जत्रा
निर्जीव देवतांच्या करतात येथ जत्रा
जातात जीव तरीही भरतात येथ जत्रा
ओझे परंपरांचे ठरतेय जीवघेणे
वेठीस बापुड्यांना धरतात येथ जत्रा
तो देव का दयाळू होई असा कठोर?
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा
झाले ठिकाण जत्रा, चिंता आणि भयाचे
चिरडून सर्व श्रद्धा सरतात येथ जत्रा
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.
-अविनाश ओगले
प्रतिक्रिया
4 Aug 2008 - 10:32 pm | प्राजु
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.
अगदी खरे आहे...
जत्रेला समोर उभे केलेत आणि त्याचे स्तोम माजवणालाही...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Aug 2008 - 10:40 pm | धनंजय
एकत्र यावे, मौज करावी, गर्दीतही फार आनंद असतो...
जत्रेत गर्दीची चेंगराचेंगरी होऊ नये अशी सोय केली नाही, याबद्दल मलाही वाईट वाटते. पण मनुष्याने घाईगर्दीत रमूच नये, तशा रेलचेल जत्रांचे आयोजनच केले जाऊ नये, असे माझ्या मनाला मानवतही नाही.
तरी या क्षणी वाटणारा विषाद सांगणारी तुमची गझल आवडली.
4 Aug 2008 - 11:34 pm | बेसनलाडू
प्रासंगिक आणि उद्विग्नता परिणामकारकपणे व्यक्त करणारी गझल आवडली.
(व्यथित)बेसनलाडू
5 Aug 2008 - 1:13 pm | सहज
जत्रा, चेंगराचेंगरी, हकनाक बळी कधी कधी थांबेल हे?
5 Aug 2008 - 8:28 pm | केशवसुमार
ओगलेशेठ,
प्रासंगिक आणि उद्विग्नता परिणामकारकपणे व्यक्त करणारी गझल आवडली.
(व्यथित)केशवसुमार
4 Aug 2008 - 11:45 pm | चतुरंग
तात्कालिक अपघाती प्रसंगाबद्दल वाचून मनात आलेले विषण्ण भाव व्यक्त करणारी समर्थ गजल!
(स्वगत - पुरेशी स्वयंशिस्त आणि सामाजिक जाणीव येईपर्यंत किती निष्पाप हकनाक बळी जाणार कोण जाणे?)
चतुरंग
5 Aug 2008 - 12:55 am | विसोबा खेचर
का हो इतका निराशावाद? साला, जत्रेतदेखील मजा असते राव!
5 Aug 2008 - 3:43 pm | नारदाचार्य
सुरेख (हा शब्द वापरताना आम्ही थोडे विचारातच पडलो आहोत. पण हे विशेषण रचनेला असल्याने तसेच ठेवले) रचना आहे. नेमके भाव व्यक्त झाले. आणि योग्य वेळीही आले. मागं एकदा आम्ही म्हटलं होतं तसं, संपादकीयापेक्षा सकस टिप्पणी.
5 Aug 2008 - 8:29 pm | अविनाश ओगले
काही वर्षापूर्वी सातार्याजवळ मांढरादेवीच्या जत्रेत अशीच दुर्घटना घडली होती. तेव्हा ही गजल लिहिली होती. हा निराशावाद नाही. पण काही वेळेला हताश व्हायला होते. मजेसाठी, भक्तिने देवाच्या दारात जाणार्यांवर ही पाळी यावी याचे दु:ख झाले. कारणे काहीही असोत; पण या घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी सर्वानी घ्यायला हवी.
आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.
या ओळी पुन्हा नैनादेवी यात्रेच्या निमित्ताने खर्या झाल्या याचे वाईट वाटले.
5 Aug 2008 - 9:14 pm | ऋषिकेश
गझल परिणामकारकपणे पोचली..
नेमके शेर!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
10 Aug 2008 - 1:05 am | चंपक
ऋषिकेशशी सहमत आहे.
चंपक