भाना .......
      मारुतीच्या मंदिराबाहेर एका मोठ्या विस्तीर्ण झाडाखाली पंचायत भरली होती.
 पारावर सतरंजी टाकली होती ,गावकरी पंच येण्याची  आतुरतेने वाट  पहात होते. समोर सावली पाहून लोक बसली होती .
          उन्हान रापलेली लोक ,काळ्या दांडीचा जाड भिंगाचा  चष्मा घातलेली,  डोक्यावर डोक्यापेक्षा जड पागोटे ,फेटे सांभाळणारी म्हातारी कोतारी  माणस , बिडी फुकणारे तरनेताठे ,  ,तंबाखू चोळणारे ,पिचकार्या मारणारे , हातातल्या काठीने फुफाट्यात रेघोट्या ओढून काहीतरी समजावून सांगण्याच प्रयत्न करणारे ,डोळे बारीक करून " अरे फलान्यचा फलाना न रे तू ?अस विचारणारे  म्हातारे !
        कुणी वाळलेल्या काड्या चावत बसलेले होत , कुणी उगाच धरून आणल्यासारख ,कुणी गंगाराल्यासारख
इकड - तिकड बघत  होत ,कुणी गंभीर विचार करीत बसलेलं !काही पोर टोर उगा कल्ला करीत होती , सर्वांची आपापसात बडबड चालू होती , लहान शेंबडी पोर मध्येच खेळात रमलेली होती , नवीनच परीटघडी मोडलेली बुजुर्ग जरा धोतर सावरून बसली होती .कुणाच काय चालू आहे कशाचाच ताळमेळ नाही . काहीजण पिचकार्या मारण्यासाठी थोड आडबाजूला बसलेले होते .
          बाया-बापड्या जरा दूर सावलीला  बसलेल्या होत्या .नुसता सावळा गोंधळ ,वादी - प्रतिवादी ,एकेमेकांकडे खाऊ कि गिळू पाहत होते ,कुणाचा बांधाला बांध , कुणाची सून नांदत नाही ,कुणाची सासू नांदू देत नाही ,कुणाची बायको पळून गेली , कुणाचा नवरा , कुणाला काडीमोड पाहिजे , कुणाला परत नांदायला जायचं ,कुणी उधारी नाही दिली , तर कुणाचे हिस्श्यावरून भांडण !  एक न एक हजार लफडे ,खून मारामार्या पासून ते साधे सासू सुनाच्या भांडणंपर्यंत  खटले , पण कोर्टाची पायरी चढणार नाहीत , सगळी गार्हाणी पंचायतीसमोर मांडणार  !
      पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या या परंपरेवर गावकऱ्यांचा विश्वास होता ,श्रद्धा होती
       " पाचामुखी परमेश्वर ,पंच जो निर्णय देईल तो शेवटचा ! चुकीचा  असो , बरोबर असो , नफ्याचा असो नुकसानीचा  तोच अंतिम निर्णय !
         महिन्यातील पहिल्या इतवारी पंचायत बसायची , त्यामुळे सगळ्यांना आपापली गार्हाणी मांडायची असल्याने फार गर्दी असायची .बाकीचे चार पंच  आले, मुख्य पंच  शिंदे राहिले होते सर्व त्यांना आदराने तात्याबा म्हणायचे.
पंच म्हणून गावकर्यांनी ५ जन निवडले होते त्यात शिंदे हे सर्वात मोठे पंच होते .
  जाणकार बुजुर्ग , जीवनातल्या चांगल्या वाईट अनुभवाची जान असलेले ,समजदार , तोडण्यापेक्षा जोडण्यावर जास्त भर देणारे , गावात काही चांगले/ वाईट प्रसंग असू दे तात्या सर्वात आधी हजर , स्वत: सर्वोपरी मदत करत .
 म्हणून ते त्या गावातल आदराच स्थान होत, त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय  !
      फटफटीच्या आवाजाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं ,तात्याबानी फटफटी थांबवली जमावातल्या एकाने लगेच ती सपराखाली सावलीला लावली ,पायातल्या वहाणा काढून तात्यांनी  मारुतीला वाकून नमस्कार केला , तेल वाहील अन पारावर येऊन बसले ,पांढरा शुभ्र सदरा ,पांढरे धोतर ,डोक्यावर गांधी टोपी ,पिळदार मिश्या , गळ्यात एक पांढर स्वच्छ उपरण , तात्या साठीला पोहचले होते पण शरीर एकदम पिळदार ,कडक !
    त्यांच्या काळात ते एक नावाजलेले पैलवान होते भरपुर कुस्त्या गाजवल्या होत्या त्यांनी एकेकाळी ,अजूनही त्यांनी व्यायामाचा  शिरस्ता कायम ठेवला होता ,तरण्याबांड पोरांना लाजवीन अशी देहयष्टी !,असे तात्या पंचाच काम कितेक वर्षापासून चोख बजावत होते .
       झाल, तात्या घाइघाइत आले अन पारावर बैठक जमवली ,तसे आपापसात कुजबूजनारे  जरा शांत होऊन नीट सावरून बसले .
    तात्याबा  : ह्ये बघा मंडळी असा कल्ला करू नका ,ह्ये बघा मला तालुक्याच्या गावाला जायचं हाय ,तवा येळ दवडण्यात काय मज्जा नाही , मंग सुरु करू का मंडळी ?
हातातला कागद नीट निरखून पाहत पंच म्हणाले
" शंकर्या ....काय भानगड हाये लेका तुझी ?
तसा शंकर्या खाडकन उभा राहिला
   शंकर्या : (आपल्या चुलत भावाकडे रागारागात बघत ) ह्या  भे # * * त ने जीन हराम करून टाकल हाये माझ ?माझ शेत गिळायला बघ्तुय ,पण एक ध्यानात ठिव मी जित्ता हाये तोपर्यंत तुला एक ढेकूळबी गावायचा नाही .
तसा किसन्या तावातावान उभा राहून त्याला शिव्यांची लाखोली वाहू लागला दोघांच्या बाचाबाचीत त्यांनी एकमेकांच्या गचांड्या धरल्या तस ४-५ जणांनी त्यांना वेगळ केल दोघही धुमसत होते .किसण्याचा म्हातारा त्याला " गप्प राहाय ना शान्या जरा, कवा बी उफाळून येन बरुबर न्हाई “
   तात्याबा : ए ,शंकर्या तू माझा टाईम वेष्ट करायला आला का हिथ? बाकीच्यांची  पण गाऱ्हाणी एकू का तुम्हाला निस्तरत  बसू ?आधीबी सांगितलं ना  जरा आवघड केस हाय तुमची ,  एखादा जमिनीचा कागद -  पतुर तर असेल ना ? नाय तर मुखत्यारपत्र केले असाल न तुझ्या बा न ? का अशीच कशी जमीन दिली त्याला सालान ?
शंकर्या : सख्खा भाऊ  हाये म्हणूनशान माझ्या येड्या बान तशीच दिली होती पिकवायला. सालान ! अन  त्योच असा घात कारण अस वाटलं असत तर कशाला दिली असती ? जबानीला पालटला हरामखोर !गिळायला बघ्तुय फुकटच !
  तात्याबा : (बाकि पंचाना)  या दोघांना वेगवेगळ घेऊन जा ,काय म्हणत्यात ते नीट बैजवार एकूण घ्यावा मंग बघू  ! तसे शेजारचे दोन पंच उठून वेगवेगळ्या दिशेला गेले दोन तुकड्या पांगल्या , कल्ला शांत झाला पंचांनी उपरान्यांनी घाम पुसला “
"सार गाव मामाच ,पण कोण न्हाई कामाच "
हम्म ................ बोला तानाजी
  आता तानाजी   उठला "  तात्या , मायबाप पोरीला लई सासुरवास आहे ,नांदवायची नाही म्हणतो तिचा नवरा ,पोरीला ६ महिने झाल माहेरी आणून सोडल्याल, ३ भैनी हाय तिच्या पाठी ,कोण करणार त्यांना ? तुम्ही लक्ष घाला थोड !
      तात्याबा : हिच्या सासरच आलाय का कोणी ? म्हणताच एक काळ्या -सावळ्या रंगाची जाड बाई गर्दीला तुडवत पुढ आली " ह्ये बघा मला हि पोरगी सून म्हणून नक्को , छप्पन - साठ पोरी आल्या होत्या सांगून माह्या पोराला , हिच्या बापान १०.००० द्यायचं काबुल केल होत लग्नात , त्याचा पत्ता न्हाय त न्हाय अन दीड दोन वर्ष उजाडली लग्नाला अजून पोराचा पत्ता न्हाय घरात पाळणा हलला नाय अजून ,अशी सून काय कामाची ?बाहेरच पाहिलं ,कौल लावला पण काय उपयोग नाही झाला .
    तात्याबा : ओ अक्का .....अश्या कामासाठी बाहेरचा काय उपयोग ???
तसे काहीजण फिस्सकन हसले , तिचा शेळपट  मुलगा तिच्याआड लपल्यासारखा झाला.
,”एक काम करा तालुक्याला दवाखान्यात न्यावा एकदा, फालतू लोकांच्या नादी लागण्यापेक्षा ते बर “
पोरगी गुणाची आहे म्हणून म्हणतो ,
बाई : पण हुंड्याच काय ?
अक्का ?  हुंडा ? कशाला पायजेले  हुंडा  ?
आणिक ऐपत नाही तरी कशाला शबुद दिला र तानाजी ?
तानाजी हात जोडून उभा होता .
" देतो तात्या थोड थोड जमा करून एक खड्डा भराया जातो त्येच दुसरीकडे खड्डा पडतोय ताळमेळच बसना !”
 तात्याबा : पैसे मिळत्यान तुम्हाला पण थोड थोड करून ,हातावरची पोट हायेत ह्यांची ,थोडाफार खड्डा आम्ही बरून काढू कस ?बाईच्या चेहर्यावर हसू उमटलं बाई एका बाजूला जाऊन बसली.
      लोकांची गार्हाणी चालू होती पंच आपल्या आपल्या परिन सोडवण्याचा प्रयत्न करीत होते कुणाला पुढल्या महिन्याचा वायदा करीत होते
तात्याबा: " ए कुणी हाये का रे तिकडे पाणी आण जरा गळ्याच्या शिरा ताणून ताणून घसा कोरडा पडलाय माझा "
तशी पलीकडच्या घरात राहणाऱ्या पारीन लगबगीन छोटी चरवी अन तांब्या भरून आणला
घट घट पाणी घशाखाली उतरवल.
सगळ्यांना आपल गार्हाण आधी मांडायची घाई झालेली होती .काही लोक वाड्या वस्त्यावरून आलेली होती ,मावळायच्या आत घरी पोहोचायचं होत .
 समोरची लोकांची घाई गडबड बघून
तात्याबा : "ह्ये बघा एक एक करून सांगा म्हंजी गोंधळ होत नाही "
" ए संभा , रम्या एकू येत न्हाई का तुम्हाला ? मी काय सांगतो ते ? गप्प राहा ना जरा.
म्हातारा सोपान केव्हाचा काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता पण बाकिंच्याच्या गडबड गोंधळात त्याचा आवाज  विरळ होत होता.
कुणाच बोलन कुणाला एकू येत नव्हत .पाचही पंचाच दर महिन्याच्या पहिल्या इतवारी असाच डोक ठणकायच !
तात्याबा  : (ओरडून )
" अरे मानस हायेत का जनावर ? एक येळ कुत्र्याला हाड म्हणाल तर ते हाडूक टाकून पळतंय "  तुमची तर तऱ्हाच  न्यारी हाये “तसा गोंधळ बर्यापैकी शांत झाला सर्वजन आपल्या जागेवर सावरून बसले.
तात्याबा: हा  ...मामा बोला ........
म्हातार्यान तोंड उघडल पण त्याचा आवाज शेजारच्याला पण एकू जाईना ,
तात्याबा:  "  जोरात बोला कि ., पुढ या अस या अंगाने तस म्हातर काठी सावरत उठला , ख्या खुर्र्र करीत घसा खाकरला एक हिरवा बुळबुळीत शेंबडाचा  बेन्डका थुंकला .
सोपान : माझी बांडी गावत न्हाई , चोरीला गेली जणू , ?
तात्याबा:  "  : ( गोंधळून ) बांडी ? कोण बांडी ?
सोपान : माझ्या ...........बकरीची पाठ हाये , कुर्ह्या कानाची तांबडी बांडी ,  दोन तीन महिन्याची आसन ,तुम्ही शोध लावा, त्या हराम्खोर चोराला पकडा ,
पंचांनी डोक्यावर हात मारून घेतला "  तुम्ही बसा बाजूला आपण शोधून काढू तुमच्या बांडीला "
तसे बाकीचे चवताळले " ओ मामा ...कुणाच ,काय अन कुणाच काय ?
दूर हिरव्या माळावर मेंढ्या / बकर्या चारणारे धनगर पण जवळ येऊन कुतूहलाने पंचायत एकत होते .
  शिंदेना तालुक्याला जायचं होत बाकीच काम इतर पंचावर सोपवून शिंदे जागेवरून उठले उपरण झटकून गळ्यात टाकल ,लोक त्यांच्याभोवती गोळा झाली होती त्यांच्या फटफटीला लोकांनी घेराव घातला ," तेव्हढ आमच बी एकूण घेतलं असत "
      पंच शिन्देवर लोकांची जास्त श्रद्धा होती ,ते थोडेफार शिकलेले होते , त्यांच्याकडूनच आपल्याला चांगला
 न्याय मिळेल अशी लोकांची समजूत होती , अन ती त्यांनी नेहमी सार्थ करून दाखविली होती ते त्या लोकांना समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते .
तेव्हढ्यात कुणाचातरी गोंगाट एकू आला ,गावातला महादू त्यांच्या दिशेने पळत येत होता ,
  तात्या ,तात्या ..खून .......................खून झाला खून झाला..............................
तात्या गर्दी रेटत पुढे आले .
घाबरलेला महाद्या धपकन खाली उताणा पडला ,धुळीन माखला ,
तात्या : ए जरा पाणी आणा रे .............कुणीतरी ,तोंड काय बघत बसले ?
गळ्यातल उपरण काढून त्याला वारा घालू लागले , तोंडावर पाण्याचे सपकारे मारले तसा महादू उठून बसला .
सर्व गाव त्याच्या पाठीमाग लोटला.
*************************************************
    महादू , सरपंच ,शिंदे व इतर पंच आपापसात कुजबुज करीत होते .
ओळखीच्या बाया - बापड्या तोंडाला पदर लावून हुंदके देत होता , हळहळत होत्या ,ह्ये अस इपरीत कद्दिच  घडल नै गावात ? 
पोलिसांची जीप वेशीतून आत घुसली तशी सरपंच ,पोलीस पाटील ,अन अजून ३-४ तरुण तिकडे लगबगीने गेले  त्यांच्यात काहीतरी जुजबी बोलन झाल अन पोलिसांनी जीप गावाच्या खालच्या रस्त्याकड वळवली .
******************************
इन्स्पेक्टर काळे  जीपमधून उतरले मृतदेहाजवळ जाताच नाकाला रुमाल लावला .
इन .काळे :  " बहुतेक २-३ दिवस झाले असावेत बॉडीला ,पालथा पडलेला मृतदेह हवालदाराने सरळ केला
चेहरा काळानिळा झाला होता गळ्यावर काचल्याच्या खुणा होत्या .जीभ किंचित बाहेर आलेली होती .डोळे अर्धे उघडे होते. “ गायकवाड बॉडीचा पंचनामा करून ताब्यात घ्या , सिव्हील हॉस्पिटल मध्ये पाठवून द्या
तपासाच्या दृष्टीने पोस्ट मार्टेम रिपोर्ट महत्वाचा आहे ,”
 इन्स्पेक्टर काळे : कोणी पाहिली बॉडी आधी ?
 तसा महादू घाबरत -  घाबरत समोर आला .
इन्स्पे. काळे : हम्म्म ...............  तू कशाला आला होतास इतक्या लांब ? आडबाजूला ?
महादू ( चपापल्यासारखा ) स ...स्साह्येब ते मी .......... कोंबडीचे पखाड टाकाय आलो होतो साह्येब !
मी  भाउच्या हॉटेलात कामला आहे , कापलेल्या कोंबड्यांचे पखाड अन घाण टाकाय येत असतो हिकड दर ३-४ दिवस मिळून ,गावकरी उकिरड्यावर टाकू देत न्हाई म्हणून !
अजून काही माहिती नाही तुला  ?  ह्या बाईला ओळखतोस का ?
महादू : व्हय जी , मध्याची बायकू हाय ती ,एका गावात राहतो ओळखणार कस नाही ?
इन्सपे. काळे : " टीचभर गाव तुमचा ,गावात खून झालाय , ते हि साधारण दोन दिवस आधी ,कुणाशी काय भांडण ? काही वाद ? कानावर काही खबरबात नाही आली ?
तुमच्या गावाच्या पंचायती बद्दल बराच एकूण आहे मी , मग कुणी काही तक्रार नाही केली का शिंदे तुमच्याकड ?
शिंदे पुढे होऊन : " अहो साहेब हि एकटीच राहते तिच्या लहान पोराबरोबर ,नवरा तालुक्याला काम करतो गवंड्याच !
इन्स्पे. काळे " ( महादुकडे बघत ) “याला पण घ्या जाधव  आपल्याबरोबर “
तसा महदू टरकला ,गयावया करू लागला ,"ताब्यात ? मला कशापायी पण मी काय केलेय? "स्वत: चे तोंड बडवून  घ्यायला लगाला ,कशापायी आलो हिकड़ म्या ***** घालायला ,सह्येबाचे पाय धरत " साह्येब मी खरच काही केल नाही साहेब , म्या कशाला काय करीन , ? गोदाच अन माज काय घेण- देण ?, ज्यांच्याशी हाय त्याना विचारा ना साह्येब !,गरीबाला का म्हणून ही शिक्षा "
सरपंचाने खिशातला रुमाल काढून घाम टिपला
इंस्पे . काळें ": ऐ गप्पे कशाला भोकाड पसरवतोय , तुला फकत चौकशीसाठी ताब्यात घेत आहे जास्ती बोलला तर आत टाकिन तुला
अस बोलून
 इन्सपे. काळेंनी आपला मोर्चा मध्याकडे वळवला त्याच्या जवळ जाताच दारूचा उग्र भपकारा जाणवला
काय रे बायको गेली ना तुझी ? अन तू असा डुकरासारखा पिवून पडला आहेस लाजा  कशा वाटत नाही रे तुम्हाला ?का तुझाच काही गोड्बंगाल तर नाही न ? ह्या दारूमुळेच संसार उध्वस्त होतात ,
त्याची गचांडी पकडत त्याला कसेबसे उठवत त्यांनी विचारले
" काय कायमचा संपवलं ना एकदाच ? काय झाल काय होत रे ?
तसा मध्याची तंतरली " ओ साह्येब ,मी ,मी ....मला कैच नाही माईत साह्येब ,म्या नव्हतो बी गावाकड !
इन्सपे. च्या बोलण्याचा रोख लक्षात घेऊन सरपंच पुढे झाला
" नाही साहेब तो असा काही करायचा नाही गरीब आहे तो , तालुक्याला जाऊन गवंडीकाम करून पोट भरतो ,आठवड्यातून एकदाच येतो गावात भेटायला  ,  अस घडल म्हणून त्याला तालुक्याला जाऊन आणलाय गावातल्या पोरांनी !
"अहो अस म्हणून कस चालेल  सरपंच ? ह्याने  काहीच केल नाही ते ? इथे खून झालाय खून  ? कुणीही असा टाईमपास म्हणून तर नसेल न केला खून ,काहीतरी कारण तर असेलच ना ? जोपर्यंत काही धागेदोरे हाती लागत नाहीत तोपर्यंत हा आमच्या ताब्यात राहील.
आम्हाला आमच्या परीने शोध लावू द्या,  असा नाही काबुल व्हायचा हा !
" जाधव गाडीत टाका रे याला "
त्यांच्या बोलण्यातला करारीपणा बघून कुणाची पुन्हा तोंड उघडायची वासना  राहिली नाही.
सर्व गावकरी चिडीचूप उभे होते .
इन्सपे काळेंनी सर्वांकड चौफेर नजर फिरवली
" हम्म कुणाची गरज पडली तर सहकार्याची अपेक्षा ठेवतो मी शिंदे साहेब तुमच्याकडून !
म्हणत इन्स्पे. काळे जीप मध्ये बसले.
धुराळा उडवत एकामाग एक पोलिसांच्या जीप चालल्या  होत्या
गावात ही अशी पहिलीच घटना होती कि  पोलिसांचा पाय गावात पडला होता
गावाची वेस ओलांडून पुढे गेल्या न गेल्या तोच मागे राहिलेल्या घोळक्यात कुजबुज सुरु झाली
 " गोदाच म्हण लफड होत भाईर "
तस पारीला गप्प करत तिचा नवरा पुढ आला
" ए पारे ,काही बोलली तर जीभ हासडीन तुझी ? खुनाचा मामला हाय हा उगा काही बोलून गळ्यात लोढण कशाला ओढून घेतीस ग ,चल हो घरात “
तशी पारी लगबगीन घरात घुसली ,बाया पांगल्या .
लोक घोळक्या घोळक्यान चर्चा करत होते ,सर्व गाव हादरला होता .
हा गावातला पहिलाच मामला होता कि ज्याच्यासाठी खुद्द शिंदेनीच  पोलिसांना पाचारण केल होत .
भैरू : ( झोकांड्या खात ) हँ. ह्या.... ह्या ....ह्या............... " ह्याच्यात लssssssssय .......मोठ्या लोकांचा हात हाये , पंचाला सुदिक दाबून टाकतीन ते,पंचाची बी डेरिंग नाही त्यांना नडायची .
.. लय..... ऐकल ह्या साहेबाबद्द्ल !  बघू ह्यो साह्येब काय करतोय ? का त्यो बी गोंडा घोळवनाराच
  निघतोय अस म्हणत दारुड्या भैरूने डोळे मिचकावले . अन झोकांड्या खात
  जाउया डबल सीट ..र... लांब... लांब..... लांब.....  गान म्हणत निघून गेला 
क्रमश :
 
         
  
प्रतिक्रिया
15 Nov 2011 - 1:20 pm | मन१
गोष्ट मस्त तपशिलवार लिहिलिये. वाचतोय.
अस्सल ग्रामीण भागात राहिलेल्या,खेडी अनुभवलेल्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत
15 Nov 2011 - 1:32 pm | किसन शिंदे
सुरूवातच गुंतवून ठेवणारी केलीय.
पंचायतीचं आणी शिंदेंच वर्णन वाचून बुलंदी सिनेमा आणी त्यातला अनिल कपूर आठवला.
15 Nov 2011 - 1:42 pm | अन्या दातार
मस्त कथा.
पुभाप्र
15 Nov 2011 - 1:51 pm | प्रभाकर पेठकर
गावखेड्यातील पंचायतीचे अचूक वर्णन साधले आहे. कथा उत्सुकता वाढवणारी आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
15 Nov 2011 - 1:55 pm | किचेन
मस्त लिहिल्यास.सुरुवातीपासूनच अगदी लहान सहन बारकावेही टिपलेत.
कोण म्हणत तुझ शुध्दलेखन अशुध्ह आहे म्हणून? अन एकदा माझ्या समोर त्याला.त्याची बी निकाल लावून टाकू म्होरल्या पानायातीत!
15 Nov 2011 - 2:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गावपंचायतीचं चित्र छान जमलं आहे.
पुभाप्र.
-दिलीप बिरुटे
15 Nov 2011 - 2:22 pm | मदनबाण
मस्त लिहलयं ट्वीटी... :)
पुढच्या भागाची वाट पाहतुया.
15 Nov 2011 - 2:27 pm | धनुअमिता
मस्त लिहीलेस कथा.
पण एक सांग पियुशा ही कथा पण अधुरी नाही ना ठेवणार "परतीच्या वाटेवर" ह्या कथेसारखी.
पुभाप्र
15 Nov 2011 - 2:32 pm | पियुशा
"परतीच्या वाटेवर" भाग लिहित आहे ग , अधुरी नाही ठेवणार :)
15 Nov 2011 - 2:29 pm | शाहिर
झ्याक जमलय बगा !
बिगी बिगी लिवा पुडचं
15 Nov 2011 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार
|| गणपती बाप्पा मोरया ||
15 Nov 2011 - 4:40 pm | प्रीत-मोहर
जय हरि विट्ठल :)
15 Nov 2011 - 11:39 pm | नावातकायआहे
|| श्री गुरुदेव दत्त! ||
16 Nov 2011 - 3:08 am | रेवती
जय बजरंग बली!
16 Nov 2011 - 10:44 am | पैसा
तू बजरंग दलात कधीपासून?
17 Nov 2011 - 2:08 pm | अन्या दातार
जो बोले सो निहाल
सत श्री अकाल
15 Nov 2011 - 2:38 pm | ५० फक्त
मस्त झालीय कथा, हा प्रकार कधी प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही पण वाचल्यावरुन हे सगळं असंच घडत असावं असं वाटतंय.
हे सगळं असंच होतं का अजुन गावातुन का आता बंद झाल्या या गोष्टी.
15 Nov 2011 - 2:39 pm | स्पा
सुरुवात मस्त झालीये ग.
15 Nov 2011 - 2:42 pm | पियुशा
@ ५० फक्त
नगर जिल्यातील मढी या गावाबद्दल ऐकलआहे का कधी ? ,गोरक्षनाथांची यात्रा भरते ,अन गाढवांचा सगळ्यात मोठा बाजार भरतो इथे !
दर वर्षी इथे अशा प्रकारच्या पंचायती भरतात, कधी पाहण्याचा योग आला तर जरूर पहा :)
16 Nov 2011 - 12:13 am | ५० फक्त
'दर वर्षी इथे अशा प्रकारच्या पंचायती भरतात, कधी पाहण्याचा योग आला तर जरूर पहा '
आता तुमच्याकडं दोन आमंत्रणं लागली एक हुरड्याचं अन या पंचायतीचं.
15 Nov 2011 - 3:03 pm | sneharani
पुढे? लिही पटापट!
:)
15 Nov 2011 - 3:07 pm | सविता००१
पियु, मस्त. आता मात्र पटपट पुढचे भाग टाक
15 Nov 2011 - 3:14 pm | ऋषिकेश
मस्त सुरवात..
आता प्रतिसाद शेवटच्या भागावरच देईन! पटपट लिहा!
15 Nov 2011 - 3:29 pm | पैसा
ते आधीचं एक क्रमशः आहे ते लवकर पुरं कर बघू!
15 Nov 2011 - 3:32 pm | स्मिता.
मस्त गं पियु! छान सुरुवात झालीये. अगदी जिवंत वर्णन केलंय...
(ती आधीची कथाही पूर्ण करून टाक आता.)
15 Nov 2011 - 3:42 pm | खुन्खार अकिब
मढी येथे वैदु समाजाची सर्वात मोथी जात पन्चायत भरते दरवर्शी रन्गपन्चमिला भरत असते...मी स्वतहा पाहिलय ...वर्नन ऐकुन येथिलच असावे अस वाततय
15 Nov 2011 - 3:57 pm | प्रास
शॉल्लिड लिखेला हय येकदम, मजा आयेलाय!
अबके इस्को पूर्ण करणेकाच क्या...!!!
वाट बघरैलाय.
:-)
15 Nov 2011 - 4:18 pm | विशाखा राऊत
पियु मस्त लिहिले आहेस.. आता जरा परतीच्या वाटेवर पुर्ण कर लवकर :)
15 Nov 2011 - 11:06 pm | जाई.
+१
विशाखाकाकूशी सहमत
16 Nov 2011 - 2:15 pm | किचेन
+१००
परतीच्या वाटेवर पूर्ण होण्याची खूप वाट प्बघ्तीये.
एवढी छान रंगव्लीयेस मग अशी अर्धवट का सोडलीस.
15 Nov 2011 - 5:36 pm | पिंगू
पियु मस्त सुरुवात आहे. बाकी जुनी कथा लवकर पूर्ण कर. वाट बघतो आहे.
- पिंगू
15 Nov 2011 - 8:09 pm | प्राजु
कथा पूर्ण झाल्यावरच प्रतिसाद लिहिन एकदम.
सुरूवार मस्त झालीये.
15 Nov 2011 - 8:38 pm | रेवती
कथेची सुरुवात दमदार झालिये.
आधीची कथा पूर्ण केल्याशिवाय आता प्रतिसाद देणार नाही.
15 Nov 2011 - 11:44 pm | मृत्युन्जय
छोटे मोठे बारकावे अचूक टिपले आणि चितारले आहेस. गोष्ट रंगेलसे दिसतय. सगळे भाग वाचेन म्हणातो येतील तसे.
15 Nov 2011 - 11:44 pm | पाषाणभेद
सुरूवात छान झालीय
16 Nov 2011 - 10:41 am | प्रचेतस
मस्त लिहिलय.
पारावरचे प्रसंग भन्नाट लिहिले आहेत. व्यक्तीचित्र अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली आहेत.
लवकर पुढचा भाग येउ दे आता.
शिवाय परतीच्या वाटेवर पण पूर्ण कर लवकर.
16 Nov 2011 - 2:04 pm | वपाडाव
एकदम बरुब्बर हय वल्लीभौ.....
16 Nov 2011 - 2:46 pm | समीरसूर
पियुशाजी,
कथा मस्त जमली आहे. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुढील भाग टाका लवकर..
--समीर
18 Nov 2011 - 9:27 am | नगरीनिरंजन
सुरुवात छान झालीय!
पंचायतीचं वातावरण डोळ्यापुढे उभं राहिलं.
अजूनही टंकनचुकांमुळे रसभंग होतोच आहे. कृपया टंकनाकडे लक्ष द्यावे.
6 Dec 2012 - 4:06 pm | सुर
पहिला भाग दिसत नाही.. तर दुसरा वाचुन काय समजनार..??
6 Dec 2012 - 4:16 pm | त्रिवेणी
मला कथा का दिसत नाही? plz मला मदत करा ना.
6 Dec 2012 - 4:22 pm | पियुशा
http://www.misalpav.com/node/19858
आधीचा अन त्यापुर्वीचा भाग ह्या लिंकवर आहे :)
6 Dec 2012 - 5:57 pm | कवितानागेश
आता दिसेल. :)