त्याची डिटॅचमेंट

इनिगोय's picture
इनिगोय in जनातलं, मनातलं
29 Oct 2012 - 1:05 pm

उत्तरार्ध

काही दिवसांपूर्वी "अटॅचमेंटमधली वेदना आणि डिटॅचमेंटमधला आनंद" याबद्दल झालेली चर्चा या छोट्याशा स्फूटाला कारणीभूत ठरली.
----------------------------------------------------------------------------
प्रिय,
निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का?
वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो.

'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं. अर्पणपत्रिका लिहून अर्पण केल्याचीच नोंद ठेवण्याच्या विपर्यस्त मोहातूनही सुटत नाही तो.

निसर्गाचं तसं नसतं. खरंतर सगळ्यात देखणा असा आस्वादाचा अनुभव देऊ शकणारी अशी ही चीज आहे. इतका की घेणाऱ्यालाच नाही तर देणाऱ्यालाही त्या अनुभवाचा लोभ जडावा.

पण म्हणून निसर्ग वेगळा ठरतो.
समर्पण दरक्षणी.
आणि देऊन रिक्त झाल्यावर गेलेल्या क्षणाशी नितळ, निवळशंख, आरपार अलिप्तता.
ही पालवी गळूनच जायचीय म्हणून ती घडवताना खंत नाही, चुकारपणा तर नाहीच.. आणि बहराचा उत्सव साजरा करून ती गळून गेल्यावर तीसाठी झुरणंही नाही.
त्याला कौतुकाची थाप लागत नाही.
निषेधाचा सूर बोचत नाही.
उपेक्षेने हताशा होत नाही.
जात असलेल्याला थांबवू बघण्याची तगमग निसर्गाकडे नाही.

स्वयंपूर्ण असं हे प्रकटन आहे. देत राहणं, देत असताना निःसंग राहणं हा धर्म कर्णानेही इतका स्वीकारला नाही.

आता सांग, ही अशी डिटॅचमेंट खरंच सुरेख नाही का?

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

29 Oct 2012 - 1:25 pm | अन्या दातार

अजून थोडे हवे होते, पण स्वत:ला डिटॅच करतो. :-)

नगरीनिरंजन's picture

29 Oct 2012 - 4:05 pm | नगरीनिरंजन

मस्त!

गवि's picture

29 Oct 2012 - 4:13 pm | गवि

फार छान. आवडलं.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2012 - 5:00 pm | अत्रुप्त आत्मा

नवं नवं,वाचाया बरं वाटलं...!

जुइ's picture

29 Oct 2012 - 7:51 pm | जुइ

Surekh!!

जेनी...'s picture

29 Oct 2012 - 7:54 pm | जेनी...

एकदम फ्रेश लेख .
खुप दिवसानी बोर्डावर आलेला चिकना लेख ;)

कीप इट अप :)

पैसा's picture

29 Oct 2012 - 8:39 pm | पैसा

आवडला लेख!

Pearl's picture

29 Oct 2012 - 8:58 pm | Pearl

छान..

मूकवाचक's picture

29 Oct 2012 - 9:44 pm | मूकवाचक

पिकले पान, पिकले फळ गळून पडते तेव्हा त्यात त्याला वेदना होत नाही की झाडाला जखम होत नाही. झाडाला घट्ट चिकटून बसलेल्या कच्च्या फळाने मी पिकलो, मी पिकलो असा कितीही कांगावा केला तरी तो खरा वाटत नाही.

समर्पण मनोभावे झालेले असेल तर मी पहा कसा साक्षीभावाने पाहतो, तुम्ही मात्र पहा कसे लिप्ताळ्यात अडकले आहात असे कळत नकळत पक्व होत चाललेल्या सहयात्रिकांना आढ्यतेने सांगण्यात, त्यांना हट्टाने अकालीच खुडून काढण्यात पिकल्या पानाला स्वारस्य उरत नाही. सगळ्या ऋतूंचे सोहळे पुरेपूर अनुभवलेल्या पिकल्या पानाची अशी सहज, स्वाभाविक डिटॅचमेंट सुंदर असणारच :-)

बहुगुणी's picture

29 Oct 2012 - 11:03 pm | बहुगुणी

प्रत्येक शब्द चवी-चवीने वाचला!
मूकवाचक यांचा प्रतिसादही आवडला!

सोत्रि's picture

29 Oct 2012 - 11:40 pm | सोत्रि

आवडले, खुपच छान!

-(डिटॅच्ड) सोकाजी

अभ्या..'s picture

29 Oct 2012 - 11:40 pm | अभ्या..

कसे येते हो हे सर्व?
निसर्गातून मनात, मनातून शब्दांत आणि शब्दातूनच परत उतरलेलं आमच्या मनात.
असंख्य धन्यवाद

अर्धवटराव's picture

30 Oct 2012 - 2:04 am | अर्धवटराव

निसर्गानं असं वागण्याचं कारण म्हणजे त्याने धारण सन्यास धर्म. निसर्ग संन्यासी आहे.

अर्धवटराव

इनिगोय's picture

30 Oct 2012 - 7:12 am | इनिगोय

सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासून आभार.. :-)

५० फक्त's picture

30 Oct 2012 - 7:38 am | ५० फक्त

इनिगोय यांचा मुळ लेख आणि मुकवाचक यांचा प्रतिसाद, दोन्ही कॉपि पेस्ट करुन ठेवले आहेत. अशाच काही गोष्टी आयुष्य काय आहे हे शिकवतात, खुप खुप धन्यवाद.

काय सुरेख स्फुट आहे हो इनिगोय! मानल. अस वाचताना सुद्धा दोन ओळीतच मन काबीज झाल.
आपुन आपका फॅन आजसे.

अनिता ठाकूर's picture

30 Oct 2012 - 11:58 am | अनिता ठाकूर

हे थोडे काव्यात्मक झाले.पण, निसर्ग आणि माणूस ह्यामध्ये फरक आहे. माणसाला मन असते.निसर्गात घडणार्या घटना जीवशास्त्रीय असतात. त्यावर निसर्गाचे स्वतःचे असे नियन्त्रण नसते. मनावर नियन्त्रण ठेवता येते.असे नियन्त्रण ठेवणे जेव्हा कठीण वाटेल तेव्हा आधारासाठी निसर्गाकडे पहावे.निसर्गाइतके स्थितप्रज्ञ राहिले तर जीवनातील आनन्दच निघून जाइल.

हा एक खूप चांगला दृष्टिकोन सांगितलात. हे तर्ककठोर सत्य असूही शकेल.

.. पण तरीही निसर्गाकडे जितकं जास्त बघावं तितका तो स्वनियंत्रित, ईषणा करणारा, मनुष्याहूनही खूप जास्त जिवंत असाच वाटायला लागतो. निसर्ग या प्रकाराच्या जितकं जास्त खोलात शिरावं तितकं त्याला मन नाही किंवा त्याचं स्वतःचं असं नियंत्रण नाही हे मानणं अधिकाधिक कठीण जातं.

निसर्ग या प्रकाराच्या जितकं जास्त खोलात शिरावं तितकं त्याला मन नाही किंवा त्याचं स्वतःचं असं नियंत्रण नाही हे मानणं अधिकाधिक कठीण जातं.

हेच जाणवलं, पटलं.

ईषणा या शब्दाचा अर्थ काय..?

ईषणाला समानार्थी शब्द माहीत नसल्याने त्याचा अर्थ साधारण व्होलिशन सारखा किंवा तोच आहे असं म्हणतो.

सस्नेह's picture

30 Oct 2012 - 1:11 pm | सस्नेह

-- 'प्रेरणा' चालेल असे वाटते.
अनितातैंशी सहमत.
निसर्गाची 'अ‍ॅटॅचमेंट' नेहमीच नैसर्गिक असते तर माणसाची काही वेळा अनैसर्गिक.

काय नियंत्रण आहे त्यावर?

गवि's picture

30 Oct 2012 - 3:25 pm | गवि

तेच तर..

आपल्यापेक्षा त्यावर इतर कोणाचंतरी नियंत्रण आहे. त्याला निसर्ग म्हणा किंवा काही.

आपलं खुद्द स्वतःचं हृदय, पण आपण व्हॉलंटरिली थांबवू शकतो का? नाही.

म्हणूनच हे म्हणणं होतं की आपण, मनुष्यप्राणी हे जितके जिवंत आहोत त्यापेक्षा जास्त निसर्ग जिवंत असल्याचा भास होतो. भासच का असेना पण होतो.

स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईन वरुन विश्व (निसर्ग = फक्त पृथ्वीच नव्हे तर विश्वाचा जिवंतपणा असं मी धरतोय) ही संकल्पना जास्त खोलात शिरुन पाहताना असं जाणवलं की कितीही थिअरीज काढल्या तरी जगातला कल्पनातीत समतोल आणि ठराविक दिशा, ठराविक क्रम , ठराविक घटना पाहताना निसर्गाला स्वतःचं नियंत्रण नाही असं तरी कसं म्हणावं?

(टीपः व्होलिशन या शब्दाच्या वर्णनात, इच्छा आणि त्यासाठी केलेली रचना, कार्यप्रणाली ही जणू "ऑटोमेट" होऊन जाणं असाही उल्लेख आहे.)

गर्भावस्थेत एका विशिष्ट दिवशी, विशिष्ट क्षणी गर्भाचं हृदय एका पल्सनिशी सुरु होतं. यामागचं मेकॅनिझम कोणालाही कळलेलं नाही. स्टेम सेल्सपासून वेगवेगळ्या पेशी तयार होतात. कोणत्याश्या ठरलेल्या कोडनुसार शरीराची रचना होते. बाहेरुन आलेला शत्रू पदार्थ ओळखून त्याला मारण्यासाठी शरीर सैन्य तयार करतं. त्या सैन्याला त्या प्रत्येक शत्रूची रचना शिकवून त्याविरुद्धची स्पेसिफिक अँटिबॉडी करतं.

कशावर मानवाचा कंट्रोल असतो? हा निसर्गाचा कंट्रोल नाही असं म्हणायचं का? निसर्गाची ईषणा नाही असं म्हणायचं का?

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2012 - 3:44 pm | संजय क्षीरसागर

निसर्ग या प्रकाराच्या जितकं जास्त खोलात शिरावं तितकं त्याला मन नाही किंवा त्याचं स्वतःचं असं नियंत्रण नाही हे मानणं अधिकाधिक कठीण जातं.

याचा अर्थ त्याचं स्वतःचं असं नियंत्रण आहे असा होतो. निसर्ग नियंत्रण शून्य आहे असं माझं म्हणणं आहे. आपला श्वास केंव्हाही बंद पडू शकतो, हृदय केंव्हाही थांबू शकतं.

ताओमधे जगणं म्हणजे निसर्गासारखं फुल अनकंट्रोल्ड जगणं, त्या जगण्यातनं डिटॅचमेंट येते. असं जगायला तुम्ही तयार असाल तर या क्षणी सिद्ध व्हाल!

आपला श्वास केंव्हाही बंद पडू शकतो, हृदय केंव्हाही थांबू शकतं.

ओके. हा फक्त मांडणीचा प्रश्न आहे. माझं नियंत्रण नाही हे निर्विवाद..

आता..
"कधीही थांबू शकतं" याचंच रुपांतर मी "कोणाचंतरी (कशाचंतरी) बाह्य नियंत्रण असतं म्हणून ते मला न जुमानता चालू राहतं आणि माझी इच्छा नसतानाही (माझ्या दृष्टीने अचानक !) बंद पडतं.." असं करतोय.

ते कसलं नियंत्रण आहे ते मला माहीत नाही. मला माहीत आहे असं म्हणून एक थियरी (ताओ ऑर अदरवाईज) बनवण्यापेक्षा मला माहीत नाही हे म्हणणं बरं वाटतं.

माझं किंवा "त्या"चं यापैकी कशाचंच नियंत्रण नसतं तर ते हृदय मुळात चालूच झालं नसतं.

बंद पडण्याला काही कारण नाही. इट इज कॉज लेस.

माझं किंवा "त्या"चं यापैकी कशाचंच नियंत्रण नसतं तर ते हृदय मुळात चालूच झालं नसतं

`तो' असा कुणी नाही.

असो, विवादाचा भाग सोडून देऊ कारण विचारापेक्षा कृती निर्णायक ठरते.

मूळ मुद्दा असाय की निसर्गाशी समरूप होऊन किंवा नैसर्गिक प्रेरणेनं जगणं. सोप्या शब्दात जाणीवेनं जगणं, स्वच्छंद जगणं कारण तुम्हाला निसर्गासारखी डिटॅचमेंट हवीये.

जस्ट ट्राय, फक्त तीन दिवस घड्याळ बाजूल ठेवून, मोबाईल स्वीच ऑफ करून, मी `जाग येईल तेव्हा उठेन आणि भूक लागेल तेंव्हाच जेवेन' हे करून पाहा. एका दिवसात तुम्ही कंटाळून जाल. दुसर्‍या दिवशी घरचे चिंताग्रस्त होतील आणि हे असं चालू ठेवलं तर ‍पुढे काय होईल या नुसत्या कल्पनेनं तुम्ही हादरून जाल. तिसर्‍या दिवशीपर्यंत तग धरू शकलात तर फोन स्वीच ऑन करून आणि घड्याळ घालून, नैसर्गिक प्रेरणा गेली झक मारत म्हणत सगळं पुन्हा `वेळेवर' करायला लागाल.

तुम्ही फक्त `भूक लागेल तेव्हा जेवीन आणि जाग येईल तेव्हा उठेन' या नैसर्गिक गोष्टी आचरणात आणता येतात का ते पाहा. त्या जमायला लागल्यावर उत्सर्ग ही प्रक्रिया नैसर्गिक व्ह्यायला लागते. मग शरीरापासनं आपण वेगळे आहोत हा फिल यायला लागतो. मग विचारांपासून वेगळेपणा. नंतर धराणांपासून मुक्ती. मग निसर्गाशी एकरूपता किंवा युनिवर्सल इंटेलिजन्सशी अनुसंधान. मग आपण व्यक्ती नाही हा उलगडा आणि सरते शेवटी, सगळ्याचा परिपाक म्हणजे सहज येणारी डिटॅचमेंट!

डिटॅचमेंट स्वरूपप्राप्तीचं फलस्वरूप आहे. ती नुसती आवडलेली किंवा निसर्गाकडे बघून केलेली कल्पना नाही.

अर्धवटराव's picture

31 Oct 2012 - 9:21 am | अर्धवटराव

मनुष्य जर निसर्गाचं चिमुकलं प्रॉडक्ट आहे तर त्याला जीवंतपणा, मन, बुद्धी हे सर्व निसर्गाकडुनच मिळालं आहे. जीवंत मनुष्य आणि निर्जीव रासायनीक निसर्ग हे समीकरण जमतच नाहि.

अर्धवटराव

सुप्पर्ब रीप्लाय अर्धवटराव ....!!

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2012 - 2:40 pm | संजय क्षीरसागर

निसर्ग आणि माणूस ह्यामध्ये फरक आहे. माणसाला मन असते.निसर्गात घडणार्या घटना जीवशास्त्रीय असतात. त्यावर निसर्गाचे स्वतःचे असे नियन्त्रण नसते.

हा लाओत्सेचा ताओ म्हणून मार्ग आहे. वाचायला आणि दिसायला सोपा पण आचरणात आणायला अत्यंत कठीण. `संपूर्ण नियंत्रण शून्य जगणं' असं त्या मार्गाचं सूत्र आहे. त्यामुळे हे थोडे काव्यात्मक झाले हे अत्यंत योग्य निरिक्षण आहे. अशा जगण्याला मन तयार होत नाही.

कवितानागेश's picture

30 Oct 2012 - 12:20 pm | कवितानागेश

आवडलं... :)

लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही खुप आवडले..:)

चिगो's picture

30 Oct 2012 - 12:43 pm | चिगो

आवडले..

तिमा's picture

30 Oct 2012 - 1:18 pm | तिमा

इतका सुंदर निसर्ग आणि त्यावरील चांगला लेख,पहायला आणि वाचायला मिळावा म्हणून रेटिनाची डिटॅचमेंट होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

मी_आहे_ना's picture

30 Oct 2012 - 1:26 pm | मी_आहे_ना

मस्त लेख आणि प्रतिक्रिया सुद्धा. (निसर्गच तो, त्याची अ‍ॅटॅचमेंट काय अन् डीटॅचमेंट काय, नैसर्गिक... म्हणून सुरेखच असणार. पण म्हणून आपल्या मनाला दूषणं लावायची का?, नाही.. तेही नैसर्गिकच आहे, म्हणून सुरेखच आहे. 'रिलेटिव्हिटी'चा थोडा-फार काय तो फरक. कधी ही रिलेटिव्हिटी वेळ-काळाची, तर कधी परिस्थितीची)

सराटा's picture

30 Oct 2012 - 1:49 pm | सराटा

प्रतिक्रिया आवडली

आवडलं, सगळ्यात असून कशातच नसणं खरंच कठीण !!

स्पंदना's picture

31 Oct 2012 - 6:06 am | स्पंदना

+१

श्री. सुड, त्याला आंतरजालीय मराठी संस्थळाचा संपादक होणे म्हणतात.

सोनल कर्णिक वायकुळ's picture

30 Oct 2012 - 2:29 pm | सोनल कर्णिक वायकुळ

आवडलं. सुन्दर
सोनल

स्वाती दिनेश's picture

31 Oct 2012 - 2:10 pm | स्वाती दिनेश

सुरेख प्रकटन!
काही प्रतिसादही आवडले,
स्वाती

प्रकटन आणि प्रतिसाद रोचक आहेत...