मला ईश्वर भेटला ....!

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
28 Feb 2012 - 2:46 pm

मला ईश्वर भेटला !
कोपऱ्यावरचा बनिया नव्हे हो..! खराखुरा ईश्वर ! कसा ते ऐकायचंय ?
अगदी अलीकडची आठवण म्हटली तर गेल्या आठवड्यातली गोष्ट. कामवाल्या सरूच्या ३ वर्षाच्या नातवाला बाळदमा आहे. ‘रातसारी खोकतोय हो पोर ताई !’ सरू म्हणत होती ‘औशीदबी लागू पडना.’ घरात एक सितोपलादी चुर्णाची बाटली होती. तिला दिली अन सकाळ संध्याकाळ पाव चमचा गरम पाण्यातून द्यायला सांगितलं. ४ दिवसांनी हसऱ्या चेहऱ्याने सरू सांगत आली ‘ताई, खोकला पार बंद झाला वो नातवाचा ! लई चांगलं औशीद दिलासा बगा .’
तेव्हा तिच्या हसऱ्या डोळ्यात मला ईश्वर भेटला ....!
विनू माझ्या मुलाचा शाळूसोबती मित्र. चौथीनंतर शाळा बदललेल्या पण मैत्री कायम. त्या दोघांच्या मैत्रीमुळे विनूच्या आईशी माझीही चांगली ओळख झालेली. मोठी हिम्मतवान बाई. परिस्थिती बेताची. नवऱ्याचे अधुपणाने डोके हलके झालेले. घराचा यंत्रमागाचा व्यवसाय स्वत: सांभाळून ३ मुलांची शिक्षणे करत असे. विनू धाकटा. एकदा जुलै महिन्यात घरी आलेला.
'काय विनू ? शाळा झाली ना सुरु?' मी विचारले.
'नाही अजून काकू.' विनू.
'अरे, जुलै अर्धा झाला ना ? मग ? ' मी.
'किनई काकू, या शाळेत वातावरण बरोबर नाही म्हणून दुसर्या चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे...’
'मग अजून का नाही घेतला ?' मी.
विनू जरा घुटमळत बोलला ‘काकू, २ हजार डोनेशन मागताहेत...’
वाईट वाटलं. माझा मुलगा अन विनू सारखेच हुशार. माझ्या मुलाला गावातल्या सर्वात चांगल्या शाळेत घातलेले. पण विनू...
संध्याकाळी राहवेना. पर्समधले २ हजार घेतले. विनूच्या आईकडे गेले. इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर निरोप घेताना त्या कुंकू लावू लागल्या तेव्हा देव्हार्याजवळ गेले. देवापुढे २ हजाराच्या नोटा ठेवल्या. म्हणाले, 'अनिरुद्धासाठी (माझा मुलगा) मनात बोलले होते याचं शिक्षण मार्गी लागुदे , एका हुशार विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च करीन. विनुशिवाय दुसर कुणी दिसत नाही मला. हे पैसे देवाकडूनच त्याला मिळालेत असे समजा.'
तेव्हा त्या आईच्या डोळ्यात तरळलेल्या पाण्यात मला ईश्वर भेटला ....!
त्याच्याही आधी... माझा मुलगा २ वर्षाचा असताना एकदा मिस्टरांना दवाखान्यात दाखल केले होते. मुलाला सांभाळण्यासाठी घरी एक सुमनआजी यायची. ती १५ दिवसापासून आलीच नव्हती. दुसरी बाई मिळेपर्यंत १५ दिवस मी रजा घेतली होती, ती उद्या संपत होती. बाई अजून मिळाली नव्हती. त्या वेळी आमच्या गावात पाळणाघरे नव्हती. मुलाला दुसरीकडे कुठे सोडायची सोय नव्हती. रजा वाढवून मिळण्यासारखी परिस्थिती नव्हती. मिस्टर दवाखान्यात, कुणी नातेवाईक घरी येऊन थांबणारे नाहीत, मला मुलाला कुठे सोडावे नी काय करावे सुचेना. देवाचे नाव घेत स्वयपाक करू लागले. साडेनऊ वाजले नी दारातून सुमनआजी आत आल्या. हातात एक गाठोडे. म्हणाल्या 'ताई, चालत येऊन नी जाऊन लई तरास व्हायला लागला हो . म्हणत असाल तर तुमच्या घरीच राहू का ? कपडे घेऊन आलेय बघा !' आंधळा मागतो एक डोळा असे झाले मला.
तेव्हा त्या आजीच्या रुपात मला ईश्वर भेटला !
........अजूनही अधून मधून भेटतो तो मला.........
लतादीदींच्या एखाद्या अवचित कानावर पडलेल्या स्वरलकेरीतून...
चिमण्या बाळाच्या कोवळ्या जावळाच्या स्पर्शातून...
चॉकोलेट दिल्यावर मुलाच्या डोळ्यात उमटणारया हास्यातून....
खच्चून भरलेल्या बसमध्ये बसायला जागा दिल्यावर कुण्या एका आजोबांच्या चेहऱ्यावर झळकलेल्या कृतज्ञतेतून...
मनाला चटका लावणाऱ्या एखाद्या कादंबरीतून...
भटकंतीत भेटलेल्या उंच डोंगरकपारीतून......
आव्हान म्हणून बनवलेल्या हापिसातल्या एखाद्या प्रोजेक्ट मधून...
हापिसातून थकून घरी आल्यावर आणि घरातली उस्तवारी निस्तरल्यावर रात्री जागून मुलाला मदत करून बनवलेल्या क्राफ्टमधून...
आणि मिपावरच्या एखाद्या अस्सल अभिव्यक्तीमधून...! ! !

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

स्वातीविशु's picture

28 Feb 2012 - 3:02 pm | स्वातीविशु

वा...वा....मस्तच....
तुम्हाला असाच ईश्वर भेटत राहो अन आम्हालाही....:)

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 4:38 pm | वपाडाव

इश्वर तुम्हाला नेहमीच भेटत राहो ही त्याच्याच चरणी प्रार्थना...

Pearl's picture

28 Feb 2012 - 8:08 pm | Pearl

आवडलं. असाच ईश्वर तुम्हाला नेहमी भेटत राहो.
.

कदाचित थोडे अवांतरः
यानिमित्त माझ्या आवडत्या ओळी लिहाव्याशा वाटतात,
आसमानो मे आनंद, मिट्टी मे भी है आनंद,
ये धरती चिर के उगनेवाले अंकुर मे आनंद...

धूप का सर्दी मे आनंद, नदी का वर्षा मे आनंद..
और वर्षा मे बदले भूमि के रंगो का आनंद...

मी-सौरभ's picture

28 Feb 2012 - 4:41 pm | मी-सौरभ

मुक्तक छान आहे

जगी ज्यास कोणी नाही
त्यास देव आहे ....

एक आदर्श लेख .

चौकटराजा's picture

28 Feb 2012 - 7:43 pm | चौकटराजा

कुठे शोधीसी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाउ मी पंढरपुरी,
विठ्ठ्ल तो आला आला मला भेटण्याला
पाय चेपितो माय पित्याचे करू द्या ही चाकरी विठ्ला उभे रहा तोवरी,
नसे राउळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी
शोधीसी मानवा राउळी मंदिरी , नांदतो देव हा आपुल्या अंतरी
कशाला पंढरी जातो रं बाबा
देव नाही देव्हार्‍यात , देव नाही देवालयी

अशा अनेक गीतांचे सार तेच आहे जे आपण लिहिले आहे.

तुम्हाला असाच ईश्वर भेटुद्या ..

अवांतर :

गण्या, अवांतरात फटु टाकुन व्हायरस घातला आहेस की काय? काहीच दिसत नैय्ये त्यात...

हंस's picture

28 Feb 2012 - 8:51 pm | हंस

छान लिहीलेय लीनाताई! असाच आपल्याला ईश्वर भेटत राहो!

छे हो, तुम्ही माणुसकी बद्दल बोलताय आणि ईश्वराबद्द्ल लिहिताय, असं करुन तुम्ही माणसाच्या माणुसकीचा अपमान करताय, तुम्ही वर दिलेली उदाहरणं ही नैसर्गिक माणुसकीची आहेत, एकत्र गटात राहुन परस्परांविषयी थोडीशी जागरुकता , सामंजस्य आणि ममता दाखवणारी आहेत, अशा गोष्टी करण्यासाठी ईश्वर असणं गरजेचं नाही.

एकत्र जगणं ही गरज आहे, अन ती गरज ओळखुन व समजुन घेउन एकत्र राहणा-या कोणत्याही सजीव प्राण्यात अशा प्रकारचे व्यवहार आढळुन येतात. माकडं, हत्ती, हरणं यांच्यात सुद्धा, पण यापैकी कोणालाच ईश्वर ही संकल्पना माहीत नसावी, मग अशा प्रकारच्य व्यवहारातुन त्यांना काय समजत असावं.

प्रचेतस's picture

29 Feb 2012 - 8:48 am | प्रचेतस

माकडं, हत्ती, हरणं यांच्यात सुद्धा, पण यापैकी कोणालाच ईश्वर ही संकल्पना माहीत नसावी,

चौकटराजा's picture

29 Feb 2012 - 9:14 am | चौकटराजा

वल्ली , तुम्बराचा फोटू रायला . पन त्येला देव म्हनायच का ?

प्रचेतस's picture

29 Feb 2012 - 9:19 am | प्रचेतस

अहो बरेच आहेत. ५० रावांनी उदाहरणे दिलीत तितकेच ईश्वर दाखवलेत. तुंबरू गंधर्व जमात. :)

आकाशी नीळा's picture

29 Feb 2012 - 9:32 am | आकाशी नीळा

सु रे ख !!

मूकवाचक's picture

29 Feb 2012 - 11:29 am | मूकवाचक

पुलेशु

राघव's picture

29 Feb 2012 - 1:34 pm | राघव

असेच म्हणतो.

पुलेशु :)
राघव

यकु's picture

29 Feb 2012 - 1:44 pm | यकु

.

RUPALI POYEKAR's picture

29 Feb 2012 - 2:00 pm | RUPALI POYEKAR

मला आवडला लेख

लेख आवडला
ईश्वर अनुभव घ्यायला तशी दृष्टी हवी मग तो
फुलाच्या सुगंधात भेटेल, कोकिळेच्या मधुर गायनात भेटेल,
माणसातल्या माणुसकी मध्ये भेटेल, फळाच्या रसालते मध्ये
भेटेल, जसा भाव तसा देव.
अनिल आपटे