भेगाळ जमिन
उन्हाचा ताव
पावसाला साकडं
आतातरी धाव..
काळं कभिन्न
मातीचं ढेकुळ
भुकेलं जनावर
तहानेनं व्याकुळ
सुकलेली आसवं
बधिर जाणिवा
आगीचा डोंब
पोटात वणवा
सरीवर सर
मातीत गारवा
बेधुंद चातक
गाई मारवा
हिरवी जमीन
हिरवं रान
बळीराजा घेई
सुंदर तान
कणसं भरली
हसलं सुख
काळ्या आईचं
प्रसन्न रूप
बरसल्या धारा
सोडूनी लय
जीवन झाले
'जीवन्'मय
पाणलोट अजस्त्र
वाहिलं जगणं
उन्हाळा-पावसाळा
नेमेची भोगणं..............
- प्राजु
(९ नोव्हें ०७)
प्रतिक्रिया
9 Nov 2007 - 9:13 pm | प्राजु
उन्हाळा आणि नंतर पावसाळ्यातील पूर...
अशा दोन परिस्थितींचं वर्णन केलं आहे.
- प्राजु.
10 Nov 2007 - 11:57 am | प्रकाश घाटपांडे
पहिली तीन कडवी वरुन जे शतकर्याचे वर्णन उभे केले जाते त्या "भांडवालावर "अनेक श्रीमंत शेतकरी व राजकीय नेते 'गरीव शेतकरी 'म्हणून लाभ घेतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे ना! शेतकरी हा एक नाही. ज्याच्या नावावर शेती आहे तो शेतकरी या भाबड्या कल्पना याला खतपाणी घालतात. आत्महत्या हा भोग फक्त गरीब शेतकरी भोगतात. केळकर समितीने शेतीवर इनकम टॅक्स लावण्याची शिफारस केल्यावर बोंबाबोंब करणारे हे शेतकरी कोण हे सुज्ञास सांगणे न लगे.
(तीन पिढ्या कौटूंबिक शेती असलेला ,पुण्यात स्थाईक झाल्यावर वडिलार्जित शेत्या इकलेला .पण आज फक्त कागदावर शेती असलेला, )
अवांतर- झाले कि नाही कवितेचे रसभंगग्रहण असे काही लोकांनी कुजबुजलेले मल ऐकायला आले
प्रकाश घाटपांडे
10 Nov 2007 - 4:17 pm | बेसनलाडू
संदीप खरेंच्या "सरीवर सरी" आणि तिची लय आठवली या कवितेवरून. चौथ्या कडव्यात बरसलीही आहे सर. एकंदर चित्रमय कविता. जीवन झाले "जीवन"मय ही ओळ खासच आवडली.
(चित्रकार)बेसनलाडू
11 Nov 2007 - 5:32 pm | विसोबा खेचर
निसर्गाची रूपं आणि त्याची बदलती स्वरुपं दाखवणारी अतिशय सुरेख कविता!
फक्त एकच गोष्ट थोडीशी खटकली.
सरीवर सर
मातीत गारवा
बेधुंद चातक
गाई मारवा
एकदा सरीवर सरी कोसळू लागल्या, मातीमध्ये गारवा आला की बेधुंद झालेला चातक मारव्यासारखा उदासवाणा राग कशाला गाईल? :)
'गारवा-मारवा' हे यमकाच्या दृष्टीने ठीक आहे, परंतु आनंदाने बेधुंद झाल्यावर सहसा मारवा हा राग गायला जात नाही. तो मारव्याचा स्वभाव नाही!
आपला,
(गाण्याखाण्यातला) तात्या.
11 Nov 2007 - 8:18 pm | प्राजु
संगीतातले अज्ञान.. आणखी काय? :)))))
तात्या,
मग...
बेधुंद चातक
धरतो केरवा......
हे कसे वाटेल?
- प्राजु.
12 Nov 2007 - 12:32 am | धनंजय
केरव्यासारखा लोकप्रिय गाण्यांतून ओळखीचा ताल आमच्यासारख्या अनपढांनाही ओळखीचा असतो. नका त्या चातकाला "बकरीकी एकटांग" करायला लावूत!
12 Nov 2007 - 3:08 am | विसोबा खेचर
बेधुंद चातक
धरतो केरवा......
हे कसे वाटेल?
माझ्या मते हे अधिक सुसंगत वाटेल! निदान अर्थाचा अनर्थ तरी होणार नाही. कुणीही खुशीत येऊन जरी मारवा गात नसला तरी केरव्याचा ठेका नक्कीच धरू शकतो!
आपणच नाही का कित्येक वेळा मूडमध्ये आलो की टेबलावर वगैरे ठेका धरतो, त्याप्रमाणेच! :)
आपला,
(गाणं जगणारा) तात्या.
12 Nov 2007 - 12:35 am | प्राजु
काय धनंजयराव..
"बकरीकी एकटांग....???"
सही आहे.
प्राजु.
12 Nov 2007 - 6:17 am | धनंजय
"बकरीकी एकटांग" हे आपले पुलं यांचे माझे नेहमीचे वाङ्मयचौर्य! या शब्दांचा केरवा ताल आहे.
चातकाला आधुनिक हिंदीत पपीहा असेही म्हणतात. पावसाविषयी अनेक गाण्यात त्याचे (आणि त्याच्या गाण्याचे) वर्णन आहे, त्यामुळे खुद्द पक्ष्याचे गाणे न ऐकलेल्या अनेकांना ते ऐकून माहीत आहे. "पिऊ पिऊ" किंवा "पिपिउ पिपिउ" असे त्याच्या आर्त स्वराचे वर्णन आपण ऐकलेच आहे. चातक केरवा तालात तो आर्त शब्द गाईल अशी कल्पना करायला फारच ओढाताण करावी लागेल. (तात्या टेबलावर ठेका धरतात, म्हणतात तसा) चातक आनंदाने पायांनी किंवा पंखाने ठेका धरतो आहे, अशी आपण कल्पना करू शकतो. पण ते शब्दचित्र तुमच्या बाकीच्या कवितेशी फारकत करून बसेल असे वाटते. कवयित्री म्हणून खरा अर्थ तुम्हालाच ठाऊक आहे. तो अर्थ ठीक वाटत असल्यास "केरवा" पर्याय यमक म्हणून जरूर वापरावे.
अवांतर : आमच्यापैकी काही पियक्कडांना "पिऊ पिऊ" शब्दातून दुसरा अर्थ सुचल्यास त्यांनी हे जाणावे, की त्यात नाविन्य नाही. असे एक गाणे यूट्यूबवर आधीच आहे.
http://www.youtube.com/watch?v=i9Qb61ULCos
पुन्हा मुद्द्याचे : कोणाला पक्षीजगातल्या चातकाचे/पपीह्याचे गाणे ध्वनिमुद्रित सापडल्यास त्यांनी ते इथे द्यावे.
12 Nov 2007 - 6:46 am | नंदन
येथे एक चलच्चित्र (व्हिडिओ) सापडले. त्यात अस्पष्ट पक्ष्यांचे बोल ऐकू येतात (आवाज कमाल पातळीवर ठेवून ऐकल्यास). पण ते चातकाचे गाणे आहे की नाही ते समजत नाही.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
12 Nov 2007 - 6:48 am | नंदन
कविता आवडली. खास करून शेवटची दोन कडवी.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
12 Nov 2007 - 12:03 pm | शब्दवेडा
कविता अतिशय बोलकी आहे.आपले भावना नेमक्या शब्दान्त पण तितक्याच प्रभावीपणे व्यक्त करण्याचे तन्त्र आवडले..
12 Nov 2007 - 7:35 pm | प्राजु
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
- प्राजु.