गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,
ते दुध माईनं चुलीवर ठेवलं होतं.
इकडे पातेल्यात मात्र निराळीच काहानी होती,
दुध आणि पाण्याची मैत्री झाली होती.
पातेल्याची गर्मी वाढू लागली,
तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.
हे पाहून दुध दु:खी झाला,
त्याने पाण्याला अटकाव केला.
सायीचा थर त्याने दिला ठेऊन,
पाणी बिचारं त्यात बसलं अड्कून.
इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,
सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.
शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी,
"जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही."
पाण्याचे शब्द ऐकून दुध त्याला म्हणाला,
"मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला."
पाण्याने दुधाला खुप समजावलं,
पण दुधने त्याचं एक नाही ऐकलं.
शेवटी दोघांनी एक निश्चय केला,
आणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता;
त्यालाच त्यांनी नष्ट केला.
प्रतिक्रिया
4 Jul 2008 - 11:21 pm | संदीप चित्रे
खूपच वेगळ्या पद्धतीने मैत्रीची कल्पना मांडलीयेत. खोक्याबाहेर विचार करणं म्हणतात ते असं : ) ... अभिनंदन !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
5 Jul 2008 - 9:48 am | सुचेल तसं
संदीप चित्रेंना मी अनुमोदन देतो.
छान कविता!!!
-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com
11 Jul 2008 - 8:32 pm | अनंतसागर
प्रोत्साहन दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद.
5 Jul 2008 - 9:45 am | मनिष
खुपच अभिनव कल्पना.....आवडली! :)
5 Jul 2008 - 6:06 pm | विसोबा खेचर
मस्त कविता! वेगळीच वाटली...
तात्या.
5 Jul 2008 - 8:13 pm | मदनबाण
छान्...मजेदार आहे..
(सायी शिवाय दुध पिणारा)
मदनबाण.....
11 Jul 2008 - 8:36 pm | अनंतसागर
सायी शिवाय दूध पिऊ नये
तिच दूध आणि पाण्याच्या मैत्रीचं बंधन आहे.