काही माणसे जगावेगळे करून दाखवायलाच जन्माला आली असतात. साहसी वृत्ती त्यांच्या रक्तातूनच वाहत असते. अश्या वृत्तीला जर दुर्दम्य इच्छाशक्ती, जीवापाड मेहनत करणे, झोकून देण्याची तयारी, खंबीरता, संयम व त्याग या गोष्टींची साथ लाभली तर पूर्वी कधीही न घडलेले घडवून आणता येते. अशीच माणसे सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट च्या शिखरावर पोचू शकतात, इंग्लिश किंवा तत्सम खाडी पोहून जाऊ शकतात, उत्तर व दक्षिण धृवावर झेंडा फडकवू शकतात, मारियाना गर्त्याच्या तळाशी पोचू शकतात. असाच एक माणूस आहे फेलिक्स बॉमगार्टनर. ऑस्ट्रियाचा रहिवासी असलेला फेलिक्स ४३ वर्षे वयाचा आहे व काही तासांतच त्याच्या आजवरच्या सर्वात महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशस्वितेसाठी तो झेपावणार आहे. त्याला पाठबळ आहे विज्ञानातील विविध शाखांच्या तंत्रज्ञांचा समावेश असलेल्या त्याच्या टीम चे. तर हि मोहीम आहे भूपृष्ठापासून १ लक्ष २० हजार फूट (३६.५ किमी) उंची वरून स्काय डाइव्ह करणे. मौजमजेसाठी स्कायडाइव्ह करणारे अंदाजे १०-११ हजार फुटांवरून उडी मारतात व ५ हजार फुटांच्या आसपास पॅराशूट उघडतात. या उंचीच्या जवळ जवळ १२ पट उंचीवरून फेलिक्स जमिनीकडे झेपावणार आहे. हा प्रश्न केवळ पटींचा नाहीये कारण भूपृष्ठापासून जितके उंच जाल तितके तापमान कमी व वातावरणाचा अधिक दाब असे गुणोत्तर असते. एवढ्या उंचीवरून आजवर कुठल्याही मानवाने उडी मारलेली नाहीये. याअगोदरचा सर्वोच्च विक्रम आहे जोसेफ किट्टिंजर यांच्या नावावर - १ लक्ष २ हजार ८०० फूट (३१.३३ किमी). अन हा विक्रम १९६० साली करण्यात आला होता. अगोदरच्या चाचणीच्या वेळी काढण्यात आलेले छायाचित्रफेलिक्सच्या या प्रकल्पाचे नाव आहे स्ट्रॅटोस. एनर्जी ड्रिंक बनवणारी रेड बुल ही कंपनी याची प्रायोजक आहे. यामध्ये वापरली जाणारी महत्त्वाची संसाधने म्हणजे एक कुपी जी हिलियम वायू भरलेल्या बलूनच्या साहाय्याने फेलिक्सला आकाशात नेईल. या मोहिमेसाठी विशेष बनविला गेलेला स्पेस सूट, पॅराशूट व इतर अनेक तांत्रिक उपकरणे. स्थळ असणार आहे, अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील रॉसवेल. तेथील स्थानिक वेळेनुसार ९ ऑक्टोबर च्या सकाळी ६ वाजता मोहिमेला सुरुवात होईल. अर्थात हवामानात प्रतिकूल बदल न झाल्यास.
या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फेलिक्सचा वेग आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक असणार आहे. अंदाजे अकराशे दहा किमी / तास. आंतरखंडीय प्रवासी विमाने या वेगापेक्षा अधिक वेगाने सहसा चालविली जात नाही. हि मोहीम यशस्वी झाल्यास नवा विक्रम तर बनेलच पण कितीतरी महत्त्वाची शास्त्रीय माहिती हाती लागेल. त्याचा उपयोग अवकाश मोहिमांमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी करता येईल. पण या सर्व बाबी कितीही आकर्षक वाटत असल्या तरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हि मोहीम यशस्वी होईलच याची संपूर्ण खात्री कोणीच देऊ शकत नाही. कुठलाही बिघाड, फेलिक्सच्या हातून घडलेली चूक वा अनपेक्षित आव्हान याची परिणिती सरळ फेलिक्स च्या मृत्यूमध्ये होवू शकते. उदा. वातावरणाचा दाब वा फ्रीफॉल चा वेग फेलिक्सच्या स्पेस सूटला सहन न झाल्यास फेलिक्सच्या शरीरातील रक्त व इतर द्रव्यात अत्यंत धोकादायक बुडबुडे निर्माण होवू शकतात किंवा मेंदूचाही स्फोट होवू शकतो. अर्थात असे होवू नये म्हणून फेलिक्स व त्याच्या टीमने जवळ जवळ तीन वर्षे राबून मोहिमेची आखणी केली आहे व कमी उंचीच्या दोन चाचण्याही केल्या आहेत. पण एवढ्या उंचीवरून हि पहिलीच उडी असणार असल्याने सर्वच बाबी अचूक असतील याची खात्री कुणीच देऊ शकत नाही.
फेलिक्स ने आजवर पार पाडलेल्या मोहिमांपैकी काही मोहिमा पाहिल्यास आपल्यालाही या मोहिमेच्या आश्वासकतेबाबत अधिक विश्वास वाटेल. १. पेट्रोनस टॉवर्स, कौलालंपूर व तायपेयी १०१, तैवान अश्या अती - उंच इमारतींवरून यशस्वी बेस जंपिंग२. ओमान मधील एक कमी व्यासाची दरी व ब्राझील मधील ख्रिस्ताच्या पुतळ्यावरून बेस जंपिंग३. विमानातून उडी मारून ब्रिटिश खाडीवरून कार्बन फायबर विंग्ज (हे पॉवर विंग्ज नाहियेत) च्या साहाय्याने ३५ किमीची ब्रिटिश खाडी पार करणे.४. सध्याच्या मोहिमेसाठीच्या चाचण्यांसाठी प्रथम ७१,५८१ व नंतर ९६,६४० फूट उंचीवरून यशस्वी स्काय डाइव्ह केले आहे. त्यात आज वापरली जाणारीच उपकरणे वापरली गेली होती. या मोहिमेमागे वर्षानुवर्षांची अवघड तपस्या आहे. फेलिक्स व त्याच्या टीमचे अनेक महिन्यांपासून दिवस रात्र सुरू असलेले परिश्रम आहेत. अन जगभरातील चाहत्यांचा सदिच्छा आहेत. चला तर मग आपणही या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रार्थना करूया. या मोहिमेचे आंतरजालावर व जगातील अनेक देशांतील वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार आहे.स्रोत - प्रोजेक्ट स्ट्रॅटोस चे संस्थळ, विकी व जालावरील बातम्या. सर्व माहिती व चित्रे जालावरून साभार.प्रोजेक्ट स्ट्रॅटोसचा दुवा - रेड बुल स्ट्रॅटोस; यावर उलटगणतीचे घड्याळ सुरू आहे.बातम्या - १, २, ३चित्रफीत - फेलिक्सचे निवडक कारनामे.अवांतर - १) हॉट एअर बलूनने सर्वोच्च उंची गाठण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर आहे. रेमंड कंपनीचे संस्थापक श्री विजयपत सिंघानिया यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये ६९००० फुटांची उंची गाठली होती. २) शीतल महाजन यांनी उत्तर व दक्षिण धृवावर यशस्वी पॅरा जंपिंग करण्याचा विक्रम केला आहे. गैर-व्यावसायिक गटात मोडणाऱ्या एकाच स्त्रीने या दोन्ही मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडणे हाही एक विक्रम आहे.टिप: या मोहिमेस भारतीय प्रसारमाध्यमांनी विशेष प्रतिसाद न दिल्याने मराठी आंतरजालाच्या वाचकांसाठी हा लेखनप्रपंच ऐन वेळी हाती घेतलाय. वर लिहिलेली सर्व माहिती व तिचे विश्लेषण अचूक असेलच याची खात्री प्रस्तुत लेखक देऊ शकत नाही.
प्रतिक्रिया
9 Oct 2012 - 11:08 am | जेनी...
:)
9 Oct 2012 - 11:52 am | पुण्याचे वटवाघूळ
अचाट धाडसी मोहिमेसाठी फेलिक्सला शुभेच्छा आणि ही माहिती दिल्याबद्दल श्रीरंगरावांचे आभार.
9 Oct 2012 - 12:02 pm | रमताराम
लै ड्येंजर मानूस. त्याच्या या अचाट साहसातून सुखरूप बाहेर येवो ही सदिच्छा.
9 Oct 2012 - 12:21 pm | शिल्पा ब
डेंजरस !! एकदम आवडेश. आमच्याकडुन फेलिक्सला शुभेच्छा !
9 Oct 2012 - 12:22 pm | शिल्पा ब
डेंजरस !! एकदम आवडेश. आमच्याकडुन फेलिक्सला शुभेच्छा !
9 Oct 2012 - 12:58 pm | अक्षया
+१
9 Oct 2012 - 1:03 pm | तिमा
यांत नायगारावर दोरावरुन चालण्यापेक्षा कमी धोका आहे. साहसवीराची उडी यशस्वी होऊ दे.
9 Oct 2012 - 1:45 pm | खुशि
सलाम त्या साहसवीराला आणि अनेक अनेक शुभेच्छा.
9 Oct 2012 - 2:26 pm | सहज
माहीतीबद्दल धन्यवाद.
थेट प्रक्षेपण दुवा.
9 Oct 2012 - 3:29 pm | मी_आहे_ना
फेलिक्सच्या मोहिमेला शुभेच्छा ... काउंटडाऊन पहातोय.
सविस्तर माहितीबद्दल धन्स...
9 Oct 2012 - 3:33 pm | अत्रुप्त आत्मा
सलाम आणी शुभेच्छा...!
9 Oct 2012 - 3:40 pm | स्पंदना
आज रात्री ११ वाजता पहाता येइल आम्हाला. धन्यवाद श्रीजो!
9 Oct 2012 - 5:52 pm | स्पंदना
डीले झालाय प्रोग्रॅम वार्यामुळे. जवळ जवळ २ तासांनी कळेल कंडीशन्स कश्या आहेत ते.
http://www.redbullstratos.com/live/ इथे पहाता येइल लाइव्ह.
9 Oct 2012 - 4:47 pm | वामन देशमुख
फ़ेलिक्सला शुभेच्छा!
9 Oct 2012 - 5:18 pm | मालोजीराव
THE ONLYTHING STANDING BETWEEN YOU AND YOUR GOAL IS THE BULLSHIT STORY YOU KEEP TELLING YOURSELF AS TO WHY YOU CAN'T ACHEIVE IT. - फेलिक्स
9 Oct 2012 - 5:34 pm | प्रभाकर पेठकर
फेलिक्स ह्यांना त्यांच्या ह्या अतुलनिय धाडसासाठी अनेकानेक शुभेच्छा..!
शाळेत तर, जमिनीपासून जसजसे वर जावे तसतसे वातावरण विरळ होत जाते आणि त्याचा दाब कमी होत जातो असे शिकविल्याचे आठवते. जमिनीवरील दाब १५ पौंड दर वर्ग इंच असतो असे शिकल्याचे आठवते.
अर्थात तरीही माझ्याकडून चुक होऊ शकते. कोणा जवळ योग्य माहिती असेल तर माझी चुक सुधारावी ही नम्र विनंती.
9 Oct 2012 - 5:40 pm | बाळ सप्रे
सहमत.. जास्त उंचीवर वातवरणाचा दाब कमी असतो..
9 Oct 2012 - 6:32 pm | श्रीरंग_जोशी
या बाबीवर मी अधिक लिहिण्यापेक्षा त्या क्षेत्रातील जाणकारांचे मार्गदर्शन घेणे अधिक इष्ट ठरेल. कॉलिंग गवि.
बाकी सर्व प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद. भारतात हिस्टरी वाहिनीवर थेट प्रक्षेपण सुरू आहे असे एका बातमीत वाचले.
शेवटचा अर्धा तास राहिलाय. http://www.redbullstratos.com/the-mission/launch-progress/
10 Oct 2012 - 10:01 am | श्रीरंग_जोशी
गवि यांचेकडून मिळालेले उत्तर-
त्या उंचीवर व्हॅक्यूम अअसल्याने आतून बाहेर दाब येतो आणि शरीर अवयव फुटतात.
समुद्राखाली खोल बाहेरुन आत दाब असतो.
फ्री फॉलचा दाब नाही. पण जी फोर्सने रक्तप्रवाह अडखळतो. गळा आवळ सूट घालतात.
फ्री फॉलने उष्णता होते म्हणून थर्मलसस्पेससूट.
9 Oct 2012 - 8:58 pm | मी_आहे_ना
वातावरण पोषक नसल्याने 'झेप' घेण्याची वेळ लांबवण्यात आली आहे
:(
9 Oct 2012 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फेलिक्सला शुभेच्छा आणि ही माहिती डकवल्याबद्दल श्रीरंग यांचे आभार.
नवीन अपडेट्स काय आहेत, कुठं बघायला मिळतंय सध्या ?
-दिलीप बिरुटे
9 Oct 2012 - 9:14 pm | सस्नेह
फ़ेलिक्सला शुभेच्छा !
9 Oct 2012 - 9:20 pm | श्रीरंग_जोशी
http://www.redbullstratos.com/the-mission/launch-progress/
जालावर थेट प्रक्षेपण (भारतात दिसेल का हे ठाउक नाही) - www.youtube.com/redbull
सद्यस्थिती - Wind conditions have improved and the balloon is being laid out. Felix Baumgartner's suit up procedure is complete.
9 Oct 2012 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिष्ट्री वाहिनी लावली आहे, पण वातावरण योग्य नसल्यामुळे झेप एका तासाने लांबली आहे. भारतीय प्रमाण वेळ म्हणजे आज रात्री १० वाजून ४१ मिनिटांनी म्हणजेच एक तासाने सुरु होईल. आत्ता विविध बातम्यांच्या वाहिनीवरुन फेलिक्सबद्दल माहिती देणं चालु आहे.
फेलिक्सला वरपर्यंत म्हणजे संभाव्य अंतरापर्यंत पोहचण्याठी तीन तास किंवा अधिक लागणार आहेत, येतांना मात्र २० मिनिटात पोहचणार आहे.
-दिलीप बिरुटे
9 Oct 2012 - 10:25 pm | सोत्रि
रंगाराव ह्या माहितीबद्दल धन्यवाद!
- (स्काय डाइव्हींग करण्याची सुप्त इच्छा असलेला) सोकाजी
9 Oct 2012 - 10:39 pm | श्रीरंग_जोशी
स्कायडाइव्ह व बंजी जंपींग करण्याची माझीही अनेक वर्षांची सुप्त इच्छा जमिनीपासून १२०० फुटांवर ८० किमी/तास या वेगाने हा प्रकार करून पाहिल्यावर कुठे गुप्त झाली ते कळलेच नाही ;-).
आपली हि इच्छा लौकराच पूर्ण होवो.
9 Oct 2012 - 10:45 pm | मराठे
एक्दम षॉलीड! आम्ही बंजी जंपिंग सोडाच, दांडीवरून गंजी काढण्यासाठीसुद्धा जंपिंग करत नाही!
9 Oct 2012 - 11:18 pm | मराठे
वार्यामुळे आजची जंप क्यांसल, कदाचीत उद्या (पण उद्यासुद्धा चित्र फारसं आशादायक नाहिये!) :(
9 Oct 2012 - 11:42 pm | श्रीरंग_जोशी
सविस्तर वृत्त आज रद्द झाल्यामूळे हिरमोड झाल्यासारखे वाटत आहे.
आशा आहे लौकरच निसर्गाचीही साथ मिळेल अन मोहीम फत्ते होईल.
10 Oct 2012 - 2:45 pm | ऋषिकेश
चांगली माहिती.. नवा फ्रेश विषय.. वाचुन मजा आली!
अर्थात फेलिक्सला आणि त्याच्या तांत्रिक चमुला शुभेच्छा आहेतच
13 Oct 2012 - 2:58 am | टिल्लू
फेलिक्सला शुभेच्छा !
मी १४००० फुटावरुन उडी मारली आहे. पण १२०००० फुट म्हणजे .... सॉल्लीड दम हवा.
माझ्या बाबतीत सांगयच तर विमान आकाशात उंच जात होते तोवर ठीक, पण जेंव्हा दरवाजा उघडला गेला
आणि माझी पाळी आली, तेंव्हा जाम टरकली होती. पण एकदा का उडी मारली कि मग आहाहा .... अवर्नणिय !!!
13 Oct 2012 - 9:17 am | किसन शिंदे
छान माहिती.!
14 Oct 2012 - 9:31 am | श्रीरंग_जोशी
रॉसवेल न्यू मेक्सिको येथील स्थानिक वेळेनुसार रविवार १४ ऑक्टोबर सकाळी ६ वाजतापासून मोहीम नव्याने सुरू होत आहे.
हवामानामध्ये अनपेक्षित असे बदल न झाल्यास आपण एका ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार बनणार आहोत.
फेलिक्स ज्यांचा विक्रम मोडणार आहे ते जोसेफ किटिंगर जमिनीवरील नियंत्रण कक्षातून फेलिक्सशी संपर्क साधणारे प्राथमिक अधिकारी असणार आहेत. जोसेफ उर्फ जो हे ८४ वर्षांचे आहेत.
14 Oct 2012 - 11:08 am | मदनबाण
या विक्रमी उडीची केव्हाची वाट पाहतोय ! :)
14 Oct 2012 - 1:01 pm | चिगो
धन्यवाद, रंगाजी.. आणि शुभेच्छा, फेलिक्स..
14 Oct 2012 - 9:18 pm | श्रीरंग_जोशी
यूट्यूब वर थेट प्रक्षेपण सुरू आहे. अन ते भारतातही दिसत आहे :-).
फेलिक्स २१ हजार फुटांपलिकडे गेलाय.
नक्की बघा. जो व फेलिक्स यांचे बोलणे पण ऐकू येत आहे
14 Oct 2012 - 11:23 pm | चिखलू
मला वाटले १ लाख २० हजार फुटावरुन स्काय डाइव्ह करणार आहे. आता १ लाख २८ हजार झालेत.
बहुतेक आता Final Inspections चालू आहेत. उत्सुकता खूप वाढलेली आहे.
All the best to Felix.
14 Oct 2012 - 11:55 pm | श्रीरंग_जोशी
ठरल्यापेक्षाही अधिक उंचीवरून फेलिक्सने उडी मारली.
फ्रीफॉलच्या दरम्यान त्याचे स्पिनिंग बघून धडकीच भरली होती.
पण बहाद्दराने कौशल्याने स्पिनिंगवर नियंत्रण मिळवले.
अन थोड्याच वेळात जमिनीवर यशस्वी लँडींग केले.
सविस्तर विश्लेषण लौकरच लिहीन.
15 Oct 2012 - 12:01 am | रेवती
उडी मारल्यावर सटासट खाली येत होता. त्यावेळी जरा भिती वाटली.
15 Oct 2012 - 12:05 am | शिल्पा ब
लिंक द्या कोणीतरी. मी युट्युबवर बघतेय पण दिसत नाही.
15 Oct 2012 - 12:09 am | श्रीरंग_जोशी
http://www.youtube.com/redbull
अजून यूट्यूबवर क्लिप्स यायच्या आहेत.
बातम्यांमध्ये लगेच बघता येईल.
15 Oct 2012 - 12:26 am | श्रीरंग_जोशी
El salto de Felix Baumgartner by SpheraChannel
15 Oct 2012 - 1:31 am | शिल्पा ब
अमेझींग !! इतक्या उंचीवरसुद्धा त्याने जो कंट्रोल दाखवला त्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच !
धाग्यासाठी अन क्लीपसाठी धन्यवाद.
15 Oct 2012 - 12:34 am | चिरोटा
प्रक्षेपण पाहिले.बघूनच धडकी भरत होती.
15 Oct 2012 - 2:03 am | श्रीरंग_जोशी
यूट्यूबवर पत्रकार परिषद थेट दाखवत आहेत.
15 Oct 2012 - 4:04 am | स्पंदना
किती वेळ जाग रहाव लागल. वर पोहोचायलाच २ तास लागले. पण फार थरारक वाटल. त्यात त्याच ब्रीदिंग जे ऐकु येत होत, त्यामुळे तर प्रत्येक क्षण आपण त्याच्याबरोबर आहोत अस वाटत राहिल.
15 Oct 2012 - 6:47 am | श्रीरंग_जोशी
प्रथम मूळ लेखातील चुकीची दुरुस्ती करतो. फेलिक्सच्या नावाचा उच्चार फिलिक्स असा केला जातो. मूळ लेख लिहिला तेव्हा हे नाव इतके काळजीपूर्वक ऐकले नव्हते त्यामुळे स्पेलिंगनुसार उच्चार लिहायच्या सवयीने घात केला.
१. आजवरच्या कुठल्याही मोहिमेत वापरल्या गेलेल्या हिलियम बलूनपेक्षा बऱ्याच अधिक क्षमतेचा बलून वापरण्यात आला.
२. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ः३० ला बलूनने उड्डाण केल्यावर अडीच तासांनी १ लक्ष २८ हजार ९७ फूट (३९ किमी) एवढी उंची गाठण्यात आली. अगोदर ठरविलेली उंची १ लक्ष २० हजार फूट इतकीच होती.
३. या सर्व काळात नियंत्रण कक्षाच्या साहाय्याने फिलिक्सने दोनदा विविध घटकांची खातरजमा करून घेतली. यामध्ये विविध उपकरणांची स्थिती, विविध इंडिकेटर्सवर दिसत असलेले आकडे किंवा दिव्यांचा रंग वगैरे. या सर्व काळात फिलिक्सला व्यस्त ठेवणे फार महत्त्वाचे होते. प्रेशर सूटवरील इंडिकेटर्सची स्थिती बघण्यासाठी फिलिक्स एका छोट्या आरशाचा वापर करत होता.
४. सर्व उपकरणे व्यवस्थित चालत असली तरी फिलिक्सच्या शिरस्त्राणाच्या काचेवरील आर्द्रता नियंत्रित करणारे उपकरण व्यवस्थित काम करत नव्हते. अर्थात मोहीम थांबवण्याइतका हा घटक उपद्रवी नव्हता.
५. बलूनची गती वाढविण्यासाठी अधून मधून हिलियम वायूचे आकारमान कमी करण्यात येत होते.
६. या सर्व काळात कुपीमध्ये भूपृष्ठावर असलेल्या हवेचा दाबाएवढा दाब कृत्रिमपणे राखण्यात आला. पण उडी मारताना कुपीचे दार उघडण्यासाठी हा दाब नियंत्रित करणे थांबवण्यात आले. फिलिक्सने परिधान केलेला प्रेशर सूट यावेळी (अपेक्षेप्रमाणे) फुगू लागला.(अवकाशातील निर्वात पोकळीत मानवी शरीराला भूपृष्ठावर असलेल्या दाबासारखी परिस्थिती कृत्रिम पद्धतीने मिळवून देणारा विशेष सूट. या प्रकारचा सूट अंतराळवीर वापरतात)
७. प्रेशर सूटमधील दाबाचे प्रमाण आवश्यकतीवढे बनल्यावर आसना समोरील उपकरणे बाजूला सारून फिलिक्सने कुपीचे दार उघडले. समोर दिसणारे अवकाशाचे मनोहर रूप अत्यंत विलोभनीय वाटत होते.
८. सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत व सर्व परिस्थिती उडी मारण्यास अनुकूल आहे याची खातरजमा केल्यावर नियंत्रण कक्षाद्वारे फिलिक्सला उडी मारण्याची सूचना करण्यात आली.
९. यावेळी फिलिक्सने उडी मारण्यापूर्वीचा शेवटचा संदेश नियंत्रण कक्षाला दिला व सलाम करून एकदम सहजपणे कुपीबाहेरील पायरीवरून स्वतःला बाहेर ढकलून दिले. नेहमी उडी मारताना पायांतून जसा जोर लावला जातो तसे अजिबात न करता.
१०. कुपीवरील कॅमेऱ्यातून हे दृश्य अत्यंत थरारक दिसले. फिलिक्सची क्षणाक्षणाला लहान होत जाणारी आकृती काही क्षणांतच दिसेनाशी झाली.
११. यापुढचे दृश्य जमिनीवरील शक्तिशाली इन्फ्रारेड कॅमेऱ्यांद्वारे दाखवले जात होते. थेट प्रक्षेपणात फिलिक्सचा वेग व उडी मारल्यापासूनचा अवधी दाखविण्यात येत होते.
१२. सर्व काही सुरळित पार पडत आहे असे दिसत असतानाच, फिलिक्सचे शरीर अनियंत्रितरीत्या स्पिन होऊ लागले. हे पाहून नियंत्रण कक्षातील वातावरण एकदम तणावग्रस्त झाले. कारण स्पिन होण्याचा वेग फार वाढल्यास शरीरातील रक्त मेंदूकडे सरकून प्रथम बेशुद्धावस्था व नंतर मृत्यूदेखील ओढवू शकतो.
१३. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक वेगळे पॅराशूट फिनिक्सजवळ होते पण त्याचा उपयोग केल्यास वेग कमी होऊन सूपरसॉनिक वेग गाठण्याच्या उद्दिष्टावरच पाणी फेरल्या गेले असते. जो काही निर्णय घ्यायचा होता तो केवळ काही सेकंदातच घेणे आवश्यक होते. जिगरबाज फिलिक्सने या मार्गाचा अवलंब न करता प्रथम एक हाताला शरीराच्या काटकोनात स्थिर करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने शरीराची ती स्थिती स्पिन होण्याच्या दिशेला अधिक अनुरूप असल्याने उलट परिणाम झाला.
१४. क्षणार्धात फिलिक्सने तो हात शरीराजवळ ओढून दुसरा हात काटकोनात स्थिर केला. यावेळी स्पिन होण्याची तीव्रता कमी होऊ लागली व भूपृष्ठापासून जवळ येऊ लागल्याने वातावरणाची घनता वाढू लागली व फिलिक्सचा वेग कमी होऊ लागला. त्याअगोदर त्याने गाठलेला सर्वाधिक वेग होता (१३४२ किमी/तास - नवा विक्रम). ३५ हजार फूट उंचीवर असल्यापासून त्याच्या प्रेशर सूट मधील दाबाची तीव्रता कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जेणेकरून त्याला हालचाल करणे सोपे जाईल.
१५. उडी मारल्यापासून चार मिनिट वीस सेकंदांनी फिलिक्सने पॅराशूट ओपन केले व फ्रिफॉल संपून तो पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीकडे कमी वेगाने येऊ लागला. फ्रिफॉलद्वारा त्याने १ लक्ष १९ हजार ८४६ फुटांचे अंतर पार केले. उरलेले ४ हजार ९०० फुटाचे अंतर त्याने अंदाजे पाच मिनिटात पार पाडले व मोहीम पूर्णत्वाला पोचली. उड्डाणाच्या काही मैल अंतरावर फिलिक्स उतरला.
१६. हेलिकॉप्टर्सद्वारे फिलिक्सचे डॉक्टर व इतर काही सहकारी काही क्षणातच त्याजागी पोचले व फिलिक्सच्या सुखरूप असल्याची खातरजमा झाली. नियंत्रण कक्षात जल्लोश झाला. फिलिक्सचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
१७. काही तासांनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व आकडेवारी देण्यात आली. हि आकडेवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांकडून प्रमाणित केले जाणे बाकी आहे.
१८. पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत विनम्रपणे फिलिक्सने सांगितले की अश्या आत्यंतिक उंचीवर पोचल्यावर सर्वप्रथम होणारी जाणीव म्हणजे विश्वाच्या अनंततेपुढे आपले अस्तित्व किती क्षुल्लक आहे. सूपरसॉनिक वेगात असताना कसे वाटत होते या प्रश्नावर त्याने उत्तर दिले की, प्रेशर सूटमुळे व अवकाशातील जवळ जवळ निर्वात पोकळीमुळे व तुलना करण्यासाठी कुठलेच दुवे नसल्याने शरीराला वेगाच्या तीव्रतेची अनुभूती होत नव्हती परंतु डोक्यात चालणाऱ्या विचारांद्वारे मात्र विचित्र अवस्था होत होती जी शब्दांत मांडणे अवघड आहे.
चित्रफिती - फिलिक्सची उडी, पत्रकार परिषद
टीप - वरील माहितीचे विश्लेषण मी माझ्या कुवतीनुसार केले आहे. त्यामध्ये त्रुटी असण्याची शक्यता आहे.
15 Oct 2012 - 5:17 pm | सुधीर
शेवटची काही सेकंद आवासूनच पाहावी लागली. भन्नाट! व्हिडिओक्लीप आणि माहितीबद्धल धन्यवाद!
15 Oct 2012 - 9:29 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्रीरंग_जोशी.
अत्यंत थरारक, अविश्वसनिय, अचाट, अद्भूत अशी ही एवढ्या उंचावरून मारलेली उडी पाहताना, आनंद, काळजी, परिणामांच्या भय अशा संमिश्र भावनांच्या दडपणाने, अनेकदा डोळे पाणावले.
पुन्हा एकवार धन्यवाद.
15 Oct 2012 - 11:13 am | ज्ञानराम
माझ्या कडे शब्दच नाहीत .. सॅल्यूट....
धन्यवाद श्रीरंग_जोशी...
15 Oct 2012 - 11:42 am | ऋषिकेश
वा.. उत्तम .. अभिनंदन! त्याचे फिलिक्स कसला फिनिक्स असे नाव ठेवायला हवे!
श्रीरंग जोशी यांचे विशेष आभार!
15 Oct 2012 - 11:50 am | ५० फक्त
जाम भारी माहिती, माझ्या वजनाचा विचार करता मला अशी संधी मिळाल्यास मी यापेक्षा दुप्पट वेगाने खाली पडेन, आणि मिनी / मायक्रो लोणार निर्माण होईल असं वाटतं.
15 Oct 2012 - 12:56 pm | दादा कोंडके
दोन वेगवेगळं वस्तुमान असणार्या गोष्टी एकाच उंचीवरून सोडल्या असता एकदमच खाली पोहोचतील असं वाचल्याचं स्मरतं.
अर्थात धोतर किंवा लुंगी घालून उडी मारल्यास फरक पडेल. ;)
15 Oct 2012 - 11:57 am | चिरोटा
पुढच्यावेळी हिलियन बलून मध्ये रॉबर्ट,खुर्शिद्,गडकरी,मनमोहन,पवार ह्यांना बसवा.
15 Oct 2012 - 1:51 pm | पैसा
एका थरारक प्रयोगाच्या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद! फिलिक्सचे अभिनंदन!
15 Oct 2012 - 2:17 pm | मी_आहे_ना
असेच म्हणतो, फिलिक्सचे अभिनंदन आणि जोशीबुवांना धन्स.... 'थेट' प्रक्षेपण नाही बघितले, आता क्लिप्स बघतो.
16 Oct 2012 - 1:21 pm | मूकवाचक
+२
15 Oct 2012 - 7:02 pm | निशदे
नुसते प्रक्षेपण बघतानाच अंगावर काटा आला होता. असल्या साहसाला मुजरा..........
15 Oct 2012 - 11:18 pm | संजय क्षीरसागर
हे सहाजिक आहे, पण
ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. धन्यवाद!
16 Oct 2012 - 8:23 am | पाषाणभेद
एकदम साहसी उडी. फार धैर्यवान आहे फिलीक्स.
माहीतीबद्दल श्रीरंगाचे आभार.
16 Oct 2012 - 10:28 am | अमोल केळकर
मस्त माहिती. अचाट साहस असेच म्हणावे लागेल .
अमोल केळकर
16 Oct 2012 - 11:37 am | श्रीरंग_जोशी
फिलिक्स यशस्वीरीत्या जमिनीवर पोचल्यावर नियंत्रण कक्षातील टीमने लगेच कुपीला परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली.
त्यासाठी हिलियम बलूनपासून वेगळे कसून एका विशेष पॅराशूटच्या साहाय्याने कुपीला जमिनीवर परत आणण्यात आले. उड्डाणाच्या ठिकाणापासून अंदाजे ७० मैल व फिलिक्सचे लँडिंग जेथे झाले त्या स्थानापासून ५५ मैल पूर्वेला एका शेतात कुपीचे लँडिंग झाले.
लँडिंगच्यावेळी होऊ शकणाऱ्या आघातापासून आतील उपकरणांचे रक्षण करण्यासाठी कुपीच्या रचनेत विशेष काळजी घेण्यात आली होती. जसे कुपीच्या खालच्या बाजूला २ इंच जाडीचे ऍल्यूमिनियमचे क्रश पॅडस लावण्यात आले होते. हि कुपी पुन्हा पुन्हा वापरण्यायोग्य आहे.
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.
6 Feb 2013 - 2:12 am | श्रीरंग_जोशी
फिलिक्सच्या या कामगिरीला चार महिने होत आल्यावर सुधारीत आकडेवारी जारी करण्यात आलेली आहे.
या विषयाशी संबंधीत आंतरराष्ट्रीय संस्थेने अजूनही यासंबधीचे प्रमाणपत्र फिलिक्सला प्रदान केलेले नाही. परंतु लवकरच ते केले जाईल अशी आशा आहे.
25 Oct 2014 - 9:49 am | बहुगुणी
गूगलच्या अॅलन युस्टेस विषयी ही बातमी वाचल्यावर या धाग्याची आठवण झाली.