...... तेथे तुझी मी वाट पहातो!

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
4 Jun 2012 - 6:24 pm

आज खूप दिवसांनंतर जाणं झालं. तिथेच जिथे दोन दादरांची भेट होते. तिथे पोहोचल्यावर मनात लगेच तुझं गुणगुणणं गुंजन घालू लागलं. तू म्हणायचीस, "जिथे दादरा दादर मिळते, तेथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते," आणि तसंच कानात शिरल्यासारखं वाटलं त्यानंतरचं तुझं खळाळतं हसू. किती दिवस होतील आता ते हसणं ऐकून. कल्पना नाही. शेवटचं ते ऐकल्यालाही बहुदा खूप कॅलेंडरं मागे जावं लागेल. तू असंच सांगायचीस आणि मी माझ्या सवयीप्रमाणे तू सांगितलेल्या वेळेच्या दहा मिनिटं आधीच जाऊन उभा असायचो. तुला ते माहितही असायचं. म्हणून मग बर्‍याचदा तू उशीराची वेळ सांगायचीस मला. किती विश्वास होता तुला भारतीय रेल्वेच्या वक्तशीरपणाबद्दल, नाही? आपल्या जन्मजात गुणांना साजेसा वेळ लावत आणि तुझं व्यवस्थित मांडलेलं वेळेचं गणित चुकवून गाडी तिच्याच ठरल्या वेळी यायची. मग तुझ्या डोळ्यात, मला उगाच जास्त वेळ ताटकळत राहायला लागल्याबद्दलची काळजी बघावी लागायची. किती तरी वेळा मी तुला अशा वेळी सांगितलंय, "अगं, मला काही ताटकळावं लागत नाही. माझा वेळ तुझी वाट बघण्यात मस्त जातो." पण तुला ते कधीच पटायचं नाही. तशी हळवीच होतीस तू! खरंच असायचं पण ते, तुझी वाट बघत घालवलेला तो वेळ कधीही फुकट गेल्याची भावना नव्हती माझ्यात. आपण भेटण्याची जागाच तशी होती ना!

एक जिना डावीकडून आणि एक जिना उजवीकडून येत असताना त्यांची सामायिक असलेली जागा. कुणालाही कधी सांगितली तर ती सापडणार नाही असं होणारच नाही. इतका राबता असलेली जागा पण आपण भेटण्यासाठी तीच ठरवली. तुझीच आयडिया ती! त्या दादराहून उतरणारा माणूस त्यावेळी आपल्या कामाच्या ठिकाणी जायच्या गडबडीत आणि दादरावर चढणारा, आपली नेहमीची गाडी चुकू नये या घाईत. मग एका बाजुला उभे असणार्‍या आपल्याला बघायला कुणाकडे वेळ असणार आहे? हा तुझा युक्तिवाद प्रथम श्रवणी मला मान्य झाला नाही पण प्रथम दर्शनी तुझ्या चाणाक्षपणाला दाद द्यावीच लागली मला!

खरंच सांगतो, मला कधीच तुझी वाट बघण्याचा कंटाळा आला नाही. तू ज्या बाजूच्या दादरावरून येशील त्याच्या एका कोपर्‍यात उभं रहायचं. उतरणार्‍यांचं दर्शन तिथून अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्हायचं. आधी त्यांची पावलं दिसायची, मग त्यांचे कपडे आणि नंतर स्वतः ती व्यक्ती. किती प्रकार पहायला मिळायचे तेव्हा. रंगवलेली - बिनरंगवलेली पावलं आणि नखं, किती तर्‍हेची पादत्राणं, किती प्रकारची चाल, किती प्रकारचे कपडे आणि किती तर्‍हेची परिधान शैली. एक छंदच लागलेला तेव्हा मला, व्यक्तिची पादत्राणं, त्यावरची रंगरंगोटी, तिची चाल आणि वस्त्र-प्रावरणं, त्यांची परिधानशैली, इत्यांदिंवरून त्या व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही कल्पना करण्याचा! अनेकदा अंदाज चुकायचा मग लक्षात आलं, मी समोर आलेल्या माणसाचं व्यक्तिमत्त्वं शोधत नव्हतो तर समोर दिसणार्‍यांपैकी काहींमध्ये तुलाच शोधत असायचो. मग अंदाज चुकायचाच होता पण यात वेळ चांगला जायचा, कंटाळा यायचा नाही. तेव्हा नव्यानेच तुला जाणण्याच्या प्रयत्नात होतो ना! मग अचानक जिन्यावर ओळखीची पावलं दिसायची. लहानखुरी, सुबक, स्वच्छ आणि नितळ. माझ्या आवडीने घेतलेल्या पादत्राणांनी नटलेली, माझ्या आवडत्या मरून रंगात रंगलेली नखं असलेली. ती पावलं दिसली की उरात काही तरी लक्कन् व्हायचं आणि मग तू दिसायचीस. डोळ्यात काळजी आणि चेहर्‍यावर कसनुसं हसू ल्यालेली. तुझी ती सुडौल मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर तशीच आहे.

मग त्याच धुंदीत मी आताही माझी तीच जागा पकडली. जणु इतक्या वर्षांनंतर तू पुन्हा त्या दादरावरून उतरणार होतीस. मी तशीच पुन्हा ओळखीची पावलं शोधू लागलो. किती वेळ गेला कुणास ठाऊक, अचानक ताळ्यावर आलो. तू थोडीच येणार होतीस? सहज घड्याळाकडे लक्ष गेलं. वीस-बावीस मिनिटं कशी सरलेली ते कळलंच नव्हतं.

तुझी वाट बघताना अजूनही मला कंटाळा येत नाही हे बाकी पुन्हा अधोरेखित झालं.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

4 Jun 2012 - 6:32 pm | कवितानागेश

ह्म्म

स्पंदना's picture

4 Jun 2012 - 6:36 pm | स्पंदना

मुक्तक !

पण अजुनही मुक्त नसलेल्या भावनेच. त्याच मुग्धपणात अडकलेल्या तारुण्याच.ठिकाण भले वेगळी असतील, पण त्याच धपापत्या श्वासांच.

मस्त प्रास.

जेनी...'s picture

4 Jun 2012 - 6:48 pm | जेनी...

:)

:)

बस इतकच ......

शुचि's picture

4 Jun 2012 - 8:12 pm | शुचि

भावना फक्त चित्रातून व्यक्त करते -

सौ - जाल

अन्या दातार's picture

4 Jun 2012 - 10:03 pm | अन्या दातार

क्या बात हॆ प्रासभाऊ! जियो

(कुणाची वाट न बघणारा) अन्या

प्रचेतस's picture

4 Jun 2012 - 10:06 pm | प्रचेतस

नक्की का रे?

जेनी...'s picture

4 Jun 2012 - 10:56 pm | जेनी...

कायपण बाता मारतो ...
रोज जेवनाच्या येळेची मरुन मरुन वाट बघतो ,आणि म्हने कुणाची वाट न बघणारा .....

पैसा's picture

4 Jun 2012 - 10:05 pm | पैसा

......

प्रचेतस's picture

4 Jun 2012 - 10:07 pm | प्रचेतस

छानच लिहिलंय.

शैलेन्द्र's picture

5 Jun 2012 - 1:25 am | शैलेन्द्र

:)

आवडल बॉस..

श्रीरंग_जोशी's picture

5 Jun 2012 - 3:23 am | श्रीरंग_जोशी

अंतःकरणाला मखमली स्पर्श करणारे लेखन...!

गवि's picture

5 Jun 2012 - 5:12 am | गवि

जरा डावीकडे जरा पोटाच्या वर काहीतरी ओढ बसली आणि कळ आली हो डॉक्टर..
खूप सुंदर. एकदम.. वेगळंच लिहिलंस एकदम आज.. हे खरं गीतगुंजन रे.

लीलाधर's picture

5 Jun 2012 - 8:21 am | लीलाधर

प्रास भौ क्या बात है !!!! :)

Madhavi_Bhave's picture

5 Jun 2012 - 10:51 am | Madhavi_Bhave

अंतर्मुख करणारा लेख. अश्या कितीतरी सत्य घटना असतील. कितीतरी प्रेमी जीव वेगळे झाले असतील पण एकमेकांना कधीच विसरू शकले नसतील. आजही जुन्या आठवणीनी मन हळवे होत असेल, जुन्या जागा, जुन्या आठवणी. मौसम सिनेमातील गाणे आठवते -

दिल धुंडता है फिर वोही फुरसतके रात दिन,

आपण आज कितीही दूर गेलेलो असो, कितीही busy असोत आणि कितीही माणसांनी वेढलेलो असो, पण आयुष्यातील काही क्षण जे निसटून गेले ते गेलेच. आता उरल्या फक्त आठवणी आणि कदाचित पश्चाताप कि काश आपण तेवढे ताणले नसते तर.

(कृपया कोणी हे आत्मकथन समजू नये. माझा असा काही अनुभव नाही आहे )

पियुशा's picture

5 Jun 2012 - 11:09 am | पियुशा

अरे वा .छानच लिहिलय की :)

प्यारे१'s picture

5 Jun 2012 - 11:33 am | प्यारे१

मस्तच....!
तरल, मखमली , हात लावावासा वाटणारं.... तरी स्वतःला कंट्रोल करवणारं! :)

Dhananjay Borgaonkar's picture

5 Jun 2012 - 4:16 pm | Dhananjay Borgaonkar

मस्त :)

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jun 2012 - 5:45 pm | अविनाशकुलकर्णी

लाईक भाऊ

स्मिता.'s picture

5 Jun 2012 - 7:17 pm | स्मिता.

सुंदर लिहिलं आहे प्रासभाऊ. फार जड नाही, भावनाप्रधान नाही की हुरहुर लावणारं नाही, फक्त वाचून छान वाटायला लावणारं लिखाण आहे.