यम बोलला वडाला
वटपौर्णिमेच्या भल्या सकाळी
बायकांच्या आधी यमच आलेला पाहून
वडाला विस्मय वाटला.
पानांची सळसळ करत बोलला यमाला
काय रे यमा, कलियुगात
सत्यवान शोधतो आहेस का सावित्री?
यम लाजत लाजत बोलला
मला वटसावित्रीचं व्रत बघायचं आहे.
वड त्राग्याने म्हणाला,
बाबारे, आजचा एकच दिवस माझ्या धंद्याचा
तू इथे बसलास तर बायका आणि भटजी
कशाला येतील इथे?
यम बोलला वडाला
पूजा तर बघेनच आणि
फांदीही दे एक मला.
वड खो खो हसत म्हणाला,
तू फांदी घेऊन करणार काय?
तुला नवरा म्हणून मागणारी आहे तरी कोण?
यम बोलला... मला नको रे,
जन्मोजन्मी हाच रेडा मिळावा म्हणून
माझ्या रेड्याच्या म्हशीचीपण आज वटपौर्णिमा आहे.
प्रतिक्रिया
18 Jun 2011 - 2:51 pm | गणपा
=)) =))
वटवृक्ष बहरु लागलेला दिसतोय. ;)
18 Jun 2011 - 3:02 pm | धन्या
विडंबनांनंतर आता चक्क मुक्तक आणि ते ही ईतकं छान जमलेलं.
चालू द्या. वाचतोय :)
- धनाजीराव वाकडे
18 Jun 2011 - 7:41 pm | रमताराम
ती म्हैस माडर्न दिसतेय, स्वतः वडापाशी न जाता त्याची इटुकली फांदीच आणून पूजा करणारी. अजून तिला टेम्प्लेट वापरायचे सुचवले नाही का एखाद्या मार्केटिंगवाल्या रेड्याला सांगायला पाहिजे राव. केवढे मार्केट आहे पहा. वटपौर्णिमा नि नंतर श्रावणात येणारे सग्गळे सण एका टेम्प्लेटमधे भागवायचे. योग्य त्या चित्रावर एक कुंकवाची टिकली वा हळदीची चिमूट (आणि हो ते कापसाचे कायसेसे करून लावतात ते ;) ) लावली की झाले काम.
बाकी रेड्याला या कामात मदत करण्याचा भोचकपणा या यमाला कोणी सांगितला हो.
कवितेची कल्पना खल्लास आहे बर्का.
20 Jun 2011 - 4:33 pm | गणेशा
छान कविता .. मस्त