श्रावणमास! निसर्ग सौंदर्याचा मास. व्रत-वैकल्यांचा मास. त्याच बरोबर मद्य-मांस विरहित मास. रोज `मद्यमासा'वाचून अजिबात न चालणारे अनेक मद्य-मांस प्रेमी, कुत्रा-मांजर पाळायचे ठरवावे इतक्या सहजतेने श्रावण पाळायचे ठरवतात. पण ते इतके सोपे नाही याची जाणीव एक दोन दिवसात होते. (काहीना एक दोन तासातच. असो.) न पेलणारी व्रते करायला गेले की हे असेच हाल हाल होतात. बालकवींचा श्रावणमास या `श्रावणपाळ' मंडळींच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा हा एक प्रयत्न. हे विडंबन सर्व श्रावणपाळांना अर्पण!
श्रावणमासी विरस मानसी हळहळ दाटे चोहिकडे
श्रावणमासी, विरस मानसी,हळहळ दाटे चोहिकडे
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे.
भवती बघता भाविक नवरे पत्नी भयाने मौनव्रती
"श्रावण-श्रावण" जपता जपता गलितगात्र हे महारथी
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो आठवे-
"सध्या श्रावण!" हळूच पाउल घराकडे अपुल्याच वळे.
उठती बसती कामे करती, अंगी नाही त्राण पहा
सर्व जगावर हाय! पसरले विषण्णतेचे रुप महा.
"गलास" साधा फुटता भासे, न पिता ही कशी चढे?
श्रावण म्हणूनी त्राण न हाती, हातामधुनी खाली पडे.
बडबड करुनी उगीच आपुले, दिवस जुने ते आठवती
सुंदर साकी, मैफल, मस्ती, मनात अपुल्या साठवती.
"उदास"* गझला पडता कानी, पाउल शोधत वाट फिरे
परि आठवता श्रावणमहिमा, मुकाट मंदिरात शिरे.
वाट असे ही जरी नित्याची कोण बेवडा अडखळला?
दारी आपुल्या अचूक येऊनी कोण नेमका गोंधळला?
पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती.
शून्यामध्ये लावून डोळे बसून राहे तासन्तास
वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावा, भुका-तहाना श्रावणमास.
(*पंकज उदासच्या शराबी गझला.)
(हालकवी) -अविनाश ओगले
प्रतिक्रिया
3 Aug 2008 - 6:07 pm | नारदाचार्य
लय भारी. एकेक द्विपदी म्हणजे पटियाळाच.
3 Aug 2008 - 6:22 pm | ऋषिकेश
ओ बॉस... काय लिहु तुम्हाला.. सलाम!
हसून हसून ससून मधे भरती भायची वेळ आली ...
एकेक शेर म्हणजे सव्वाशेर आहे :)
भयंकर हसतो आहे.. उद्या हाफिसात नक्की ऐकवणार हा प्रकार:)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
3 Aug 2008 - 8:18 pm | चतुरंग
चतुरंग
3 Aug 2008 - 8:29 pm | प्राजु
आपण खरोखर ग्रेट आहात..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Aug 2008 - 10:09 pm | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू
4 Aug 2008 - 12:55 pm | केशवसुमार
ओगलेशेठ,
एकदम भन्नट विडंबन..अजून येऊद्या..
(निवृत्त)केशवसुमार
3 Aug 2008 - 10:32 pm | तळीराम
आम्हा सर्व तळीरामांच्या 'श्रावणीय' व्यथा मांडणारे हे काव्य लईच जबरदस्त... नुसते वाचले तर अचाट कविता... मूळ कविता माहित असली तर विडंबनाची मजा काही औरच....
पुरोपकंठी शुद्धमती... आणि उतरेना कंठी बासमती.. क्या बात है...
बालकवींची पूर्ण कविता आता या क्षणी जवळ नाही..
काही का असेना हालकवींनी आमच्या दुखर्या श्रावण त्रासावर फुंकर घातली... बरं वाटलं..
3 Aug 2008 - 10:47 pm | फटू
पुन्हा एकदा "अविनाश टच" पाहायला मिळाला...
अविनाशच्या कवितांचा खुप मोठा पंखा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
3 Aug 2008 - 11:00 pm | चतुरंग
आमच्या स्मरणशक्तीने म्हणावी तशी साथ दिली नाही - मी दिलेले गीत अपूर्ण होते - खाली अविनाश ओगले ह्यांनी गीत संपूर्ण दिले आहे.
धन्यवाद ओगलेशेठ!!
(खजील)
चतुरंग
4 Aug 2008 - 8:29 am | विसोबा खेचर
पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती.
क्या बात है! लै भारी..
साला, दो दिन की जिंदगी! म्हणूनच आम्ही श्रावणबिवण पाळण्याच्या भानगडीत पडत नाही. वो अपने बसकी बात नही!
आमचे गुरुवर्य काकाजी म्हणतात, "न पेलणार्या गोळ्या घेऊ नयेत. मग त्या भांगेच्या असोत की अध्यात्माच्या! :)
ओगलेशेठ, सुंदर विडंबन...
आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.
4 Aug 2008 - 10:44 am | नरेंद्र गोळे
वा! भाई वा!!
4 Aug 2008 - 9:23 pm | अविनाश ओगले
श्रावणमासी, हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणि भासे
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
ऊठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर हाय रेखिले सुंदरतेचे रूप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनी येती अवनी वरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनी भिजले आपुले पंख पाखरे सावरिती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारेही चरती रानी गोपहि गाणी गात फिरे
मंजुळ पावा गात तयाचा श्रावणमहिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देवदर्शना निघती ललना हर्ष माइना हृदयात
वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत
4 Aug 2008 - 9:34 pm | चतुरंग
आमची आठवण इतकी नीट नव्हती (बालकवींची माफी मागायला हवी)
चतुरंग