चिकन शवर्मा

गणपा's picture
गणपा in पाककृती
7 Nov 2012 - 8:37 pm

गेल्या आठवड्यात व्हेजींसाठी फलाफील आणि व्हेज-शवर्मा झाला. एक आठवडा कोंबडीलाही विश्रांती मिळाली असेल. म्हणुन पुन्हा सामिश प्रेमींसाठी चिकनकृती. :)

साहित्य :

.
चिकन थाईज. (हाडं काढुन टाकलेली.)
२ चमचे तंदुर मसाला.
२ चमचे आलं वाटण.
१ चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ चमचा काळीमिरी पुड.
१ चमचा लसुण पुड. / वाटण.
एका लिंबाचा रस.
चवीनुसार मीठ.

कृती :

.

शक्यतो हाडं काढुन चिकनच्या मांड्यांकडचा भाग घ्यावा. कट कट कमी करायची असल्यास सरळ चिकन ब्रेस्ट वापरावे.
चिकनचे दोन भाग करुन घ्यावे. (एक मसालेदार तर एक कमी तिखट बनवण्यासाठी.)

एका भागात तंदुर मसाला, आलं वाटण, लाल तिखट, लसुण पुड, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करावं.
तर दुसर्‍या भागात मीठ, काळिमिरी पुड, आल वाटण, लसुण पुड आणि लिंबाचा रस टाकुन एकत्र करावं.
चिकनला चरबी नसेल तर १-२ चमचे तेल टाकावं.
दोन्ही चिकन फ्रीजमध्ये किमान २ तास तरी मुरत ठेवावं.

.

चिकन मी ओव्हनमध्ये भाजायचं ठरवलं होतं. काही ओव्हन मध्ये ग्रिल करण्यासाठी गोल फिरणारी खास सोय असते जी माझ्या ओव्ह्नमध्ये नाही. म्हणुन घरच्या घरीच तारेचे २ स्टँड बनवले. जे फिरते नव्हते पण बराचसा तसाच इफेक्ट मिळाला जसा मला हवा होता.
त्या स्टँडमध्ये चिकनचे तुकडे ओवून घेतले. वरून एक लिंबाची फोड ठेवली.

.

ओव्हन २००°C वर १० मिनिटं तापवुन घेतल्या नंतर हे दोन्ही स्टँड आत ठेऊन ३० मिनिटं भाजुन घेतलं.

.

चिकन तयार झाल्यावर त्याचे लहान तुकडे करून घ्यावे. सोबत लेट्युस, टॉमेटो, ताहिनी सॉस, फ्रेंच फाईज यांची ही जुळवा जुळव करुन ठेवावी.
(पेठकर काकांनी दिलेली 'बटाटा न वापरण्याची' टीप पुढल्यावेळी वापरली जाईल. पण तुम्ही ती आत्ताच वापरायला हरकत नाही.)

.

पिटा ब्रेड/ खुबुस अर्धा उघडुन त्यात वरील मिश्रण भरुन घ्यावं.

रोल करुन गरम-गरमच सर्व्ह करावं.

.

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

7 Nov 2012 - 8:49 pm | स्मिता.

एक नंबर आहे चिकन शवर्मा! फटू बघून तोंपासु.

फक्त ते शवर्मामधे फ्राईज...

इष्टुर फाकडा's picture

7 Nov 2012 - 9:01 pm | इष्टुर फाकडा

कातील दिसतंय चिकन, (नेहमीप्रमाणेच)
एक प्रश्न: लिंबाची फोड का बोवा? वरच्या भागातलं चिकन आंबट नाही का व्हायचं?

खुपच मस्त.. आणि घरच्या घरी बनवलेले तारेचे स्टँड अप्रतिम... hehehhe ;)

पतन्ग's picture

7 Nov 2012 - 10:05 pm | पतन्ग

भन्नाट दिसतय

घरगुती तारेच्या ष्ट्यांडसाठी १०० पैकी १०० गुण.
बाकी चिकनकृतीबद्दल काय बोलणार?
खरंतर व्हेजवाली कृती दिल्यावर तुलाच मौसाहारींची दया आली असावी असा अंदाज. ;)
फोटू छान हे जाताजाता सांगते.

जयवी's picture

7 Nov 2012 - 10:39 pm | जयवी

खतरा दिसतोय शवर्मा :)

संदीप चित्रे's picture

7 Nov 2012 - 11:19 pm | संदीप चित्रे

पाकृ आणि फोटु नेहमीसारखे कातिलच शिवाय तारेच्या स्टँडसाठी शाबासकी बोनस!

घरगुती तारेच्या स्टँड ची कल्पना एकदमच छान. जिन्नस ठेवतानाच color combination पण मस्त. त्या मसालेदार चिकनला रंग पण कसला झकास आलाय!!!

प्रभाकर पेठकर's picture

8 Nov 2012 - 1:54 am | प्रभाकर पेठकर

अप्रतिम घरगुती शवार्मा...

ओवताना चिकनच्या मांसावर चरबीचा एक जाड थर त्यावर एक आख्खा कांदा आणि त्यावर लिंबू लावल्यास उष्णतेने चरबी वितळून चिकनच्या मांसावर ओघळते आणि शवार्माची चव वृद्धींगत होते. कांदा आणि लिंबाच्या रसानेही स्वाद वाढतो.

प्रचेतस's picture

8 Nov 2012 - 8:14 am | प्रचेतस

लाजवाब प्रेझेंटेशन

प्रशांत's picture

8 Nov 2012 - 9:48 am | प्रशांत

लाजवाब प्रेझेंटेशन (नेहमीप्रमाणेच ;-) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2012 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> लाजवाब प्रेझेंटेशन नेहमीप्रमाणेच
एकहजार एक टक्के. सहमत.

मला नेहमी वाटतं या चार पाच मिपाकरांनी मिळुन या पाककृतींवर
छापील पुस्तक काढलं पाहिजे. पण सांगायचं कोणाला आणि ऐकणार कोण ?

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

8 Nov 2012 - 9:17 am | इरसाल

मस्त मित्रा.
का नाही वजन वाढणार मग ? :(

गवि's picture

8 Nov 2012 - 11:52 am | गवि

क्या बात है..
मशीनशिवाय हा पदार्थ बनवता येत नाही असा माझा अडाणी समज दूर केल्याबद्दल धन्यवाद.

मायक्रोवेव्ह ओव्हन, मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर, त्याचे वेगळाले मोड्स, त्यांचे उपयोग याविषयी कोणी सविस्तर लिहीलं आहे का? नसल्यास लिहील का? या उपकरणाची भीती वाटते. त्यात मेटल अजिबात चालत नाही अशी समजूत आहे. एकदा थोडंसं मेटल प्लेटिंग असलेला कप चहा गरम करायला त्यात ठेवला तर चकमक उडाली.

तार आत ठेवण्यासाठी कसला मोड असतो? की हा मायक्रोवेव्हच वेगळा असतो?

हे सर्व प्रश्न हास्यास्पद आहेत का?

-(अडाणभोट) गवि

नेत्रेश's picture

8 Nov 2012 - 11:59 am | नेत्रेश

गणपाभाउंनी साधाच (हिटींग कॉईलचा) ओव्हन वापरला आहे.

हे सर्व प्रश्न हास्यास्पद आहेत का?

नाही, गवि मुळीच नाही.
घरी (९-१० वर्षां मागे) मायक्रोवेव्ह घेतल्यावर मी ही अनेक अयशश्वी प्रयोग केले आहेत. मागाहुन कळलं की तंदुर वा तत्सम पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये जमत नाहीत.
मायक्रोव्हेवमध्ये अनेक पदार्थ व्यवस्थीत करता येतात असे अनेकांनडुन ऐकले आहे. पण आमच्याकडे मात्र हल्ली त्या मायक्रोव्हेवचा फक्त शिळे अन्न गरम करणे. शेंगदाणे, पापड भाजणे/तळणे (एकदा तर सुके बोंबीलही भाजले होते. पण त्या नंतर आठवडा भर त्याचा सुगंध दरवळत राहिला तेव्हा पासुन ते थांबवलं.) फार फार तर बटाटा उकडणे आदींसाठीच उपयोग होतो.
चहा गरम करताना तुम्हाला आलेला अनुभव अनेकांनी घेतला असेल. :)

अलीकडेच मायक्रोव्हेव + कन्व्हेंशन ओव्हन घेतला. यात मात्र तुम्ही मेटल जाळी (कन्व्हेंशन मोड मध्ये असताना) वगैरे वापरु शकता. अशीच आख्खी कोंबडी बनवुनच श्रीगणेशा केला.
हल्ली बर्‍याच मायक्रोव्हेव + कन्व्हेंशन ओव्हनमध्ये हॉरीझाँटल रोटेटर ही उपलब्ध असतो.

सध्या मी जो ओव्हन वापरतो तो काहीसा असा आहे. वर गॅस+इलेक्ट्रीक शेगडी आणि खाली इलेक्ट्रीक ओव्हन.
.
(चित्र आंजावरुन साभार.)

पण आमच्या कडे मात्र हल्ली त्या मायक्रोव्हेवचा फक्त शिळे अन्न गरम करणे. शेंगदाणे, पापड भाजणे/तळणे (एकदा तर सुके बोंबीलही भाजले होते. पण त्या नंतर आठवडा भर त्याचा सुगंध दरवळत राहिला तेव्हा पासुन ते थांबवलं.) फार फार तर बटाटा उकडणे आदींसाठीच उपयोग होतो.

आमच्याकडे वर टेबलक्लॉथ टाकून त्यावर बरण्या ठेवण्यासाठी होतो.

माहितीबद्दल धन्यवाद गणपाभाऊ.

मायक्रो + कन्व्हेक्शन असा असल्यास त्यात बेक्ड करंज्या, चकल्या, शंकरपाळे होतात असे ऐकले आहे.

५० फक्त's picture

8 Nov 2012 - 7:24 pm | ५० फक्त

एखादं वेळ करुन पाठवा की, आम्ही झोकात फिरु सोसायटित युएस आणलेला फराळ खात...

मस्त कलंदर's picture

8 Nov 2012 - 11:31 pm | मस्त कलंदर

माझ्या आयुष्यात आतापर्यंत फक्त दोन मायक्रोवेव्हज आले आहेत, तेव्हा त्यांच्या मोड्सबद्दल लिहिते.
एक मायक्रोवेव्ह साधा आहे, फक्त अन्न गरम करण्याचा. त्यात गरम गरणे आणि डिफ्रॉस्ट करणे असे दोनच मोड आहेत. त्यातल्या नॉर्मल(मायक्रोवेव्ह) मोडवरती बडीशेप, शेंगदाणे, लाडवासाठीचं बेसन भाजणं, आधी हाटून घेतलेलं पुरण घट्ट करण्यासाठी शिजवणं असे प्रकार करता येतात. फक्त त्यांना मधून मधून परतायला लागतं आणि बडिशेप पटकन करपते, तेव्हा अधिक काळजी घ्यावी लागते. वास घालवण्यासाठी एका मावेसेफ बोलमध्ये पाणी घेऊन त्यात अर्धं लिंबू पिळावं. काम तमाम.
माझ्याकडे हा ओव्हन आहे:
oven

  • माझा सध्या घरी वापरत असलेला ओव्हन हा मावे+कन्व्हिक्शन+ग्रील असे बरेचसे मोड असलेला आहे. हा प्रकार करताना आधी दोन मिनिटे ग्रील आणि पाच मिनिटे मावे मोडवर बनवला. नंतर बटाट्याऐवजी पनीर घालून हा पदार्थ करताना आधीचे सेटिंग वापरल्यास पनीर छान भाजले गेले पण सुटून खाली पडत होते. त्यासाठी आता फक्त पाच मिनिटे मावे मोड पुरेसा आहे हे कळलं आहे.
  • केक करताना इथं सगळेजण आधी प्रिहिटिंग ते पण फॅरनहाईट मध्ये देतात आणि २०मिनिटं साधारण बेक करतात. मी सरळ माझ्या ओव्हनमध्ये असलेला 'जगातल्या प्रसिद्ध पाकृ' हा पर्याय वापरते आणि तोही विना प्रीहिटिंग. पाच मिनिटात मस्त लुसलुशीत आणि स्पाँजी केक तयार होतो. पाच मिनिटे हे चॉकलेट केकसाठी मावेचं स्वत:चं सेटिंग आहे पण त्यासाठी मोड आणि तापमान काय घेत असावा ते माहित नाही.
  • या पाकृसाठी मी मावे+ग्रील ६०० डिग्री से. वरती ओव्हन तीन मिनिटे प्रीहिट केला आणि नंतर त्यच सेटिंग्जवरती ३ ते ३:३० मिनिटे कुकीज बेक केल्या. आधी लेखातलं वेळेचं सेटिंग लावलं होतं, आणि घरभर खमंग वास सुटल्यावर ही फक्त बेक होण्याची सुरूवात असेल म्हणून सोडून दिलं होतं. तरी मध्येच जाऊन त्यांचा बदलता रंग पाहून मावे बंद केला म्हणून ठीक. परिणामी कुकीज अर्ध्या करपल्या होत्या. नंतर दोनदा केल्या त्या मात्र न करपता छान झाल्या.
  • इडली साध्या मावे मोडवर ९०० डि.से. वरती साडेचार ते पाच मिनिटांत होतात.

माझ्यामते हे थोडं ट्रायल आणि एररमधून जमू शकेल. मलाही अजून असले प्रश्न पडतात.

वा वा.. खूप खूप धन्यवाद्स.. आजच मावे चालू करतो..इइइन्स्पिरेशन मिळाले...

इरसाल's picture

10 Nov 2012 - 4:56 pm | इरसाल

मावे चालु केला काय?
असल्यास : काय बनवले ? :)
नसल्यासः कधी बनवणार ? ;)

मस्त कलंदर's picture

10 Nov 2012 - 9:07 pm | मस्त कलंदर

एक राहिलं. मावेसेफ नसलेल्या प्लास्टिक(साध्या डिनरसेट्मध्ये मिळतात त्या मेलामाईनच्या)काचेच्या डिशेस, ग्लास व कप यांच्यावर सोनेरी/चंदेरी रंगकाम नसेल तर दोन मिनिटांपर्यंत मावेमध्ये बिन्धास्त वापरता येतात.
हे आम्हाला डेमो द्यायला आलेल्या अधिकारिक माणसाने सांगितले आहे, आणि त्यामुळे काहीही वाईट होत नाही हा आमचा गेल्या वर्षाभराचा अनुभव आहे..

दादा कोंडके's picture

10 Nov 2012 - 9:45 pm | दादा कोंडके

एकदा थोडंसं मेटल प्लेटिंग असलेला कप चहा गरम करायला त्यात ठेवला तर चकमक उडाली.

नशीब. नुसतच अंडं उकडायला ठेवलं असतं तर हाहाकार झाला असता. :)

प्रभाकर पेठकर's picture

8 Nov 2012 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर

पुण्यात कुठल्यातरी कंपनीचा मेटल फ्रेंडली मायक्रोवेव्ह ओव्हन मिळतो.

विलासराव's picture

8 Nov 2012 - 9:53 pm | विलासराव

कालच विमेने आणी माझ्या मित्राने हे डीश खाल्ली. आणी विमे मला म्हणाले गणपाला विचारायला पाहीजे की बाबा ईथे दुबईत काय काय खावं. आनी ईकडे गणपा हजर.
बाकी मला आजकाल चिकनचं वावडं असल्याने मी तटस्थ.
व्हेज शवर्मा गोड मानुन घेतो.

सानिकास्वप्निल's picture

9 Nov 2012 - 5:18 pm | सानिकास्वप्निल

शवर्मा बघून दिल खुश हुआ :)

पैसा's picture

10 Nov 2012 - 10:30 pm | पैसा

पाहिले आणि वाचले.

अत्रन्गि पाउस's picture

15 Nov 2012 - 6:57 pm | अत्रन्गि पाउस

मुळिच सर्व करणार नाहि...सगळे मलाच पुरणार नाहिये...

पुण्यात पुर्वी हाईट बार मध्ये मिळत असे.खासच!!

लालगरूड's picture

31 Jul 2016 - 9:48 am | लालगरूड

आज खायलाच पाहिजे

सत्याचे प्रयोग's picture

31 Jul 2016 - 2:52 pm | सत्याचे प्रयोग

आता श्रावण झाल्यावरच प्रयोग करून पाहू. ते चिकनचे प्रमाण नाही कळलं

सुंड्या's picture

31 Jul 2016 - 3:36 pm | सुंड्या

माझी दिल्ली आणि हैद्राबादच्या 'चविष्ट' आठवणीपैकी एक म्हणजे 'श्वार्मा'...जबरदस्त चवीची आठवण करुन दीलीत हो भाऊ.