घृतं पिबेत

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
20 Jan 2012 - 10:51 am

असेही दिवस होते की सांजवात तिळाच्या तेलात भिजायची तर निरांजनातल्या फुलवाती साजुक तूपात भिजायच्या. अंबाडीच्या भाजीवरची लसणाची फोडणी तेलात व्हायची तर कढीला चुर्रकार फोडणी तूपातली मिळायची. जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता.
देव्हार्‍यातला बाळकृष्ण पण लोणी साखरेच्या वाटीवर नजर ठेवूनच आंघोळीला तयार व्हायचा.सोळा सोमवारच्या व्रतानी भोळा शंभो प्रसीद प्रसीद व्हायचा तो लोणकढ्या तुपातल्या चुरम्याच्या लाडवामुळे आणि सत्यनारायणाच्या शिरा दुसर्‍या दिवशी खाल्ला की परब्रह्म जरा जास्तच चांगले प्रकट व्हायचे.बेंबीला चिमटा काढून वर्षभरात अंगारकीचा एखादाच उपास दिवसभर व्हायचा तो संध्याकाळी वाफाळत्या मोदकावर साजुक रवाळ तुपाचा घसघशीत हप्ता मिळावा या आशेवरच.
इडलीसोबत पुडीची चटणी तिळाच्या तेलात पावन होऊन यायची आणि उडदाच्या पापडाची लाटी अंगभर तेलात माखून "गिळा आता" म्हणायची.
सांगायचं होतं ते असं की ही तेलं तूपं म्हणजे कुकींग मिडीयम नव्हती तर पाककृतीचे अ‍ॅक्टीव्ह कांपोनंट असं त्यांचं स्वयंभू अस्तित्व होतं.त्यांच्या स्वादाचा आपापला महीमा होता. अन्न पूर्णब्रह्म होतेच पण त्यानी कसे प्रकट व्हावे त्याचे काही अलिखीत संकेत होतेच.
घरी वापरायचं तूप घरीच कढवलं जायचं आणि तेल आणायला शनीवार वगळता तेलाच्या घाण्या होत्या. लग्न कार्य वगैरे वगळता रोजचं तूप घरीच कढवलं जायचं. लोणी कढवायला घेतलं की वासाची पहीली नोट नको नकोशी आंबुस असायची मात्र सेकंड नोट खमंग तुपाची . तो खमंग दरवळ संध्याकाळपर्यंत घरभर फिरत असायचा. खमंग रवाळ तूप. त्याचे शेवटचे चार थेंब वसूल करण्यासाठी भिंतीला कलतं करून ठेवलेलं पातेलं हातात आलं की बचकभर साखर घालून दत्त दत्त । दत्ताची गाय । गायीचं दूध ।दुधाची साय म्हणत म्हणत बेरी खरवडून पोटात ढकलेपर्यंत चैन पडायची नाही.
पोल्सनचा मस्का आणि पाव "नस्ती थेरं" या सदरात मोडायची.
पण एकाएकी सगळ्या व्यवस्थेचे सांधे बदलले. माणसं वाढली -भुकेची पोटं वाढली आणि अन्न कमी पडायला लागले. आता निवृत्तीच्या वयात असणार्‍या बर्‍याच जणांच्या बालपणीचे हे चित्र आहे.नंतर वेगाने समाजव्यवस्था एकेका दशकात सांधे बदलत गेली .चिंता -क्लेश-दु:ख -दरीद्र देशांतराला गेलीच नाहीत पण माणसं मात्र जगायला घराच्या बाहेर पडली. अस्तित्व तगवून धरण्याची एक न संपणारी लढाई सुरु झाली. कमाई आणि खर्चाची दोन टोकं जुळवता जुळवता घरातली कर्ती माणसं टेकीला आली . स्वस्त साधन स्त्रोताचे शोध सुरु झाले. माल्थस नावाचा एक शहाणा माणूस कधीतरी म्हणाला होता की भूमीतीय गुणोत्तराने वाढणार्‍या प्रजोत्पादनाला अंकगणितीय श्रेणीनी वाढणारे अन्न पुरेसे पडणार नाही. त्यानी कदाचीत अर्थशास्त्राचा विचार केल असेल पण प्राण्यांच्या जिवंत राहण्याच्या दुर्दम्य नैसर्गीक इच्छाशक्तीचा विचार केला नसावा. आठवड्यातले तेलातुपाचे दिवस कमी झाले .
डालडा म्हटल्यावर नाक मुरडणारी माणसं रांगेत उभं राहून डालडा आणायला लागली.
तसं आपल्याकडे डालडा काही नविन नव्हतं पण त्याला सैपाकघरात मान्यता नव्हती पण नंतर हळूहळू तेल किंवा तूप म्हणजे वनस्पती तूप मिळणे हेच परमोच्च भाग्याचे लक्षण आहे हे कळल्यावर असल्या शंका मनात येणेच बंद झाले .
सैपाकघरात एकदा डालडा आला आणि नंतर कायमचा तेथेच राहीला. याचे श्रेय जाते हिंदुस्थान लिव्हरच्या चिवट मार्केटींगला. सुरुवातीला हातगाडीवर स्टोव्ह आणि कढईचा संसार मांडून एक माणूस डालडात पुर्‍या तळून दाखवायचा आणि जमलेल्या गर्दीला आग्रहानी खायला घालायचा.कै.सुधीर फडक्यांच्या आत्मकथनात याचा उल्लेख वाचलासा वाटतो आहे त्यानंतर डालडात बनवायच्या पाककृतींचं पुस्तकं पण आलं .
डालडा म्हणजे काय तर हायड्रोजीनेटेड तेल.
तेलापासून बनवलेलं तूप .म्हणून वनस्पती तूप.
दिसायला साजुक तूपासारखं .
रंगानी आकर्षक आणि चवीनी एकदम बुद्दू.
साधारण तेलाच्या रेणू शृंखलेतल्या रिकाम्या शिटा हायड्रोजनच्या रेणूंनी भरून काढल्या की झालं वनस्पती तूप तयार.
पॅलॅडीयम नावाच्या एका धातूच्या मदतीने हे स्थित्यंतर सहज शक्य होते कारण आकारमानाच्या नऊशे पट हायड्रोजनचे रेणू वाहून नेण्याची क्षमता या धातूत आहे. हायड्रोजीनेशन केल्यावर तेलाचं जे काही होतं त्याला म्हणायचं वनस्पती तूप . त्यात थोडासा बदल करून -जीवनसत्वाची भर घालून हिंदुस्थान वनस्पती मॅन्युफॅक्चरींग कंपनीने पहील्यांदा डालडा भारतात आणलं. नंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान लिव्हर झालं.
डालडा ह्या नावाचा मात्र एक वेगळाच किस्सा आहे. सुरुवातीला हे वनस्पती तूप भारतात आयात केलं जायचं डाडा अँड कंपनी मार्फत . लिव्हरला मात्र स्वतःचा मालकी हक्क दाखवायचा होता मग त्यात तडजोड म्हणून एल जोडून डालडा नाव तयार झालं. युनीलिव्हरचा इतिहास मात्र थोडी वेगळी कथा सांगतो . हार्टॉग्ज या कंपनीने १९२६ साली डालडा ह्या नावाची मक्तेदारी घेतली. युनीलिव्हरचा साम्राज्यवाद मोठा की भारतीय प्रजेची भूक (आणि नड )मोठी हे कळायला मार्ग नाही पण डालडा अस्तित्वात आल्यापासून पाच वर्षाच्या आत शिवडीच्या फॅक्टरीत डालडा बनायला सुरुवात झाली. १९३७ साली प्रकाश टंडन नावाच्या एका भारतीयाला बोर्डावर घेऊन लिव्हरनी आपले हेतू स्पष्ट केले आणि त्यानंतर हिंदुस्थान लिव्हरच्या अश्वमेधाचा घोडा अडवायला कुणीच धजावलं नाही.
१९६५ -१९७१ ची दोन युध्दं झाली -सत्तर एकाहत्तर बहात्तरचा ची वर्षे लागोपाठ अवर्षणाची गेली आणि डालडा पण काळ्या बाजारात गेलं . लोकसभेत डालडाच्या वाढत्या भावावर आणि दुर्भीक्षावर अनेक चर्चा झडल्या आणि डालडा रेशन कार्डावर मिळायला लागलं.
राहणीमान बेचव झालं पण तगून राहण्याची गरज त्यापेक्षा मोठी होती .
दादर स्टेशनला उतरल्यावर सामंतांच्या दुकानातल्या काचबंद पेटीतल्या लोण्याच्या प्रचंड आकारमानाच्या गोळ्याकडे बघून सुस्कारा सोडून लोकं पुढे निघून जाताना मी बघीतली आहेत. खानदेश -कोईंबत्तूर -बेळगाव ही लोण्याची घराणी आजही कसाबसा जीव तगवून उभी आहेत.
डालडाच्या स्पर्धेत अनेक नविन ब्रँड आले आहेत .पत्र्याच्या डब्यातलं डालडा प्लॅस्टीकच्या पिशवीत मिळायला लागलं.
नव्वदीच्या नंतर हेल्थ काँशस पिढी मिळवती झाली आणि नव्या मध्यमवर्गीय कुटुंबात डालडाची गरज संपली. कधी न ऐकलेल्या तेलबियांचं तेल घरात आलं . डालडानी पण डालडा अ‍ॅक्टीव्ह या नावाखाली पुन्हा एकदा सैपाकघर काबीज करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत नव्या सुनांनी आणि नव्या तेलांनी जम बसवला होता. (या नव्या तेलाची जाहीरात करणार्‍या कमनीय बांध्याच्या बाया कदाचीत लिव्हर कंपनीला मिळाल्या नसतील .)
काही वर्षापूर्वी लिव्हरनी डालडा ब्रँड विकून टाकला.
पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे .
चार्वाकानितीत फारसा फरक पडलेला नाही .
ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

तुमचंही असंच साजूक तुपातल लेखन....आपल्याला जाम
आवडत ब्वा..
हा लेखहि सुंदर

मृगनयनी's picture

20 Jan 2012 - 11:14 am | मृगनयनी

तुपासारखाच्च स्निग्ध लेख आहे... रामदास'जी..... :)

पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे

सहमत. :)

आमच्या पुण्यातल्या जुन्या वाड्यात एका अरुन्द कट्ट्यावर या डालड्याच्या जुन्या डब्यांमध्ये आम्ही विविध प्रकारचे वृक्ष (पक्षी : रोपं) लावत असू... व वृक्षारोपणाचा आनन्द लुटत असू... अर्थात हे वृक्ष त्यान्च्या बालपणीच एखाद्या चिऊ किन्वा काऊचे किन्वा साळुन्कीचे भक्ष्य बनले जायचे... पण तेव्हा आम्हाला वाटायचं... की डालड्याचा डबा हा मूलतः तुपाचा असल्यामुळे वृक्षाच्या मूळापर्यन्त पाणी पोचण्यास प्रॉब्लेम येत असावा. त्यामुळे वृक्ष वाढत नसावेत.... ;) आम्हाला त्यावेळी मातीच्या कुन्ड्या वापरण्यास मनाई होती....हाहा... वेरी फनी...

तसेच "डब्बा ऐसपैस" खेळताना पण या डब्ब्यान्चा मस्त वापर केल्या जायचा....

... बालपणीचा काळ सुखाचा..... :)

धन्यवाद... रामदास काका... :)

डालड्याच्या डब्याचे "ऑफ लेबल" वापर आठवू जाता सुतळीबाँबच्या स्फोटात अशा डब्यांचे बळी देऊन त्यांना छिन्नविच्छिन्न पोचे आलेले "डबडे" बनवले जायचे ते आठवलं.

शिवाय डबा ऐसपैस आणि स्टंप म्हणून एकावर एक उभे करणे हेही.

पियुशा's picture

20 Jan 2012 - 11:43 am | पियुशा

मस्त ! माहीतीपुर्ण लिखाण :)
आवडेश :)

अनुराग's picture

20 Jan 2012 - 6:41 pm | अनुराग

+१

अहाहा.. रामदासकाका.. लाजवाब..

धातूपासून तुपापर्यंत कोणत्याही विषयावर तुम्ही जे काही खास शैलीत लिहीता ते म्हणजे एकदम मेजवानीच..

अगदी घरगुती साजुक तुपातला बेसनलाडू खाल्ल्याचा आनंद मिळाला लेख वाचून..

प्रचेतस's picture

20 Jan 2012 - 11:01 am | प्रचेतस

लेखणही अगदी रवाळ, सुंदर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2012 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे .

क्या बात है. सॅल्यूट सर.........!!!

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

20 Jan 2012 - 7:36 pm | तुषार काळभोर

म्हणतो..

पैसा's picture

20 Jan 2012 - 11:13 am | पैसा

तेव्हा त्या डालडाच्या रिकाम्या पिवळ्या डब्यांचा पण अनेक प्रकारे उपयोग व्हायचा!
जरा बरी परिस्थिती आल्यावर आमच्यासारख्या मध्यमवर्गीयानी डालडा खाऊन घशाला त्रास होतो, वगैरे म्हणत डालडा वापरायचं सोडून दिलं. आता आता कोलेस्टेरॉल वाढेल या भीतीने तूप आणि खमंग वास येणारं गोडेतेल पण वापरायचं कमी झालं. पण त्याबरोबर आयुष्यातला स्निग्ध भागही कमी व्हायला लागलाय. :(

प्रकाश घाटपांडे's picture

20 Jan 2012 - 2:06 pm | प्रकाश घाटपांडे

तेव्हा त्या डालडाच्या रिकाम्या पिवळ्या डब्यांचा पण अनेक प्रकारे उपयोग व्हायचा!

त्यापैकी टमरेल म्हणुन असलेला वापर बहुजन हिताय बहुजन सुखाय असा होता. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jan 2012 - 11:16 am | विश्वनाथ मेहेंदळे

लेखक न वाचता धागा उघडला होता. पहिल्या २ वाक्यात अंदाज आला. मग खाली जाऊन बघितले तर अंदाज १००% बरोब्बर निघाला :-)

मस्त लेख काका. डालडा म्हटले की मला बटाट्याची चाळ आठवते. त्यात काही संदर्भ असावेत, त्यातील चित्रात डालड्याच्या डब्ब्यात तुळस दाखवली आहे असे अंधुक आठवते.

रामदास's picture

20 Jan 2012 - 9:22 pm | रामदास

या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आतल्या बाजूस तुम्ही म्हणता तसे चित्र आहे. त्या चित्रात प्रभाकर कंदील वापरा असे लिहीलेली पिशवी हातात घेतलेला एक माणूस आहे.

नगरीनिरंजन's picture

20 Jan 2012 - 11:17 am | नगरीनिरंजन

अष्टपैलू लेख.

साजूक नॉस्टॅल्जिया, एका बदलत्या कालखंडाचा वेध, शास्त्रीय व इतिहासाची माहिती, अचूक निरीक्षण, मार्मिक टिप्पण्या...काय नाही या लेखात?
लेख आवडला असे दरवेळी सांगण्यात अर्थ नाही.

मितभाषी's picture

20 Jan 2012 - 11:25 am | मितभाषी

आताच लोकप्रभामधेही हा लेख वाचला.

मेघवेडा's picture

20 Jan 2012 - 5:21 pm | मेघवेडा

तंतोतंत.

शेवटचे वाक्य अतिशय चपखल. :)

मृत्युन्जय's picture

20 Jan 2012 - 11:18 am | मृत्युन्जय

च्यायला साधे लेखन सुद्धा पुनः पुनः वाचावे असे का वाटते? वास्तविक विषय अगदी साधा "डालडा" किंवा बदलते राहणीमान. भाषा साधी सरळ, टोन नॉस्टेल्जिक. मग असे रामदास काकांच्या लिखाणान नक्की काय असते बरे की माणूसा गुंगुन पडतो? ज्या दिवशी हे समजेल तेव्हा आम्हाला पण थोडेफार वाचनीय लिहिता येइल बहुधा. :)

मराठमोळा's picture

20 Jan 2012 - 11:32 am | मराठमोळा

मृत्युंजयाच्या वाक्या वाक्याशी सहमत आहे.
रामदास काकांचे लेख म्हणजे एक मेजवानीच असते.. त्यांचे लेख एकदा वाचून समाधान होत नाहीच.
लेखनाबद्दल काय बोलावे, ईतके सुखद लिखाण की काही लिहायला-बोलायला शब्दच अपुरे पडतात..

...._/\_ ...

मन१'s picture

20 Jan 2012 - 11:53 am | मन१

तुपाळ, तुपकट, स्नेहन करणारे लेखाअवडले.

अर्धवटराव's picture

20 Jan 2012 - 11:32 pm | अर्धवटराव

लाजवाब.

(आजभी ममता कि कसौटी पे खरा) अर्धवटराव

पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे .

क्या बात है!! रामदासकाकांचे लेखन म्हणजे साजूक तुपासारखंच खमंग आणि पौष्टीक! :-)

अन्या दातार's picture

20 Jan 2012 - 11:32 am | अन्या दातार

पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळा डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटींग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्याचे चित्र म्हणजे आपल्या सामाजीक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहीलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे .
चार्वाकानितीत फारसा फरक पडलेला नाही .
ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे

मान गये जनाब!!!! स्थित्यंतर टिपण्याची तुमची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे.
__/\__ __/\__ __/\__

विनायक प्रभू's picture

20 Jan 2012 - 11:34 am | विनायक प्रभू

मस्त लेख.
डालडा चा डबा आणि टमरेल कसे काय राहीले बॉ?

इरसाल's picture

20 Jan 2012 - 11:41 am | इरसाल

अतिशय उत्तम लेख. वाचतच रहावासा वाट णारा.

हे घ्या. आन्जा साभार.

रामदास's picture

20 Jan 2012 - 9:19 pm | रामदास

चित्र बरगडी असलेल्या डब्यांचे आहे. आधीच्या डब्याला अशा बरगड्या (रिब्ज) नव्हत्या. त्यामुळे पॅकींगची स्ट्रेंग्थ कमी असायची.पोचे लवकर पडायचे . थोडा जास्त थावचा पत्रा वापरला की अशा रिब्ज पाडता येतात.

इरसाल's picture

25 Jan 2012 - 1:15 pm | इरसाल

काका तुम्हाला हा म्हणायचाय काय ?

प्रदीप's picture

25 Jan 2012 - 8:40 pm | प्रदीप

हे डबे नवीन दिसतात. जुने डालडाचे रिबलेस डब्बे मातकट पिवळ्या रंगाचे होते, त्यावरील झाडही दाट हिरव्या रंगाचे होते. मुळात लोगो असा झाडाच्या बुंध्याकडे लिहीलेला नव्हता. आणि ते लाल रंगातील 'नवीन' असे काही दिसते आहे, ते तर अजिबात नव्हते. थोडक्यात डबा असा चीयरफुल दिसत नसे.

sneharani's picture

20 Jan 2012 - 11:51 am | sneharani

मस्त लेख!!
:)

विसुनाना's picture

20 Jan 2012 - 12:08 pm | विसुनाना

डालडाच्या इतिहासाचा ललित लेखाजोखा आवडला.
***
'डालडा' ला जनमान्यता (नाईलाजाने) मिळाली तरी साजूक तुपाची प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही. मारवाडी लोक सर्वच पदार्थांत डालडा वापरतात असा आमचा समज होता - "पछे डालडा खायो कोनी?" असे खोचकपणे विचारून आम्ही आमच्या मारवाडी मित्रांची टर उडवत असू. 'आम्ही डालडा वापरतो' असे उघडपणे कोणीही मान्य करत नसे. पण घरातल्या फडताळाच्या फळीवर उभे असलेले हिरव्या रंगाचे आणि पिवळ्या मोठ्या झाकणचे लांबट फुग्याच्या आकाराचे प्लास्टिक डबे गुपित उघडे करत. ते डबे तिखट, खडे मीठ भरून ठेवण्याच्या कामी येत.
मात्र 'खुसखुशीत अनारसे करण्यासाठी साजूक तुपापेक्षा डालडा जास्त चांगला' ,'थोडे तूप आणि डालडा यांच्या मिश्रणाने शाबुदाण्याची खिचडी बनवली तर जास्त खमंग लागते' असे अनुभवाचे बोल स्वयंपाकघरांतून ऐकू येत. आठवड्याला एकदा साजूक तूप कढताना खमंग वास घरात दरवळत असेच.
वरणभातावर कोणी डालडा घेतला किंवा रवा डालड्यात भाजून शिरा केला असे चित्र नव्हते.
***
मराठी समाजात आता मात्र साजूक तुपाचे आणि राईस ब्रान, सनफ्लॉवर रिफाईन्ड तेलांचे साम्राज्य आहे. याला आयटी इंडस्ट्रीचा हातभार आहे हे नाकारता येणार नाही. शिवाय डालडातील हायड्रोजनेटेड फॅट्समुळे हृद्रोग होतो हा समज सर्वत्र पसरला आहे. आता डा(ल)डा ला टाटा.

जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता. >>>>>>>

हे असले (अस्सल) काही बोलुन, आठवणींच्या जात्यात, आय टी लाईफ , पार दळून काढल्याबद्दल रामदास काकांचा निषेध !! ;)

जबराट लेख ओ काका

खेडूत's picture

20 Jan 2012 - 12:22 pm | खेडूत

मस्त!
खूप दिवसांनी ' तो कवी डालडा विकतो ' आठवले.. :)

आता वर्षभर अशीच साजूक मेजवानी मिळेल अशी अपेक्षा.

स्वाती दिनेश's picture

20 Jan 2012 - 12:46 pm | स्वाती दिनेश

सुंदर , साजूक तुपात भिजलेल्या अनेक आठवणींनी माखलेला लेख!
(स्मरणरंजनात मग्न)स्वाती

किसन शिंदे's picture

20 Jan 2012 - 12:50 pm | किसन शिंदे

पुढच्या 'आठवणीतल्या ब्रँड'ची आत्तापासूनच उत्सुकता लागलीय..

अभिज्ञ's picture

20 Jan 2012 - 12:52 pm | अभिज्ञ

अतिशय साजुक व रवाळ लेख.

मध्यंतरी कुठल्याश्या लेखात "आजकाल आईसक्रीम देखील "डालडा" तुपानेच बनवतात" असे वाचल्याचे स्मरते.

अभिज्ञ.

प्यारे१'s picture

20 Jan 2012 - 12:57 pm | प्यारे१

'साजूक तुपाच्या खालोखाल' (सौजन्य- माझ्या मावशीचे मिस्टर) असलेल्या वनस्पति तुपाची (च्यायला डाल्डाच म्हणायचं राव -टूथपेस्ट म्हणजे कोलगेट अथवा फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स तस्सं) आठवण करुन दिल्याबद्दल... धन्स.

डालडाच्या डब्याची रंगसंगती साधून "ऊमदा" नावाचं एक व.तूप आलं होतं. ते कोणाला आठवतंय का?

या नावावरुन ते तूप आहे की शक्तिवर्धक औषध, हेच कळत नाही.

डालडाचा उल्लेख चिंवि जोशींच्या चिमणराव मोटार घेतात त्या कथेत आला आहे. त्यांची मोटार घसरुन घाटात कोसळते आणि लोळागोळा होते.. मोरु आणि चिमणराव दु:खाने ते पहात असताना मोरुची कॉलेजमैत्रीण (कल्पना शहा किंवा तत्सम बहुधा) तिच्या अलिशान गाडीतून तिथे येते. तिच्या फॅमिलीसमोर शायनिंग मारायला मोरु त्या नष्ट झालेल्या कारविषयी म्हणतो , "जाऊ द्या अप्पा, असले डाल्डाचे डबे पुष्कळ आहेत आपल्याकडे."

हा उल्लेख पुलंच्या चाळीच्याही बराच आधीचा असावा. पण पुलंनी त्यात तुळस लावून एक सुंदर रचना साधली.. :)

विशाखा राऊत's picture

20 Jan 2012 - 5:07 pm | विशाखा राऊत

:)

रामदास's picture

20 Jan 2012 - 9:16 pm | रामदास

हा ब्रँड उमरेड अ‍ॅग्रो लिमीटेडचा ब्रँड होता. उमरेड नागपूर जवळचे एक गाव आहे .नागपूरचा एक तालुका आहे.

मूकवाचक's picture

20 Jan 2012 - 1:11 pm | मूकवाचक

मस्त लेख.

चैतन्य दीक्षित's picture

20 Jan 2012 - 1:41 pm | चैतन्य दीक्षित

खूप आवडला लेख.
असेच अजून वाचायला आवडेल.

चिगो's picture

20 Jan 2012 - 2:24 pm | चिगो

असेही दिवस होते की सांजवात तिळाच्या तेलात भिजायची तर निरांजनातल्या फुलवाती साजुक तूपात भिजायच्या. अंबाडीच्या भाजीवरची लसणाची फोडणी तेलात व्हायची तर कढीला चुर्रकार फोडणी तूपातली मिळायची. जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता.
देव्हार्‍यातला बाळकृष्ण पण लोणी साखरेच्या वाटीवर नजर ठेवूनच आंघोळीला तयार व्हायचा.सोळा सोमवारच्या व्रतानी भोळा शंभो प्रसीद प्रसीद व्हायचा तो लोणकढ्या तुपातल्या चुरम्याच्या लाडवामुळे आणि सत्यनारायणाच्या शिरा दुसर्‍या दिवशी खाल्ला की परब्रह्म जरा जास्तच चांगले प्रकट व्हायचे

देवाच्या कृपेने हे दिवस पहायला मिळालेयत. गावी घरी गायी-म्हशी असल्याने असेल, आमच्या घरात डालडाचे साम्राज्य आले नाही.. मात्र मोठ्या सणांच्या वेळी, समारंभांमध्ये त्याचा वापर असायचा.. आता तर डालड्यात "ट्रान्स फॅट्स" असतात हा शोध/समज पसरल्यापासून त्याची मक्तेदारी संपलीय..

रामदासकाका, तुमच्या पहील्याच पॅराने नॉस्टॅल्जियाचा सॉलिड झटका आलाय.. :-( लेख प्रचंड आवडल्या गेलेला आहे..

प्रकाश१११'s picture

20 Jan 2012 - 2:28 pm | प्रकाश१११

रामदासजी -सुरेख.भाषाशैली उत्तमः
तो खमंग दरवळ संध्याकाळपर्यंत घरभर फिरत असायचा. खमंग रवाळ तूप.
त्याचे शेवटचे चार थेंब वसूल करण्यासाठी भिंतीला कलतं करून ठेवलेलं पातेलं हातात आलं की बचकभर साखर घालून दत्त दत्त । दत्ताची गाय । गायीचं दूध ।दुधाची साय म्हणत म्हणत बेरी खरवडून पोटात ढकलेपर्यंत चैन पडायची नाही.

अतिसुंदर आहे ..

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 2:41 pm | परिकथेतील राजकुमार

रामदास काका हे मिपावरचे मोठ्ठे फाउंड आहेत असे मी आधीच म्हणलो होतो.

(ही जुनी आठवण कशी वाटली काका ? ) ;)

चतुरंग's picture

20 Jan 2012 - 8:57 pm | चतुरंग

फाइंड फाइंड! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jan 2012 - 2:52 pm | परिकथेतील राजकुमार

फाइंड फाइंड!

चक्क चक्क रंगाकाकांचा अभ्यास कमी पडला ?

डान्याचा लेख वाचला नाहीये का ? ;) फाउंडच बरोब्बर आहे.

इष्टुर फाकडा's picture

20 Jan 2012 - 3:10 pm | इष्टुर फाकडा

रामदास काका, तुमच्या लेखनाचा हेवा वाटतो !
आमचे विचारही परिच्छेद पाडून मुद्देसूद येत नाहीत ते तसे शब्दातून उतरायची आशाच सोडा.
तुमचे हे अक्षरघृत पिऊन तुपाची उणीव भासेना झाली आहे. :)

स्मिता.'s picture

20 Jan 2012 - 3:14 pm | स्मिता.

आमच्या पिढीत डालडा 'घश्याला त्रासदायक' म्हणून आधीच घराबाहेर गेला होता पण जुने डबे मात्र लहानपणी घरात पाहिले आहेत. त्यात काहीतरी डाळी, खडा मीठ, वगैरे भरून ठेवलेले असे. आता ते डबेही घरात उरले नाहीत. काकांच्या लेखामुळे लहानपणीच्या स्वयंपाकघराची आठवण झाली.
बाकी लेख अगदी झकास हे वेगळे सांगायची गरज नाही.

प्राजक्ता पवार's picture

20 Jan 2012 - 3:19 pm | प्राजक्ता पवार

लेख आवडला :)

असुर's picture

20 Jan 2012 - 4:03 pm | असुर

__/\__

फारच सुरेख.
सगळी स्थित्यंतरं काळाच्या पट्टीवर ठेवून नंतर अलगद त्यांच्या कड्या जोडून त्याचाच लेखनहार करावा ही करामत रामदासकाकांचीच. कुणा येर्‍यागबाळ्याचे हे कामच नाही.

--असुर

झकासराव's picture

20 Jan 2012 - 4:16 pm | झकासराव

कमाल आहात काकाश्री. _/\_

आमच्याकडे त्या डालड्याच्या डब्यापासुन मोठे पत्र्याचे डबे बनवुन देणारे कारागीर येत असत. ते कारागीर आले की मग आम्ही पोरं खुप उत्सुकतेने त्यांच काम पहात असायचो.
डालड्याचे डबे कापुन त्याच पत्र्यापासुन बनवलेले मोठे पत्र्याचे डबे हे त्या काळच्या महाग असल्याने एखाद दुसर्‍या असलेल्या अ‍ॅल्युमिनियम च्या धान्य / पिठ ठेवण्याच्या ५ किलो १० किलो डब्याच्या मांडीला मांडी लावुन घरी असायचे.

कांकांनी इतक सुंदर लिहलयं की प्रतिसाद काय लिहावा तेच सुचेनास झालं आहे. :)

विशाखा राऊत's picture

20 Jan 2012 - 9:48 pm | विशाखा राऊत

काका लेख एकदम मस्त रवाळ आहे ... दिवाळीच्या अगोदर घरी येणारा डालडा आठवला

स्वाती२'s picture

20 Jan 2012 - 6:34 pm | स्वाती२

सुरेख!

विकास's picture

20 Jan 2012 - 7:54 pm | विकास

डालडा सारख्या लेखाने पण nostalgia येऊ शकतो हे हा लेख वाचताना अनुभवले!

मध्यंतरी एकदा येथे (बॉस्टन भागात) एका भारतीय किराणामालाच्या दुकानात मला डालडा दिसला आणि असाच
nostalgia आला होता आणि अजूनही (health consciousness च्या काळात) त्याला गिर्‍हाईक आहे हे बघून काहीसे आश्चर्य वाटले होते.

रेशनच्या दुकानात डालडाला पाम तेलाचे (कधी कधी सुटे) मिळण्याचे alternative आल्याचे आठवले. तसेच त्याच काळात हळू हळू रेशनकार्ड हे मध्यमवर्गीयांसाठी एक नागरीकत्वाचा दाखला इतकाच राहून त्याचा वापर घरातील हा घरातील कामवाल्या बाईंना रेशन साठी म्हणून होऊ लागल्याचे देखील आठवले.

बाकी अजून एक गोष्ट आठवली ती म्हणजे ८३-८४ च्या सुमारास डालडामधे प्राण्यांची (विशेष करून गाईची) चरबी मिश्रणासाठी वापरली जाते असे काहीसे बाहेर आले आणि त्याविरोधात बघता बघता संसदेत आवाज उठू लागला. अर्थात तो आवाज तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरोधात देखील होऊ लागला होता. इतका की त्याचा परीणाम हा ८४ च्या मध्यावर्ती निवडणूकात होणार असे वाटू लागले होते. पण इंदिराजींची हत्या झाली आणि लोकांश्रूंच्या महापूरात विरोधकांबरोबरच डालडा देखील वाहून गेला.

गणपा's picture

20 Jan 2012 - 7:56 pm | गणपा

शीर साष्टांग दंडवत.

म्या पामराने रामदास काकांच्या लिखाणा बद्दल काय बोलावे.

तिमा's picture

20 Jan 2012 - 8:04 pm | तिमा

रामदासजी,
लेखन आणि कालप्रवास खूपच आवडला. दिवाळीच्या वेळेस, डालडाचा रंगीत डबाही मिळायचा असे आठवते.
डालडाचा एक वेगळाच उपयोग आम्ही लॅबमधे करतो. डालडाचा बाथ, जास्त तापमानाला एखादे डिस्टिलेशन करायचे असेल तर सोईचा पडतो.

मराठे's picture

20 Jan 2012 - 8:07 pm | मराठे

वा: ! -------/\--------
यापेक्षा वेगळी काय प्रतिक्रीया देणार?

वाक्यावाक्यागणिक साजूक तुपात तळलेल्या मोतीचुराचा घास घ्यावा तसे झाले! वाचून डोळ्यांना सुद्धा तुपाळ ओषटपण आलंय! :)

डालडाचे डबे हे मध्यमवर्गीय घराचे व्यवच्छेदक लक्षण होते! आता त्याची जागा सर्व प्रकारच्या तेलांनी घेतली.
उगाचच्या उगाच कॉलेस्टेरॉल कोलेस्टेरॉल म्हणून बोंबा मारत साजूक तूप घरातून हद्दपार करणार्‍या मार्केटिंग वाल्यांचा मला निषेध करावासा वाटतो!

गॅसच्या जवळ भिंतीला टेकवून ठेवलेले पातेले, त्यातले चार थेंब ओघळून आलेले तूप संध्याकाळी आई चांदीच्या तामलीत काढायची आणि मग साखर घालून बेरी खरवडायला माझ्या ताब्यात द्यायची! यंव रे पठ्ठे. तोंपासू!!

पण या तुपाच्या बाबतील माझं नशीब आजही जोरावर आहे! आजही आमची आनपूर्णा घरीच लोणी कढवते आणि साजूक तूप करते! गरमागरम वरणभात, तीळ लावलेली बाजरीची उनून भाकरी, वाफाळते मोदक, अवीट गुळाची पोळी, अलवार पुरणपोळी, साजूक साटोरी, खमंग थालीपीठ या सगळ्या मांदियाळीला तुपात माखून खाल्ले नाही तर पाप लागते!! कनवाळू काकवी आणि हापूसचा साखरांबा हे तुपासोबतच खायचे असतात. हे सगळे मी आजही करु शकतो. याचा मला आनंद आहे!(हॅट्स ऑफ टु हर!)

(तुपाशीच खाणारा)रंगा

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 6:43 pm | मी-सौरभ

हाबिणंदन!! :)

ए काय रे!
माझ्या नवर्‍यालाही कळत नाही कुठं काय लिहावं.
आमच्या मुलाला लहानपणी इतक्या अ‍ॅलर्ज्या होत्या की पथ्य पाळण्यासाठी घरीच स्वयंपाक करावा लागत असे म्हणून......बाकी काही नाही.

प्राजु's picture

20 Jan 2012 - 9:32 pm | प्राजु

टिप्पीकल रामदान स्टाईल!!!
मस्त!!
तूपाइतकाच स्निग्ध, रवाळ, खमंग आणि डालडा इतकाच ओशट... सुंदर लेख!!

५० फक्त's picture

20 Jan 2012 - 10:09 pm | ५० फक्त

मस्त लिहिलंय, आवडलं. आणि हो चतुरंगाना + १०० , अजुन माझ्या पण घरात तुपाचंच साम्राज्य आहे.

धनंजय's picture

20 Jan 2012 - 10:41 pm | धनंजय

स्मृतींबाबत या अशा प्रकारचे लेखन आवडते. रामदास यांचे लेखन आवडते.

स्मृतींना उजाळा देते, पुन्हा तो काळ अनुभवता येतो. पण उगाच लाडात येऊन गोग्गोड होत नाही.

रामपुरी's picture

20 Jan 2012 - 11:24 pm | रामपुरी

आजीची आठवण करून दिलीत. हल्ली बायकोच्या राज्यातून मुगाचे लाडू, मुगाची खीर, पापड्याच्या लाट्या, कुरडयांसाठीचा ओला चीक, साबुदाण्याची खीर, तांदळाचे पापड, लाह्याचे पीठाचे गूळ दूध तूप घालून केलेले लाडू, चिरमुर्‍याचे लाडू असे असंख्य पदार्थ हद्दपार झालेले आहेत. आजी आणि आई बरोबरच असे पदार्थ कायमचे लुप्त झाले आहेत. अजूनतरी 'तूप' या यादीत आलेले नाही हेच सुदैव.

या प्रतिसादाकरीता स्त्री मुक्ती (पक्षी: फक्त स्वयंपाकघरातून मुक्ती) आघाडीचा रोष पत्करण्याची आपली तयारी आहे. :)

रेवती's picture

21 Jan 2012 - 12:34 am | रेवती

मस्त प्रतिसाद!

सर माझी प्रतिक्रीया तुम्हाला माहित आहेच.
तुमचा लेख वारंवार वाचताना ,आई ने तुरीची डाळ भरुन ठेवलेला डबा बराच काळ लक्षात राहील्याचे, आत्ता आठवले . बाकी काही म्हणा ९१ नंतर जन्माला आलेले गेले डब्याच्या भावात.
त्यांना डाडा काय आणी डालडा काय
हाय काय नाय काय

तुमच्या पुढच्या लेखा करिता आम्ही चातक झालो आहोत.

इति रघू सावंत

धन्य आहात.
तुम्हाला दंडवतच घालायला पाहिजे.
डालडाच्या रिकाम्या डब्यांमध्ये वाळवणाचे पदार्थ (उपासाच्या साबूदाण्याचा पापड्या आणि बटाट्यचा वाळवलेला कीस) भरून ठेवलेले आठवतात.
लेखन आवडले हे वे. सां. न. ल.

दिपक's picture

21 Jan 2012 - 9:53 am | दिपक

__/\__ दंडवत घालतो काका. काय बोलणार शब्दच नाहियेत. लेख परत परत वाचतोय प्रत्येक वाक्याची गोडी चाखत.

अप्पा जोगळेकर's picture

21 Jan 2012 - 2:15 pm | अप्पा जोगळेकर

तुमचे लिखाण खरोखरच फार सुंदर असते.

विजुभाऊ's picture

21 Jan 2012 - 4:09 pm | विजुभाऊ

रामदास काका ंच्या कीबोर्ड मधून नक्की काय काय निघेल ते सांगता येत नाही.
लेख झकास आहे
आम्ही डालडाचे डबे झाळून त्याला दोन्ही बाजूने कड्या लावून ते डबे पोहाणॅ शिकताना फ्लोट म्हणून वापरायचो

आम्ही डालडाचे डबे झाळून त्याला दोन्ही बाजूने कड्या लावून ते डबे पोहाणॅ शिकताना फ्लोट म्हणून वापरायचो

हे असे ? ;)

https://www.youtube.com/watch?v=6Dkw1QRHGKI&feature=youtu.be

(५ ते ११ सेकंदाला 'त्याचं' दर्शन होईल. :) )

सूड's picture

22 Jan 2012 - 1:28 am | सूड

स्पीचलेस !!

प्रदीप's picture

22 Jan 2012 - 10:17 am | प्रदीप

काळाबरोबर लुप्त झालेल्या घरगुती रवाळ तूप, त्याची जागा घेणारे डालडा, ह्यांच्या आठवणी काढणारा हा लेखही एका जुन्या, व मला हव्याहव्याश्या वाटणार्‍या, स्टकॅटो वाक्यांतून मार्मिक निरीक्षणे नोंदवणार्‍या व्यंकटेश माडगूळकरांच्या शैलीतला.

बाकी, नगरीनिरंजन ह्यांच्याशी संपूर्ण सहमत-- आठवणी, माहिती, अर्थशात्रीय संदर्भ, तसेच पाककृतींविषयी , समाजाच्या अपरिहार्य स्थित्यंतराविषयी नेमकी टिपण्णी करत जाणारा व पुढील ह्याच विषवावरील लेखांची उत्सुकतेने वाट पहावयास लावणारा हा अष्टपैलू लेख आहे.

शाहरुख's picture

22 Jan 2012 - 12:17 pm | शाहरुख

बाकी, नगरीनिरंजन ह्यांच्याशी संपूर्ण सहमत-- आठवणी, माहिती, अर्थशात्रीय संदर्भ, तसेच पाककृतींविषयी , समाजाच्या अपरिहार्य स्थित्यंतराविषयी नेमकी टिपण्णी करत जाणारा व पुढील ह्याच विषवावरील लेखांची उत्सुकतेने वाट पहावयास लावणारा हा अष्टपैलू लेख आहे.

+१ !!

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jan 2012 - 7:37 am | बिपिन कार्यकर्ते

हा लेख निवांत क्षणी वाचायचा, कितीही काळ गेला तरी हरकत नाही, या हट्टाने बाजूला ठवला होता. माझ्या हट्टाचं चीज झालं! आता हे मनात घोळवत ठेवतो. जास्त लिहित नाही.

मात्र, विसुनाना, चतुरंग आणि प्रदीप यांचे प्रतिसाद आवडले हे आवर्जून नमूद करतो.

तुषार काळभोर's picture

26 Jan 2012 - 7:39 am | तुषार काळभोर

>>>>माझ्या हट्टाचं चीज झालं!

डालडा झाला असेल... ;-)

पर्नल नेने मराठे's picture

26 Jan 2012 - 2:42 pm | पर्नल नेने मराठे

लेख सुरेखच !!!

आईच्या राज्यात डालडा होता, बहुदा पुर्या तळायला वापरला जायचा (हल्ली पुर्या तेलात तळतात).
शिरा, साबुदाण्याची खिचडी तत्सम पदार्थ मात्र घरात कढवलेल्या तुपातच होत असत.
आमच्या मुंबईत गो़कुळ सारखे उत्तम दुध मिळत असल्याने मी ही तुप कढवीत असे.
ज्या दिवशी ताक घुसळले जायचे त्या दिवशी हमखास घरच्या लोण्यातली पावभाजी मी करत असे.

दुध तापविणे, साय काढणे, विरजण लावणे, ताक करणे, तुप कढविणे कितितरी कामे माझ्या आयुश्यातुन कमी झालित आणी विरजण, ताक, दही, लोणी हे शब्द जाउन लबान, योगर्ट आणी अनसॉल्टेड बटर हे शब्द माझ्या आयुश्यात आलेत. :(

देवांची रोज पुजा होत नसली तरी मात्र सकाळी तुपाचा दिवा मी लावते. एकदम वर्षाच्या तुपात भिजविलेल्या वाती आई मला करुन देते. त्या दोन वाती निरांजनात अजुन तुप न घालताच मी लावते. कारण घर बन्द करुन मी लगेच ओफिस्ला जात असल्याने मला दिवा जास्त वेळ तेवता नको असतो. सन्ध्याकाळी मात्र रोज खाण्यासाठी वापरत असलेल्या तेलाचाच दिवा लावला जातो आणी वर हात जोडुन "तिळाचे तेल कापसाची वात देवा तुम्हाला सांजवात म्हटले जाते." ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 2:43 pm | बिपिन कार्यकर्ते

रामदास भरून पावले आज!

पर्नल नेने मराठे's picture

26 Jan 2012 - 2:45 pm | पर्नल नेने मराठे

पापलेट/मासा पा़कृ वर प्रतिसाद बघ म्हणजे तु भरुन पावशिल ;)

रामदास's picture

26 Jan 2012 - 6:04 pm | रामदास

एक तर कितीतरी महीन्यानी सून नजरेस पडली .
(रोज सांजवात लावते हे वाचल्यावर तर मी आता डोळे मिटायला पण तयार आहे .)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 6:06 pm | बिपिन कार्यकर्ते

सुनबाई, सांजवात बंद कर गो! म्हातारा चालला लगेच! अजून हवा आहे तो आम्हाला! नातवंडांना गोष्टी सांगून झोपवणार कोण? ;)

पर्नल नेने मराठे's picture

26 Jan 2012 - 6:11 pm | पर्नल नेने मराठे

बिप्स काहिहि अभद्र बोलुस नकोस माझ्या सासर्यांना...गाठ माझ्याशी आहे .

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 6:17 pm | बिपिन कार्यकर्ते

उलट मी त्यांच्याबाजूने बोलतोय. तुला सावध करतोय. असो. तुमच्या घरातल्या भानगडी! आम्ही नाही मधे पडत! ;)

पर्नल नेने मराठे's picture

26 Jan 2012 - 6:26 pm | पर्नल नेने मराठे

भानगडी काय ..कहिहि =)) अच्र्त बव्ल्त

मोहनराव's picture

26 Jan 2012 - 7:06 pm | मोहनराव

सुरेख!!!

मैत्र's picture

27 Jan 2012 - 12:46 am | मैत्र

च्यायला साधे लेखन सुद्धा पुनः पुनः वाचावे असे का वाटते? वास्तविक विषय अगदी साधा "डालडा" किंवा बदलते राहणीमान. भाषा साधी सरळ, टोन नॉस्टेल्जिक. मग असे रामदास काकांच्या लिखाणान नक्की काय असते बरे की माणूसा गुंगुन पडतो? ज्या दिवशी हे समजेल तेव्हा आम्हाला पण थोडेफार वाचनीय लिहिता येइल बहुधा.

अशा किती प्रतिसादांना सहमत म्हणावं आणि काय कौतुक करावं.
दंडवत खरेच.

रामदास काका -- योगायोगाने युनिलिव्हर च्या हेडक्वार्टर च्या शहरात त्यापासून अगदी थोड्या अंतरावर राहत असताना हा लेख वाचायला मिळाला .. सगळ्या नॉस्टॅल्जिया बरोबरच याची पण अंमळ गंमत वाटली..

नेहमी प्रमाणे शेवटच्या चेंडूवरचा षटकार मात्र सगळ्यात जास्त मनात रेंगाळतो आहे --
"ॠणं कृत्वा आयुष्याला कायमचं चिकटलं आहे पण घृतं पिबेत कधीच विसरून गेलो आहे""

मोदक's picture

28 Jan 2012 - 12:15 am | मोदक

__/\__

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2012 - 12:22 am | निनाद मुक्काम प...

नॉस्टॅल्जिया,ह्या विषयाला वाहिलेली लेखमाला सुरु करावी अशी काकांना नम्र विनंती

प्रसाद गोडबोले's picture

19 Feb 2013 - 7:19 pm | प्रसाद गोडबोले

ह्या एका लेखात १५-२० वर्षे मागे भुतकाळात घेवुन जायची ताकद आहे .

सुपर नॉस्टॅल्जिक !!

अप्रतिम लेखन !!

हारुन शेख's picture

19 Feb 2013 - 11:02 pm | हारुन शेख

आयुष्य एखादया मिरवणुकीसारखे आहे ( life is a fiesta ). त्याचा आनंद तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता. एक मिरवणुकीत सामील होऊन किंवा दुसरे कडेला उभे राहुन मिरवणुकीची गंमत बघुन. पहिल्यात प्रत्यक्ष मिरवणुकीत सामील झाल्याचा उत्कट आनंद आहे. तर दुसरयात संपूर्ण मिरवणूक डोळे भरून पाहिल्याचे समाधान.

रामदासकाका तुमच्या या लेखातुन जगण्यातली तुमची उत्कटता आणि समाधान दोन्हींचा प्रत्यय मिळतोय. खूप आवडला लेख.