जंगलवाटांवरचे कवडसे - ४ (ताजोमारूची साक्ष)

रमताराम's picture
रमताराम in जनातलं, मनातलं
19 Apr 2012 - 9:11 pm

मागील भागः
जंगलवाटांवरचे कवडसे - १
जंगलवाटांवरचे कवडसे - २
जंगलवाटांवरचे कवडसे - ३

ताजोमारू सांगू लागतो. "ती दिवसांपूर्वीची गोष्ट. रणरणत्या दुपारी एका विशाल वृक्षातळी मी विश्रांती घेत पडलो होतो. समोरून एक पुरूष घोड्यावर बसलेल्या एका स्त्रीला घेऊन येत होता. मला पाहताच तो थांबला. त्याच्या चेहर्‍यावर भय दिसले. नकळत त्याने आपल्या तरवारीला हात घातला. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपी जाण्याच्या प्रयत्नात होतो. ते पाहून तो थोडा आश्वस्त झाला. एक नजर माझ्यावर ठेवून तो पुढे चालू लागला. ते माझ्याजवळून पुढे जात असतानाच ती झुळुक आली. पाने सळसळली नि मला ओलांडून त्या घोड्यावरील स्त्रीला स्पर्श करून पुढे निघून गेली. त्या झुळुकीने त्या स्त्रीचे अवगुंठन दूर झाले नि तिचा चेहरा माझ्या नजरेस पडला. कदाचित तिचा चेहरा क्षणभरच दिसला म्हणून असेल (थोडक्यात ती खरंतर फारशी सुंदर नसावी किंवा निदान आज ती तशी वाटत नाही हे तो सूचित करतो आहे.) पण मला एखादी देवीच नजरेस पडल्याचा भास झाला. त्याच क्षणी मी ठरवले, हिला हस्तगत करायचेच. भले त्यासाठी तिच्या पुरूषाला ठार मारावे लागले तरी बेहत्तर. अर्थात तसे करावे न लागता ती मिळाली तर त्याहुन उत्तम. मला तिच्या पुरूषाला ठार न मारता तिला आपलेसे करायचे होते. (इथे तो 'मिळवण्याची' भाषा करतो आहे, भोगण्याची नव्हे. तसेच मला त्याला मारायचे नव्हते असे म्हणत आपण हेतुत: ही हत्या न केल्याचेही ठसवतो आहे.) "पण मी ते यामाशिनाच्या रस्त्यावर करू शकत नव्हतो, त्यासाठी त्यांना जंगलात आडबाजूला नेणे आवश्यक होते. "

ताजोमारू त्यांच्या मागे धावत सुटतो. धापा टाकत त्यांना गाठतो. सामुराई त्याच्याकडे वळतो नि विचारतो "काय हवंय तुला?". ताजोमारू लगेच उत्तर देत नाही. काही क्षण तो सामुराईला न्याहाळत राहतो. कदाचित आपल्या प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत असावा. यावरून वासनेने पीडित असूनदेखील ताजोमारू बेफाम अथवा उतावीळ झालेला नाही, पुरेसा सावध आहे हे दिसून येते. तो घोड्याभोवती एक फेरी मारतो नि तिचा चेहरा पुन्हा दिसतो का याचा अंदाज घेतो. सामुराई पुन्हा एकवार त्याला सामोरा येतो नि पुन्हा तोच प्रश्न विचारतो. दोनही वेळा या प्रश्नाचे उत्तर न देता ताजोमारू अंगावर बसलेला डास एका फटक्यात चिरडून टाकतो. हळूहळू पावले टाकत निघून जात असल्याचा आव आणतो नि अचानक फिरून सामुराईवर खोटा खोटा हल्ला चढवतो. सामुराई पुरेसा सावध आहे याचा त्याला अंदाज येतो. गडगडाटी हसून तो सामुराईला घाबरायचे कारण नाही असे सांगतो. त्याचा विश्वास बसावा म्हणून आपली तलवारदेखील त्याला पहायला देतो. आपल्याला जवळच असलेल्या एका प्राचीन आणि पडक्या अवशेषांमधून मला अनेक उत्तमोत्तम तलवारी नि आरसे मिळाल्याचे सांगतो. मी ते काढून पलिकडे ढोलीत लपवून ठेवले आहेत असे सांगतो. तुला हवे असतील तर ते तुला स्वस्तात विकू शकतो असा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवतो. समोरचा सामुराई आहे त्यामुळे शस्त्र हे त्याला अतिप्रिय असते हे जोखून तो त्याला मोहात पाडतो आहे. त्याच्यावर ही मात्रा नाहीच चालली तर आरशांची लालूच त्याने त्या स्त्रीसाठी दाखवली आहे. स्वत:साठी नाही तरी स्त्रीच्या आग्रहाखातर त्या सामुराईला आपण आपल्याबरोबर येण्यास भाग पाडू शकतो असा त्याचा होरा आहे. बाराव्या शतकात आरशांची उपलब्धता फारशी नसावी. एकेकाळी घरात फोन असणे, टीव्ही असणे हे जसे दुर्मिळ अथवा प्रतिष्ठेचे समजले जात असे तसेच एखाद्या स्त्रीकडे शृंगारासाठी स्वत:चा आरसा असणे हे प्रतिष्ठेचे समजले जात असेल कदाचित. त्यामुळे हा दुसरी लालूच त्या स्त्रीसाठी आहे. जेणेकरून सामुराई मोहात पडला नाहीच तर ती स्त्री मोहात पडण्याची शक्यताही तो निर्माण करतो आहे. मुख्य रस्त्यापासून दूर जंगलात त्यांना खेचून नेण्यासाठी त्याने हा दुहेरी डाव टाकलेला आहे.

Lady_n_Horse

एका ओढ्याकाठी आपला घोडा नि स्त्री यांना थांबवून तो सामुराई ताजोमारूबरोबर जातो. त्यावेळी पडद्यावर असलेला लहानसाच पण वाहता ओहळ नि झर्‍याचे पाणी पितानाही बुरख्यातच असणारी स्त्री नि बाजूलाच लगामाने बद्ध असलेला घोडा त्या स्त्रीचे नि घोड्याचे सामाजिक स्थान सूचित करतात. गर्द जंगलात समोरासमोरच्या लढाईत तसेही निरुपयोगी असणारे धनुष्य नि बाण त्या स्त्रीजवळच सोडून सामुराई केवळ तलवार बरोबर घेऊन ताजोमारूबरोबर जातो. ताजोमारू घाईघाईने पुढे चालला आहे. जंगलाची सवय नसलेल्या सामुराईची त्याच्याबरोबरीने चालताना तारांबळ उडते आहे. त्या स्त्रीपासून पुरेसे दूर गेल्यानंतर ताजोमारू क्षणभर थांबतो नि सामुराईला पुढे जाऊ देतो. संधी साधून मागून हल्ला करून तो नि:शस्त्र करतो नि कमरेच्या दोरीने त्याला बांधून घालतो.

धावतच तो त्या स्त्रीकडे परत येतो. आता त्या स्त्रीलाही तो मुख्य रस्त्यापासून आत नेऊ पाहतो आहे. त्यासाठी तिचा नवरा आत अचानक आजारी झाल्याचे तिला सांगतो. हे ऐकून ती व्यथित होते नि धक्क्याने आपले अवगुंठण दूर करते. आता तिचा चेहरा ताजोमारूला पूर्ण दिसतो. आडरानात आपल्या पुरूषावर ओढवलेल्या प्रसंगाने तिचा चेहरा पांढराफटक पडलाय. थिजलेल्या नजरेने ती ताजोमारूकडे पाहते आहे. "तिच्या चेहर्‍यावर एखाद्या लहान मुलाची निरागसता होती. मला त्या पुरूषाचा हेवा वाटला. अचानक मला त्याचा तिरस्कार वाटू लागला.तो किती दुबळा आहे हे मला तिला सांगायचे होते. त्या पाईन वृक्षाखाली मी किती सहजपणे त्याच्यावर मात केली हे मला तिला दाखवावेसे वाटले." ताजोमारू तिला तिच्या नवर्‍याकडे घेऊन जातो. ते वेगाने जात असतानाच तिच्या हातातील तिची हॅट - नि त्याला जोडलेला तो बुरखा - वाटेतील एका झुडपावर अडकून राहतो. (जो पुढे त्या लाकूडतोड्याला सापडल्याचा उल्लेख त्याने त्याच्या साक्षीमधे केलेला आहे.)

LadyFights

नवर्‍याची ती केविलवाणी स्थिती पाहून ती संतापाने उसळते. कंबरेला लावलेला खंजीर काढून ताजोमारूवर हल्ला चढवते. अर्थात ताजोमारू-सारख्या निर्ढावलेल्या गुन्हेगारासमोर तिचा पाड लागणारच नसतो. लहान मुलाशी खेळावे तसा तो तिचे वार चुकवत असतो. पण त्याचबरोबर "आपण अशी निर्भय नि शूर स्त्री कधीही पाहिली नव्हती" अशी कबुली देतो. (यात एकप्रकारे अशा शूर स्त्रीलाही मी अंकित केले हा आत्मगौरवाचाही एक धागा गुंतलेला आहे.)

अखेर थोड्या प्रतिकारानंतर तो तिला पकडतो नि तिचा भोग घेतो. तो तिला पकडून तिचा भोग घेऊ पहात असतानाच तिच्या हातातील खंजीर हलकेच गळून पडतो नि जमिनीत रुततो.

TajomaruSeduces

हे खंजीराचे रुतणे एका बाजूने जबरी संभोगाचे/ बलात्काराचे निदर्शक आहे तर दुसर्‍या बाजूने ज्याप्रकारे हलके हलके तो खंजीर तिच्या हातून निसटू लागतो ते पाहता प्रतिकार सोडून ती त्याच्या स्वाधीन होते आहे अशीही एक शक्यता दिसून येते.

त्याचबरोबर हा खंजीर गळून पडत असताना ताजोमारूच्या खांद्यावरून मागे तिला पर्णराजीतून डोकावू पाहणारा सूर्य दिसतो. त्याचे चार चुकार कवडसे तिच्या चेहर्‍यावर पडलेले दिसतात. तिचे डोळे हळूहळू मिटत जातात. आता हे डोळ्यावर पडलेल्या कवडशांनी दिपून गेल्याने की प्राप्त परिस्थितीला शरण गेल्याचे निदर्शक आहे हे कुरोसावा प्रेक्षकाला सांगत नाही, तुमचे तुम्ही समजून घ्यायचे असते. ताजोमारू दुसरी शक्यता सत्य म्हणून ठसवू पाहतो. माझ्या शौर्याला अखेर ती शरण आली, माझ्या स्वाधीन झाली असा त्याचा दावा आहे. म्हणूनच आपल्या भोगाचे वर्णन करताना तो तिने एका हाताने आपल्याला कवटाळल्याचा, देहभोगाला एक प्रकारे संमती दिल्याचा उल्लेख करतो.

Surrender

ताजोमारू तिचा प्रतिकार मोडून तिला कवेत घेतो तेव्हाच तो तिरक्या नजरेने तिचा पुरूष हे पाहतो आहे ना याची खात्री करून घेतो. यात स्त्रीसुखाबरोबरच त्या सामुराईच्या - दुसर्‍या पुरुषाच्या - मानखंडनेचे सुखही तो भोगू पाहतो आहे. एक प्रकारे आपले शौर्य, आपली मर्दानगी तो सिद्ध करू पाहतो आहे. हे कोर्टात सांगत असतानाही तो खदाखदा हसत असतो. "अखेर त्याला न मारता मी त्याची स्त्री मिळवली." अशी बढाई तो मारतो. मला अजूनही/तरीही त्याला ठार मारायची इच्छा नव्हती असा दावा तो करतो.

त्या स्त्रीला आपलेसे करण्याचा - भोगण्याचा - हेतू साध्य झाल्यानंतर ताजोमारू त्या दोघांना तिथेच सोडून निघून जाऊ पाहतो. (इथे ताजोमारू किंचित फसलेला आहे. आधी तिला आपलेसे करण्याची इच्छा असल्याचा दावा करणारा तो, तिच्याशी संग करून चालू लागल्याचे सांगतो तेव्हा हे त्याच्या आधीच्या दाव्याला छेद देऊन जाते हे त्याच्या ध्यानात येत नाही. ) ती स्त्री त्याला धावत जाऊन थांबवते. ती म्हणते 'आता एकतर तू मेलं पाहिजेस किंवा माझ्या पतीने तरी. माझ्या अब्रूचे धिंडवडे दोन पुरूषांनी पाहिले आहे. हे तर मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तेव्हा तू त्याला ठार मार किंवा तुम्ही दोघांनी द्वंद्व करावे. जो जिवंत राहिल त्याच्याबरोबर मी राहीन." त्या काळातील सामाजिक नीतीच तिच्या तोंडाने बोलते आहे. स्त्री ही जिंकून घेण्याची, हिरावून घेण्याची वस्तू आहे. लढणार्‍यांनी तिच्या मालकीचा फैसला करावा हाच नियम होता. त्याचीच आठवण ती ताजोमारूला करून देते आहे. ताजोमारू सामुराईला बंदिवासातून मोकळे करतो नि त्याची तलवार त्याला परत देतो. हे सांगताना आपली न्यायबुद्धी तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला कपटाने बंदिवान केले असले तरी त्याला असहाय्य स्थितीत मारलेले नाही असा त्याचा दावा आहे.

ताजोमारूच्या साक्षीतून दिसणारे द्वंद्व हे जवळजवळ समसमा स्वरूपाचे आहे. दोघेही समबल आहेत नि सारख्याच त्वेषाने लढताहेत. युरपिय पद्धतीच्या द्वंद्वातून न दिसणारे असे हूल देण्याचे पवित्रेही वापरत आहेत. ताजोमारू हा जंगलचा डाकू असल्याने त्याच्या पवित्र्यांमधे शस्त्राघाताबरोबरच आरडाओरड करून समोरच्याला विचलित करण्याचे, छद्म युद्धाचेही तंत्र वापरले जाते. उलट सामुराई हा प्रशिक्षित नागर योद्धा आहे. तो स्थिर नजरेने नि एकाग्रतेने वार करतो आहे. अखेर एका क्षणी सामुराई जमिनीवर पडतो, त्याची तलवारही बाजूच्या झुडपात अडकल्याने हातातून निसटते. गडगडाटी हसत ताजोमारू आपल्या तलवारीने भोसकून त्याला ठार मारतो. मला त्याला सन्मानाचा मृत्यू द्यायचा होता नि तो मी दिला असे ताजोमारू फुशारकीने न्यायासनासमोर सांगतो. तो सांगतो "त्याने माझ्यावर २३ वार केले. यापूर्वी कोणीही वीसचा आकडा पार करू शकला नव्हता."

'त्या स्त्रीचे पुढे काय झाले?' या न्यायासनाकडून आलेल्या प्रश्नावर "मला ठाऊक नाही. तिच्या पतीला ठार केल्यावर मी वळून पाहिले तेव्हा ती आधीच नाहीशी झालेली होती" असे तो सांगतो.” मी मुख्य रस्त्यावर येऊन तिचा शोध घेतला. पण तिथे फक्त तिचा घोडाच मला दिसला. मी तिच्या आक्रमकतेवर लुब्ध झालो होतो, पण तीही अखेर एक सामान्य स्त्रीच निघाली." त्याची तलवार गावात विकून त्याबदली त्यातून आलेल्या पैशातून आपण आपण दारू खरेदी केल्याची माहिती तो देतो. परंतु ज्या खंजीराच्या सहाय्याने ती लढली तो खंजीर कुठे आहे या प्रश्नावरही तो ते आपल्याला माहित नसल्याचे सांगतो. "त्याच्यावर मोती जडवलेले होते. त्याबाबत मी पार विसरूनच गेलो की. अगदीच मूर्ख आहे मी. तो तिथेच सोडून येण्यात फारच मोठी चूक केली मी." अशी खंतही तो व्यक्त करतो.

या खंजिराचे अस्तित्व नि त्याचे अखेर काय झाले असावे याबाबत एकाहुन अधिक शक्यता असू शकतात. कदाचित असा खंजीर काही नव्हताच नि त्याच्या सहाय्याने त्या स्त्रीने ताजोमारूवर केलेला हल्ला हा पूर्णपणे ताजोमारूचा बनावच असू शकतो. यातून ती स्त्री दुबळी वगैरे नव्हती असे सूचित करून तो तिच्या प्रती असणारी न्यायासनाची सहानुभूती कमी करू शकतो. आता मुळात अस्तित्वातच नसलेला खंजीराचे पुढे काय झाले हे कसे काय सांगता येणार. दुसरी शक्यता ही की तो खंजीर त्या संघर्षात त्या जंगलाच कुठेतरी पडला असावा. तिसरी शक्यता म्हणजे ताजोमारू नि सामुराईचे द्वंद्व चालले असताना जेव्हा ती स्त्री तिथून नाहीशी झाली तेव्हा जाताना तिने आपल्याबरोबर नेला असावा. आणखीही एक चौथी शक्यता चित्रपटातील न्यायासनासमोर नसली तरी कुरोसावाच्या न्यायाधीशांसमोर म्हणजे प्रेक्षकांसमोर येते, पण त्याबद्दल नंतर.

गोषवाराच सांगायचा झाला तर त्याची साक्ष अशी सांगते की ती स्त्री मी माझ्या शौर्याने मिळवली. एवढेच नव्हे तर तिने राजीखुशीने माझ्याशी संग केला आणि तिच्याच आग्रहावरून मी तिच्या पतीला ठार मारले आणि तो प्रतिस्पर्धीही असा शूरवीर असून. गुन्ह्याची कबुली देतानाही अप्रत्यक्षपणे तो आपले शौर्य, आपली मर्दानगी ठसवू पाहतो.

ताजोमारूच्या साक्षीचा तपशील लाकूडतोड्यांने सांगून झाला आहे. तिसरा माणूस म्हणतो "सर्व डाकूंमधे ताजोमारू सर्वात मोठा स्त्रीलंपट म्हणून प्रसिद्ध आहे. घोडाही न घेता पळालेल्या त्या स्त्रीचे जंगलात काय झाले असेल कुणास ठाऊक."

भिक्षू सांगतो "ती परवा कोर्टात आली होती. पोलिसांनी तिला शोधून काढेपर्यंत ती देवळात लपून बसली होती."

"खोटं आहे सारं. ताजोमारू नि ती स्त्री दोघेही खोटारडे आहेत." लाकूडतोड्या म्हणतो. "माणसेच खोटे बोलतात." तिसरा माणूस हसून म्हणतो. "बहुतेक वेळ आपण स्वत:शी देखील प्रामाणिक नसतो." "शक्य आहे..." भिक्षू म्हणतो "माणसे दुबळी असतात म्हणून ती स्वत:लाही फसवतात." "हुं. झालं यांचं प्रवचन सुरू." तिसरा माणूस वैतागून म्हणतो. . "ते खरं आहे का खोटं याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. फक्त ते मनोरंजक असलं की मला पुरे." (इथे पुन्हा ऑस्कर वाईल्डच्या लॉर्ड हेन्रीची आठवण होते.) भिक्षू सांगतो "तिची साक्ष ताजोमारूच्या साक्षीच्या अगदी विपरीत अशी होती. तो म्हटला त्याप्रमाणे ती आक्रमक वगैरे मुळीच वाटत नव्हती. उलट अगदीच दुबळी, आज्ञाधारक नि दयनीय अशी भासत होती."

आता त्या स्त्रीच्या निवेदनाचा तपशील भिक्षू त्या तिसर्‍या माणसाला सांगू लागतो.

(क्रमश:)

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

वाचतिये. दोन पुरुषांच्या लढाईपर्यंतच शिनेमा पाहिला आहे त्यामुळे तिथपर्यंत समजले.
आता पुढील लेखनाची वाट पाहते.

पैसा's picture

19 Apr 2012 - 10:52 pm | पैसा

कथा मस्त उलगडते आहे. दुसर्‍या कोनातून ही कथा कशी दिसेल याची उत्कंठा लागली आहे. कॅलिडोस्कोपच हा!

अन्या दातार's picture

20 Apr 2012 - 10:40 am | अन्या दातार

त्यावेळी पडद्यावर असलेला लहानसाच पण वाहता ओहळ नि झर्‍याचे पाणी पितानाही बुरख्यातच असणारी स्त्री नि बाजूलाच लगामाने बद्ध असलेला घोडा त्या स्त्रीचे नि घोड्याचे सामाजिक स्थान सूचित करतात.

हे रुपक काही नीटसे कळले नाही. नक्की सामाजिक स्थान काय आहे हे यातून कसे वरे स्पष्ट होते?

सहज's picture

20 Apr 2012 - 10:52 am | सहज

अवांतर - महीलांचे स्थान..
नुकतेच एक ताजे रुपक पाहण्यात आले.

पैसा's picture

20 Apr 2012 - 12:17 pm | पैसा

ओहळ वाहता आहे पण लहानसा आहे. स्त्री पाणी पितानासुद्धा बुरखा बाजूला करू शकत नाही आणि घोडा सदैव लगामाने बांधलेला. दोघांवरही पूर्णवेळ बंधनं आहेत आणि स्त्रीचं स्थान पाळीव प्राण्याच्या बरोबरचं आहे असं काहीसं इथे सूचित होतंय.

रमताराम's picture

20 Apr 2012 - 3:52 pm | रमताराम

आमचं पाल्हाळ कोणीतरी बारकाईने वाचतंय हे वाचून निर्वाण प्राप्त झाले. :) अन्याभौ नि पैसाताई दोघांचेही आभार.

जयंत कुलकर्णी's picture

20 Apr 2012 - 4:05 pm | जयंत कुलकर्णी

मी पण वाचतोय बर का !

sneharani's picture

20 Apr 2012 - 11:08 am | sneharani

वाचतेय, येऊ दे पुढचा भाग!
:)

र.रा.
तुमची लेखनशैली जबरदस्त आहे , एकेक धागा उलगडुन दाखवण्याची :)
सुपर्ब :)

सुंदरच ररा!
याला रसग्रहण न म्हणता क्षण ग्रहण म्हणावे काय?
प्रत्येक क्षण समजून घेताना मजा आली.
मागचे भाग तेवढ्या काळजीपूर्वक वाचले नव्हते (की ते 'असे' लिहिलेच नव्हते? ) ... आता वाचतो.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

स्पंदना's picture

23 Apr 2012 - 6:56 am | स्पंदना

हा ही भाग अतिशय छान लिहिलाय. विषेशतः तिच्या चेहर्‍यवरचा बुरखा अगदी तहान भागवतानाही न दुर होणारा, बाजु ला बांधलेला घोडा अन ती यांच्यातल साम्य, बाजुला पडलेला खंजीर, अगदी एक एक गोष्ट नकळत प्रतिकात्मक होत जाते.
चलतचित्र पहाताना एव्हढे सारे "कवडसे"(शब्द तुम्हा कडुन उधार) ध्यानात नाही यायचे, जेव्हढे तुमच्या चलदर्शनातुन येताहेत.