मराठी माणसाने काय करावे - फतवा!

विकेड बनी's picture
विकेड बनी in जनातलं, मनातलं
24 Jul 2008 - 7:36 pm

नमस्कार वाचकहो,

संकेतस्थळावर वावरता वावरता आमची अनेक मंडळींशी मैत्री झाली, विचार जुळले. मतांचे आदान प्रदान झाले. यांतून मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी एक समिती स्थापन करण्याचे ठरले. या समितीची काही ठोस उद्दिष्टे असावीत ती इतरांपर्यंत पोहोचावीत असा मनोदय ठेवून हे लिखाण होत आहे.

मराठी माणसाला गप्पा-गोष्टी करण्यात जेवढा रस आहे तेवढा रस पेकाट मोडून कामं करण्यात नसावा. नाही हो, म्हणजे असता तर काम-धाम सोडून मंडळी नानाविध विषयांवर जीव तोडून प्रतिसाद न देती. मराठी माणसाने हे करावं, ते करावं, अस्सं करावं, तस्सं करावं, आधी केलेची पाहिजे हे सांगण्यास मराठी माणूस जितका उत्सुक असतो त्याच्या एक-चतुर्थांशही ते करण्यास उत्सुक नसतो असं आपलं आमचं निरिक्षण. आता हे निरिक्षण खोटं आहे सांगायला कितीक धावून येतील बघाच!

या संगणकाने-महाजालाने एक उपकार लोकांवर केला की भलेमोठे लेख आणि प्रतिसाद लिहिताना त्याने त्या माणसाचा चेहरा लपवून ठेवण्याची काळजी घेतली. माणूस जे काही लिहितो, ज्या बाता मारतो त्याची शहानिशा करण्याची सोयच इतरांना ठेवली नाही. आता मराठी माणसांच्या, मराठी भाषेच्या, मराठी अस्मितेच्या संवर्धनासाठी मराठी माणसाने काय करावे हे गुळमुळीत सांगून उपयोग नाही. या ठिकाणी इतर धर्मीय बघा कसे फतवे काढतात. फतवा काढला की लगेच अंमलबजावणी होते, कोणी त्याविरुद्ध कुरबुरही करत नाही. तेव्हा जसे ते करतात तसेच आपण केले - म्हणजे जशास तसे -तरच आपली धमक दिसून येईल या उद्देशाने आम्ही आज एक फतवा काढत आहोत. त्याची कलमे पुढीलप्रमाणे -

१. मराठी माणसाने पुणे, नाशिक, कोल्हापूर - मुंबई कधीच सोडली हो, तिचा उल्लेख करत नाही - सोडून परदेशांत - अमेरिका-इंग्लंड नको हो, तिथे आधीच गेले भरपूर - चीन, जपान, न्यूझिलंड, झालंच तर माली, घाना, काँगो, आईसलँड, नॉर्वे येथे स्थायिक व्हावे. मराठी साहित्य संम्मेलनाला या देशांत पुढील संम्मेलने करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि मराठी संकेतस्थळावरील सदस्यांना 'पुन्हा पुन्हा संम्मेलनं परदेशांत का?' किंवा '२०५० साली तरी मराठी साहित्य संम्मेलन भारतात होईल का?' या विषयावर चर्चा उडवून देण्याची सोय करावी.

२. पुणे, नाशिक, औरंगाबाद वगैरे शहरे आपल्या हातातून कशी सुटत चालली आहेत, OMS म्हणजेच बाहेरच्या राज्यातील माणसे येऊन या शहरांचा विस्कोट करत आहेत याच्या गरमागरम चर्चा आपल्या उबदार खुर्चीत बसून कराव्यात. जमल्यास, मराठी माणसाने रस्त्यावर उतरून काय करावे याबद्दल लफ्फेदार लेख लिहावेत परंतु लेख लिहिण्यापूर्वी आपल्या घराची खिडक्या-दारे घट्ट बंद आहेत हे बघून घ्यावे. परदेशस्थ मराठी भाषकांनी देशात गोंधळ चालला आहे त्यावर जोरजोरात चर्चा झाडाव्यात. त्या चर्चांत आपल्याला किती मते पडली यावर आपली संकेतस्थळावरील पोझिशन किती बलदंड आहे याची खातरजमा करावी. हिंदू धर्म, सांप्रदायिकता वगैरे चर्चांना कोणी विरोध केल्यास हिंदू दहशतवादाची कडु गोळी गोड आवरणात हळूच चारावी. राजने मोदींकडे ट्रेनिंग घ्यावे की उद्धवने मोदींकडे ट्रेनिंग घ्यावे या विषयावर एकमेकांना धोपटून काढावे. मराठी माणूस केवळ हिंदुत्वाला विसरला म्हणूनच त्याचा अपकर्ष झाला यावर वारंवार लेख लिहावेत. मराठी माणसाच्या अपकर्षाला इटलीतली सूनबाई, राष्ट्रवादी-समाजवादी नेते, जमल्यास श्री. अमिताभ बच्चन आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू कसे जबाबदार आहेत हे पटवून द्यावे.

३. परदेशस्थ बायांनी आपण परदेशांत राहूनही सिग्रेट आणि दारूकडे ढुंकूनही पाहिलेले नाही तेव्हा मराठी देशस्थ बायका - हे जातीय विधान नाही हो! - सिग्रेट आणि दारूच्या आहारी गेल्या तर समस्त मराठी समाजावर किती विपरित परिणाम होतील याचा उहापोह करावा. याशिवाय, देशांतील बायांनी तोकडे कपडे वापरावे का यावर चर्चा कराव्या. जमल्यास पांढरपेशा मध्यमवर्गीय घरातून आलेल्या उर्मीलाने मराठी मुलींचे नाव कसे बदनाम केले यावर विचारविनिमय करावा. अदिती गोवित्रीकर, विदिशा पावटे, मधु सप्रे वगैरेंना मराठी भाषेबद्दल जराही प्रेम नाही याबद्दल चर्चा झाडाव्यात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इंग्लंड-अमेरिकेत मराठी ही सर्व शाळांत सक्तीची करावी असा हट्ट परदेशी सरकाराकडे धरावा आणि त्याचे वृत्तांत वारंवार संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. मराठी भाषेचे खरे तारणहार परदेशस्थ मराठीच आहेत हे सकलजनांना पटवून द्यावे. त्यासाठी मदतीला कौतिकराव ढालेंना घ्यावे.

४. नाकावर घसरणारा चष्मा डोळ्यांवर घट्ट बसवून इतर काहीही न करता बाकीच्यांनी काय करावे यावर आपापले बहुमूल्य प्रतिसाद द्यावेत. त्यानिमित्त चर्चांसाठी काही विषय येथे देत आहे -

अ. क्ष ने कविता कराव्यात की विडंबन?
ब. य ने व्यक्तिचित्र काढावे की काढू नये?
क. र ने मराठी असून मराठी बोलावे की बोलू नये?
ड. ल ने क्रमशः लेख लिहावेत की लिहू नये?

वरील चर्चांपैकी एका चर्चेला "ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न" असे म्हणून दुसर्‍या चर्चेला "हॅ राव! आम्ही म्हणतो तसेच केले पाहिजे" असे आलटून पालटून प्रतिसाद द्यावेत.

५. सर्वात शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की संकेतस्थळांवर न संपणार्‍या चर्चा झाडल्याने, व्यक्तिगत टिका केल्याने, इतिहास उगाळल्याने, चर्चेगणिक बदलणारी आपली मतं मांडल्यानेच मराठी अस्मिता बळकट होणार अशी प्रतिज्ञा करावी. एखाद्याचे लेख, प्रतिसाद, मत समजून न घेता आपलेच घोडे दामटत रहावे. शक्य असल्यास कंपू बनवून एखाद्याला लक्ष्य करून हाणत राहावे.

हा आहे आमचा पंचकलमी फतवा! हा न पाळणार्‍याचे मिसळपाव सदस्यत्व, मिसळपावावर दहशतवादी धुमाकूळ घालून खारीज केले जाईल याची निश्चिंती बाळगावी.

आपला,
मराठी माउस (मराठी माणूस उत्कर्ष समिती)
मिपा.

ताजा कलम - मिसळपाव संकेतस्थळ चालक आणि संपादक आणि मराठी माउस यांचा कोणताही संबंध नाही.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 7:56 pm | विसोबा खेचर

मिपाराव,

लै भारी लेख बर्रका! अगदी मनापासूम आवडला, अनेक प्रश्नांचा अगदी सहज टोप्या उडवत चांगला समाचार घेतला आहे! :)

आता माझे प्रतिसाद -

क्ष ने कविता कराव्यात की विडंबन?

कविता! जर क्ष = तात्यासुमार असेल तर! ;)

य ने व्यक्तिचित्र काढावे की काढू नये?

काढू नये असं नव्हे, प्रयत्न अवश्य करत रहावा! जर य = तात्या सप्रे असेल तर! ;)

ल ने क्रमशः लेख लिहावेत की लिहू नये?

लिहावेत, पण जर क्रमश: लेखमाला रौशनीसारखी असेल तर! ;)

एखाद्याचे लेख, प्रतिसाद, मत समजून न घेता आपलेच घोडे दामटत रहावे. शक्य असल्यास कंपू बनवून एखाद्याला लक्ष्य करून हाणत राहावे.

हम्म! काय हो, आपण पूर्वी नमोगतावरही होतात काय हो? ;)

हा आहे आमचा पंचकलमी फतवा! हा न पाळणार्‍याचे मिसळपाव सदस्यत्व, मिसळपावावर दहशतवादी धुमाकूळ घालून खारीज केले जाईल याची निश्चिंती बाळगावी.

अरे बापरे! असंही आहे का? बरं बरं! चालू द्या....

(स्वगत) - साला मालक म्हणून लोकं आजकाल आपल्यालापण विचारत नायशी झालेली दिसतात! :)

ताजा कलम - मिसळपाव संकेतस्थळ चालक आणि संपादक आणि मराठी माउस यांचा कोणताही संबंध नाही.

आयला बास काय? असं कसं म्हणता? हे संस्थळ काढून आम्हीही मराठी माणसाच्या आंतरजालीय प्रसाराला आणि प्रचाराला हातभारच लावला आहे की! मग संबंध नाही असं कसं म्हणता? :)

बाय द वे, माऊस हा शॉर्टफॉर्म आवडला! :)

आपला,
(मराठी माणूस) तात्या.

सर्किट's picture

24 Jul 2008 - 11:27 pm | सर्किट (not verified)

मस्त फतवा आहे !

समस्त मराठी समाजाने ह्याचे पालन करावे, असा आमचाही आदेश आहे.

- (इमाम) सर्किट

मुक्तसुनीत's picture

24 Jul 2008 - 11:32 pm | मुक्तसुनीत

फतवा काढणार्‍यानी बोलबच्चनगिरी बंद करावी असा नवा फतवा काढावा लागणार ..प्रश्न आहे , तो काढणार कोण ! =))

धनंजय's picture

24 Jul 2008 - 11:35 pm | धनंजय

आम्ही या फतव्यातली कलमे आधीच पाळत आहोत, त्यामुळे आम्हाला हा फतवा नव्याने लागू नाही.

पण कलमे न पाळणार्‍यांविरुद्ध काय कारवाई होईल, ते कलम फारच तोकडे राहिले आहे.

हे म्हणजे प्रसाद आव्हेरल्याने कायकाय इजा होते, तो चविष्ट भाग जवळजवळ गाळून सत्यनारायणीची पोथी वाचल्यासारखे वाटले.

मुक्तसुनीत's picture

24 Jul 2008 - 11:40 pm | मुक्तसुनीत

मराठी माणूस गणले जाणार नाही ! :P

वरदा's picture

24 Jul 2008 - 11:52 pm | वरदा

हे म्हणजे प्रसाद आव्हेरल्याने कायकाय इजा होते, तो चविष्ट भाग जवळजवळ गाळून सत्यनारायणीची पोथी वाचल्यासारखे वाटले.

बरोबर
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्रियाली's picture

25 Jul 2008 - 2:57 am | प्रियाली

कदाचित क्रमशः असे लिहायला विसरले असावेत. फतव्याचा उत्तरार्ध बाकी असावा. ;)

चतुरंग's picture

24 Jul 2008 - 11:40 pm | चतुरंग

हा नवीन 'फुटवा' चांगलाच जोमदार आहे! चला कलम करुयात! ;)

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

24 Jul 2008 - 11:56 pm | इनोबा म्हणे

वरील चर्चांपैकी एका चर्चेला "ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न" असे म्हणून दुसर्‍या चर्चेला "हॅ राव! आम्ही म्हणतो तसेच केले पाहिजे" असे आलटून पालटून प्रतिसाद द्यावेत.
हे लय आवडले.
या लेखात ज्योतिषशास्त्राचा उल्लेख नाही मिपाराव! तुमची शनी-मंगळ युती चुकलेली दिसते.

बाकी जमल्यास, मराठी माणसाने रस्त्यावर उतरून काय करावे याबद्दल लफ्फेदार लेख लिहावेत हे तुम्हालाही लागू होत आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

गुंडोपंत's picture

25 Jul 2008 - 7:16 am | गुंडोपंत

फतवा जबरी आहे!

आपला
गुंडोपंत

मुक्तसुनीत's picture

25 Jul 2008 - 7:24 am | मुक्तसुनीत

- स्वागत आहे ! :-)