हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम....
..
वणव्यात पेटलेली, वस्ती अजून बाकी,
जाळून पीळ गेला.... रस्सी अजून बाकी..!
हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम,
दोस्ती उजाड झाली, बस्ती अजून बाकी..!
रामो रहीम नाही, जातीयतेत काही,
पण 'राज' कारण्यांची, कुस्ती अजून बाकी..!
सांधावयास सारे, आयुष्य वाहिले मी,
माया जगात का ही, सस्ती अजून बाकी..?
सारे दुभंगलेले, उध्वस्त मोडलेले,
जोडेन मी पुन्हा ते, हस्ती अजून बाकी..!
माणूसकी जपाया, बांधून सर्व जखमा,
हा मी उभा पुन्हा बघ, मस्ती अजून बाकी..!!
----
~जमीर इब्राहिम "आझाद"
प्रतिक्रिया
16 Dec 2011 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा... चांगलं समाज काव्य आहे... :-)
16 Dec 2011 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
17 Dec 2011 - 1:47 pm | अविनाशकुलकर्णी
एकदम समाज वादी..लाल सलाम
18 Dec 2011 - 10:14 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'
अत्रुप्त आत्मा, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आणि अविनाशकुलकर्णी ...
धन्यवाद..!!
19 Dec 2011 - 9:30 am | llपुण्याचे पेशवेll
कविता काव्यगुणाच्या दृष्टीने पाहता चांगली आहे. पण आशय अगदीच पोकळ वाटतो. सर्व धर्मसमभाव, वर्ण-जातीभेद नष्ट करणे अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि अदनुषंगिक प्रबोधनपर आशय असलेले साहीत्य पोकळ आणि निरुपयोगी असते.
कारण सर्वधर्मसमभाव वगैरे बोलायला संकल्पना चांगल्या आहेत, पण त्या तशा आचरणात आणल्या जात नाहीत कारण त्या तशा आचरणात आणण्याच्या लायकीच्याही नाहीत असे आमचे स्पष्ट मत आहे.
तसे असते तर आज दर दोन दिवसांनी इस्लाम खतरे में है च्या बोंबा भारतात उठल्या नसत्या, "भ्रष्टाचार विरोधी आंदोलन इस्लामच्या विरोधी आहे" असे म्हणणार्या जामा मशिदीच्या इमामास देशप्रेमी मुसलमानांनी त्यांची जागा दाखवली असती, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा फुकटात मागितली गेली नसती असो. अजूनही बरेच काही. प्रत्येकाने आपली कंबर घट्टं बांधून उभे रहावे हेच ठीक.
बाकीच्या रिकामटेकड्यांना वाजवूदेत टिमक्या फुकाच्या.
25 Dec 2011 - 11:59 pm | आनंदी गोपाळ
झारीतील शुक्राचार्य असा एक वाक्प्रचार आहे. ठाऊक आहे का?
20 Dec 2011 - 12:14 pm | जयनीत
<<< रामो रहीम नाही, जातीयतेत काही,
पण 'राज' कारण्यांची, कुस्ती अजून बाकी..!>>>>>
धार्मीक तेढ फक्त राजकारण्यां च्या षडयंत्रा मुळे निर्माण होते , हे मत मान्य होण्या सारखे नाही .
लोकांच्या मनात काहीच नसते का ?
20 Dec 2011 - 12:53 pm | गवि
रामो रहीम आणि जातीयता यांची पहिली ओळ घेऊन "राज" वर केलेला श्लेष चपखल बसत नाहीसे वाटते.. "राज"कारणात या दोन्ही गोष्टी आढळल्याचं दिसलेलं नाही. अर्थात त्यांचं क्षेत्र वेगळे हेही खरं..पण त्यामुळे श्लेष असलाच तर तो जुळत नाही.