पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे

dr sanjay honkalse's picture
dr sanjay honkalse in जनातलं, मनातलं
19 Jul 2011 - 6:51 pm

पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे :M.A.,M.Phil.,M.D.,M.Com.,LL.B.

भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे .भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी सांगड घालून शास्त्रोक्त पद्धतीने सण, उत्सव, व्रत वैकल्ये, तीर्थाटन साजरी होतात व याला पारंपारिकता आहे. एवढी विविधता व परंपरा इतर कुठल्याही देशात व धर्मात आणि ती ही शास्त्रोक्त बैठकीवर आधारलेली आढळत नाही.

तीर्थाटन, शिक्षण व निरीक्षण हे भारतात परंपरेने तीन महागुरू म्हणून संबोधले जातात. तीर्थे ही ऊर्जास्त्रोत मानली जातात. भारतातीय इतिहास व संतही याचे समर्थनच करतात. अगदी शंकराचार्यांपासून ते ज्ञानेश्वर, एकनाथ, विवेकानंद यांनी ते केलेले आहे. पुष्कर मेळा, गंगासागर, कुंभ मेळे, नैमिषारण्य मेळा,गंगासागर मेळा हे प्रमुख मेळावे आजही लाखोंच्या उपस्थितीत साजरे होतात. हे सर्व मेळावे याची देही याचीडोळा पाहून मी तृप्त झालेलो आहे. पण या सर्वात अद्वितीय, अद्भूत व अविस्मरणीय ठरतो तो आषाढी एकादशीला भरणारा पंढरपूरचा मेळा व वारी, जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी 'अनुभवावी'.

वारी म्हणजे देहू-आळंदी पासून पंढरपुरापर्यंत विठ्ठलनामसंकीर्तन करीत करीत २६० कि.मी.चा केलेला पायी प्रवास.याला सातशे वर्षांची अगाध परंपरा आहे. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी तेराव्या शतकात वारी केल्याचा उल्लेख आढळतो. निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांसह वारी केल्याचा उल्लेख आढळतो. जगद्गुरू तुकाराम महाराजही पंढरीची वारी करत असत. पुढे त्यांचे चिरंजीव नारायण यांनी ती परंपरा चालू ठेवली.त्याकाळी म्हणजेच १६८० ते १८३० च्या दरम्यान वारी देहू व आळंदीहून एकत्रितपणे जात असे.ही पालखी ज्ञानदेव व तुकोबा यांच्या पादुकांसह पायी,बैलगाडी,हत्ती-घोडे,अंबारी अश्या भव्य विलोभनीय लव्याजम्यासह मोठया दिमाखात जाई.१८६० नन्तर काही कौटुंबिक कारणांमुळे देहू व आळंदीच्या पालख्या विभक्तपणे जाऊ लागल्या.हत्ती घोडे यांचा लवाजमा कमी कमी होऊ लागला; अश्या वेळी "हैबतबाबा" यांनी पालख्यांना पुन्हा एकदा शिस्त व वळण लावले. शितोळे सरकार यांच्यातर्फे वारीच्या व्यवस्थेची व घोडयांची व्यवस्था केली गेली ती परंपरा आजपर्यंत चालू आहे.वारीच्या रिंगणातील दोन घोडे हे शितोळे सरकारांच्या घराण्याकडून आजही येतात.वारीतील आजची शिस्त,भक्तीभाव,एकरूपता,निश्चलता,सौहार्द,समर्पण आणि शरणागती याचे सर्व श्रेय हैबतबाबांना जाते म्हणून आजही आळंदीस देवळात त्यांची पायरी आहे.प्रथम त्यांना नमस्कार होतो आणि मग ज्ञानोबांना. पंढरीला जसा नामदेवांना मान आहे तसा आळंदीला हैबतबाबांना आहे.म्हणूनच आजही वारीच्या रथापुढील पहिली दिंडी हैबतबाबांची असते.
१९३२ पासून देहू व आळंदीहून वेगळ्या पालख्या निघतात. ज्ञानोबांची पालखी पुणे,आळंदी,सासवड फलटण मार्गे सोलापुरात येते तरं तुकोबांची इंदापूर मार्गे वाखरीला त्या एकत्र येतात. ४० वेळा हिमालय पदभ्रमण, सप्तकैलास, २६ वेळा बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करूनही मला कधी पंढरीची वारी करता येईल असा विचारही आला नाहीं पण नर्मदा प्रदक्षिणा करताना आमचे ज्येष्ठ मित्र श्री साठे यांच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामुळे मला तो योग लाभला व मी वारीसाठी शेडगे पंचमंडळीच्या देशमुख दिंडीत नाव नोंदवले आणि माऊलीची अनन्य कृपा बघा सहसा कधी कुणाच्या घरी न जाणारा मी आमची मैत्रीण श्रीमती कुलकर्णी यांच्या घरी मुक्कामास गेलो आणि लक्षात आले की ते मूळचे पंढरपुरचे व त्यांच्या घरी माझ्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले गेले ते पायी चालण्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरले. अशा रितीने माउलींनी माझी पूर्वतयारी करवून घेतली.

श्री.कै.केशवराव देशमुख महाराज ९-१-१८७७ ते २७-४-१९४२ जे ज्ञानेश्वरी (एम.ए.ज्ञानेश्वरी विषय घेऊन ) चे गाढे उपासक व प्रवचनकार होते.त्यांच्या प्रवचनाला तुडुंब गर्दी होत असे. त्यांची समाधी आजही पुण्याच्या ओंकारेश्वराच्या देवळात आहे व आजही त्यांच्यानंतर त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीने ७० वर्षानंतरही ही दिंडीची प्रथा सुरु आहे.
यांची दिंडी रथापुढे ४ थी असते तर सर्व दिंड्या दोन गटात असतात (अ)रथापुढे व (ब) रथामागील दिंड्या. रथापुढील दिंड्या या मानाच्या म्हणून प्रसिद्ध आहेत व त्या क्रमाने रथापुढे (एकूण २४) नामगजर,हरीपाठ भजन म्हणत चालतात त्यांच्या पुढे २४ व्या दिंडीपुढे शितोळे सरकारांचे घोडे व त्यांच्यापुढे आळंदीचा नगारा असतो. त्या रथामागे जवळ जवळ २०० च्या वर दिंड्या सामील असतात. जगनाडे महाराजांची दिंडी साधारणपणे सर्वात शेवटी असते.

पंढरीची वारी अद्वितीय, अविस्मरणीय,अवर्णनीय,अतुल्य व अद्भूत असते कारण; लाखो लोक कोणताही सांगावा अथवा निमंत्रण न देता भक्तिभावाने वारीत सामील होतात. कित्येकजण वर्षानुवर्षे वारी करतात.

बाबामहाराज सातारकर लहानपणापासून

आज ७७ वर्षे वारीत सामील होतात. २००८ जूनला बायपास होऊनही त्यांनी वारी चुकवली नाही. एकदा आई आजारी असताना वारी सोडून जायचे नाही म्हणून त्यांनी आईला वारीच्या ठिकाणी बोलावणे धाडले. असे अनेक जण वारीची कौटुंबिक परंपरा पाळणारे आहेत.मला मात्र नेहमी लहानपणी वाटायचे की मी मोठा होईपर्यंत हे पांढरे कपडे टोपीवाले राहारणार नाहीत पण आजही स्वच्छ पांढरे कपडे घातलेले लाखो लोक वारीत सामील होतात नव्हे त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज सुशिक्षित,उच्चशिक्षित भाविकही वारीत सामील होतात,दिसतात व पर्यटन आदी संस्थांचे कार्यकर्ते पण स्वच्छता अभियानवाले त्यांच्या दिंड्या काढतात.

वारीची पहिली सार्वजनिक जागतिक पातळीवरील नोंद B.B.C ने घेतली. त्यानंतर 'पंढरीची वारी' हा जागतिक आकर्षणाचा विषय ठरला. आज अनेक परदेशी वारकरी पण वारीत सामील होतात. एकानेव आईनाकोवा या जपानी महिला वारकरी गेली ३५ वर्षे वारी करीत आहेत. नव्हे तो एक अभ्यासाचा विषय झाला आहे. मी स्वतः व्यवस्थापनाच्या (MANAGEMENT) च्या विद्यार्थ्यांना व INTERNATIONAL BUSINESS FINANCE/TRADE च्या विद्यार्थ्यांना वारी,कुंभमेळा यांचे व्यवस्थापन,तंत्रज्ञान (MANAGEMENT TECHNOLOGY)व TRADE POTENTIAL यावर सतत PROJECT घेतले आहेत. वारीचे व्यवस्थापन हा खरोखरीचा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. आज आषाढीस दिंडीत जवळ जवळ १० लाख वारकरी वय, जात-पात,लिंगभेद,दर्जा,हुद्दा न मानता पंढरपुरी येतात त्यापैकी २-३ लाख वारकरी पाऊस-पाणी,ऊन-वारा इ.गैरसोईची तमा न बाळगता, कुठल्याही सांगाव्याशिवाय वारीतून पायी पंढरपुरास येतात आणि तेही दरवर्षी न चुकता.सगळ वातावरण विठ्ठलमय झालेले असते

विठ्ठल नामाची शाळा भरली i
शाल शिकताना तहानभूक हरली i i असे वातावरण असते

आजच्या जमान्यातील हे सर्वात मोठे आश्यर्य नव्हे का? कारण आज बोलावूनही कोठे उपस्थित राहण्याची मानसिकता जनसामान्यांच्यात तर नाहीच पण वेळही नाही. राजकीय मेळावे तर पैशांचा पाऊस पाडून

व स्वार्थासाठी (सर्वसाधारणपणे) भरवले जातात. आज १००- २०० चा समूह नियंत्रित करणं कठीण जात आहे.हिमालयातील बद्रीनाथ येथे रात्री शृंगार उतरविताना पाहणाऱ्या १०० माणसांवर नियंत्रण करणं कठीण जात. १०-१२ पट्टेवाले असूनही ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शृंगार उतरवताना व निर्वाण दर्शन घेताना भांडताना मी अनेकवेळा पहिले आहे. त्याउलट वारीत अनेक लाखो वारकरी शिस्तीत टाळ मृदुंग वाजवीत ४-४ च्या समूहाने एकामागे एक चालत असतात. इतरवेळी अरेरावी करणारे पोलीसही त्यांना ''माउली'' म्हणून संबोधतात. आज माझ्यासोबत सहलीला येणार्यांपैकी काही जण राहण्याची व्यवस्था, बाथरूम ( की ज्याचा १० मिनिटांवर वापर केला जात नाहीं) बघून राहायचे की नाहीं हे ठरवतात त्याचवेळी एका बाजूला लाखो वारकरी मिळेल तेथे आंघोळ करतात, कपडे धुतात व अंगावर, पाठीवर वा हातात घेवून चालत असताना वाळवतात. मिळेल तिथे नाहीतर रस्त्यावरच दुपारचा रात्रीचा विसावा घेतात दिवसा व संध्याकाळी मुकाम्मी काहीजण भजन कीर्तन करत दंग असतात तर काही स्वयंपाक करून पंगतीच्या व्यवस्थेत दंग राहतात.काहीही कटकट न करता स्वतःहून हे सर्व करतात. यावर्षी 'सदाशिव नगर' येथील रिंगण अर्धवट झाल्यामुळे बाहेर पडण्यासाठी दोन तीनच गेट असलेले मैदान आता POLICE FIRE व जनरल डायर नसूनही जालियनवाला shaबाग होतो की काय अस वाटत असतानाच कुठेही शिवीगाळ , भांडण, धक्काबुक्की न करता शांततेने सर्वजण एकामागोमाग बाहेर पडले. त्या दिवशी तर जेवणाचे सामान असणारे ट्रक आकस्मिक पोलीस वाहतूक, पोलीस नियंत्रणामुळे वेळेत पोहोचू शकले नाहीत म्हणून हजारो वारकरी भुकेले राहिले तरीही कोणीही तोंडातून 'ब्र' काढला नाही. हे सर्व अद्भूत, अद्वितीय नाही का? वारीतील लोक एकमेकांना ''माउली''

म्हणून संबोधतात. त्यांना कोणतेही व्यसन नसते. (हल्ली आधुनिक युगानुसार काही तंबाखू , गुटका खाणारे तुरळक आहेत त्या साठी व्यसनमुक्त दिंडीही निघते). एकंदरीत कुठलातरी unwarranted, uncontrolled hand of discpline आहे हे जाणवत . स्वशिस्त (self discipline) सौहार्द , सहचर्य, सहकार्य, समर्पण आणि शरणागती या षटसुत्रींवर हे सर्व चालते व ती कुणीही कुणावरही लादत नाही.

Economics मधील आदर्श बाजार स्पर्धेतील (perfect competition ) मधील invisible hand व त्याचे आपोआप (automatic ) घडणारे कार्य, कुठल्याही बाजारी स्पर्धेशिवाय येथे प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळते आणि हा automatic force निर्माण होतो तो अध्यात्म व भक्तीभाव व पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचे प्रतिक म्हणून प्रतिष्ठीत पावलेल्या विठोबाच्या दर्शनाची नव्हे मुखदर्शनाच्या अथवा कळस दर्शनाच्या ओढीमुळे. अशिक्षित, अज्ञान वारकऱ्यांची आध्यात्मिक जाण व ज्ञान आजकालच्या सत्संगाच्या नावाखाली fashion म्हणून अभ्यास करणाऱ्यांनी लक्षात घेण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे.

आज हजारो ट्रक, ३-४ हजार ST बसेस, water tanker चहावाले, चांभार, कपडेवाले, फळ विक्रेते, गंध लावणारे यांच्या उदरनिर्वाहाचा व बाजारी संपत्ती निर्माण करण्याचा स्त्रोत वारी आणि कुंभ मेले आहेत हेही लक्षात घेणे इष्ट. निदान त्यांचे व्यापारी potentials जाणून घेणे महत्वाचे. हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी balet paper चे गणित मांडणाऱ्या राजकीय आणि शासकीय संस्थांनी वारीतील सार्वजनिक व्यवस्थापन, सुधारण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे महत्त्वाचे आहे. शासनाची एकच mobile lavatory दिसली ती पण वाल्हे गावानंतर गायब झाली. लाखोंच्यासाठी कमीत कमी ५०-६० mobile lavotary , पाणी व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थापन होणे महत्वाचे व अत्यंत गरजेचे आहे. पाणी, खाद्यवाटप यात दिंडी व्यवस्थापक व सार्वजनिक संस्थाच अधिक आहेत.
अशा या वारीत मात्र सातारा जिल्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावचे शिरवळकर भेटले. ते गेली ७ वर्षे आज १०७ वर्षे वय असलेल्या आपल्या आईला खांद्यावर घेऊन वारी करीत आहेत. त्यांचे म्हणणे आजच्या पिढीला मातापित्याचे महत्व लक्षात यावे म्हणून मला पांडुरंगाने दृष्टांत दिल्यामुळे मी हे करीत आहे.
आणि मग लक्षात येते ते हे की पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णु पंढरीत प्रकट झाले. देवापेक्षाही मातृपितृ सेवेला प्राधान्य देणाऱ्या पुंडलिकासाठी युगानुयुगे डोक्यावर शिवलिंग धारण करून कोणतेही शस्त्र हाती न घेता फक्त शंख हाती घेवून २८ युगे विष्णु विठ्ठल म्हणून उभा आहे. पंढरपुरातील विठोबाचे अवतरणे हेच मातृपितृभक्तीचे प्रतिक आहे हे आजच्या पिढीतील सलमान, रितिक रोशन आदर्श मानणाऱ्या तरुण पिढीचे कौतुक करणाऱ्या पालकांनी लक्षात घेणे व तसे मूल्यशिक्षण पाल्यांना देणे महत्वाचे आहे. गणपतीलाही प्रथम पूजेचा मान आहे तो त्याच्या त्याने केलेल्या आई वडिलांच्या सेवेमुळेच .आज शिवाजी, ज्ञानेश्वर, श्रावणबाळ, पुंडलिकाच्या आदर्शाचे मूल्य शिक्षण देणे व तेही सहजपणे उपदेशाचे डोस न पाजता होणे महत्वाचे आहे. आजच्या पिढीला पुंडलिकाचा इतिहास ज्ञात असणे महत्वाचे आहे , कारण तोही आजच्या पिढीतील बहुतांश तरुणासारखा मातापित्यांना धिक्काराणारच होता हे फार थोड्यांना माहीत असावे. त्यास कुक्कुटेश्वाराच्या देवळात (काशी \ पिठापूर येथील ) गंगा यमुना सरस्वती या त्रीदेविनी देवतांच्या साक्षात्कारासाठी मातापित्याच्या महत्वाची जाणीव झाली व पंढरपूरच्या विठोबाच्या अवतरण्याचा इतिहास रचला गेला. एवढे जरी आजच्या पिढीच्या लक्षात आले तर,'' IT IS NEVER TOO LATE ''चा विचार करून मातापित्यांची सेवा करण्याची बुद्धी व कार्य व्हावे. कारण आजचे तरुण हे उद्याचे मातापिता व जेष्ठ नागरिक होणार आहेत व ''पेरिले तेच उगवते'' या न्यायाने त्यांनी योग्य पेरणी करावी म्हणून हा लेख प्रपंच.

--
dr.sanjay honkalse.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

एकदम बरोबर लिहिले आहे.
आवडले

मूकवाचक's picture

19 Jul 2011 - 9:25 pm | मूकवाचक

पु. ले. शु.

धन्या's picture

20 Jul 2011 - 5:09 am | धन्या

संजय सर,

लेख छान लिहिला आहे तुम्ही. थोडासा श्रद्धेच्या आणि बराचसा कौतुकाच्या अंगाने जाणारा असा लेख मनापासून आवडला.

मीही यावेळी एकादशीला पंढरपूरला गेलो होतो. त्या माझ्या अनुभवांचा छोटासा लेखाजोगा.

कळायला लागलेल्या वयापासून विठ्ठल आणि ज्ञानदेव या दोघांनी अक्षरशः मला झपाटून टाकले आहे. एक देव तर दुसरा "अवतार पांडुरंग" अर्थात या देवाचंच रुप. सर्वसामान्यांच्या श्रद्धेप्रमाणे दोघेही महाविष्णूचा अवतार. ज्ञानदेव नेहमीच भेटत राहीला, लहानपणी मोठयांच्या रंगात आलेल्या त्याच्या चमत्कारांच्या कथांमधून, थोडे मोठे झाल्यावर मराठीच्या युवकभारतीच्या पुस्तकामधील बहुतेक वेळा पहिल्या कवितेमधून ज्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या असायच्या. विठ्ठलाची प्रत्यक्ष अशी ओळख कधी झालीच नाही. कधी ज्ञानदेव, कधी नामदेव तर कधी तुकाराम आपल्या अभंगांमधून त्याची ओळख करुन दयायचे.

नाही म्हणायला लहानपणी एकदा बाबांसोबत पंढरपूरला जाणं झालं होतं. तेव्हा पांडुरंगाला अगदी डोळे भरुन पाहणं झालं होतं. त्यानंतर मनात खुप ईच्छा असूनही कधी जायला जमलंच नाही. गावाकडच्या भजनात ज्ञानदेवांचा "रुप पाहता लोचनी" आणि तुकारामांचा "सुंदर ते ध्यान" हा अभंग आला की मनातल्या मनात लहानपणी पाहिलेली ती सावळी मूर्ती नजरेसमोर आणून मनातल्या मनात नमस्कार करत असे.

एक दिवस मुंबईला गेलो असताना, चुलतभावाने आपण पंढरपूरला जाऊया म्हणून विषय काढला. एकदम हलकं वाटलं. म्हणजे बरेच दिवसंची पंढरपूरला जायची ईच्छा पुर्ण व्हायची वेळ आली होती. नाही म्हणायला मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलं होतं. आषाढी कार्तिकीला होणारी पंढरपूरच्या नागरी सुविधांची ओढाताण, त्यामुळे तिथल्या नागरीकांना होणारा त्रास हे सारं वाचलं होतं, मित्रांकडून ऐकलं होतं.

अगदी विठ्ठलाबद्दलही चिकित्सक वृत्ती निर्माण झाली होती. श्रीकृष्ण तर व्याधाचा बाण लागून निजधामाला गेले. आणि विठ्ठलाची कथा तर काही वेगळंच सांगते. रुक्मिणीला शोधत श्रीकृष्ण दिंडीरवनात आले आणि पुंडलिकाच्या ईच्छेनुसार इथेच कमरेवर हात ठेवून उभे राहीले. एकाच व्यक्तीच्या जीवनाचे दोन शेवट कसे काय असू शकतात हा प्रश्न हल्ली पडू लागला होता. याच दरम्यान डॉ. रा. चि. ढेरेंचं "विठ्ठल: एक महासमन्वय" हे पुस्तक हाती लागलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. सुरुवातीला थोडासा दचकलो. वैष्णव ज्याला अठ्ठावीस युगे उभा असलेला श्रीकृष्ण - विष्णू समजतात तो खरं तर काळाच्या ओघात विष्णूरुप मिळालेला एक स्थानिक देव आहे हे नविन काहीतरी कळलं.

खरंतर या सगळ्या तर्काने मनाला पटणार्‍या माहितीच्या, तसेच श्रीकृष्णाच्या अंतिम प्रवास कथेमुळे मनात येणार्‍या शंकेच्या आवर्तनांनी मनातल्या विठ्ठलावरील श्रद्धेला धक्का बसायला हवा होता. पण झालं मात्र उलटंच. त्या सावळ्या रुपाच्या दर्शनाची ओढ अजूनच वाढली.

सुट्टीचा विषय ऑफीसमध्ये काढला आणि एका उस्मानाबादच्या मित्राने पंढरपूरच्या अनुभवांविषयी बोलायला सुरुवात केली. त्याची कुणी दूरची बहीण पंढरपूरला राहते. म्हणे शहाण्याने आषाढी - कार्तिकीला पंढरपूरला जाऊ नये. भयानक घाण, दुर्गंधी, बकालपणा यांचं साम्राज्य या दिवसांत पंढरपूरला असते. स्थानिक लोक शक्य झालं तर या दिवसांत कुठेतरी दुसर्‍या गावी जातात. ही गोष्ट तशी ऐकून माहिती होती. त्यामुळे दुर्लक्ष केलं.

एकादशीच्या एक दिवस आधी आई बाबांना घेऊन पुण्याहून निघालो. पुण्यापासून सुरु होणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्र ९ ने अगदी १६५ कि. मी. गेल्यावर वेणगावांजवळ उजव्या हाताला एक फाटा फुटतो. इथून पंढरपूर चाळीस कि. मी. फाटयावरून आत वळलो. आता पायी चालणार्‍या दिंडया वाटेत भेटू लागल्या होत्या. हातात भगव्या पताका, मुखात ज्ञानदेव किंवा तुकारामांचा अभंग. वातावरण भारावल्यासारखं होतं.

येणार्‍या - जाणार्‍या गाडयांना वारकरी स्वतःहून बाजूला होऊन वाट करु देत होते. वेगळाच अनुभव होता. पुण्यात हॉर्न अखंड वाजवूनही लोक बाजूला होत नाहीत, गाडी बाजूला घ्यावी लागते.

पंढरपूरला आलो. गाडी बाहेरच चार पाच कि. मी. वर पार्क करावी लागली.

पायी चालत चंद्रभागेकडे जायला सुरुवात केली. आणि जे मित्रांकडून, वृत्तपत्रांमधून स्वच्छतेच्या बाबतीत ऐकलं होतं त्याचा पावलोपावली अनुभव यायला लागला. रस्त्याला एखाद्या जत्रेचं स्वरुप आलेलं. सगळीकडे केळ्यांच्या साली दिसत होत्या. हॉटेलांसमोर, चहाच्या टपर्‍यांसमोर प्लास्टीकचे चहाचे रीकामे कप, लोकल ब्रँडच्या "बिस्लेरीच्या" पाण्याच्या रिकाम्या बाटल्या यांचा खच पडला होता. त्यांचं ना त्या हॉटेलवाल्यांना, चहाच्या टपरीवाल्यांना सोयरसुतक होतं, ना चहा पाणी पिणार्‍यांना. हे एक बरं होतं, कुठेतरी ऐकलंय की पंढरपूरातलं पाणी पिऊ नका, "बिस्लेरी" घ्या, म्हणून पॅकेज्ड पाणी प्यायचं आणि बाटली मात्र तिथेच फेकून त्या जागेचा उकिरडा करायचा. खूप सरळ साधा प्रश्न आहे. उत्तरही सोपं आहे. जे लोक पाण्याच्या बाटल्या, चहा विकतात त्यांनीच रिकामे खोके किंवा शक्य झाल्यास कचरा पेटया पूरवून लोकांना ते वापरायला लावायचे. पण करणार कोण. सार्वजनिक स्वच्छतेची पडलीये कुणाला. मला काही होऊ नये म्हणून मी बिस्लेरीचं पाणि पितोय ना, मग झालं तर.

चंद्रभागेवरील गावात शिरणारा छोटा पूल ओलांडला. आतापर्यंत फक्त घाण डोळ्यांना दिसत होती. चंद्रभागेच्या वाळवंटावर पाऊल टाकल्यावर मात्र नाकाला भयानक दुर्गंधी जाणवायला लागली. तो वास कसला होता हे सांगायची काहीच गरज नाही. ज्या चंद्रभागेत बुडी मारून आपली पापे धूवून टाकायची त्या चंद्रभागेच्या वाळवंटाची लोकांनी हागणदारी करुन टाकली होती. नव्हे, अवस्था एखाद्या गावाच्या हागणदारीपेक्षाही वाईट होती. आजूबाजूला बघायची सोयच नव्हती. नाक मुठीत धरून त्यातल्या त्यात चांगली जागा कुठे दिसतेय का हे शोधत पुढे सरकत होतो.

कुणी पचकन थुंकत होतं, कुणी नाक शिंकरत होतं. कुठे खरकटं, उरलेलं अन्न फेकलेलं होतं, कुठे मधूनच गावातून येणार्‍या गटाराने चिखल झाला होता. सगळा आनंदी आनंद होता. त्या वासाने अगदी कुठल्याही क्षणी ओकारी येईल असं राहून राहून वाटत होतं.

स्वछतेच्या बाबतीत ही तर्‍हा तर वेगवेगळ्या दिंडयांच्या तारस्वरातील भजनांनी होणार्‍या गोंगाटाची वेगळीच कथा. आधीच ही प्रासादिक भजनी मंडळे काय किंवा दिंडीवाले काय, अभंग ईतक्या जोरात गातात की बेंबीच्या देठापासून ओरडत अभंग गायला नाही तर तो विठ्ठलाला आवडणार नाही या भावनेने गातात. त्यात ते "ब्याटरीवरचा लाउसपिच्चर" वापरतात. मग काय सांगायला हवं.

त्यातल्या त्यात चांगली जागा शोधली. चंद्रभागेत जमेल तितके आत गेलो आणि बुडी मारली.

दशमीच्या दिवशी गेल्यामुळे आणि एकादशीलाच पुण्यात परतायचे असल्यामुळे दर्शनाचा विचार्च केला नाही. मुखदर्शनाचा विचार मनात आला होता परंतू मुखदर्शनाची लांबच्या लांब रांग पाहून तोही विचार मनातून काढून टाकला.

कळस दर्शन घेतलं. आणि मंदिराच्या प्रदक्षिणेला सुरुवात केली. गर्दी असल्यामुळे जरा ढकलाढकली होत होती. ते साहजिकच होतं. पण ही प्रदक्षिणा करताना काय लागत नव्ह्तं पायाला? तुटलेल्या चपला, कपडयांच्या पिशव्या, नाडया तुटलेल्या जुन्या पद्धतीच्या पट्ट्यापट्ट्यांच्या चड्ड्या, केळ्यांच्या साली, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या... काय अन काय.

अक्षरशः गुदमरल्यासारखं झालं होतं एक दिड दिवस. एकादशीच्या दिवशीच डॉ. ढेरेंनी वर्णन केलेली पांडुरंगाच्या आद्यमूर्तीचं प्रतिरुप पाहायला माढ्याच्या वाटेला लागलो आणि सुटल्यासारखं वाटलं...

परत आल्यावर संजोपरावांची विठ्ठला ही कविता वाचनात आली. थोडं तटस्थ दृष्टीने पाहिल्यावर लक्षात येईल की या कवितेत वर्णन केलेल्या भावना केवळ अभिजनांच्या नसून त्या शहरी वातावरणात वाढलेल्या सर्वसामान्यांचाही आहेत. वारकरी हे सर्वसाधारणपणे ग्रामिण भागातील, कमी शिकलेले, खालच्या आर्थिक स्तरातील असतात. वारकर्‍यांमध्ये शहरी भागातील, सुशिक्षित लोकही असतात. नाही असं नाही. परंतू त्यांचं प्रमाण एकंदरीत वारकरी संख्येच्या तुलनेत खुप कमी आहे.

पंढरपूराची ही एकादशांना होणारी दुरावस्था टाळण्यासाठी काही करावं असं कुणालाच कसं वाटत नाही? फक्त ईच्छाशक्ती हवी. तिथे चंद्रभागेमध्ये असताना राहून राहून वाटत होतं की आत शहरात जावं, एक प्लास्टीकची बादली विकत घ्यावी आणि कचरा उचलायला सुरुवात करावी. केवळ आई बाबा सोबत असल्यामुळे ती ईच्छा मी दाबून टाकली.

पंढरपूराची ही दुरावस्था नक्कीच टाळता येईल. फक्त ईच्छाशक्ती हवी. एक चांगला पर्याय म्हणजे प्रशासनाने यात लक्ष घालावे म्हणून प्रयत्न करावेत. हा मुद्दा पुढे आला की एक छान बहाणा केला जातो. म्हणे पंढरपूरची लोकसंख्या जेमतेम सव्वा - दिड लाख आहे. एकदम चार पाच दिवसांत सात आठ लाख लोक पंढरपूरात आल्यानंतर नागरी सुविधांवर ताण पडणारच. आम्ही आमच्या परीने करतोच की खुप काही.

अरे बाबांनो, पण पंढरपूरला आषाढी - कार्तिकीला सहा सात लाख लोक येतात. आणि वारी ही काही काल परवा सुरु झालेली गोष्ट नाही. ज्ञानदेवांच्याही आधीपासून वारी सुरु आहे. साडेसातशे पेक्षाही जास्त वर्षांचा ईतिहास वारीला आहे. एव्हढया मोठया कालावधीत प्रशासन काहीच शिकलं नाही की या काळात सुविधा कशा कोलमडू दयायच्या नाहीत हे? किंवा यात्रेनिमित्त आलेल्या लोकांना मुलभूत सुविधा कशा पुरवता येतील, अस्वच्छता होणार नाही याची काळजी कशी घेता येईल हे अजूनही प्रशासनाला कळत नाही?

अर्थात सिस्टीमला दोष दिला की सारं काही संपत नाही. सार्वजनिक स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जे वारकरी पंधरा दिवस तंगडतोड करून पायी पंढरपूरला जातात ते वारकरी चार दिवसांच्या पंढरपूरच्या वास्तव्यात सकाळी उठल्यावर चार पावल दूर शौचाला जाऊ शकत नाही? ज्या चंद्रभागेला माता म्हणता त्या चंद्रभागेच्या वाळवंटात शौचाला बसताना मनाला काहीच वाटत नाही? आपल्याला काही होऊ नये म्हणून बिस्लेरीचं पाणी पिता. पण ती बाटली रिकामी झाल्यावर कचरापेटीत फेकून द्यावी एव्हढं साधं भान असू नये? जर जवळपास नगर प्रशासनाच्या स्वच्छता खात्याची कचरापेटी नसेल तर काही वेळ रीकामी बाटली आपल्याजवळच एखाद्या पिशवीत नाही ठेवता येणार?

तेच भजनांच्या गोंगाटाबाबतीत. तारस्वरात बॅटरीवरील लाउडस्पिकर वर चालणारी भजनं. काय गरज आहे त्याची. हळूवार आवाजात भजनं म्हटली तर नाही का चालणार?

कदाचित वारकरी लोक समाजाच्या ज्या थरातील असतात, त्या थरात अजून सार्वजनिक स्वच्छतेचं महत्व कळलेलं नसेल. ध्वनी प्रदुषण म्हणजे काय हे त्यांच्या गावीही नसेल. पण हे चित्र नक्की बदलता येईल. गरज आहे ते जनजागृतीची. वारीच्या वाटेवर ज्या स्वयंसेवी संस्था दिंडयाना जेवण वगैरे देतात, त्यांना वारकर्‍यांना या गोष्टी पटवून देता येतील. पण याही पेक्षा प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे किर्तनाचा, प्रवचनाचा. किर्तनकारांनी, प्रवचनकारांनी "ठोब्बा रक्मायी" च्या गजरात भक्तीच्या महात्म्याबरोबरच स्वच्छतेचं महत्वही लोकांना पटवून दिलं पाहिजे. ज्ञानदेव - तुकारामांच्या चमत्कार कथांबरोबर संत गाडगेबाबा नावाच्या संताच्या स्वच्छतेच्या ध्यासाबद्दलही बोलायला हवं. असं जर झालं चंद्रभागा स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही.

... आणि मग अठ्ठावीस युगे एकाच जागी कमरेवर हात ठेवून उभा असलेल्या विठ्ठलालाही संध्याकाळी चंद्रभागेच्या वाळवंटात फेरफटका मारावासा वाटेल.

- धनाजीराव वाकडे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jul 2011 - 7:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ठार नास्तिकालाही संपूर्ण स्क्रोल करायला लावणारा प्रतिसाद.

पाषाणभेद's picture

20 Jul 2011 - 9:00 am | पाषाणभेद

अगदी बरोब्बर! त्याचबरोबर जो आस्तिक आहे त्याचेही मन परिवर्तन करणारा प्रतिसाद.

धनाजीराव झिंदाबाद!

धन्या's picture

20 Jul 2011 - 11:55 am | धन्या

अदिती, पाषाणभेदराव प्रतिक्रियेसाठी आभार.

पंढरपूरला जाऊन आल्यापासून राहून राहून वाटत होतं की असं काहीतरी लिहावं. या लेखाच्या निमित्ताने ती संधी मिळाली :)

- धनाजीराव वाकडे

मुलूखावेगळी's picture

20 Jul 2011 - 12:07 pm | मुलूखावेगळी

बाकिच्यांचे आभार राहिले ना मानाय्चे.

आनि माझे पण आठवण करुन दिल्याबद्दल ;)

धन्या's picture

20 Jul 2011 - 12:20 pm | धन्या

क्रमाने प्रतिक्रिया वाचत स्क्रोल करत आभार मानायचा विचार होता. :)

असो.

- धनाजीराव वाकडे

किसन शिंदे's picture

20 Jul 2011 - 10:12 am | किसन शिंदे

___/\___

अप्रतिम लेख आणी त्यापेक्षाही अप्रतिम असा तुमचा प्रतिसाद...भारावून गेलो आहे.

मनातली तळमळ अगदी योग्य रितीने मांडलीत तुम्ही, अगदी माझ्याही.

मूकवाचक's picture

20 Jul 2011 - 3:29 pm | मूकवाचक

धनाजीराव, पु. ले. शु.

धन्या's picture

20 Jul 2011 - 6:03 pm | धन्या

किसनराव, मुकवाचकजी धन्यवाद !!!

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jul 2011 - 11:14 am | बिपिन कार्यकर्ते

धन्या, लेका, अगदी बरोब्बर लिहिलं आहेस! लेख (मी सश्रद्ध असूनही) फारसा आवडला नाही. तो वाचताना मनात जे विचार येत होते ते तू नेमकेपणाने मांडले आहेस. कोणत्याही गोष्टीचे आंधळे उदात्तीकरण चूकच आहे. वारी ही एक अद्भुत प्रक्रिया / घटना आहे. पण म्हणून त्यात सगळेच साव असतात आणि चोर कोणीच नसतात हे म्हणणे मात्र एकदम कैच्याकैच. 'शेवटी माणूस इथून तिथून सारखाच' यावर गाढ विश्वास असल्यामुळे हे असे सरसकट उदात्तीकरण होऊ शकत नाही याचे भान असते.

मी स्वतः वारी कधीच केली नाहीये. करायची इच्छा मात्र आहे. पण आमच्या गावात श्रीएकनाथ महाराजांची पालखी येते. ( http://www.misalpav.com/node/13266 ) ... त्याची व्यवस्था आमच्या घरात असते. त्यावेळी अगदी मर्यादित स्वरूपात संबंध येतो. वारकरी समाजात जातिभेद नष्ट झाल्याची कल्पना कशी नुसती कल्पनाच आहे याचे पूर्ण प्रत्यंतर त्यावेळेस येते. एका मित्राकडून वारीच्या काळात पंढरपुरात वाढणार्‍या गुन्ह्यांची आणि अनैतिक कृत्यांची माहिती पहिल्यांदा मिळाली तेव्हा कसेसेच झाले.

सगळ्याच प्रकारचे लोक असतात वारीत. मात्र गरीब, (तथाकथित) अडाणी सामान्य वारकरी ज्या भक्तिभावाने वारी करतो, तल्लिन होऊन मैलोनमैल झपाटल्यासारखा चालतो ते मात्र मोहून टाकणारे आहे.

वर लिहिल्याप्रमाणे वारीतील पारलौकिक बाजू जमेस धरली तरी लौकिक जगातील सुधारणा अतिशय गरजेच्या आहेत.

मात्र गरीब, (तथाकथित) अडाणी सामान्य वारकरी ज्या भक्तिभावाने वारी करतो, तल्लिन होऊन मैलोनमैल झपाटल्यासारखा चालतो ते मात्र मोहून टाकणारे आहे.

अगदी...

म्हणजे वारीला जाणार्‍यांमध्ये हौशे, नवशे आणि गवशे यांची संख्या कमी नसली तरी उरलेले काही लाख सामान्य वारकरी एखादया लोहचुंबकाने लोखंडाला खेचून न्यावे तसे पंधरा दिवस दोन अडीचशे किलोमीटर एका अंतरीक ओढीने पायी चालत जातात ही गोष्ट खरंच मनाला मोहून टाकणारी आहे.

पण तू म्हणतोस तसं, पारलौकिक बाजू जमेस धरली तरी लौकिक जगात सुधारणा व्हायला हव्यात. ती काळाची गरज आहे.

तुझा पालखीचा लेख वाचला. झक्कास लिहिला आहेस.

तुला माहिती असेलच, तुमच्या कुर्डूवाडी पासुन जवळंच पवारांचा मतदारसंघ असलेलं माढा गाव आहे. तिथल्या विठ्ठल मंदिराबद्दल डॉ. रा. चि. ढेरेंच्या पुस्तकात वाचलं होतं. पंढरपूरावरुन परत येताना जाऊन आलो. एकादशीला त्या विठोबाचं दर्शन घेतलं :)

- धनाजीराव वाकडे

छोटा डॉन's picture

21 Jul 2011 - 11:19 am | छोटा डॉन

लिहायला परावृत्त करणारा प्रतिसाद म्हणुन ह्याची पोच देतो आहे.
सविस्तर लवकरच खरडेन.

- छोटा डॉन

पंगा's picture

21 Jul 2011 - 11:38 am | पंगा

की प्रवृत्त???

अर्थ १८० अंशांनी फिरतो, म्हणून ही पृच्छा.

छोटा डॉन's picture

21 Jul 2011 - 11:42 am | छोटा डॉन

प्रवृत्तच हवे, माझी चुक मान्य करतो. :)

- छोटा डॉन

जयंत कुलकर्णी's picture

20 Jul 2011 - 10:32 am | जयंत कुलकर्णी

डेबू.............................वाचव रे बाबा !

जेम्/रुद्राक्ष थेरपी करणार्‍या आपल्या नावामागे डॉ. असे लिहिण्यास कायद्याने परवानगी आहे का ? कोणी तज्ञ प्रकाश टाकेल का ?

dr sanjay honkalse's picture

20 Jul 2011 - 7:19 pm | dr sanjay honkalse

जेम्/रुद्राक्ष थेरपी करणार्‍या आपल्या नावामागे डॉ. असे लिहिण्यास कायद्याने परवानगी आहे का ? कोणी तज्ञ प्रकाश टाकेल का ?

जयंत कुलकर्णी.
M.D. केल्यावर डा लावता येते मऊलि.आन्खिन प्रकाश तकु शक तो पण...............................................उत्त्र आपल्या विचर्न्यच्य पद्ध्तिवर आधरीत असेल नाहितेर मिहि गप्प बस णॅच योग्य सम्जतो. धन्यवाद!

dr sanjay honkalse's picture

20 Jul 2011 - 7:31 pm | dr sanjay honkalse

जेम्/रुद्राक्ष थेरपी करणार्‍या आपल्या नावामागे डॉ. असे लिहिण्यास कायद्याने परवानगी आहे का ? कोणी तज्ञ प्रकाश टाकेल का ?

जयंत कुलकर्णी.
M.D. केल्यावर डा लावता येते मऊलि.आन्खिन प्रकाश टाकु शकतो पण...............................................उत्तर आपल्या विचार्ण्याच्या पद्धतिवर आधरीत असेल नाहितेर मीपण गप्प बसणॅच योग्य सम्जतो. धन्यवाद!

जयंत कुलकर्णी's picture

20 Jul 2011 - 8:25 pm | जयंत कुलकर्णी

श्री. संजय,

माझ्या माहितीप्रमाणे डॉ. ही पदवी फक्त अ‍ॅलोपाथी प्रॅक्टीस करणार्‍यांनाच लावता येते. बाकिच्यांनी वैद्य इ. इ. ही पदवी लावायला हरकत नसावी. दुसरे ज्या विद्यापिठाची (?) आपण डॉ म्हणून पदवी लावता ती फक्त रजि. आहे. त्याला Indian Medical Council ची मान्यता नाही. म्हणून ही शंका. अर्थात ती जर असेल तर मी माझे शब्द मागे घेईन व आपली क्षमाही मागेन.

आपल्या दुसर्‍या धाग्यावर आलेली ही प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.

जासत बोलायला नको ! Govt. registered अशा पद्तीने लिहीले आहे की ते Govt approved वाटवे. मिंबईत अशा लाखो संस्था reg. आहेत.

What is the status of Indian Board of Alternative Medicines and its courses?

Indian Board of Alternative Medicines is legally constituted, internationally recognized and the largest institution of Alternative Medicine in India. It is duly incorporated under Act XXVI of 1961 of Government of West Bengal, based on the Central Government Act XXI of 1860, Literary & Scientific Institutions Act, 1854. The Diploma, Bachelor, Masters and Doctorate programs are duly chartered under the memorandum of the IBAM which has been accepted by the concerned department for registration. Moreover the rights of the practitioners of Alternative Medicine are duly protected under Article 19 of the Constitution of India.

याच धाग्यावर इतर्ही अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत त्याचे आपण एका ओळीतही उत्तर दिलेले नाही. आपल्या आयुष्याच्या वर्षांचे गणीत जुळत नाही. तरीही त्यात आपण वर दिलेल्या अनेक हिमालयाच्या वार्‍या इ. इ. यांचा हिशेब धरलेला नाही. असे असतान आपल्यावर व आपण जे लिहीता त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा हे मी आपणास प्रामाणिपणे विचारतोय. पण ज्या दृष्टीकोनातून आम्ही रजनीश, असत्यसाईबाबा यांच्यावर टिका करतो त्या दृष्टिकोनातून आपल्यावर. आपली काही तुमच्याशी दुश्मनी नाही हे लक्षात घ्या !

सुनील's picture

20 Jul 2011 - 10:55 am | सुनील

मूळ लेख आणि धनाजीरावांचा प्रतिसाद आवडला.

मृत्युन्जय's picture

20 Jul 2011 - 11:04 am | मृत्युन्जय

लेख आणि धनाजीरावांचा प्रतिसाद दोन्हीही उत्तम.

लेख आवडला

- मालोजीराव

धन्या's picture

20 Jul 2011 - 12:09 pm | धन्या

मालोजीराव,

हा फोटो ऑनलाईन मटाच्या वॉलपेपर विभागातील आहे. बरेच दिवसांपासून प्रश्न आहे की हा फोटो नेमका कुठला आणि कुणाच्या पादुकांचा आहे. (खरं तर या पादुका म्हणणं चुकीचंच आहे. ही आहे कुठल्यातरी धातूने बनवलेली पादुकांची प्रतिकृती. नाही का? )

बादवे, याच फोटोच्या जोडीने तिथे विठ्ठलाचे दोन फोटो आहेत. त्यातला संपुर्ण काळ्या पार्श्वभूमीवर खालच्या उजव्या कोपर्‍यात विठ्ठलाची मूर्ती असलेला फोटो आमचा आवडता. फोटोतला विठ्ठल आणि फोटो घेणार्‍याची/एडीट करणार्‍याची रंगसंगतीची जाण, दोन्ही मनाला भावतात. (वर "विठ्ठलाची""या शब्दाच्या जागी श्रींची" शब्द लिहिला होता आधी पण लगेच दोन श्री वाल्यांची आठवण झाली आणि खोडला :प )

- धनाजीराव वाकडे

मालोजीराव's picture

20 Jul 2011 - 12:38 pm | मालोजीराव

होय महाराजा ! हे चित्र आमच्याही परम आवडीचे आहे.

प्यारे१'s picture

20 Jul 2011 - 12:44 pm | प्यारे१

ह्यो आमचा वालपेपर हाय.

बाकी पंढरपूरला तीन नाही चारच गोष्टी खर्‍या. पांडुरंग, पुंडलिक, चंद्रभागा आणि (ही अ‍ॅडिशन आहे) चोता दोन.

मराठी_माणूस's picture

20 Jul 2011 - 11:59 am | मराठी_माणूस

देव दर्शनाला पायी जावे असे कुठे म्हटले आहे. पुर्वीच्या काळी वाहने नसताना पायी जात असतील. पण आता असे का
ह्या सर्वांचा रहदारीला खुप त्रास होतो

मराठी_माणूस's picture

20 Jul 2011 - 12:00 pm | मराठी_माणूस

प्रकाटाआ

सुमो's picture

20 Jul 2011 - 12:15 pm | सुमो

धनाजीराव आणि बिपिन कार्यकर्ते यांचे प्रतिसाद आवडले नि पटले.

नितिन थत्ते's picture

20 Jul 2011 - 1:11 pm | नितिन थत्ते

धनाजीराव आणि बिपिन यांचे प्रतिसाद आवडले.

कदाचित शासकीय पूजा करनारे मुख्यमंत्री सोडले तर हुच्चभ्रू लोक पंढरपुरला जात नाहीत म्हणून तिथे व्यवस्था सुधारण्याची गरज प्रशासनाला वाटत नसेल.

"मला काही होऊ नये म्हणून मी बिस्लेरी पितोय ना ? मग बास" ही वृत्ती बर्‍याच प्रश्नांचं मूळ असावी.

@जयंत कुलकर्णी : M Phil केल्यावर डा. लावता येत असेल. प्रा. डॉ. अधिक खुलासा करू शकतील.

जयंत कुलकर्णी's picture

20 Jul 2011 - 2:26 pm | जयंत कुलकर्णी

म्हणजे, १ली २री ३री..... ११वी असे लिहायचे का ?

अविनाशकुलकर्णी's picture

20 Jul 2011 - 10:28 pm | अविनाशकुलकर्णी

एका समस्या चांगली मांडली आहे..
धनाजिराव लिहित रहा...

धाग्याकर्त्याच्या भावना दूखावण्याची इछ्चा नाही पण मी स्वानूभवाने सांगेन की तिथे अव्यवस्था प्रचंड असते. फक्त त्याकडे भक्तीने भारलेले लोक हे चालायचचं म्हणून दूर्लक्ष करतात. व्यवस्थापन कसं असू नये याची जाण यावी म्हणून इथे विद्यार्थ्यांना न्हेलंच पाहीजे.

dr sanjay honkalse's picture

23 Jul 2011 - 9:48 pm | dr sanjay honkalse

पूर्वा कुळ्कर्नि poorvakulkarni@gmail.com
प्रिय संजय सर यांस ,

लेख फारच सुंदर आहे. भारताची संस्कृती आणि परंपरा महान आहेतच. वारी बद्दल ची बरीच माहिती मिळाली. वारी चा इतिहास कळला. मानाच्या दिंड्या व त्यांची management great आहे. लाखो लोकं भक्ती भावाने कुठचीही कुरबुर न करता वारीत सामील होतात, त्यापाठी त्यांची श्रध्दा व विठ्ठल च आपला तारक आहे हि भावना आहे.

तुम्ही दिलेले Economics मधील perfect competition चे example आवडले. खर आहे आजकाल सत्संग च्या नावाखाली fashion तर करतातच.व लुटारू पणा पण खूप आहे. मी एका ठिकाणी संत बाबांकडे गेले होते (नाव देत नाही) तिथे कुंकवाची छोटी डबी Rs .१५०/- व पाठी लागून घ्याच म्हणून आग्रह करत होते. मी इतकी irritate झाले त्या बाबांना न भेटताच परत आले.

वारकरी लोकांमध्ये इतकी शिस्त, सहकार्य, सहनशीलता आहे तर शासकीय मदत तर पाहिजे परंतु private सेक्टर , मोठे trust किव्हा चांगले sponserer यांनी लोकाची सेवा केली पाहिजे. for ex एका चांगल्या bakery ने चहा बरोबर biscuits चे stall ठेवायचे. त्यांची add तर होईल व पुण्य पण पदरी पडेल. स्वच्छता तिथे परमेश्वर . मुलभूत सेवा उपलब्ध हव्यातच.

तुम्ही लिहिलेले अनुभव सुद्धा खूप मनाला भिडतात. जाता जाता दिलेले उपदेश हि चांगले आहे. पुंडलिकाची मातृपितृभक्ती अगाध होती. म्हणूनच भगवान विठ्ठल त्यांच्या भेटीस आले. माता पिताना देवा समानच मानले पाहिजे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे खरे आहे. पित्याचे छप्पर डोक्यावर असल्यावर अन्यायाविरुद्ध लढायची सुद्धा ताकद येते.

सर, लेख खूप खूप आवडला. उत्कृष्ट भाषा , clear थिंकिंग . तुमचे विचार पटले.

पूर्वा कुळकर्णी