शब्द...!

वेणू's picture
वेणू in जनातलं, मनातलं
24 Mar 2012 - 1:21 pm

सुटीची मस्त सकाळ म्हटलं की हातात वाफाळत्या चहाचा कप आणि समोर वृत्तपत्र, ठरलेलंच!!
"घरकाम होत राहतील आरामात" कसली घाई नाही, गडबड नाही हा आल्हाददायी विचार करत पहिला घोट घेतला अमृततुल्याचा- चहाची चष्म्यावर आलेली वाफ साफ करत, वृत्तपत्रात घातलं डोकं...

'पुंजके' नावाचा स्तंभलेख वाचताना,
सुधीर मोघे म्हणतात- येथे रेंगाळले, ओळी सुंदरच होत्या,
"शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते,
वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते!"

वाचन खुंटलं इथेच... खरंच शब्द म्हणजे नक्की काय, नितळ पाणी? भावनांचा रंग मिसळला की तेच भाव व्यक्त करणारे! ते स्वतःच खूप काही बोलतात, आपण व्यक्त होताना त्यांचा अजून खुबीने वापर केला की त्यांचं सौंदर्य अजूनच खुलतं- जणू एक एक शब्द म्हणजे दागिना, तो व्यक्त होणार्याु सौंदर्यवतीने चढवावा अलवार, अंग- प्रत्यंगाचं सौंदर्य लाखपटीने नाही वाढलं तर बोलावं!!!

आज "शब्दावर" घ्यावं लिहायला.... खरंच! स्वतःशी ठरवत, वृत्तपत्र बाजूला सारत जरा सैलावून बसले, आज लिहावंच खरं...

इकडे मनात, उत्स्फूर्त टाळया मारत जमलेली शब्दांची मैफिल ताडकन सावध झाली....

कुणकुण : जरा, गप्पा - टाळ्या थांबवा, ती काहीतरी ठरवत आहे
व्यासंग : हो, तिचा 'शब्दांवर' लिखाण करायचा विचार सुरू आहे
अहं : करु देत की मग, आपण आहोतच श्रेष्ठ, प्रत्येकाने लिहायलाच हवं आपल्याबद्दल.. आपल्यावाचून पानही हलत नाही, आपले उपकार नकोत मानायला?
निर्मोही : आपल्यावर? अरे आपण बापडे कोण लागून गेलो, आपण 'जा, वाक्यात अमूक जागी जाऊन बसा" म्हटलं की जाणारे... आपल्यावर कसलं आलंय लिखाण?
बंडखोर : ए चला, आपण सारे निघून जाऊया, थोडावेळ दूर!! आज ती काम करताना बरंच सुचेल तिला काही-बाही त्या आधी निघूयातच.. उठा
कुरघोडी : हो! आपणच नसू तर कसले आलेय लिखाण, कसले ते व्यक्त होणे, चला निघूया
खंबीर : का तिच्याशी असे वागता. मी येत नाहीये.
भटकंती : फिरलो नाहीये गेले कित्येक दिवसात, तिच्याच दिमतीला आहोत, दमलोय आता- चला निघूचयात..
कूच : या माझ्या मागून....

ज्यांच्यावर लिहायला घ्यावं, तेच रानोमाळ परागंदा झाले, माझ्याच समोर!

कामाला लागले, ते करण्यावाचून पर्यायही नव्हता....
तास, दीड तास...

मनाच्या तळाशी काही दूर्लक्षित शब्दांची हालचाल जाणवली...
एक- एक सारे हळूच मनःपटलावर येऊ लागले....
ह्यांनाच घेऊन लिहावं का? निवडावेत पण जरा... काही जीर्ण, काही उदास, काही मरगळलेले कुणी उगाच मलूल- हे नकोत सध्या, काही काळ...

निवडून एकेकाला टोपलीत भरत गेले, त्यांनाच नंतर सुसंबद्ध गोवून काहीतरी छानसं लिहावं, ह्या हेतूने!
बघता- बघता माझी टोपली भरली... आता ते ओसंडून वाहू लागले, त्यांना थोपवून धरावं म्हणून दोन्ही हात सरसावले... तसा, 'स्पर्श' अगदे उडी मारून बाहेर पडला, चालू लागला..
मी :अरे, अरे जरा थांब, का निघालास?
स्पर्श : तू हात लावून माझ्या अर्थाची भावना प्रत्यक्षात पोहोचवलीस, माझी गरज संपली
'ऊबेनीही' उडी मारत स्पर्शाचेच अनुकरण केले..
मी कारण विचारताच, म्हणाली
ऊब : तुझ्या स्पर्शानेच माझा अर्थ थेट पोहोचतोय, मी का हवी इथे?

मागोमाग माया, आपुलकी, प्रेम, वेड, लोभ, उल्हास, स्फूर्ती, आनंद, अपेक्षा आणि मी निवडलेले सारे सारे पडले बाहेर, मला मन मानेल ती कारणे देत.....

पुन्हा टोपली रिकामीच!!!

..... आज मला शब्द वश नव्हतेच!

-बागेश्री
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रास's picture

24 Mar 2012 - 1:27 pm | प्रास

छान लिहिलंय की!
शब्दांवर विचार करताना शब्दांच्याच प्रतिक्रियांवर आधारित शब्दांनीच लिहिलेलं लेखिकेच्या मनोभावनेची उत्तम व्यक्तावस्था दर्शवणारं मुक्तक आवडलंय आपल्याला.....

डॉ.श्रीराम दिवटे's picture

24 Mar 2012 - 3:47 pm | डॉ.श्रीराम दिवटे

अक्षरांपुढे अक्षर आले की शब्द बनतो. अक्षराच्या प्रत्येक जोडणीला काही ना काहीतरी अर्थ असतोच. त्या अर्थाने ध्वनित होतो तो शब्द. असे अनेक शब्द असले तरी नेमक्या शब्दापुढे नेमका शब्द ठेवला नाही तर अनर्थ निघतो. शब्दांची यथासांग मालिका निर्माण करता येणे हे कसब अंगी बाणावे लागते, तेव्हाच एखादं लेखन घडतं. हे सुचणं बरचसं मूड वर अवलंबून असल्याने शब्द सुचत नाहीत असा भ्रम होतो. बाहेर एखादी चक्कर मारून आल्यावर बरंच काही लिहिता येऊ लागतं असा बहुतेकांचा अनुभव आहे.

जाई.'s picture

24 Mar 2012 - 3:56 pm | जाई.

लिखाण आवडल

सुन्दर! आज तुम्हाला शब्द वश झाले.
आवडल.

कवितानागेश's picture

25 Mar 2012 - 1:32 am | कवितानागेश

सुंदर लेखन.
अजून येउ दे..

वेगळ्या धर्तीच लिखाण !
सुरेख.

सर्वांचे मनःपूर्वक आभार! :)

सुन्दर! सकाळ सकाळी विचाराना सुरुवात करणारा ले़ख,
धन्यवाद

पैसा's picture

26 Mar 2012 - 9:33 am | पैसा

कल्पनेसाठी १००/१००! बाकीचे लेखनासाठी.

वेणू's picture

27 Mar 2012 - 12:46 pm | वेणू

धन्यवाद! :)

मन१'s picture

27 Mar 2012 - 1:42 pm | मन१

पण शब्दाचा स्फोट झाल्याशिवाय त्यातून अर्थ बाहेर पडतच नाही हेही खरे.