हत्यार व सरस्वती पुजन

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
7 Oct 2011 - 6:51 pm

हत्यार्‍यांचे विविध प्रकार असतात. युध्दात वापरली जाणारी ह्त्यार, किचन मध्ये वापरली जाणारी हत्यारे (सुरी, विळी) अजुन बर्‍यच क्षेत्रात हत्यारे वापरली जातात. तशिच शेतकर्‍यांची हत्यारे वर्षभर शेतकर्‍यांच्या सोबत राबत असतात. त्यांना निवांतपणा मिळतो तो दसर्‍याच्या दिवशी. ह्या शेतीतून अन्न धान्य पिकवण्यासाठी ही हत्यार जी कष्ट करतात त्यांचे आभार, त्यांच्याबद्दलच्या पुज्य भावना दसर्‍याच्या दिवशी हत्यार पुजन करुन केले जाते.

माझे माहेर शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे आईने पुजलेली हत्यारे मी अगदी बालपणापासुन पाहत आले. सासरची शेती पेण गावाला आहे. पण सासु-सासरे नोकरी निमित्त गावोगावी फिरले. त्यामुळे शेतीअवजारांच्या पुजेशी त्यांचा संबंध आला नाही. मात्र बाकी सगळ्या पुजा, सणवार माझ्या सासरी होतात. मी लग्न होऊन आले. पहिल वर्ष माहेरीच असत. त्यामुळे ते वर्ष चुकल. दुसर्‍या वर्षी आमचे सगळे कुटुंब नविन वाडीत शिफ्ट झाल. तिथे सासर्‍यांनी वाडीसाठी हत्यार घेतलीच होती. मी स्वतः सुद्धा ती हत्यारे छोट्या मोठ्या कामांसाठी वापरत होते. त्यामुळे दसर्‍याच्या त्या दुसर्‍या वर्षी रहावले नाही. जाऊन सगळी हत्यारे गोळा केली आणि स्वच्छ धुवून पुसुन आणुन पाटावर मांडली. सासरे आणि सासूबाई पाहत बसले ही काय करते. पण जे करत होते त्यामुळे दोघेही खुष झाले. सासुबाई म्हणाल्या शेतकरीण आहे ना ती म्हणून शाब्बासकी दिली. सासर्‍यांच्या चेहर्‍यावर त्या दिवशी मी वेगळाच आनंद पाहीला.

माझे सासरे खुप मितभाषी होते फार कमी बोलत. ते ४ वर्षापुर्वी वारले. पण प्रत्येक दसर्‍याला ही पुजा करताना मला त्यांना त्या दिवशी हत्यारे पुजल्यामुळे झालेल्या समाधानाची आठवण येते.

ह्या वर्षी केलेले हत्यार पुजन. हत्यारांमध्ये पिकाव, कुर्‍हाड, फावडा, कुदळी,नारळ सोलण्याचे यंत्र भिंतिला टेकुन आहे तर पुढे खरळ, हातोडी, कचरा काढण्याचा खुरपा, कोयता, सुरी, काती आहे.

ही सरस्वती माझ्या मुलीसाठी सासुबाईंनी काढून दिली काल. श्रावणीने पुजन केले सरस्वतीचे.

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

जाई.'s picture

7 Oct 2011 - 7:32 pm | जाई.

काल मी पण हेच केलं
फक्त अवजाराऐवजी ईलेक्ट्राँनिक्सची आणि बेअर अँक्टची पूजा केली

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2011 - 8:15 pm | प्रभाकर पेठकर

मी सुद्धा घरातल्या हातोडी, काणस, पक्कड, विळी इत्यादी अवजारांची पुजा दसर्‍याला करीत असे. तसेच, पाटीवर सरस्वती काढून तिचेही पुजन करीत असे. असो.

चित्रातल्या पहिल्या हत्याराला 'पिकाव' म्हणतात की 'टिकाव' म्हणतात? आमच्या इथे सर्वजणं 'टिकाव' म्ह्णायची.

सासरची शेती पेण गावाला आहे. त्यामुळे सासरी हत्यारपुजनाची माहीती नव्हती.

हे काही नीट कळले नाही. पेण गावाचा आणि हत्यारपुजनाची माहिती नसण्याचा काही संबध आहे का? कारण मुंबई सारख्या शहरात राहूनही आम्हाला दसर्‍याच्या दिवशीच्या हत्यारपुजनाची माहिती होती. काही वेगळे कारण असल्यास विशद करावे, हि विनंती.

विशाखा राऊत's picture

7 Oct 2011 - 8:40 pm | विशाखा राऊत

दसर्‍याची पुजा, सरस्वती पुजन आठवले. आई सांगायची जो विषय अवघड वाट्तो ते पुस्तक ठेवा. चांगले मार्स्क मिळतील :)
बाकी हत्यारांची पुजा, गाडीची पुजा आणी त्या अगोदर सगळे धुवुन लख्ख साफ करणे मज्जा असायची.

निवेदिता-ताई's picture

7 Oct 2011 - 10:05 pm | निवेदिता-ताई

मलाही सर्व आठवले....हे सर्व सांगणारी आई आठवली.

पैसा's picture

7 Oct 2011 - 10:06 pm | पैसा

पेठकर काका, त्याला पिकावही म्हणतात आणि टिकावही म्हणतात. पाटीवरची आकड्यांची सरस्वती आठवली. आदल्या दिवशी पाटीला शाई लावून जास्त काळी करायची, ती आठवण आली. जागु, धन्यवाद!

प्रभाकर पेठकर's picture

8 Oct 2011 - 1:00 am | प्रभाकर पेठकर

त्याला पिकावही म्हणतात आणि टिकावही म्हणतात.

धन्यवाद पैसाजी,

लक्षात ठेवीन.

पैसा कोळशाने ही पाटी काळी करायचो आम्ही.

निवेदिता, विशाखा, जाई धन्स.

प्रभाकरजी मला पेण गावाबद्दल नव्हत म्हणायच. ही पुजा सगळीकडेच केली जाते. सासरची शेतजमिन पेण गावात आहे. पण सासु-सासरे नोकरी निमित्त गावोगावी फिरले. त्यामुळे शेतीअवजारांच्या पुजेशी त्यांचा संबंध आला नाही.

पिकाव आणि टिकाव दोन्ही म्हणतात.

प्रभाकर पेठकर's picture

8 Oct 2011 - 1:02 am | प्रभाकर पेठकर

आले लक्षात. धन्यवाद.

चित्रा's picture

8 Oct 2011 - 12:14 am | चित्रा

नेहमीप्रमाणेच छान.

या धाग्याने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शमीची पानं पाहून छान वाटले.
पाटीपूजनासाठी शाळेत बोलवत असत. त्यावेळी स्वच्छ पाटीवर १ १ अकड्यांची सरस्वती काढून न्यावी लागायची. बरोबर पूजेचं साहित्य!
जागु या दिवशी काही स्पेशल नैवेद्य असतो का?

राही's picture

8 Oct 2011 - 3:43 pm | राही

ती पाने आपट्याची असावीत. शमीचे पान हे चिंचेच्या पानाप्रमाणे संयुक्त पान असते आणि देठावर काटा असतो.
पण काही ठिकाणी आपट्याला शमी नाव असणे शक्य आहे.

५० फक्त's picture

8 Oct 2011 - 8:10 am | ५० फक्त

रेवतीतै + १०० टु शेवटची ओळ, पुजा हत्यारांची करा नाय तर देवांची आपण आपलं नैवैद्यावर लक्ष ठेवावं हे बरं.

कुणी त्या आकड्यांच्या सरस्वती मागचा इतिहास किंवा थेअरी सांगेल काय, त्या विशिष्ट आकृतीचा अन सरस्वतीचा काय अन कसा संबंध आहे हे समजावुन सांगेल का, ही अतिशय प्रामाणिक शंका आहे.

राही's picture

8 Oct 2011 - 4:02 pm | राही

मला वाटते की आपण जे चित्र सरस्वतीचे म्हणून काढतो ते यथार्थ-चित्र नसते तर मोरावर बसलेल्या देवीचे प्रतीक असते. चौकोनचौकोनांचा मिळून बनवलेला जो उलटा त्रिकोण, तो मोराचा पिसारा. प्रत्येक चौकोन आणि त्यामधील डोळा(ठिपका) म्हणजे एक एक मोरपीस. त्रिकोणाच्या दक्षिण कोनबिंदूपाशी दोन रेघा म्हणजे मोराचे पाय.तिथेच सरस्वतीचे आसन अथवा बैठक असते.
नेहमीच्या रांगोळीत चंद्र,सूर्य,तारे,गोपद्मे याबरोबर चौकटीतल्या विट्ठलरखुमाईचे चित्र काढतात तेही असेच आडव्या उभ्या रेषांनी. अगदी सोपे आणि प्रतीकात्मक. विटेवर उभा आणि कटीवर हात असे चितारताना आडव्या छोट्या आयताची वीट बनते, तिरया रेषांतून कमरेवरची हात स्पष्ट होतात. शेजारी रखुमाई म्हणजे पूर्वीच्या खेळण्यातली लाकडाची ठकी. एक उभा आयत आणि वर एक वर्तुळ. आयतावर वस्त्र दाखवण्यासाठी निर्‍यांच्या रेषा.
हे सर्व आपोआप आणि कालांतराने झालेले सुलभीकरण आहे.

५० फक्त's picture

9 Oct 2011 - 10:53 pm | ५० फक्त

धन्यवाद, मी हा प्रश्न आज पर्यंत ब-याचजणांना विचारला आहे, पण समाधान होईल असे उत्तर मिळाले नाही , अर्थात तुमच्या उत्तराने पण समाधान झालेले नाहीच, पण अजुन एक उत्तर तरी मिळाले त्याबद्दल धन्यवाद.

५० शोध काढते आता.

रेवती अग श्रिखंड पुरीचाच नैवेद्य असतो दसर्‍याला.

इथे पण दसर्‍याच्या दिवशी "शस्त्रपूजा" झाली.
सगळ्यांनी आपापल्या तलवारी वगैरे आणले होते..

पण मनात उगाच एक विचार आला.. ही ढेरी सुटलेली माणसे खरंच तलवार चालवायची वेळ आली तर चालवतील काय :(

अप्पा जोगळेकर's picture

8 Oct 2011 - 4:35 pm | अप्पा जोगळेकर

आम्ही आपले गुमान जाउन मुंब्र्याच्या बोल्डर्सना हार चढवले, रोपच्या बाजूला नारळ फोडले अन आलो परत. हाय काय नि नाय काय. प्रसाद खाल्ल्याशी कारण.

जागु's picture

8 Oct 2011 - 5:01 pm | जागु

राही छान माहीती. त्या पानांना आम्ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपट्याचीच पाने म्हणतो आणि चिंचेसारख्या बारीक आणि काटे असलेल्या पानांना शमी.

यशवंत, आप्पा धन्यवाद.

अविनाशकुलकर्णी's picture

8 Oct 2011 - 8:33 pm | अविनाशकुलकर्णी

पैसा कोळशाने ही पाटी काळी करायचो आम्ही.
सुपरलाइक

आठवणी ने हळवा झालो..लहान पणचा दसरा आठवला
आईची आठवण आली.....