वेताळ आणि वेताळिणीचा संवाद...

योगप्रभू's picture
योगप्रभू in जनातलं, मनातलं
14 Jun 2011 - 12:21 pm

प्रेत पुन्हा झाडाला लटकू लागले आणि विक्रमही घरी निघून गेला. इतकावेळ प्रेतात बसून विक्रमाची बडबड ऐकून कंटाळलेला वेताळही अन्य काहीच टाईमपास नसल्याने नाईलाजाने घराकडे वळला. खरे तर घरी जाणे त्याच्या अगदी जीवावर आले होते कारण घरी त्याला वेताळिणीची बडबड ऐकून घ्यावीच लागणार होती. नेमके हेच टाळण्यासाठी वेताळ रोज त्या झाडावरच्या प्रेतात वेळ घालवत बसायचा. 'वेताळिणीपेक्षा विक्रम परवडला. तो निदान लागट आणि तिरकस तरी बोलत नाही,' या विचाराच्या नादात वेताळ घरी पोचला.

'या! आलात एकदाचे गावभर उंडारुन. आता गिळायची घाई असेलच' अशा शब्दांनी आपले स्वागत होण्याच्या अपेक्षेत असलेल्या वेताळाला आज मात्र आश्चर्याचा धक्का बसला. वेताळीण चक्क शांत होती आणि काहीही न बोलता स्वयंपाकघरात काम करत होती. वेताळाला धोक्याचा वास येऊ लागला. बायका शांत असतात तेव्हा ती वादळापूर्वीची शांतता असते आणि गोड बोलतात तेव्हा नवर्‍यांच्या खिशाला खड्डा पडणार असतो, हे ठोकताळे वेताळाला अनुभवाने पाठ झाले होते.

'कशी आहेस डार्लिंग? टिंग्या जेऊन झोपला का?' काही तरी विचारायचे म्हणून वेताळाने विचारले. टिंग्या म्हणजे वेताळ-वेताळिणीचे लेकरु. त्याचे खरे नाव झोटिंग, पण लाडाने झोटिंग्या म्हणता म्हणता 'टिंग्या' हे टोपणनाव पडले. टिंग्याही बापाच्या वळणावर जाऊन दिवसभर गावचे उकीरडे फुंकत असल्याची तक्रार अलिकडे वेताळीण करु लागली होती.

'टिंग्या कधीच झोपला. मी तुमचीच वाट बघत होते. आज आवडीचे जेवण मिळाले' वेताळिणीच्या बोलण्यावर वेताळाने आनंदाने वळून बघितले. खरंच ताटात सगळ्या आवडीच्या पदार्थांची रेलचेल होती. दारुचा बुधलाही होता सोबतीला. बहुतेक कुणी धनवान पार्टी खपली असावी आज. दोघे त्या भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. जेवताना वेताळिणीने सहज विचारले, 'आज खूप वेळ लागला यायला. काही गहन चर्चा झाली का?'

वेताळाला आश्चर्याचे एकापाठोपाठ एक धक्के बसत होते. एरवी विक्रमाचे आणि चर्चेचे नाव काढले तरी वेताळिणीच्या चेहर्‍यावर आठ्या पडायच्या. तिला वेताळ आणि विक्रमाचे हे पालथे उद्योग मुळीच पसंत नव्हते. 'आपण बरे, आपले काम बरे' हा तिचा दृष्टीकोन होता. वायफळ वाद घालणे म्हणजे घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजणे, हे तिचे पक्के मत होते. 'ब्रह्मसमंध स्वयंसेवक संघ', 'वीर ब्रिगेड', 'भुतावळ ब्रदरहूड' अशा कोणत्याही संघटनेत आपल्या नवर्‍याने आणि मुलाने सामील होऊ नये, हा तिचा दंडक होता. एवढेच काय ती स्वतःही 'हडळ महिला मंडळा'ची सभासद झाली नव्हती. अशी ही वेताळीण आज चक्क विक्रम भावोजी आणि गहन चर्चेबद्दल विचारत होती. वादविवादप्रिय वेताळाला संतोष वाटला.

तो म्हणाला, 'अगं! आज माझी आणि विक्रमाची 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्वधर्मसमभाव' या विषयावर कसली भन्नाट चर्चा झाली. आणि विक्रमाने समाजातील ३ वर्गांचे कसले मस्त विवेचन केले म्हणून सांगू?' मग वेताळाने वेताळिणीला ती सगळी चर्चा ऐकवली. वेताळिण शांतपणे सगळे ऐकून घेत होती. शेवटी वेताळाने विचारले, ' तुला काय वाटतं या विषयाबद्दल?'

त्यावर वेताळिण म्हणाली, 'मला बाई तुमच्या त्या जडजंबाळ आणि विद्वत्तापूर्ण चर्चेतील काही म्हणजे काही समजत नाही. तुम्हा पुरुषांचे एक ठीक आहे. तुम्हाला घालवायला बराच वेळ असतो. आमच्यामागचे 'रांधा, वाढा, उष्टी काढा आणि मुले वाढवा' हे चक्र कधीच संपत नाही. घरकामाला वेळ पुरत नाही मग चर्चेला कुठून मिळणार?' वेताळिणीमधील 'बाई' जागी असल्याचे वेताळाला जाणवले. आपण घरात काडीचीही मदत करत नसल्याची लाज वाटून वेताळ हळूवारपणे म्हणाला, ' हे बघ. आमच्या चर्चा जड असतात मान्य आहे. पण तू काहीतरी हलके-फुलके ऐकव. मला आवडेल ऐकायला.'

त्यावर वेताळिण म्हणाली, ' आम्हा बायकांना कुठून तुमच्याएवढी अक्कल असायला? आमचे डोके फक्त 'आपण आणि आपले घर' इतक्यापुरतेच चालते. तरी तुम्ही म्हणताय तर आईकडून ऐकलेली एक गोष्ट सांगते. ऐका.

एका गावात एक शेतकरी होता. त्याचे नवे लग्न झाले होते आणि घरात आई-वडीलही होते. शेतकरी रोज सकाळी उठून शेतावर जाई. दिवसभर मेहनत करी. सायंकाळी घरी येई. गुरांच्या धारा काढून, भरपूर जेवण करुन काही काळ भजनात घालवून झोपी जाई. गावात बोंबलत काड्या लावत फिरणे, पारावर टोळ-भैरवांसमवेत विड्या फुंकत चकाट्या पिटणे किंवा दुसर्‍यांची लफडी-कुलंगडी चघळत बसणे यात त्या शेतकर्‍याला काडीचाही रस नव्हता.

एक दिवशी त्या शेतकर्‍याची तरुण बायको दुपारचे आवरुन स्वयंपाकघरात पडली होती. आता लवकरच आपल्या कुशीत बाळ असेल, असे स्वप्न बघत होती. तेवढ्यात 'धाडकन' आवाज आला. पाहते तो काय, आढ्याला टांगलेला भोपळा कुजक्या दोरीचे शिंकाळे तुटून खाली पडून फुटलेला. तिच्या मनात विचार आला, 'आत्ता जर माझं बाळ तिथं झोपलेलं असतं तर हा भोपळा त्याच्या अंगावर पडून फुटला असता आणि ते मेलं नसतं का?' त्यासरशी ती हंबरडा फोडून रडायला लागली. ते ऐकून शेजारच्या खोलीत झोपलेले सासू-सासरे आले. तिचे ऐकून तेही 'हो गं बाई. तुझे खरे आहे' असे म्हणत गळा काढून रडू लागले. हा गोंधळ ऐकून शेजारी जमा झाले. ते पण जोरजोरात रडू लागले.

कुणीतरी ही बातमी शेतात जाऊन तरुण शेतकर्‍याला सांगितली. तो बिचारा हातातील कामे सोडून घाबरुनच घरी आला. सगळी हकीगत समजताच जाम भडकला. इतकी मूर्ख माणसे कधी पाहिली नव्हती. आता मीच घर सोडून जातो आणि यांच्यापेक्षा जास्त मूर्ख माणसे दिसली तरच घरी येईन, असे म्हणून उद्वेगाने तो शेतकरी देशाटनाला निघून गेला.

वाटेत त्याला एक गाव लागले. तिथे जोरदार हाणामारी सुरु होती. कारण विचारता ते भांडण दोन वेगळ्या जातींच्या माणसांतील वादातून भडकले होते. पहिला म्हणत होता, की २०० वर्षांपूर्वी तुझ्या पणजोबांनी मुद्दाम आमच्या पणजोबांच्या शेतात गुरे चरायला सोडली होती, तर दुसरा म्हणत होता, की गुरे आपल्या मनाने शेतात गेली त्यासाठी माझ्या पणजोबाला का मारायचे? शेतकर्‍याने विचारले, 'पणजोबा, गुरे, शेती यापैकी आज काही शिल्लक आहे का?' त्यावर दोघेही म्हणाले, 'नसले तर काय झाले. पिढीजात वाद तर अजुन सुटला नाही ना? बर्‍या बोलाने कबूल केले तर ठीक अन्यथा आमची मुले अख्खा गावच जाळतील.' त्यावर शेतकरी खिन्नतेने हसला आणि पुढे निघाला.

पुढच्या गावात त्याने पाहिले, की काही लोक एका गाईला हातपाय बांधून शिडीवरुन छपरावर चढवत होते. त्याने विचारले, 'हे काय करताय?' तर ते लोक म्हणाले, 'गाईला चारा खाऊ घालतोय' शेतकरी आश्चर्याने म्हणाला, 'अरे पण मग छपरावरुन चारा काढून खाली आणा ना.' त्यावर ते लोक म्हणाले, 'तसे घातले तर गाय खात नाही.' मग शेतकरी म्हणाला, 'अरे चारा गाईपुढे टाकून तुम्ही तुमच्या कामाला निघून जा ना. गाईला खायचा तेव्हा खाईल भूक लागल्यावर.' पण त्याचे बोलणे कुणालाही पटत नव्हते.

तिसर्‍या गावात शेतकर्‍याने पाहिले, की एका हवेलीच्या गच्चीत एक श्रीमंत माणूस नागडा उभा होता. खाली जमिनीवर दोन नोकर हातात एक चड्डी धरुन उभे होते. तो माणूस वरुन चड्डीत उडी मारत होता आणि चुकली की पुन्हा वर जाऊन उडी मारत होता. शेतकर्‍याने विचारले, की हे काय चालले आहे? त्यावर ते नोकर म्हणाले, 'आमचे मालक रोजच्या प्रमाणे चड्डी घालत आहेत.' त्यावर शेतकरी म्हणाला, ' अरे पण पायात चड्डी घालूदे ना त्यांना' त्यावर ते नोकर म्हणाले, 'जगाच्या विरुद्ध करण्याची मालकांची रीत आहे. ते उडी मारुनच चड्डी घालणार.'

हे बघितल्यावर शेतकर्‍याला स्वतःची चूक कळली. तो म्हणाला, अरेच्चा! जगात एकापेक्षा एक निरुद्योगी आणि यडपट लोक असतात तर.यांच्या मानाने माझ्या घरच्यांचा बावळटपणा काहीच नाही. मी पण एक खुळाच. त्यांच्यावर रागावून शेताची कामे सोडून आलो. असे म्हणून शेतकरी घरी परतला.

ही कथा सांगून वेताळिण म्हणाली, 'म्हणून माझी आई म्हणत असे, की नसत्या उठाठेवी करु नये आणि कामाकडे पाहावे.' मग ती सहानुभूतीने वेताळाला म्हणाली, अहो! तुम्ही पण नको त्या चर्चांपेक्षा आणि सारखे प्रेतात बसून विक्रमाच्या खांद्यावरुन भट्कण्यापेक्षा काही काम करा ना.'

त्यावर वेताळाला एक कल्पना सुचली. तो म्हणाला, 'अगं त्यापेक्षा तू आणि विक्रमाची बायको आमच्या उद्याच्या चर्चेत का नाही सहभागी होत? विषय पण तुम्हाला रस वाटेल असा आहे. ' अक्कल कुणाला जास्त - स्त्रियांना, की पुरुषांना?'

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

वेताळीण बाईची गोष्ट 'फार्फार' आवडली! हेच सार आमचे मित्र टारेश्वर सकल मानवजातीच्या कल्याणापोटी मागीतलेल्या पसायदानातून 'देवा सगळ्यांना भरपूर काम दे' असे सांगतात. :-)

येस! वी आर...बिझी!
(कार्यमग्न) मनिष

धन्या's picture

14 Jun 2011 - 6:24 pm | धन्या

मनिष,

'देवा सगळ्यांना भरपूर काम दे'

एरव्ही मलाही खुप काम असतं आणि टायपाचाही कंटाळा येतो. त्यामूळे डोक्यात खुप काही चालत असूनही लेख म्हणून खुपच कमी लिहिलं जातं.

तो रविवार जरा वेगळा होता. =P

बाकी वेताळीणीने सांगितलेली गोष्ट भारीच आहे. जालावरच्या लेखकांनी आणि वाचकांनी आचरणात आणली तर खुप सारी पट्टारुंदी (ब्यँडविडथ हो !) वाचेल.

- धनाजीराव वाकडे

अहो, ह. घ्या. :-)
तुमचे (येस वी आर) विडंबन तर अगदीच हुच्च! :-)

लिहावसे वाटतेय तर लिहा मोकळेपणे, तुम्ही लिहीताही चांगले. नंतर उगाच आमच्यासारखे 'जीवनाविषयी उदास सामंजस्य' आले की संपलेच की ;-)

मनराव's picture

14 Jun 2011 - 12:47 pm | मनराव

:D :D....... मस्त लिहिलं आहे.....

किसन शिंदे's picture

14 Jun 2011 - 12:53 pm | किसन शिंदे

__/\__ ज..ब..र..द..स्त !

वेताळीणबाईने सांगितलेली शेतकरयाची गोष्टही खास.

अन्या दातार's picture

14 Jun 2011 - 12:56 pm | अन्या दातार

योगप्रभूंना योगसाधनेतुन झालेला हा साक्षात्कार का?? कृ.ह.घे.हे.वे.सां.न.ल.

नगरीनिरंजन's picture

14 Jun 2011 - 1:03 pm | नगरीनिरंजन

छान लेख, पण थोडा घाईत लिहीलेला वाटला आणि उपरोध थोडा त्राग्याकडे झुकल्यासारखा वाटला. तरीही आतापर्यंतच्या अनेक चर्चा वाचून ऐकून मनात आलेले काही विचार मांडले गेले आहेत. :-)
अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समभाव हेच काय, या अनुषंगाने विधेयके, आंदोलने, भ्रष्टाचार, आंतरराष्ट्रीय राजकारण, अध्यात्म या आणि अशा अनेक गोष्टींवर चर्चा करणारे लोक निरुद्योगी आणि यडपट असतात यावर आपले एकमत होणार बहुतेक. :-)

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 1:39 pm | धमाल मुलगा

>अशा अनेक गोष्टींवर चर्चा करणारे लोक निरुद्योगी आणि यडपट असतात यावर आपले एकमत होणार बहुतेक
सरळ आहे राव.
ढीगभर काम समोर असताना कसं कोण किलोकिलोचे प्रतिसाद लढवत बसेल? ;)

योगप्रभू,
श्रीमंत माणसाचा किस्सा लैच्च आवडला गा.

मृत्युन्जय's picture

14 Jun 2011 - 1:43 pm | मृत्युन्जय

श्रीमंत माणसाचा किस्सा लैच्च आवडला गा.

नागड उघड तुम्हाला सगळच आवडतय हो. ;)

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 1:56 pm | धमाल मुलगा

बदलत्या काळानुसार बदलायला नको? :D

म्हणजेच नगरीनिरंजन यांचेकडून किलोकिलोचे प्रतिसाद तुला अपेक्षीत होते काय?

नगरीनिरंजन हलके घ्या. :-)

लेख अन गोष्टही मस्त. आता मलाही मिपा सोडून इतरत्र भटकावे लागेल असे दिसते. ;-)

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 1:54 pm | धमाल मुलगा

माझ्या प्रतिसादांबद्दल बोलत होतो की मी. ;)

धन्या's picture

14 Jun 2011 - 6:18 pm | धन्या

या अनुषंगाने विधेयके, आंदोलने, भ्रष्टाचार, आंतरराष्ट्रीय राजकारण, अध्यात्म या आणि अशा अनेक गोष्टींवर चर्चा करणारे लोक निरुद्योगी आणि यडपट असतात यावर आपले एकमत होणार बहुतेक.

इथून पुढे लेख लिहिण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागेल :)

- धनाजीराव वाकडे

स्मिता.'s picture

14 Jun 2011 - 2:03 pm | स्मिता.

छान लेख आहे... मजा आली. वेताळणीने सांगितलेली गोष्ट आवडली.

ननिंच्या, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समभाव हेच काय, या अनुषंगाने विधेयके, आंदोलने, भ्रष्टाचार, आंतरराष्ट्रीय राजकारण, अध्यात्म या आणि अशा अनेक गोष्टींवर चर्चा करणारे लोक निरुद्योगी आणि यडपट असतात यावर आपले एकमत होणार बहुतेक.
या वाक्याशी सहमत!

मिपाकर मित्रांनो,

थोडी कोपरखळी मारण्याच्या हेतूने चंमत ग केली आहे.
नगरी निरंजन किंवा हिरीरीने वाद घालणार्‍यांना टाकून बोलण्याचा हेतू नाही. मी पण त्या चर्चांमध्ये हातभर प्रतिसाद देतच असतो.

पण लहानपणी आमची मित्रांचे वाद टीपेला चढले, की कुणीतरी मोठं माणूस डोकावायचं आणि खेकसायचं

' ए पोरांनो! केवढ्यानं भांडताय. काही कामं नाहीत का तुम्हाला?'

...तर हे प्रहसन लिहिताना हे वाक्य आठवत होते, इतकेच.
कृपया कुणी नाराज होऊ नका.:)

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 2:08 pm | धमाल मुलगा

ए गप रे. उगाच खुलासे कसले देणं चालू आहे? :)
माहितीए आम्हाला. आणि आम्ही कोणी नाराज अन म्हाराज होत नाही. यू फिकीर नॉट. :)

नगरीनिरंजन's picture

14 Jun 2011 - 2:34 pm | नगरीनिरंजन

यवढ्या-तेवढ्यानी नाउमेद होणारे वाटलो का काय आम्ही तुम्हाला? आणि झालो नाराज तरी काय उखडणारे तुमचं? :bigsmile:

पाषाणभेद's picture

14 Jun 2011 - 2:46 pm | पाषाणभेद

असं नाही काही. नाराज झाले तर साधूमहाराज येतील हं.

:-)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jun 2011 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

अर्र्र्र धम्या लेका तुला कळला नाही धाग्याचा हेतु ;)

पण लहानपणी आमची मित्रांचे वाद टीपेला चढले, की कुणीतरी मोठं माणूस डोकावायचं आणि खेकसायचं

हे वाक्य विनाकारण डकवुन आपल्या वयाचा अधिकार गाजवायचा अंतस्थ हेतू आहे हा ;)

हरकत नाय ! पुढील कट्ट्याचे बिल वयस्कांनी द्यावे.

योगप्रभू's picture

14 Jun 2011 - 5:26 pm | योगप्रभू

परा,
मी मोठं माणूस म्हटलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ वयस्क होत नाही.
उगाच आम्हाला 'सिनियर सिटीझन' मध्ये ढकलायचं कारण नाही. मी मधल्या फळीतला खेळाडू हाय.

कट्ट्याचे बिल द्यायला घाबरत नाही.

(गंथालय रात्री बारानंतर बंद होते, याची कट्ट्यावरील रसिक वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. बारानंतर पुस्तक वाचायला मिळणार नाही, याची कल्पना आपल्या बालवाचकांनाही द्यावी :))

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jun 2011 - 3:06 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समभाव हेच काय, या अनुषंगाने विधेयके, आंदोलने, भ्रष्टाचार, आंतरराष्ट्रीय राजकारण, अध्यात्म या आणि अशा अनेक गोष्टींवर चर्चा करणारे लोक निरुद्योगी आणि यडपट असतात यावर आपले एकमत होणार बहुतेक.
- या वाक्याला १०० वेळा सहमत.

गोष्ट लई आवडली.

पैसा's picture

14 Jun 2011 - 3:29 pm | पैसा

झक्क टपल्या मारल्यात!

विजुभाऊ's picture

14 Jun 2011 - 4:06 pm | विजुभाऊ

एक शंका : लोक चड्डीत पाय घालतात की पायात चड्डी ?
लोक अंगात शर्ट घालतात की शर्टात अंग ?

योगप्रभू's picture

14 Jun 2011 - 5:35 pm | योगप्रभू

एक शंका : लोक चड्डीत पाय घालतात की पायात चड्डी ?

उत्तर : बहुतेक लोक स्वतःच्या पायात चड्डी घालतात आणि दुसर्‍याच्या चड्डीत पाय :)

वाहीदा's picture

14 Jun 2011 - 6:05 pm | वाहीदा

बाकी इथे ही
'ब्रह्मसमंध स्वयंसेवक संघ', 'वीर ब्रिगेड', 'भुतावळ ब्रदरहूड' , 'हडळ महिला मंडळा' वगैरे आहे की काय ? ;-)
बाकी योगप्रभू तुम्ही नावे पण काय सॉलीड भारी घेतलीत हो .. मज्जा वाटली वाचताना !

नाना बेरके's picture

14 Jun 2011 - 7:58 pm | नाना बेरके

योगप्रभू

तुमचा लेख आवडला.

सुधीर१३७'s picture

14 Jun 2011 - 8:53 pm | सुधीर१३७

मस्तच.......................... :)

गोष्ट भलतीच मनोरंजक आहे.;)
'ब्रह्मसमंध स्वयंसेवक संघ', 'वीर ब्रिगेड', 'भुतावळ ब्रदरहूड'
हे भारी आवडले.

प्राजु's picture

15 Jun 2011 - 5:04 am | प्राजु

मस्त ! एकदम आवडली!
याची एक लेख माला होऊ शकेल. विचार करा, योगप्रभू!!
चांगली लेखमाला होईल.

नितिन थत्ते's picture

15 Jun 2011 - 9:59 am | नितिन थत्ते

एकदम मस्त.

विसोबा खेचर's picture

15 Jun 2011 - 12:20 pm | विसोबा खेचर

झकास रे..! :)

मुलूखावेगळी's picture

15 Jun 2011 - 3:06 pm | मुलूखावेगळी

_ /|\ _

राजेश घासकडवी's picture

15 Jun 2011 - 5:55 pm | राजेश घासकडवी

लष्कराच्या भाकऱ्या भाजणं याला वेळ फुकट घालवणं म्हणतात. पण त्याहीपेक्षा वरताण म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या कशा भाजल्या जाव्यात याविषयी तावातावाने रिकाम्या पोटी चर्चा करणं.

वाहीदा's picture

15 Jun 2011 - 6:45 pm | वाहीदा

एक लंबर प्रतिसाद !

रमताराम's picture

17 Jun 2011 - 12:16 am | रमताराम

खास करून 'टिंग्या' या शब्दाचे मूळ रूप (झोटिंग्या) समजल्याने समाधानी आहोत. एकुणच टिंग्याच्या वर्तनाशी हा खुलासा जुळणारा असल्याने बोधीवृक्षाऐवजी मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाखालीच साक्षात्कार झाल्यासारखे वाटले.

अवांतरः तुमच्या वेताळणीला सांगितली आहे का ही गोष्ट? सांगितली असल्यास हातीपायी धड असल्याचा पुरावा मागू का?

(विक्रम) रमताराम