अगदी सोपी कणकेची/गव्हाच्या पिठाची बिस्किटे (एगलेस व्हीट अल्मन्ड कुकीज)

Pearl's picture
Pearl in पाककृती
26 Oct 2012 - 12:37 am

कुकीज बनवायचे खूप दिवसापासून मनात होते. आणि मला मैदा वापरायचा नव्हता. कणकेची बिकिटं बनवायची होती. म्हणजे केव्हाही खाता येतील, कितीही खाता येतील अशी हेल्दी आणि टेस्टी बिस्कीटं बनवायची होती :-)

जनरली खाण्याच्या पदार्थात ‘हेल्दी आणि टेस्टी’ यापैकी कोणतीतरी एकच गूण असतो :-) मागे एकदा नेटवरून रेसिपी पाहून एक रेसिपी बनवली. ती बिस्किटं हेल्दी होती पण टेस्टी नव्हती. मग थोड्या अजून रेसिपी पाहून त्यात मला हवा असलेला बदल करून बनवलेली बिस्किटं खूप मस्त, टेस्टी आणि Crunchy झाली. तीच रेसिपी इथे देत आहे. नक्की करून पहा.

साहित्यः
१ कप गव्हाचे पीठ, १ स्टिक अनसॉल्टेड बटर (रूम टेंपरेचरला आलेले), पाऊण कप पिठीसाखर, १ चिमूटभर मीठ, अर्धा टीस्पून वेलची पूड, १/४ कप बदाम

कृती:
१) बदामाचे फ्लेक्स (लहान तुकडे) करून घ्या. त्यातले थोडे बिस्किटं सजवायला बाजूला काढून ठेवा.
२) एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, बटर, पिठीसाखर, मीठ, वेलचीपूड, बदामाचे फ्लेक्स हाताने चुरून घाला.
३) मिश्रण चांगलं मळून त्याचा एक गोळा करून घ्या. मळताना गरज वाटली तर १-२ चमचे बटर/तूप अजून घाला.
४) ओव्हन 360 °F ला प्रिहिट करायला लावा. एका कुकी शीटला अल्युमिनियम फॉइल लावून घ्या.
५) मळलेल्या मिश्रणाच्या गोळ्याचे आता लहान लहान (पेढ्याएवढे) गोळे करून घ्या. त्यावर बदामाचे फ्लेक्स लावून बिस्किटं थोडी चपटी बनवून कूकीशीटवर एकमेकापासून बर्‍यापैकी अंतरावर ठेवा. (कारण बेक केल्यानंतर कुकीजचा साइझ जवळजवळ दुप्पट होतो.)
६) ओव्हन प्रिहिट झाल्यानंतर ५ मिनिटांनी ही कुकीशीट ओव्हनमध्ये ठेवा.
abc
७) १८ मिनिटांनी कूकीशीट ओव्हनमधून बाहेर काढा. आणि कुकीज चांगल्या थंड होऊ द्या.
(कुकीज पूर्ण थंड झाल्याशिवाय त्यांना हात लावू नका. अन्यथा कुकीज मोडतील.)
८) थंड झाल्या की ह्या क्रंची, क्रिस्पी कुकीजची मजा लुटा.
abc

टीपः
१) ही बिस्किटे मोठ्या प्रमाणावर करायची जितके कप गव्हाचे पीठ घ्यालं तितके टेबलस्पून बटर जादा घाला. उदा. २ कप गव्हाचे पीठ घेतले तर त्यात (दीड कप पिठीसाखर, २ चिमूट मीठ, १ टीस्पून वेलची पूड, १/२ कप बदाम, २ स्टिक्स अनसॉल्टेड बटर आणि) २ टेबलस्पून बटर जादा घाला.
२) बदामाऐवजी तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट वापरू शकता.
३) कुकीज चांगल्या चपट्या करून मग बेक करायला ठेवा. नाहीतर नंतर कुकीज चावायला त्रास होईल.
४) १ स्टिक अनसॉल्टेड बटर = १/२ कप अनसॉल्टेड बटर = ८ टेबलस्पून अनसॉल्टेड बटर

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

26 Oct 2012 - 3:28 am | स्पंदना

टेस्टी दिसताहेत. अन मैदा न वापरता म्हणजे तर लय भारी!
शेवटी बटर स्टीकच प्रमाण टेबलस्पुन मध्ये दिल्याबद्दल धन्यवाद.

रेवती's picture

26 Oct 2012 - 6:20 am | रेवती

छान दिसतायत. खूप पूर्वी बेकरीवाल्याकडं मैदा, डालडा आणि इतर पदार्थ प्रमाणात दिले की कुकीज करून मिळायच्या. मैत्रिणीकडं खाल्ल्यावर मी आईच्या मागे भूणभूण केली पण त्यात मैदा आणि डालडा असल्याने मिळाल्या नाहीत. वरील कुकीजमध्ये हे दोन्ही पदार्थ नसल्याने करण्यास हरकत नाही.

भगिरथ's picture

26 Oct 2012 - 11:51 am | भगिरथ

करुन पहिनच...

तर्री's picture

26 Oct 2012 - 4:30 pm | तर्री

कसे काय जमते - छान छान ! आश्चर्यच आहे !
विकत मिळतात का कुठे ? ते सांगा !
(फुकट मिळत असतील तर !!!! )

मस्तच... मैद्याला चांगला पर्याय आहे. :)

एक शंका आहे... ह्यात बेकिंग पावडर वापरली नाहिये का?

बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काही वापरले नाही.
तरी छान क्रंची होतात.
(फक्त आठवणीने कुकीज बेकींग शीटवर ठेवताना बर्‍यापैकी फ्लॅट करून ठेवाव्यात.)

अनन्न्या's picture

26 Oct 2012 - 7:06 pm | अनन्न्या

एगलेस असल्यामुळे लगेच करणार.

पैसा's picture

26 Oct 2012 - 8:01 pm | पैसा

मैदा आणि डालडा नसल्यामुळे आवडण्यात आल्या आहेत!

जाई.'s picture

26 Oct 2012 - 8:57 pm | जाई.

सोप्प!!

पप्पु अंकल's picture

26 Oct 2012 - 9:27 pm | पप्पु अंकल

एवितेवि बायको चपात्या चांगल्या करतेच, आता बदामाचे काप टाकुन करायला सांगतो
धन्स.

काय मस्त दिसताहेत ती बिस़्ईटे ... यम यम

अरेच्च्या स्वसंपादन सोय नाही राहीली वाटतं :(