अशी गुमसुम आवडतेस मला

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
6 Jul 2008 - 1:32 am

अशी गुमसुम आवडतेस मला
***
अशी गुमसुम आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे
खूप दुरून ऐकतेयस - माझा ... आवाज तुला नाही शिवत.
वाटते तुझी दृष्टी तुला ... सोडून गेलीये दूर उडून
एक चुंबन जणू तुझे ... ओठ असावे घट्ट शिवत.
*
सगळ्याच गोष्टी आहेत जशा ... माझ्या आत्म्याने भरलेल्या
माझ्या आत्म्याने भरलेली ... तूही त्यांच्यातूनच येतेस.
स्वप्नातल्या ग फुलपाखरा, ... आहेस माझ्या आत्म्यासारखी
"कारुण्य" शब्दासाठी जणू ... मूर्तिमंत तूच होतेस.
*
अशी गुमसुम आवडतेस मला, ... दूर कुठे गेलीयेस जणू.
फुलपाखरू भुणभुणावे - ... शल्य तसे सांगते आहेस.
खूप दुरून ऐकतेयस - माझा ... आवाज तुला नाही पोचत
तुझ्या नि:शब्दतेत तू ... स्तब्ध मलाही होऊ द्यावेस.
*
पण तू मला बोलूही दे, ... या नि:शब्दतेशी तुझ्या
दिव्यासारख्या उजळ अशा , ... वळ्यासारख्या सुगम अशा.
रात्रीसारखी शांत आहेस, ... नक्षत्रांनी भरगच्च
नि:शब्द जणू चांदण्याही - ... दूरही तशा, सहजही तशा.
*
गुमसुम अशी आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे
दूर, दुखरी, जणू काही ... मरण पावलीस असे दिसते
तेव्हा तुझा एकच शब्द, ... एकच स्मित मला पुरते
सुखी होतो, सुखी कारण ... ही शंका सत्य नसते.
***
(मूळ कवी: पाब्लो नेरूदा)

पाब्लो नेरुदा यांच्या अनेक कवितांच्या लकेरी "इल पोस्तिनो" (द पोस्टमॅन) या इटालियन चित्रपटात गुंफल्या आहेत. त्या चित्रपटाची इंग्रजी बोलणार्‍या देशांत जहिरात करण्यासाठी मिरामॅक्स कंपनीने एक तबकडी प्रसिद्ध केली, त्यात अनेक कवितांचा पूर्ण अनुवाद केलेला आहे. पैकी या कवितेचा अनुवाद असा होता (मला तो आवडलेला नाही...)

9. I Like For You to be Still
I like for you to be still: it is as though you were absent,
and you hear me from far away and my voice does not touch you.
It seems as though your eyes had flown away
and it seems that a kiss had sealed your mouth.

As all things are filled with my soul
you emerge from the things, filled with my soul.
You are like my soul, a butterfly of dream,
and you are like the word Melancholy.

I like for you to be still, and you seem far away.
It sounds as though you were lamenting, a butterfly cooing like a dove.
And you hear me from far away, and my voice does not reach you:
Let me come to be still in your silence.

And let me talk to you with your silence
that is bright as a lamp, simple as a ring.
You are like the night, with its stillness and constellations.
Your silence is that of a star, as remote and candid.

I like for you to be still: it is as though you were absent,
distant and full of sorrow as though you had died.
One word then, one smile, is enough.
And I am happy, happy that it's not true.

कविताभाषांतर

प्रतिक्रिया

मनिष's picture

6 Jul 2008 - 9:33 am | मनिष

धनंजय........सुरेखच जमलाय!
इंग्लिश अनुवादापेक्षा तुझ मराठी अनुवाद फारच सकस.

गुमसुम अशी आवडतेस मला, ... जणू नसतेसच इथे
दूर, दुखरी, जणू काही ... मरण पावलीस असे दिसते

'जणू मरण पावलीस' अशा प्रतिमा मराठी काव्यात सहसा आढळत नाही.

मुक्तसुनीत's picture

6 Jul 2008 - 9:48 am | मुक्तसुनीत

धनंजय यांनी काही लिहीले असले की आवर्जून वाचणे होतेच. बहुदा ते वाचणे म्हणजे वेळ सार्थकी लागणे असते. या कवितेच्या बाबतीत काही नेहमीची जादू घडली नाही. मी इंग्रजी कविता वाचली. तिचाच मला स्पर्श झाला नाही. त्यामुळे मराठी अनुवादात मन रमले नाही याबद्दल मला आश्चर्य वाटले नाही...

इट्स् अ हिट् ऑर अ मिस्. यावेळच्या कवितेशी सूर जुळले नाहीत; तरी आगामी कवितांची वाट पाहीनच.

धनंजय's picture

6 Jul 2008 - 6:03 pm | धनंजय

हीच कविता आलटून पालटून स्पॅनिशमध्ये/मराठीमध्ये कडवी वाचून.
Get this widget | Track details | eSnips Social DNA

चित्रा's picture

7 Jul 2008 - 6:11 pm | चित्रा

खूपच तरल कविता.

सर्व ओळी चित्रदर्शी वाटल्या. प्रत्येकाच्या मनात ही कविता वाचून उभे राहणारे चित्र वेगळेच असणार यात काही आश्चर्य नाही. पण सहज मनात आले म्हणून पिकासोच्या काही चित्रांचा शोध घेतला असता या कवितेजवळ जाणारे एक चित्र सापडल्यासारखे वाटले..
http://picasso.tamu.edu/picasso/ImgViewer?imageURL=./graphics/1903/opp03...

कवितावाचनही आवडले. दोन्ही कविता आणि अनुवाद ऐकल्यानंतर अनुवादात मूळ स्पॅनिशचा तोल सांभाळण्याची खूपच काळजी घेतली असल्याचे जाणवते.

नंदन's picture

7 Jul 2008 - 6:58 pm | नंदन

चित्रदर्शी ओळी, पिकासोचे चित्र, कवितावाचनात सांभाळलेली मूळ स्पॅनिशची लय -- याबाबत चित्रा यांच्याशी सहमत.
मात्र 'वळ्यासारख्या सुगम अशा' ह्या उपमेचा अर्थ नीटसा समजला नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

8 Jul 2008 - 2:15 am | धनंजय

"ब्ल्यू मूड" मध्ये, पण तरीही शांत, अशी वाटते आहे पिकासोच्या चित्रामधील मुलगी. धन्यवाद, चित्रा!

"वळ्यासारखी सुगम" इथे "वळ्यासारखी साधी" असे भाषांतर करावे की नाही हा प्रश्न मला पडला होता.

इतर दागिन्यांसारखे वळे नक्षीदार गुंतागुंतीचे नाही, साधे आहे. म्हणावे तर त्याचा आकार मनात भरण्यास सुगम आहे. तशी "तू"ची नि:शब्दता गुंतागुंतीची नाही. समजण्यास सुगम आहे.

त्या वेळी वाटले की "साधी" शब्दात "मामूली"ची झाक येत होती.

पण आता वाटते "वळ्यासारखी साधी" अशीच शब्दांची निवड करायला हवी होती. शिवाय "सुगम" मध्ये लय सांभाळता येत होती आणि त्यामुळे कदाचित तोच शब्द अर्थपूर्ण आहे, असे मी स्वतःला पटवून घेतले असावे.

सुवर्णमयी's picture

8 Jul 2008 - 4:54 pm | सुवर्णमयी

चित्राशी बरेच अंशी सहमत.
प्रयोग आवडला.

विकास's picture

8 Jul 2008 - 2:56 am | विकास

सुंदर काव्ये (स्पॅनिश आणि मराठी). वर दोन्ही भाषेत ऐकताना एकदम "द ग्रेट गँबलर" मधील "दो लफ्जों की है एक कहानी" या अजून एका सुंदर गाण्याची आठवण झाली!

विसोबा खेचर's picture

6 Jul 2008 - 5:41 pm | विसोबा खेचर

कविता सुंदर आहे..

रात्रीसारखी शांत आहेस, ... नक्षत्रांनी भरगच्च
नि:शब्द जणू चांदण्याही - ... दूरही तशा, सहजही तशा.

या ओळी सर्वाधिक आवडल्या.

तात्या.

अरुण मनोहर's picture

7 Jul 2008 - 6:47 pm | अरुण मनोहर

वाहवा. मराठी आणि स्पॅनीश मधे ऐकून खूप मजा आली.