कोडॅक मोमेंट्स

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
6 Feb 2012 - 11:02 am

मी बँकेच्या रांगेत उभा होतो .
काम संपतच आलं होतं आणि त्यानी मला बघीतलं .
हा माझा मित्र कमोडीटी ब्रोकर आहे . सोनं चांदी तांबं -जस्तं सारख्या कमोडीटीत व्यवहार करतो.
हात धरून जवळजवळ ओढतच त्यानी मला बाहेर काढलं .
"बघीतलंस ?"
माझा चेहेरा प्रश्नार्थक .
"पुन्हा एकदा माझा अंदाज बरोब्बर निघाला. चांदीचा भाव पडला."
"जवळजवळ सत्तर हजाराच्या आसपास होती ना रे चांदी ?"
मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो
"तो इतिहास झाला रे. ओसामा मेला त्याच्या दुसर्‍या दिवशी त्रेप्पन्न हजारावर आला होता भाव. रातोरात विस हजारानी पडला ."
"मग आता काय झालं ?"
त्यानी दयार्द्र नजर माझ्याकडे टाकली.
"तुमच्या कडे लॉजीकच नाही रे .पंधरा दिवस बोंबलून सांगतो आहे भाव पडणार ."
"आजची न्युज बघीतलीस ? कोडॅकनी दिवाळखोरी जाहीर केली आहे .जास्तीत जास्त चांदी वापरणारी कंपनी बुडली ."
" मी म्हणतो ते हेच. कोडॅक गेली म्हणजे चांदीचा भाव पडणार ना रे .?
साधं लॉजीक आहे रे ."
माझ्यावर दयार्द्र दृष्टीचा वर्षाव करत माझ्या उत्तराची अपेक्षा करत तो थांबला.
"कोडॅक आणि लॉजीकचा काय संबंध रे ? मी विचारलं .
"कोडॅकनी लोकांना प्रेम करायला -रागवायला -हसायला शिकवलं .
जेव्हापासून आठवतं आहे तेव्हापासूनच्या सगळ्याच आठवणी कोडॅक मोमेंट्स आहेत रे .
ज्यांच्या हातात कॅमेरा होता आणि जगायची हौस होती त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस कोडॅक मोमेंट होता."
आता बुचकळ्यात पडण्याची वेळ माझ्या मित्राची होती.हा माझ्या मित्राचा प्रांत नाही .
कमोडीटीच्या व्यापारात असल्या विचारांना जागा नाही.
त्याला काय माहीती की जर कोडॅक मोमेंट्स नसते तर आख्खं आयुष्यच कमोडीटी झालं असतं . पण हे सांगण्याआधीच नजरेस दुसरं कोणीतरी आलं असावं बहुतेक आणि माझ्याकडे दुर्लक्ष करून तो चालायला लागला होता.
कोडॅक म्हणजे शेअर मोमेंट्स शेअर लाइफ.
फेस बुक किंवा ऑर्कूटच्याही अगोदर शेअरिंगची गोडी कोडॅकने आपल्याला लावली.
आंतरजाल नव्हतं तेव्हा जर इस्टमन कोडॅकची इस्टमन (योग्य उच्चार इस्टमैन कलर )कलर फिल्म नसती तर अदमासे शंभर-दीडशे कोटी अर्धपोटी झोपणाऱ्या जनतेने कुठल्या रंगात आपली स्वप्ने बघितली असती कुणास ठाऊक?
कोडॅक मोमेंट म्हणजे आनंदाचा- दु:खाचा- मीलनाचा -दुराव्याचा- पुराव्याचा- साक्षात्काराचा- अनुभूतीचा- आविष्काराचा- अपेक्षेचा -अपेक्षापूर्तीचा क्षण.
काळाच्या धावत्या ओघातून अलगद उचलून वेगळे केलेले क्षण-
शब्दावाचून लिहिलेली कविता.
कोडॅक मोमेंट म्हणजे शाश्वती.
कोडॅक मोमेंट म्हणजे फुलांना निर्माल्य न होण्याची दिलेली ग्वाही.
विलयाकडे जाणाऱ्या ब्रह्माच्या सृष्टीत काही क्षणांना अमर करून आज कोडॅक स्वत:च विलयाच्या मार्गावर आहे.
कंपनी थोडय़ाच दिवसांत कदाचित बंद पडेल. सगळं काही डिजिटल असेल, पण ते कोडॅक नसेल.
तसंही बघितलं तर कोडॅक कंपनी कधीच फिल्म विकतो - विकत घ्या असं म्हणत नव्हती.
ते आठवणींच्या- क्षणचित्रांच्या व्यापारात होते. चला, या निमित्ताने बघूया आपलेच काही कोडॅक मोमेंट्स!
(हे मोमेंट्स एकाच व्यक्तीच्या आयुष्यातील नाहीत. वेगवेगळ्या व्यक्ती-वेगवेगळ्या वेळा. काही गोड काही कडू -पण प्रत्येक फोटो कोडॅकचा.)
-----------------------------------------------------------------------------
शेवटचा बॉल .मॅच जिंकायला चार रन .
आजारी मियांदाद खेळायला उभा.
बॉल चेतन शर्माच्या हातात.
मॅच बघणार्‍याच्या प्रत्येक माणसाची पल्स दोनशेच्या वर तरी नक्की गेली असेल.
आणि या मुर्खानं आज काय करावं ?
चक्क फुलटॉस. तो पण लेग स्टंपवर.
समोर मियांदाद उभा आहे हे माहीती असूनही.
गर्रकन बॅट वळली आणि छक्का .
हातात आलेली मॅच घालवली .
मॅच हारल्याचं काहीच नाही . कुणासोबतही हारू.
पण पाकीस्तानसमोर फक्त जिंकायचच असतं हे चेतन शर्माला माहीती नसावं ?
हॅट स्साला. एका बॉलमध्ये मियांदादला अमर केलं.जाम रडलो आज.
आठवीत असताना पळसुले मास्तर पानीपतची तिसरी लढाई शिकवताना चार वेळा डोळे पुसायचा तेव्हा पोटाच्या आतून खदखदा हसायला यायचं.
आज कळलं हारल्यावर कसं पोटात गुद्दा मारल्यासारखं वाटतं ते .
-----------------------------------------------------------------------------
कसं हे सगळं सहन करता रे तुम्ही ?
ज्याला जसं जमेल तसा जो तो भ्रष्टाचार करतो या देशात .
एकानी शंभर करोड खाल्ले तर दुसरा दोनशे करोड खाण्याच्या प्रयत्नात
कायम कुरघोडीची गणितं करत राहतात तुमचे नेते.
दर दहा मिनीटाला एक स्कॅम होत असेल या देशात .
कसं ? कसं जगता रे तुम्ही .?
परदेशाहून आलेला एक मित्र तावातावानी विचारत होता.
मी काहीच बोलत नाही . त्याला फक्त एक जुना फोटो दाखवतो.
हा बघ पाकीस्तानी कमांडर नियाझी आणि हे लेफ्टनंट जनरल अरोरा.
नियाझी शरणागतीच्या कागदावर सही करतानाचा फोटो.
कसं जगतो म्हणून विचारतोस ना ? त्याचं हे उत्तर आहे.
टू जी काय थ्री जी काय भ्रष्टाचार तर चालत राहतील.गाव असेल तर गिधाडं पण असतीलच.
पण या अशा क्षणाची किंमत काय लावशील ?
आम्ही साक्षीदार आहोत या क्षणाचे.
किती लाख करोड ओवाळून टाकू सांग ?
आणि अजूनही इथेच जगतो ते फक्त या क्षणांसाठी.
हम जीते है इस पल के लिये.
-----------------------------------------------------------------------------
मग तिचं डीएडचं कॉलेज सुरु झालं. मी घरी एकटाच असलो अभ्यास करत असलो की मला तिला खूप भेटावंस वाटायचं . मी तिच्या फोटोकडे टक लावून बघत बसायचो .मग तिच्या डोळ्यात उतरायचो.
हळूच तिच्या वर्गात
भूगोलाचा तास.
पृथ्वीचा नकाशा.
ती माझा हात घट्ट धरून माझं बोट त्या नकाशावर ठेवणार.
हवं तिथेच ठेवणार.
नकाशात मी इथे आहे.
मग ती वर्गातून अदृश्य.
नकाशात मी फिरफिरून तिला शोधत रहाणार.गाव गाव उंबरा उंबरा पालथा घालणार.
नंतर एक रंगीत पोस्टकार्ड येणार .त्याच्यावर तिच्या राजवाड्याचं चित्र. म्हणजे राजपुत्र पण असणारंच .
मी तर फार गरीब दिसणार ह्या फोटोत.
तिच्या राजवाड्यात गेलो तर त्या भुलभुलैय्यात मी हरवणारच.
ती सापडत नाही .
मला चुकल्यासारखं होऊन डोळ्यात पाणी आलं की ती पाठीमागून येऊन माझी डोळे झाकणार.
"वेडाच आहेस , मी काय अशी हरवणारे काय "?
वर्गातली सगळी मुलं खदखदून हसण्याचा आवाज आला की वास्तवात जागा व्हायचो.
पण डोळ्यात पाणी आणि फोटोतून ती हसतच असणार.
-----------------------------------------------------------------------------
या फोटोत जरा जास्तच हसते आहे ती.
म्हण्जे ती हसते गोडच पण या फोटोत ती जरा लबाडीश गोड हसत्येय.
अर्थात कारण तिला आणि मलाच माहीत्येय.
आज दुपारी आम्ही जुने फोटो काढून बघत बसलो होतो .
तसा तिचा आज मूडही माझी टेर खेचण्याचा होता.मी पण ढील देत होतो .आधी ढील द्यावी आणि नंतर खेचावं हे आपलं खास टेकनीक आहे
माझ्या लहानपणचे फोटो.
चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेचा फोटो. (फोटोवरून काही कळ्ळत नाही हं हुषारी.)
मुंजीतला मातृभोजनाचा फोटो . (आत्ता मला कळ्ळं ताटाखालचं मांजर म्हणजे काय)
मग मी माझा अगद्दी म्हणजे अगदी लहानपणचा फोटो दाखवला.
बादलीत उभा असलेला मी .(ह्या फोटोत काही स्पष्ट दिसत नाहीय्ये)
मग मी आज्जी पायावर घालून मला तेल मालीश करत्येय तो फोटो दाखवला.
हा फोटो जरा बारकाईनीच बघत होती ती आणि मग अचानक म्हणाली
लहानपणी सगळं कसं इवलं इवलसं अस्तं ना ?
हो ना .मी भाबड्या सुरात म्हणालो
आणि माझ्याकडे बघत एकदम लाजलीच .
मी अक्राळविक्राळ हसायला लागलो मग ती मला बुक्क्यानी मारायला लागली .
ढील देऊन झाली होती. खेचायची वेळ माझी होती . दुपार फुल्ल टूस वसूल झाली .
हा फोटो नंतरचा आहे .
समझ्या क्या ?
-----------------------------------------------------------------------------
आज लपवलेला फोटो बाहेर काढला.
रेसींग हँडबुकच्या मागे दडवून ठेवला होता.
गेले सहा महीने छळ मांडला होता.
सारखा सारखा फोटो दाखवत म्हणायची दिसत्येय ना कंठी माझ्या गळ्यात ?
कुठे ठेवलीस गहाणवटीत चांडाळा ?
मग एकदम रडायला लागायची . अरे माझ्या बापाची एकच आठवण आहे रे ती...
बायकोला तर कंटाळा आला होता .
गेल्या महीन्यात म्हणाली सांगा ना त्यांना एकदा. कळू दे त्यांना पण ...
मला तरी कुठे आठवतंय ?
पूना बंगलोर बाँबे कुठल्या सिझनसाठी गहाण टाकला होता ते पण आठवत नव्हतं.
हॉस्पीटलात पण डॉक्टर -नर्स -आया बाया सगळ्यांना फोटो दाखवत सुटली होती म्हातारी.
मला पण वैताग आला स्साला.
एक तर लक चालत नाही आणि वर दिवसरात्र ही बडबड.
लपवूनंच टाकला फोटो.
कालच्या डर्बीत रामस्वामीच्या चैतन्यचक्रम नी हात दिला.
आणली सोडवून कंठी एकदाची.
पण ही तर आधीच निघून गेली
आता हा फोटो माझ्या खाजगी नरकाचा एंट्रीपास.
------------------------------------------------------------------------------

इतिहासविचार

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

6 Feb 2012 - 11:11 am | विसुनाना

शेवटचा मास्टरपीस फारच आवडला. स्वयंभू कथा आहे ती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2012 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटचा मास्टरपीस फारच आवडला. स्वयंभू कथा आहे ती.
सहमत आहे.

सालं रामदास हे नाव आमच्या मिपाचं वैभव आहे. ग्रेट.

-दिलीप बिरुटे

कालच्या डर्बीत रामस्वामीच्या चैतन्यचक्रम नी हात दिला.
आणली सोडवून कंठी एकदाची.
पण ही तर आधीच निघून गेली
आता हा फोटो माझ्या खाजगी नरकाचा एंट्रीपास.

सर्र्र्र्र्र्र्र्र्कन काटा आला अंगावर! वरतीच गोड गुदगुल्या वाटल्या. रामदासपण ढील देऊन कधी खेचतील भरोसा नाही! :(
अप्रतिम. सगळ्या कोडॅक मोमेंटस ह्या स्वतःत्र गोष्टीच आहेत! :)

मनराव's picture

6 Feb 2012 - 11:28 am | मनराव

जुने सगळे कोडॅक मोमेंट्स डोळ्यासमोर तरळुन गेले.......

श्रावण मोडक's picture

6 Feb 2012 - 12:31 pm | श्रावण मोडक

सलाम!
हे लिहिण्याचा शब्द पाळलात तुम्ही. आता तुमचे आधीचे इतर अधुरे लेखन अधुरेच राहिले तरी चालेल. ती अधुरेपणाची हुरहूर साठवून घ्यावी, आणि हे असे काही क्षण अंगी भिनवावेत, त्यासोबत आपल्याही जगण्यातले असे काही क्षण आठवावेत...
सुख म्हणजे काय असतं, या प्रश्नाचं उत्तर असं कधीतरी गवसत जातं आणि मी तेच घिसंपिटं वाक्य म्हणतो, जीवन सुंदर आहे!

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Feb 2012 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते

साहेब! साहेब!! साहेब!!!

खरं संगायचं तर हे वाचतानाचा अनुभव आणि मनात दाटून आलेल्या भावना याच एक कोडॅक मोमेंट झाल्यात माझ्यासाठी. आणि असे कित्येक कोडॅक मोमेंट्स तुम्ही दिलेत आत्ता पर्यंत.

आता हा फोटो माझ्या खाजगी नरकाचा एंट्रीपास.

ही आणि अशी कित्येक वाक्यं... तुमच्या लेखनातून भेटलेली, तुमच्याशी बोलताना भेटून गेलेली... त्या अडगळीच्या खोलीबद्दल आपण बोललो होतो ते ही आठवलं.

यासगळ्याबद्दल काही बोलणं मला शक्य नाही. केवळ, भाग्य आहे सालं म्हणून हे मिळालं, एवढंच सध्या तरी म्हणतो.

_/\_

पक पक पक's picture

6 Feb 2012 - 1:28 pm | पक पक पक

एकदम कड्क मोमेंट्स !! :) झक्कास ,दिल्खुश ,मस्त लिहीता रामदास साहेब..... _____/\_____

सन्जोप राव's picture

6 Feb 2012 - 1:49 pm | सन्जोप राव

हेच लेखन लोकप्रभात वाचलं तेंव्हा शेवट वेगळा असल्यानं एका अस्ताला गेलेल्या ब्रॅन्डचं स्मरण वाटलं होतं. इथं बघतो तर हे काय भलतंच...
रामदास या माणसाची भीती वाटायला लागली आहे....

मूकवाचक's picture

6 Feb 2012 - 2:26 pm | मूकवाचक

_/\_

कवितानागेश's picture

6 Feb 2012 - 2:27 pm | कवितानागेश

सगळ्याच मोमेंट्स आवडल्या.

माझीही शॅम्पेन's picture

6 Feb 2012 - 2:29 pm | माझीही शॅम्पेन

जबरदस्त

___/|\____

काय बोलू.. निखळ सुंदर..

मी काही बोलणार नाही.
माझी तेवढी लायकी नाही.
_/\_

प्यारे१'s picture

6 Feb 2012 - 3:46 pm | प्यारे१

खरंच.

आम्ही रामदास काकांना छान म्हणणं म्हणजे....
म्हणूनच आतापर्यंत गप्प होतो. :|

मी-सौरभ's picture

6 Feb 2012 - 7:44 pm | मी-सौरभ

.....

सोत्रि's picture

6 Feb 2012 - 8:21 pm | सोत्रि

_/!\__/!\__/!\_

- (दिग्मुढ झालेला) सोकाजी

प्रीत-मोहर's picture

6 Feb 2012 - 3:00 pm | प्रीत-मोहर

__/\__

वपाडाव's picture

6 Feb 2012 - 3:36 pm | वपाडाव

दं ड व त
__/\__

विजुभाऊ's picture

6 Feb 2012 - 3:45 pm | विजुभाऊ

काही ल्हिणार नाही................

स्मिता.'s picture

6 Feb 2012 - 3:53 pm | स्मिता.

लिखाणाबद्दल मी काय बोलावं? ते सुंदर सुरेख, अप्रतिमच... हलक्या फुलक्या मोमेंट्सने सुरुवात करत शेवटच्या मोमेंटने काळजाचा ठाव घेतला.

स्मरणरंजन, आठवणी या विषयात काका तुम्ही मास्टर आहात!

सूड's picture

6 Feb 2012 - 3:55 pm | सूड

__/\__

सुहास झेले's picture

6 Feb 2012 - 4:14 pm | सुहास झेले

निशब्द झालो..... इतकंच म्हणेन की....काका, तुमचं लिखाण काळजाला भिडतं !!

हरिप्रिया_'s picture

6 Feb 2012 - 4:24 pm | हरिप्रिया_

अ प्र ति म!!!
खुप हळव करता तुम्ही काका.....

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2012 - 4:27 pm | अत्रुप्त आत्मा

सलाम....कबुल हो....!

सगळे कोडेक मुमेंत आठवले.
का कोणास ठावूक पण शेवटच्या प्रसंन्गात अप मधला म्हातारा डोळ्यासमोर आला.

स्पा's picture

6 Feb 2012 - 5:24 pm | स्पा

__/\__

कडक चाबूक.........
शेवट काळजाचा ठाव घेणारा

टिवटिव's picture

6 Feb 2012 - 5:29 pm | टिवटिव

__/\__

चिगो's picture

6 Feb 2012 - 5:30 pm | चिगो

कसं जमतं हो तुम्हाला? निशब्द झालोय.. एकाच लेखात आनंद, खट्याळपणा, हुरहूर आणि दु:ख ह्या वेगवेगळ्या भावना अनुभवायला दिल्यात तुम्ही.. काय बोलणार? गणपा म्हणाला तेच, लायकी नाही माझी.. (जनरली मी "आपली" असं लिहीलं असतं स्वतःबद्दल कदाचित.. आता टाप नाही तेवढी)

धन्यवाद..

इरसाल's picture

6 Feb 2012 - 6:16 pm | इरसाल

वरील सर्व प्रतिक्रियान्शी सहमत.

५० फक्त's picture

6 Feb 2012 - 6:31 pm | ५० फक्त

मस्त एकदम मस्त छान वाटलं,,

कुठे सुरुवात, कुठे शेवट? चांदीच्या कमोडिटीतून कोडॅक मोमेंट्समधे कधी शिरलात समजलंच नाही.
अल्बममधला एकेक फोटो बघतानाच मनात कुठेतरी धाकधूक सुरु झाली होती की धोबीपछाड बसणार!
गालावरून मायेनं हात फिरवता फिरवता एकदम खण्णकन मुस्कटात भडकवावी तसं झालं सालं.
आता आलं दिवसभर गाल चोळत बसणं....
तुम्ही अशक्य आहात!

-रंगा

सानिकास्वप्निल's picture

6 Feb 2012 - 7:10 pm | सानिकास्वप्निल

सगळे मोमेंट्स सुंदर
सुंदर लिखाण :)

कोडॅक म्हणजे शेअर मोमेंट्स शेअर लाइफ.

मस्त एकदम

बहुगुणी's picture

6 Feb 2012 - 7:56 pm | बहुगुणी

फक्त पाचच मिनिटं वेळ होता मिपावर डोकवायला, फार बरं झालं मी रामदासांचा लेखच उघडून वाचला, नेहेमीप्रमाणेच- चीज झालं वाचण्याचं.

आणखी लिहिलं असतंत तरी वाचतच राहिलो असतो, वेळ नसतानाही, पण थांबवलंत तिथे आवंढा आणलात!

पॉल सायमनचं एक गाणं आठवलं:

" alt="" />

When I think back
On all the crap I learned in high school
It's a wonder
I can think at all
And though my lack of edu---cation
Hasn't hurt me none
I can read the writing on the wall

Kodachrome
They give us those nice bright colors
They give us the greens of summers
Makes you think all the world's a sunny day, Oh yeah
I got a Nikon camera
I love to take a photograph
So mama don't take my Kodachrome away

If you took all the girls I knew
When I was single
And brought them all together for one night
I know they'd never match
my sweet imagination
everything looks WORSE in black and white

Kodachrome
They give us those nice bright colors
They give us the greens of summers
Makes you think all the world's a sunny day, Oh yeah
I got a Nikon camera
I love to take a photograph
So mama don't take my Kodachrome away

मयुरा गुप्ते's picture

6 Feb 2012 - 10:39 pm | मयुरा गुप्ते

देवा...म्हातार्‍याच्या पोतडीतुन आलेले अनुभव/लेखन पेलण्याची ताकद दे रे बाबा...

निशब्द!!!!

--मयुरा.

धनंजय's picture

6 Feb 2012 - 10:48 pm | धनंजय

फारच आवडले - नेहमीसारखे.

(प्रास्ताविक भाग पुढच्या कोडॅक मोमेंट्सइतका आवडला नाही. सोन्यापुढे चांदी फिकी, इतपतच... लुटणार्‍याने चांदी लुटली, तरी आम्ही आनंदाने वेचूच.)

ज्ञानेश...'s picture

6 Feb 2012 - 11:01 pm | ज्ञानेश...

असंख्य फ्लॅश क्लिक झाले, मनातल्या मनात.

चिंतामणी's picture

6 Feb 2012 - 11:17 pm | चिंतामणी

प्रतिक्रीया लिहायला. :~ :-~ :puzzled:

तुम्हाला माणूस इतका स्वच्छ वाचता येतो काय?
भिती वाटते आता.
जरा गम्मत वाटेपर्यंत पुढे काहीतरी वाईट वाटवणारे असणार अशी खात्री होती.

पिवळा डांबिस's picture

7 Feb 2012 - 2:09 am | पिवळा डांबिस

आजचं लॉग-इन वसूल!
जियो!!!

प्राजु's picture

7 Feb 2012 - 2:41 am | प्राजु

रामदास!!! रामदास!! रामदास!!!
लेखामध्ये फक्त रामदास!! जियो काका!!

इतके मोमेंत्स जपून ठेवलेले असतात मनात... आज सगळ्याची उजळणी झाली..

अर्धवटराव's picture

7 Feb 2012 - 3:37 am | अर्धवटराव

आयला... आम्ही असं ठरवून वगैरे फ्रायडे इव्ह घालवतो... कधी बीअर+बतोलेबाजी, तर कधी गजल वगैरे आणि व्हिस्की... त्या सगळ्या मैफीलीची धुंदी रामदास काकांच्या एका पानभर लेखाने परत देऊन जावी असं होत आलय. हा लेख तरी कसा अपवाद असणार.
__/\__

अर्धवटराव

इन्दुसुता's picture

7 Feb 2012 - 7:11 am | इन्दुसुता

लेखन अतिशय आवडले. श्रामो यांच्या प्रतिसादाशी बहुतांशी सहमत.

sneharani's picture

7 Feb 2012 - 11:29 am | sneharani

अप्रतिम्..!सुरेख...! किती विशेषणं लावलीत तरीही कमी पडतील!!
शेवटचा मास्टरपीस....हातच जोडले!!सलाम!
:)

सुहास..'s picture

7 Feb 2012 - 12:28 pm | सुहास..

स्मरण रंजन आवडले !!

दिपक's picture

7 Feb 2012 - 4:40 pm | दिपक

___/\___
रामदास काकांचे लेख आमच्यासाठी मिपावरचे बेस्टेस्ट मोमेंट्‍स आहेत.

धमाल मुलगा's picture

7 Feb 2012 - 4:49 pm | धमाल मुलगा

दर वेळी कुठून कौतुकाचे, आनंदाचे, दु:खाचे वेगवेगळे शब्द आणायचे आम्ही भिका मागून? काही प्रतिक्रिया देणार नाही ज्जा!

अवांतरः काकानु, असंच एकदा डोंगरेंच्या "बाळापासून बाबापर्यंत " असलेल्या प्रॉडक्शन रेंजबद्दल लिहा की.

पैसा's picture

7 Feb 2012 - 10:31 pm | पैसा

आत्यंतिक सुंदर लेख! मिपाच्या आयुष्यातली ही एक कोडॅक मोमेंट आहे. कोडॅक निघाली आहे. एकेक दिवस तुम्ही, आम्ही सगळेच निघून जाऊ, पण या कोडॅक मोमेंट्स अशाच चिरंतन राहतील. स्माईल प्लीज!

जाई.'s picture

7 Feb 2012 - 11:12 pm | जाई.

_/\_

विजुभाऊ's picture

12 Sep 2016 - 11:49 am | विजुभाऊ

रामदास भौ..... हा लेख ही आमचीही एक कॉडॅक मोमेंट....... _/\_

Rahul D's picture

13 Sep 2016 - 2:11 am | Rahul D

+1111

Rahul D's picture

13 Sep 2016 - 2:11 am | Rahul D

+1111

शित्रेउमेश's picture

13 Sep 2016 - 8:49 am | शित्रेउमेश

क्लीक... क्लीक... क्लीक... क्लीक... क्लीक...
खूप सार्‍या आठवणी जागवल्या.....

रामदास हे नाव आमच्या मिपाचं वैभव आहे. ग्रेट.
काका , कुठून आणता हि कल्पनाशक्ती ?
अफलातून आहे तुमची लेखनशैली
त्रिवार नमस्कार