✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

‘बालगंधर्व’ आणि आमचं शंकेखोर मन

च
चिंतातुर जंतू यांनी
Sun, 05/15/2011 - 23:25  ·  लेख
लेख
पूर्वपीठिका: नटरंग आणि आमचं शंके़खोर मन ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून भारून गेलेले अनेक लोक भेटले आणि तशी अनेक परीक्षणं विविध ठिकाणी वाचली. चित्रपट पाहून आमच्या शंकेखोर मनात आलेल्या काही शंकांचं निरसन तरीही झालेलं नाही, म्हणून रसिक मायबाप वगैरे समस्त मराठीजनांची क्षमा मागून आमच्या त्या शंका इथे दिलेल्या आहेत: संगीत आणि तेही विशिष्ट काळातलं, विशिष्ट जातकुळीचं संगीत (पक्षी: बालगंधर्व आणि त्यांच्या काळातलं नाट्यसंगीत) हाच ज्याचा आत्मा आहे अशा चित्रपटात एकता कपूरच्या टिनपाट टी.व्ही. मालिकांतल्यासारखं पार्श्वसंगीत सतत का वाजत असतं? प्रेक्षकांना प्रसंगातलं कारुण्य वगैरे समजायला संवाद (तेही अमुक-तमुक व्यक्ती मेली, अमुक लाखांचं कर्ज फेडा वगैरे टाईपचे; म्हणजे सूचक वगैरे नाहीत बरं) आणि त्या जोडीला पडद्यावरच्या सर्वांनी गाळलेली टिपं पुरेशी नाहीत असं दिग्दर्शकाला वाटतं का काय? की एकंदरीत आजच्या प्रेक्षकाला असलंच संगीत लागतं अशा समजातून हे आहे? पण मग हे असलं भावनांना हातघालू संगीत सतत वापरणं हा बालगंधर्वांचा आणि त्यांच्या संगीताचा अपमान नाही होत का? हे निव्वळ पार्श्वसंगीत म्हणून नाही, तर अगदी ‘धर्मात्म्या’च्या प्रसंगातल्या करुण गाण्यातदेखील कसलीतरी भयंकर (आणि त्या काळात नसणारी) वाद्यं कानठळ्या बसेपर्यंत का वाजत रहातात? अशा वाद्यांनी प्रसंगातलं कारुण्य गहिरं वगैरे होण्याऐवजी अगदी नाहीसं होतं हे ज्यांना कळत नाही त्यांना संगीतातलं नक्की काय कळतं? एकंदरीत बालगंधर्वांविषयी किमान आस्था असणाऱ्या पुष्कळ लोकांना माहीत असतील असे किस्से किंवा एखाद्या चरित्रकोशात सहज सापडतील असे त्यांच्या आयुष्यातले ठळक प्रसंग एखाद्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधल्या बुलेट पॉईंटसारखे टाकत गेलं की पटकथा झाली असं पटकथालेखकाचं मत आहे का? म्हणजे टिळक आले त्यांना ‘अरे हा तर बालगंधर्व’ म्हणून गेले; गडकरी आले त्यांना ‘एकच प्याला’ देऊन गेले; केशवराव भोसले आले आणि धैर्यधर झाले; शांताराम आले आणि धर्मात्मा बनवून गेले अशी नुसती माणसांची आणि प्रसंगांची जंत्री चित्रपटात येत राहते. याउलट कोणत्याही संदर्भग्रंथात सहज सापडतील अशा तपशीलांपलीकडचे बालगंधर्व चित्रपटात दिसतच नाहीत. उदा. असं सांगतात की गाण्यातलं शास्त्रशुद्ध तंत्र (हा अमुक ताल, तो तमुक राग वगैरे) गंधर्वांना फारसं कळत नसे पण त्यांची संगीताची जाण मात्र अतिशय चकीत करणारी होती आणि गळ्यातून हवे ते काढण्यात ते वाकबगार होते. अशा माणसाला संगीताबद्दल, इतर गायकीबद्दल काय वाटतं हे चित्रपटात कुठेच येत नाही. नुसतं एकामागून एका प्रसंगात त्यांना गाताना दाखवलं आणि त्यांची व्यवहारी जगाविषयीची निरागसता दाखवली की व्यक्तिचित्रण झालं असं दिग्दर्शकाला/पटकथालेखकाला वाटतं का? चित्रपटात दोन प्रसंग कराचीत घडतात. पहिल्या प्रसंगात तशी पाटी येते आणि दुसऱ्या प्रसंगात पात्रं आणि संवादातून ते कळतं. मग दोन्ही प्रसंगांत मागे उगाच बांग का? म्हणजे कराचीत तेव्हा २४ तास बांग ऐकू यायची असा कुणाचा समज आहे की काय? की जिथे बांग ऐकू येते अशी ठिकाणं ही आताच्या पाकिस्तानातच असणार असं काहीसं प्रेक्षकांना वाटावं अशी इच्छा आहे? आणि मग इतर ठिकाणी उगाचच मागे मोटारींचे वगैरे आवाज का येत रहातात? म्हणजे मोटारी असतील तर त्या कराचीत नाहीत तर उर्वरित भारतातच (म्हणजे तेव्हापासून ‘आपण’ पुढे वगैरे) असं काही म्हणायचं आहे का? एकंदरीत संवाद आणि पटकथेत चुकून झालेले विनोद तर फारच आहेत. उदा: गंधर्वांशी लग्न झालं तेव्हा त्यांच्या बायकोचं वय नक्की काय होतं? ती घोडनवरी होती की काय? कारण विभावरी देशपांडे अभिनेत्री म्हणून कितीही गुणी असली तरीही त्या काळात घोडनवरी ठरली असती अशा वयाची दिसते (आणि आहेच). लग्नाच्या आणि पहिल्या रात्रीच्या प्रसंगात ती थोराड दिसते हा काही तिचा दोष नाही; ती कास्टिंगची ढोबळ चूक वाटते. गंधर्वांच्या नाटकांना आलेली आणि पहिल्या रांगांत बसलेली म्हणून जी काही प्रेक्षकमंडळी दिसतात ती ठेवणीतले कपडे-दागिने घालून, बग्ग्यांमधून वगैरे येणारी, गंधर्वांच्या उच्चभ्रू, लब्धप्रतिष्ठित चाहत्यांपैकी आहेत असं त्यांच्याकडे पाहून काही वाटत नाही. मग या गोष्टींना (श्रीमंतीचं प्रदर्शन वगैरे) दिग्दर्शकाचा काही तात्त्विक विरोध वगैरे आहे की काय अशी शंका वाटू लागते. याउलट स्टेजवर नसतानाची नाटक मंडळी पाहून वाटतं. म्हणजे यांचे कपडे सारखे परीटघडीचे, कडक, कोरे कसे दिसतात असा प्रश्न पडतो. एवढ्या लोकांना रोज किती कामं असतात आणि त्यात त्यांचा कसा पिटटा पडतो याची कल्पना ज्यांचा फिरत्या नाटक मंडळींशी संबंध आला असेल त्यांना असेल. मग तरीही त्यांचे कपडे असे सदासर्वकाळ कोरे का? त्या लोकांना काही कामंधामं करायला लागत नसत का? निव्वळ मिशा लावल्यानं राहुल देशपांडे मर्दानगीचा निखळ नमुना वगैरे दिसतो हे आम्हाला तरी फारच विनोदी वाटलं. त्यात केशवराव भोसल्यांचे धैर्यधराच्या वेशातले फोटो पाहिलेले असल्यामुळे तर आम्ही वाईट परिस्थितीत सापडलो. एकंदरीत असले सिनेमे पाहून मराठी संगीत नाटकातला सुवर्णकाळ जिवंत होतो आणि जाताजाता मराठी चित्रपटसृष्टीतही नवा सुवर्णकाळ उदयाला येतोय असं आमच्या बालबुद्धीला तरी वाटलं नाही. उलट अनेकांना प्रिय असणारे बालगंधर्व जरा जास्तच सस्ते झालेत असं आम्हाला वाटू लागलंय. आता आम्ही पडलो शंकेखोर म्हणून आमचं रडगाणं सोडून द्यायचं, का आमच्या मुद्द्यांत तथ्य वाटतं असं म्हणायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. खिशाला फार तोशीस मात्र पडू देऊ नका असा आमचा एक पुणेरी सल्ला.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22180 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

क्या बात है

आनंदयात्री
Tue, 05/17/2011 - 21:33 नवीन
क्या बात है .. उत्तम प्रतिसाद. हा धागा उघडुन स्क्रोल केल्याचे सार्थक झाले. धन्यवाद रे बिका शेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+ १

प्रसन्न केसकर
गुरुवार, 05/19/2011 - 07:24 नवीन
संपुर्ण धाग्याला सकारात्मक बनवणारा प्रतिसाद आहे बिकाचा. बिकाशेट फक्त अजुन एक शक्यता: चित्रपटातल्या ज्या तृटींबाबत आपण बोलतोय त्या दुर करणं जरी शक्य असलं तरी त्यात परत आर्थिक पाठबळ विचारात घ्यावं लागतं. आमिर खान आणि बालगंधर्वची टीम यांच्यात याबाबत तुलना करता येईल का याबाबत मी साशंक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

+१

नितिन थत्ते
गुरुवार, 05/19/2011 - 09:09 नवीन
>>आमिर खान आणि बालगंधर्वची टीम यांच्यात याबाबत तुलना करता येईल का याबाबत मी साशंक आहे. म्हणूनच "मराठी चित्रपट जसा असण्याची सवय आहे त्यापेक्षा खूपच चांगला आहे" अशी प्रतिक्रिया दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

संपादन

श्रावण मोडक
Wed, 05/18/2011 - 08:55 नवीन
नुकतेच असे ऐकले की सध्या जो सव्वादोन तासाचा चित्रपट दाखवला जातो, मूळ चित्रण त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. बहुतेक चार साडेचार तासांचा खेळ व्हावा एवढे. मग काटछाट करून सव्वादोनतासांवर आणला आहे. चित्रपटात जाणवणारा विस्कळितपणा त्यामुळे तर नसावा? अशी शंका मनात आली.
यालाच संपादन म्हणतात राव ;) चित्रपटीय परिभाषेत संकलन असा शब्द असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

व्यक्तीगत हलाल हल्ला!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/18/2011 - 10:30 नवीन
व्यक्तीगत हलाल हल्ला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

व्वा!

साधामाणूस
Wed, 05/18/2011 - 14:52 नवीन
श्री. बिका, चित्रपट पाहिलेला नाही पण आपली प्रतिक्रिया एकदम सन्तुलीत वाटली, आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिपिन

मुक्तसुनीत
Tue, 05/17/2011 - 20:06 नवीन
बिपिन आणि मागे एका लेखात आलेली मस्त कलन्दर यांची प्रतिक्रिया आवडली.
  • Log in or register to post comments

कोणत्याही इताहासातील

विजुभाऊ
Wed, 05/18/2011 - 05:44 नवीन
कोणत्याही इताहासातील व्यक्तीरेखेवर चित्रपट/ नाटक लिहीताना लोकाना माहीत असलेल्या त्यांच्या आयूष्यातील प्रसंगाना धरूनच ती व्यक्तीरेखा जिवंत केली जाते. माहीत नसलेले प्रसंग मांडणे हे तसे जोखीमीचे काम असते. शिवाय तसे प्रसंग कथेला पूरक असावे लागतात. हे प्रसंग कोणत्यातरी इतिहासाच्या पुस्तकातच वाचायला मिलतात. माहीत नसलेल्या प्रसंगाना धरून काही लिहायचे तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत काहीच लिहीता येणार नाही. माहीत असलेल्या प्रसंगातील नाट्य शोधणे व ते मांडणे हे लेखकाचे कौशल्य असते. कधी कधी एखद्या घटनेवरसुद्धा आख्खा चित्रपट निघु शकतो.एखद्या व्यक्तीचे आयूष्य दोन तासांत मांडणे हे एक प्रकारे शिवधनुष्य उचलण्याचा प्रकार असतो. बालगंधर्व चित्रपटात काही उणीवा असतील पण त्यातील काही प्रसंगात केलेला छाया प्रकाशाचा वापर हा गुरुदत्तची आठवण करून देतो. ( उदा: हातवर दही देण्याचा प्रसंग) चित्रपटात काही व्यक्तीरेखंवर अन्याय झालेला जाणवतो. अर्थात हे होतेच. व्यक्तीवर चित्रपट काढणे हा त्या व्यक्तीवरील चित्रपट नसतो तर ती व्यक्ती लेखकाला कशा प्रकारे भावली यांचा पट असतो. अन्यथा बालगंधर्व ही व्यक्ती रेखा "एक हरलेला पिता / एक बेजबदार पती / रीस्क टेकिंग मॅनेजर" अशा अनेक अंगाने पहाता येते. बालगंधर्व एक विद्यार्थी म्हणून कसे होते ते देखील दाखवावयास हवे होते. अशा अनेक तक्रारी संगता येईल. चित्रपट पहाताना राहूल देशपांडे चे दिसणे खटकले ( मर्दानी सौंदर्य वगैरे) पण तो अगदीच ऑडमॅन आउट सुद्धा नाही वाटला. चित्रपतातील काही गोष्टी काळाशी विसंगत वाटतात उदा: नाटकातील गीतांच्या मागे सिम्थेसायजर / पियानो चा वापर. पण ते कदाचित संगीतात नाविन्य आणण्याचा प्रयत्न असावा. ( ऑर्गनचे/पायपेटीचे सूर कदचित तरुण पिढीला आपलेसे वाटणार नाही असा विचार असेल) पण एकुणताच बालगंधर्व चित्रपट पहाणे हा एक आनंददायी अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

चांगली चर्चा

धनंजय
Wed, 05/18/2011 - 11:51 नवीन
चित्रपटाला निर्मितीमूल्यांच्या निकषावर घासणे हे योग्यच आहे. बिपिन कार्यकर्ते यांची प्रतिक्रियाही आवडली.
  • Log in or register to post comments

एकुणच रथी महारथी लोकांच्या

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/19/2011 - 06:09 नवीन
एकुणच रथी महारथी लोकांच्या प्रतिक्रिया वाचुन हा चित्रपट म्हणजे जिवनगौरव पुरस्कार मिळालेल्या एखाद्या व्यक्तीचे आयुष्य / कारकिर्द जसे पुरस्कार प्रदान करण्याआधी ४/५ मिनिटे चलचित्रांच्या माध्यमाने उलगडून दाखवतात तसा वाटत आहे. बाकी एक गंमत कळली नाही की काही लोक का भांडत का आहेत ? १) हे चित्रपटाचे परिक्षण नसुन बालगंधर्वांचे वैयक्तिक परिक्षण वाटत आहे म्हणुन ? २) बालगंधर्वांना महत्व मिळत आहे आणि चित्रपटावर कोणी बोलत नाहिये म्हणुन ? ३) आमची श्रद्धस्थाने आणि तुमची श्रद्धास्थाने ह्यांच्यातल्या श्रेष्ठत्वाचा मुद्दा मध्ये आणायचा म्हणुन ? ४) एखाद्या विषयावर आम्ही देखील किती कळकळीने बोलु शकतो हे दाखवायचे म्हणुन? ५) जुने स्कोर सेटल करायचे म्हणुन ? ६) कंपुबाज म्हणुन ? ७) कंपुबाज विरोधक म्हणुन ? ८) आजकाल बालगंधर्व चित्रपटावर बोलायची फॅशन आहे म्हणुन ?
  • Log in or register to post comments

अरारा

रमताराम
गुरुवार, 05/19/2011 - 09:12 नवीन
हा पर्‍या नेहमी कळीचे प्रश्न इचारतो. आमच्या बाबतीत क्र. ४ आणि क्र. ८ खरे आहे. जालावरच्याच कुण्या मित्राने मागे म्हटले तसे, व्यवहारात नसलेली (खरंतर शून्य असलेली) इमेज आम्ही जालावर - मर्यादित परस्पर-संबंधांमुळे - तयार करून टिकवून ठेवू शकतो राव. त्यात आम्ही पुणेकर असल्याने प्रत्येक विषयातले आपल्याला कळते असा आमचा ठाम विश्वास आहे नि त्यावर बोललेच पाहिजे असा आग्रह पण आहे. आणि आता या विषयावर चार धागे झाल्यावर आपल्याला काहीतरी लिहायलाच हवे ना, म्हणून काहीतरी प्रतिसाद दिले झालं. एरवी सालं आपण चित्रपट पाहतो कशासाठी, माफक करमणूक म्हणून रे, उगा डोक्याला कल्हई कशाला हवी राव. ते अँगल, ते पर्स्पेक्टिव, शेड्स, प्रतीकात्मता, ओतुर (स्पेलिंग बरोबर आहे का ठावं नाय) थिअरी, वगैरे वगैरे ऐकले की आमच्या पोटात गडबड सुरू होते राव. पण हे कबूल केले तर साला आपल्या इमेजचे काय होणार ना म्हणून थोडे लिहितो अधूनमधून, समजून घे दादा. आणि आपण साला इतरांशी पूर्ण सहमत झालो तर पुन्हा आपले वैशिष्ट्य काय राहिले? मग थोडी सहमती थोडी असहमती करत तोल सांभाळतो राव, दोस्तांना पण सांभाळायला हवे ना. जालावर असेच चालते ना हो? आम्ही बराच काळ वाचनमात्र होतो तेव्हा केलेल्या अभ्यासातून असाच निष्कर्ष काढला होता (आमच्या बुद्धिमर्यादेमुळे चुकीचाही असेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्रुटी = गरीबी, पण कसली?

चिंतातुर जंतू
गुरुवार, 05/19/2011 - 10:00 नवीन
चित्रपटातल्या ज्या तृटींबाबत आपण बोलतोय त्या दुर करणं जरी शक्य असलं तरी त्यात परत आर्थिक पाठबळ विचारात घ्यावं लागतं.
अं बिपिननं वर उपस्थित केलेल्या त्रुटी जरा पुन्हा पाहू:
  • >>खूपश्या प्रसंगातले पार्श्वभूमीवरचे आवाज आणि पडद्यावर चाललेला प्रसंग यांचा परस्परसंबंध कळालाच नाही. (बहुतेक नसावाच.)
  • >> त्यांच्या जीवनातल्या ठळक घटना नुसत्या ओळीने मांडल्या आहेत. त्यात परस्परसंबंध ठेवून किंवा एक सुसंगती आणून त्याचा एकच एक सलग पट तयार करणे (हे माझ्या अल्पज्ञानानुसार) हे पटकथेचे काम. इथे अभिराम भडकमकर नावाच्या मातब्बर नावाने संपूर्ण निराशा केली.
  • >> हा चित्रपट त्या सगळ्याच व्यक्तिरेखांशी अनभिज्ञ असणारा प्रेक्षक बघत असेल तर त्याला कसे कळणार?
  • >> चित्रपट हे एक स्वयंपूर्ण एकक आहे असे समजून त्या चौकटीच्या आत, महत्वाच्या व्यक्तिरेखा तरी नीट उभ्या करायला नकोत? ते झालेच नाहीये.
  • >> पण मग त्या प्रसंगाचा शेवट करताना 'मर्द का बच्चा' वगैरे तद्दन फिल्मी डायलॉग्ज वापरून त्या पूर्णच प्रसंगाला एकदम टुकार पातळीवर आणले. काय गरज होती? माहित नाही.
आता यातल्या प्रत्येक त्रुटीमागे पुरेसं आर्थिक पाठबळ नव्हतं असं मानून दोष त्याच्या माथी मारता येईल का? बरं चित्रपट तसा स्वस्तात बनवलेला नक्कीच वाटत नाही. मग तथाकथित गरीबीमागे लपून आणि मी दुसऱ्या एका प्रतिसादात वर म्हटल्याप्रमाणे अल्पसंतुष्ट वृत्ती बाळगून आपण आपल्याच संस्कृतीला कद्रू करतो आहोत का? कल्पनादारिद्र्य म्हणतात ते हेच का?
  • Log in or register to post comments

एक वाचनिय चीरफाड!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 06/19/2011 - 21:04 नवीन
एक वाचनिय चीरफाड! http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=164446:2011-06-17-10-20-14&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा