`काहीही करून आपल्याला गाणं वाजवता आलं पाहिजे' या इच्छेमुळे मला मास्तर भेटले. कोणताही बँड दिसला की मी ऐकत राहायचो, वाटायचं की आपल्या मनाजोगता की-बोर्ड वाजवणारा कुणीतरी एक दिवस नक्की भेटेल. एकदा मामाकडे साई दरबारात हजेरी लावायला मास्तरांचा बँड आला आणि आमची गाठ पडली; संगीताची शून्यजाण असणार्या मला, पहिल्या भेटीतच, मास्तर शिकवायला तयार झाले!
मास्तर हा बँड मधला म्युझिक अरेंजर असतो, प्रत्येक वाद्य वाजवणार्याकडून, गाण्यात वाजणारी वेगवेगळी वाद्य वाजवून घ्यायची, स्वतः की-बोर्ड वाजवायचा आणि पर्फेक्ट रिदम लावून संपूर्ण गाण्याचा हुबहू परिणाम त्या वाद्यवृंदातून साधायचा, असं ते काम असतं! वाजवणारे सगळे एकदम सुमार दर्जाचे असतात त्या सगळ्यांकडून एका स्केलमध्ये गाणं बसवणं अत्यंत जिकिरीचं असतं त्यामुळे मास्तर कोणतंही गाणं कोणत्याही स्केल मध्ये वाजवू शकायचे.
काहीही शास्त्रीय शिक्षण नसताना निव्वळ ऐकून कोणतीही सुरावट वाद्यातून काढू शकणार्या मास्तरच मला आश्चर्य वाटायचं आणि त्याही पुढे जाऊन मास्तर गाण्याचा प्रत्येक शब्द वाद्यातून उमटवू शकतात यावर मी बेहद्द खूश होतो. म्हणजे `ओ सजना बरखा बहार आई' मधली सुरुवातीची सतार, त्याच वजनानं, हा माणूस कि-बोर्डवर तर काढू शकायचाच पण लता मंगेशकरच्या `तुमको पुकारे मेरे मनका पपिहरा' च्या दोन्ही हरकती जशाच्या तश्या काढायचा आणि त्या ही पुढे जाऊन `कैसी रिमझिम मे ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, यानंतरची ..`तेरे ही खाबमें खो गये' ही जागा अशी काय उमटवायचे की क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटायचं आणि कहर म्हणजे त्यांना स्वतःला त्यात काही विशेष वाटायचं नाही!
ओ. पी. च्या `बूझ मेरा क्या नाम रे' मधली सुरुवातीची सुरावट काय किंवा `पिया पिया पिया मोरा जिया पुकारे' मधलं किशोरच यॉडलिंग आणि आशाचे आलाप मास्तर ज्या तर्हेनं वाजवतात ते ऐकून असं वाटतं की मास्तरांची ओ. पी. शी गाठ पडायला हवी होती, ओ पी इतके खूश झाले असते की बोलता सोय नाही.
मास्तर शास्त्रीय रागांवर आधारित गाणी म्हणजे `अज हू न आये बालमा' वगैरे पार रफी आणि सुमन कल्याणपूरच्या आलापांसहित, प्रत्येक जागा जशीच्या तशी घेत आणि त्याहून कहर म्हणजे कोणतंही नोटेशन समोर नसताना कसे वाजवू शकतात याचं रहस्य मला आताआता उलगडलं, हा माणूस गाण्यातच असतो, तो गाणंच जगतो! एकवेळ शंकर जयकिशनला `मन भावनके घर जाये गोरी' चं मधलं इंटरल्यूड काय आहे ते लगेच सांगता येणार नाही पण मास्तर एकदा वाजवायला लागले की पार सुरुवातीच्या म्युझिकपासून मधलं इंटरल्यूड जसच्यातसं घेत आख्खं गाणं जसंच्या तसं, कुठलाही कागद किंवा वही न घेता फुल त्या मूडमध्ये जाऊन वाजवतात!
त्याहूनही कहर म्हणजे नुसतं गाणं सांगायचा अवकाश की मास्तरांचं वाजवणं सुरू! मग ते पार `राजसा जवळी जरा बसा' असो की `रसिक बलमा दिल क्यूं लगाया तोसे, दिल क्यूं लगाया' असो किंवा मग एकदम `दिवाना हुआ बादल' असो; मूड आणि गाण्याचा काहीही संबंध नाही! एका रागातून दुसर्या रागात जायला भल्याभल्यांना कमालीचा रियाज असावा लागतो आणि त्यांचं आधी ठरलेलं असतं, पण हा माणूस एका मूडमधून लगेच दुसर्या मूडमध्ये आणि तरी ही प्रत्येक गाणं हुबहू संपूर्णपणे त्या गाण्याच्या मूडमध्ये!
नौशाद मियांना `मोहे भूल गये सावरिया' चा मूड पकडण्यासाठी सगळा स्टुडिओ धुऊन घ्यायला लागला होता, मोगर्याचे हारेच्याहारे आणावे लागले होते आणि लताला पहाटे गायला बोलवावं लागलं होतं; मास्तरच्या भोवती फक्त शांतता हवी मग मास्तर जो काही माहौल `मोहे भूल गये सावरिया' नि तयार करतात त्यानं अक्षरशः प्रत्येक रसिक मंत्रमुग्ध होईल, वेळ थांबल्यासारखी वाटेल आणि दिवसभर फक्त हे एकच गाणं एकवा म्हणेल!
`नाचे मन मोरा मगन दिगधा दिगी दिगी' वाजवताना मास्तर स्वतः रफी झाल्यासारखे वाटतात आणि जे काय वाजवतात ते ऐकून स्वतः रफी नाचला असता असं वाटतं आणि मजा म्हणजे साथीला तबला नसताना! सगळ्यात कहर म्हणजे कि-बोर्ड कुठला तर `कॅसिओ एसे-टेन' ज्याच्यावर दिग्गज वाजवणार्याची बोटं सुद्धा मोठ्या मुश्किलीनं चालतील, फिरण्याची तर बातच सोडा आणि पुन्हा साथीला रिदम नसताना!
मला कधी कधी वाटतं मास्तरच `दिवाना मसताना हुआ दिल' रेकॉर्ड करून डिजीटलाइझ करावं आणि आशाला पाठवावं त्यातलं `कुछ अनकही कहे मेरी चितवन, बोले जिया लिखे मेरी धडकन' हे तर हुबहू येतंच पण आख्खी `पमग, मरेग पमगम, आऽआऽ आ-आऽ आ, सां नि ध प म ग रे सा-नि नि नि' ही सरगम, `एक नया अफसाना' च्या निसटत्या नोटस आणि शेवटचं तिनी घेतलेलं (चार मिनिटं आणि एकोणचाळीसाव्या सेकंदावरचं) `आऽआऽआ जाने कहा होके बहार आई' चं वेरिएशन ऐकून ती सुद्धा या माणसाला भेटायला येईल!
मला हवा तसा, म्हणजे ज्या स्केलमध्ये मला गायला जमेल त्या स्केलमध्ये वाजवू शकणारा, आणि अक्षरशः शब्दनशब्द वाद्यातून उमटवू शकणारा हा माणूस जर भेटला नसता तर किती वेळा मला पुन्हापुन्हा जन्म घ्यावा लागला असता, कल्पना करवत नाही!
प्रतिक्रिया
21 May 2012 - 1:31 pm | मी-सौरभ
आवडेश :)
21 May 2012 - 1:54 pm | चिगो
व्यक्तिचित्र चांगलं रंगवताय.. पुभाप्र.
21 May 2012 - 1:54 pm | जयंत कुलकर्णी
मस्त ! एका दुर्लक्षित कलाकाराला न्याय दिल्यासारखे.....
21 May 2012 - 3:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
21 May 2012 - 7:55 pm | सोत्रि
खुप छान व्यक्तीचित्रण, आवडेश!
- (वाद्य शिकायची ईच्छा असलेला) सोकाजी
21 May 2012 - 7:58 pm | पैसा
छान व्यक्तिचित्रण! शेवट "क्रमशः" लिहायचं रहिलं काय?
22 May 2012 - 9:52 pm | सानिकास्वप्निल
छान आहे , आवडले :)
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
22 May 2012 - 10:02 pm | मुक्त विहारि
अजून येवू द्यात.
23 May 2012 - 9:19 am | चौकटराजा
संजय श्री, आरेखन मस्त.त्यातील ओघाने येणारी माहिती उपयुक्त, मास्तर विषयी आदर आजच्या कालात सुखावणारा ! मास्तरांना एकदा ऐकायलाच पाहिजे !