यकु

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
19 Nov 2012 - 9:07 pm

यकु गेला.
इथल्या अनेकांशी बोलून, भांडून, मनात येईल ते येईल तेव्हा बेधडक सांगून.
मैत्री करून. पंगे घेऊन. शाब्दिक हाणामार्‍या करून. म्हणतात तसं, एक तर आपण त्याचे मित्र झालो, किंवा शत्रू; पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं.

यकु गेला.
अनेक अर्धवट गोष्टी मागे ठेवून. अनेक प्रश्न घालून. एका अत्यंत बुद्धीमान माणसाचं हे असं का व्हावं हे त्यातलं सगळ्यात मोठा प्रश्न.
अखेरीस त्याच्या मनात काय होत होतं हे आता नीटसं कधीच कळायचं नाही. त्याचे अलीकडचे विचार ऐकून, त्याच्याशी बोलताना नेहमीच याचा हा असा काहीतरी शेवट असेल हेच वाटत राहायचं. ते तसं होऊ नये, यासाठी कोणालाही काही करायलाही वाव न ठेवता, प्रचंड अस्वस्थ करून यकु गेला.
गेलाच.

काय केलंस यकु? राग येतो आहे तुझा. खूप राग येतो आहे.

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

राही's picture

20 Nov 2012 - 11:25 am | राही

सव्विसावं वर्ष हे काय वय आहे का जाण्याचं? स्वप्नांचा गालिचा एका बाजूने उलगडता उलगडता दुसर्‍या बाजूने तो त्याची गुंडाळीही करू लागला होता हे त्याच्या लेखनावरून सतत जाणवत होतं. त्याला मदतीची तीव्र गरज असावी असंही जाणवत होतं. मी फारच दूरस्थ,जालावरचा संपर्क केवळ वाचनमात्रतेचा.पण निकटच्या सुहृदांकडूनही अशी मदत या मनस्वी माणसाने स्वीकारली नसतीच कदाचित.त्यापेक्षा गुंगारा देणंच पसंत केलं त्याने, कसं फसवलं सगळ्यांना असं म्हणून.
तो जे काही कदाचित शोधीत होता ते आता तरी त्याला लाभो.
किंवा जे काही त्याला सापडलं होतं ते सदैव त्याच्याजवळ राहो.

कवितानागेश's picture

20 Nov 2012 - 11:33 am | कवितानागेश

आत्ता कळतय, आत्महत्या करणे हा खरोखर मोठा गुन्हा आहे.
त्याची शिक्षा कायम भोगावी लागते........मागे उरलेल्या सगळ्यांना.

काल बातमी समजल्यापासून सुन्न झालेय !

अतीबुद्धिमान आणि अतीसंवेदनशील व्यक्तीचा असा शेवट होण्याचे ओळखीतले हे तिसरे उदाहरण !

यकु, फसवलंस रे !

हिटलर's picture

20 Nov 2012 - 11:46 am | हिटलर

विनम्र श्रद्धांजली

किसन शिंदे's picture

20 Nov 2012 - 11:47 am | किसन शिंदे

दोन तीन वेळा ठरलेली भेट कँसल झाली. सुधागडच्या वेळी भेटेल असं वाटलं होतं पण तो आलाच नाही.

शेवटी भेट राहीलीच. :(

यकू!
राजा, आता जिथे असशील तिथे तरी निवांत बस .

पप्पु अंकल's picture

20 Nov 2012 - 11:51 am | पप्पु अंकल

भावपूर्ण श्रद्धांजली...

अमृत's picture

20 Nov 2012 - 11:58 am | अमृत

हे असं वागताना या बुद्धीमान लोकांना आपल्या माय बापाचा, बायका पोरांचा कसाकाय विसर पडतो? केवळ स्वतःची सुटका करून घ्यायची आणि इतरांना आयुष्यभर पुरणार्‍या दु:खात लोटून जायचं..

मृतात्म्यास श्रद्धांजली :-(

नुकतच एका जवळच्या नातेवाईकानी सुद्धा असाच वेडेपणा केला... अप्पलपोटे लेकाचे

विसुनाना's picture

20 Nov 2012 - 11:59 am | विसुनाना

धक्कादायक आणि दु:खद बातमी.
एका उमद्या तरुणाचा अकाली अंत - हा मानसिक अपघातच झाला म्हणायचा त्याला.

अविनाश पांढरकर's picture

20 Nov 2012 - 12:02 pm | अविनाश पांढरकर

काय बोलायचं अशा वेळी कळत नाही. असो. श्रद्धांजली !!

वाईट वाटलं, पण आश्चर्य नाही. गणराजच्या कट्ट्यानंतर त्याला सोडायला गेलो होतो शिवाजीनगर पर्यंत. त्या पंधरा मिनिटात जेवढं शक्य होतं तेवढं समजावलं, कारण भिती होती, उघडला गाडीचा दरवाजा आणि खाली उडी मारली तर काय घ्या ? तोंडदेखलं तरी हो हो म्ह्णाला होता, नीट राहेन, नविन नोकरी पाहतो वगैरे वगैरे.

त्याच्या धाग्यावर ब-याच वेळा उघड उघड विरोध केला होता या गोष्टीत अडकु नये म्हणुन. असो.

तरी अजुन लग्न केलेलं नव्हतं ही एक चांगली गोष्ट,त्याच्या आई वडीलांना काय वाटत असेल हा प्रश्न आहेच, त्याला वर म्हणल्याप्रमाणे काळ हेच एक औषध आहे.

यकु साहेब, आयुष्याच मातेर केलत अश्या आत्महत्येने.
रडवुन व काळजाला चटका लावुन गेलात.
तुमच्या आत्म्यास शांती लाभो हिच देवाचरणी नम्र विनंती.

चेतन माने's picture

20 Nov 2012 - 12:41 pm | चेतन माने

भावपूर्ण श्रद्धांजली :(

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Nov 2012 - 12:41 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आत्महत्या!!!!
:(
कां? कां?

पिंगू's picture

20 Nov 2012 - 12:51 pm | पिंगू

:( का रे बाबा इतका जीवनाला वैतागला होतास.. फक्त एकदाच फोनवर बोलणं झालं होतं रे आपलं.

michmadhura's picture

20 Nov 2012 - 12:53 pm | michmadhura

मिपावर आल्यावर पहीला मैत्रीचा हात देणारा यक्कु आज नाहीये ह्यावर विश्वासच बसत नाहीये. खूप सुन्न करून गेलास रे यक्कु.

सस्नेह's picture

20 Nov 2012 - 12:54 pm | सस्नेह

मृत्यूनंतर तरी तो जे शोधत होता ते त्याला मिळो.

आज अत्यंत चीड येतेय स्वतःची.. त्याच्या भरकटलेल्या धाग्यांवर त्याची खिल्ली उडवणार्‍या प्रतिक्रीया वाचून करमणूक व्हायची, त्याची.. हळूहळू त्याचाशी होणार्‍या खव-गप्पा कमी केल्या/झाल्या, ह्याची.. कशाला, त्याच्या भरकटलेपणावरुन सुचलेल्या कवितेची.. सगळ्याचीच.. सॉरी दोस्ता, तूला समजून घेण्यात आमचीच संवेदनशीलता कमी पडली असेल कदाचित. तू तर साला, "एकदा मरण्याचा अनुभव घेऊन बघूयात" म्हणूनही कदाचित त्याच्या कुशीत झेपावला असशील.. असो, आहेस तिथे तरी सुखात, आनंदात रहा..

गुमनाम's picture

20 Nov 2012 - 2:12 pm | गुमनाम

वैयक्तीक परिचय नव्हता. पण वाईट वाटले. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.

पैसा's picture

20 Nov 2012 - 2:13 pm | पैसा

हारुन शेख's picture

20 Nov 2012 - 2:55 pm | हारुन शेख

खूपच धक्कादायक बातमी. खूप कलंदर व्यक्ती होते यकु. मिपावर आल्या आल्या पहिलं स्वागत त्यांनीच केलेलं. मनाचा तो दिलखुलासपणा आवडला होता. असं खरंच काय घडलं की त्यांनी आयुष्य असं अर्ध्यावर संपवावं. वाईट..वाईट.. वाईट्ट ... वाटतंय एकदम.

राजघराणं's picture

20 Nov 2012 - 3:12 pm | राजघराणं

वांझोट्या दु:खाला काही अर्थ आहे का ? अध्यात्म काय करत शेवटी ? मझ्या बुद्धीपलिकडे आहे सगळ

बॅटमॅन's picture

20 Nov 2012 - 3:55 pm | बॅटमॅन

या यकुमुळे मी मिपावर आलो. त्याआधी गूगल बझवरून ओळख झाली होती. ओशो, यूजी आणि एकूणच अध्यात्म या विषयांवरून झालेली ओळख पुढे वाढत गेली, नंतर प्रत्यक्ष तो एकदा भेटलादेखील. पण कुठेही तो इथपर्यंत जाईल, असे कधीच वाटले नव्हते. त्याचे लिखाण सटकल्यागत वाटत असे, त्याचा स्वभाव मनस्वी आहे हेदेखील जाणवत असे पण ते लिखाणातूनच...प्रत्यक्ष भेटला तेव्हा किंवा चॅटवरदेखील तो एकदम संयमी वाटत असे, बाकीच्या इडिओसिंक्रसीज इतक्या थराला जातील असं कधीच वाटलं नाही. पण यक्याला त्याचा ड्यू असलेला बेनिफिट ऑफ डौट मिळावा म्हणून, त्याला शिव्या घालण्याऐवजी तो जिथे आणि जशा रूपात असेल तसा असो, पुढील उपक्रमांसाठी सुयश चिंतितो. मे ही रेस्ट इन पीस.....

(नि:शब्द) बॅटमॅन.

शिवाजी नाठे's picture

20 Nov 2012 - 4:03 pm | शिवाजी नाठे

आतून आलेले लेख व प्रतिक्रया मधून कळलेला एका अनोळखी व्यक्ती मुळे डोळ्यात पाणी आले. रात्री झोपण्या पूर्वी वाचलेली वाईट बातमी वाचून डोक्यात "एवढे विचारी लोक एवढा टोकाचा व अविवेकी विचार का करत असतील" या प्रश्नाने काहूर माजवले. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो एवढीच प्रार्थना.

श्यामल's picture

20 Nov 2012 - 4:09 pm | श्यामल

असे काय घडले असावे कि ज्यामुळे यकुसारख्या बुध्दिमान आणि उमद्या व्यक्तिमत्वाला उण्यापुर्‍या २६ वर्षांच्या आयुष्याची अखेर करण्याचा असा अविवेकी निर्णय घ्यावा लागला ? असा अघोरी, आत्मघातकी निर्णय घेणार्‍यांच्या मनात मागे रहाणार्‍या आपल्या सुह्रदांवर आपल्या जाण्याने काय परिणाम होऊ शकेल याचा एक क्षणभरही विचार येत नाही का ? आत्महत्या हा सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे असे का वाटते आजकालच्या ह्या तरुण पिढीला ?.......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2012 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धक्का देणारी बातमी समजल्यापासून अनेक मिपाकर मित्रांप्रमाणे मलाही तितकाच किंबहुना अधिकचा त्रास होतोय. सारखा अस्वस्थपणा. 'सर यशवंत बोलतोय, म्हणुन जे सुरु व्हायचा की पुछो मत' अशात म्हणजे पंधरा एक दिवसापूर्वी त्याला चार-पाच वेळेस फोन केला तरी त्याने फोनला उत्तर देत दिले नाही. बहुतेक अगोदर कधी असं झालं नाही. आणि नंतरही त्याचा फोन आला नाही. आणि कळलं ते असं अचानक.

त्याच्या अगम्य, अद्भूत गोष्टींपासून,दुर ठेवण्याचे मिपाकरांनी नक्कीच प्रयत्न केले होते. त्याच्या बोलण्यातून तेही अनेकदा व्यक्त झालं होतं. पण, सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात, हेच खरं....! असं काही होईल असं वाटलं नाही. सर्वांना फसवलं. येडपट साला.

-दिलीप बिरुटे

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Nov 2012 - 6:33 pm | चेतन सुभाष गुगळे

मनाचा रोग आधी आहे, शरीराचा रोग व्याधी आहे, पदाचा रोग उपाधी आहे आणि या तीनही रोगांवर औषध समाधी आहे. ज्ञानवंतांचा विश्वास आधी, व्याधी, उपाधी यावर नसतो, तर समाधीवर असतो. समाधी म्हणजे आपण स्वत: मृत्यूला दिलेले निमंत्रण असते.

मृत्यू आणि समाधी यात फरक आहे. जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करणे म्हणजे मृत्यू आहे आणि जीर्ण वस्त्र टाकणे; पण नंतर नवीन वस्त्र धारण न करणे म्हणजे समाधी आहे.

दिवंगत पत्रकार व सक्रिय मिसळपाव सदस्य श्री. यशवंत एकनाथ कुलकर्णी हे खर्‍या अर्थाने ज्ञानवंत होते.

विसुनाना's picture

20 Nov 2012 - 7:07 pm | विसुनाना

या धाग्यावर वाद नकोत हे जरी खरे असले तरी तुमचे म्हणणे पटत नाही. आणि असे भलतेच विचार आपणही करू नयेत ही विनंती.
२६ वर्षे वयाचा मुलगा जेव्हा हकनाक जातो तेव्हा त्याच्या घरच्यांना, जवळच्यांना हे 'ज्ञानवंत' इत्यादींसारखे विचार किती चटके देत असतील हे ध्यानात घ्या. अल्पानुभवाचे हे बोल बोलायला सोपे आहेत. पण ज्याचे जळते, त्यालाच कळते.
या अध्यात्माच्याच भाषेत उत्तर द्यायचे तर - चार पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम आणि त्यानंतर मोक्ष.
एकदमच मोक्ष नव्हे!
यावर उपाय झाले असते आणि योग्य ती खबरदारी घेतली असती तर एका हुशार मुलाचा अंत झाला नसता.

विकास's picture

20 Nov 2012 - 7:56 pm | विकास

पूर्ण सहमत.

वरील चेतन सुभाष गुगळे यांचे मतप्रदर्शन अयोग्य वाटले.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2012 - 8:28 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2012 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

गुगळे यांचे मतप्रदर्शन अयोग्य वाटले.

विसुनाना थँक्स.

-दिलीप बिरुटे

अप्पा जोगळेकर's picture

20 Nov 2012 - 9:21 pm | अप्पा जोगळेकर

धागा काय आहे आणि आपण प्रतिक्रिया काय देतोय याचे जरा भान बाळगा. अध्यात्मावर इतर ठिकाणी चर्चा करता येईल.

स्वाती२'s picture

20 Nov 2012 - 7:18 pm | स्वाती२

आज बर्‍याच काळाने मिपावर डोकावले तर ही अभद्र बातमी! वैयक्तिक परिचय नव्हता पण तरीही काही सुचत नाहिये!खूप वाईट वाटतय.

श्रावण मोडक's picture

20 Nov 2012 - 8:11 pm | श्रावण मोडक

या जगात अशी काही मंडळी आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना मदत करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी ती वास्तवात करावी. ती करता येत नसेल तर जरूर 'शिवाजी जन्माला यावा...' ही प्रार्थना करावी. पण हे सारे उद्योग आपल्यातच मर्यादित ठेवावेत. हे उद्योग, प्रामाणिकपणे बोलायचे तर कौन्सेलिंग, असे जाहीरपणे कधी करायचे, कधी नाही याची ज्यांना जाण नाही, त्यांनी एक माध्यम मिळाले आहे म्हणून त्याविषयी काहीही लिहू नये. कारण अशा जाहीर मांडलेल्या गोष्टींचे(ही) परिणाम त्या मंडळींवर होतात. ते सकारात्मक असतात (असाच काहीसा एक प्रकार मिपावरून झाला आहे, तो इथल्याच एका जबाबदार माणसाने अत्यंत जबाबदारीने करून घेतला आहे) किंवा नकारात्मक असतात. त्यांचे व्यवस्थापन करणे म्हणजे एखाद्या माणसाला समजावणे, रागावणे, दम देणे वगैरेच्या पलीकडे असते. नकारात्मक परिणामात ती माणसे अधिक टोकाकडे जातात, आणि पुढे सारेच अवघड होऊन बसते.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Nov 2012 - 8:27 pm | बिपिन कार्यकर्ते

:)

कवितानागेश's picture

21 Nov 2012 - 12:28 am | कवितानागेश

हम्म..

अप्पा जोगळेकर's picture

20 Nov 2012 - 9:22 pm | अप्पा जोगळेकर

वाईट झाले.

ईश्वर आत्म्यास सद्गती देवो.

बातमी ऐकल्यापासून खूप सुन्न आणि अस्वस्थ वाटले. यशवंत कुलकर्णी यांनी माझ्या का त्यांच्या (आता आठवत नाही) धाग्यावर गुरुचरीत्रातील पुढील नृसिंहसरस्वतींचे अष्टक दिले होते. मी त्याबद्दल त्यांची ऋणी आहे. तेच स्तोत्र म्हणून त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभावी अशी प्रार्थना करावी लागेल असे वाटले नव्हते.

नृसिंहसरस्वती अष्टक

इन्दुकोटीतेज करूणासिंधु भक्तवत्सलम नंदनात्रिसुनूदत्तमिन्दिराक्षश्रीगुरूम
गंधमाल्याक्षतादिवृंददेववंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||१||

मायापाशंधकारछायादूर भास्करम आयताक्ष पाहि श्रियावल्लभेशनायकम|
सेव्यभक्तवृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||२||

चित्तजादिवर्गषटकमत्तवारणांकुशम तत्वसार शोभितात्म दत्त श्रियावल्लभम|
....................................... वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||३||

व्योमतेजवायूआपभूमीकर्तुमिश्वरम काम क्रोध मोहरहित सोमसूर्यलोचनम|
कामितार्थदातृभक्त कामधेनूश्रीगुरुम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||४||

पुन्डरीकाअयताक्ष कुंदलेंदुतेजसम चंड दुरितखंदनार्थ दंडधारिश्रीगुरुम|
मण्डलीक मौली मार्तंडभासिताननम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||५||

वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्तीश्रीगुरुम नादबिंदूकलातीत-कल्पपादसेव्ययम|
सेव्यभक्तवृंदवरद भूयो भूयो नमाम्यहम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||६||

अष्टयोगतत्वनिष्ठ तुष्टज्ञानवारिधीम कृष्णावेणीतीरवासपंचनदी सेवनम|
कष्टदैन्यदूरीभक्ततुष्ट काम्यदायकम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||७||

नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तीकम हारकृत शारदेन गंगाधराआत्मजम|
धारणीक देवदीक्ष गुरुमूर्ती तोषितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||८||

परमात्मानंदश्रिया पुत्रपौत्रदायकम नारसिंहसरस्वतीय अष्टकं च यः पठेत|
घोर संसारसिंधू तारणाख्य साधनम सारज्ञानदीर्घाअयुरारोग्यादिसंपदम|
चारुवर्ग काम्यलाभ वारंवारयज्जपेत|
इति श्री गुरुचरित्रांतर्गत श्रीनरसिंहसरस्वतीअष्टकसंपूर्णम|

स्वसंपादनाची सोय दिसत नाही. वरील अष्टक/प्रतिक्रिया उडवल्यास हरकत नाही. ते अष्टक या धाग्यावर उधृत करण्याचे एकमेव कारण - अतिशय सुंदर असे ते अष्ट्क मला यशवंत कुलकर्णी यांचेमुळे सापडले. आणि मी त्यांची आभारी आहे.

विटेकर's picture

21 Nov 2012 - 10:02 am | विटेकर

कालपासून हाच धागा आणि तेच तेच प्रतिसाद पुनःपुन्हा वचतो आहे.
खूप खूप वाईट्ट वाटले.
हा एक्मेव सदस्य , ज्याच्याबरोबर मी फोनवर सम्पर्क आणि गप्पा हाणल्या होत्या.
अत्रुप्त आत्म्याच्या नर्मदा परिक्रमेबद्दल लिहित असताना...! आवडीचा विषय होता माझ्या.
मग गुप्तकाशीतील.. सुरु झाल्यावर भिती वाटते रे .. नको लिहूस असेही सांगितले होते.. पण हे असे घडायचेच होते ..!
भावपूर्ण श्रद्धांजली !
आणखी काय लिहू? चुट्पुट लागली आहे. !

५० फक्त's picture

21 Nov 2012 - 10:26 am | ५० फक्त

चुकीची दुरुस्ती - नर्मदा परिक्रमेला आत्मशुन्य गेला होता, अतृप्त आत्मा नाही.

अधिकाची माहिती - श्री. आत्मशुन्य सध्या घरी व्यवस्थित सुखरुप आहेत, त्यांचेशी संपर्क आहे. काळजी नसावी.चेपु आणि इतर ठिकाणी विविध मिपाकरांनी नर्मदा - परिक्रमा - यकु - बाबा- विलासराव - आत्मशुन्य अशी लिंक लावत काळजी व्यक्त केली होती म्हणुन हा खुलासा.

विटेकर's picture

21 Nov 2012 - 12:01 pm | विटेकर

चुकून अत्रुप्त आत्मा लिहिले...बरे झाले दुरुस्त केलेत.
..विलासरावांची काय खबरबात आहे का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Nov 2012 - 3:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

विलासरावांशी बोलणे झाले माझे परवा. ते ठीक आहेत. चिंतेचे काही कारण नाही.

मी सौदि अरेबिया मधे आहे असे समजल्यावर लगेचच यकुने मला सौदि मधल्या एका सदस्याची सर्व माहिती कळवली होती. असो.
माझ्या खरडवहीतील काही कॉपी पेस्ट. पैकी पैसा याना मी ओळखत नाही आणि यकुना पण नाही.
माझ्याशी यकुचा संवाद चालू असताना त्याने मिपावर न येण्याचा निर्णय घेतला. पैसा यांच्याशी त्याचा जास्त संवाद दिसला म्हणून मी "पैसा" शी सवांद साधला. असो.

संपादित.

किसन शिंदे's picture

21 Nov 2012 - 11:57 am | किसन शिंदे

तुम्ही ज्या खरडींचा संदर्भ दिलाय ती फार जुनी गोष्ट आहे. त्यानंतरही यकु नियमाने इथे येत होता.
मधल्या काळात बर्याचश्या गोष्टी झाल्यात ज्या तुम्हाला माहित नसाव्यात.

प्रसाद प्रसाद's picture

21 Nov 2012 - 11:42 am | प्रसाद प्रसाद

सकाळी सकाळी मिपा उघडलं आणि एव्हढी वाईट बातमी......
व्यक्तिशः कधीच ओळख नाही झाली पण चेपु वर कधी कधी बोलणे व्हायचे .....
काय झालं हे..........

मानस्'s picture

21 Nov 2012 - 12:16 pm | मानस्

यकुंशी व्यक्तिगत अशी ओळख नव्हती पण मला त्यांचं लेखन आवडायचं. त्यांची नर्मदा परिक्रमा तर कायम लक्षात राहील.

असं काय सलत होतं देव जाणे...त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या आई-वडिलांना हे दुः ख सहन करण्याची शक्ती देओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आत्महत्या म्हणजे तात्पुरत्या समस्येवरचा कायमस्वरूपी उपाय..तो यकूंना जवळचा वाटला..

यकूंसोबत मी कशाही प्रकारे कनेक्टेड नसलो तरी मिपाकरच आहे ना मी अन यकू पण होते..
व्हर्च्युअल कूटूंब आहोत आपण.. त्यातला सदस्य म्हणजे..छे.. कल्पनाच करवत नाही..

शेवटी काय.. _/\_ ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो..

झकासराव's picture

21 Nov 2012 - 5:01 pm | झकासराव

:(

महेंद्र's picture

22 Nov 2012 - 10:46 pm | महेंद्र

ही दूसरी केस.. कही महिन्यापूर्वी एका मित्राने आत्महत्या केली, आता हा ! मनापासून शिव्या घालायची इच्चा होते आहे. अरे मिपा वर इतके हजारो लोकं आहेत, कमीत कमी एकाशी तरी जवळचे संबंध असायला हवे की नाही:? इथे इतके मित्र म्हणायचे आणि पुन्हा एकटेच रहायचे ह्यात काय अर्थ आहे? सुखाचे क्षण जस इथे शेअर करता, तसेच मनात असलेल्या व्यथा बोलण्यासाठी एखादा तरी जिवलग मित्र इथे मिळवावा असे वाटते.

सोशल मिडीया मुळे आपण स्वत्।ला फार एक्स्ट्रोव्हर्ट झालो आहोत असे समजतो, पण खरंच तसं असत नाही,आपण उलट जास्त इंट्रोव्हर्ट होत जातो.

खरंच खूप वाईट वाटलं. इ मेल वर बराच संपर्क होता, पण प्रत्यक्ष कधी भेट झाली नव्हती. इश्वर मृतात्म्यास शांती देवो हीच सदिच्छा.

शैलेन्द्र's picture

22 Nov 2012 - 11:38 pm | शैलेन्द्र

अतिशय धक्कादायक बातमी.. एकदोनदा इथेच त्याच्याशी एकास एक बोलन झालेल, त्याने इंदोरला आलो की भेटायच आग्रहाच आमंत्रणही दिलेल.. पुढच्या सगळ्याच घडामोडी फार वीचित्र होत्या.. काय बोलावं.. खरच फार वाइट वाटतय..

चैतन्य दीक्षित's picture

23 Nov 2012 - 12:53 pm | चैतन्य दीक्षित

मन सुन्न झालंय ही बातमी ऐकून.
मृतात्म्यास सद्गती लाभो.

निवेदिता-ताई's picture

23 Nov 2012 - 7:00 pm | निवेदिता-ताई

कालच मला ही बातमी समजली, सध्या मा़झ्या मिस्टरांना बरे नाहीये, त्यामुळे इथे येणे जमत नाहीये....
खूप वाईट वाटले, धक्काच बसला.......

चाणक्य's picture

24 Nov 2012 - 3:51 am | चाणक्य

विश्वासच बसत नाहीये. काय लिहावं हे ही कळत नाहिये धड

बांवरे's picture

24 Nov 2012 - 8:44 am | बांवरे

इश्वर त्याच्या आत्म्यास सद्गती देवो. :( :(

हमारे बाद, अब महफिल में अफसाने बयान होंगे ..
बहारें हमको ढुंढेंगी... न जाने हम कहां होंगे ??

साती's picture

26 Nov 2012 - 3:59 am | साती

बातमी वाईट आहे पण अनपेक्षित नाही.
यावेळी अ‍ॅज अ ग्रूप कमी पडलो आपण. निदान यापुढे कुणी असं टोकाचं लिहू लागलं तर हा रेफरंस लक्षात घेऊन आपापसात त्याचं बरोबर असेलही असे वाद घालण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजावता येईल.
कितीदातरी यकु चुकीच्या वाटेवर चाललाय हे ओळखलेल्या आयड्यानि त्याला समजावयाचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळी काही विशिष्ट लोकानी त्याच्या सो कॉल्ड अध्यत्मिकतेचे दावे करत उलट समजावणार्याना खडसावलंय.
त्याच्या आईवडिलांपेक्षा आपण त्याला जवळ होतो असं निदान त्याच्या लिखाणावरून वाटतं.त्याची मानसिक आंदोलने आपण जास्त जवळुन अनुभवलियत. तरिही आपण आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडू शकलो नाही हेच खरे.

आशिष सुर्वे's picture

27 Nov 2012 - 11:10 pm | आशिष सुर्वे

मित्रा, मनाला चटका लावून गेलास रे..

दीपा माने's picture

7 Dec 2012 - 9:53 am | दीपा माने

फारच धक्कादायक बातमी आज मला एका मिपाकराकडून मिळाली. मी ह्या परवाच्या ४ डिसेंबरपासुनच अनपेक्षितपणे यकुंचे साहित्य वाचायला लागले होते. लिखाणातुन त्यांच्या लेखनसामर्थ्याची कल्पना येवु लागली म्हणून त्यांनी आणखी लेखन करत रहावे म्हणून शुभेच्छाही दिल्या होत्या. मिपाने यकुंचे साहित्य वाचणासाठी ठेवावे अशी विनंती करते.एक मिपाकर ह्या नात्याने यकुंना मनःपुर्वक श्रध्दांजली.

समीरसूर's picture

1 Jan 2013 - 12:16 pm | समीरसूर

यकुंना श्रद्धांजली!

मला आजच कळले. मध्ये मिपावर यायला सवडच नाही मिळाली. एक तुफानी व्यक्तिमत्व हरवले. खूप दु:खद...

--समीर

पुष्कर जोशी's picture

3 Dec 2016 - 8:14 am | पुष्कर जोशी

.

पुष्कर जोशी's picture

3 Dec 2016 - 8:27 am | पुष्कर जोशी

आज यकु ची खूप आठवण येत आहे .. तो जायच्या आधी १ / २ महीन्यापूर्वीच भेट झाली होती .. प्रचंड अस्वस्थ होता.. आठवण येत आहे ..

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2016 - 8:32 am | अत्रुप्त आत्मा

:(

भाते's picture

3 Dec 2016 - 9:17 am | भाते

हे असले धागे पुन्हा वरती काढत जाऊ नका रे! खुप त्रास होतो हा धागा वाचल्यावर.

संपादक मंडळ, साहित्य संपादक मंडळ,
हा धागा त्वरित आणि कायमचा वाचनमात्र करा.

दिवाळीत हा कसा न कसा आठवतोच.

कोणीही गेलं की दुःख तर होणारच, भले भले मिपाकर काळाच्या पडद्याआड गेले, पण अफलातून व्यक्तिमत्व या बिरुदाला पात्र मिपाकराची अशोभनिय एगझिट ही खरी दुर्मिळात दुर्मिळ म्हणूनच अत्यन्त ठळक बाब. एक जाणता मिपाकर म्हणून कोणी कसे असू नये याचे उदाहरण म्हणून तरी त्याची आठवण कोणी का विसरावी ?

चौथा कोनाडा's picture

30 Oct 2019 - 10:24 am | चौथा कोनाडा

यकु म्हटलं कि मिपाचे जुने दिवस आठवतात, जेव्हा मी वाचनमात्र होतो.
यकु चे भावपुर्ण स्मरण !