४.
शेतामधी संगतीनं राबतोय
पहाटेचा ओलाजरद किरण
हिरव्या भाताच्या रोपावर
दवबिंदु जणु अवखळ
शिवार पिकल उद्या
जणु घबाड घावल
दिवाळ सनाला यंदा
घरी फराळ मिळल
सावकाराच्या बेन्याच
पैकं बी फिटत्याल
फाटलेल्या सदर्याला
जोड ठिगळाचा मिळल
वाफ्यातुन वाहतय
पाणी हळुच जपुन
दारं धरुन मातीत
फुलेल रानाच सपान
रातच्याला काजव्याचा
अंधुक सोनेरी प्रकाश
सोन्याच्या दिसाचा
हाच सुगावा असल
................ शब्दमेघ (१४ जुलै २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)
.
.
.
.
.
मागील ३ कविता :
१. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक (गीत)
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक
सुरकतलेल्या चेहर्यावरी तुझाच कयास
उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास
भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं
सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं
भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं
पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!!
आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण
रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव
हरवलं देहभान.. आता अंधारलं जग
मिठीत तुझ्या विसावलं माझं वेडं स्वप्नपान
------------- शब्दमेघ ( २३ मे २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)
.
.
.
.
२. काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती
गच्च ओल शिवार.. फुललेली कांती
हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी
पांढर्याफटुक ढगांची रेशमी दुलई
काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
बांधावर उभी कोवळी रानजाई
नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रीती
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती ||
झिम्माड गर्द रानात.. टिफण चालती
सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती
औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती
घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची
------------- शब्दमेघ ( १६ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)
.
.
.
.
३. टिपुर आशेचं दाणं
(गीत)
आलं आभाळ दाटुन
दु:ख गेलया भरुन
थेंबागणिक र सारं
वेडावल मन रान ||
स्वप्न झिम्माड पान
कोरडं ठिकुर गाण
बांधावर विखुरलं
टिपुर आशेचं दाणं ||
कवा पाहिन मी सारं
माझ हिरव शिवार
बाया बापड्यांच्या मुखी
कवा हक्काची भाकर ||
आलं आभाळ दाटुन
दु:ख गेलया भरुन
पेरल्यात ओलशब्द
आस पावसाची बघुन ||
आलं आभाळ दाटुन
दु:ख गेलया भरुन ||
................ शब्दमेघ (२८ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)
प्रतिक्रिया
14 Jul 2011 - 4:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हे लय भारी!! जियो!!
14 Jul 2011 - 5:24 pm | अत्रुप्त आत्मा
सगळ्या कविता म्हणजे १ जिवंत अनुभव आहेत...
15 Jul 2011 - 10:54 am | कच्ची कैरी
गणेशा ,आज बर्याच दिवसानंतर तुमची कविता वाचली ,खूप छान वाटतय अगदी मिसळपाववर परत आल्यासारख वाटतय .
15 Jul 2011 - 11:09 am | विसोबा खेचर
क्लास..!
15 Jul 2011 - 4:01 pm | पल्लवी
शिवार पिकल उद्या
जणु घबाड घावल
दिवाळ सनाला यंदा
घरी फराळ मिळल
सावकाराच्या बेन्याच
पैकं बी फिटत्याल
फाटलेल्या सदर्याला
जोड ठिगळाचा मिळल
ही कडवी आवडली.