आठवणींच्या चारोळ्या

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
17 Jun 2011 - 1:02 pm

१.
मनाच्या गाभा-यातून
घोंघावतेय आठवणींचे वादळ
थरथरणा-या पापण्यांतून
ओघळतायत आनंदाश्रू नितळ

२.
एकदा त्याच किनार्‍यावर
एक स्वैर लाट भेटली
त्या लाटेवर झालेली स्वार
एक आठवण घेऊन आदळली

३.
गंधुली अंगणातील रातराणीची
सांजवेळीच मोहरून पसरली
छोटुली कळी तुझ्या आठवणीची
अवेळीच बहरून उमलली

४.
तुझ्या आठवणींशी हृदयाची
पहिल्या प्रहरी झडली चकमक
जिंकता जिंकता हरलो मी
राहिली अनंत वेदनेची तगमग

५.
कातरवेळी सप्तसूर दाटून आले
काळजातून मारवा पाझरू लागला
गाऊ जाता अवचित लोचने मिटू लागले
संधीप्रकाशात या तुझाच सूर सूर दाटला

६.
तुझ्या आठवणींच्या गावात
मन माझे कातरवेळी शिरले
जातांना ते हलके हलके होते
परततांना मात्र कां इतके जड झाले

७.
आठवणींच्या जगातील अजब हि गणिते
दोन अधिक दोन बरोबर एक लक्ष होते
माझ्या आठवणींतून तुझ्या वजा केल्यावर
मात्र ओंजळीत माझ्या फक्त शून्य उरते

८.
तू माझ्या आठवणींमध्ये रमतेस
ती तुझ्या मनाची सुंदर सफर
मी तुझ्या आठवणींकडे निघताच
मनाची माझ्या कां होते फरफट?

९.
माझ्या आठवणींचा पसारा मांडून बसतेस
कधी डोळे भरतात तर कधी उमलते स्मित
भरल्या डोळ्यांनी असे हलकेच हसतांना
किती लोभस दिसते ती जुई उमलतांना

१०.
माझ्या आठवणी इतक्याही दुखर्‍या नाही
कि तू त्या कधी एकांतीही आठवू नये
मी तुझ्यापासून इतकाही दूर नाही
कि तुझ्या हाकेला सादही देता येऊ नये

१२.
तुझी प्रत्येक आठवण
माझ्या मनाच्या पुस्तकात
पुस्तकी त्यांची साठवण
मोरपिशी फुंकर हृदयात

१३.
जरा कुठे डोळे मिटावे तर
तुझ्या आठवणी नाचत आल्या
हात लांबवून स्पर्शा गेलो तर
चटकन पापण्यांमागे जाऊन दडल्या

१४.
कधी पावसाच्या तर कधी तुझ्या
आठवणी अश्या भरभरून कोसळल्या
पाहता पाहता विद्ध मनाच्या माझ्या
जखमा कशा थरारून विरघळल्या

१५.
आजकाल माझे मन
पाठलागी रमे सावल्यांच्या
तुझ्या सहवासाचे क्षण
आठवणींतून झरे नयनांच्या

१६.
परत एकदा तेच स्वप्न
परत एकदा तुझ स्मरण
परत एकदा तेच जगण
परत एकदा माझं मरण

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१७/०६/२०११)

चारोळ्याकविता

प्रतिक्रिया

एवढ्या चारोळ्या जर बासुंदीत टाकल्या तर गुंगी यायची ;)

बाकी चारोळ्या मस्तच :)

- टारोळ्या
गोविंद बोलो हरि गोपाल बोलो
बोल राधा बोल तुने ये क्या किया
क्या बोलती तु आती क्या खंडाला
खंडाळा लोणावळा कोल्हापुरचा पण्हाळा

पप्पु अंकल's picture

17 Jun 2011 - 1:51 pm | पप्पु अंकल

टारझन च्या टारोळ्या नाही आरोळ्या असतात.

दत्ता काळे's picture

17 Jun 2011 - 1:55 pm | दत्ता काळे

एकदा त्याच किनार्‍यावर
एक स्वैर लाट भेटली
त्या लाटेवर झालेली स्वार
एक आठवण घेऊन आदळली

... वा! मस्त जमलीये ...

विदेश's picture

17 Jun 2011 - 2:51 pm | विदेश

९ आणि १३ जास्त आवडल्या.