भाना..........भाग - ३
भाना..........भाग - १
भाना..........भाग - २
दारावरची कडीची टकटक ऐकून भैरूच्या बायकोने दार उघडल, तसा तिने लगबगीन डोक्यावरचा पदर सावरला
" तात्या " ह्या वक्ताला ? या ..ना.. या.. आतमंदी या .......”
तात्या अन संभा खोपटात शिरले , तात्याने संभाला डोळ्यांनाच खुणावल तसं संभाने दाराला आतून कडी घातली .नाही म्हणायला भैरूची बायको गांगरली जराशी .
हातातला पाण्याचा तांब्या पुढ्यात ठेऊन वैस थोड कोपर्यात उभ राहून भिंतीला टेकली ,पायाच्या नखाने सारवलेली जमीन कुरतडताना तिची पदराशी चाललेली चुळबुळ तिची मनस्थिती सांगून जात होती .तात्याने घसा खाकरला जरासा ,
" भैरू कुठ दिसना? त्येच्याकाडाच काम होत सुमे आमच .!
सुमी : तात्या तुम्हाला तर माहित आहे ना ,त्ये घरला कधी येतीन याचा काय नेम आहे का ? चार- चार दिस उंबर्याला पाय लागत नाही त्याच ! आधी लय त्रास व्हायचा , जीव काळजीन गलबलून जायचा , कुठं कुठं शोधायची मी त्याला तान्ह्या लेकराला घिऊन पण आता सवय झालीय मला त्येच्या अश्या वागण्याची " “रोजच मढं त्याला कोण रडं "
येतो...... ४ - ८ दिसांनी घरला मनात आल तर , अन ढोसायला पैक नसत्याल तर , आता मी एकली काय काय करू ? कसंतरी रोजान शेतावर काम करतीय म्हणूनशान दोन घास तरी जात्यात लेकरांच्या पोटात नाही तर ……
" तात्या ,ह्या दारूपायी आविष्याचा सत्यानाश झालाय मह्यावाला , माणूस माणसात राहू देत न्हाई ही दारू ,किती समजावलं किती काय काय केल ? आता तर आशाच सोडून दिली समद्यानी अस म्हणत सुमीन तोंडाला पदर लावला.
संभान नकारार्थी मान डोलावली ,तात्यापण उठला खिशात हात घातला जितक्या नोटा हातात आल्या तितक्या सुमीच्या हातात कोंबल्या ,
" हे बघ बाई लेकीसारखी हायेस तू म्हणूनशान " तसं सुमीच्या चेहऱ्यावर किंचित हसू फुलल !
तात्या : सुमे एक काम कर फकस्त, भैरू आला रे आला की लगोलग मला कळीव कसंही करून लई महत्वाच काम है त्येच्याकड ,समजल ? सुमीन होकारार्थी मान डोलावली .
झाल...... सुमीन आपल नेहमीच दळण दळून तात्याकडून पैसे बरोबर वसूल करून घेतले हे संभाला खटकल जरास !
संभा : तात्या ,आता वो काय करायचं ? भैरू त नाही गावला? आता फुढ?
तात्या : संभ्या, अस अस घायतुकीला येऊन नै जमायचं ,जरा दमान घ्यावं लागेल
त्या दिवशी भैरू दारूच्या नशेत
“ह्याच्यात लssssssssय .......मोठ्या लोकांचा हात हाये , पंचाला सुदिक दाबून टाकतीन ते,पंचाची बी डेरिंग नाही त्यांना नडायची . “ जरी बोलला ना तरी त्यो खरच बोलत होता मला तरी ग्यारंटी हाये .
संभा : हा sssss प्पण तात्या , त्या सुमीच्या हातात इतके पैक कोंबायची काय गरज होती का म्हणतो म्या ? एक १०० -२०० रुपड्यानी बी काम झाल असत न ?
तात्या : च.. च्च ...तुला नाही कळायचं राहू दे अरे तो भैरू काय येडा बिद्रा वाटला कि काय तुला ? बारा पिंपळाचा मुंजा हाये,आज हिथ तर उद्या तिथ ,लेकाला सगळ्या खबरी असतात ,चार बुक शिकलेला गडी हाये त्यो पण ह्या दारून खेळखंडोबा झाला त्याच्या आयुष्याचा , मोठ्या ( नको त्या ) लोकांच्या संगतीचा परिणाम , पण अक्ख्या गावाची खबर असती त्याच्याकड . हा एक माझ्यावर खार खाऊन असतो त्यो , म्हणूनशान मला सरळ सरळ सांगायचा न्हाई त्यो .म्हणूनच त्याच्या बायकोकडे जॅक लावून ठेवला मी , आता सांगीन ती दम्मानी, कस्स ?
संभा: तात्या ,मानल ब्वा तुम्हाला !!!!!!
____***_________***____________***____________***
तात्याने शेतातल इंजिन चालू केल , भल्या थोरल्या पैपामधून पाणी वाफ्यावाफ्यातून चपळ नागिणी
सारख पसरू लागल. भुईतून वर आलेली टवटवीत हिरवागार पोपटी आलेली रोप सकाळची कोवळी उन्ह खात होती
व्यायाम करून दमलेल्या शरीराला तात्याने विहिरीत झोकून दिल
मनभरून पोहून घेतलं ,बाहेर आले ,पंचाने अंग पुसतच
होते तर ,संभ्या लगबगीन ढेकळ तुडवत येताना दिसला
तात्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या " इतक्या सकाळी काय लगबग ?
काय गडबड रे संभ्या?
**__________**__________**__________**_________**_________**
पडक्या देवळाच्या मागल्या अंगाला असलेल्या कवठला महादून गळफास घेतला होता
तात्या हळहळला ..... " अरे मारुतीराया “
बाया बापडे जमा झाल्ये नुसता कल्लोळ !!!कुणाचं बोलनं कुणालाच समजत नव्हत.
एकीकडे महादूच्या घरच्यांनी हंबरडा फोडला होता
तात्या लगबगीन आला तसा जमाव पांगला जरासा ,अन इतक्यात गपकन महादूच्या म्हातारीने तात्याची गच्चांडी धरली कच्चकन !
" मुडद्या तुझ्यापायी माझ तरण - ताठ पोरग गेल रे , किड पडतीन तुला , लई तळ-तळाट लागल तुला भडव्या , तू असा रंडवा ,एकला असाच त्वांड वरती करून जाशीन कुत्रा बी यायचं नाय थुकायला तुझ्यावर !
तात्याला या अनपेक्षित प्रकारामुळे काय बोलाव त्येच सुचत नव्हत .बाकीच्यांनी म्होर होऊन म्हातारीच्या तावडीतून तात्याला सोडवल .तरी म्हातारीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता .
" काय गरज हुत्ती तुला पोलिसांना बोलवायची , ती भाना तोंड वासून गेलीच हुती ना ,मंग ? त्या आऊ पायी माझ पोरग गेल हातच !ना तू पोलिसांना बोलावलं असत न माह्या महाद्याला नेल असत ,ना त्यान कच खाऊन अस जीवाच बर वाईट केल असत, पण तुझ्या $%^$ ला लई खाज . "
तात्याच डोक सुन्न पडल होत , मटकन खाली बसला तात्या ,महादूच्या घरच्यांचा आक्रोश चालूच होता .
“ तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.” डोक्यावरचा पदर सावरत जाता - जाता आक्कीने तात्याला टोमणा मारलाच
परत पोलिसांच्या जीप दाखल झाल्या गावात ..
इन्सपे .काळे ,गायकवाड ,जाधव त्रिमूर्ती हजर झाली होती एका बाज आणून त्यावर महाद्याच प्रेत ठेवलं
त्याच्या तोंडाभोवती माश्या भिन भिनत होत्या ,तात्याने खांद्यावरचा पंचाने महाद्याचा चेहरा झाकला ,सर्व सोपस्कार ,चौकश्या पार पडल्या ,
“पोलीस ठेसनातून आल्यापासून पोरग हिरमुसलच ,ना धड जेवल ना धड बोलल कुणाशी ,वाटलं १०-१५ दिसांनी येईन गाडी रुळावर आपसूक पण त्ये अस काय अभद्र काय करीन अस म्हाईत असता तर लेकाला डोळ्याआड नसता होऊ दिला .....मी .......द्येवा रे द्येवा ........... महाद्या काय केल र तू ,कसा धजला ? रे महाद्या ................”
................
महाद्याची आय रडतच होती ,उर फुटेस्तोवर
महादूच्या आईने पोलिसांवरही चांगले तोंडसुख घेतले होते.
तात्याच डोक गरागरा फिरत होत , आपण पोलिसाना बोलावून खरच चूक तर केली नाही ना ?
इन्सपे काळे : शिंदे तात्या जरा .........................
तात्या अन काळे साहेब आडबाजूला झाले
महिनाभरात घडलेली गावातली ही दुसरी घटना .आधीच भाना प्रकरणात पोलिसांना पाचारण केले म्हणून अर्धा गाव तात्याच्या विरोधात होता .अन आज या महादू प्रकरणामुळे सगळा गाव तात्याच्या विरोधात उभा ठाकला होता .
चार टाळके एकत्र आले कि कुजबुज सुरु
शंकर्या " मला तरी वाटत ह्या पोलिसांनी दट्ट्या लावल्यामुळेच महादून खेळ संपवला कायमचा
भाऊराव : मी काय म्हणतो ,भानाच्या खुनामाधी महादुचा काय हात नसल कशावरून ? म्हणजी त्येचच काय लफड-बिफड तर नव्हत न ? अन आता मग पितळ उघड पडण म्हणून पोलिसांच्या भीतीपायी त्येन अस तर केल नसल ना
नै म्हणजे आपल कवाधरण भुंगा वळवळतोय डोस्क्यात म्हणून ना म्हाद्याची बायकू नांदत हुती, ना, भानाचा नवरा तीच्याबारुबर नीट व्हता थोडक्यात काय त्ये समजून घ्या ना राव !
रशीद : " एय तू चुप्प कर ना बे ,अपना दिमाग नको लगाऊ किधर बी ,किधर वो भाना अन किधर अपना महादू, काडी की अक्कल नै तेरेकू चुप्प कर !
शंकर्या " त्येच म्हणतो मी भाना काय इतकी साधीसुधी हुती का ? इतकी तरणीबांड ,उफाड्याची अर्धा गाव तिच्या पाठीमाग ,अन ती महाद्याला घास तरी टाकण का ? श्या ...मला तर तर दुसराच काळ- बेर वाटत .
दुपारी तात्या इन्सपे. काळेशी बोलला तेव्हढाच नंतर तात्याने दिवसभर तोंडाला कुलूप लावलं त्ये लावलच .तात्याला सारखी अपराधीपणाची भावना बोचत होती आपण खरच पोलिसांना बोलावून चूक केली की काय ,? गावातल्या गावात पंचायतीत मिटवला असत ह्ये प्रकरण तर आज महादू जित्ता असता
डोक्यात नुसती विचारचक्र ,एखाद्या वावटळीत सापडून जीव गुदमरावा अस काहीस झाल होत तात्याच
“ना धड ह्या थडाला ना धड त्या थडाला “अशी काहीशी गत झाली तात्याची !
महादू नावाचा एकच धागा होता ,ज्याला पकडून काही अंदाज / पडताळे बांधता आले असते तो धागाही निसटला होता हातातून ,साध्या वेशातले पोलीस महादूच्या मागावर होते हे फक्त अन फक्त तात्यालाच ठाऊक होते ,दिवस रात्र कानोसा घेऊनही कुणाच्याच हाती काही लागल नाही .तात्या तर तात्या पोलीसही हात हलवतच फिरत होते गेला महिनाभर !
तात्याची मती भंग झाली होती .खुनाचा तपास तर लांबच राहिला ,पण हे अघटीत कशामुळ घडलाय नक्की याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता गावात एक प्रकारची भयान अवकळा पसरली होती ह्या प्रकरणाची चांगलीच धास्ती घेतली होती समद्यानी , भीतीचे सावट पसरले होते गावात , एक एक रात्र वैरयाची असल्यासारखी भासत होती.
रशीद : तात्या मेरेको लगता ,महादू कूच जाणता था , या फिर्र उसकू कोई तो भी टोचण लगाया होएंगा ,"तुने मुह खोला तो तेरी खैर नै करके "मेरी दुकान पे आता था कधी मधी ,पण जब से वो पुलिस का राडा हुवा ना तबसे एकदम चिडीचुप्पच हो गैला था वो , “ चार आणे कि हो या आठ आणे कि “अपनी जिनगानी प्यारी रैती सबकु , ऐसा कायकू करींगा कोई फोकट मे?
शंकर : एकदम !!! पॉइंट हाय रे तुझ्या बोलण्यात !
तात्या : कस हाये , या दगडाखाली बर्याच जनाची बोट गुतलेली हायेत , पण नेमकी ही खेळ - पत्री कोण करतंय ह्ये समजल ना तर अख्खाच्या अख्खा सोलून काढीन मादरचोतला !
**______**_______**_______**_______
अख्खा गाव जरी तात्याच्या विरोधात असला तरी संभा,शंकर,रशीद अन भाऊराव ह्या खास माणसानी तात्याची साथ सोडली नाही .इतका वेळ शांत विचार करत बसलेला तात्या अचानक बाजेवरुन उठला पायात चपला अडकवल्या ,तसे बाकीचे उभे राहिले.
संभा : तात्या कुठ ? त्ये बी ह्या वक्ताला ?
तात्या : येणार हैस का ? असशील तर गप गुमान चाल जास्ती चवकश्या नको
हम्म ... संभा पाठोपाठ शंकर अन रशीद पण उठले .
भाऊरावच्या जीवावर आलेलं ,इतक्या रातच्याला ?
हम्म्म .. दोन्ही हात पसरून आळस देऊन भाऊराव उठला, " कुणाची म्हैस अन कुणाला उठबैस “
म्हणत तात्या पाठोपाठ तोही गपगुमान चालू लागला .
क्रमश :
प्रतिक्रिया
13 Apr 2012 - 11:44 am | प्रचेतस
हा भाग खूपच उशिराने आलाय पण जमलाय एकदम फक्कड.
गाववाल्यांचे संवाद चांगले रंगवलेस, रहस्य पण चांगलेच गडद झालेय.
पुढचा भाग लवकर येऊ देत आता.
13 Apr 2012 - 12:27 pm | पियुशा
वर लेखात दिलेल्या भागांच्या लिंक्स माझ्याकडुन गंडल्याने ,
वाचकाकरीता हा आधीच्या भागांचा दुवा :)
http://www.misalpav.com/node/19755 भाग -१
http://www.misalpav.com/node/19858 भाग -२
13 Apr 2012 - 12:04 pm | किसन शिंदे
मस्त रंगवलाय हा भाग पण..
13 Apr 2012 - 12:11 pm | इरसाल
बरोबर..........
पण पाणी पडुन रंग फिके व्हायच्या आत दुसरा हात फिरवा म्हणजे झाले.
13 Apr 2012 - 12:18 pm | नगरीनिरंजन
संवाद फारच चांगले जमले आहेत.
पु.भा.प्र.
13 Apr 2012 - 12:38 pm | यकु
अरे ही तर वेगळीच स्टोरी दिसतीय
..
मला वाटलं जी लेने दो चा भाग आहे की काय.
चला आता आधीचे भाग कुठे मिळतात ते पहाणे आणि वाचणे आले ;-)
13 Apr 2012 - 1:31 pm | मुक्त विहारि
सगळे भाग वाचुन झाले की मग प्रतिसाद देईन...
13 Apr 2012 - 1:57 pm | स्मिता.
हा भाग एकदम झाक झालाय. रहस्य वाढलंय आणि पुढच्या भागाची उत्सुकतासुद्धा!
आता पुढचा भाग टाकायला एवढा वेळ घेऊ नकोस, पटापट लिही.
13 Apr 2012 - 2:21 pm | ५० फक्त
मस्त झाला आहे हा भाग पण .
13 Apr 2012 - 3:46 pm | सस्नेह
>>>>>रोजच मढं त्याला कोण रडं "
तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.”
कुणाची म्हैस अन कुणाला उठबैस “<<<<<
वा, म्हणी बाकी एकदम फ्रेश काढल्याहेत हां शोधून. माझ्या संग्रहात मोलाची भार पडली आहे, पिवशा, थँक्स.
भाग छानच जमलाय. गावरान भाषेचं वळण अगदी तंतोतंत !
13 Apr 2012 - 8:01 pm | पैसा
बरेच दिवसानी भाग आला पण गुंगवून ठेवणारा झालाय!
13 Apr 2012 - 11:16 pm | पांडू पाटील
ए पोरी,
झ्याक जमलयं येकदम पन,
हबक आता लै येळ घालवु नगसं फुडचा येपीसोड टाकया.....डोकं भंजाळाला लागलयं फुड काय व्हनार तेचा इचार करुन्....पट्टदिशी फुड्चा येपीसोड टाक बगू शान्या पोरिवानी.....
15 Apr 2012 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर
मनाची पकड घेणारे वजनदार लेखन केले आहे. अभिनंदन.
रोजच मढं त्याला कोण रडं
तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
कुणाची म्हैस अन कुणाला उठबैस
जुन्या (शहरात) वापरात नसलेल्या म्हणींना उजाळा मिळाला. त्याने वाचनातली लज्जत अधिकच वाढली.
फक्त एक विनंती. (वर अनेकांनी केली आहेच, तिच.) मागचा भाग विस्मरणात जायच्या आत पुढचा भाग टाकावा.
6 Dec 2012 - 5:48 pm | सुधीर१३७
दर वर्षाला एक किंवा दोन भाग असे काही ठरविले आहे का?
भाग ४ ......................?????????????????????
२०१३ मध्ये????????????????????????????