वसंताच्या उंबरठ्यावर..

रविंद्र रुपन्'s picture
रविंद्र रुपन् in जनातलं, मनातलं
4 Dec 2012 - 12:31 pm

(या मालीकेचा पहीला धागा http://www.misalpav.com/node/23312)
हा सारा अद्भुत स्वप्नांचा प्रदेश आहे. धुक्याने वेढलेल्या गर्द पर्वतराजींचा. धूसर. जाणीव-नेणिवेच्या सीमारेषेवरचा. स्वप्नाळू डोळ्यांनी स्वतःलाच न्याहाळणारा मुग्ध आसमंत. काळ वसंताच्या पहिल्या चाहुलीचा. वेळ रात्र व दिवस ह्यांच्या मधली. स्थळ-काळाप्रमाणे ‘ती’ देखील कौमार्य-यौवन, निरागसता-आत्मभान ह्यांच्या संधिप्रदेशात उभी. वसंतातल्या तांबुस पिंपळपानाइतकी नाजुक अन् कोवळी. आणि तिच्या मनात हळुवार उमलणारा तो पहिल्यावहिल्या प्रेमाचा अस्फुट अंकुर!
आतापर्यंत जगातल्या कितीतरी कवींनी ह्या विषयावर कविता केली असेल. ‘प्रणयचंचला त्या भ्रूलीला, अवगत नव्हत्या कुमारिकेला’ असं बालकवी जिच्याबद्दल म्हणतात ती फुलराणी हीच. ‘ती डोलत होतीशी डोलत नव्हती’ न् फुलंच जिच्याशी बोलत होती ती आरती प्रभूंची ‘उधळणगंधा’ म्हणजे हिचीच जुळी बहीण असणार.
इतकं कोमल, भावविभोर चित्रण कवितेत शोभतं. कारण अशा कवितांचा आस्वाद हा एक नितांत खाजगी अनुभव असतो. पण आम पब्लिकसाठी बनविलेल्या हिंदी सिनेमाच्या गाण्यात एवढी तरलता?
सिनेमाही तसा अगदी कायमचा वळचणीवर टाकलेल्या प्रकारातला.‘शंकर हुसेन’ नावावरून तर कसलाच बोध होत नाही. मूळ सिनेमा, किमान त्यातल्या गाण्यांच्या चित्रीकरणाचा भागही कुठे उपलब्ध-सहजगत्या तरी- नाही. पण असं असलं तरी ‘शंकर हुसेन’ हे नाव सिनेमाच्या इतिहासात आब राखून आहे ते त्यातल्या क्लासिक गाण्यांमुळेच.

खय्यामचं अलौकिक संगीत, लता-रफीचे स्वर्गीय आवाज, जाँ निसार अख्तर, कमाल अमरोही ह्यांची प्रतिभा यांचं त्यांत अफलातून मिश्रण झालंय. जिवाचा कान आणि तृषार्त धरतीचं मन करून ऐकावी अशी ही गाणी.

अपने आप रातोंमे चिलमने सरकती हैं

हे ऐकलं की कुठल्याशा गूढरम्य महालातील रेशमी, सळसळते पडदे सरकल्याचे आवाज आपल्याला स्वच्छ ऐकू येतात. लताचं आणखी एक गाणं आहे - कुठेतरी धुक्यात लपेटलेली नदी दिलरुबा वाजवतेय आणि तू माझ्यापासून थोड्याशा अंतरावरून निघून जातोस. दिसत नाहीस मला, पण तुझ्या पावलांचा प्रतिध्वनी माझ्या काळजात उमटतो....

आप यूँ फासलोंसे गुजरते रहें
दिलसे कदमोंकी आवाज आती रहीं, आप यूँ...

आणि ह्या सर्व गाण्यांवर कळस चढवणारं कहीं एक मासूम हे गाणं. एका सुंदर, नाजुक, निरागस, सावळ्या मुलीचं, तिच्या चित्तवृत्तींचं चित्रण करणारं. तिच्या स्पंदनांशी लय साधणारा रफीचा आवाज. त्यात पुरुषी दिमाख नाही, फ्लर्टिंग नाही, तिच्याविषयी असोशीने बोलणारा पण तिच्या कुँवारपणाची आब राखणारा असा हा आवाज.
खरं तर हे सारं स्वप्नरंजन चाललंय्. अशी मुलगी खरंच कुठे आहे का माहीत नाही. त्याला आणि आपल्यालाही. पण ती तशी असावी असं त्याला वाटतं, प्रत्येक पुरुषाला वाटतं. हे पुरुषाच्या नजरेनं केलेलं एका नवयौवनेचं चित्रण आहे, पण गंमत म्हणजे त्यात शारीरतेचा भाग नाही. साऱ्या गाण्याभर ती दिसते, भासते, पण जाणवतात त्या फक्त तिच्या मनातल्या ऊर्मी.
कधी ती झोपेतच हसते. कधी गाढ झोपेत पडलेल्या स्वप्नामुळे तिचं नाजुक हृदय पिळवटतं. तिच्या हलचालींनी उशा खाली कोसळतात. आहेच. कुठेतरी आहेच ती नाजुक, सुंदर मुलगी. माझं स्वप्न पाहणारी---
झोपेतून उठली तरी ती खऱ्या अर्थाने जागी होत नाही. रात्री तिला छळणारी स्वप्नं दिवसाच्या घराच्या छतावरून तिला खुणावतात, लोभावतात. अंतःकरणाच्या सखोल शांततेत अचानक कितीतरी वाद्यांच्या तारा झणाणतात. (माझ्या आठवणींचा वारा सुटलाय ना?) ते स्वर तिच्याशी बोलू लागतात. मग तीही मंद सुरांत हलके हलके गुणगुणू लागते (माझं गाणं, आणखी काय?) आहेच. कुठेतरी आहेच......
माझी आठवण छळायला लागली की ती हिम्मत करून मला पत्र लिहायला बसते. पण लिहिणार काय अन् कसं? विचारणार तरी कोणाला? तिची बोटं थरथरतात. लेखणी खाली पडते. पण त्याने मनातल्या उर्मी थोड्याच थांबणार? ती पुन्हा लेखणी उचलते. पण हाय! काय लिहायचे ते तिला कुठे ठाऊक आहे? शेवटी हातातला कागद कोराच राहतो. आपल्या वहीवर माझं नाव लिहून ती थांबते. चला, म्हणजे माझ्याशी नातं जोडलं तर....

(गुलजारची एक नज्म आहे. कवि कविता लिहायला बसतो. शब्द फुलपाखरासारखे अवतीभवती भिरभिरतात, पण कागदावर उतरायला कुणीच तयार होत नाहीत. शेवटी आपल्या प्रियेचे नाव लिहून तो थांबतो. म्हणतो, याहून चांगली कविता तरी कोणती असणार?)

माझ्या प्रेमाचा ज्वर तिला आता चढायला लागलाय. तिचं शरीर हलके हलके तापू लागलय.तिचं मन तरी तिच्या ताब्यात राहिलंय कुठे? ती चालते एकीकडे तर तिचे पाय भलतीकडेच पडतात. गळ्यातला दुपट्टा जमिनीवर लोळतो. काळवेळाचं भानही तिला राहिलेलं नाही. (ज्वर डोक्यात गेल्यावर, त्यावर परिणाम झाल्याशिवाय कसा राहील?)
अशी ही निरागस, प्रेमामुळे अंतर्बाह्य सुंदर झालेली सावळी मुलगी. मला तिचं सावळेपण जास्तच भावतं. कारण कृष्ण, द्रौपदी, विठ्ठल ह्यांची पूजा करणाऱ्या ह्या उष्ण कटिबंधाच्या प्रदेशात एरवी गोऱ्या त्वचेचं वारेमाप कौतुक उगाचच होत असतं. (गीतकारही बहुत खूबसूरत, मगर साँवली सी, असं म्हणतो, पण ‘मगर’ हा शब्द त्याने केवळ मात्रांच्या सोईसाठी वापरला आहे असं मी मानतो.)

मुळात मुग्ध, प्रेमाचा अर्थ न कळण्याइतपत भाबडी अशी ही मुलगी. पण आता आपल्या शरीर-मनात सामावू पाहणाऱ्या प्रेमाशी एकरूप झालीय. प्रेमाच्या रंगात रंगलीय. गाण्याच्या चार मिनिटांत तिच्यातले हे स्थित्यंतर आपल्याला जाणवते आणि हेही कळते की ती दुसरीतिसरी कुणी नसून तो आपल्याच मनाचा नितांतकोमल विभ्रम आहे.

खोल गाभाऱ्यात घंटा वाजली की त्या नादाची वलयं पुढे कितीतरी वेळ कानात दुमदुमतात. तसंच चांगलं काव्य ऐकल्यावरही त्यातून उमलणाऱ्या अर्थांची असंख्य वलयं शब्दांमधल्या सांध्यांतून निसटून आपल्या भेटीला येतात. नाही का?

कही एक मासूम नाजुक सी लडकी
बहुत खुबसुरत मगर सांवली सी

मुझे अपने ख्वाबों की बाहों में पाकर
कभी नींद में मुस्कुराती तो होगी
उसी नींद में कसमसा-कसमसाकर
सरहाने से तकिये गिराती तो होगी

वही ख्वाब दिन के मुंडेरों पे आके
उसे मन ही मन में लुभाते तो होंगे
कई साझ सीने की खामोशियों में
मेरी याद से झनझनाते तो होंगे
वो बेसख्ता धीमें धीमें सुरों में
मेरी धुन में कुछ गुनगुनाती तो होगी

चलो खत लिखें जी में आता तो होगा
मगर उंगलियाँ कंपकपाती तो होगी
कलम हाथ से छुट जाता तो होगा
उमंगे कलम फिर उठाती तो होंगी
मेरा नाम अपनी किताबों पे लिखकर
वो दातों में उंगली दबाती तो होगी

जुबाँ से कभी अगर उफ् निकलती तो होगी
बदन धीमे धीमे सुलगता तो होगा
कहीं के कहीं पाँव पडते तो होंगे
जमीं पर दुपट्टा लटकता तो होगा
कभी सुबह को शाम कहती तो होगी
कभी रात को दिन बताती तो होगी

(मिपाकरांनो, मनःपूर्वक धन्यवाद! आपण माझ्या लेखमालेचे उत्साहात स्वागत केले. होय, प्रत्येक लेखानंतर 'क्रमशः' लिहिलेले असो की नसो, ही लेखमालाच आहे.तिचे स्वरूप लेखागणिक उलगडत जाईल. प्रत्येक लेखासोबत गीताचे शब्द व त्याच्या ऑडिओ/ व्हिडीओ क्लीपची जोडणी दिली जाईल. आपण गाणे पाहावे/ऐकावे, त्याचे शब्द समजून घ्यावेत व त्याच्या रसग्रहणातून त्याचे सौंदर्य उलगडावे- अशा तिहेरी आस्वादातून त्याचा संपूर्ण आनंद आपल्याला घेता यावा अशी कल्पना आहे. ती तुम्हाला किती भावते हे समजून घेण्यास मी उत्सुक आहे.)
या गाण्याची युट्युब जोडणी.http://www.youtube.com/watch?v=m9CNGJj0bcs

कलाअनुभव

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

4 Dec 2012 - 3:24 pm | संजय क्षीरसागर

त्यातून असं बिनचूक लेखन सध्या दुर्लभ आहे.

तुमचा व्यासंग उत्तम आहे तो असाच वाढवत न्या. लगे रहो

पैसा's picture

4 Dec 2012 - 10:00 pm | पैसा

फार उत्कट भावना तरलतेने व्यक्त केल्यात. या गाण्याशी नातं जोडणारं अलिकडच्या काळातलं एक गाणं, "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" या गाण्यात आवाज, संगीत यापेक्षा त्यातल्या शब्दांकडेच आधी लक्ष जातं. तसंच जुन्या काळातलं एक अत्युकृष्ट गाणं "जलते हैं जिसके लिये."

धन्यवाद! हा प्रवास असाच सुरू राहू दे!

जाई.'s picture

4 Dec 2012 - 10:08 pm | जाई.

सुंदर लिखाण

रविंद्र रुपनु....काय नाव आहे.

खर तर इथे "कुछ दिल ने कहा" टाकायची फार इच्छा झाली होती, पण तुम्ही पुढे कुठे तरी या गाण्याबद्दल लिहाल म्हणुन टाकत नाही आहे.

फार तरल शब्द.

चौकटराजा's picture

5 Dec 2012 - 5:24 am | चौकटराजा

हे गीत रफी साहेबानी अतिशय उत्कटतेनं गायलंय ! शायराचे अल्फास रसिकापर्यंत नेण्यात रफी माहीर होते. उदा - नही उमरकी नयी फसल मधील " कारवा गुजर गया" हे गीत असो की प्यासा मधले जला दो जला दो जला दो ये दुनिया असो.

आपले लिखाण अगदी सोनेपे सुहागा असे आहे. निवडलेले गीत व आपले विवेचन दोन्ही माशाल्ला !

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2012 - 5:44 am | अत्रुप्त आत्मा

पुन्हा एकवार सलाम ...

वाचतोय

जेनी...'s picture

5 Dec 2012 - 6:32 am | जेनी...

:)