उन्हाळ्याचे दिवस म्हणजे रानमेव्याचे दिवस. दर्या, डोंगरांवर, जंगलात रानमेवा तयार होत असतो. त्यातलाच एक रानमेवा म्हणजे जांभुळ.
तसे जांभूळांचा आस्वाद घेण्यासाठी मला कधी दर्या डोंगरांत नाही जाव लागल. आमच्या वाडीतच ३-४ जांभुळांची झाडे होती. परी़क्षा आणि सुट्टीचा काळ ह्या दरम्यान जांभुळांचा बहर असायचा. मी अभ्यास नेहमी वाडीत जाऊन एखाद्या झाडाखालीच करायचे. अमुक एकच झाड असे काही ठरलेले नसायचे. सावली चांगली असेल, साफसुफ असेल अश्या झाडाखाली जाऊन अभ्यास करायचे. पण जांभुळांच्या सिझनमध्ये मात्र मुद्दाम स्वतः जांभुळ्याच्या झाडाखाली झाडलोट करून तिथे चटई टाकून अभ्यासाला बसायचे. त्यामुळे झाडावरून पडणार्या ताज्या जांभुळांचा मधुन मधुन आस्वाद घ्यायला मिळत असे. आता म्हणू नका की अभ्यासात लक्ष होत की जांभुळांकडे :हाहा:
सुट्टीत तर धम्मालच असायची. आमच्या घरी आत्या-काकांची मुले यायची. सुट्टीत घरात आम्ही क्वचीतच सापडायचो. वाडीत हुंदडणे, कैर्या-चिंचा पाडून मिठ-मसाला लावुन खा, करवंद खा, अस्वने खा ह्या झाडावर चढ त्या झाडावर चढ अशी गंमत असायची. जांभुळाच्या झाडाखाली त्यावेळी जास्त मुक्काम असे. कधी कधी भातुकलीही आम्ही करायचो जांभुळाच्या झाडाखालीच.
पण जांभुळाच्या झाडाखाली आम्ही जास्त झाडलोट नाही करायचो कारण जांभळे जमिनीवर पडली की फुटून त्यांना माती लागायची आणि पानांवर पडली की चांगली असायची. म्हणून पालापाचोळा तसाच ठेवायचो. ह्याचा अर्थ असा नाही की जमीनीवर पडलेली जांभुळे आम्ही घ्यायचो नाही. फुटलेला भाग सोडून राहीलेला भाग खायचो :हाहा: ती चव, ती मजाच काही वेगळी असायची. मला भर दुपारी जांभुळे खायला जायला खुप आवडायच. कारण दुपारी ही जांभुळे तापली की ती नरम पडायची आणि जास्त गोड लागायची.
भावंडांपैकी कुणीतरी कधीकधी जवळ्यच्या फांद्यांवर चढून जांभळांच्या फांद्या हलवायचे किंवा दगडे मारायचे पण तेंव्हा काही अर्धी कच्ची जांभळेही पडायची. अशी जांभळे खाताना घशाला आवंढा बसायचा. पण तरीही चाळा म्हणून ती खाल्ली जात.
आता जांभुळे बाजारात भरपुर विकायला येतात अगदी हायब्रिड जातीची. पण झाडाखाली पडलेली ती अर्धवट जांभळे खाण्यात जी मजा यायची ती मजा ह्या विकतच्या मोठ्या आकर्षक आख्ख्या जांभळांना येत नाही.
जांभळाच्या झाडावर पक्षीही भरपूर येत. कावळे, पोपट, बुलबुल, साळुंख्या यांचा वावर सतत ह्या जांभळांच्या झाडावर असे. त्यांचे पोट भरण्याचे साधनच म्हणा. पण हेच पक्षी कधी कधी स्वतःचे पोट भरून आमच्या अंगावर प्रसाद टाकत. :हाहा:
आमच्या वाडीत गावठी म्हणजे लहान जांभळांची काही झाडे होती तर २ झाडे मोठ्या जांभळांची. पण मोठ्या जांभळांना बहुतेक किडच लागे. अजुन हे झाड आहे अजुनही तशीच किड लागते. रात्रीची वटवाघळही ह्या झाडावर सारखी उड्या मारत असतात. खुप कमी जांभळे मिळत ह्या झाडाची. ही जांभळे आई-वडील कुणाकडून तरी काढून घेत. काढण्यासाठी एक माणूस झाडावर चढायचा. आम्ही खाली आईची साडी किंवा चादर घेऊन माणूस जी फांदी हलवेल त्या खाली झोळी करून उभे राहायचो. मग फांदी हलवली की टपाटप जांभळे चादरीत पडायची. एक-दोन टणटणाटण डोक्यात पण पडायची. ही जांभळे आई-आजी सगळ्यांना वाटायच्या.
ही सगळी बालपणातली मजा. आता सासरी असेच मोठ्या जांभळाचे झाड अगदी गेटजवळ आहे.
जांभुळाचे शास्त्रिय नाव syzygium cumini असे आहे. जांभुळाचे झाड ३० फुटापेक्षा जास्त वाढते. बहुतेक जांभळाच्या झाडांच्या फांद्या ह्या वरच्या दिशेला सरळ वाढत जातात.
त्यामूळे हे झाड ऐटदार दिसते. भरगच्च पानांमुळे झाडाखाली थंड सावली पडलेली असते.
जांभळाच्या फांद्या जळण्यासाठी खुप उपयुक्त असतात. भराभर जळतात. जांभळाचे लाकूडही कडक असते. फळ्या बनवण्यासाठी तसेच कोळी माणसे बोट व मच्छी कापण्याचे लाकूड बनवण्यासाठीही ह्याच्या सुकलेल्या खोडाचा उपयोग करतात.
साधारण जानेवारी-फेब्रुवारीत जांभळाच्या झाडाला छान कोवळी पालवू फुटू लागते व मार्च-एप्रिल मध्ये फुले धरू लागतात. फुले अगदी ५ मिमि एवढीच असतात. जवळून पाहीले की त्यांचे सौंदर्य आपोआप नजरेत भरते.
थोड्याच दिवसांत छोटी-छोटी फिक्कट हिरव्या रंगाची लांबट फळे धरू लागतात. एखाद महीन्यात ह्या फळांना चांगले बाळसे धरते.
मग हळू हळू सुरुवात होते पिकण्याची.
दिवसोंदिवस ह्यांचा रंग गडद होत जातो म्हणजेच ती पिकू लागतात.
जांभळाचे इतर औषधी गुणधर्म तर सगळ्यांनाच माहीत आहेत म्हणजे जसे जांभूळ, डायबिटिझ झालेली माणसे खाऊ शकतात, जांभळाच्या बियांपासून डायबिटीझ वर औषध बनवले जाते. जांभुळा पासुन जांभुळ सरबत, जॅम बनवले जातात. जांभळावर बर्याचदा मधमाशा मधाची पोळी बनवतात ही मध गुणकारी मानली जाते.
जंगलातील जांभळांच्या झाडांमुळे कातकरी, डोंगराळ भागातील लोकांना जांभुळे विकून, लाकडे विकून उपजीवीकेसाठी हातभार लागतो.
पण आजकाल जंगलतोडीचे भिषण अवजार धार लावून सज्ज असल्यामुळे भविष्यात ह्या कातकरी लोकांच्या उपजीवीकेवर वार होत आहेत. जंगल-डोंगरांवर पडणारी ही मायेची सावली पोरकी होत चालली आहे.
प्रतिक्रिया
11 Jun 2012 - 4:24 pm | जाई.
छान माहिती दिलीस. :)
11 Jun 2012 - 4:26 pm | अक्षया
छान माहिती आणि फोटो.. :)
11 Jun 2012 - 4:28 pm | प्रचेतस
सुंदर.
कालच मावळात जांभळाची भरपूर झाडे पाहता आली.
11 Jun 2012 - 4:31 pm | ५० फक्त
निसर्गसखी खुप मस्त लेख आणि दोन तीन महिने लक्षात ठेवुन काढलेले फोटो वगैरे, एवढा संयम ठेवणं अवघड आहे.
कधी संधी मिळाली तर लवासाच्या गेटच्या बाहेर डाव्या बाजुला एक रस्ता रामनगर गावठाणात जातो, तिथं एक देवाचं जांभुळ आहे, त्याची जांभळं करवंदाएवढीच असतात, ती चाखुन पहा. सगळी जांभळं खालच्या पारावर पडतात तो सगळा पार निळा जांभळा होउन जातो, ती जांभळं तशीच खायची असतात, त्या पारावर चढलं की भांडायला येतात तिथले लोक .
पहिल्या पावसांत तो पार धुवुन निघतो तेंव्हा त्या निळ्या जांभळ्या पाण्यात पोरं एकमेकांच्या अंगावर उडवतात ते पहायला जाम मजा येते.
11 Jun 2012 - 4:43 pm | सुहास..
लई आवडेश !!
आणि " जांभुळ आणी त्याचे औषधी उपयोग या विषयावर त्याच जांभळी खाली एक परिसंवाद सूरु झाला :)
11 Jun 2012 - 4:57 pm | बिपिन कार्यकर्ते
आमच्या इथलं (लहानपणचं) जांभळाचं झाड आठवलं! थेट असंच्य असंच सगळं! :)
11 Jun 2012 - 5:21 pm | गणपा
काय जांभुळ महोत्सव चालवताय की काय?
तिकडे सोत्रीने 'जांभळाची' टाकली. आणि इथे तर आख्ख लगडलेलं झाडच.
11 Jun 2012 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा
नेहमी प्रमाणेच,,,लेख आवडला आहे.... :-)
11 Jun 2012 - 6:03 pm | उदय के'सागर
:)
नेहमी प्रमाणे खुपच छान.....
बाकि लेख वाचुन बर्याचदा ट्रेकिंग करतांना भुकेच्यावेळी अशीच ताजी, खाली पडलेली जांभळं (करवंद, बोरं, कैर्या) पोटभर खालेल्ली आठवली... अहाहा काय आनंद होता त्यात.... कुठल्याहि पंचतारांकित हॉटेलातल्या जेवणापेक्षाहि मिळालेलं अवर्णनिय समाधान :)
11 Jun 2012 - 6:21 pm | विसुनाना
जांभळाचं झाड हा आत्मीय विषय आहे. (पण झाडाखाली नव्हे तर झाडावर.)
उन्हाळ्याची सुट्टी, एखादी कादंबरी आणि ते जांभळाचं झाड. म्हणजे मग दुपारचे जेवण झाल्यावर उन्हं उतरेपर्यंत फांद्यांवर निवांत . बनियनवर पडलेले जांभळाचे डाग कमीतकमी महिनाभर तरी जात नसत.
आता तिथे ते उंच-उंच झाड उरलेलं नाही. म्हणजे तिथं आता पेरूचं, तुत्तु(ती)चं, रामफळाचं असं कुठलंच झाड उरलेलं नाही. :( फक्त एक उंबराचं भुंडं झाड तेवढं र्हायलं आहे. तेही, मुळापासून तोडलं तर दत्त महाराजांचा कोप होऊन निर्वंश होतो म्हणून...
11 Jun 2012 - 6:26 pm | जागु
५० फक्त तुमच्या वर्णनावरून ती जांभळे पहाविशी वाटतात. बघू कधी योग आला तर.
जाई, अक्षता, वल्ली, सुहास, कार्यकर्ते, गणपा, अतृप्त आत्मा, उदय धन्यवाद.
11 Jun 2012 - 11:07 pm | ५० फक्त
पुढच्या वर्षी शक्य झालं तर आणेन मी, मग कळवेन तुम्हाला.
11 Jun 2012 - 6:34 pm | स्मिता.
जागुताईचा लेख म्हणजे एक पर्वणीच असते. तो वाचून फोटो, माहिती, प्रसन्नता, जुन्या आठवणींना उजाळा, थोडी जागृती इ. इ. बरेच काही मिळते. थोडक्यात ऑल-इन-वन लेख असतो. :)
11 Jun 2012 - 7:03 pm | चौकटराजा
या धाग्यावरून दोन ठिकाणांची आठवण आली. एक बन शिरवळ गावापासून तीन चार किमी
अंतरावर. तिथे एक सोय होती. जांभळे खाली ओढ्यात पडत व फुटत नसत.काही फुटली तरी
पाण्याने आपोआपच धुतली जात. दुसरे ठिकाणे तळेगाव दाभाडे इंदुरी गाव या रस्त्यावर आहे.
तिथेही बख्खळ जांभळे चरायला मिळायची. तिथे एक माणूस जांभळाच्या झाडावरून वीस फूट खाली पडला.त्या वेळे पासून जांभळाच्या झाडावर कधीही चढलो नाही. आमच्या सोसायटीत जांभळाचे झाड आहे. पण गेले तीन वर्षे त्याला फळ येत नाही. पण आले की
उत्त्तम प्रकारची जांभळे खायला मिळतात.
आपल्या धाग्यातील शेवटचे दोन फोटो तोंडाला पाणी आणणारे आहेत. लाजवाब !
11 Jun 2012 - 7:42 pm | विशाखा राऊत
जागुताई मस्तच ग :)
11 Jun 2012 - 11:30 pm | जागु
५०, स्मिता, चौकटराजा, विशाखा धन्यवाद.
12 Jun 2012 - 3:10 am | प्रभाकर पेठकर
पुन्हा एक, बालपणीच्या आठवणी 'जागविणारा' लेख. अभिनंदन आणि धन्यवाद.
मुंबई शहरात, ठाणे जिल्ह्या शेजारीच, माझ्या दहिसरात, मुंबईत असूनही, खेडेगावची सर्व सुखे अनुभवली आहेत.
जांभुळ, कैर्या, चिकू, करवंद, बोरं, चिंचा, आवळे, कमरकं, पेरू, आंबे इ.इ.इ. सर्व फळांचा विनामुल्य आस्वाद उपभोगत आनंदिलेल्या बालपणाची आठवण अशा लेखांनी होते. मन हळवे होऊन रम्य अशा बालपणात चोरुन बागडून घेते. वर्तमान काळाला सोनेरी-रुपेरी झालर लेऊन सुसह्य बनविते.
आता जांभूळाची साथ Syzygium Jambolanum ह्या होमिओपॅथीच्या मधूमेहावरील औषधाने जन्मभरासाठी आहे. असो.
12 Jun 2012 - 9:02 am | श्रीरंग_जोशी
छायाचित्रे अन लेखही....!
12 Jun 2012 - 11:18 am | जागु
प्रभाकरजी धन्यवाद. काळजी घ्या.
श्रीरंग धन्यवाद.