पायावर उभं राहायला तीन सर्जरीज कराव्या लागल्या पण थोडं बरं वाटलं की मास्तर मी उशाशी ठेवलेला की-बोर्ड काढायचे आणि तिथल्या नर्सेस आणि बॉइजना त्यांची आवडती गाणी वाजवून दाखवायचे. ते जिथे जातात तिथला मूड बदलवू शकतात, मग ती मैफिल असो की घर की हॉस्पिटल! डिस्चार्ज मिळाल्यावर मास्तर पहिल्यांदा वॉकर घेऊन रिक्शात बसले तेव्हा वाटलं नियतीनं बहुदा माझ्याशीच डाव खेळून बघितला असावा, एका पायात कायमचा दोष राहून सुद्धा मास्तर जसेच्या तसे होते!
ते पुन्हा शिकवायला यायला लागले तेव्हा माझ्या आईला काळजी वाटायची की हा माणूस एका जागी तीन-चार तास अशा अवघडलेल्या अवस्थेत बसू कसा शकतो? ती म्हणायची `अरे त्यांच्याकडे बघ, त्यांना त्रास होत असेल'. मी मास्तरांना विचारलं की ते म्हणायचे `मी सगळी रग काढून टाकली आहे, काही होत नाही हो, तुम्ही वाजवा!
______________________
माझं स्वरज्ञान शून्यापेक्षाही कमी होतं, मला फक्त लिरिक्स पाठ असायची आणि गाण्याचा नेमका मूड कळायचा. मास्तर एकेकाळी स्वतः ऑर्केस्ट्रात गायचे पण त्यांना लिरिक्स यथातथाच माहिती होती. सगळ्यात धमाल म्हणजे मला कोणती की `सा' आहे कोणती `रे' कोणती `कोमल रे' वगैरे, आधी इकडचे तिकडचे क्लास केल्यामुळे, नक्की माहिती होती, पण मास्तर सरळसरळ कोणत्याही शुद्ध स्वराला कोमल म्हणायचे! त्यांच्या दृष्टीनं स्केल महत्त्वाचं आणि कमालीचं बिनचूक होतं, स्वराला कोमल म्हटलं काय की शुद्ध त्यानं काही फरक पडत नव्हता!
अशी ही आमची गुरू-शिष्य परंपरा त्यांच्या अॅक्सिडेंटपूर्वी आणि नंतर अनेक वर्ष चालू राहून सुद्धा मला एक गाणं धड वाजवत येईना.
एक दिवस मी त्यांना म्हटलं मास्तर रेकॉर्डचं स्केल काहीही असू द्या तुम्ही मला सगळी गाणी फक्त एका स्केलमध्ये शिकवा, मास्तर म्हणाले चला कोणतंही स्केल घ्या.
________________________
मग मी एक महान काम केलं सगळ्या दिग्गज संगीतकारांची मला आवडणारी एकसोएक गाणी काँप्युटरवर अत्यंत सुरेखपणे अल्फबेटीकली अरेंज केली, म्हणजे कोणतंही गाणं मनात आलं की एका क्षणात ते लावता आलं पाहिजे! यात नकळतपणे मेलडी मुख्य ठेवून सगळे संगीतकार एका लेवलला आणले गेले, म्हणजे भले मला पिक्चर कोणता आणि संगीतकार कोण हे माहिती नसेल पण गाजलेलं आणि की-बोर्डवर सुरेख वाजू शकेल असं प्रत्येक गाणं माझ्याकडे होतं! हे कलेक्शन इतकं अफलातून झालं की ज्या मित्रांना त्याची सीडी करून दिली ती त्यांनी कारमधे लावल्यावर म्हणाले, `आता गाडी विकू तेव्हाच सीडी काढू!'
__________________________
हा सगळा सोहळा संपन्न झाल्यावर एक दिवस मी मास्तरांना म्हणालो, 'मास्तर माझ्यासारख्या फक्त मूड आणि लिरिक्स कळू शकणार्या माणसाला जर सगळ्यात ग्रेट संगीतकार कोण विचारलं तर मी म्हणीन `ओ. पी. नय्यर!'
`का? 'ते म्हणाले
' ओ. पी. नि स्वतः कबूल केलंय की त्याला संगीताचं कोणतंही शास्त्रीय ज्ञान नाही आणि तरीही त्याचं कोणतंही गाणं लागलं की तुमचं लक्ष वेधलं गेलच म्हणून समजा आणि मूड बदलायलाच हवा'.
मास्तर म्हटले `कोणतं गाणं घेता? '
`जरा होल्ले होल्ले चल्लो मोरे साजना, हम भी पिछे है तुम्हारे' घेऊया का?
`त्यात काय अवघड आहे? घ्या!' आणि त्यांनी लगेच गाण्याचा पहिला पिक-अप वाजवला!
मी म्हटलं `अहो थांबा, थांबा हे तुम्ही काय वाजवलंत?
मास्तर म्हणाले `ते आता तुमच्या स्केलमध्ये आहे, तुम्ही काय हवं ते लिहून घ्या'.
माझ्या आयुष्यातलं पहिलं नोटेशन मी लिहिलं `रेंसां, निधप, म'रे गमपs!'
_______________________________
नंतर जे काय गाण्याच्या शब्दा-शब्दाचं नोटेशन काढलं त्यानं माझं मलाच धन्य वाटायला लागलं! एकदा ट्रिक कळल्यावर इंटल्यूडच सहीसही नोटेशन काढणं सोपं होतं. मग मास्तरची शिकवणी संपल्यावर रियाज करायला लागलो आणि माझं गाणं पार मुखडा आणि अंतरा करत एकदम सही वाजायला लागलं! म्हणजे मला 'देखली हुजूर मैंने आपकी वफा, बातों ही-बातों- मे हो' गये खफा' असं अगदी म्हटल्यासारखं वाजवता यायला लागलं!
मग इंटरल्यूडशी सलगी करायला सुरुवात केली पण ते काही झेपेना. पुढच्या वेळी मास्तर आले तेव्हा म्हणाले `नुसतं नोटेशन वाजून उपयोगी नाही त्याचं वजन असतं' आणि त्यांनी मला ते वजनात वाजवून दाखवलं. मग नुसत्या इंटरल्यूडचा रियाज चालू केला आणि मला त्यातले आघात जमायला लागले.
आणखी थोड्या रियाजा नंतर त्या गाण्यात पहिल्या इंटरल्यूडला आघात आहेत आणि दुसरं इंटरल्यूड पूर्णपणे वेगळं आहे आणि स्वरातून स्वर सलग वाजवत नेला आहे हे पण समजलं आणि की-बोर्ड मधून उमटवता देखील यायला लागलं. माझं गाणं मग पार पहिल्या पिक-अप पासून ते पार मुखडा, इंटरल्यूड, अंतरा करत शेवटापर्यंत सहीसही वाजायला लागलं!
__________________________
मग एक दिवस मास्तरांना फोन केला `मास्तर , होल्ले होल्ले चल्लो कुठल्या स्केलला आहे हो? '
`पांढरी दोन' ते म्हणाले
की-बोर्डला स्केलचेंजर आहे तो मी पांढरी दोनला सेट केला, काँप्युटरवर गाणं सुरू केलं आणि स्ट्रेट गाण्याबरोबर वाजवायला सुरुवात केली, मला आश्चर्य वाटलं, खुद्द आशा भोसलेला मी सहीसही साथ करत होतो अगदी इंटरल्यूड म्युझिक सहित!
(समाप्त)
प्रतिक्रिया
26 May 2012 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. स्वरज्ञान शुन्य असल्यामुळे आमच्याही आयुष्यात असा एखादा मास्तर यायलाच हवा होता असे लेखन वाचून संपवल्यावर वाटले.
-दिलीप बिरुटे
26 May 2012 - 11:54 pm | संजय क्षीरसागर
आपली शिकण्याची इच्छा दुर्दम्य हवी, कारण स्वतःला गाता किंवा वाजवता यावं असं प्रत्येकाला वाटतच असतं. मी फक्त मला गवसलेला एक सोपा पर्याय सर्वांशी शेअर केला आणि मनावर घेतलं तर कुणालाही ते शक्य आहे हे सांगितल.
26 May 2012 - 10:15 am | प्रदीप
मास्तरांसारखी हिंदी चित्रपट संगीताच्या पॅशनने झपाटलेली माणसे माझ्यासारख्याला विलोभनीय वाटतात. हे व्यक्तिमत्व मनापासून आवडले. तुमच्यासारखा कदरदान शागिर्द त्यांना मिळाला, हे त्यांचे भाग्य आहे, ते मात्र दुर्मिळ म्हटले पाहिजे. सर्वथा अशी माणसे हलाखीच्या परिस्थितीत जगतात व तशीच संपून जातात. त्यांना स्वतःला, त्यांच्या झालेल्या उपेक्षेचे दु:ख नसते हे खरे, पण त्यांच्या कुटुंबियांना मात्र त्यांच्याबरोबर शिक्षा भोगावी लागते.
पुढेमागे कधी जमलेच तर ह्या मास्तरांना भेटायला जरूर आवडेल!
26 May 2012 - 11:54 pm | संजय क्षीरसागर
`मैं जिंदगीका साथ निभाता चला गया' आहेत. तुमची भेट घडवून देईन, व्य. नि. करतो.
26 May 2012 - 10:25 am | चौकटराजा
संजय राव, हा ही लेख चांगला झाला आहे लहान असला तरी. मला वाटतं 'जरा होल्ले'ची दोन
इंटर ल्यूड आहेत त्याचे पहिले क्लॅरिनेट मधे वाजते तर दुसरे सारंगी मधे. साहजिकच सारंगीत
आसयुक्त वादन होते तर क्लॅरिनेट मधे ठोस स्वर वेगवेगळे वाजतात. माझ्या अंदाजा प्रमाणे
ठोस स्वरांच्या पद्धतीला स्टकॅटो तर आसयुक्त ला ओब्लिगादो म्हणतात. पण माझा अंदाज
चूक असेल तर मला करेक्ट करा अशी माझी विनंति आहे. नय्यर हे प्रामुख्याने स्टकॅटो चा
वाद्यमेळ करणारे होते असे म्हणतात.
27 May 2012 - 12:16 am | संजय क्षीरसागर
त्या गाण्यात पहिलं म्युझिक कट -नोटस किंवा स्टकाटो पद्धतीनं वाजवलं आहे तर दुसरं लेगाटो पद्धतीनं (एकातून दुसर्या स्वरावर एकसंधपणे जाणं, तुम्ही म्हणता तसं आसयुक्त वादन) कि-बोर्डवर दोन्ही प्रकारानं वाजवता येतं मग मूळ वाद्य कोणतही असो, याशिवाय कॉर्डस (एकाच वेळी संवादी स्वरसमूह वाजवणं) हे तर त्या वाद्याचं वैशिष्ठ्य आहेच.
अर्थात तुमच्या क्लॅरिनेट आणि सारंगी या अवलोकनामुळे इथून पुढे मला स्टकाटो केव्हा आणि लेगाटो केव्हा वाजवायच हे कळलं त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद!
28 May 2012 - 6:24 pm | पैसा
पूर्ण मालिका आवडली. व्यक्तिचित्र उत्तम प्रकारे उभं केलं आहेत!