मोठ्यांच्या छोट्या आठवणी –
बालगंधर्व चित्रपट पाहिला आणि बालगंधर्वांच्या माझ्या मनातील आठवणी जाग्या झाल्या.
साल असावे १९६२- ६३. सांगलीजवळ माधवनगरची कॉटनमिल प्रसिद्ध होती. तिचे मालक शेठ गंगाधर ल. नातूंना आध्यात्मिक वाचनाचा व श्रवणाचा नाद होता. माझ्या वडिलांचा कापडव्यवसाय कॉटन मिलच्या आश्रयाने होता. माझे वडील अध्यात्मिक मनन व चिंतनात रमणारे असल्याने त्यांची व नातू शेठजींची धंद्याच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक चर्चेच्या कारणांनी घसट होती.
त्याकाळात वासुदेवराव जोशी किर्तनकार व प्रवचनकार म्हणून सांगलीच्या भागात फार प्रसिद्ध होते. नातू शेटजींच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाच्या अभंगांवर त्यांच्या निरुपणची व्यवस्था केली गेली. नातू शेठजी मुंबईहून माधवनगरात महिन्यातील काही दिवसासाठी येत त्या काळात रात्री नऊ वाजता विठठल मंदिरात निरुपणाला रंग भरे. वारकरी संप्रदायाला अनुसरून एक वीणाधारी, २०-२५ टाळकरी, असे त्यांचे निरुपण ३-३II तास चाले. मी तेंव्हा १३-१४ वर्षांचा, वडिलांच्या बरोबर ते ऐकायला न चुकता जात असे.
श्री विठ्ठल रुखमणी देवालय असे नामाधिकरण असलेल्या स्व. प्राणजीवन गोवर्धन दास गप, प्रताप शेठजींच्या त्या विठ्ठल मंदिराची शान होती. बुधगावच्या वाटेवर पथिकांना विश्रांती स्थळ व अनेक भाविकांना, कथेकऱ्यांना, अध्यात्मिक साधकांना साधनापुरक असलेली ती वास्तू १०० वर्षापुर्वी आस्थेने बांधली होती. नुकतेच त्या मंदिराला रंगाचा नवा साज चढवला गेल्याने त्याला अशी नवी झळाळी प्राप्त झाली आहे.
1 विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार
दुरवरून दिसणारा कळस, मंदिराच्या प्रवेश द्वारावर शेठजींचा लहान पुतळा, वीणाधारी सरस्वती दोन विशाल सिंहांमधे आसनस्थ आहे.
2 सभामंडपाचा दर्शनी भाग व
3 या विठ्ठलमंदिरातील काळ्यापांढऱ्या फरशीच्या मध्यात बसलेल्या बालगंधर्वांचे दर्शन व गायन झाले.
या दुमजली मंदिरात प्रवेशताना पावसापाण्याच्या संपर्काला दूर ठेवायसाठी पत्र्याच्या पन्हाळी, गणवेशातील दोन शस्त्रधारी रखवालदार, वरच्याबाजूला चार ऋषींची सोबत. मधल्या भागात सन १९११ या मंदिरस्थापना वर्षाची नोंद. त्यावर कळसाच्या बाजूला भगवान श्री कृष्ण उभे, समोर एकतारी धारी मीरा?
त्या मंदिराच्या परिसरात पांथस्थांना राहायला ओसऱ्या व पडव्या आहेत. मागे विहिर व मंदिराच्या पुजारीव इतर सेवेकऱ्यांसाठी राहायची सोय.
सभा मंडपात वेलबुट्ट्यातील अर्ध कमानी गुलाबी-पिवळ्या रंगाची पखरण असलेले नक्षी काम, समोर भरपूर फुलमाळांनी सजवलेली रुकमणी-विठोबाची मुर्ती. त्यासमावेत गणपती व हनुमानाची लहान प्रतिमा डाव्या-उजव्या बाजूला.
प्रवचनाच्या दिवशी शेठजीं येणार म्हटल्यावर विशेष थाट असे. सभामंडपात सतरंज्या, मधोमध प्रवचनकारांसाठी रंगीत जाजम. शेठजींसाठी शुभ्र नव्या चादरींखाली मऊमऊ गादी. हात टेकायला लोड, पाठीशी तक्के, समोर पाणी भरलेली चांदीची तांब्या-भांडी. लवंग-इलायचीदाणी. शेठजींच्या पत्नी सौ. अक्कां समावेत त्यावेळच्या प्रतिष्ठित स्त्रिया वरच्या मजल्यावरून संकीर्तनाचा आनंद घेत.
काही नोकरमंडळी शेठजींच्या नजरेत भरावे अशा बेताने पितळेचे मोठे दोरीवाले टाळ गळ्यात घेऊन नामसंकीर्तनाच्या वेळी विठ्ठ्ल-विठ्ठल, रामकृष्णहारी असा हरिनामाचा गजर करताना तल्लीन असल्याचे दर्शवत. हुरुपाने नाच करताना आमच्यासाऱख्यांना खुदकन हसू येई. कारण कधी काही कारणांनी शेठजी मधेच उठून गेले तर ही मंडळी टाळ गळ्यातून काढून टाकून टाळीवर येत. कधी कधी एक बोट वर करायच्या बहाण्याने धूराचे झुरके घेऊन गुप्त होत.
बुवांच्या पायाशी डाव्याहाती पेटीवाले, उजवीकडे बापुराव म्हसकर तबल्याची ठाकठुक करून मानेने हो म्हटले की वीणाधारींकडून कथनासाठी जोशीबुवा पागोटे काढून सज्ज होत. कमर खोचून ‘जेहत्त्ते कालाचे ठाई’ म्हणून सुरवात केली की त्यांच्या अमोघ वाणीत अवीट रंग भरे. तुकारामांचे अभंग, एकनाथ, नामदेव संताच्या काव्यासह, ज्ञानेश्वरीतील कल्पनाविलास, ओव्या, अनेक कवींचे दाखले, त्यांचे त्यावरील भाष्य माझ्यासारख्या बालबुद्धीला समजले नाही तरी जरूर भावले.
‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी ।।’
... ज्ञानोबा माउलींनी हरीमुखे म्हणा हे दोनदा सांगण्याचा गूढभाव काय? अगणित पुण्य मिळवायचे असेल तर वारंवार हरीनाम घ्या. असे वेदशास्त्र हात वर करून ठासून सांगण्यातील कळकळ त्यातून व्यक्त होते....
... अशाच एका प्रवचनाच्या रात्री बुधगावकरांकडे पाहुणचार घेताना बालगंधर्व आज सेवेला हजेरी लावणार आहेत असे कळले. एरव्ही कधी न फिरकणारे बुधगावकर राजे त्यांच्या समावेत बालगंधर्वांची स्वारी. त्यांना उचलून आणावे लागायचे म्हणून नोकर.. वेगळे तबला पेटीवाले असा फौजफाटा गाडीतून आला. त्यांना खच्चुन भरलेल्या लोकांतून जागा करून देऊन काळी टोपी, सफेज कुडता, गोरे पान क्षीण पण तीक्ष्ण नजर, उपस्थितांना नमस्कार करून विठ्ठलासमोर सेवा करायची इच्छा आहे. आवाज गोड करून घ्यावा असे विनम्रमणे म्हणून हात डाव्या कानाला लाऊन ...
‘पतित तू पावना म्हणविसी नारायणा’ भजनाला आरंभ केला. आर्त्र स्वरात भिजलेले कारुण्य. सहज फिरणारा आवाज, तानांची हळुवार सुरावट. संत कान्होपात्रेच्या आळवणीला सुराचा परीसस्पर्ष. बालगंधर्वांच्या गलितगात्र अवस्थेतील त्या करुण भजनातील शब्दांनी वरिठांना त्यांच्यागत वैभवाची आठवण येऊन भडभडून आले. त्यांची दीन स्वरांजली, प्रत्यक्ष दर्शन आणि भजनातील शब्द वैभव. कान, लोचन अणि मनाने स्तब्धपणे अनुभवलेले ते क्षण आंतरिक अनुभूति देऊन गेले.....
चित्रपटाने त्यांच्या वैभवशाली नाट्परंपरेची, शरीर सौष्ठवाची व स्वरगंगेची झलक अनुभवली... आणि आठवणींना उजाळा मिळाला.
प्रतिक्रिया
15 Aug 2012 - 8:07 pm | पैसा
बालगंधर्वांना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे? शेवटच्या दिवसांत का असेना, सोनं धुळीत पडलं तरी सोनंच असतं. नशीबवान आहात.
15 Aug 2012 - 9:09 pm | अत्रुप्त आत्मा
:-)
16 Aug 2012 - 1:03 pm | शशिकांत ओक
आत्मा तृप्त झाला असे स्मायली सांगायचा प्रयत्न करतोय वाटत....
15 Aug 2012 - 9:54 pm | बॅटमॅन
ग्रेट!!
15 Aug 2012 - 10:23 pm | शैलेन्द्र
काका.. खरचं छान लिहिताय.. येवुद्या असच..
15 Aug 2012 - 10:50 pm | श्रीरंग
मस्त!!
16 Aug 2012 - 9:14 am | मूकवाचक
+१
16 Aug 2012 - 2:23 am | मधुरा ashay
तुमचे लेख वाचुन अगणीत आठवणी जाग्या ़झाल्या. आभार.
16 Aug 2012 - 7:07 am | चौकटराजा
आपण नानांना प्रत्यक्ष ऐकले ? अ य्यो य्यो केवढे हे भाग्य ! आठवणी लिहिण्याची शैली ही मस्त ! देउळ हे नेटके स्वच्छ ! नानासाहेब राजहंस माझे ( तसे गंधर्व पदवी मिळालेले सगळेच ) आवडते गायक ! सैगल सारखेच सुरेल! प्युअर !
16 Aug 2012 - 9:57 am | विटेकर
सुंदर लेख ! आवडला .
विट्याहून सांगलीला जाताना एस टी तून हटकून नमस्कार व्ह्यायचा.. पण कधी उतरुन आत जाण्याचा प्रसंग आला नाही.
( असाच नमस्कार तासगांवच्या गणपतीला ही घडायचा .. तो तर थेट एस टी तून स्पष्ट दिसायचा ! )
आता निश्चित प्रयत्न करीन.
- सुहास
16 Aug 2012 - 1:11 pm | शशिकांत ओक
वेळ मिळाला की आतून विठ्ठल मंदीर पाहण्याची इच्छा जागृत झाली... वाचून आनंद झाला. असेच सांगलीच्या भागातील सदस्यांना वाटत असेल तर त्यांच्या लहानपणातील आठवणी वाचायला आवडतील...
16 Aug 2012 - 10:23 am | नाना चेंगट
मस्त!
16 Aug 2012 - 1:52 pm | अमोल केळकर
धन्यवाद ओक साहेब
याच मंदिरातील काही दिवसापुर्वी काढलेला हा फोटो.
अमोल केळकर
17 Aug 2012 - 11:48 am | शशिकांत ओक
अमोल,
विठ्ठल-रखुमणीचा सुंदर फोटो टाकून या धाग्याला सात्विक रुप आणलेस त्याबद्दल धन्यवाद
तुझ्या पालकांनी आपल्या बंगल्यात पुढील मेळावा घ्यायचे ठरवले आहे. त्या निमंत्रणाची पुणेरी माधवनगरकर वाट पाहताहेत म्हणावे...