पूर्वपीठिका: नटरंग आणि आमचं शंके़खोर मन
‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून भारून गेलेले अनेक लोक भेटले आणि तशी अनेक परीक्षणं विविध ठिकाणी वाचली. चित्रपट पाहून आमच्या शंकेखोर मनात आलेल्या काही शंकांचं निरसन तरीही झालेलं नाही, म्हणून रसिक मायबाप वगैरे समस्त मराठीजनांची क्षमा मागून आमच्या त्या शंका इथे दिलेल्या आहेत:
संगीत आणि तेही विशिष्ट काळातलं, विशिष्ट जातकुळीचं संगीत (पक्षी: बालगंधर्व आणि त्यांच्या काळातलं नाट्यसंगीत) हाच ज्याचा आत्मा आहे अशा चित्रपटात एकता कपूरच्या टिनपाट टी.व्ही. मालिकांतल्यासारखं पार्श्वसंगीत सतत का वाजत असतं? प्रेक्षकांना प्रसंगातलं कारुण्य वगैरे समजायला संवाद (तेही अमुक-तमुक व्यक्ती मेली, अमुक लाखांचं कर्ज फेडा वगैरे टाईपचे; म्हणजे सूचक वगैरे नाहीत बरं) आणि त्या जोडीला पडद्यावरच्या सर्वांनी गाळलेली टिपं पुरेशी नाहीत असं दिग्दर्शकाला वाटतं का काय? की एकंदरीत आजच्या प्रेक्षकाला असलंच संगीत लागतं अशा समजातून हे आहे? पण मग हे असलं भावनांना हातघालू संगीत सतत वापरणं हा बालगंधर्वांचा आणि त्यांच्या संगीताचा अपमान नाही होत का?
हे निव्वळ पार्श्वसंगीत म्हणून नाही, तर अगदी ‘धर्मात्म्या’च्या प्रसंगातल्या करुण गाण्यातदेखील कसलीतरी भयंकर (आणि त्या काळात नसणारी) वाद्यं कानठळ्या बसेपर्यंत का वाजत रहातात? अशा वाद्यांनी प्रसंगातलं कारुण्य गहिरं वगैरे होण्याऐवजी अगदी नाहीसं होतं हे ज्यांना कळत नाही त्यांना संगीतातलं नक्की काय कळतं?
एकंदरीत बालगंधर्वांविषयी किमान आस्था असणाऱ्या पुष्कळ लोकांना माहीत असतील असे किस्से किंवा एखाद्या चरित्रकोशात सहज सापडतील असे त्यांच्या आयुष्यातले ठळक प्रसंग एखाद्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधल्या बुलेट पॉईंटसारखे टाकत गेलं की पटकथा झाली असं पटकथालेखकाचं मत आहे का? म्हणजे टिळक आले त्यांना ‘अरे हा तर बालगंधर्व’ म्हणून गेले; गडकरी आले त्यांना ‘एकच प्याला’ देऊन गेले; केशवराव भोसले आले आणि धैर्यधर झाले; शांताराम आले आणि धर्मात्मा बनवून गेले अशी नुसती माणसांची आणि प्रसंगांची जंत्री चित्रपटात येत राहते.
याउलट कोणत्याही संदर्भग्रंथात सहज सापडतील अशा तपशीलांपलीकडचे बालगंधर्व चित्रपटात दिसतच नाहीत. उदा. असं सांगतात की गाण्यातलं शास्त्रशुद्ध तंत्र (हा अमुक ताल, तो तमुक राग वगैरे) गंधर्वांना फारसं कळत नसे पण त्यांची संगीताची जाण मात्र अतिशय चकीत करणारी होती आणि गळ्यातून हवे ते काढण्यात ते वाकबगार होते. अशा माणसाला संगीताबद्दल, इतर गायकीबद्दल काय वाटतं हे चित्रपटात कुठेच येत नाही. नुसतं एकामागून एका प्रसंगात त्यांना गाताना दाखवलं आणि त्यांची व्यवहारी जगाविषयीची निरागसता दाखवली की व्यक्तिचित्रण झालं असं दिग्दर्शकाला/पटकथालेखकाला वाटतं का?
चित्रपटात दोन प्रसंग कराचीत घडतात. पहिल्या प्रसंगात तशी पाटी येते आणि दुसऱ्या प्रसंगात पात्रं आणि संवादातून ते कळतं. मग दोन्ही प्रसंगांत मागे उगाच बांग का? म्हणजे कराचीत तेव्हा २४ तास बांग ऐकू यायची असा कुणाचा समज आहे की काय? की जिथे बांग ऐकू येते अशी ठिकाणं ही आताच्या पाकिस्तानातच असणार असं काहीसं प्रेक्षकांना वाटावं अशी इच्छा आहे? आणि मग इतर ठिकाणी उगाचच मागे मोटारींचे वगैरे आवाज का येत रहातात? म्हणजे मोटारी असतील तर त्या कराचीत नाहीत तर उर्वरित भारतातच (म्हणजे तेव्हापासून ‘आपण’ पुढे वगैरे) असं काही म्हणायचं आहे का?
एकंदरीत संवाद आणि पटकथेत चुकून झालेले विनोद तर फारच आहेत. उदा: गंधर्वांशी लग्न झालं तेव्हा त्यांच्या बायकोचं वय नक्की काय होतं? ती घोडनवरी होती की काय? कारण विभावरी देशपांडे अभिनेत्री म्हणून कितीही गुणी असली तरीही त्या काळात घोडनवरी ठरली असती अशा वयाची दिसते (आणि आहेच). लग्नाच्या आणि पहिल्या रात्रीच्या प्रसंगात ती थोराड दिसते हा काही तिचा दोष नाही; ती कास्टिंगची ढोबळ चूक वाटते.
गंधर्वांच्या नाटकांना आलेली आणि पहिल्या रांगांत बसलेली म्हणून जी काही प्रेक्षकमंडळी दिसतात ती ठेवणीतले कपडे-दागिने घालून, बग्ग्यांमधून वगैरे येणारी, गंधर्वांच्या उच्चभ्रू, लब्धप्रतिष्ठित चाहत्यांपैकी आहेत असं त्यांच्याकडे पाहून काही वाटत नाही. मग या गोष्टींना (श्रीमंतीचं प्रदर्शन वगैरे) दिग्दर्शकाचा काही तात्त्विक विरोध वगैरे आहे की काय अशी शंका वाटू लागते. याउलट स्टेजवर नसतानाची नाटक मंडळी पाहून वाटतं. म्हणजे यांचे कपडे सारखे परीटघडीचे, कडक, कोरे कसे दिसतात असा प्रश्न पडतो. एवढ्या लोकांना रोज किती कामं असतात आणि त्यात त्यांचा कसा पिटटा पडतो याची कल्पना ज्यांचा फिरत्या नाटक मंडळींशी संबंध आला असेल त्यांना असेल. मग तरीही त्यांचे कपडे असे सदासर्वकाळ कोरे का? त्या लोकांना काही कामंधामं करायला लागत नसत का?
निव्वळ मिशा लावल्यानं राहुल देशपांडे मर्दानगीचा निखळ नमुना वगैरे दिसतो हे आम्हाला तरी फारच विनोदी वाटलं. त्यात केशवराव भोसल्यांचे धैर्यधराच्या वेशातले फोटो पाहिलेले असल्यामुळे तर आम्ही वाईट परिस्थितीत सापडलो.
एकंदरीत असले सिनेमे पाहून मराठी संगीत नाटकातला सुवर्णकाळ जिवंत होतो आणि जाताजाता मराठी चित्रपटसृष्टीतही नवा सुवर्णकाळ उदयाला येतोय असं आमच्या बालबुद्धीला तरी वाटलं नाही. उलट अनेकांना प्रिय असणारे बालगंधर्व जरा जास्तच सस्ते झालेत असं आम्हाला वाटू लागलंय. आता आम्ही पडलो शंकेखोर म्हणून आमचं रडगाणं सोडून द्यायचं, का आमच्या मुद्द्यांत तथ्य वाटतं असं म्हणायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. खिशाला फार तोशीस मात्र पडू देऊ नका असा आमचा एक पुणेरी सल्ला.
प्रतिक्रिया
15 May 2011 - 11:46 pm | आनंद
अगदी बरोबर आहे.
पटकथे वर अजीबात मेहनत घेतलेली नाहीए. असे चित्रपट बनवताना ग्राउंड वर्क अतिशय महत्वाचे असते नेमक त्याचाच अभाव आहे. अर्थात फार अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या त्या मुळे ठीक होता.
16 May 2011 - 1:10 am | इंटरनेटस्नेही
नाही बघितला, बरं झालं.
-
(अॅज फार अॅज पॉसिबल मराठी आणी हिंदी चित्रपट न बघणारा) इंट्या.
16 May 2011 - 4:30 am | अभिज्ञ
कमाल आहे.
चि जंच्या मागील लेखावर आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया या हि लेखाला तंतोतंत कशा काय लागू
पडत आहेत?
त्यातली मला आवडलेली पाषाणभेदांची प्रतिक्रिया
"कोणतीही कलाकृती पाहतांना सर्जनशील मन असावे लागते. तू चित्रपट त्या वृत्तीने न पाहता केवळ समिक्षणाच्या सदाशिव पेठी पातळीत पाहीला. तू जेवतांना कॅलरीज मोजून त्याच खात असशील. त्याचा आनंद घेत नसशीलच."
असो,
अभिज्ञ.
अवांतर : मागे एकदा हरिश्चंद्राची फॅ़क्टरी पाहिला होता. पहिल्यांदा पाहिल्यावर टुकार वाटला होता,
परवा परत एकदा पाहील्यावर "ब-यापैकि आवडला". कदाचित पहिल्यांदा मला चित्रपट नीटसा कळला नसावा.
16 May 2011 - 8:04 am | आनंदयात्री
पाषाणभेदांचा सिक्सर आवडला. मस्त !!
16 May 2011 - 12:32 pm | यकु
"कोणतीही कलाकृती पाहतांना सर्जनशील मन असावे लागते. तू चित्रपट त्या वृत्तीने न पाहता केवळ समिक्षणाच्या सदाशिव पेठी पातळीत पाहीला. तू जेवतांना कॅलरीज मोजून त्याच खात असशील. त्याचा आनंद घेत नसशीलच."
पाभेंची ही प्रतिक्रिया अगदी पटली आणि आवडली !
19 May 2011 - 2:30 am | प्रकाश घाटपांडे
आमाला लई दिवसापासुन सर्जनशील शब्द कुठतरी वापरायचा आहे पन गोची काय व्हतीय कि सृजनशील कवा म्हनायच व सर्जनशील कवा म्हनायच? दोगामधी नेमका फरक काय? सर्जन म्हंजी शल्यचिकित्स असा अर्थ हाय का? मंग चिरफाड करनारा म्हंजी सर्जनशील मानुस म्हनायच का?
अशे प्रश्न आमच्या मना उबे र्हात्यात.
आता बिअर पितानी किती क्यालरीज जातात हा प्रश्न बी नंतर कवातरी पडतोय. (पेताना नाय) बर ढेरी वाढते ती बिअरनी कि क्यालरीज नी हा बी प्रश्न हाय! तव्हा आपल शास्त्रापुरत असाव हे आमच मत!
शंका घेतली कि ज्यानला आवडत नाय ती ल्वॉक त्याला कुशंका म्हंत्यात हे आमाला म्हाईत हाय! शंका ही घेण्या पेक्षा येते त्याला कोन काय कर्नार!
आता पिच्चरच म्हनाल तर आपन तो पाहिला नाय! आन त्यातल आपल्याला काय कळत बी नाय! पन पघितला तरी टाईमपास म्हनुन पघायचा हाय काय नाई काय!
16 May 2011 - 5:21 am | सहज
:-)
परिक्षण आवडले.
पटकथा, संगीत, दिग्दर्शन, पात्र निवड/चित्रीत प्रसंग ...सामुदायीक अपयश
16 May 2011 - 8:22 am | नरेशकुमार
मला RIO पिच्चर खुप आवडला.
अव्वांतर : नशिब बालसाहेब हयात नाहीत. अन्यथा त्यांनी इथच 'आत्म्हत्या करन्यासाठी काय करु ?' अशी पोस्ट काढली असती.
16 May 2011 - 9:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
उतारवयातले बालगंधर्व सुबोध भावेने बर्यापैकी रंगवले आहेत; पण शरीर दमलं आहे आणि चेहेरा मात्र फारतर चाळीशीचाच दिसतो. रोज दूधाची आंघोळ करणार्या माणसाचा चेहेरा एवढाही तरूण, तजेलदार राहू शकतो का?
निव्वळ मिशाच नव्हे, वर्णही काळा केला आहे. प्रत्यक्षात अट्रॅक्टीव्ह दिसणारा माणूस पडद्यावर काहीतरीच दाखवून त्याला मर्दानगीचा निखळ नमुना (म्हणजे नक्की काय?) म्हणणं आणखीनच विनोदी वाटलं.
गडकरी, शांताराम यांची कामं करणारे नट निवडताना चेहेर्यात साधर्म्य शोधलं आहे आणि मुख्य कामाच्या, अॅक्टींगच्या नावाने बोंब असा काही प्रकार वाटतो. आणि मग (अॅक्टींग चांगली करणारे) किशोर कदम हे गणपतराव बोडस म्हणून चालतात का? नाट्याचार्य खाडीलकर या व्यक्तीरेखेला फार काम नाही, आणि चेहेर्यात साधर्म्यही वाटतं.
चित्रपटात बालगंधर्वांचे विचार म्हणून दोनच गोष्टी दिसतात, एकतर रसिकता*. आणि दुसरं म्हणजे नाटकातून विचार मांडताना, आपणही शिकलं पाहिजे. माणूस म्हणून बालगंधर्व काय होते हे समजतच नाही.
*रसिकता म्हणून त्यांनी पंचवीस हजार खर्च केले का पंचवीसशे या तपशीलात मला फारसा रस नाही. कदाचित चित्रपटात आकडा चुकीचा दिलाही असेल पण म्हणून भरजरी शालू, अत्तरं, इ. "अनावश्यक खर्च" बालगंधर्वांनी केला हे दिसतं.
16 May 2011 - 10:13 am | रमताराम
माणूस म्हणून बालगंधर्व काय होते हे समजतच नाही.
आम्ही पोतदारांच्याबाबत मांडलेला मुद्दा पुन्हा मांडतो. आधी बालगंधर्व गायक, नट, संगीत-नाटक परंपरेचे अध्वर्यू म्हणून कसे होते ते समजू द्या. मग त्यांचे माणूसपण तपासायला जा. पण माझ्या मते ती सार्वजनिक ओळख जरी पुन्हा उजळून निघाली तरी ते चित्रपटाचे पुरेसे यश आहे . (विस्तारभयास्तव मुद्दा आवरता घेतला आहे) मग काय बालगंधर्वांच्यावर टीकेचा भडिमार करायचा असेल, कोणाला 'माणूसपण समजून' घेण्याच्या वरकरणी हेतूमागून त्यांचे वाभाडे काढायचे असतील तर हरकत नसावी.
बाकी लेखात उल्लेखलेल्या तांत्रिक बाजू या चित्रपटाचे माध्यम म्हणून मूल्यमापन करत असतील ते ठीकच आहे. परंतु माध्यमापलिकडे कथेची बाजूदेखील पहायला हवी. चित्रपटाचा प्रेक्षक हा माध्यमापेक्षा कथेकडेच अधिक लक्ष देतो असा या पामराचा समज आहे. ती जर जमली तर सार्या तांत्रिक त्रुटी आम्ही क्षम्य मानू.
16 May 2011 - 1:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चित्रपटातून हे खरोखरच दिसतं का? ते कितपत चांगलं मांडलं आहे? गाजलेली पदं जास्तीतजास्त प्रमाणात चित्रपटात आलीच पाहिजेत असा काही अट्टाहास होता का?
मुलगी गेल्यानंतरही प्रयोग करणे, "म्हातारा इतुका"* गाण्यानंतर नटांमधली चर्चा, 'एकच प्याला'तल्या सिंधूकडून काही शिकलं पाहिजे, केशवराव भोसल्यांचे जोडे पदराने पुसण्याचा गाण्यातला प्रसंग इत्यादी गोष्टींमधूनही बालगंधर्वांचं माणूसपण दिसत नाही का?
माणसाचं माणूसपण दाखवणं म्हणजे वाभाडे काढणं असा समज का? श्रीनिवास रामानुजन हे महान गणिती इतिहासात नापास झाले होते असं सांगणं हा त्यांचा अपमान का समजावा? एखाद्या कला-क्रीडा-विज्ञान क्षेत्रात असामान्य कर्तृत्व गाजवणार्या व्यक्ती इतर काही क्षेत्रांमधे सामान्यांच्या तुलनेत फार मागे असणं (एक प्रकारे डिस्लेक्सिक?) यात काही नावीन्यतर नाहीच नाही.
*बाल विवाह आणि कोवळ्या वयात विधवा ही महाराष्ट्रातली एकेकाळची वस्तुस्थिती माहित असल्यामुळे "म्हातारा इतुका" गाण्यात लहान पोरग्यांचे घेरे दिसणं थोडं अंगावर आलं.
16 May 2011 - 4:12 pm | रमताराम
चित्रपटातून हे खरोखरच दिसतं का? ते कितपत चांगलं मांडलं आहे? गाजलेली पदं जास्तीतजास्त प्रमाणात चित्रपटात आलीच पाहिजेत असा काही अट्टाहास होता का?
हे आम्हाला ठाऊक नाही, आम्ही चित्रपट पाहिला नाही. म्हणून आमचा प्रतिसाद 'जर-तर' स्वरूपाचा होता हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. दिसलं 'असेल' तर चित्रपट पास करा नाहीतर नापास. अॅज सिंपल अॅज दॅट. माय मनी इज नॉट इन्वेस्टेड इन इट. :)
मुलगी गेल्यानंतरही प्रयोग करणे, "म्हातारा इतुका"* गाण्यानंतर नटांमधली चर्चा, 'एकच प्याला'तल्या सिंधूकडून काही शिकलं पाहिजे, केशवराव भोसल्यांचे जोडे पदराने पुसण्याचा गाण्यातला प्रसंग इत्यादी गोष्टींमधूनही बालगंधर्वांचं माणूसपण दिसत नाही का?
पुन्हा तेच. आम्ही दिसत नाही वगैरे म्हटलेलेच नाही. ते शोधायची घाई नको इतकेच म्हटले आहे (तुम्हाला असेल तर शोधा, आम्ही अटकाव थोडेच करणार आहोत) त्यामुळे प्रतिसाद पुन्हा एकवार गैरलागू.
माणसाचं माणूसपण दाखवणं म्हणजे वाभाडे काढणं असा समज का?
'आहे' असं डेफिनिटिव विधान केलेले नाही. पुन्हा 'कोणाला करायचे असेल तर' कडे लक्ष वेधू इच्छितो. त्या विधानाचा अर्थ असा की 'अगदी ते सुद्धा करायचे असेल तरी हरकत नाही' असा होईल (असा आपला आमचा समज आहे) त्यामुळे पुन्हा एकवार मुद्दा गैरलागू.
*बाल विवाह आणि कोवळ्या वयात विधवा ही महाराष्ट्रातली एकेकाळची वस्तुस्थिती माहित असल्यामुळे
रोचक विधान. खास करून बाल विवाह नि बाल/कोवळ्या वयातील विधवा यांना एकाच मापाने मोजलेले पाहून गंमत वाटली. कारण बाल विधवा ही 'समस्या' म्हणून समाजाच्या कितव्या भागात/घटकात अस्तित्वात होती हे पाहणे मनोरंजक ठरेल. तसेच बाल विवाह 'पर से' ही समस्या होती का याबाबत साशंक आहे.
16 May 2011 - 9:59 am | रमताराम
एकुण 'हरिश्चंद्राच्या फ्याक्टरी'ने आमची जी अवस्था केली तीच चिंतूशेटची 'बालगंधर्व'ने केली तर. इथेही भावनिक एनकॅशमेंट चालू आहे तर. चालायचंच 'यथा प्रजा तथा मजा'.
ते काहीही असो बालगंधर्वांचे आपण देणे लागतो, त्यामुळे चित्रपट पहावा तर लागेलच. पण आता कुठे दुर्लक्ष करावे हे तरी समजले. त्याबद्दल चिंतूशेटचे आभार. नाहीतर मूळचा मास्तरकीचा बाणा, त्यात आयटीमधला त्रुटीअन्वेक्षकाच्या कामाने वृश्चिकदंश झालेला त्यामुळे अशा त्रुटी लगेच नजरेस पडतात. पाप हो!
गाणिगिणी तरी बरी आहेत का, नाही म्हंजे डोळे मिटून पाहण्यासारखा तरी आहे का हो चित्रपट?
16 May 2011 - 10:22 am | ईश आपटे
अभिनंदन, अभिनिवेषाला बळी न पडता परीक्षण दिल्याबद्द्ल. एकंदर मराठीचित्रपटसृष्टीतील सुमारदर्जाची कल्पना असल्यामुळे मराठी चित्रपट पहाणे सोडले आहे. मागे वासुदेव बळवंत फडके चित्रपट पहाताना ज्या वेदना झाल्या त्या सहन करण्यापलीकडे होत्या.
कॅरेक्टर उभे करणे हे मराठी/हिंदी नटांच्या व दिग्दर्शकांच्या आवाक्यापलीकडील गोष्ट आहे.(अपवाद हरिश्वंद्राची फॅक्टरीचा). मग सावरकर असोत, फडके असोत वा आता बालगन्धर्व , नुसती त्या काळातील ड्रेपरी चढवली व सेट उभे केले की काळ व व्यक्ती उभी राहते असा आपल्या चित्रपट सृष्टीचा समज आहे.
एक प्रश्न- बालगंधर्वांचा आजच्या काळात सिग्निफिगन्स काय ?? हे मला अजून ही स्पष्ट झालेले नाही
क्रोस ड्रेसिंग करणारा एक गाणे म्हणणारा नट ज्याविषयी तत्कालीन पुरुष ओब्सेस्ड होते ह्याचे एवढे महत्व का ? पाहिजे तर खवहीत प्रतिसाद द्यावा.
16 May 2011 - 10:43 am | रमताराम
अपवाद हरिश्वंद्राची फॅक्टरीचा
ह. ह. पु. वा. तो नक्की माहितीपट होता, चरित्रपट होता की विनोदी (की सगळ्यांसाठी थोडा थोडा असा 'समाजवादी' - :) - किंवा बॉलिवूड स्टैल ) चित्रपट होता हे अजून समजले नाही मला. (एक उदा. शेवटी चरित्रात किंवा कादंबरीतसुद्धा फारसा महत्त्व दिले गेले नसते असा 'फाळके खेळणी' विकणार्या मुलाचा अर्ध्या मिनिटाचा प्रसंग.) आणि चक्काचक ऑइल पेंट वाली चाळ पाहून तर आपल्याकडे सोन्याचा धूर वगैरे निघत होता तो मध्ययुगात नव्हे तर कलियुगापर्यंत होता की काय अशी शंका आली. कर्जबाजारीपणा दाखवण्यासाठी लोटा गहाण टाकायला नेणे वगैरे पाहून कणेकरांच्या फिल्लमबाजीची ( घागर इकॉनॉमी आणि चकाचक अॅल्युमिनियमच्या रिकाम्या भांड्यांचा आवाज करून अन्न संपल्याचे सांगणारी बिच्चारी गरीब आई) आठवण झाली.
असो. चिंतूशेटचा धागा काश्मीरला नेला तर ते रागवतील म्हणून चूप बसतो.
16 May 2011 - 10:59 am | ईश आपटे
ऊगीच २४*७ उग्र चेहरा करुन व अधुन मधुन रडके प्रसंग घालून चांगला व्यक्तिपट उभा राहतो काय?
आपण फाईंडींग नेव्हरलँड पाहिला असेल , किंवा अगदी लेटेस्ट म्हणजे ' सोशल नेटवर्क', व्यक्ति किती ही महान असली तरी, ती ही जगण्यातल्या विनोदी प्रसंगात हसू शकते , प्रसंगी विनोद निर्माण करु शकते हे आपल्या लोकांना एवढे विचित्र का वाटते?
ध्येय वादी मनुष्याने बाई-बाटली पासुन दूर असले पाहिजे ह्या समजातुन हे होत असावे. पुलंनी म्हंटल्याप्रमाणे, विनोदी लेखक काही नेहमी विनोद करीत नाही , तसा गंभीर लेखन वा अभिनय करणारा नेहमी गंभीर चेहरा करुन हिंडत नाही...
16 May 2011 - 10:24 am | छोटा डॉन
जंतुचे परिक्षण गंमतशीर आणि अलमोस्ट पटणारे आहे असे सांगतो.
बरे झाले मी अजुन पिक्चर पाहिला नाही, पाहताना गंमत वाटेल ह्याची गॅरेंटी आहे ;)
बाकी अजुन एक गंमत अशी की इतिहासावर किंवा ऐतिहासिक/सामाजिक व्यक्ती किंवा कलाकारांवर बेतलेले आजकालचे सिनेमे हे केवळ 'गंमतशीर' असतात असे आमचे अनुभवांती मत झाले आहे.
ह्यात इन जनरल नैतिकतेला काडी लाऊन 'जे खपते तेच पिकते' ह्या तत्वाने हे बनवले असतात असे वाटते, अर्थात त्यात चुक असे नाही पण उगाच आम्हाला अंमळ गंमत वाटते ;)
=)) =)) =))
जंतूशेठ, एवढीही काढायची नसते हो.
असो, लेख गंमतशीर, सिनेमा जरुर पाहु असे सांगतो :)
- छोटा डॉन
16 May 2011 - 10:42 am | मृत्युन्जय
एखाद्या चरित्रकोशात सहज सापडतील असे त्यांच्या आयुष्यातले ठळक प्रसंग एखाद्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधल्या बुलेट पॉईंटसारखे टाकत गेलं की पटकथा झाली असं पटकथालेखकाचं मत आहे का
हे एकदम पटले. म्हणजे बर्याच वेळा चित्रपट आपल्याला समजुन घ्यावा लागतो. त्याला ना नाही. एखाद्या कलाकृतीची गरज असते ती. पण इथे हे सगळे प्रसंग रिकाम्या जागा भरा सारखे झाले आहेत. ओळी किहुन दिल्या आहेत तुम्ही फक्त शब्द भरायचे. याहुन जास्त काही करायला परवानगी नाही. बर चित्रपट खुप मोठा होत होता म्हणुन ही काटछाट केली असेल तर तसेही नाही.
गंधर्वांच्या जीवनातले बरेच प्रसंग गाळले आहेत. चित्रपट करुणतेकडुन उद्विग्नतेकडे वाटचाल करत राहतो. तो एवढा गंभीर करायचा काहीच गरज नव्हती. बालगंधर्व सरदार मुझुमदारांच्या वाड्यावर जाउन स्त्रीवेषात हळदीकुंकु घेउन आले होते हे आणि असेच अजुन काही प्रसंग टाकुन चित्रपट जरा हलकाफुलका बनु शकला असता.
बालगंधर्व कुठल्याही प्रकारे चित्रपट वाटत नाही. तो एक निबंध वाटत जातो. परिच्छेदामागुन परिच्छेद येतात. गतिमानतेमुळे प्रेक्षक अडकुन पडतात. बोर होत नाही एवढेच.
असो. चित्रपट वाईट नाही. फक्त ओव्हरहाइप्ड आहे. एकदा बघायला काहीच हरकत नसावी. इतका जास्त उदोउदो झाला नसता तर कदाचित छिद्रान्वेषी चिरफाडही झाली नसती. एकदा बघायला हरकत नाही पण नाही बघितला तर हातुन फारसे काही निसटणारही नाही
16 May 2011 - 12:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
परिच्छेदामागून परिच्छेद येत असल्यामुळे मी तरी कंटाळले. नदीकाठी (का ते भंडारदरा धरण आहे?) उभं राहून दंगून गाणं म्हणत जाताना "पाण्यात उडी मारली तर बरं!" असा विचार राहून राहून माझ्या मनात येत होता.
अवांतरः ही गाणी मी माझ्या घरात, मला हव्या तेवढ्या आवाजात ऐकायला माझी ना नाही.
तिथेच पाण्याचा रंग एवढा निळा का? महाराष्ट्रात एवढी स्वच्छ हवा कधी दिसते का? वगैरे प्रश्न मी ऑप्शनला टाकले होते.
सहमत.
16 May 2011 - 7:19 pm | मृत्युन्जय
परिच्छेदामागून परिच्छेद येत असल्यामुळे मी तरी कंटाळले
परिच्छेदामागुन परिच्छेद येत आहेत असे जे वाटले ते मला पण खटकलेच. पण एरवी चित्रपटाच्या गतिमानतेमुळे ते खुप जास्त अंगावर आले नाही असेच मलादेखील म्हणायचे होते.
17 May 2011 - 11:25 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>तिथेच पाण्याचा रंग एवढा निळा का? महाराष्ट्रात एवढी स्वच्छ हवा कधी दिसते का? वगैरे प्रश्न मी ऑप्शनला टाकले होते.
काही कळले नाही. तीसच्या दशकात महाराष्ट्रात स्वच्छ हवा नसायची ?? त्याकाळी पाणी निळे दिसत नसे ??
16 May 2011 - 10:42 am | विसोबा खेचर
नो कॉमेन्टस्..!
धन्यवाद,
(नारायणराव बलगंधर्वांचा भक्त) तात्या.
--
बालगंधर्वांच्या प्रत्येक तानेगणिक एक, असे वडिलांच्या हातचे फटके रावसाहेबांनी का खाल्ले हे केवळ जमाखर्चाच्या वह्या वाचता येणार्या लोकांना नाही कळणार..! - (रावसाहेब - पु ल देशपांडे)
17 May 2011 - 12:23 am | वाटाड्या...
आता मात्र हद्द झाली....
अजुनपर्यंत गप्प राहुन मी सुद्धा बालगंधर्वांच्या 'चित्रपटा' विषयीच्या असलेल्या मतांविषयी केवळ वाचनमात्र होतो. कारण चित्रपट कसा असावा ह्याविषयी प्रत्येकाची आपापली मतं आहेत आणि ती आपापल्या जागेवर बरोबरही असतीलही.
पण मिपाकर मित्रहो...खाली थत्तेचाचा म्हण्तात त्याला अनुमोदन देऊन....बालगंधर्वांसारख्या उच्चतम गायकी असलेल्या गायक-नटाबद्दल आपल्या कोणाच्या लिहिण्या-वाचण्यातुन उपमर्दपर शब्द जाऊ नयेत अशी मी व्यक्तिशः कळकळीची विनंती करत आहे. ही आपली थोर परंपरा (लिगसी) आहे आणि त्याचा कमीतकमी अपमान होईल असे तरी वागु लिहु नये असं मला वाटतं.
@ मित्र ईश आपटे: बालगंधर्वांविषयी आपली मतं कळाली, तेव्हा जरा आपणही गायनाच्या, अभिनयाच्या क्षेत्रात आपले काय योगदान आहे ते कळवावे. याशिवाय आपण आतापर्यंत किती लोकांचे संसार उभे केले आहेत? किती लोकांना निखळ आनंद दिला आहे ते ही कळवावे. आपल्या गायनाच्या, अभिनयाच्या किती सीडीज निघाल्यात आणि किती लोक त्या मिळाल्या नाहीत म्हणुन रस्ते, दुकानं आणि शहरं पालथी घालत आहेत तेही जाता सांगावे. क्रॉस ड्रेसींग करणारा आमचा हा बालगंधर्व बुवा काय काय करत होता ते आम्ही आपल्याला त्यानंतर सांगुच. अन्यथा सर्शत मिपावर कोणाची नाहीतर आमच्या बुवांची माफी मागावी. अन्यथा आपण सार्वजनीक मिपाठिकाणी बालगंधर्वांचा अपमान करुन मिपाची इज्जत घालवत आहात हे लक्षात ठेवावे.
16 May 2011 - 11:39 am | Nile
निरीक्षणं वाचली, सिनेमा पाहिल्या शिवाय त्यात किती खटकणारं आहे आणि किती सोडून देण्यासारखं हे सांगता येणं अवघड आहे. चिंतातूर जंतू नेहमीच चांगली परिक्षणं लिहतात त्या मुळे सिनेमा पाहताना काही गोष्टी "बघायच्या" (आणि का बघायच्या) याबद्दल मला मार्गदर्शन होते हे खरे आहे.
बालगंधर्वांवर सिनेमा काढायचा म्हणजे अवघड काम असावे. त्यासाठी पूष्कळ संशोधनाची गरज पडावी. पण सिनेमाचे ट्रेलर पाहताना मात्र कुतूहल निर्माण झाले होते हे कबूल करतो.
16 May 2011 - 1:25 pm | श्रावण मोडक
"खिशाला फार तोशीस मात्र पडू देऊ नका असा आमचा एक पुणेरी सल्ला" हा तुमच्या शंकांशेवटी येणारा सल्ला स्वतंत्र परिच्छेदात टाका राव. लक्षवेधक आहे. हितावहही असावा.
बाकी, एकूण या चित्रपटाचे जे ऐकू येतंय ते पाहता, दुकान बरं (चाललं) आहे, आतला माल दर्जेदार असेलच असे नाही, एवढेच म्हणता येते सध्या.
चित्रपट पाहिलेला नाही.
16 May 2011 - 3:06 pm | नितिन थत्ते
>>बाकी, एकूण या चित्रपटाचे जे ऐकू येतंय ते पाहता, दुकान बरं (चाललं) आहे, आतला माल दर्जेदार असेलच असे नाही, एवढेच म्हणता येते सध्या.
माल (पक्षी-मराठी चित्रपट) जितपत दर्जेदार असण्याची सवय आहे त्यापेक्षा दर्जेदार आहे.
बाकी चित्रपटाच्या निमित्ताने बालगंधर्वांचं परीक्षण होत आहे ते अनावश्यक वाटते आहे.
चरित्रकोषात आढळणारेच प्रसंग दाखवण्यासंबंधी : प्रेक्षकांना प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्रातले प्रसंग सहसा माहितीच असतात त्यामुळे तेच चित्रपटात येणार. आणि ते आले नाहीत तर प्रेक्षकांना चालणार नाही असे वाटते. उदाहरणार्थ : शिवाजी महाराजां*च्या चरित्रात कोंडाण्याच्या लढाईचा प्रसंग नाही दाखवला तर चालण्यासारखे आहे. त्याऐवजी त्यांच्या साल्हेर-मुल्हेरच्या स्वार्या किंवा दक्षिणेची मोहीम दाखवता येऊ शकतील. पण कोंडाण्याचा प्रसंग दाखवला नाही तर प्रेक्षक ते मुळीच चालवणार नाहीत (असे वाटते). गड आला पण सिंह गेला हा डायलॉग सिनेमात हवाच.
*येथे गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस छत्रपती श्री शिवाजी महाराज असे वाचावे.
16 May 2011 - 9:23 pm | ईश आपटे
बाकी चित्रपटाच्या निमित्ताने बालगंधर्वांचं परीक्षण होत आहे ते अनावश्यक वाटते आहे.
का बर??? इथे अंधविश्वास, बाबा वाक्य , होली काऊ हा दृष्टिकोन आपल्या सारख्या वयस्कर पुरोगाम्याने घ्यावा ह्याच आश्चर्य वाटत.
19 May 2011 - 4:26 am | अन्या दातार
चित्रपटाचे चालू आहे. बालगंधर्वांचे नाही. पक्षी अंधविश्वास, बाबा वाक्य , होली काऊ याचा इथे काडीमात्र संबंध नाही. उगा भलते वळण देउ नका. हे इतिहासाचे पुस्तक नाही.
16 May 2011 - 4:06 pm | चिंतातुर जंतू
असहमत. चरित्रकोशातली माहिती अशा प्रकारची (परिपूर्ण) असावी लागते, कारण अशी परिपूर्णता ही कोशवाङ्मयाची गरज असते. पण चांगला चरित्रपट (बायो-पिक) करण्यासाठी पटकथालेखक आणि दिग्दर्शक यांना आपली चाळणी लावायचं स्वातंत्र्य असतं किंबहुना ती लावावी लागतेच. तो परवाना कलाकृतीच्या निर्मात्याला निश्चित असतो आणि असावा. याची लोकप्रिय उदाहरणं आपल्याकडेही आढळतात. उदा: शिवाजीविषयीचा एक चित्रपट त्याचं फक्त बालपण दाखवून त्याद्वारे शिवाजीत थोर होण्याची बीजं कशी होती ते दाखवू शकतो, तर दुसरा चित्रपट स्वराज्य स्थापनेपर्यंतचा प्रवास दाखवून शिवाजीचे गुण विशद करू शकतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत शिवाजीचा प्रवास दाखवायलाच हवा असा आग्रह असण्याची गरज नाही आणि असा सगळा प्रवास दाखवला आहे अथवा नाही यावरूनच फक्त चित्रपटाचा दर्जा जोखू नये.
त्यापलीकडे जाऊन असंही म्हणता येईल की सुपरिचित गोष्टीच दाखवायच्या तर त्यात पटकथालेखकाला फार कष्ट उपसावे लागत नाहीत. याउलट अनेकांना अपरिचित असणारे काही प्रसंग दाखवून त्याद्वारे अनेकांना अपरिचित असणारे गुणविशेष अथवा काही वेगळी बाजू दाखवायची तर त्यासाठी अधिक अभ्यास करावा लागतो. 'बालगंधर्व' चित्रपटाच्या पटकथालेखकानं असा काही विशेष अभ्यास केला आहे असं चित्रपट पाहून वाटत नाही. ज्याच्याविषयी इतकी मिथकं आणि आख्यायिका चवीचवीनं मराठी माणसांत सांगितल्या जातात अशा माणसाची (निर्माता-दिग्दर्शक यांनाच अभिप्रेत असलेली) थोरवी दृग्गोचर होण्यासाठी असा अभ्यास गरजेचा होता असं मात्र वाटतं. नाहीतर निव्वळ 'आपल्याला प्रिय/आदरणीय व्यक्तीविषयी गौरवात्मक चित्रपट बनवला तर मग तो चांगलाच असणार' अशी, म्हणजे 'दारिद्र्यातच सुख आहे' वगैरे छापाची अल्पसंतुष्ट वृत्ती बाळगून आपण आपल्याच संस्कृतीला कद्रू करतो असं वाटतं.
16 May 2011 - 4:24 pm | प्रमोद्_पुणे
मेहेनत घेतली नाही हे खरे आहे. अभिजीत केळ्कर प्रत्येक ठिकाणी रडकाच दाखविला आहे. पण सुबोध भावेचे काम खरोखर आवडले. केवळ त्यासाठी एकदा बघायला हरकत नसावी.
16 May 2011 - 4:45 pm | भारीबंडू
जळकुटी प्रतिक्रिया आहे
16 May 2011 - 4:46 pm | प्रसन्न केसकर
अॅटिट्युड या समिक्षक आणि समिक्षांच्या अंगभुत ठरत चाललेल्या दोषांपासुन कलाक्षेत्राची थोडी मुक्तता व्हायलाच हवी राव. हे अतिशहाणे लोक उग्गीचच सिल्कचे कुर्ते घालुन अन हातात गजरे बांधुन `यु नो! आय सी' ची उधळण करत अन शॉ, शेक्सपिअरचे आचके देत देशी भाषेतली नाटक पहाणार अन पॉप्युलर त्या सगळ्या गोष्टींना उगीच आंबट तोंडानं नाकं मुरडणार अन वर परत इतर सगळ्या गोष्टी कश्या हिणकस तेच घोकणार.
चरित्रपटात नायकाच्या आयुष्यातले ठळक प्रसंग एखाद्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधल्या बुलेट पॉईंटसारखे येणार नाहीत तर काय मग त्या प्रसंगांवर आधारित कपोलकल्पित फॅन्टसीज येणार? अन बालगंधर्वांवरच्या चित्रपटात एकामागून एका प्रसंगात त्यांना गाताना दाखवलं नाही, त्यांची व्यवहारी जगाविषयीची निरागसता दाखवली नाही तर त्या चित्रपटाची फॅक्च्युअॅलिटी कितपत राहिल?
गंधर्वांच्या नाटकांना आलेली आणि पहिल्या रांगांत बसलेली प्रेक्षकमंडळी ठेवणीतले कपडे-दागिने घालून, बग्ग्यांमधून वगैरे येणारी, गंधर्वांच्या उच्चभ्रू, लब्धप्रतिष्ठित चाहत्यांपैकीच असावीत हा आग्रह तरी कश्यासाठी असावा बुवा? गंधर्व काय फक्त उच्चभ्रु लब्धप्रतिष्ठितांचीच मक्तेदारी होते? अन त्याकाळी किती उच्चभ्रु, लब्धप्रतिष्ठित नाटकाला जायला ठेवणीतले कपडे-दागिने घालायचे हे तरी कुणी पाहिलय? की कुणीतरी काहीतरी आवडलं म्हणलं म्हणुन उगीचच त्याला नावं ठेवायची?
16 May 2011 - 6:28 pm | भवानी तीर्थंकर
पहिले वाक्य हे अगदी सर्वसाधारण विधान आहे. मी त्याच्याशी सहमत आहे. पण त्यापुढे जि लिहिले आहे ती वाक्ये म्हणजे वरच्या लेखनासंदर्भातील ओपिनियन्स आहेत का? तसे असेल तर मात्र प्रश्न उभे राहतात. अशा लोकांनी शंका व्यक्त केल्या तर त्या चुकीच्या ठरतात? मूळ शंका ज्याविषयी आहे त्या फॅक्ट्स तर कायम रहात असतीलच की. फॅक्ट्सच तशा नसतील तर, फॅक्ट्स तशा नाहीत, असे म्हणत या शंकाच आर्बिट्ररी ठरवता येतात. त्या तशा खोडण्याऐवजी सिल्कचे कुर्ते, हातात गजरे वगैरे लिहणे म्हणजे कात्रजचा घाट करणे होय.
(प्रश्न - चिंतातूर जंतू यांनी फॅक्ट्स म्हणून जे मुद्दे मांडले आहेत, ते वास्तवात चित्रपटात आहेत की नाही?
माझे मत - ते मुद्दे चित्रपटात नसतील तर केसकर यांचे म्हणणे लागू. पण जर असतील तर केसकर यांनी मांडलेले सिल्कचा कुर्ता वगैरे बाबी म्हणजे कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न आहे.)
तुमच्या या लेखनातून मुद्दा निसटतो आहे. पीपीटीच्या स्वरुपातच चरित्र येणार असे तुम्हाला म्हणायचे आहे का? कारण कपोलकल्पित फँटसी हा मुद्दाच नाहीये. त्या येताच कामा नयेत. पण चरित्र असेल तर ते मात्र प्रवाही असणे केव्हाही श्रेयस्करच.
छत्रपती शिवरायांचा दाखला वर आला आहे. त्यानुसार बोलायचे झाले तर अशा महान माणसांविषयीचे कथन एका चित्रपटात जेव्हा शक्य नसते तेव्हा त्याचे तुकडे करून ती बायोग्राफिक कलाकृती परिपूर्ण करणे हाच मार्ग असतो. तो न चोखाळता काही घडले असेल तर त्याविषयी शंका येणारच. बालगंधर्व या पिक्चरबाबत स्टोरीवरून तरी असं दिसतंय की सारे संपूर्ण बालगंधर्व एकातच सामावण्याचा प्रयत्न केला गेला असावा. तसे असेल तर ते तुकड्यांचेच दर्शन होईल. मग त्याला पीपीटी म्हटले तर त्यात वावगे काय?
(प्रश्न - पीपीटीच्या स्वरूपात मुद्दे मांडणे म्हणजे चरित्र (तेही चित्रपट, नाटक यासारख्या दृकश्राव्य माध्यमासाठीचे) असते का?)
याबाबत इतिहास तपासण्याची गरज असावी.
(प्रश्न - इतिहास काय सांगतोय?)
एक शंका: 'उच्चभ्रू' हे लेबल आहे का? :)
18 May 2011 - 2:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"होलिअर दॅन काऊ..." का "होलियर दॅन दाऊ"?
फ्राऊ अदिती
18 May 2011 - 2:45 pm | मुक्तसुनीत
होली काऊ !
- मुसुम्याऊ.
18 May 2011 - 3:33 pm | श्रावण मोडक
च्यामारी नेमकं काय घ्यावं हेच कळेना झालंय.
काऊ - इंग्रजीतली?, गाय - आपली आखुडशिंगी, बहुदुधी किंवा गोमाता?, किंवा सावरकर म्हणतात तशी उपयुक्त पशू?
बाकी काही असो, आम्ही आम्ही बैल आहोत हे कळलंय, ते कोणीही वेगळं सांगायचा प्रयत्न करू नये.
19 May 2011 - 4:39 am | बिपिन कार्यकर्ते
रेड्याला काळजी गायीची!
19 May 2011 - 5:04 pm | श्रावण मोडक
ओsssss आम्ही वर बरंच काही लिहिलं आहे. उगा नाही त्या श्रेणीत ढकलायचं काम नाही. ;)
16 May 2011 - 5:31 pm | सामान्य वाचक
एक प्रश्न- बालगंधर्वांचा आजच्या काळात सिग्निफिगन्स काय ?? हे मला अजून ही स्पष्ट झालेले नाही
क्रोस ड्रेसिंग करणारा एक गाणे म्हणणारा नट ज्याविषयी तत्कालीन पुरुष ओब्सेस्ड होते ह्याचे एवढे महत्व का ?
तसे तर तुमचे माझेही या जगात महत्व नाही.
या उपर सगळे 'काल' चे सन्दर्भ आज इन्सिग्निफिचन्ट्च आहेत.
आपल्यामते टुकार असणारे विषय हे काही जणान्चे श्रद्धा स्थान असू शकते , याचे भान ठेवावे.
आपल्याला न आवडणार्या ( का न कळणार्या?) विषयावर टीका करताना किमान पातळी सोडू नये, असे मला वाटले.
16 May 2011 - 7:06 pm | चिंतातुर जंतू
प्रसन्न केसकरांच्या इतर मुद्द्यांना वर प्रतिसाद आलेलाच आहे. एका मुद्द्याबद्दल स्पष्टीकरण देतो:
माझ्या परिसरातल्या अशा आर्थिक स्तरांतल्या लोकांकडून आणि आप्त-स्वकीयांकडून गंधर्वांविषयीचे असे किस्से मी ऐकले आहेत. इतरांना याहून वेगळी माहिती असली तर (म्हणजे पुढच्या रांगा सिनेमातल्या पिटाप्रमाणे सर्वात स्वस्त असत, किंवा उच्च आर्थिक वर्गातले लोक गंधर्वांना नाकं मुरडत, वगैरे) जरूर सांगावी. त्यांचं स्वागतच आहे, पण माझ्या मते अजूनही मराठी माणसं राहुल देशपांडेचं 'कट्यार..' वगैरे पाहायला अशीच नटूनथटून जातात.
16 May 2011 - 8:16 pm | प्रसन्न केसकर
१) गंधर्व कुणाची मक्तेदारी नव्हते पण लब्धप्रतिष्ठितांत ते चांगलेच लोकप्रिय होते.
मान्य
२)सर्वाधिक किमतीची तिकिटं काढण्यात लब्धप्रतिष्ठित इतरांहून पुढे होते.
मान्य
३) आजच्यासारखेच त्या काळातही पहिल्या रांगांत सर्वाधिक किमतीची तिकिटं काढून आलेले प्रेक्षक बसत.
मान्य
४) नटूनथटून गंधर्वांच्या नाटकाला जाणं हा एक उत्सवी सांस्कृतिक प्रकार होता.
हे देखील मान्य
आणि त्यावर काही शंकादेखीलः
१) तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीचा प्रभाव तत्कालिन लोकांच्या लिंगभेदानुसार वेशभुषेमध्ये दिसत असे काय? पुरुषांनी नटणे सवरणे अयोग्य समजले जात असे काय?
२) थिएटरमधील बैठक व्यवस्थेमधे देखील तसा काही फरक दिसे काय?
३) तेव्हा प्रतिष्ठित कुटुंबांमधे पडदा पद्धती प्रचलित होती काय? थिएटरमधे बायका व पुरुष यांच्यासाठी वेगळे विभाग असत काय?
बालगंधर्वांच्या काळातील लोकांनी त्या काळच्या परिमाणांमधे नटुन थटुन नाटकाला जाणे आणि आजच्या काळातील लोकांनी राहुल देशपांडेंच्या कट्यार... ला नटुन थटुन जाणे यात तुलना करणे हे अज्ञान किंवा बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीकडे जाणुन बुजुन केलेली डोळेझाक नसावी याबाबत मला स्वतःला तुमच्याबाबत खात्री आहे.
बाकी अन्य मुद्यांबाबत तुम्ही प्रसन्न केसकरांच्या इतर मुद्द्यांना वर प्रतिसाद आलेलाच आहे असे उत्तर दिलेले आहे. त्यावर या दोन्ही मीडीयांशी जवळुन संबंध येत असलेली व्यक्ती म्हणुन एकच म्हणु शकतो की पीपीटी आणि सिनेमा याबाबत माध्यमे म्हणुन मुळात असलेला परस्परसंबंध समजुन घेतला तरच मी मांडलेल्या त्या मुद्याबाबत चर्चा होऊ शकते. आणि ज्यांना हा परस्परसंबंधच मुळात माहिती नाही त्यांनी सिनेमा किंवा पीपीटी या विषयावर उगीचच तज्ञ असल्याप्रमाणे चर्चा करु नये हे उत्तम.
16 May 2011 - 9:37 pm | भवानी तीर्थंकर
आधी आवश्यक खुलासा: मी सर्वज्ञ नाही.
तुम्ही मांडलेल्या मुद्यांवर माझाच प्रतिसाद आहे आणि त्याचा उल्लेख चिंतातूर जंतू यांनी केला आहे, असे गृहीत धरून हे लिहिते आहे.
तो संबंध समजून घ्यायचा आहे. म्हणूनच तर मी प्रश्न उपस्थित केले. पीपीटी आणि सिनेमा यातील हा "परस्परसंबंध" खरंच मांडा.
मी प्रश्न विचारते आहे. तरीही मी तज्ज्ञतेचा दावा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केल्याचा संशय तुम्ही माझ्यावर का घेताहात? हे उगाचच 'लुक हू इज टॉकिंग' प्रकारातले दिसते आहे. बहुदा, प्रश्न विचारणेच चूक असावे? प्रश्न विचारताना मी माझी मतेही मांडली आहेत. ती चुकीची असू शकतात. पण ती चूक तरी ठरवली पाहिजेत. ते न करता फक्त माझ्यावर संशय व्यक्त करण्याचे कारण कळले नाही.
बाकी वादंग नकोत म्हणून येथे माझे प्रश्न पुन्हा मांडते.
१. चिंतातूर जंतू यांनी फॅक्ट्स म्हणून जे मुद्दे मांडले आहेत, ते वास्तवात चित्रपटात आहेत की नाही?
माझे मत - ते मुद्दे चित्रपटात नसतील तर केसकर यांचे म्हणणे लागू. पण जर असतील तर केसकर यांनी मांडलेले सिल्कचा कुर्ता वगैरे बाबी म्हणजे कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न आहे.
२. पीपीटीच्या स्वरूपात मुद्दे मांडणे म्हणजे चरित्र (तेही चित्रपट, नाटक यासारख्या दृकश्राव्य माध्यमासाठीचे) असते का?
३. इतिहास काय सांगतोय?
(हा तिसरा प्रश्न बालगंधर्वांच्या नाटकाला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या संबंधात आहे आणि त्याविषयी वर चिंतातूर जंतू यांनी मांडलेल्या काही मुद्यांवर तुम्ही 'मान्य' असे म्हटल्याने माझ्यापुरता हा प्रश्न निकालात निघतो आहे.)
अकारण व्यक्तीगत टिप्पणी होणार असेल तर मात्र माझा हा या मुद्यावरचा अंतिम प्रतिसाद आहे.
16 May 2011 - 7:40 pm | सुहास..
चिंतातुर जंतु जी !! आपले लिखाण नेहमीच आवडत आले आहे , यावेळी हे लिखाण ' जाणुन-बुजुन खोडी काढणारे आहे ' असे मला वाटते. आधी " बाल गंधर्व " वर चांगले दोन लेख आले होते. तिथे आपण लिहिले नाहीत. शिवाय वर आलेले काही प्रतिसाद " धागा मॅनेजमेंट सिस्टिम' च्या चालीवर आधी " जी-मेल /टॉक/व्यनी-मनी " तुन डिस्कस झाले असावेत अशी ही एक शंका मनात आली आहे. अर्थात. 'तिकडच्या' बाजारात जाणार्याच्या खांद्यावर बंदुक ठेवुन फुसके बार उडवणार्यां कडुन दुसरी अपेक्षा नाही.
चिंतातुरजंतुचा लेख आणि माझे शंकेखोर मन !!
लेखक फर्म आहे हे गृहीत धरायचे का ? बर लेखन एकाच पातळीवर(ते ही वर-वर) का बरे ? समीक्षण म्हणुन केवळ निगेटिव्ह शेड ? चित्रपटाच्या सुरवातीला आले ल्या डिसक्लेमर कडे लेखकाचे लक्ष का गेले नाही ? मुळात चित्रपट हा एकुण बालगंधर्वाच्या व्यक्तीरेखेवर आहे की व्यक्तीला आलेले अनुभव/किस्से किमान पक्षी पटकथेच्या आधारे दर्शवायचे आहेत ?
फॅक्टस बद्दल म्हणायला गेले तर मी (लेखकाच माहीत नाही ) बालगंधर्वासमोर उभा नव्हतो, ? मग जर मला कोणीतरी त्या व्यक्तीरेखेविषयी काहीतरी सांगते आहे मग ते चित्रपटातुन असेल किंवा मिपाच्या धाग्यारुपी असेल ते मी का ऐकावे ? आपल्याला नावडले आहे म्हणुन ' शब्दांचा खेळ ' माडंत या वेगळ्या लेखाचे मुळात प्रयोजनच समजले नाही ? नंटरंगाविषयी आपण आधी केलेली टिप्पणी आवडली होती, पण नटरंग ही बालगंधर्वा सारखी ऐतिहासिक व्यक्ती आहे का ? ज्या काळात मिशा हे पुरुषी पणाच लक्षण मानल्या जात असे/नसे त्या काळात आपण जाउन आलात का ? " बांग " हा शब्द-प्रयोग इथे वापरण्याचे प्रयोजन काय ? कराचीचा सिन देण्याकरिता आपण दिग्दर्शक असतात तर काय दाखविले असते ? काही उर्दु डॉयलॉग चालले असते असे लेखकाचे म्हणणे आहे काय ? काही तांत्रिक बांबीमुळे एकुण चित्रपटच बंडल आहे असे म्हणुन लोकांना पुणेरी सल्ले देणार्या लेखकाने कथा/पट़कथा/संवाद लिहीले आहेत का ? की ही लेखन -उठाठेव केवळ विद्वत्ता-प्रदर्शन आहे ?आपल्या शंकेखोर लेखी बघण्याजोगा एखाद्या चित्रपटाचे नाव सांगाल काय ?
असो ..
टिका असावी पण किमान विधायक असावी असे वाटल्याने ही प्रतिसाद-प्रपंच . ह. घ्या.
अवांतर : बाकी काही मंडळी "कपडे बदलुन " प्रतिसाद देत असल्याचे पाहुन अंमळ मौज वाटली. (हे हलकेच घ्या, नका घेवु, फरक पडत नाही )
16 May 2011 - 11:34 pm | चिंतातुर जंतू
म्हणजे काय ते कळलं नाही. मी माझ्या विधानांची जबाबदारी घेत आहे का असं म्हणायचं आहे का? माझ्या वर्तनावरून ते ठरवण्याचा हक्क प्रत्येक वाचकाला आहे.
बालगंधर्वांचं संगीत आणि सिनेमात वाजणारं पार्श्वसंगीत यांच्यातला फरक बालगंधर्वांच्या चाहत्याला खुपत का नाही, असं विचारणं वरवरचंच आहे का? असेल बुवा. इतर लोक भारून गेले तसं आम्हाला काही झालं नाही बुवा. चित्रपटाची पातळी वरवरचीच आहे असं वाटलं. ते तसं का वाटलं याची पुरेशी उदाहरणं लेखात आहेत.
स्तुती करणारे पुष्कळ आहेत आणि ज्यांना करावीशी वाटते ते ती करतच आहेत. विशेष गौरव करावा असा हा चित्रपट मला वाटला नाही. त्यामुळे स्तुतीची जबाबदारी मी घेत नाही.
मुद्दा कळला नाही. माझ्या मते हा चरित्रपट (बायो-पिक) आहे. ज्यांना तो तसा वाटत नाही त्यांना आपलं मत मांडायला मोकळीक आहेच.
मुद्दा कळला नाही. मिपावरचा कोणताही धागा किंवा एकंदरीत आंतरजालावरचं कोणतंही लेखन किंवा एकंदरीतच कोणतंही लेखन कुणी का वाचावं?
मुद्दा कळला नाही. माझ्या मते वेगळा लेख बरा की मेगाबायटी प्रतिसाद बरा यात शिरण्यापेक्षा लेखातल्या मुद्द्यांविषयीची चर्चा अधिक विधायक होईल.
धन्यवाद पण मुद्दा कळला नाही. माझ्या लेखी दोन्ही चित्रपट आहेत, आणि मी ते दोन्ही पाहिले म्हणून मला जे लिहावंसं वाटलं ते लिहिलं. त्यात चित्रपटात ऐतिहासिक/अनैतिहासिक व्यक्ती असण्या/नसण्याचा संबंध काय ते कळलं नाही.
मी वर म्हटल्याप्रमाणे केशवराव भोसले यांच्या फोटोंत दिसणारा मर्दानी रुबाब पाहता त्यांच्याविषयी बालगंधर्वांनी असे उद्गार काढलेले असणं यात ऐतिहासिक तथ्य असू शकेल असं वाटतं, पण चित्रपटातल्या राहुल देशपांडेला ते शोभत नाहीत; किंबहुना मला ते फार विनोदी वाटलं.
माझ्या मते सिनेमातल्या त्या दोन प्रसंगांत जे ऐकू येतं त्याला बांग म्हणतात, म्हणून बांग हा शब्द वापरला. इतर चित्रपटभर फक्त मोटारी, बैलगाड्या, मुलं खेळतानाचे वगैरे आवाज येतात. फक्त जे दोन प्रसंग कराचीत घडतात त्यात असा आवाज दाखवणं विनोदी वाटलं. काही आवाज आला नसता तरी फरक पडला नसता. (या चित्रपटातल्या अनेक प्रसंगांत येणार्या न येणार्या पार्श्व-आवाजांमुळे काही फरक पडत नाही.)
जेवण अळणी/खारट झालं आहे असं म्हणण्यासाठी स्वतः सुगरण असणं गरजेचं आहे का? बाकी कुणाच्या लिखाणाला कुणी विद्वत्ता-प्रदर्शन मानावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसा दावा मी केलेला नाही, तद्वत त्याचं समर्थन किंवा खंडन करण्याची जबाबदारी माझी नाही.
जाताजाता: पुणेरी सल्ले देण्यासाठी स्वतःला कशातलं काही कळण्याची गरज असते का? अगदी एखाद्या अमृततुल्य चहाच्या दुकानातही तावातावाने चालणार्या राजकीय चर्चांमध्ये पंतप्रधानांपासून ओबामांपर्यंत अनेकांना सल्ले देणार्या कुणीही साधं गल्लीतल्या गणेश मंडळाचं अध्यक्षपद तरी कधी भूषवलं असेल का, यविषयी शंका आहे. असो. कृहघ्याहेवेसांनल.
17 May 2011 - 2:03 am | मुक्तसुनीत
रंजन आणि कला यांचा समतोल नावाचा प्रकार असतो का ? की एकावेळी एकाच गोष्टीची निवड करता येते ? गंधर्वगाथा हा वास्तववादी चरित्रपट आहे की "साजरा" करण्याचा उत्सव आहे ? चित्रपटामधले भव्य सेट्स आणि महागडी वस्त्रेप्रावरणे या सार्यांचा वापर रिटर्न ऑफ इन्व्हेस्ट्मेंट्वर डोळा ठेवून केलेला आहे की गंधर्वयुगीन भव्यतेचे यथायोग्य चित्रण करण्याकरता ? कथा/पटकथा/संवाद या सार्यांचं महत्व मूलस्वरूपी असायला हवं की सेट्स-गाणी-वस्त्रे-प्रावरणे-नृत्ये या सार्यांना एकत्र आणायचे निमित्त हवे म्हणून एक निमित्तमात्र असे त्यांचे अस्तित्त्व असते ? या चित्रपटाचा उद्देश बालगंधर्व या माणसाची कला नि कर्तबगारी दाखवणे आहे , की त्याच्यानिमित्ताने काळाचा पट उलगडून दाखवणे आहे ? की बालगंधर्व नावाच्या देवाला त्याच्या यथायोग्य मखरात बसवण्याचे परमकर्तव्य पार पाडायचे आहे ? बालगंधर्व हे महान होते आणि आता कालानुरूप त्यांचा विसर पडला आहे , की , बालगंधर्वांची स्मृती महाराष्ट्राच्या मनामनातून कधीच पुसली जाणार नाही ? (यापैकी कुठला क्लिशे ग्राह्य मानायचा ?) प्रस्तुत चित्रपटाच्या संकल्पनेमधे आणि त्या संकल्पनेच्या सादरीकरणामधे "आपल्याला घासून घासून गुळगुळीत झालेले क्लिशेज टाळायचेत, आपल्याला 'जाणता राजा' ची पडद्यावरची आवृत्ती सादर करायची नाही" अशा प्रकारच्या विचाराचा मागमूस जाणवतो का ? दुसरीकडे , भव्यसेट्स आणि वस्त्रेप्रावरणे यांनी युक्त अशी कृती बनवायची नसेल तर या मेगाप्लेक्स च्या जमान्यात पैशाचं गणित कसं बसवणार ? सिनेमाच्या पैशाचं गणित बसवता येत नसेल तर त्याचं नाटक बनवायला हवं होतं का ? त्यातही पोषाखीपणा नको असेल तर प्रायोगिक स्वरूपाचं नाटक बनवायला हवं होतं का ? मग त्या पेक्षा कादंबरीच काय वाईट ? मग आहे ती चरित्रे नि गंधर्वसाहित्य हे आहेतच त्याचं काय ? गंधर्वगायकी आणि केशवरावभोसले/दीनानाथ यांच्या गायकीतील परस्परविरोधाची मूलतत्वे या चित्रपटाने सर्व डिसकोर्स्सकट मांडली तर अशोक रानड्यांसारख्यांनी काय करावे ?
अनेक प्रश्न. यापैकी कुठल्याच प्रश्नांच्या गळाला न लागलेल्या एखाद्या सुळसुळीत माशाप्रमाणेच या चित्रपटविषयक सत्याचे झाले आहे काय ? हाही एक प्रश्नच !
17 May 2011 - 9:33 am | रमताराम
मुसुंचे उत्तर आवडले. मीही साधारण असाच मुद्दा लिहिण्यासाठी आलो होतो पण मुसुंनी अधिक नेमकेपणे नि थोडक्यात लिहिल्याने आमचे पाल्हाळ वाचले नि अब्रूही. :)
17 May 2011 - 10:36 am | वारकरि रशियात
बालगंधर्व चरित्रपट:
आम्हीही पाहिला. या धाग्यावर, तसेच समीरसूर, तात्या (आणखी कोण ते आता लक्षात नाही, पण आणखी एका धाग्यात) अनेकांनी लिहीले, तसा आम्हालाही तो आवडला.
'चिंजं' नी लिहिल्याप्रमाणे आस्वाद घेताना जर्क - डिसजॉईंटेडनेस जाणवला, त्यांनी तसेच इतर अनेकांनी लिहीलेल्या (तसेच न लिहिलेल्या पण आम्हाला जाणवलेल्या) तृटीही आहेत हेही मान्य.
पण, आम्ही जितपत अपेक्षा ठेवल्या होत्या, त्यातील ब-याच पूर्ण झाल्या, असेच मी म्हणेन. ब-याच प्रमाणात आनंद आणि समाधान मिळाले असेही म्हणेन.
या सर्व चर्चांत मला वाटते मुळात आपण सर्वांनी कांही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात, त्या अशा:
१)नारायणराव बालगंधर्व हे नजिकच्या भूतकाळातील एक महानायक होते.
२) महानायकाचे चरित्रगान करणे (अगदी त्यातील दोषदिग्दर्शनासह) ही आपल्याला वाटते तितकी सोपी व सहजसाध्य गोष्ट नाही. त्यासाठी तितक्याच उत्तुंग प्रतिभेचा आणि दिक्कालाचा वेध घेऊ शकणारी बुद्धी असणारा चरित्रगायक (या माध्यमात दिग्दर्शक - नटसंच इ.) ही प्राथमिक आवश्यकता आहे. महाकाव्य (किंवा कोणतीही कलाकृती) अजरामर / महान होण्यासाठी केवळ चरित्रनायक महान असणे पुरेसे नसते. अन्यथा अनेक प्रसंगी नेमका अन्वयार्थ न कळल्याने सरधोपट मार्गाने चित्रीकरण केले जाउन चरित्रनायक / घटना विनोदी वाटण्याची, नेमका कसा होता हा उलगडा न होण्याची शक्यता असते.
३)या चमूने गेली कांही वर्षे खूप परिश्रम घेतले असे म्हटले आहे. पण उत्तुंग प्रतिभा आणि दिक्कालाचा वेध घेऊ शकणारी बुद्धी यांना पर्याय असत नाही.
४) रसिकांना आणि स्वत:ला (आपल्या मनाला) अधिकाधिक निखळ सर्वांगिण आनंद मिळावा हा एकमेव विचार आणि निर्व्याज भोळसटपणामुळे व्यावहारिक जगात वावरायला नालायक हे 'नानां'च्या जीवनातील खरे द्वंद्व सीमलेसली समोर आणणे ही येथे कसोटी होती.
५) पुलं / गदिमा अशांसारख्या (चित्रपटाची भाषा जाणणा-या) प्रतिभावंतांना हे शिवधनुष्य (कदाचित)पेलले असते.
६)पण आताच्या काळात ज्यांना हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करावासा वाटला, त्यांनी प्रयत्न करूच नये असे आपण म्हणू नये.
फक्त एकच असते; असे प्रयत्न वारंवार घडत नसतात, त्यामुळे जे प्रयत्न करायला जातात, त्यांनी कलाकृती अधिक निर्दोष व्हावी याची काळजी घ्यायला हवी होती. मला वाटते, (चिंजं सह)सर्वांचा येथे लिहिण्याचा हाच हेतू असावा.
17 May 2011 - 11:08 am | लिखाळ
समीक्षण छान.
चित्रपट अजून पाहीलेला नाही. पाहणार आहे. तसेही मी फार तोशीस पडणार नाही अश्याच ठिकाणी (प्रभात, निलायम) चित्रपट पाहतो. सल्ल्या बद्दल आभार. :)
--(बाणेदार) लिखाळ.
17 May 2011 - 12:17 pm | चिंतातुर जंतू
शक्यता नाकारता येत नाही.
निर्माते नितीन देसाई यांच्या शब्दांत:
‘बालगंधर्वांच्या जीवनातील संघर्ष आजच्या कलाकारांना समजावा, त्यांनी केलेली साधना, किमया दाखवावी, यातूनच "बालगंधर्व' चित्रपटाची बनवण्याची प्रेरणा मिळाली.’
[...]
'नाटकासाठी त्याग करणारा कलावंत खरोखरच महान आहे. कलाकार म्हणून जगत असताना त्यांच्या यातना, जीवन मला मोहीत करते. हा चित्रपट म्हणजे त्यांना मानाची सलामी आहे. गंधर्व गायकीचा पट या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. गंधर्वांच्या गाण्याबरोबर त्यांचा जीवनपट व्यक्त करणारी दोन गाणीही चित्रपटात आहेत.' (संदर्भ: सकाळ ११ मे)
ज्यात कथा-पटकथा-संवाद निमित्तमात्र असतात असा हा चित्रपट असावा असं त्याविषयी जे काही स्तुतीपर लिहून आलं होतं त्यावरून वाटलं नाही.
दोन्हीपैकी काहीही एक असू शकेल असं मानलं तरी माझ्या मते चित्रपट त्या उद्देशात सफल होत नाही.
मखरात बसवायचं असेल तर मग विनोदी झालेले प्रसंग टाळणं किमान आवश्यक होतं.
आमच्या श्रद्धास्थानांना क्लिशे मानता काय? आता तुमच्यावर काही ब्रिगेडी लोक सोडायला हवेत ;-)
चित्रपटाशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती पाहिल्या तर त्यांच्या मते ते एक उत्कृष्ट कलाकृती निर्माण करायला निघाले होते आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत; तद्वत क्लिशेचा आरोप ते नाकारतील.
‘जाणता राजा’विषयी त्यांना काय वाटतं माहीत नाही. आमचं मत विचाराल तर हा चित्रपट ‘जाणता राजा’ इतका भव्यदिव्य नाही. (याचा अर्थ आमच्या मते ‘जाणता राजा’ चांगला होता असा होत नाही याची नोंद घ्यावी.)
गंधर्वांचे इतके भक्त पृथ्वीतलावर अस्तित्वात असताना ही काळजी कशाला करायची देवा? अधिक उत्तर खाली पहा.
वास्तवदर्शी शैलीला आमचा तरी मूलत: विरोध नाही. गंधर्वांच्या वास्तवदर्शी चित्रणात दिमाखदार पोशाख येणार. त्याला आमची ना नाही. त्याविषयी आमच्या धाग्यात अजिबातच नाराजीचा सूर नाही. तद्वत आमचा पास.
वरचं उत्तर पहावं.
हे हे हे. रानड्यांनी आता काहीही केले नाही तरी ते आम्हाला पूज्य, देवा. तद्वत, आमचा पास.
चित्रपटविषयक सत्य इतके सुळसुळीत असू शकते ही शक्यता नाकारता येत नाही, पण या चित्रपटात आम्हाला जी अनवधानाने करमणूक मिळाली ती मात्र निखळ होती ;-)
17 May 2011 - 7:18 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रतिसाद द्यायची भिती वाटते आहे. ;) तरी धोका पत्करतो.
डिस्क्लेमर : माझ्या कडे सिल्कचा कुर्ताच नाही.
बालगंधर्वांबद्दल बोलायचं काम नाही, आणि माझी तर लायकीही नाही. पण एका महान कलाकारावर काढलेला चित्रपट म्हणून खूप आशेने बघायला गेलो होतो. पहिल्या ५-१० मिनिटातच गचके बसायला सुरूवात झाली.
शाहू महाराजांच्यासमोरच्या बालपणीच्या मैफिलीनंतर एकदम १० वर्षांचा काळ गेला, म्हणजे साधारण १८ च्या वयाचे बालगंधर्व दिसायला हवे होते. सुबोध भावे काही तिथे पटेना. (३ इडियट्स मधे आमिरवर बरीच फोटोशॉपिय मेहनत घेतली गेली, तेवढी घेतली असती तर काही चान्स होता. शिवाय आमिरची चणही लहान. सुबोध भावे थोराड वाटला.) लग्नातले नवरा नवरी थोराड वाटले मलाही. यावर उपाय म्हणजे लहानपण + नवतारूण्य + तारूण्य / प्रौढावस्था इत्यादींसाठी वेगळे कलाकार घेतले असते तर बरे झाले असते.
पण सुबोध भावेच्या अभिनयामुळे बरे वाटले आणि पुढे बघत राहिलो. नांदी अतिशय उत्कृष्ट वाटली. तरी त्यातले काही तुकडे थोडे आधुनिक वळणाचे वाटले म्हणून खटकले, कानाला नव्हे, केवळ त्या काळातले वाटले नाहीत म्हणून. खूपश्या प्रसंगातले पार्श्वभूमीवरचे आवाज आणि पडद्यावर चाललेला प्रसंग यांचा परस्परसंबंध कळालाच नाही. (बहुतेक नसावाच.) कराची म्हणाले की बांगच. तिथे दुसरा आवाजच नव्हता त्या काळी बहुधा. एका प्रसंगात बालगंधर्व पुण्यातल्या (?) एका जुनाट वाड्यात कोणाशीतरी बोलत असतात आणि पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या सामुहिक गाण्याचा / प्रार्थनेचा आवाज येतो. आणि तोही चक्क पाश्चात्य सुरावटीत. का? कळले नाही.
धक्के बसायचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जीवनातल्या ठळक घटना नुसत्या ओळीने मांडल्या आहेत. त्यात परस्परसंबंध ठेवून किंवा एक सुसंगती आणून त्याचा एकच एक सलग पट तयार करणे (हे माझ्या अल्पज्ञानानुसार) हे पटकथेचे काम. इथे अभिराम भडकमकर नावाच्या मातब्बर नावाने संपूर्ण निराशा केली. (खरं तर हे अपेक्षित नाही. अनाकलनियच आहे.) हाच तो पीपीटीचा मुद्दा. मला अगदी हीच उपमा सुचली होती चित्रपट बघताना. पंडित किर्लोस्कर कंपनीतला बाण चोरतो. का? त्यामागे तसेच काही मातब्बर कारण असावे. उदा. तो बाण साक्षात अण्णासाहेब किरोस्करांच्या पूजेतला असावा म्हणून त्याचे महत्व आणि त्याच्यावर श्रद्धा जबर असावी, म्हणून थेट तोच चोरला, असे असावे का? जे काय असेल ते नीट उभे करायला हवे होते.
मग नारायणराव गडकरीमास्तरांकडे जातात. हात पसरतात. फाटक्या साडीतही भूमिका करायला तयार होतात. का ब्वॉ?कोण असा मातब्बर नाटककार लागून गेला हा माणूस की हजारो रुपयांचे अत्तर उधळणारे नारायणराव फाटक्या साडीत उभे रहायला तयार होतात? मग त्या प्रसंगाआधी एखाद दोन छोट्याशा प्रसंगातून / संवादातून गडकरीमास्तरांची मातब्बरी दाखवता आली असती. हा चित्रपट त्या सगळ्याच व्यक्तिरेखांशी अनभिज्ञ असणारा प्रेक्षक बघत असेल तर त्याला कसे कळणार? गोहरजान हे गंधर्वांच्या जीवनातले अतिशय महत्वाचे पात्र. ती पण व्यक्तिरेखा नीट उभीच नाही राहिली. त्यामुळे ते सगळे विनोदी वाटायचा संभव. चित्रपट हे एक स्वयंपूर्ण एकक आहे असे समजून त्या चौकटीच्या आत, महत्वाच्या व्यक्तिरेखा तरी नीट उभ्या करायला नकोत? ते झालेच नाहीये. त्यामुळे ज्यांना बालगंधर्व हा फिनॉमेना काय होता, त्यांची लोकप्रियता कशी होती, त्यावेळची बाकीची महत्वाची माणसं, त्यांची गायकी इत्यादी माहित आहे त्यांनाच हे सगळे भावेल. इतरांचे काय? त्यांना फारतर ब्वॉ असाअसा एक थोर कलाकार होऊन गेला शंभरएक वर्षांपूर्वी आणि तो बाईच्या वेषात गाणी म्हणायचा, एवढाच बोध झाला तर तो दोष गंधर्वांचा नव्हे. नक्कीच चित्रपट बनवणार्या टीमचा आहे. नि:संशय.
मधेच 'मुकेश ऋषी' पठाण म्हणून येतो आणि तो दीड लाख कर्जाचा प्रसंग घडतो. तो पर्यंत सतत गंधर्वांच्या बरोबर सावली सारखा असणारा पंडित गजाआड जाऊन तब्बल दीड दिवस उलटलेला असतो. पण नारायणरावांना माहितच नसते! (अशा काही उदाहरणांमुळे त्यावेळच्या फॅक्ट्सचे संशोधन अपुरे राहिले असावे का? असा विचार मनात डोकावतो.) मग नारायणराव बाणेदारपणे देणगी नाकारतात. ते ठीकच. ते तसेच असावेत बहुधा. विलक्षण मनस्वी आणि मानी. पण मग त्या प्रसंगाचा शेवट करताना 'मर्द का बच्चा' वगैरे तद्दन फिल्मी डायलॉग्ज वापरून त्या पूर्णच प्रसंगाला एकदम टुकार पातळीवर आणले. काय गरज होती? माहित नाही.
अशा बर्याच गोष्टी चित्रपट बघताना खटकत राहिल्या.
पण तरीही मला हा चित्रपट बघितल्याचा पश्चात्ताप वगैरे नाही झाला. उलट अजून एकदा / दोनदाही बघायची तयारी आहे. पदरचे पैसे खर्चून.
का?
उत्तम संगीत. मला तरी आनंद भाटेंनी गायलेली गाणी, नांदी वगैरे आवडले. (कव्वाली अनाठायीच वाटली. आवडलीही नाही विशेष.) बालपणचे गाणे ऐकले नाही. मी गेलो तेव्हा तो प्रसंग होऊन गेला होता.
भव्य सेट्स. नेत्रदीपक रंगसंगती. ज्या रंगमंचीय भव्यतेकरिता आणि आकर्षकतेसाठी नारायणराव ओळखले जात त्याची चुणूक बघायला मिळाली.
प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय. सुबोध भावे, विभावरी देशपांडे, किशोर कदम. उत्तम. पण गडकरी मास्तरांचे काम करायला आयत्यावेळी जो मिळेल तो उभा केलाय असे वाटले. (आणि नाटक देतो म्हणल्यावर लगेचच समोरच्या टीपॉयवरील एक 'डायरी'सदृश चोपडी देताना तर फारच विनोदी वाटलं.) अविनाश नारकर हा तसाही डोक्यात जातो. लाऊड अभिनय करतो. नैसर्गिक वाटत नाही. पण बाकी बहुतेकांनीच उत्तम अभिनय केला आहे.
उत्तम निर्मितीमूल्यं. खर्चात कसर केल्यासारखे वाटले नाही फारसे. उत्तम सेट्स. उत्तम साउंड. मराठीत हे सगळे आत्ता आत्ता बघायला मिळते आहे. नाहीतर पूर्वी कमीत कमी पैशात चित्रपट केला आहे हे शेंबडे पोर सुद्धा सांगू शकेल अशी परिस्थिती होती.
मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषय हाताळले जात आहेत. तमाशा आणि नंतर तथाकथित विनोदी अशा लाटांमधे सापडलेला मराठी चित्रपट आता कात टाकतो आहे आणि ते सुद्धा कोणत्याही नवीन चाकोरीत न अडकता. अर्थात १००% चित्रपट चांगले असतील असे नाही. पण जेव्हा व्यापारात फायदा असतो तेव्हाच नवनवीन व्यापारी येऊन धंदा अजून मोठा होतो. जसे दाक्षिणात्य चित्रपटसृष्ट्यात दिसते. प्रचंड पैसा आणि यश मिळाल्यामुळे तिथे आपल्या तुलनेने चांगले चित्रपट जास्त येतात. प्रसिद्धीही मिळते. हिंदी आणि इंग्रजी माध्यमंही दबून असतात. तसे मराठीत होईल अशी आशा वाटण्यासारखे दिवस आहेत.
बाकी इतरत्र घेण्यात आलेले काही आक्षेप ('छ्या: असं कुठं असतं काय?' टाईपचे) फारच बालिश किंवा तर्कटी वाटले. जे घडलं ते घडलं आणि (बहुधा) तसंच दाखवलं गेलं... सिंपल. उद्या व्हॅन गॉ वर चित्रपट काढला आणि त्यात तो वेडाच्या भरात स्वतःचाच कान कापून घेतो असे दाखवले तर ते बरोबरच असेल. तसं घडलंच होतं. तिथे, 'छ्या: असं काय कोणी स्वतःचा कान कापतो काय? कैप्पण' असं म्हणणं म्हणजे स्वतःचं हसं करून घेणं आहे. तद्वतच, नारायणराव घेत असतील हजारोंची अत्तरं. तो खरं तर या दुनियेत केवळ शरिरानेच वावरणारा वेडा कलावंत होता. त्याला काय किंमत पंचवीस हजारांची?
**
नुकतेच असे ऐकले की सध्या जो सव्वादोन तासाचा चित्रपट दाखवला जातो, मूळ चित्रण त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. बहुतेक चार साडेचार तासांचा खेळ व्हावा एवढे. मग काटछाट करून सव्वादोनतासांवर आणला आहे. चित्रपटात जाणवणारा विस्कळितपणा त्यामुळे तर नसावा? अशी शंका मनात आली.
तस्मात, एकदा तर बघायला हरकत नाहीच. मी तर म्हणतो, बघाच.
17 May 2011 - 9:33 pm | आनंदयात्री
क्या बात है .. उत्तम प्रतिसाद. हा धागा उघडुन स्क्रोल केल्याचे सार्थक झाले. धन्यवाद रे बिका शेख.
19 May 2011 - 7:24 am | प्रसन्न केसकर
संपुर्ण धाग्याला सकारात्मक बनवणारा प्रतिसाद आहे बिकाचा.
बिकाशेट फक्त अजुन एक शक्यता: चित्रपटातल्या ज्या तृटींबाबत आपण बोलतोय त्या दुर करणं जरी शक्य असलं तरी त्यात परत आर्थिक पाठबळ विचारात घ्यावं लागतं. आमिर खान आणि बालगंधर्वची टीम यांच्यात याबाबत तुलना करता येईल का याबाबत मी साशंक आहे.
19 May 2011 - 9:09 am | नितिन थत्ते
>>आमिर खान आणि बालगंधर्वची टीम यांच्यात याबाबत तुलना करता येईल का याबाबत मी साशंक आहे.
म्हणूनच "मराठी चित्रपट जसा असण्याची सवय आहे त्यापेक्षा खूपच चांगला आहे" अशी प्रतिक्रिया दिली होती.
18 May 2011 - 8:55 am | श्रावण मोडक
यालाच संपादन म्हणतात राव ;) चित्रपटीय परिभाषेत संकलन असा शब्द असावा.
18 May 2011 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्यक्तीगत हलाल हल्ला!
18 May 2011 - 2:52 pm | साधामाणूस
श्री. बिका, चित्रपट पाहिलेला नाही पण आपली प्रतिक्रिया एकदम सन्तुलीत वाटली, आवडली.
17 May 2011 - 8:06 pm | मुक्तसुनीत
बिपिन आणि मागे एका लेखात आलेली मस्त कलन्दर यांची प्रतिक्रिया आवडली.
18 May 2011 - 5:44 am | विजुभाऊ
कोणत्याही इताहासातील व्यक्तीरेखेवर चित्रपट/ नाटक लिहीताना लोकाना माहीत असलेल्या त्यांच्या आयूष्यातील प्रसंगाना धरूनच ती व्यक्तीरेखा जिवंत केली जाते.
माहीत नसलेले प्रसंग मांडणे हे तसे जोखीमीचे काम असते. शिवाय तसे प्रसंग कथेला पूरक असावे लागतात. हे प्रसंग कोणत्यातरी इतिहासाच्या पुस्तकातच वाचायला मिलतात.
माहीत नसलेल्या प्रसंगाना धरून काही लिहायचे तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत काहीच लिहीता येणार नाही.
माहीत असलेल्या प्रसंगातील नाट्य शोधणे व ते मांडणे हे लेखकाचे कौशल्य असते.
कधी कधी एखद्या घटनेवरसुद्धा आख्खा चित्रपट निघु शकतो.एखद्या व्यक्तीचे आयूष्य दोन तासांत मांडणे हे एक प्रकारे शिवधनुष्य उचलण्याचा प्रकार असतो.
बालगंधर्व चित्रपटात काही उणीवा असतील पण त्यातील काही प्रसंगात केलेला छाया प्रकाशाचा वापर हा गुरुदत्तची आठवण करून देतो. ( उदा: हातवर दही देण्याचा प्रसंग)
चित्रपटात काही व्यक्तीरेखंवर अन्याय झालेला जाणवतो. अर्थात हे होतेच.
व्यक्तीवर चित्रपट काढणे हा त्या व्यक्तीवरील चित्रपट नसतो तर ती व्यक्ती लेखकाला कशा प्रकारे भावली यांचा पट असतो.
अन्यथा बालगंधर्व ही व्यक्ती रेखा "एक हरलेला पिता / एक बेजबदार पती / रीस्क टेकिंग मॅनेजर" अशा अनेक अंगाने पहाता येते.
बालगंधर्व एक विद्यार्थी म्हणून कसे होते ते देखील दाखवावयास हवे होते.
अशा अनेक तक्रारी संगता येईल.
चित्रपट पहाताना राहूल देशपांडे चे दिसणे खटकले ( मर्दानी सौंदर्य वगैरे) पण तो अगदीच ऑडमॅन आउट सुद्धा नाही वाटला.
चित्रपतातील काही गोष्टी काळाशी विसंगत वाटतात उदा: नाटकातील गीतांच्या मागे सिम्थेसायजर / पियानो चा वापर. पण ते कदाचित संगीतात नाविन्य आणण्याचा प्रयत्न असावा. ( ऑर्गनचे/पायपेटीचे सूर कदचित तरुण पिढीला आपलेसे वाटणार नाही असा विचार असेल)
पण एकुणताच बालगंधर्व चित्रपट पहाणे हा एक आनंददायी अनुभव आहे.
18 May 2011 - 11:51 am | धनंजय
चित्रपटाला निर्मितीमूल्यांच्या निकषावर घासणे हे योग्यच आहे. बिपिन कार्यकर्ते यांची प्रतिक्रियाही आवडली.
19 May 2011 - 6:09 am | परिकथेतील राजकुमार
एकुणच रथी महारथी लोकांच्या प्रतिक्रिया वाचुन हा चित्रपट म्हणजे जिवनगौरव पुरस्कार मिळालेल्या एखाद्या व्यक्तीचे आयुष्य / कारकिर्द जसे पुरस्कार प्रदान करण्याआधी ४/५ मिनिटे चलचित्रांच्या माध्यमाने उलगडून दाखवतात तसा वाटत आहे.
बाकी एक गंमत कळली नाही की काही लोक का भांडत का आहेत ?
१) हे चित्रपटाचे परिक्षण नसुन बालगंधर्वांचे वैयक्तिक परिक्षण वाटत आहे म्हणुन ?
२) बालगंधर्वांना महत्व मिळत आहे आणि चित्रपटावर कोणी बोलत नाहिये म्हणुन ?
३) आमची श्रद्धस्थाने आणि तुमची श्रद्धास्थाने ह्यांच्यातल्या श्रेष्ठत्वाचा मुद्दा मध्ये आणायचा म्हणुन ?
४) एखाद्या विषयावर आम्ही देखील किती कळकळीने बोलु शकतो हे दाखवायचे म्हणुन?
५) जुने स्कोर सेटल करायचे म्हणुन ?
६) कंपुबाज म्हणुन ?
७) कंपुबाज विरोधक म्हणुन ?
८) आजकाल बालगंधर्व चित्रपटावर बोलायची फॅशन आहे म्हणुन ?
19 May 2011 - 9:12 am | रमताराम
हा पर्या नेहमी कळीचे प्रश्न इचारतो. आमच्या बाबतीत क्र. ४ आणि क्र. ८ खरे आहे. जालावरच्याच कुण्या मित्राने मागे म्हटले तसे, व्यवहारात नसलेली (खरंतर शून्य असलेली) इमेज आम्ही जालावर - मर्यादित परस्पर-संबंधांमुळे - तयार करून टिकवून ठेवू शकतो राव. त्यात आम्ही पुणेकर असल्याने प्रत्येक विषयातले आपल्याला कळते असा आमचा ठाम विश्वास आहे नि त्यावर बोललेच पाहिजे असा आग्रह पण आहे. आणि आता या विषयावर चार धागे झाल्यावर आपल्याला काहीतरी लिहायलाच हवे ना, म्हणून काहीतरी प्रतिसाद दिले झालं. एरवी सालं आपण चित्रपट पाहतो कशासाठी, माफक करमणूक म्हणून रे, उगा डोक्याला कल्हई कशाला हवी राव. ते अँगल, ते पर्स्पेक्टिव, शेड्स, प्रतीकात्मता, ओतुर (स्पेलिंग बरोबर आहे का ठावं नाय) थिअरी, वगैरे वगैरे ऐकले की आमच्या पोटात गडबड सुरू होते राव. पण हे कबूल केले तर साला आपल्या इमेजचे काय होणार ना म्हणून थोडे लिहितो अधूनमधून, समजून घे दादा.
आणि आपण साला इतरांशी पूर्ण सहमत झालो तर पुन्हा आपले वैशिष्ट्य काय राहिले? मग थोडी सहमती थोडी असहमती करत तोल सांभाळतो राव, दोस्तांना पण सांभाळायला हवे ना. जालावर असेच चालते ना हो? आम्ही बराच काळ वाचनमात्र होतो तेव्हा केलेल्या अभ्यासातून असाच निष्कर्ष काढला होता (आमच्या बुद्धिमर्यादेमुळे चुकीचाही असेल.)
19 May 2011 - 10:00 am | चिंतातुर जंतू
अं बिपिननं वर उपस्थित केलेल्या त्रुटी जरा पुन्हा पाहू:
आता यातल्या प्रत्येक त्रुटीमागे पुरेसं आर्थिक पाठबळ नव्हतं असं मानून दोष त्याच्या माथी मारता येईल का? बरं चित्रपट तसा स्वस्तात बनवलेला नक्कीच वाटत नाही. मग तथाकथित गरीबीमागे लपून आणि मी दुसऱ्या एका प्रतिसादात वर म्हटल्याप्रमाणे अल्पसंतुष्ट वृत्ती बाळगून आपण आपल्याच संस्कृतीला कद्रू करतो आहोत का? कल्पनादारिद्र्य म्हणतात ते हेच का?
19 Jun 2011 - 9:04 pm | बिपिन कार्यकर्ते
एक वाचनिय चीरफाड!
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=164...