तुझ्या एका शब्दासाठी
तुझ्या एका शब्दासाठी
वाट किती मी पहावी
तुझ्या एका शब्दामुळे
मला कविता सुचावी
माझी कविता अधुरी
तुझ्या एका शब्दाविना
जसा जीव चातकाचा
तडफडे थेंबाविना
तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
स्वप्नपाखरासवे मी
शब्दशिंपले गुंफले
तुझा शब्द येता कानी
देहभान हरपले
"काव्य झाले तनमन,"
माझे आभाळ बोलले!!!
प्रतिक्रिया
30 Oct 2007 - 11:41 pm | देवदत्त
छान कविता आहे.
31 Oct 2007 - 12:06 am | बेसनलाडू
छान अष्टाक्षरी. आवडली.
(वाचक)बेसनलाडू
31 Oct 2007 - 2:18 am | नंदन
म्हणतो. शेवटचे कडवे विशेष आवडले.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
31 Oct 2007 - 12:07 am | धनंजय
> तुझ्या एका शब्दामुळे
> मला कविता सुचावी
> माझी कविता अधुरी
> तुझ्या एका शब्दाविना
यांतील दुहेरी अर्थ खास.
31 Oct 2007 - 12:38 am | विसोबा खेचर
नेहमीप्रमाणेच सुंदर कविता..
तुझ्या एका शब्दामुळे
मला कविता सुचावी
ह्या ओळी सुरेख वाटल्या!
अवांतर - अगो सुवर्णमयी तुझा पत्ता काय? आहेस कुठे? बर्याच दिवसांनी मिसळपाववर दिसते आहेस!
असो, तुझ्याकडून अजूनही अश्याच उत्तम कविता मिसळपाववर लिहिल्या जाव्यात हीच इच्छा!
तात्या.
31 Oct 2007 - 12:54 am | प्राजु
पण खरं सांगू....
तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
तुझ्या शब्दरंगामध्ये
एक चित्र भिजलेले
इथे काहीतरी खटकते आहे....
तुझा शब्द येता कानी
देहभान हरपले
"काव्य झाले तनमन,"
माझे आभाळ बोलले!!!
हा एकदम सह्हि!
प्राजु.
31 Oct 2007 - 1:13 am | प्राजु
तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
स्वप्नपाखरासवे मी
शब्दशिंपले गुंफले
हे छान आहे.
- प्राजु.
31 Oct 2007 - 1:41 am | प्रियाली
वाव्वा! वाव्वा! वाव्वा! ;-)
31 Oct 2007 - 9:23 am | आजानुकर्ण
पद्मजा फेणाणी यांच्या "ही शुभ्र फुलांची ज्वाला" या क्यासेटमध्ये "तुझ्या एका हाकेसाठी... किती बघावी वाट" अशी कविता आहे तिची आठवण झाली. ती कविता यशवंत देव यांची होती असे वाटते.
ही कविता...
तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी ही वाट.....
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट.....
तुझ्या एका हाकेसाठी,
उभी कधीची दारात,
तुझी चाहूलही नाही,
होते माझीच वरात....
तुझ्या एका हाकेसाठी,
हाक मीच का घालावी ?
सात सुरांची आरास,
मीच मांडून मोडावी.....
आले दिशा ओलांडून,
दिली सोडून रहाटी.....
दंगा दारात हा माझा,
तुझ्या एका हाकेसाठी......
तुझ्या एका हाकेसाठी,
किती बघावी ही वाट.....
माझी अधिरता मोठी
तुझे मौन ही अफाट
(कानसेन) आजानुकर्ण जोगळेकर
31 Oct 2007 - 9:47 am | सुवर्णमयी
हे गाणे खूप छान आहे, त्यातला भाव तर फार मनाला भिडणारा आहे... हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकले तेव्हा कितीदा अडवले तरी माझ्या मनातले विचार त्याच सुरावटीत येऊ लागले. पण त्या गाण्यावर आधारित ही कविता आहे म्हणणार नाही. (कारण माझी कविता अगदी साधी आहे, त्यात अभिप्रेत अर्थ आणि कल्पना सुद्धा वेगळी आहे. )हे पूर्ण गाणे दिल्याबद्दल आभारी आहे.
31 Oct 2007 - 10:12 am | आजानुकर्ण
पद्मजांच्या आवाजात गाणे ऐकायला खूप मस्त वाटते. या अल्बममधली "पाऊस कधीचा पडतो" ही कवितासुद्धा मस्त आहे. या अल्बमसोबत आलेला "हसरा श्रावण" नावाचा दुसरा अल्बमही मस्त होता. (चूभूदेघे) कुसुमाग्रज, शांताबाईंची गाणी त्यात होती असे पुसटसे आठवते.
31 Oct 2007 - 1:07 pm | स्वाती दिनेश
कविता आवडली,छान अष्टाक्षरी!
अवांतरः
पाऊस कधीचा पडतो,
झाडांची हिरवी पाने,
हलकेच जाग मज आली,
दु:खाच्या मंद सूराने...
पुढच्या ओळी आठवत नाहीत :(
ग्रेस यांची कविता ना? छानच आहे ती कविता,मला खूप आवडते,पण त्यांच्याच "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.." पेक्षा कमी प्रसिध्द आहेसे वाटते.(चू.भू.दे.घे.)
स्वाती
31 Oct 2007 - 10:15 pm | आजानुकर्ण
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती
पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला
संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्यावरती लाटांचा आज पहारा
- आजानुकर्ण गोडघाटे
अल्बमचे नाव या कवितेतील ओळींवरूनच दिले आहे असे वाटते
- (अंदाजपंचे) आजानुकर्ण
1 Nov 2007 - 1:02 pm | स्वाती दिनेश
कर्णा,
सगळी कविता इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद,
स्वाती
31 Oct 2007 - 9:49 pm | सर्किट (not verified)
तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
स्वप्नपाखरासवे मी
शब्दशिंपले गुंफले
ह्या ओळी खूप आवडल्या.
-सर्किट
31 Oct 2007 - 10:19 pm | आजानुकर्ण
शिवाय
माझी कविता अधुरी
तुझ्या एका शब्दाविना
या दोन ओळीही अतिशय सुरेख आहेत.
31 Oct 2007 - 9:51 pm | सुवर्णमयी
सर्वांचे आभार,
मनमोकळ्या प्रतिसादाने लेखनास मदत होते, दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.
1 Nov 2007 - 12:23 am | विसोबा खेचर
मनमोकळ्या प्रतिसादाने लेखनास मदत होते, दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.
दुसर्याला मनमोकळा प्रतिसाद देणे, दाद देणे हे मिसळपावचे वैशिष्ठ्य आहे!
फक्त आपल्याच गोटातल्या लोकांना प्रतिसाद 'प्रसवणे' आणि इतर कुणाचीही दाद नाही म्हणून इतर संकेतस्थळांवर दुसर्या नावांनी त्या कविता 'प्रसवणे' असले प्रकार मिसळपावकडे नाहीत!
मिसळपाव ही चार जिंदादील लोकांची टपरी आहे. इथे यावं, मिसळ खावी, ताक प्यावं, एकमेकांच्या लेखनाला दिलखुलास दाद द्यावी, नावं ठेवावी आणि पुढच्या पोटापाण्याच्या उद्योगाला निघून जावं! इतका साधा, सोपा आणि सरळ उद्देश आहे या टपरीचा!
असो, सोनाली तुला पुढील लेखनाकरता शुभेच्छा! इथे तुझ्या लेखनाची मनमोकळी दखल नेहमीच घेतली जाईल याची खात्री बाळग!
आपला,
(जुन्नरच्या यष्टी ष्टँड वरची मिसळ आवडणारा!) तात्या.
1 Nov 2007 - 6:20 pm | आजानुकर्ण
तात्या, जुन्नरला कधी गेला होता?
नारायणगांव यष्टी ष्ट्यांडावर मस्त भेळ मिळते. आम्ही मंचरवरून स्पेशल भेळ खायला नारायणगांवला जायचो. आणि नारायणगांव ते कळंब या मार्गावर हॉटेल गोकुळ आहे तिथली मिसळ खायला विसरु नका.
(नारायणगावची भेळ आणि हॉटेल गोकुळची मिसळ आवडणारा) आजानुकर्ण
1 Nov 2007 - 1:23 pm | अभिजितसावंत
कविता फार छान आहे.
प्रेम असाव तर ह्या कवितेसारख.
1 Nov 2007 - 4:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
स्वप्नपाखरासवे मी
शब्दशिंपले गुंफले
या चार ओळी अधिक आवडल्या '' श्वासात शब्दांचे आभास" हे तर अप्रतिम.
अशाच चांगल्या कविता वाचायला मिळतील, या आशेने पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा !
मनमोकळ्या प्रतिसादाने लेखनास मदत होते. काय म्हणता ? :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
1 Nov 2007 - 5:16 pm | स्वाती राजेश
तुझ्या एका शब्दासाठी
वाट किती मी पहावी
तुझ्या एका शब्दामुळे
मला कविता सुचावी
शब्दांची सुंदर गुंफण केली आहेस. आशाच सुंदर ओळी तु़झ्या कडून वाचायला मिळू देत.
20 Dec 2007 - 6:00 pm | लबाड मुलगा
छान वाटले
पक्या
21 Dec 2007 - 8:47 pm | धोंडोपंत
सोनालीताई,
अप्रतिम कविता. हार्दिक अभिनंदन. क्या बात है ! एकदम सही.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com