रामचंद्र गुहा हे भारतातील सर्वात लोकप्रिय इतिहासकार आहेत. ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक. भारत म्हणजे प्रचंड अंतर्विरोध व कमालीची बहुविधता. असे असूनही हा देश एकत्र कसा राहू शकला, हा त्या पुस्तकाचा विषय. गुहा याचे श्रेय येथील सामान्य माणसाची जिद्द, लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता, एकसंघ बाजारपेठ अशा अनेक घटकांना देतात. सरतेशेवटी ते म्हणतात,
“जोपर्यंत हिंदी सिनेमे पाहिले जातात व त्यांची गाणी गायली जातात, तोपर्यंत भारत टिकून राहील.”
हिंदी सिनेमा व त्यातील गाणी यांना आपल्या आयुष्यातून वेगळे करताच येणार नाही. कधीकधी तर मूल जन्मल्यावर त्याच्यावर होणारा पहिला संस्कार हा हिंदी गाण्याचा असतो. (लेबर रूममध्ये डिलिव्हरी करताना जुनीनवी हिंदी चित्रपट गीते ऐकणारे रसिक डॉक्टर्स माझ्या परिचयाचे आहेत.) ते मूल कुठेही वाढू दे, आदिवासी पाड्यावर, झोपडपट्टीत, गावकुसाबाहेर की बंगल्यात - त्याच्या अवतीभवती चित्रपट संगीत असतेच. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते आपल्याला नव्याने भेटते. नव्याचा स्वीकार करण्याएवढे आपण तरूण राहिलेले नसू तर आपल्या आवडत्या काळातील संगीत आपल्याला पुन्हा पुन्हा भेटते. शाळा-कॉलेजात, पिकनिक पार्ट्यांमध्ये, लग्नसराईत, वाढदिवसाला, धार्मिक समारंभांपासून ते श्रध्दांजली कार्यक्रमांपर्यंत सर्वत्र ते आपल्या जीवनात सामावलेले असते. जणू या चित्रपटगीतांच्या निमित्ताने जीवनच आपल्याला हरघडी पत्र पाठवीत असते. ते पत्रही कसले?
कवी नीरजच्या शब्दात –
फूलोंके रंगसे, दिलकी कलमसे,
तुझको लिखी रोज पाती (चित्रपट – प्रेमपुजारी, १९७०)
ही सुगंधी फुले आपल्या आयुष्यात त्यांचे रंग, गंध घेऊन येतात, आपल्या आयुष्याशी असे मिसळतात -
--जैसे की माला में धागा
---फुलं ओवता ओवता धागाही सुगंधी होऊन जातो.
प्रत्येकाचं स्वतःचं असं खासगी आयुष्य असतं. जगरहाटीच्या पलीकडे एक नितांत खासगी कोपरा असतो. सिमेंटविटांच्या घराच्या पलीकडे एक स्वप्नातलं घर असतं. त्याचं वर्णन गुलजार नेमक्या शब्दात करतात---
थोडी-सी जमीं थोडा आसमाँ,
तिनकों का बस इक आशियाँ
भारतीय माणसाच्या स्वप्नघराच्या भिंती या हिंदी सिनेमाच्या गाण्यांनी बनलेल्या असतात. प्रत्येकाची आवडती गाणी, त्याचा कालखंड, लाडके गायक-गायिका संगीतकार असतात. अमुक गाण्याचं चित्रिकरण दिग्दर्शकाने केलं, की त्याच्या अमक्या असिस्टंटने, त्यामुळे त्याला कसा उठाव आला किंवा ते पडलं, अशा असंख्य गोष्टींची चर्चा आपण करतो. गाण्याच्या सेटवर किती खर्च झाला, तमक्या गाण्यात हिरॉइनने किती ड्रेस बदलले, त्यातून फॅशनचा ट्रेण्ड कसा बदलला हेदेखील वादाचे, जिव्हाळ्याचे विषय होतात.
या सर्वातून एक महत्त्वाचा घटक बरेचवेळा दुर्लक्षित राहतो – गीतकार आणि गाण्याचे शब्द, त्यांचा आशय. टीव्हीच्या पडद्यावर, वाद्यवृदांत, खासगी - सार्वजनिक मैफिलींमध्ये गाणे सादर करताना क्वचितच कुणाला गीतकाराच्या श्रेयाची आठवण होते. वास्तविक हिंदी-उर्दूतील अनेक मान्यवर कवी-शायरांनी हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. नीरज, साहिर, जाँ निसार अख्तरपासून ते गुलजार व‘उमरावजान ’ फेम ज्ञानपीठ विजेते शहरयार यांच्यापर्यंत अनेक नावे घेता येतील. त्यांची गाणी आपल्या तोंडी बसली पण त्या गीतांचे काव्यगुण कुणी फारसे उलगडून दाखवले नाहीत. जिथे नेहमीचे शब्द, संवाद संपतात तिथे काव्याची सुरुवात होते. म्हणून हिंदी सिनेमातही अतिशय तरल किंवा दाहक संवेदना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असेल तेव्हा चांगला लेखक, दिग्दर्शक गीताचा आश्रय घेतोच. कधीकधी विशिष्ट पात्राची भावस्थिती इतकी उत्कट असते की ती काव्यरूप घेतेच.
ग्रामीण भारताचे सारे जीवन पावसावर अवलंबून आहे. येथे पाणी हे सर्वार्थाने जीवन आहे. ग्रीष्माचे दाहक तडाखे सोसल्यावर आसुसलेल्या धरतीवर पावसाचे पहिले थेंब पडतात, तेव्हा स्वाभाविकच मनं आनंदानं उसळतात, पावलं ठेका धरतात, शब्द उमटतात-
हो उमड – घुमड कर आयी रे घटा ....
(भरत व्यास, दो आँखे बारह हाथ, १९५८)
या दृश्याच्या ऐवजी सिनेमातील पात्रे एकत्र येऊन परस्परांना ‘किती छान पाऊस पडतो आहे, नाही?’ असे विचारताहेत अशी कल्पना करून पहा, म्हणजे काव्याचं महत्त्व समजेल. किंवा ‘१९४७ अर्थ’ या चित्रपटातलं हे गीत आठवून पाहा...
भारत-पाकिस्तान फाळणीचा काळ. लाखों माणसांची कत्तल, कोट्यवधी देशोधडीला लागलेले, माणसांचे माणूसपण संपून आदीम, आसूरी, रक्तपिपासू टोळ्याच फक्त उरलेल्या. एक न संपणारी काळोखी रात्र, साऱ्या जगाला व्यापून उरलेली. दबा धरून बसलेली हिंस्र रात्र. तो भाव व्यक्त करायला शब्द येतात –
रात की दलदल हैं गाढी रे, धडकन की चलें कैसे गाडी रे
सहमी-सहमी ये दिशाएँ.... जैसे कुछ होने को है....
ये हवाएँ जाने क्या होने को है...मौत छुपी झाडी झाडी रे (जावेद अख्तर, १९९९)
स्त्री-पुरुषांमधले प्रेम, आसक्ती, विरहव्याकुळता, माणसाची स्वातंत्र्याकांक्षा, तारुण्यातील निर्भरता, निसर्गाच्या विविध रुपांशी तादात्म्य, भक्ती असे कितीतरी भाव चित्रपटगीते प्रगट करीत आली आहेत. काळानुसार त्याच्यावर पडलेल्या फरकावरून त्या त्या काळाचा पोत तपासून पाहता येईल. कोणत्या काळात कोणते गाणे लोकप्रिय झाले, कोणते उत्तम गाणे तेव्हा दुर्लक्षित राहिले, पण कालांतराने लोकांना त्यात अविट गोडवा गवसला, या साऱ्या बाबी खरं तर समाजशास्त्रज्ञांना आव्हानास्पद वाटायला हव्यात. (अनेक देशांत पॉप कल्चर, पॉप्युलर कल्चर ही एक महत्त्वाची विद्याशाखा मानली जाते.) मराठीपुरता विचार केला तर नाट्यसंगीत, गीतरामायण व संदीप-सलीलच्या रचना कोणत्या काळात लोकप्रिय झाल्या, समाजातल्या कुठल्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले, यातून बरेचसे समाजशास्त्रीय शोध लागू शकतात.
मी समाजशास्त्रज्ञ नाही, काव्यशास्त्रातील जाणकार नाही, हिंदी-उर्दूतला तज्ज्ञ नाही. मी फक्त एक सजग रसिक आहे. मला जे भावले ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे. आपल्या आयुष्यात रंग पेरणारे ज्ञात-अज्ञात गीतकार, कवी, संगीतकार ह्यांच्याविषयी माझ्या मनात अपरंपार कृतज्ञता आहे. या लेखमालेतून मी हिंदी चित्रपटगीतांचा काव्य म्हणून, आधुनिक लोकप्रिय संस्कृतीचा आरसा म्हणून विचार करणार आहे.
मला जाणवलेले काव्य सौंदर्य उलगडून तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ते वाचताना तुमच्या मनातही अशी अनेक सौंदर्यस्थळे जागी होतील, जुन्या स्मृतींना नवे संदर्भ लगडतील, आणखी काय हवे ? तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहेच. त्याशिवाय संवाद पूर्ण कसा होणार?
प्रतिक्रिया
3 Dec 2012 - 11:45 am | पियुशा
आवडले :)
3 Dec 2012 - 12:44 pm | पैसा
मिपावर स्वागत. लिखाण आवडले आहे. थोड्या वेळात माझ्याकडून काही भर घालते. ही लेखमालिका आहे का? क्रमशः राहिले वाटते!
3 Dec 2012 - 1:25 pm | अत्रुप्त आत्मा
फार छान ... आणी अतिशय चांगल्या विषयाला सुरवात केली आहे आपण,पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....... :-)
3 Dec 2012 - 3:34 pm | स्पंदना
बादल बिजली चंदन पानी ऐसा अपना प्यार
लेना होगा जनम हमे कई कई बार ।
रवींद्र साहेब पहिल्या गाण्यातच आम्ही आउट. आता रात्रभर याच गाण्यावर हिंदोळत आंदोळत.
लेख अगदीच सत्याला धरुन. अगदी लहाणपणापासुन चित्रपट अन गाणी खरच आपल्या जीवनाचा भाग होउन जातात. आपण व्यक्तही होतो या गाण्यातुनच.
चला तुमच्या लेखालाही असा गाण्यातुनच सलाम
कसे कोठुनी येतो आपण
कसे न कळता जातो गुंतुन
क्षणात हसतो क्षणात रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर..
3 Dec 2012 - 4:35 pm | परिकथेतील राजकुमार
हे अगदी 'पहिल्या पेगलाच आउट' ह्या चालीवरती वाचावेसे वाटले.
लेखन उत्तम. पहिलाच प्रयत्न असल्याने आणि सध्या मिपावरती 'वाचनीय' अक्षरांचा तुटवडा असल्याने आपले लिखाण अंमळ जास्तीच आवडले.
3 Dec 2012 - 4:07 pm | सस्नेह
सुरेख लेखन्.थोडी अजुन सुसूत्रता यावी.
गीतकार अन गाणी म्हटल्यावर हे गीत आठवले.
कारी कारी कारी अंधियारी थी रात
इक दिनकी बात
जब सघन गाग्न्पे घननननननन गर्ज उठे
गरज उठि सावनकी घटा घुंगटमे छुपाकर चपल चपल बिजलीकी छटा
इक नार तिखि तलवार या थी वो कटार
करके सिंगार चलि उस पार जहां थे उसके किशन मुरार..
चित्रपट नवरंग
3 Dec 2012 - 6:36 pm | किसन शिंदे
मिपावर स्वागत!
आधी वाचला होताच आता परत वाचला. :)
पुढील लेखांच्या प्रतिक्षेत...
3 Dec 2012 - 8:12 pm | ५० फक्त
लई भारी,काळजाजवळचं लिहिलंय,क्रमशः असावं ही अपेक्षा खोटी ठरवु नका.
4 Dec 2012 - 12:12 pm | रामदास
सहमत .
कुठेतरी एखादा समानधर्मा सापडल्याचा आनंद झाला.
पुलेशु आणि पुभाप्र.
4 Dec 2012 - 12:37 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला आणि पटलाही..
मिपा वर स्वागत!
स्वाती
4 Dec 2012 - 5:07 pm | चौकटराजा
मी फक्त एक सजग रसिक आहे. हेच महत्वाचे आहे हो. असे लेणे या धरेवर विकत मिळत नाही.ते येतानाच आणले जाते.
4 Dec 2012 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार
लेण्याद्री
परा
4 Dec 2012 - 5:28 pm | स्पा
सुरेख, सहज
आवडलं