जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.
जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.
अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)
आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात.
१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.
२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमीट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालु आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमीट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमीट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.
या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.
मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चूकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीयना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वत: एक जैन धर्मीय या नात्याने या लेखनाद्वारे करीत आहे.
http://beftiac.blogspot.com/2010/10/blog-post_08.html
प्रतिसादांना उत्तरे देण्याकरिता पुरवणी लेखन
या लेखाच्या प्रतिसादात अनेकांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या प्रतिसादांना तिथल्या तिथे उत्तरे देण्याचा मी कमाल प्रयत्न केला आहे. अर्थात अनेक वाचकांच्या प्रतिसादात काही मुद्दे पुन्हा पुन्हा आले आहेत. त्या सर्वांना त्या त्या ठिकाणी एकसारखी प्रत्युत्तरे देण्यापेक्षा अशा मुद्यांना या लेखातच उत्तरे द्यावी या उद्देशाने हे पुरवणी लेखन करीत आहे. या पुरवणी मजकूराच्या वर असणार्या मूळ लेखात कोणतेही संपादन केलेले नाहीय.
१. अनेकांनी जैन धर्मीयांच्या कट्टरपणाचा, विखारीपणाचा, तसेच त्यांच्या आचरण व शिकवणूकीतील विसंगतींचा मुद्दा मांडला आहेत. याबद्दल एक उदाहरण द्यावेसे वाटते. काही वर्षांपुर्वी हिंसक प्रचार करणार्या एका धार्मिक नेत्याला जैन धर्मीयांच्या दादावाडी (पुणे) मंदिरात आमंत्रण दिले गेले होते व ते जैन मंदिरात आले देखील होते. http://articles.timesofindia.indiatimes.com/keyword/jain-temple/featured/4 अशा लोकांना बोलवायचे असेल तर एरवी अहिंसेचे गोडवे गाण्यात तरी काय अर्थ आहे?
२. जैन ब्रॅन्डींगची मी बरीच उदाहरणे दिली होती पण त्यातील प्रामुख्य़ाने खाण्याच्याच बाबींची चर्चा झाली. अनेकांनी अशा प्रकारे जैन धर्मीयांना साजेसे अन्नपदार्थ हॉटेला त उपलब्ध करून देण्यात काहीच गैर नसल्याचे म्हंटले आहे. मलाही यात काही गैर आहे असे म्हणायचे नव्हतेच. मला स्वत:ला देखील माझ्या आवडीप्रमाणे हॉटेलात अन्न उपलब्ध असावे असे वाटतेच. आक्षेप आहे तो अशा पदार्थांच्या नावामागे जैन हा शब्द लावण्यास. कारण यातून बरेच गैर समज निर्माण होतात. उदाहरणार्थ - जैन पावभाजी - आता या पावभाजीत कांदा, लसूण, बटाटा आदी पदार्थ नसतात हे खरे. परंतू तरीही तिला जैन पावभाजी संबोधणे चूकीचेच आहे. जैन धर्मीयांच्या अन्नग्रहणाच्या काटेकोर नियमानुसार पाव देखील जैन आहारात समाविष्ट होऊ शकत नाही. तो किण्वन प्रक्रियेने बनतो व त्यात जंतुंची वाढ होत असते. याप्रमाणेच जैन पिझ्झा हा देखील खर्या अर्थाने जैन आहार होऊ शकत नाही. पण गंमतीचा भाग असा की बाजारात मिळणारे बहुतेक सर्व पदार्थ खाण्याची इच्छा तर असतेच, त्याचवेळी आपण धर्म पाळतो असेही दाखवायचे असते मग त्या पदार्थात थातुर मातुर बदल करून त्याच्यामागे जैन उपाधी चिकटवून हादडणे चालु होते. आता इतके जैन पदार्थ बाजारात मिळत आहेत की जैन मांस व जैन अंडी देखील मेन्यूकार्ड मध्ये विराजमान होतात की काय अशी शंका वाटू लागली आहे.
याबाबत मॅगी टोमॅटो सॉस उत्पादकांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी त्यांच्या सॉसमध्ये कांदा व लसुणाशिवायचा देखील एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे, परंतू त्यावर जैन सॉस असे न लिहीता सॉस विदाऊट ओनिअन ऍन्ड गार्लिक असे लिहीले आहे.
३. मी लेखात निवडलेल्या बाबी फारशा त्रासदायक नाहीत असाही काहींचा आक्षेप होता. हे मलाही मान्य आहे. परंतु एक लक्षात घ्या की एक जैन धर्मीय म्हणून जगताना मी आमच्या धर्माच्या साधु साध्वींचे अतिशय कडक नियम पाहिले आहेत. हे लोक किती क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करतात हे कदाचित आपणास ठाऊक नसेल म्हणून त्याबद्दलची ही उदाहरणे इथे मांडू इच्छितो - स्थानक या प्रार्थना स्थलात ध्यान करतेवेळि इलेक्ट्रॉनिक घड्याळ वापरू नये कारण त्यातील विद्युत प्रभावा मुळे सुक्ष्म जीवांची हत्या होते, नळाचे वाहते पाणी वापरू नये कारण या प्रवाहामुळे सुक्ष्म जीवांची हत्या होते, इत्यादी. असे अजब तर्कशास्त्र रोजच्या व्यवहारातील गोष्टींना लावले जाते. इतकेच नव्हे तर जैन धर्मीयांच्या धार्मिक / सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे इतर धर्मीय झाडुवाले, वाहनचालक आदी आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरावर असलेल्यांना गोड बोलुन मांसाहार वर्ज्य करण्याच्या शपथा घ्यायला लावल्या जातात. अशा प्रकारे इतरांच्या गळी आपले धार्मिक आचरण उतरवून त्यांना बाटविणारे आमचे हे समाजधुरीण आमचाच एखादा बांधव कत्तलखाना / मद्यालय अशा व्यवसायांमध्ये सक्रिय असतो तेव्हा त्याला खडसावून जाब का विचारीत नाहीत याचा मला राग येतो. तीन वर्षांपूर्वी शिरूर स्थित एका गुटखा व्यापार्याच्या कन्येने नऊ दिवस उपवास केले होते त्याचा मोठा समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या समारंभात जैन साध्वींनी सदर कन्यारत्नाचे कौतुक केलेच परंतू तिच्या गुटखा किंग पित्याची देखील सामाजिक बांधिलकी जपणारे व्यावसायिक असे म्हणत तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. देणगी मिळते म्हणून असे मिंधे आचरण करणार्या साधु साध्वींचा मला जराही आदर वाटत नाही.
प्रतिक्रिया
15 Sep 2011 - 1:07 pm | चेतन सुभाष गुगळे
<<तेच महावीरांच, हा ही एक राजपुत्रच, अर्थात या सार्याचे पुरावे त्या काळच्या वाञ्मयामध्ये मिळतात.>>
या वाक्यातून तुम्हाला हिंदु धर्मातूनच जैन धर्माचा उगम झाला असं म्हणायचं असेल तर ते चूक आहे. जैन धर्म बराच जुना आहे. महावीर हे देव नाहीत. ते तीर्थंकर आहेत. जैन धर्मात देवाची प्रतिमा / मूर्ती नसते कारण ते कोणीच पाहिलेले नाहीत. तीर्थंकर हे मानव होते. सर्वांनी पाहिलेत. त्यांच्या मूर्त्या / प्रतिमा असतात.
महावीर हे चोविसावे तीर्थंकर आहेत. पहिले तीर्थंकर कोण? त्यांचा जन्म केव्हा झाला? आदि माहिती इथे मिळू शकेल http://en.wikipedia.org/wiki/Tirthankara
जैन धर्म आणि हिंदु धर्म यांची तूलना केल्यास हिंदु धर्म हा एक मोठा प्रवाह आहे तर जैन धर्म हा एक त्यापुढे लहानसा ओघळ. दोघांचा प्रवास समांतरच आहे. जैन धर्म हिंदु धर्मातून उगम पावलेला नाहीये. पण काही कारणांनी (जसे आचरणास अवघड अशी तत्वे) ह्या धर्माचे अनुयायी कायमच अत्यल्पसंख्य होते. तरीही हा नष्ट झाला नाही कारण पुढील काळात काही जण हिंदु धर्मातून या धर्मात प्रवेश करू लागले (हे प्रमाणही फारच कमी असले तरी धर्माचे नाव टिकून राहण्यास पुरेसे होते). त्यामुळे पुढे लोकांचा असा गैरसमज झाला की जैन ही हिंदुंचीच शाखा आहे.
खरं तर लोकांच्या समजामुळेच काही जैन चिडले आणि आम्ही वेगळे आहोत हे ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला (ही या शंभर एक वर्षातील बाब आहे). या आक्रमकतेतुनच जे काही विसंगत आणि विपरीत घडत आहे त्यालाच मी जैन धर्माचं ब्रॅंडींग असं संबोधून त्यावर हा लेख लिहीलाय.
15 Sep 2011 - 2:54 pm | शैलेन्द्र
"जैन धर्म हिंदु धर्मातून उगम पावलेला नाहीये."
हिंदु नसेल कदाचीत, पण सनातन किंवा वैदीक धर्मातीलच एक ज्ञानशाखा म्हणुन त्यांचे अस्तित्व कित्येक काळ होते. एकाच कुळात काही जैन, काही बौद्ध मत माननारे लोक नांदायचे.. पंजाबातील घरा घरात शिख धर्माबाबत हे दिसायच- दिसतं.. महाराष्ट्रातील महानुभव पंथही तसाच..
15 Sep 2011 - 4:12 pm | राही
<<वेगळेपणा ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला>>
साधारण १९६०-६१ आणि १९७०-७१ या दोन्ही शिरगणत्यांच्या काळात जैन समाजाने आपला धर्म 'जैन' असा नोंदवावा आणि आडनाव 'जैन'च लावावे असे खास प्रयत्न झाले.तोपर्यंत हिंदू धर्म आणि जैन जात किंवा पोटजात अशी नोंदणी तुरळक रीत्या होत असे. या कार्यात खासदार(?) प्रो. जगदीशचंद्र जैन (गांधीहत्या खटल्यातील एक महत्त्वाचे साक्षीदार) आघाडीवर होते. या कामी दिल्लीस्थित जैन लोकांनी पुढाकार घेतला होता.
17 Sep 2011 - 3:25 am | चित्रगुप्त
जैन धर्मग्रंथांमध्ये योगसाधनेवर आहे का काही? असल्यास कळवा. जालावर असेल तर फारच उत्तम.
15 Sep 2011 - 10:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
त्या-त्या धर्माच्या आचरणकर्त्यांनी ठरवावं तो "धर्म" संप्रदाय आहे का धर्म ते! इंदिरा गांधींच्या मृत्युनंतर शीखांना वेगळे काढणारे काही हिंदूच होते. माझ्या ओळखीतल्या धर्म मानणार्या शीख, बौद्ध आणि जैनांना हिंदूमधला वेगळा संप्रदाय म्हटलेलं आवडत नाही ही माझ्याकडची माहिती आहे. डॉ. आंबेडकरांनी अनुयायांसोबत हिंदू धर्म त्यागून बौद्ध "धर्माचा" (किंवा धम्माचा, उच्चाराबद्दल मी आग्रही नाही) स्वीकार केला यास "धर्मांतर"(संप्रदायांतर नव्हे!) असं म्हटलं जातं. धर्म हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही त्यामुळे ऐकीव माहितीपुढे माझी मजल नाही.
माझ्यासारख्या देव न मानणार्यांना, अर्थात निरीश्वरवाद्यांना कोणाचाही आणि कसलाही देव बनवताच येत नाही. ज्यांना या संकल्पनेची गरज वाटते त्यांनी कोणालाही आणि/किंवा कशालाही देव बनवला तरी माझी "नो कमेंट".
मात्र माझा देव तोच खरा देव आणि दुसरा मानतो तो देवच नाही यात प्रचंड तार्किक विसंगती आहे.
19 Sep 2011 - 6:03 pm | चेतन सुभाष गुगळे
<< माझ्यासारख्या देव न मानणार्यांना, अर्थात निरीश्वरवाद्यांना कोणाचाही आणि कसलाही देव बनवताच येत नाही. ज्यांना या संकल्पनेची गरज वाटते त्यांनी कोणालाही आणि/किंवा कशालाही देव बनवला तरी माझी "नो कमेंट".
मात्र माझा देव तोच खरा देव आणि दुसरा मानतो तो देवच नाही यात प्रचंड तार्किक विसंगती आहे. >>
या विधानांशी पूर्णत: सहमत आहे. मी देखील निरीश्वर वादीच आहे. फक्त एकच गोष्ट मला जाणवली ती अशी - देव ही संकल्पना आपण मानत नसल्याबद्दल जर लेख लिहीला तर सर्वच धर्मांतील ईश्वर कल्पनेचे समर्थक एकत्रित रीत्या लेखावर तुटून पडतात. त्यांच्या तुटून पडण्यात विचार, तर्क, समंजसपणा अशा बाबींना अजिबात स्थान नसते. ते निव्वळ भावनेच्या आहारी जातात. स्वत: तर भडकलेले असतातच पण इतरांनाही भडकविण्याचे प्रयत्न करतात. त्यापेक्षा एक एक धर्मातील चूकीच्या रूढी, आचरण, विसंगती यावर स्वतंत्र रीत्या विवेचन केले असता प्रतिसादांना हाताळणे तूलनेने सुलभ होते.
15 Sep 2011 - 9:47 am | ऋषिकेश
भारतातील प्रत्येक जाती-धर्मात दिसणार्या विसंगतीपैकी जैन धर्मियांबाबतच्या विसंगतीवर बोट ठेवणारा लेख आवडला. तुमचा हा अभ्यासाचा विषय असेल तर असेच इतर धर्मियांच्या(पंथीयांच्या/जातीयांच्या)ही शिकवणी व प्रत्यक्ष आचरणातील विसंगती सहज दाखवता याव्यात. अश्या लेखाची प्रतिक्षा करायला आवडेल
15 Sep 2011 - 11:34 am | चेतन सुभाष गुगळे
<< भारतातील प्रत्येक जाती-धर्मात दिसणार्या विसंगतीपैकी जैन धर्मियांबाबतच्या विसंगतीवर बोट ठेवणारा लेख आवडला. >>
धन्यवाद.
<< तुमचा हा अभ्यासाचा विषय असेल तर असेच इतर धर्मियांच्या(पंथीयांच्या/जातीयांच्या)ही शिकवणी व प्रत्यक्ष आचरणातील विसंगती सहज दाखवता याव्यात. >>
मी हा काही माझ्या अभ्यासाचा विषय मुद्दाम ठरवून केलाय असे नव्हे, पण समाजात राहताना ज्या काही गोष्टी आपल्यावर लादल्या जातात त्यातली प्रामुख्याने त्रासदायक म्हणजे धर्म. अनेकदा आपल्याला परधर्मीयांच्या धार्मिक / पारंपारिक आचरणाचा त्रास होतो (त्याचप्रमाणे ज्या धार्मिक ग्रंथांचा आधार घेऊन ते असे वर्तन करतात त्या ग्रंथांचे मी स्वत: वाचन केले तर मला जाणवले की यातील काही विधाने एकमेकांशी जुळत नाहीयेत, तर काही विधाने तर्कदृष्ट्या अतिशय चूकीची आहेत). तेव्हा आपण उद्वेग व्यक्त करतो. त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपल्याही धर्मातील विसंगतींवर प्रकाश टाकावा असे मला वाटते.
15 Sep 2011 - 10:34 am | सुहास झेले
लेख आणि प्रतिक्रिया वाचल्या....मुद्दा आवडला, अजुन वाचायला आवडेल...:)
शुभेच्छा !!
19 Sep 2011 - 6:07 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद सुहास. याविषयी अजुनही मुद्दे मांडले आहेत. त्याकरिता संपादन करून मूळ लेखाच्या शेवटी पुरवणी लेखन जोडले आहे.
15 Sep 2011 - 10:52 am | सुनील
लेख आणि चर्चा आवडली.
याविषयी इतकंच सांगेन की ज्याला समाजातल्या नकारात्मक गोष्टींवर टीका करायची आहे त्याने प्रथम आपल्या घरातल्या नकारात्मक गोष्टींचाही निषेध करावा, म्हणजे त्याचा हेतू biased नसल्याची खात्री पटते व समाजातले इतर घटक त्याने त्यांच्यावर केलेल्या टीकेला देखील सकारात्मक पद्धतीने घेतात. (मला वाटतं माझ्या या वाक्यांवरून माझ्या मिपावर प्रकाशित होणार्या भावी लेखांची दिशाही तुम्हाला नक्कीच कळली असेल).
लवकर येऊ दे!
15 Sep 2011 - 2:10 pm | भडकमकर मास्तर
मी दहा वर्षे जैन धर्मीय शाळेत गेलो आहे....
साध्वी वगैरे मंडळींचे मला कायम आश्चर्य वाटत असे.... संपूर्ण शाळेला ( तेव्हा सुमारे दोन हजार मुलं होती शाळेत्त) रणरणत्या उन्हात मैदानात बसवून स्वतः झाडाखाली किंवा मांडवाच्या सावलीत मंचावर बसून मुक्या प्राण्यावर दया करा टाईप लेक्चर मी वर्षानुवर्षे ऐकली.
छोट्या पोरांना तासभर ऊन लागते ते दिसत नाही मात्र मुंग्यांना त्रास हो ऊ नये ही काळजी... ही भोंदूगिरी त्यांना कळायची नाही का ? असो...
मी सहावीत असतानाही घरी येऊन हे सांगून घरच्यांशी वाद घालत बसे...
आता वाटते , भाषण चालू असताना हात वर करून त्यांना ह प्रश्न संपूर्ण शाळेसमोर विचारायला हवा होता... ( असो .. राहून गेल्य गो ष्टी)
15 Sep 2011 - 4:17 pm | इरसाल
छान लेख लिहिलास चेतन. आवडला.
माझे जैन धर्मियांबद्दल्चे दोन अनुभव.
आमचे एक सर आहेत.भिकार्याला दारात कधी उभे केले नाही.पण जेव्हा जेव्हा जैन धार्मिक कार्यक्रम व्हायचे तेव्हा ह्यांच्या देणग्या २५/५०/७५ हजार अश्या असायच्या त्याही १९९० च्या काळात.ह्यांच्याच घरावर म्हणे चंदनाचा पाऊस पडला होता.
दुसरा अनुभव जैन मेडिकल स्टोर वरचा.
आजीसाठी काही औषध घ्यायला मेडिकल वर उभा होतो.तेव्हड्यात तिथे साध्वी अवतरल्या.आणि आम्ही सगळे गिर्हाईक अछूत झालो.:(
मेडिकल वाल्याने जवळजवळ सगळ्यांना हुडूत करून हाकलले. कोणीही पूर्ण काउंटरला हात लावायचा नाही. मग तो दोन्ही मुठी छातीशी बांधून लीन मुद्रा करून शब्द/आज्ञा झेलण्यास सज्ज झाला. साध्विनी सगळ्यात अगोदर काउंटर वर मोर्पिसाने सफाई केली मग त्याच्या कडून औषधांची मागणी केली.तो न बोलता सांगतील ते औषध काढून देत होता.
पैसे न देता गेल्या नंतर त्याने काउंटर ला नमस्कार केला मग आम्हा अच्छुताना हात लावायला परवानगी मिळाली.
तरीही (नेमीनाथ जैन ब्रम्हचर्य आश्रमात शिकलेला) इरसाल J)
15 Sep 2011 - 7:46 pm | स्वानन्द
पहिल्या अनुभवाच्या बाबतीत गैर काही वाटण्यासारखे वाटले नाही. एरव्ही भिकार्यांना पैसे देणारे अनेक जण त्यांचा माजोरडेपणा बघून पैसे देणे बंद करतात असे बर्याचदा पाहण्यात आले आहे. ( मी देखील त्यातलाच एक )
बाकी दुसरे उदाहरण वाचून वाईट वाटले.
19 Sep 2011 - 6:17 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद राकेश,
तू मांडलेल्या पहिल्या मुद्याविषयीचं माझं मत -
http://www.misalpav.com/node/10115
तुझ्या दुसर्या मुद्याविषयी -
अरे साध्वींच्या समोर जैन धर्मीय असूनही आम्ही देखील अछुतच ठरतो. ती धार्मिक भेदाभेद नसून तो स्त्री-पुरुष असा भेदाभेद आहे. म्हणजे जैन साधु कुठल्याही स्त्रीला स्पर्श करीत नाही. तर जैन साध्वी कुठल्याही पुरूषाला..
हे एका अर्थी बरेच आहे म्हणायचे अन्यथा अनेक साधु / साध्वींचे मग स्वनियंत्रण सुटून नको ते प्रकार घडू शकतात.
हां आता त्यांनी हात लावलेल्या काऊंटरलाही स्पर्श करायचा नाही हा जरा अतिरेक च आहे. पण त्यात कसे आहे की प्रत्येक जण आपल्या परीने नियमांना अधिक कडक बनविण्याचा प्रयत्न करत असतो.
<< साध्विनी सगळ्यात अगोदर काउंटर वर मोर्पिसाने सफाई केली >>
हे मात्र काही से चूकीचे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे पांढर्या धाग्यांचा कुंचा असतो. मोरपिस (किंवा कुठलीही प्राणीज वस्तू) वापरणे जैन तत्वांमध्ये बसत नाही.
15 Sep 2011 - 11:13 pm | आशु जोग
यातले बरेच प्रतिसाद मी वाचतोय
मारवाडी गुजराती जैन
आणि
कोल्हापूर सोलापूरचे जैन यामध्ये आचरण आणि प्रथांमधेही फरक असावा !
16 Sep 2011 - 10:30 am | ५० फक्त
''सोलापूरचे जैन यामध्ये आचरण आणि प्रथांमधेही फरक असाव''''
सोलापुरच्या जैनांचा काय संबंध आला आहे तुमचा आणि त्या निमित्तानं सोलापुरचा.
पक्का सोलापुरी एमएच १३
17 Sep 2011 - 1:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
१३ हा आकडा मला फार आवडतो. किती दिवस विचारात होते की MH-13 कुठचं असेल. थ्यँक्स, तुमच्यामुळे आज समजलं!
19 Sep 2011 - 6:29 pm | वपाडाव
मला 26 हा आकडा आवडतो....MH-26 नांदेडचे आहे....
17 Sep 2011 - 6:25 pm | आशु जोग
लेख चांगला आहे
अनेकांनी तसे प्रतिसाद दिले आहेत.
पण
मी "हा लेख विचारांना खाद्य पुरवणारा आहे " असे म्हणालो
काही भंपक लोक हे खाद्य वापरून आपली सकाळ साजरी करायचे
म्हणजे याचे विडंबन करणारे नवे धागे चालू होतील अशी भीती वाटते
19 Sep 2011 - 6:16 pm | जाई.
तुमची मते निर्भीड आहेत
19 Sep 2011 - 6:35 pm | चेतन सुभाष गुगळे
<< तुमची मते निर्भीड आहेत >>
धन्यवाद. मी तशी ती मांडू शकतो कारण,
१. मी जरी कितीही टीका केली तरी जैन धर्मीय खवळून उठत नाहीत. हा लेख मी आमच्या समाजातील अनेकांपर्यंत पोचविला. लेख वाचून त्यांनी तो शांतपणे बाजुला ठेवला आणि "चालायचंच. सगळीकडे असं थोड्याफार प्रमाणात होतंच असतं. बाकी छान लिहीलंय" इतकी थंड प्रतिक्रिया त्यापैकी बहुतेकांची होती.
२. त्याचप्रमाणे मी जेव्हा इतरांवर टीका करतो तेव्हा टीका ज्यांच्यावर करतोय त्यांचं नुकसान करण्याचा माझा उद्देश नसून हे मी त्यांच्या फायद्याकरताच लिहीलंय अशी त्यांची खात्री पटेल अशीच माझी लेखन शैली असते. हे एक उदाहरण पाहावे :-
http://www.misalpav.com/node/18686#comment-326925
हे वाचून कुणाला राग येईल की त्यांचे डोळे उघडतील?
19 Sep 2011 - 9:34 pm | आशु जोग
मित्रा
या लेखावरून आठवलं
तुम्ही 'गिरीश जाखोटिया' यांचे लेखन वाचले आहे का !
19 Sep 2011 - 10:28 pm | चेतन सुभाष गुगळे
त्यांचे एका मारवाड्याची गोष्ट नावाचे पुस्तक प्रकाशित झाले असल्याचे ठाऊक आहे परंतू अजुन वाचले नाही. त्यांचे वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले काही लेख वाचले आहेत.
19 Sep 2011 - 10:58 pm | अविनाशकुलकर्णी
व्यवसायात सचोटेी हा एक जैन समाजाचा गुणधर्म मला आढळला..
आमचा मनिष भाई नावाचा एक जैन ट्रेडर होता..माल घ्यायचा उधारी ने..
३०-६० दिवसात पैसे द्यायचा.....भरपुर धंदा दिला त्याने....
पुढे त्याला दुसरी कडुन स्वस्त माल मिळु लागल्याने आमच्या मिटींग मधे मला ज्यादा डिस्काऊट देण्याची गळ घातली..
मला शक्य नसल्याने धंदा थांबला..मी माझे स्टेटमेंट दिले हिशेब झाले व त्याने चेक दिला.व अकांऊट सेटल झाले....
पण मैत्री चालुच होति..
एकदा ७ महिन्या नंतर मला त्याचे टपाल आले..मी जरा चकितच झालो..
टपाल उघडले तर त्या ४७८२.०० रु चेक होता.. व पत्र त्यात त्याने लिहिले होते कि त्याचा हिशेबा प्रमाणे हि रक्कम जुन्या हिशेबात निघत होति ति तो देत आहे.....
खर तर मी विसरलोच होतो....पण त्याने माझी चुक सुधारुन पैसे पाठवले.
व्यवसाया त अशी माणसे अभावाने आढळतात...
3 Apr 2020 - 11:38 am | चौथा कोनाडा
जैन लोकांचा लाघवीपणा हा वेगळाच सुंदर विषय आहे.
आता पर्यंत सम्पर्कात आलेले जैन मित्र, परिवार हे कायमचे मित्र झालेत.
कलेच्या बाबतीत त्यांचा सढळ दानशुर पणा बर्याच वेळा जाणवलाय.
20 Sep 2011 - 1:09 am | इंटरनेटस्नेही
गुगळे साहेब, अतिशय चांगला लेख लिहीला आहेत आपण. टीका करताना तोल न गमवल्याचे पाहुन अधिकच आनंद झाला. जैनधर्मीय हिंदुंचाच एक भाग (एक संप्रदाय म्हणुन) समजले जातात, त्यामुळे त्यांना कदाचित असुरक्षित वाटत असावे. त्यासाठीच अश्या प्रकारचे ब्रॅन्डींग करण्याकडे त्यांचा कल असावा असे दिसते.
मिपावरील संग्राह्य लेखनापैकी एक.
-
ऋषिकेश चिंदरकर.
20 Sep 2011 - 9:16 am | चेतन सुभाष गुगळे
<< अतिशय चांगला लेख लिहीला आहेत आपण. टीका करताना तोल न गमवल्याचे पाहुन अधिकच आनंद झाला. >>
<< मिपावरील संग्राह्य लेखनापैकी एक. >>
धन्यवाद चिंदरकर साहेब.
<< जैनधर्मीय हिंदुंचाच एक भाग (एक संप्रदाय म्हणुन) समजले जातात, त्यामुळे त्यांना कदाचित असुरक्षित वाटत असावे. त्यासाठीच अश्या प्रकारचे ब्रॅन्डींग करण्याकडे त्यांचा कल असावा असे दिसते. >>
होय तेच कारण असावे. जो स्वतः मनातून धास्तावलेला असतो तोच आधी समोरच्या पुढे आक्रमकतेचा आव आणतो.
23 Sep 2011 - 12:16 am | आशु जोग
मधले काही प्रतिसाद हाकललेले दिसतायत
--
पण परिणाम होउन गेला ना
3 Apr 2020 - 9:54 am | चौकस२१२
लेख आणि त्यावरील चर्चा दोन्ही गोष्टी आवडल्या .. चेतनजी तुम्ही आधी का मिपासण्यास घेतला होता माहित नाही पण तुमची लेखन शैली पण चांगली दिसते.. तेव्हा लिहीत राहा
आता मूळ मुद्दयांवर एक छोटी प्रतिक्रिया...
- कोणच्याही गोष्टीचा अतिरेक केला कि त्याचा जवळील समाजाला त्रास हा होतोच.. मग ते कोणत्याही धर्माची धर्मांधता असो, जैन धर्मातील काही सावयायिन बद्दल ऐकून होतो , आपल्या लेखाने अजून प्रकाश पडला
खास करून हा त्रास स्थानिक पातळीवर होत असणार यात शंका नाही ( संकुलात मांसाहारावर बंदी किंवा अप्रत्यक्ष बिगर जैन ना घेणे वैगरे हे इतर धर्मीय हि करतात अर्थात )
त्यामुळे हे वाचून जसा जु लोंकांबद्दल असलेला मूळ आदर "कर्मठ जु" बघून कमी झाला तसा काकणभर जैन समाजाबद्दल पण झाला! )
- वैश्विक पातळीवर बघायला गेलं तर "दगडा पेक्षा विट बरी " या उक्ती प्रमाणे "इस्लामी जिहाद" पेक्षा" जैन जिहाद " परवडेल ....१००%