नोंदः सध्या मिपावर चालू असलेला कविता, नवकविता आणि विडंबनाच्या जिलब्यांचा पाऊस पाहून आम्ही ही बरेच दिवस आधी पाडलेली ब्लॉगवरील जिलबी सादर करीत आहोत.
वृत्त- स्रग्धरा.
कंटाळा पूर्ण पाळा, वळवळवळिता , रोडका होशि बाळा |
देहाचा सान गाळा, शिणवुनि विरळा, का करावा कृपाळा?
लागावा छान चाळा, बघत बस नळा, तोय वाहे खळाळा |
किंवा येंगोनि माळा, सकलहि झुरळां, मारि रे चंडकाळा ||१||
वृत्त- शार्दूलविक्रीडित.
चित्ती नाद उठे मनी पुटपुटे, आलस्य हे गोमटे |
कैसा दीस उठे व रातहि कटे, दोघे जसे भामटे |
तोंडीची जरि मक्षिका नच फुटे , तादात्म्य वाटे, पटे |
जे कोणी दिवटे जगात फुकटे, हे त्यांपरी ओखटे ||२||
वृत्त- उपजाति.
आलस्य आहे जगतात थोर |
तयाविना विश्व पुरे असार |
तयाविना कार्य महत्वहीन |
तेणेगुणे शीण नसे “रुटीन”||३||
वृत्त- उपजाति.
म्हणाल का लावियले पुराण?
उपाय जो ह्यावरि रामबाण |
तो ऐकता सोडुनिया उसासे |
आलस्यभृत्यांत जावे अपैसे ||४||
- कंटाळा ब्लॉग चे प्रेरणे बद्दल आभार.
आणि सरतेशेवटी -
वृत्त- द्रुतविलंबित.
न कळता पद अग्निवरी पडे| न करि दाह असे न कधी घडे |
अलस नाम वदों भलत्या मिसें| सकल कार्यचि भस्म करीतसे||५||
– श्री .वामन नरहर शेषे, राहणार कोरेगाव कुमठे (सातारा) , यांची क्षमा मागून (!)
प्रतिक्रिया
29 Mar 2012 - 1:24 pm | निश
बॅटमॅन साहेब , मस्त मस्त मस्त कविता
कंटाळा पूर्ण पाळा, वळवळवळिता , रोडका होशि बाळा |
देहाचा सान गाळा, शिणवुनि विरळा, का करावा कृपाळा?
लागावा छान चाळा, बघत बस नळा, तोय वाहे खळाळा |
किंवा येंगोनि माळा, सकलहि झुरळां, मारि रे चंडकाळा
ह्या ओळी अफाट आहेत.३
तुम्हाला हात जोडुन नमस्कार.
मस्त कविता
29 Mar 2012 - 1:26 pm | पैसा
कंटाळा कविता वृत्तात बांधून आवडली!
29 Mar 2012 - 1:30 pm | प्रचेतस
लै भारी.
29 Mar 2012 - 2:47 pm | शैलेन्द्र
तुम्ही हल्ली एकालाही सोडु नका.. मला वाटत प्रोग्रॅमच बनवुन टाकलाय.. आला नविन माल कि टाक
29 Mar 2012 - 2:51 pm | प्रचेतस
अहो प्रतिसादच टाकतोय, विडंबन नाही.
29 Mar 2012 - 1:38 pm | सांजसंध्या
___/\___
29 Mar 2012 - 1:55 pm | रसप
छान!
29 Mar 2012 - 3:38 pm | विदेश
झकास आहे !
29 Mar 2012 - 7:22 pm | मनीषा
वृत्तबद्ध जिलब्या छान आहेत.
त्यातही शार्दुलविक्रिडित मधील 'आलस्य' पुराण फार आवडले.
29 Mar 2012 - 7:39 pm | जेनी...
चवदार जिलबि...:D
29 Mar 2012 - 7:52 pm | नरेंद्र गोळे
जेथे वाघळास१ कळले वृत्तांत२ सारे कसे
जेथे आळश्यास३ स्फुरले फुलोर साहित्य हे
जेथे नांदती सरससे राजे४ इथे आळशी
तेथे मी खुशाल५ करतो त्यांची इथे संस्तुती
१ वाघुळ म्हणजे वटवाघुळ. पक्षी बॅट, बॅटमॅन.
२ मराठी अलंकारांतील छंद आणि वृत्ते अंतापर्यंत जाणून घेतल्याने मिळालेले ज्ञान.
३ आळशीपणाचा गौरव मानणार्याच्या आसपासही काव्य-निर्मितीचा हुरूप फिरकू नये. त्यातून अनवधानाने सृजन झालेच!
४ त्यात ह्या संकेतस्थळावर “आळशांचे राजे”ही आहेतच, तेव्हा अनवधानाने कधी राजनिर्मिती होईल हे सांगता येत नाही.
५ म्हणून मी निश्चिंतपणे त्यांच्या काव्यास संस्तुत (पक्षी वाचण्याकरता रेकमेंड) करत आहे.
29 Mar 2012 - 8:49 pm | बॅटमॅन
कंटाळा डीटेलवारी व्यक्त केल्याबद्दल अनेक धन्यवादगळु बरं का गोळेसाहेब :)
29 Mar 2012 - 8:04 pm | यकु
उरी कळवळा वाहे खळखळा देखोनी तव लिळा रे सूज्ञ बाळा, शब्द येती भळभळा! ;-)
29 Mar 2012 - 8:48 pm | बॅटमॅन
कंटाळ्याचा चाळा हा पाळा तीच साची लीळा बाकी नुसता मेंदूस पडलेला पिळा ;)
29 Mar 2012 - 8:51 pm | यकु
कंटाळा तो खुळा करीतसे वळवळा पाडोनी मेंदूस पिळा, हुळहुळा, हुळहूळा!! ;-)
29 Mar 2012 - 8:17 pm | सुहास झेले
अरे देवा....मिपाला झालंय काय? आधी कविता आणि मग त्या कवितांचे विडंबन .... डोळे पाणावले ;)
अवांतर - वृत्तात कंटाळा अप्रतिम बसलाय :) :)
29 Mar 2012 - 8:52 pm | बॅटमॅन
कंटाळ्याचा पुरस्कार न कंटाळता, न टाळता केल्याबद्दल घ्या टाळी सकळही :)
29 Mar 2012 - 8:58 pm | यकु
या काव्यरसाने ओथंबलेल्या रसिकांच्या उपस्थितीत बॅटमॅन यांना कुमठे मुक्कामी मिपाचे 'चोरोपंत'* अशी पदवी पुणेरी पगडीसह देण्यात येईल ;-)
*(वाचकांचा कंटाळा चोरणारे म्हणून ;-) )
29 Mar 2012 - 9:02 pm | बॅटमॅन
चोरोपंत!!! वा वा वा थ्यांकु हो यक्कुशेठ थ्यांकु थ्यांकु :)
अवांतरः
आमचे हे असले उद्योग पाहून आमच्या येका मित्रवर्यांनी आम्हांस कधीकाळी पदवी दिली होती त्याचे स्मरण जाहले. ती पदवी होती "यमक हराम" :D
29 Mar 2012 - 9:05 pm | यकु
"यमक हराम"
___/\___ !!!!
___/\0_ !!!
29 Mar 2012 - 9:10 pm | बॅटमॅन
तेच तर, अस्मादिकांची प्रतिक्रिया तीच होती त्यावर :)
30 Mar 2012 - 6:45 pm | अत्रुप्त आत्मा
@ती पदवी होती "यमक हराम" >>> निर्वाण पावलो आहे...
30 Mar 2012 - 7:06 am | जोशी 'ले'
लय म्हंजे लय भारी राव
30 Mar 2012 - 10:28 am | अविनाशकुलकर्णी
मस्त मस्त...मजा आली वाचताना