आधी(चं) हौस त्यात पडला पाऊस...

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
6 Mar 2012 - 12:08 am

मागे दौलताबादाला जाऊन आल्यापासून माझा धाकटा जरा इतिहासमय झाला होता. तेव्हापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकणे हा त्याचा आवडता छंद बनला. यू ट्यूब वर जाऊन महाराजांचे ऍनिमेशनपट पाहणे, कलर्सवर चालू असलेली महाराजांची सीरियल (अतिशय टुकार असलेली) पाहणे ह्या गोष्टी तो अगदी मावळ्याच्या निष्ठेने करतो.

'कायद्याचे बोला' बघितल्यापासून माझी मोठा मुलगा मकरंद अनासपुरे, आपला मक्या हो, त्याचा प्रचंड फॅन झाला आहे. त्याची डायलॉग डिलिव्हरी आणि गावरान भाषेचा तडका त्याला फारच आवडतो, म्हणजे मलाही बरं का. विशेषतः म्हणी आणि वाक्प्रचारांचा प्रभावी वापर तर मला भयंकर आवडतो. आता तो संवाद लेखकाच्या कौशल्याचा भाग झाला हे जरी खरे असले तरीही मक्याच्या तोंडून ऐकण्याची खुमारी काही औरच आहे. विशेष म्हणजे त्याने अजूनही भरत जाधव सारखा वात आणला नसल्यामुळे अजूनही तो सुसह्य आहे. (त्या भरतला कोणीतरी स्टेज आणि स्क्रीनमधला फरक समजावून सांगा ना ,प्लीज...)

तर ह्या दोन्ही गोष्टी आठवायचे आणि सांगायचे कारण म्हणजे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट. असंख्य वेळा पाहिलेला हा चित्रपट (सौजन्य: टोरंट डाउनलोड) परवा परत एकदा बघितला. ह्या चित्रपटात महाराज आणि मक्या असा दुहेरी योग जुळून आल्यामुळे दोन्ही मुलांचा आवडता चित्रपट आहे हा. मला जनरली मुलांबरोबर चित्रपट बघताना त्यांना कथानक समजावून सांगणे आवडते. थोड्याफार तांत्रिक करामतीं समजावून सांगणे, पात्रांविषयी माहिती देणे, जोक्स, कोट्या समजावून सांगणे ह्यात मला रस असतो त्यामुळे बच्चेकंपनी माझ्याबरोबर चित्रपट बघायला एकदम खूश असते. त्यात मक्याचा चित्रपट बघताना मी 'मस्ट'चं. त्याचे डायलॉग्सचे षट्कार बहुतेक माझ्या मोठ्याच्या डोक्यावरून जातात. तो म्हणी आणि वाक्प्रचारांचा अर्थ समजावून घ्यायच्या खूप मागे असतो. मी त्याच्याशी बोलताना खूप वेळा त्यांचा वापर करत असतो त्यामुळे मला तशीच उत्तरं द्यायला (बहुतेक वेळा निरुत्तर करायलाच) म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करून, त्याला आवडते.

त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय बघितला तेव्हा त्यांना भोसले म्हणजे कोण, गोसालिया त्याच्या का मागे लागलाय, महाराज असे काय आले, ते कुठे राहतात (धाकट्यासाठी), मक्या कोण ह्यातच सगळा वेळ गेला होता. मग दुसर्‍यांदा बघितला तो मात्र मक्याची आतषबाजी ऐकण्यासाठी, आणि भोसलेला आलेला जोर आणि त्या जोषांत त्याने मारलेले डायलॉग्स एन्जॉय करण्यासाठीचं.

त्यात मक्याचा एक डायलॉग आहे 'आधीच हौस त्यात पडला पाऊस'. हा डायलॉग ऐकून माझी बायको माझ्याकडे बघून जोरात हसली. मोठ्या मुलाला कळेना की काय झाले. मग तो त्याचा अर्थ काय म्हणून मागे लागला. "अरे त्याचा अर्थ तुझे बाबा", असे म्हणून बायको पुन्हा हसायला लागली. हसून झाल्यावर तिने त्याचा अर्थ अगदी साग्रसंगीत त्याला समजावून सांगितला. त्याला तो अर्थ आता व्यवस्थित कळला, बापाचे जिवंत उदाहरणच संदर्भासहित स्पष्टीकरणाला होते म्हटल्यावर कसे समजणार नाही? मग आई आणि लेक मिळून पिक्चर रिवाइंडकरून, त्या डायलॉग वर भरपूर हसले, मी मात्र बळंच, तोंडदेखलं हॅ हॅ हॅ केलं. पण ह्या सगळ्या प्रकारात धाकट्याला काहीही कळलेलं नव्हत. आम्ही सगळे का हसतो आहोत हे त्याला कळेना.तो मला परत परत "काय झाले?", "तो काय बोलला?", "आधीच हौस त्यात पडला पाऊस म्हणजे काय?" असे विचारू लागला. आता त्याला काय सांगणार कपाळ. आता आम्ही सगळे हसतो आहोत आणि आपल्याला काही समजत नाही हा अपमान सहन न होऊन त्याने भोकांड पसरले. मग त्याला काहीतरी थातूर मातूर समजावून सांगितले. त्यानेही बेट्यानं सगळं समजले असा आवा आणला आणि पिक्चर परत रिवाइंड करायला लावून तो डायलॉग आल्यावर जोरात हसला. खरंतर त्याला काहीही कळले नव्हते. त्यानंतर मी मध्येच कधीतरी त्याला "आधीच हौस त्यात पडला पाऊस" असे उगाचच म्हणायचो. एक दोनदा तो हसला पण नंतर काही तो हसायचा नाही, पण त्याचा चेहरा जरा विचारी व्हायचा. मग मीही तो डायलॉग त्याला मारणे बंद केले.

परवा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' परत झी टॉकीजला लागला होता. नेहमीप्रमाणे मी आणि माझा मोठा मुलगा डायलॉग्जवर हसत होतो. त्यात मक्याचा तो डायलॉग परत आला, 'आधीच हौस त्यात पडला पाऊस'. तो डायलॉग आल्यावर माझा धाकटा मुलगा धावत धावत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, "बाबा, मला ह्या अर्थ माहितेय". मला एकदम हसूच आले. मी म्हटले काय आहे सांग. त्यावर तो म्हणाला, "अहो, त्या भोसलेच आधीचं हाउस आहे ना त्यात पाऊस पडला आणि म्हणून त्याला दुसरं हाउस बांधायचंय पण तो गोसालिया त्याला बांधून देत नाहीयेय. त्याला महाराज मदत करताहेत दुसरं घर बांधायला". आणि आता गोसालियाची कशी मज्जा होणार म्हणून हसायला लागला आणि मी मात्र त्याच्या हौस च्या हाउस ह्या इंटरप्रीटेशनने फ्लॅट झालो होतो.

"कोई शक?" हे एकढेच म्हणावेसे वाटते आता ह्या आजच्या पिढीच्या आकलन आणि विचार शक्ती पुढे.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

हा हा हा हा.
खी खी खी.
आधीचं हाऊस्..........मज्जा.

आबा's picture

6 Mar 2012 - 2:31 am | आबा

देशपांडे नाही हो, अनासपुरे

लेख छानच !

आबा, धन्यवाद,
चुकीची दुरूस्ती केली आहे.

- (धांदरट) सोकाजी

gaikiakash's picture

6 Mar 2012 - 3:24 am | gaikiakash

ह्याची equivalent वैदर्भीय म्हणः
आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास :)

५० फक्त's picture

6 Mar 2012 - 6:45 am | ५० फक्त

आनंद आहे, मिपावर एक बालकशंकात्रस्तपालक संघाची स्थापना करणे गरजेचे आहे असं वाटायला लागलंय. त्या निरागसता जपायच्या नादात एवढी लफडी होतात की सांगता सोय नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2012 - 9:38 am | अत्रुप्त आत्मा

@मिपावर एक बालकशंकात्रस्तपालक संघाची स्थापना करणे गरजेचे आहे असं वाटायला लागलंय. त्या निरागसता जपायच्या नादात एवढी लफडी होतात की सांगता सोय नाही.>>> +१

आत्मशून्य's picture

6 Mar 2012 - 10:52 am | आत्मशून्य

.

हा..हा.. हा..
हलकं फुलंक .. मस्त. आवडलं.

(त्या भरतला कोणीतरी स्टेज आणि स्क्रीनमधला फरक समजावून सांगा ना ,प्लीज...)

+१ लॉक किया जाये.
तो अभिनय करतो की अर्धांगवायूचे प्रात्यक्षिक?

मक्या पण बोरच व्हायचा, पण खपून जातो

वपाडाव's picture

6 Mar 2012 - 5:10 pm | वपाडाव

मक्या पण बोरच व्हायचा, पण खपून जातो

यशवंता, आपणा मराठवाडी लोकांना तो लैच डोक्यात जातो... पण मी पाह्यलंय हे पश्चिमेचे लोक त्याला लै डोक्यावर घेतात... चालायचंच, तो आपल्यासारखाच आहे ना म्हणुन आपल्याला नसेल आवडत...
पण त्याचे चित्रपट पाहण्यासारखे असतात बरं... (निशाणी डावा अंगठा-तुफ्फान विनोदी)

हंहंहं.. आपण मक्‍याचा फॅनचय..
एकदा आमच्या ऑफिसला आला होता. त्याला म्हणलं आरं काय चाल्लंय भावा?
तर तो करंगळी वर करुन म्हणे, हे कुणीकडं आहे इथं आधी सांग..
च्यायचा मक्या म्हणलं.. ;-)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

6 Mar 2012 - 12:26 pm | डॉ.श्रीराम दिवटे

आंग्लमराठीचा असा नेहमी गोंधळ उडतोच. 'फॉक्सपूरची मँगोबाई मला ब्रेड!' असंच काहीसं.

विशाखा राऊत's picture

6 Mar 2012 - 4:39 pm | विशाखा राऊत

मस्त मस्त.. त्यात पडला पाऊस :)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Mar 2012 - 5:21 pm | परिकथेतील राजकुमार

भारीच किस्सा एकदम.

मस्त रे सोक्या.

काल परवाच मक्याचा एक चित्रपट पहाण्यात आला. त्यात पण त्याचा असाच एक डायलॉग होता..
हे म्हंजे मागीतला 'गोंडा' नी मिळाली 'होंडा' :)