प्रिय मित्रा,
आज बरेच दिवसांनी "सुहृदगाथा" बाहेर काढले. बराच वेळ मुखपृष्टावरील अवचटांचे अजिंठाचे रेखाटन पहात बसलो. आतल्या कवितांना साजेसे गूढ. रंग सुद्धा आतील कवीतांसारखेच. पुस्तक उघडून पहिले पान पाहिले आणि एक मोठा धक्का बसला. त्यावर तू लिहले आहेस
शब्द संपतात तिथून सुरू होणार्या दोस्तीला मला
एवढेच कळवायच
संध्याकाळची प्रत्येक कविता
मी बकुळफुलात जपून ठेवलीय
२६-१-१९७९
बस. एवढेच. सहीसुद्धा नाही. तुला त्याची गरज वाटली नाही. व त्यावेळी मलाही. पु.शि. रेग्यांचा कविता संग्रह व ग्रेसची आठवण करून देणारा, दोस्तीला बकुळफुलांचा सुगंध देणारा ... उभ्या आयुष्यात किती जण भेटतात अशा कवीमनाची ? वाढदिवसाला अशी भेट मिळाल्याने आपल्या सर्व मित्रांच्या आनंदात त्या दिवशी मोठी भर पडली असणारच. पण आज धक्का बसला म्हणतो तो या करिता की आज मला तुझे नावच आठवत नाहीये.
मित्रा, रागावू नकोस. नव्हे, तू रागवणार नाहिस याची मला खात्री आहे. आज "लागले नेत्र रे पैलतीरी " अशी आपल्या सर्वांचीच वेळ आली आहे. पैलतीराकडे बघत बघत आपण कालनदीत उतरलो आहोतच. पोटरीपर्यंत पाणी पोचले आहेच. तेव्हा विस्मरण हा शाप नसून एक देणगीच आहे असे म्हणावयाचे हे दिवस. का म्हणून वाईट वाटून घ्यावयाचे ? आता शांती मिळवावयाचा प्रयत्न करावयाचा. अशा वेळी या डोहात एखादा पूर्वस्मृतीचा दगड पडला तर जे तरंग उठतात ते बर्याच वेळी क्लेशकारकच ठरतात. पूर्वी ऊठसूट प्रत्येक गोष्टीवर वाद घालावयाची, पत्ते खेळतांना तर हमखास भांडणे काढावयाची सवयच होती. सौ. म्हणावयाची " कशाला किरकोळ गोष्टीत भांडणे काढता ? " तर मी म्हणावयाचो " मित्रांशी भांडावयाचे नाही तर काय ८-१२ आणे जास्त काढणार्या अनोळखी रिक्षावाल्याशी हुज्जत घालावयाची ?" तुम्ही तर हसून नेत होता. त्या वेळीं " आपणच खरे " असा खोटा आनंद होता. तो तुमचा मोठेपणा होता हे आज कळते . इतक्या उशिरा; वेळ निघून गेल्यावर !
सागरांत भेटणार्या दोन ओंडक्यांसारखी आपली भेट. आयुष्यभर थोडीच संगत मिळणार होती ? केव्हा विलग झालो ,कळलेही नाही. पण एक नक्की. तुम्ही मित्र माझ्या जीवनांत आनंदाचे वेल लावून गेलात. माळी विस्मृतीत गेला असला तरी त्या वेलांच्या फुलांनी माझे जगणे समृद्ध झाले इतके आजही जाणवते.
प्रिय मित्रा, आयुष्याच्या या वळणावर क्षमा मागणे हे निरर्थक आहे हे मला कळते. त्यामुळे एवढेच म्हणतो कीं पुढच्या जन्मी तुझ्या सारखेच मित्र परत मिळोत व त्या वेळी त्यांची किंमत योग्य वेळी कळो.
शरद
प्रतिक्रिया
20 Dec 2011 - 7:53 pm | इंटरनेटस्नेही
विस्मरण ही मोठीच देणगी आहे, ज्यांना लाभते ते ते खरे भाग्यवान.
20 Dec 2011 - 9:39 pm | गणेशा
भावनाशिल लेख.....
मित्र कोण आहे असे आठवत नसताना ही, मैत्रीच्या वेलीला फुलवणार्याप्रति जी क्रुतज्ञता व्यक्त केली आहे ते खरेच खुप मनाला शांती देणारे वाटले...
तरीही पहिल्या २ ओळीत अगदी मनाचा ठाव घेतला असे वाटले.. त्या २ ओळीत अश्याच आपल्याकडील जुण्या पुस्तकांच्या, ग्रीटींगच्या पानावर कायमचे विसावलेले मैत्रीचे अनेक क्षण आठवुन गेले.
" विस्मृती ही आयुष्यातील घटनांसंबंधी असली तरी आयुष्याच्या स्मृतीपटलावरील असंख्य विनलेले धागेदोरे हे कोणीतरी आपलेसे वाटल्याच्या खुणाच भासतात" - गणेशा
20 Dec 2011 - 9:40 pm | प्रास
हे मुक्तक आपल्याला प्रचंड आवडलेलं आहे.
खूपदा असे प्रसंग येतात. आयुष्याच्या प्रवासात भेटलेले कित्येक जण तेव्हा कितीही जवळचे असले तरी केव्हा तरी दूर जातात. काही काळानंतर जेव्हा त्यांची आठवण येते तेव्हा लक्षात राहतात ते त्यांच्या सोबत व्यतित केलेले आनंदाचे क्षण. कोणत्या कारणाने ते आपल्यापासून दूर गेले, त्यावेळी कोणत्या घटना घडल्या यांचं विस्मरण होतं आणि काही केल्या त्या स्मृति पुन्हा येतंच नाहीत. मग विचार करावा लागतो, जर या व्यक्ति आपल्यापासून दूर गेल्यात किंवा आपण त्यांच्यापासून फारकत घेतलीय तर त्यामागचं कारणही तसंच त्रासदायक असेल. आज ते आठवत नाहीये तर त्यामुळे होणारा मनस्तापही भोगावा लागत नाहीये पण तेव्हाच त्यांच्याबरोबरचे आनंदाचे क्षण मात्र आपल्याला पुन:प्रत्ययाचा आनंद देत आहेत. तर ही विस्मरणाची देणगी उत्तमच आहे.
बाकी मुक्तकाचं शब्दांकनही छान आहे.
:-)
20 Dec 2011 - 11:47 pm | पैसा
असं खूपदा होतं. कित्येक वर्षं पहात आलेल्या माणसाचा चेहरा अंधुकसा आठवतो, पण नाव आठवत नाही. मित्र दुरावतात, कधी खूप वर्षांनी अचानक भेटतातही. काळाच्या ओघात सगळंच पुसून जातं. हे असंच व्हायचं. विस्मरण हे वरदान असलं तरी ते सुहृदांच्या सगळ्याच आठवणी पुसून टाकू शकत नाही हे नशीबच!
21 Dec 2011 - 12:08 pm | गवि
कित्येक वर्षं पहात आलेल्या माणसाचा चेहरा अंधुकसा आठवतो, पण नाव आठवत नाही.
हुश्श.. व्हॉट अ रिलीफ.. मला वाटलं मला एकट्यालाच असा रोग जडलाय की काय.. पण इथे बरेचजण हेच म्हणताहेत.
उत्तम लेख..
अतिअवांतर शंका.. आधीच्या प्रतिसादातला किंवा धाग्यातला काही भाग घेऊन त्याला बाजूला लाल उभी रेघ येते अशा रितीने क्वोट करुन प्रत्युत्तर देतात ते कसं करतात?
21 Dec 2011 - 12:15 pm | किसन शिंदे
अतिअवांतर शंका.. आधीच्या प्रतिसादातला किंवा धाग्यातला काही भाग घेऊन त्याला बाजूला लाल उभी रेघ येते अशा रितीने क्वोट करुन प्रत्युत्तर देतात ते कसं करतात?
अगदी मलाही बर्याच दिवसापासून पडलेला प्रश्न.
कोणी मदत करू शकेल काय?
21 Dec 2011 - 12:21 pm | यशोधरा
मला वाटते, प्रतिकिया ह्याखाली जी बटनवाली ऑप्शन्स आहेत, त्यातील ब्लॉक्क्वोट वापरायचे. (शेवटून तिसरे) ज्या वाक्यांना/ शब्दांना क्वोट करायचे आहे, ती तुमच्या प्रतिसादात डकवून, सिलेक्ट करुन ब्लॉकक्वोट हे बटन क्लिक करायचे. बहुतेक.
21 Dec 2011 - 12:23 pm | गवि
या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद... :)
21 Dec 2011 - 12:25 pm | किसन शिंदे
जमलं जमलं, आम्हालाही जमलं :)
21 Dec 2011 - 12:47 pm | वाहीदा
अरेच्च्या मला ही जमलं !!
गविंशी सहमत
21 Dec 2011 - 1:10 pm | यशोधरा
सगळ्यांने मिळून येडं बनवलं वाट्टं मला. :)
असूदेत, असूदेत.
21 Dec 2011 - 1:14 pm | गवि
नाही हो.. खरोखर माहीत नव्हतं. क्वोटचे साईन बघूनही त्याचा असा उपयोग असेल हे माहीत नव्हतं.
शिवाय प्रश्न आधी विचारला आणि तुम्ही येऊन उत्स्फूर्त उत्तर दिलंत, त्यामुळे आधीच तुम्हाला अमुक बनवण्यासाठी नेम धरणं कसं शक्य आहे? :)
पुन्हा एकदा धन्यवाद...
21 Dec 2011 - 1:29 pm | यशोधरा
वांदो नथी. :)
21 Dec 2011 - 1:51 pm | स्पा
मलाही जमल्या गेलं आहे =))
21 Dec 2011 - 2:03 pm | मन१
मला कधी जमकोणते ;)
23 Dec 2011 - 4:37 pm | llपुण्याचे पेशवेll
बघू मला जमते का?
21 Dec 2011 - 5:53 pm | चिगो
थँक्यु, यशो.. मुक्तक सॉलिड. अजूनतरी बर्यापैकी मित्र आठवतात.. एकदा आयटेम झाला. मला एकदा एकाने थांबवून " काय, ओळखलंस काय?" म्हणून विचारलं. आता नाही आठवत तर गपगुमान सांगावं की नाही मी? पण तीही गोची.. मग मी, "अरे क्या यार, कैसा है? इन्स्टीट्युट मधे होतास ना?" वगैरे पाल्हाळ लावलं. त्याने एका मिनिटाने मला थांबिवलं, "बस्स काय, दादा? मी सोनू" वगैरे सांगितलं. आता माझ्या ह्या दुरच्या आतेभावाला मी त्याच्या लहानपणी पाहीलेला, एवढा वाढला असेल मला काय ठावूक.. पर होता है.
हे भलतीकडेच सुटलो मी.. पुन्हा एकदा, सुंदर मुक्तक. आम्हालाही आयुष्य समृद्ध करणारे मित्र भेटले, पण च्यायला पुस्तकं गिफ्ट केली नाहीत कुणी.. शेवटी आम्हीच ढापली..;-)
21 Dec 2011 - 2:46 am | विकास
मुक्तक आवडले!
"दिये जलतै है, फूल खिलतै है, बडी मुश्कील से मगर, दुनीया मे दोस्त मिलते है" या गाण्यातल्या भावार्थाची आठवण झाली.
आत्ताच्या जमान्यात जालावर पण ओळखी होतात. त्यात तर अजून एक गोंधळ होतो... व्यक्ती टोपणनावाने ओळखीच्या होतात. ओळख वाढली की फोन/इमेलने संवाद होतात कधी कधी प्रत्यक्ष भेटणे होते. अशा संवादात व्यक्तीचे खरे नावच लक्षात येत नाही आणि मग कधी कधी गोंधळ होऊ शकतो.
21 Dec 2011 - 2:49 am | इंटरनेटस्नेही
+१
21 Dec 2011 - 1:47 pm | गणपा
मुक्तक तर प्रचंड आवडलं.
आणि विकासरावांच्या शब्दा शब्दाशी सहमत.
जीवाभावाचे शाळुसोबती आठवले.
हल्ली भेटणं अशक्य झालयं. अर्थात दोष माझाच आहे. :(
23 Dec 2011 - 6:22 pm | मी-सौरभ
अश्या गोंधळात पण मजाच आहे...
21 Dec 2011 - 3:09 am | प्राजु
वाह वाह!
अप्रतिम!!
सुंदर लेखन. खूप दिवसांनी असं काहीतरी काळजाचा ठाव घेणारं वाचायला मिळालं.
22 Dec 2011 - 6:28 pm | सोत्रि
अगदी हेच म्हणायला आलो होतो.
- (अनेकांचा प्रिय मित्र असलेला) सोकाजी
21 Dec 2011 - 11:35 am | उदय के'सागर
खुपच छान!
मित्रांशिवाय आयुष्यं म्हणजे...... विचारच करु शकत नाहि.....
हे मुक्तक खुप काहि शिकवुन गेलं.... धन्यवाद!
21 Dec 2011 - 12:16 pm | प्रीत-मोहर
अप्रतिम लेख. खूप दिवसांनी अस चांगल वाचायला मिळाल.
21 Dec 2011 - 12:18 pm | यशोधरा
मुक्तक अतिशय आवडले.
21 Dec 2011 - 12:23 pm | किसन शिंदे
मुक्तक आवडले.
21 Dec 2011 - 1:37 pm | सुहास झेले
सुंदर...!!
21 Dec 2011 - 1:54 pm | स्पा
अतिशय तरल ,सुंदर
वा मस्तच
21 Dec 2011 - 1:58 pm | वाहीदा
मिपाकर हर्षद प्रभुदेसाई यांच्या कवितेतील काही ओळी आठविल्या
क्षण सरता तो जलद गतीने,
पाऊले मागे का..अडखळती
कुणास आठवूनी कुणी असे का..?
वळणावर एका त्या घुटमळती ...
विस्मरण देणगी कि शाप या संभ्रमात अजूनही..
मीही खुपदा पूर्ण Blank होते काहीच आठवत नाही अचानक ऑफीस मध्ये ही प्रेझेंटेशन देताना बोलता बोलता Blank होते :-(
21 Dec 2011 - 2:05 pm | मन१
मनास भावले.
21 Dec 2011 - 2:56 pm | मेघवेडा
छान मुक्तक. आवडले.
21 Dec 2011 - 3:58 pm | स्वातीविशु
खुपच छान.
22 Dec 2011 - 10:25 am | अर्धवट
वा.. जियो..
23 Dec 2011 - 6:02 pm | हरिकथा
शरदजी,
तुमच्या भावना यापेक्षा चांगल्याप्रकारे व्यक्त होणे कठीण होते.
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ। हे तर सगळ्या जीवनाचे सारंच आहे तरी समेत्य च व्यपेयातां च्या मधल्या काळातला चांगल्या आठवणींचा ठेवा हाच पुढे मनात दरवळत राहतो असा अनुभव आहे.
तुमचं मनोगत खूप आवडलं.