मासे पण शिकवतात

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
21 Jul 2008 - 10:20 am

"आयुष्यात येणार्‍या अडचणीना सामोरं कसं जायचं हे पाण्यातल्या प्रवाहाबरोबरच्या भोंवर्‍यात तरंगून आपला जीव कसा वाचवावा हे समजणार्‍या माश्याकडून मी शिकलो"
हे दत्तुचे शब्द माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहेत.

त्याचं असं झालं त्यावेळी आम्ही वरसोवाला राहत होतो.आमच्या घराजवळ "फिशरीजरिसर्च इंन्सटीट्युट" आहे.एकदां मला त्यांच्या डिग्री समारंभाच्या कार्यक्रमाला आमंतत्रण होतं. त्या गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला.त्याला ओळख
विचारावी म्हणून त्याच्या जवळ जावून मी प्रश्न विचारण्याचं साहस केलं
"काय रे तू घोडग्यांचा दत्तु का?"
तो म्हणाला
"होय. मी पण तुम्हाला त्यावेळीच ओळखलं, ज्यावेळी तुम्ही आमच्या डायरेक्टरशी गप्पा मारत होता.पण तुम्हाला विचारायचं धारीष्ट केलं नाही.बरं झालं तुम्हीच मला विचारलंत ते"

आणि ह्या नंतर आमचा सहवास वाढत गेला.आणि आम्ही एकमेकाला वरचेवर भेटत होतो.
दत्तु आणि मी वेंगुर्ल्याला एकाच शाळेत शिकत होतो. तसा दत्तु मला खूपच ज्युनीअर होता.पुढच्या शिक्षणासाठी जसा मी मुंबईला आलो तसा दत्तु आणि त्याचे आईवडील त्याच्याही शिक्षणासाठी मुंबईत शिफ्ट झाले.
एकदा दत्तु माझ्या घरी जेवायला आला असता आपली माहिती सांगू लागला.
"माझ्या वडीलानी मुंबईला गिरगांवला खोताच्या वाडीत एक घरगुती खानावळ काढली होती.आणि त्यावेळी मी प्रभुसेमीनरी मधे शिकत होतो.
त्यानंतर मी एलफिनस्टन कॉलेजनधे पुढचं शिक्षण घेवून एम.एससी झालो.आणि आता फिशरीज मधे पीएचडी केलं."
चहाचा कप वर उचलून बशीत चहा ओतत दत्तू सांगत होता.
"आपल्या माणसाच्या घरी बशीतून चहा भुरकायला बरं वाटतं.तुमच्याकडे कसला शिष्टाचार? "
असं म्हणत हंसत हंसत पुढे सांगू लागला.
"मी आणि माझे वडील दर रविवारी ’भाऊच्या धक्क्यावर’ समुद्रातून मासे पकडण्याचा छंद म्हणून जात असायचो. माझ्या गळाला पहिला मासा लागला त्यावेळी किती आनंद मला झाला म्हणून सांगू?"
मी त्याला विचारलं
"तुला फिशरीज रिसर्चचं बाळकडू ह्यामुळेच मिळालं का?"
"ऐका तर खरं "
असं म्हणत दत्तू पुढे सांगू लागला.
" पाण्याचा सागर दिसला की माझं मन निरनिराळ्या माशांसाठी वेडं होतं.त्याचं जास्त श्रेय माझ्या वडीलांचच आहे."
दत्तू तसा कोळी ज्ञातीतला.त्यामुळे गावाला सुद्धा ते कोळीवाड्यातच राहायचे.मोठ मोठे खपाटे घेवून दत्तूचे आजोबा आणि वाडवडील मांडवीवर मासे मारी साठी जायचे.

"माझी आयुष्यातली महत्वाची वेळ माझ्या वडीलांबरोबर मासे गळाने पकडण्यात गेली.पण माझ्या वडीलांच्या स्वभावाला दुसरा कांगोरा होता.ते चटकन रागवायचे.कधी कधी एकदम रागावून मला मारायचे.रागच्याभरात त्याना फक्त त्यांचीच बाजू खरी वाटायची.माझी बाजू ऐकून घ्यायची त्यांची तयारीच नसायची.पण त्यामुळे मी खचलो नाही,जरा कोडगा झालो,हतबल झालो,आणि थोडा कडवटपणा आला,पण दुसरा रविवार आल्यावर पुर्वीच्या आठवड्याचे सर्व विसरून परत दोघेही गळ घेवून जायचो."
दत्तु पुढे सांगत होता.
" काही वर्षानंतर माशां वरची माझी आवड जागृत ठेवूनमी ग्रॅज्युएट झालो. मी नेहमीच चांगला विद्दयार्थी म्हणून राहिलो.पण नेहमीच मी असुरक्षतेचा बळी राहिलो.मला कसलाच भरंवसा राहिला नाही.जणू माझ्यातून भरंवसा उचकून काढला गेला.माझा मार्ग मी शोधत राहिलो पण चक्कर घेतच राहिल्यानं सर्व शक्तिचे निराकरण झालं."

नंतर अगदी आनंदात येवून तो पुढे म्हणाला
" एका रात्री जणू ’नवलची घडले’,मी मासा खवळत्या पाण्यात कसा पोहतो यावर संशोधन करत असता, असं दिसून आलं की माशांना खवळत्या प्रवाहात सुद्धा पाण्याच्या भोंवर्‍यात स्नायुंचा कमीत कमी वापर करून तरंगण्याची क्षमता असते. माझ्या एकाएकी एक लक्षात आलं की अडचणी पण एखद्दयाला कमी धडपड करायला मदत करतात.आणि ह्याचेच आकलन होण्याची जरूरी मला फार दिवसापासून होती."
अगदी अभिमानाने दत्तु पुढे म्हणाला.
" माझ्या संशोधनावर मी खूप मेहनत घेवून मग मी पीएचडीसाठी युनिव्हर्सीटीमधे माझा थीसीस सादर केला.तो डिग्री देण्याचा समारंभ होता.
त्या ढगाळ संध्याकाळी माझे आईवडील वेळात वेळ काढून आले आणि माझ्या बाजूला उभे राहून माझा हात आपल्या हातात घेवून मी डिग्री घेताना मला जणू आशिर्वाद देत होते."

आपले डोळे पुसत दत्तु पुढे म्हणाला
" मला वाटतं,माझ्या आयुष्यातल्या अडचणीना मी सामोरे जाण्यासाठी मला त्यांच्याशी दोन हात न करता,त्याना वाट देवून बाजूला होणं जमू शकलं.प्रवाहाबरोबर जाण्याचं आणि भोंवर्‍यात मिळाल्यावर तरंगून घेणं, मी माशाकडून शिकलो. दुसर्‍या बद्दल कटुता न ठेवता मी जगायला शिकलो. एखाद्दयाला माफ करण्याच्या प्रकारापासून हे निराळं आहे. आयुष्यातल्या होणार्‍या घटनांची व्याख्या मी अशा पद्धतीत करतो,आणि सामोरा जातो."

तो क्षणभर गप्प झाल्यावर,मी त्याला जवळ घेतलं,आणि म्हणालो
"पीएचडी होण्याच्या लायकीचाच आहेस."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

पक्या's picture

21 Jul 2008 - 1:10 pm | पक्या

गोष्ट छान आहे.
>> माझ्या आयुष्यातल्या अडचणीना मी सामोरे जाण्यासाठी मला त्यांच्याशी दोन हात न करता,त्याना वाट देवून बाजूला होणं जमू शकलं.प्रवाहाबरोबर जाण्याचं आणि भोंवर्‍यात मिळाल्यावर तरंगून घेणं, मी माशाकडून शिकलो.

इथे कथानायक अडचणींना कसा सामोरा गेला हे अजून तपशीलासकट स्पष्ट व्हायला हवे होते. मग कथेला अजून उठाव आला असता असे मला वाटते.

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Jul 2008 - 8:33 pm | श्रीकृष्ण सामंत

पक्याजी,
आपलं म्हणणं बरोबर आहे.मी जे हे खालिल वाक्य लिहिलं आहे ते जास्त स्पष्ट करायला हवं होतं.खरं म्हणजे त्या वाक्यातून मला अर्थ थोडासा विचार केल्यावर लक्षात आला होता तो असा.आणि मी तो टेकन फॉर ग्रॅन्टेड धरला.

"माशांना खवळत्या प्रवाहात सुद्धा पाण्याच्या भोंवर्‍यात स्नायुंचा कमीत कमी वापर करून तरंगण्याची क्षमता असते."

म्हणजे शेवटी भोंवर्‍यात सापडल्यावर माशाने आपल्या अवगत असलेल्या स्नायुचा कितीही उपयोग केला असता तरी त्याचे प्रयत्न फोल ठरले असते.कारण भोंवरा खूपच शक्तिमान असतो.
अशावेळी मासा त्या भोंवर्‍यात उताणे पडून स्वतःला झोकून देतो त्यामुळे नकळतच तो भोंवर्‍याच्या फिरण्यात बाहेर फेकला जातो आणि अशा तर्‍हेने आपली सुटका करून घेतो.
भोवरा ही माणसाची अडचण समजली तर त्या अड्चणीत असंच माश्या सारखं केलं तर उगाच अडचणीत जास्त धडपड नकरता आपली सुटका करून घेता येईल.असा तो संदेश होता.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

संदीप चित्रे's picture

21 Jul 2008 - 7:17 pm | संदीप चित्रे

>> अडचणी पण एखद्दयाला कमी धडपड करायला मदत करतात
खूपच महत्वाचं आणि नेमकं !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

राधा's picture

21 Jul 2008 - 8:41 pm | राधा

मी पक्या शी सहमत आहे...........पण ज्या भावना व्यक्त व्हाय्च्या त्या झाल्यात्..........मस्त........

अर्थात हे कोकणातल्या समुद्रतटांवर तितकेच खरे आहे - पण "मौजमस्ती" करायला गोव्यात अधिक तरुण येतात. दरवर्षी उलट्या प्रवाहात अडकून काही तरुण मरण पावतात. दरवर्षीच हे आकडे ऐकून मन निबर झाले होते - या वर्षी माझ्या एका मित्राचा पंचविशीतला धाकटा भाऊ असाच वारला, तेव्हा पुन्हा काळजाला ठेच लागली.

समुद्रकिनार्‍याला जाताना हा धडा लक्षात ठेवावा. बहुतेक ठिकाणी समुद्राच्या लाटा जितक्या आत नेतात, तितक्याच बाहेर ढकलतात. त्या तुम्हाला आत नेऊन बुडवत नाहीत.

किनार्‍याच्या काही विशिष्ट भागांत (किनार्‍याच्या, खालील खडकांच्या आकारामुळे असेल) किनार्‍याकडून खोल जाणारे प्रवाह निर्माण होतात - एखाद्या ओढ्यासारखे - त्याच्या बाजूलाच आतून पाणी किनार्‍याकडे (बाहेर) ढकलणारे प्रवाह असतात. ते तितके जोरदार नसतात. खोल नेणार्‍या प्रवाहाची शक्ती प्रचंड असते - त्याच्याविरुद्ध अगदी बलदंड पैलवानही लढू शकत नाही. तर असा प्रवाह तुम्हाला किनार्‍याकडून दूर पश्चिमेला ओढत असेल, तर त्याच्याविरुद्ध पूर्वेला पोहायचा प्रयत्न करू नये. स्नायू थोड्याच वेळात दमून काम द्यायचे थांबतील. पण प्रवाहाच्या काटकोनात (उत्तरेकडे, किंवा दक्षिणेकडे) पोहायचे. तुम्ही म्हणाल "असे कसे? किनारा तर पूर्वेकडे आहे..." पण तो शक्तिशाली प्रवाह काटकोनात जायला तुम्हाला प्रतिबंध करणार नाही, आणि त्या प्रवाहातून तुम्ही बाहेर पडू शकाल. प्रवाहाच्या बाजूचे उलट-प्रवाह तुम्हाला सापडले तर फारच उत्तम ! - ते प्रवाह तुम्हाला किनार्‍याकडे नेतील. नाही सापडले तरी ठीक - शांत पाण्यात हळूहळू किनार्‍याच्या दिशेने पोहता येते.

श्रीकृष्ण सामंत यांच्या लेखात भोवरा/प्रवाह रूपक आहे, ते रूपक प्रभावी आहे. पण ही माहिती खराखरचा जीव वाचवण्यासाठीही उपयोगाची आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Jul 2008 - 10:38 pm | श्रीकृष्ण सामंत

धनंजयजी,
छान! आपण अतिशय अभ्यासू वृत्तिने पाणी आणि भोवरा ह्याचे संबंध दाखवून दिले आहेत.आपल्या मित्राच्या पंचविशीतल्या भावाचं अपघाती जाणं वाचून मलाही खूप दुःख झालं.आपल्या प्रशंसे बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com