महिन्याभरापूर्वी "मेरे बाप पहले आप" आप हा हिंदी चित्रपट पाहीला. पाहिला म्हणणे खरं तर धाडसाचे होईल. "झेलला" हाच शब्द योग्य आहे. आणि झेलला तोसुद्धा त्या पोरीसाठी. खुप गोड आहे ती पोरगी. हो पोरगीच नाही तर काय... पाच वर्षांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा. केवळ तीचं ते निरागस हसू पाहण्यासाठी प्रियदर्शन, परेश रावल आणि अक्षय खन्ना यांचा पांचटपणा खपवून घेतला. (विश्वास नाही बसत हो की याच प्रियदर्शन आणि परेश रावल यांनी सुनिल शेट्टी आणि अक्षय कुमार या मारधाड द्वयींसोबत काम करून "हेराफ़ेरी" सारखा उत्तम विनोदीपट बनवला होता.)
असो. मी तुम्हाला सांगत होतो त्या गोड पोरीबद्दल. जेनेलिया डिसोझा तिचं नाव. अभिनय जमतो की नाही हे माहिती नाही पण पडद्यावरील तिचा वावर कृत्रीम नक्कीच वाटत नाही.बहुतेक ती तिच्या खाजगी आयुष्यातही अगदी अशीच असावी ती. हसरी, खेळकर... तीन तास संपताच "मेबापआ" डोक्यातून निघून गेलं. पण जेनेलियाचा पडद्यावरील हसरा चेहरा मात्र लक्षात राहीला. तिच्या बद्दल अजून काही माहीती मिळवण्यासाठी आम्ही मग गुगलला कामाला लावला. (तो गुगलही अगदी खुश झाला असेल एका सौंदर्यवतीची माहीती काढायला सांगीतली म्हणून. कारण एरव्ही आम्ही त्या बिच्यार्याला डेटाबेसमधून अशी अशी माहीती कशी आणायची, "डीस्क्रीपंसी" हा इंग्रजी शब्द अचुक कसा लिहायचा यासारखे एकदम चिंधी प्रश्न विचारतो.)
आम्ही गुगलला "जेनेलिया" हा शब्द दीला आणि म्हटलं आता शोध. त्यानेही "जो हुकुम मेरे आका" म्हणत जेनेलियाची ढीगानी माहीती आमच्या पुढ्यात ओतली. अरेच्च्या ही पोरगी आमच्यापेक्षा चक्क पाच वर्षांनी लहान आहे. वाटत नाही हो पण तसं काही. आणि तिचं सौंदर्यसुद्धा किती नैसर्गीक आहे... (लेका, गाढवीण सुद्धा सुंदर दिसण्याचं तुझं वय आहे रे. मग चित्रपट अभिनेत्री तुला सुंदर दिसेल यात नवल काय.) या पोरीनं म्हणे यापुर्वी "तुझे मेरी कसम" आणि "मस्ती" या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे म्हणे. "तुमेक" मी अजुनही पाहीला नाही पण मस्ती पाहीला आहे. डोक्याला खुप ताण देवून पाहीला पण मस्ती मधलं ती असणारं एकही दृश्य नजरेसमोर येईना. अगदी "तू नळी" (YouTube :D ) वरही मस्ती मधली तीची चित्रफ़ीत मिळते का पाहीलं. नाही मिळाली. देव जाणे. (जाउदे ना भौ... तुला काय दुसरे कामधंदे नाहीत काय... च्यायला काहीही शोधत बसतो जालावर.)
याच दरम्यान भारतात या पोरीचा अजुन एक हिंदी चित्रपट आला होता. "जाने तू... या जाने ना". आमिर खानचा हा चित्रपट. म्हणजे आमिर खानने आपल्या भाच्याला लॉंच करण्यासाठी बनवलेला (च्यायला... लॉंच करायला आमिर खानचा भाचा काय सॅटेलाईट आहे काय ?) या चित्रपटाचा आमिर खानच्या भाच्याला किती फ़ायदा होईल हे ते दोघे मामा भाचेच जाणोत. पण या चित्रपटातील जेनेलियाची "आदिती" मात्र भाव खाऊन गेली. चित्रपटाची कथा तशी चावून चावून चोथा झालेली. चित्रपटातला शिखर प्रसंग (climax scene :D) तर चक्क "अमेरिकन पाय : द नेकेड माईल" या चित्रपटातून अगदी तसाच्या तसा उचललेला. (इच्छुकांनी हा "नेकेड माईल" पाहण्यास हरकत नाही. पण जरा सांभाळून. चित्रपट प्रत्येक फ़्रेममध्ये आपल्या नावाला जागतो :D ). एका हळव्या क्षणी (किंवा भिकार क्षणी फ़ॉर दॅट मॅट्टर :D )हिरोला आपल्या प्रेमाचा साक्षात्कार होतो आणि मग तो इस जालिम दुनिया के सगळे बंधनको झुगारुन देके आपल्या प्यारला पान्यासाठी सुपरसॉनिक विमानांच्या काळातही घोडयावरून धाव घेतो. (पाडगांवकरांचं म्हणणं अगदी खरं आहे. प्रेम, आपलं त्यांचं सेम असतं. म्हणून तर नेकेड माईल मधला अमेरिकन हिरो काय कींवा जातूयाजाना मधला भारतीय हिरो काय, आपलं प्रेम मिळवण्यासाठी घोडयावरून धाव घेतात...)
असो. ते अडीच तीन तास संपताच "जातूयाजाना" डोक्यातून निघून गेला. पण जेनेलियाचा उस्फुर्त अभिनय मात्र मनात घर करून राहीला. पुन्हा एकदा आम्ही गुगलला कामाला लावले. "तू नळी" वर जेनेलियाच्या काही तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमधील चित्रफ़ीती सापडल्या. चित्रफ़ीती तमिळ आणि तेलुगु भाषेतल्या असल्यामुळे फ़ारसं काही झेपलं नाही. पण तीचा "बोमरिलू" हा तेलुगु चित्रपट चांगला असावा हे जाणवलं. अगदी "विकी" नेही चित्रपटाच्या उत्तमतेची ग्वाही दिली. लगेच भारतीय दुकानामधून (अमेरिका निवासी भारतीय, अमेरिकेतील भारतीय दुकानाना "इंडीयन शॉप" असं म्हणतात.) इंग्रजी उपशिर्षक असलेली बोमरिलूची तबकडी आणली. पाहीली. आणि तो अप्रतीम चित्रपट पाहील्यानंतर खुप दिवसांनी एक नितांत सुंदर चित्रपट पाहील्याचं समाधान मिळालं. चित्रपट पाहताना इतका समरस झालो होतो त्या चित्रपटाशी की त्या वेळात मुळीच जाणवलं नाही की आपण तेलुगु, आपल्याला बिलकुल न समजणार्या भाषेतील चित्रपट पाहत आहोत.
एका सुंदर प्रसंगाने चित्रपट सुरु होतो. समुद्र किनार्यावर एक अगदी छोटं बाळ पावलं टाकत असतं आणि त्याचे बाबा त्याला सावरत असतात. याच वेळी कथेचा निवेदक आपल्या गंभीर आवाजात सांगत असतो की वडीलांनी मुलाला त्याच्या बालपणामध्ये आधार देणे आवश्यकच आहे पण मुलगा मोठा झाल्यानंतरही त्याच्या आयुष्यात दखल देणं कितपत योग्य आहे... मुलं लहान असतात तोपर्यंत त्यांना आई बाबांचा आधार हवा असतो पण जस जशी ती मोठी होत जातात तसतसं त्यांना आई बाबांपासून स्वातंत्र्य हवं असतं. तसं नाही झालं तर त्यांची प्रचंड घुसमट होते. प्रसंगी मुलं घराबाहेर आई वडीलांबद्दल अपशब्द काढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. कधीतरी ही घुसमट असह्य होते आणि मग मुलं सगळी बंधनं झुगारुन देतात. बोमरिलू याच मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत आहे.
सिद्धार्थ (सिद्धार्थ सुर्यनारायण - रंग दे बसंती मधला करण) एका सुखवस्तू घरामधला घरामधला मुलगा. दोन वर्षांपुर्वी इंजिनियर झालेला. आणि तरीही त्याच्या प्रत्येक गोष्टीवर वडीलांचा वरचश्मा असणारा. त्याने कुठले कपडे घालावेत इथपासुन ते त्याची "हेअर स्टाईल" कशी असावी इथपर्यंत सारं काही वडील ठरवणार. या सगळ्याला सिद्धु खुप वैतागलेला. अगदी मित्रांसोबत असताना पिणं झाल्यानंतर आपल्या बाबांना खुप शिव्या द्यायचा तो. मित्रांसोबत असताना तो नेहमी म्हणायचा, की त्याच्या बाबांनी त्याच्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ केली तरीही दोन गोष्टी तो त्याच्या मनाप्रमाणेच करणार होता. एक म्हणजे त्याच करीयर आणि त्याचं लग्न. त्याला आवडणार्या मुलीसोबतच तो सात फेरे घालणार होता.
आणि अशातच सिद्धुचे घरवाले त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न ठरवतात आणि त्याच्या मनाची घुसमट अधिकच वाढत जाते.पण एक दिवस त्याला एका मंदीरात "ती" दिसते आणि त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळते. लग्न ठरलेलं असतानाही सिद्धू त्या मुलीच्या, हासिनीच्या (जेनेलिया) प्रेमात पडतो. हासिनी सिद्धुच्याच कॉलेजला इंजिनियरींगला असते.आपल्याच कॉलेजचा पासआऊट म्हणून हासिनी सिद्धुशी मैत्री करते आणि तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडते.
चित्रपटामध्ये हा इथवरचा प्रवास इतक्या हळूवारपणे दाखवला आहे की आपल्या हिंदी चित्रपटांनी बनवणार्यांनी त्याचे धडे घ्यावेत. गोंधळलेला सिद्धू, अल्लड आणि अवखळ कॉलेजकन्यका हासिनी, त्या दोघांचं साध्या साध्या प्रसंगांमधून फ़ुलणारं प्रेम, सिद्धू आणि त्याच्या आई बाबांमधील प्रसंग. सारंच सुंदर. एरव्ही घरामध्ये एक अवाक्षरही न बोलणार्या सिद्धूचं हासिनीवरचं अधिकार गाजवताना सिद्धार्थ नारायणने केलेला अभिनय तर लाजबाब...
आपलं लग्न ठरलं आहे हे सिद्धूला हासिनीला सांगायचं असतं. तसं ते तो तिला सांगतोही. ते ऐकताच हासिनीला धक्का बसतो. ती सिद्धूपासुन दुरावते. पण ती फ़ार काळ स्वत:ला त्याच्यापासून दुर ठेवू शकत नाही आणि ती परत येते. सिद्धू आणि हासिनीचं पुन्हा एकदा भेटतात. एका रस्त्यावर, सिद्धूच्या बाबांसमोर त्यांच्या नकळत. सिद्धूचं लग्न ठरलेलं असुनही तो दुसर्या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे, ही गोष्ट समजताच घरात वादळ येतं. बाबा सिद्धूला हासिनीला विसरून जायला सांगतात. सिद्धू सगळ्यांना एकदा तुम्ही हासिनीला भेटा, तिला समजून घ्या आणि मग हव तर जर तिचा स्वभाव पटला नाही तर मला तिला विसरायला सांगा अशी विनंती करतो. नव्हे, तो घरच्यांना हासिनीला एक आठवडयासाठी घरी आणण्याचं कबूल करतो. आणि सहलीची युक्ती करून हासिनीला तिच्या घरुन आठवडयासाठी आपल्या घरी घेऊन येतोही.
हासिनी सिद्धूच्या घरी येते. सुरुवातीला सारे तिच्याकडे दुर्लक्ष करतात पण हासिनी आपल्या अल्लड, अवखळ वागण्याने सार्यांची मने जिंकून घेते. एके दिवशी हासिनी सार्या कुटूंबासोबत एका लग्न समारंभात जाते. आपल्या अल्लड स्वभावाने त्या लग्न समारंभामध्ये रंग भरते. योगायोगाने याच लग्नाला हासिनीचे बाबाही येतात. तिच्या बाबांनी एकदा सिद्धूला मित्रांसोबत दारू पिऊन रस्त्यावर आपल्या बाबांना शिव्या देताना पाहीलेलं असतं. ते सिद्धूला ओळखतात. हासिनी प्रसंगावधान राखून पुढचा प्रसंग टाळण्यासाठी समारंभातून तिच्या बाबांच्या नकळत निघून जाते. असं असुनही घरी आल्यावर सिद्धू हासिनीला तिच्या लग्नामधल्या बालिश वर्तनाबद्दल ओरडतो. या सगळ्याने हासिनी व्यथीत होते. सिद्धू पुर्वीचा जसा होता तसा आता राहीला नाही, तसंच या घरात राहण्यासाठी तिला खुप तडजोड करावी लागेल आणि ते तिच्याने होणार नाही असं सांगून ती सिद्धूच्या घरुन निघून जाते. हासिनी तिच्या घरी गेल्यावर तिच्या बाबांचा ओरडा खाते. पण ती पुन्हा असं काही ती करणार नाही असं आपल्या बाबांना वचन देते.
इकडे सिद्धू मात्र हासिनीच्या विरहात स्वत:ला हरवून जातो. सिद्धूची आई पुढाकार घेऊन त्याच्या बाबांना समजावते. चोवीस वर्षात कधीही बाबांपुढे तोंड न उघडलेला सिद्धूही आपल्या मनातील घुसमट बाबांसमोर व्यक्त करतो. गेले चोवीस वर्ष ते कसे चुकत गेले हे सांगतो. सिद्धु आपल्या नियोजित वधूच्या घरी जाऊन लग्न त्याचं त्यांच्या मुलीशी ठरलेलं लग्न मोडण्यास राजी करतो. सिद्धूचे बाबाही आपल्या मुलासाठी हासिनीच्या घरी जातात. तिच्या बाबांना हासिनी आणि सिद्धूच्या लग्नासाठी विनंती करतात. आता हासिनीचे बाबा सिद्धूला समजून घेण्य़ासाठी त्याला एक आठवडाभर आपल्या घरी राहायला बोलावतात. आणि त्यानंतर हासिनी आणि सिद्धू लग्न करुन सुखी होतात असं मानायला लावून चित्रपट संपतो...
म्हटलं तर हा चित्रपट तसा एक चाकोरीबद्ध चित्रपट आहे. प्रेमकथा, घरातील ताण-तणाव हे विषय तसे नेहमीचेच आहेत.पण चित्रपटाचं सादरीकरण निव्वळ अप्रतीम आहे. सिद्धार्थ नारायण (सिद्धू), जेनेलिया (हासिनी), प्रकाश राज (सिद्धूचे बाबा) या तीन कलावंताचा तसेच इतर सह कलाकारांचा कसदार अभिनय, कानांना गोड वाटणारं संगीत या सगळ्यामुळे चित्रपट खुप सुंदर बनला आहे. सिद्धार्थ नारायणनेच गायलेलं "आपुडॊ ईपुडॊ" हे गीत आणि "बोम्मनी गिस्ते" हे प्रेम गीत ही दोन्ही गाणी सुंदर आहेत... चित्रपट २००६ साली प्रदर्शीत झाला होता. त्यावेळचा तो सुपरहीट तेलुगु सिनेमा होता. चित्रपटाला फ़िल्मफेअर पारितोषिकही मिळालं होतं...
असो. तर "मेरे बाप पेहले आप" सारख्या भिकार हिंदी चित्रपटापासून हसत खेळत सुरु झालेली जेनेलियाची कहाणी "बोमरिलू" या नितांत सुंदर तेलुगु चित्रपटाशी थोडीशी गंभीर लिखाणाने संपली !!!
(जाता जाता: हा चित्रपट गुगलच्या सौजन्याने बोमरिलू इथे पाहता येईल. )
प्रतिक्रिया
27 Jul 2008 - 3:47 pm | अभिज्ञ
बोमरिलु....
वर्षाभरापुर्वी बंगलोर ते हैदराबाद असा प्रवास वॉल्वो बसने करत होतो.
त्यावेळि आमच्या वाहकाने हा पिक्चर विडियोवर लावला होता.
एकतर रात्री तुडुंब झोप आली असताना हे असले अगम्य पिक्चर पहायचे म्हणजे डोक्याला लैच त्रास असतो.त्यात हि लोक पिक्चर फारच मोठ्या आवाजात लावतात.त्यामुळे झोप वगैरे यायचा प्रश्नच नसतो.
पण आलिया भोगासी ह्या न्यायाने अन पुलंच्या भाषेत "शेजारचा रेडियो जर ठणाणा करत असेल तर तो आपल्या करिताच लावला
आहे असे समजायचे ,त्याने त्रास कमी होतो." हेच आठवून हा चित्रपट पाहिला होता.
पण काय सांगू महाराजा, हा चित्रपट समजायला भाषेची गरजच भासली नाहि.पिक्चर चालु होउन कधी संपला
हे कळले देखील नाहि.सुरुवात ते शेवट अतिशय अप्रतिम झालाय.
विषेशतः सिध्दू,हासिनी अन प्रकाश राज ह्या तिघांचा अभिनय. अतिशय उत्तम.
पाहून वर्ष झाले आहे तरिहि अजून तो जसाच्या तसा आठवतो, मला वाटते ह्यातच चित्रपटाचे यश आहे.
अभिज्ञ.
अवांतर-फटु (अरे जरा चांगले नाव निवड रे बाबा.(ह.घ्या.)) ,ह्या चित्रपटाचे नाव बोमरिलु होते ते हा लेख वाचला तेंव्हा कळाले.
अन नायिकेचे नावहि आम्हास ठावूक नव्हते. ती माहिति दिल्याबद्दल धन्यवाद.
अजुन काहि चित्रपटांचे परिक्षण द्यावेत.लिखाणाची स्टाइल जबरि आहे.
27 Jul 2008 - 6:06 pm | विसोबा खेचर
जेनिलिया बाकी छानच दिसते...! :)
असो,
आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या.
27 Jul 2008 - 6:18 pm | यशोधरा
बोम्मारिलू बघतेय आत्ता!! छान वाटतोय सिनेमा...
27 Jul 2008 - 6:44 pm | राधा
छान लिहिलत हो 'जेलिनिया' बद्दल्...........
पण आमिर अन त्याच्या भाच्याबद्दल काही वाईट लिहिण्यापेक्षा नसत लिहिला तर तुमच्या जेलेनिया ची महती कमी नसती काही झाली........;(
27 Jul 2008 - 6:56 pm | एडिसन
बोम्मारिलू मस्तच होता. हॉस्टेलच्या विंगमधले गुल्टी (तेलगू) मित्र हा पिक्चर लावून बसले होते. तेव्हा मी तिथे टपकलो. "मला काही कळणार नाही रे!", असं म्हणायची सोय नव्हती कारण लगेच त्यांनी इंग्रजी उपशीर्षकं पैदा केली. मग मीपण बसलो आणि संपेपर्यंत उठलोच नाही. नेहमीचीच कथा असू्नसुद्धा जेनेलियाचा अभिनय आणि फ्रेश, सहज वावर यामुळे सही वाटला बोम्मारिलू..
(इच्छुकांनी हा "नेकेड माईल" पाहण्यास हरकत नाही. पण जरा सांभाळून. चित्रपट प्रत्येक फ़्रेममध्ये आपल्या नावाला जागतो)
=)) =)) अगदी..अगदी..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
27 Jul 2008 - 7:19 pm | भडकमकर मास्तर
मी सुद्धा बोम्मारिलु ( उपशीर्षकाविनाच पाहिला)...
बराचसा कळला... मजा आली....
..
एकूण जेनेलिया दिसते छान...
पण तिचे जातुयाजाना मध्ये काही ठिकाणी उच्चार अगदीच विचित्र वाटले.....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/