बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली
(आमची प्रेरणा: उषःकाल होता होता काळरात्र झाली ! )
बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली
अरे, चला विश्वासाच्या पेटवा मशाली !
कुण्या चार खासदारांची आस मी धरावी ?
वोट कोण देई; कुणाची वाट मी पहावी ?
कसा मोहनाचा जीव, होई वर-खाली !
कसा घाव करिती `फिरुनी' विळा नि हातोडा
खाई भाव बाजारात, लंगडा ही घोडा
घरावरची साधी कौले, सोनियाची झाली
तिजोर्यात भरले `त्यानी', पंचवीस कोटी
हाती आमुच्या रे `व्हीप'; नशीबेच खोटी
आम्ही ती दुकाने, जी रे, दिवाळ्यात गेली!
अशा कशा ज्याच्या त्याच्या वाढल्या उमेदी?
विकाऊच जो तो; म्हणतो करा मज खरेदी ?
लोकशाही शरमून गेली; माजली दलाली !
`खास-दार' उघडून देती, मते बंदिशाला
तारण्यास सरकाराला गुन्हेगार आला !
म्हणू देश दुर्दैवी की `अणू' भाग्यशाली !
लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम'
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
-अविनाश ओगले
प्रतिक्रिया
27 Jul 2008 - 8:36 pm | केशवसुमार
ओगलेशेठ,
एकदम झकास..
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
हे खासच..
ह्या पुढार्यांना कधी लाज वाटणार आहे कोण जाणे..
(शर्मिंदा) केशवसुमार..
27 Jul 2008 - 9:50 pm | मिसळपाव
सुंदर जमलंय म्हणू की पहिल्या-दुस-या कडव्यानंतर नकळत मूळ गाण्यासारख्या ओळी वाचायला लागलो आणि सगळं वाचून झाल्यावर सुन्न झालो ते सांगू? फार पूर्वी एक रेखाचित्र पाहिलं होतं त्याची आठवण झाली - एका लहान मुलाचा दु:खी चेहेरा नी एका डोळ्यातून ओघळणारा अश्रू. चित्र छान जमलंय वाटण्यापेक्षा त्या मुलाची वेदना चटकन् खोल कुठेतरी जाणवली.
हि कविता वाचल्यावर आत्तापण तसंच झालं. विशेषतः शेवटचं कडवं. सेनापती बापटांवर पु.ल. नी लेख लिहिला आहे (बहुतेक 'गुण गाइन आवडी' मधे) त्यात शेवटचं वाक्य आहे तेच खरं - "आपण आपले डोळ्यांवर कातडे ओढित नाही तर पांघरत, जगत जगत राहू या"
27 Jul 2008 - 10:54 pm | मानस६
बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली....भन्नाट आहे
-मानस६
28 Jul 2008 - 12:11 am | फटू
सुंदर... तुझी "पाऊस" ही अशीच मनाला भिडली होती...
लिवते र्हवो...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
28 Jul 2008 - 1:03 am | विष्णुसूत
मस्त जमली आहे... गाता येइल येवढे यमक जमलं आहे...
रेकॉर्ड करा लवकर... येणार्या निवडणुकित नक्की वापरता येइल !!
28 Jul 2008 - 1:50 am | भडकमकर मास्तर
`खास-दार' उघडून देती, मते बंदिशाला
तारण्यास सरकाराला गुन्हेगार आला !
म्हणू देश दुर्दैवी की `अणू' भाग्यशाली !
खास दार आणि म्हणू अणू ... हे लै आवडले...
उत्तम गेयता जपलेले विडंबन
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
28 Jul 2008 - 3:35 am | सुवर्णमयी
विडंबन आवडले.
मस्तच.
शुभेच्छा
28 Jul 2008 - 3:44 am | गुंडोपंत
अशा कशा ज्याच्या त्याच्या वाढल्या उमेदी?
विकाऊच जो तो; म्हणतो करा मज खरेदी ?
लोकशाही शरमून गेली; माजली दलाली !
सुरेख!
उमेदी या शब्दाचा शब्दाचा त्याचवेळी कवितेत त्यातून दिसणारा अनर्थ हा विरोधाभास भिडला.
म्हणू देश दुर्दैवी की `अणू' भाग्यशाली !
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
हे भडकमकर मास्तर आणि केसु म्हणालेच आहेत खास, तेच!
आपला
गुंडोपंत व्यथीत
28 Jul 2008 - 7:32 am | संदीप चित्रे
विडंबन मस्त आहे :)
>> राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
>> संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
खूपच आवडल्या ह्या ओळी.
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
28 Jul 2008 - 8:00 am | अरुण मनोहर
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
गांधीजींचे नांव जपणार्यांनीच आज ही वेळ आणली आहे.
विडंबन छान जमले आहे. (म्हणजे कवीला. राजकारण्यांनी केलेल्या विडंबना विषयी नाही म्हट्ले!)
28 Jul 2008 - 8:07 am | विसोबा खेचर
लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम'
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
क्या बात है ओगलेशेठ! लै भारी....!
28 Jul 2008 - 9:31 am | अमोल केळकर
मस्त आहे विडंबन
आवडले
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
28 Jul 2008 - 12:31 pm | नंदन
प्रासंगिक विडंबन आवडले. खास-दार, राम आणि वाम मस्तच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Jul 2008 - 2:03 pm | प्रसाद लुले
फारच छान!!!!!
28 Jul 2008 - 2:49 pm | नरेंद्र गोळे
कोण म्हणते दर्जेदार विडंबने होत नाहीत? ह्या इथे आहेत. या! पहा!!
अविनाश, अप्रतिम विडंबन. सुंदर शब्दरचना, 'काळ'कर्त्यांची सडेतोड भाषा आणि नेमकी, मोजकी अभिव्यक्ती.
प्रचलित घटनांवर केलेले भाष्यही समर्पक आहे. छानच.
झकासच. मनःपूर्वक अभिनंदन. आणि ज्या मिसळपावमुळे मला हे वाचण्यास मिळाले त्या मिसळपावाचेही अभिनंदन.
28 Jul 2008 - 3:48 pm | नारदाचार्य
या विषयावरच्या एखाद्या वृत्तपत्रीय संपादकीयापेक्षा सरस टिप्पणी. अभिनंदन.
28 Jul 2008 - 4:17 pm | स्वाती दिनेश
प्रासंगिक विडंबन आवडले.
या विषयावरच्या एखाद्या वृत्तपत्रीय संपादकीयापेक्षा सरस टिप्पणी. अभिनंदन.
हेच म्हणते.
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
हे फारच चपखल!
स्वाती
28 Jul 2008 - 9:28 pm | झकासराव
सुंदर जमलंय म्हणू की पहिल्या-दुस-या कडव्यानंतर नकळत मूळ गाण्यासारख्या ओळी वाचायला लागलो आणि सगळं वाचून झाल्यावर सुन्न झालो ते सांगू? फार पूर्वी एक रेखाचित्र पाहिलं होतं त्याची आठवण झाली - एका लहान मुलाचा दु:खी चेहेरा नी एका डोळ्यातून ओघळणारा अश्रू. चित्र छान जमलंय वाटण्यापेक्षा त्या मुलाची वेदना चटकन् खोल कुठेतरी जाणवली.>>>>>>..
अगदि हेच म्हणतो. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
28 Jul 2008 - 9:37 pm | चतुरंग
अविनाशराव, ह्याला विडंबन म्हणू की नको अशी द्विधा अवस्था आहे, आधारित काव्य जास्त योग्य ठरावे.
फारच थेट आणि मार्मिक भाष्य करणारी कविता.
लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम'
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
हा कळस आहे! हॅट्स ऑफ!!
चतुरंग
29 Jul 2008 - 2:55 am | llपुण्याचे पेशवेll
खरेच छान काव्य.. आणि प्रत्येक शब्द मूळ काव्यासारखा काळजाला भिडणारा.
पुण्याचे पेशवे
28 Jul 2008 - 9:50 pm | कैलासराजा
अविनाश जी झकास.......
कवी अवि रायाचे वाचुन विडम्बनगान.....
धन्य जाहली तनू आमूची ,धन्य जाहले कान......
सुन्दर्...लिखते रहो.......
28 Jul 2008 - 11:42 pm | सर्किट (not verified)
ओगलेसाहेब,
ह्या विडंबनाचे मोठ्ठे प्रिंट ऑट घेऊन संसदेत लावावे, असे वाटते.
- सर्किट
29 Jul 2008 - 12:48 am | प्राजु
लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम'
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
हे खूप परिणामकारक झाले आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Jul 2008 - 10:46 am | मनिष
फारच छान!! एखाद्या वर्तमानपत्रात किंवा साप्ताहिकात द्या ना....नाहितर ई-सकाळ वाले माहिती देतीलच इथून! :)