"माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दाचा उद्दा नक्कीच ग्रेट असणार.ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार."
त्यादिवशी तळ्यावर मी प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो.नेहमीच्या वेळेवर प्रोफेसर काही आले नाहीत त्यावेळी मी समजलो की आता जास्त वेळ त्यांची वाट बघण्यात अर्थ नाही.म्हणून मी उठतो उठतो तोच त्यांचा नातु माझ्या मागे उभा असलेला दिसला.
मला म्हणाला,
"काका,आजोबाना आज जरा बरं नाही,तुम्ही त्यांची वाट बघत राहाल म्हणून मला त्यानी तसा निरोप द्दायला तुमच्याकडे पाठवलं आहे."
बरेच दिवसानी त्यांच्या नातवाची आणि माझी भेट झाली.
काय कसं काय चालंय वगैरे विचारून झाल्यावर माझ्याशी विषय काढत म्हणाला,
" तुम्हाला माझ्या मनात आलेला विचार सांगायचा आहे."
मी मनात म्हणालो बापरे, भाऊसाहेबांचा नातु पण आजोबा सारखाच विचारी वाटला.रक्ताचा अस्रर कुठे जाणार म्हणा.
"खरं म्हणजे मी हे माझ्या आजोबांशीच डीसकस करणार होतो.पण म्हटलं तुम्ही आणि आजोबा नेहमीच काही ना काही तरी डीसकस करत असताच मग तुम्हाला माझा विचार सांगून तेव्हडंच होणार आहे."
मी त्याला म्हणालो,
"ऐकुया तर काय तू म्हणतोस ते"
त्यावर मला म्हणाला,
"काका,परवा दिवशी रात्री, ह्या शनिवार,रविवारी काय करायचं,कुणा मित्राकडे जायचं वगैरे वगैरे गोष्टींचा मी विचार करीत असताना,माझे आईवडील काही तरी माझ्या विषयी डीसकस करीत होते ते माझ्या कानावर पडलं.
माझे वडील थोडेसे अपसेट झालेले दिसले.म्हणजे ते नेहमीचं बोलणं जे आईवडील आपल्या मुलांबद्दल करतात, आणि त्याबाबत काळजीत असतात,जसं मी कोणत्या कॉलेजमधे जावं,घरापासून कॉलेज किती दूर असावं,आणि खर्च किती यावा अशा पैकी नव्हतं."
मी म्हणालो,
" अरे,तू तर प्रो.देसायांचा नातू.तू त्यांच्या सारखाच हुशार असणार.त्यामुळे तुझ्या बाबतीत हेच विषय जास्त डीसकस केले जाणार नाही काय?"
त्यावर मला म्हणतो कसा,
" नाही,नाही,ऐका तर खरं. हे सगळं जगावेगळंच होतं.
वडील आईला वैतागून म्हणत होते,’ आमच्या पश्चात आणि आम्ही जाता जाता आमची पिढी ह्या नव्या पिढीला कसलं जग देवून जात आहे? पुढचे ह्यांचे दिवस महा कठीण आहेत भविष्यपण दारूण आहे.’ जणू आमच्या ह्या पिढीला भविष्यच नसणार असा काही तरी त्यांचा त्रागा होता."
ज्या अविर्भावात तो मला सांगत होता ते बघून मला त्याचं खरंच कौतुक वाटत होतं.
मला पुढे कसा म्हणतो,
"मी खरा आमच्या गेस्ट रूम मधे बसलो होतो,आणि तिकडून हा त्यांचा वैताग माझ्या कानावर पडत होता.आणि काका, मी तुम्हाला गम्मत सांगतो,हे ऐकत असताना माझं लक्ष माझ्या आजीआजोबांच्या फोटोवर केंद्रीत झालं होतं.तो आजोबांचा टाय,सूट,बूट घातलेला प्रोफेसरांचा वेष,आणि त्याच्याच बाजूला माझ्या पणजोबा-पणजीचा फोटो,त्यात माझ्या पणजोबांचे ती डोक्यावर पुणेरी पगडी एका कानात बिगबाळं,भरपुर मिशा,घट्ट गळ्याचा कोट,त्यावर सफेद उपरणं आणि खाली स्वच्छ मसराईझ्ड धोतर,त्याउप्पर जावून त्यांच्या तोंडावर दिसणारं ते समाधान पाहून मला खूपच धीर आला.
माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दाचा उद्दा नक्कीच ग्रेट असणार.
ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार.त्या त्यांच्या फोटोनी मला असं कां वाटावं, ते समजायला एक प्रकारची मदतच केली आहे."
मला ते त्याचं म्हणणं ऐकून खूप कुतुहल वाटलं.ओघानेच मी त्याला म्हणालो
"का रे,सांग बघू!"
मला म्हणाला.
"सांगतो ऐका. माझ्या आजीआजोबांच्या आणि पणजीपणजोबांच्या वेळी झालेल्या गंभीर आणि नुकसानदायी घटनांचा मी विचार केला.
दोन जागतिक युद्धं,ऍटॉमीक बॉम्बस,महाभयंकर रोगाच्या सांथीतून झालेला संहार,आणि बरोबरीने चांगल्या गोष्टी पण त्यानी पाहिल्या.दोन्ही महायुद्धांचा शेवट,रोगावर निरनिराळी व्हयाक्सीन्स,रेडिओचा शोध,विमानाचा शोध,असल्याही गोष्टी त्यानी पाहिल्या आहेत."
मी म्हणालो,
"मग आता,तुला तुझ्या जगात काय चांगल्या गोष्टी दिसणार ह्याचं भाकित काय आहे ते तर ऐकूया"
मला म्हणाला,
"हा तुमचा प्रश्न मला आवडला.माझ्या आजोबानी पण असाच प्रश्न विचारलेला असता.
मला वाटतं माझी पिढी एडसवर जालीम औषध,कॅन्सरचा निप्पात, कदाचीत जगात शांती येईल,मंगळावर माणूस,असल्या गोष्टी पाहील.
आता हेच बघा,माझ्या आजोबाना माझ्या आताच्या वयावर म्हणजे सोळा वर्षावर चंद्रावर माणूस जाईल हे विचारात आणणं देखील शक्य नव्हतं, तसंच माझ्या वडिलांच्या सोळाव्या वर्षी इंटरनेटचा विचार सुद्धा त्याना शक्य नव्हता."
काका,मी ज्यावेळी लहानपणी एखाद्दया दिवशी थोडा नर्व्हस असायचो त्यावेळी माझे बाबा माझ्या खांद्दावर अलगद प्रेमाने हात ठेवून म्हणायचे ’द्दाटस ओके, उद्दाचा दिवस नक्कीच तुला बरा जाईल.’मी त्यांना म्हणायचो कशावरून?त्यावर ते म्हणायचे’मला तसं वाटतं त्यावरून!’ मी त्यांच्यावर विश्वास ठेवला.माझ्या पणजोबांचा असाच विश्वास असावा,माझ्या आजोबांचा पण असाच विश्वास असावा,आणि आता माझा पण."
उशिर होत आहे असं पाहून जाता जाता तो मला म्हणाला
" मला आणि माझ्या पिढीला काय भविष्य असावं ह्याचा त्या रात्री कष्टी होवून विचार करताना माझ्या आईबाबाना पाहून मला क्षणभर वाटलं काका,मीच बाबांच्या खांद्दावर हात ठेवून म्हणावं,
"द्दाट्स ओके बाबा,नका वरी करू! उद्दा नक्कीच चागलं असणार’"
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
29 Jul 2008 - 8:19 am | दोयल
छान लिहिले आहे. असाच आशावाद सर्वांनी दाखवला तर खरच उद्या चांगला असेल..