आजही यमुनातीरावर राधा कदंबाखाली उभी
अगदी नेहमीसारखेच
आजही प्रतिक्षा; ठाऊक आहे कान्हा गोकुळात नाही तरीही
अगदी नेहमीसारखेच
कसे युगान्तीत प्रेम हे
अवघे निळे आभाळ काजळले
अमर प्रेमाचे चमचमते थेंब ओघळलेले
कदंबाच्या पानापानात ते गच्च दाटलेले
राधेचे उत्तरीय त्या प्रेमात चिंब जाहलेले
राधा कशी पुरती बावरलेली
इतक्यात दुरून एकतारीचे सूर घुमले
नितांत आर्त विरहगीत त्यामागून आले
राधेचे नेत्र त्याचा उगम शोधू लागले
दूरवर एका वडाखाली एक सात्विक सौंदर्य, वल्कले नेसलेले
राधा धावत सुटली त्या वडाकडे
त्या सौंदर्याला गाठायला
अचानक ती मध्येच अडखळली, वेडावली, मुळातून हादरली
अजरामर प्रेमाचा वर्षाव त्या कदंबापलीकडे नव्हताच
या प्रेमापलीकडे देखील विश्व असू शकते????
त्या सात्विक सौंदर्याला विचारले तिने, कोण तू,इथे कशी?
ते उत्तरले, जा.. परत जा.. त्या कदंबाखाली लवकर.. तेच तुझे प्राक्तन
इथला वणवा नाही सोसायचा तुला, ही तर माझी नियती
आजही मीरेने पुन:श्च, अजून एक
जहरप्याला घशाखाली उतरवला... नेहमीसारखेच
अगदी नेहमीसारखेच
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०८/०६/२०११)
प्रतिक्रिया
8 Jun 2011 - 11:30 am | अज्ञातकुल
काय सांगू तुला . विषय आणि मांडणी दोन्हीही मस्त :)
8 Jun 2011 - 4:16 pm | गवि
जबरदस्त रे..
आणखी एक सुंदर क्रिएशन.
युगान्तीत हा शब्द टायपो झाला असावा. युगातीत म्हणायचं असेल तुला.
9 Jun 2011 - 12:57 am | अत्रुप्त आत्मा
राधा आणी मीरा मानवी जीवनातील उपभोग आणि वैराग्य या दोन आवश्यक बाबींचं जणु चींतनच आहे.कवी मनाला ते निरनिराळ्या पातळ्यांवरुन ते नेहमी साद घालत...त्याचाच हा सुंदर आविष्कार आहे...फारछान,ह्रुदयस्पर्शी,अप्रतीम.
9 Jun 2011 - 8:07 am | पाषाणभेद
सुंदर
9 Jun 2011 - 8:19 am | नगरीनिरंजन
छान रे!
9 Jun 2011 - 8:29 am | मदनबाण
अप्रतिम... :)
9 Jun 2011 - 12:17 pm | विसोबा खेचर
व्वा..!
9 Jun 2011 - 5:18 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सर्वांचे मनापासून धन्यवाद.