आमचे शंकेखोर मन घेऊन आम्ही सहसा मराठी बोलपट पाहाण्यास जात नाही, कारण मनास फार (कु)शंका पडतात, आणि त्यामुळे आम्हांस फार तसदी होते, असा आमचा नित्य अनुभव आहे. तरीही मराठी भाषा-संस्कृतीवरील प्रेमापोटी आणि सर्वांच्या स्तुतिसुमनांमुळे आम्हांस मोह झाला आणि आम्ही ते धाडस अखेर केले. आता आम्हांस पडलेल्या या काही शंका...
टिप्पणी १: आम्ही करमणूकप्रधान बोलपट (उदा: गोविंदा वगैरे) पाहावयास जाताना मेंदू नावाचा आमचा अवयव नेमाने घरी ठेवून जातो, पण उपरनिर्देशित बोलपटाने पारितोषिके वगैरे मिळवून गोविंदाच्या बोलपटांहून उच्च दर्जा प्राप्त केलेला असावा, असा आमचा कयास होता, त्यामुळे आमच्या मेंदूस आम्ही बरोबर नेले. ही गलती असल्यास त्याची माफी आम्ही आधीच मागतो, पण हेही कबूल करतो, की मेंदू नेला नसता तर झाली असती, त्याहून तो नेल्याने अंमळ अधिक करमणूक झाली.
टिप्पणी २: आपण चित्रपट पाहिला नसल्यास चित्रपटात घडणारे काही कळीचे प्रसंग आपल्याला खालील मजकुरामधून कळू शकतात. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर तो वाचावा.
- बोलपट नक्की कोणत्या काळात घडतो? एस. टी. सारखी दिसत राहाते, म्हणजे फार जुना नसावा. तसेच लोकांची भाषा, कपडे, तमाशातील अजय-अतुल यांचे संगीत वगैरे पाहताही असा समज होतो. पण पत्र, टेलिफोन, एस. टी. डी. बूथ वगैरे प्रकारांचा शोध लागला नसावा, असे दिसते. कारण बाप मेल्यावर महिनाभर गुणाचा कुटुंबाशी काही संपर्क नाही. सर्वसामान्यतः मनुष्यगणातील सजीव आपल्या जिवलगांपासून दूर गेल्यास त्यांची ख्याली-खुशाली पुसण्यास आणि आपली सांगण्यास उपरनिर्देशित साधनांचा उपयोग करतात, असा आमचा अनुभव आहे.
- अतुल कुलकर्णी नाच्या होण्यास तयार होतो आणि प्रत्यक्ष नाच्या बनतो, या दरम्यान नक्की किती काळ जातो? पैलवान गडी नंतर इतका हडकतो, की काही महिने दुष्काळ, उपोषण किंवा कुपोषण झाल्याचा भास होतो.
- घरंदाज स्त्रियांना तमाशात काम करण्याविषयी विचारल्यास मार पडेल, हे कळण्यास किती अक्कल लागते? तेवढीही अक्कल नसलेले पुरुष जो तमाशा उभा करतील, तो बक्कळ चालेल, यावर आमचा विश्वास बसणे अंमळ कठीण गेले.
- कोंकणस्थ स्त्रिया या आमच्या घरच्याच! तरीही गोरीघारी स्त्री फडावर नाचताना पाहून आम्हांस काही तसदी वगैरे होत नाही; तितके आम्ही प्रागतिक (किंवा निर्लज्ज, काय म्हणाल ते!) आहोत. परंतु अशा स्त्रीने ग्रामीण असल्याचे दाखवताना हेल, भाषा, हावभाव यांवर थोडे कष्ट घ्यावेत, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. ते इतके का जड आहे?
- अतुल कुलकर्णी नाच्या होईस्तोवर घंटाभर उलटून गेला असावा. मुख्य कथानक तोवर सुरुच होत नाही. असे का? त्यानंतरच्या घंटाभरात मात्र शून्यापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंतचा प्रवास, मग उत्कर्षबिंदू, मग पुन्हा शून्य आणि मग पुन्हा शिखर असा बोलपटाचा प्रवास होतो. त्यामुळे ते सर्व 'लवकर आटपा एकदाचे' अशा स्वरूपात होऊन जाते. असेही का? पहिला घंटाभर आम्ही मिशी कधी उतरेल आणि लावणी कधी सुरु होईल, याची वाट पाहिली. आम्हांस फार कंटाळा आला. इतरांस तो का येत नाही, याचा काही अदमास येत नाही. शून्यापासून शिखरापर्यंतचा दुसरा प्रवास तर दाखविलाच नाही. बहुधा तोवर बोलपटातले कलाकार आणि दस्तुरखुद्द दिग्दर्शक देखील कंटाळून गेले असावेत, असा कयास आम्ही काढला.
टिप्पणी ३: आम्ही सदाशिव पेठी. त्यामुळे वैचारिक मतभेदांची आम्हांस नको तेवढी आदत आहे. हिंसेची मात्र अजिबात आदत नाही. आमचा शंकेखोर मेंदू थोडा मागासलेला आहे, असे हे वाचून आपणांस वाटले, आणि आम्हांस झ, फ, भ वगैरे अक्षरे मिरवणार्या शिव्यांची लाखोली द्यावयाची मनीषा झाली, तर ती शक्यतो खाजगीत द्यावी, ही विनंती. आम्ही आपल्या भावना (आनंदाने नाही, पण) स्वीकारू. बाकी काही नाही, तरी आमच्या शंकांनी आपली किंचित करमणूक तरी झाली असेल, एवढीच गरिबाची आशा आहे.
- चिंतातुर जंतू :S
प्रतिक्रिया
31 Jan 2010 - 7:02 pm | बिपिन कार्यकर्ते
चालायचंच हो... पण चित्रपटाचा ओव्हरऑल इफेक्ट काय झाला ते सांगा बरं? ते महत्वाचं.
अवांतर: मी अजून बघितला नाहीये हा चित्रपट पण बघायची इच्छा आहे.
बिपिन कार्यकर्ते
31 Jan 2010 - 7:29 pm | पाषाणभेद
कोणतीही कलाकृती पाहतांना सर्जनशील मन असावे लागते. तू चित्रपट त्या वृत्तीने न पाहता केवळ समिक्षणाच्या सदाशिव पेठी पातळीत पाहीला. तू जेवतांना कॅलरीज मोजून त्याच खात असशील. त्याचा आनंद घेत नसशीलच.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
31 Jan 2010 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>कोणतीही कलाकृती पाहतांना सर्जनशील मन असावे लागते. तू चित्रपट त्या वृत्तीने न पाहता केवळ समिक्षणाच्या सदाशिव पेठी पातळीत पाहीला. तू जेवतांना कॅलरीज मोजून त्याच खात असशील. त्याचा आनंद घेत नसशीलच.
सहमत आहे. तरिही निरिक्षणे चांगली. :)
पण, चित्रपट चांगला आहे. गाणी तर एकदम झकास.
आमच्या मित्राच्या थ्री इडियट्स्च्या परिक्षणाची आठवण झाली.
-दिलीप बिरुटे
5 Feb 2010 - 10:02 am | विजुभाऊ
तू जेवतांना कॅलरीज मोजून त्याच खात असशील. त्याचा आनंद घेत नसशीलच.
त्यापेक्षाही या खाल्लील्या जेवणाचे उद्या नक्की काय रुपांतर होणार आहे याचा विचार करत जेवत असशील असे म्हणाना. ;)
5 Feb 2010 - 1:47 pm | चिंतातुर जंतू
आमचा मनस्ताप पाहून ज्या कुणास या अथवा तत्सम भावना होत असतील, त्यांचे लक्ष आम्ही याच धाग्यावरील आमच्या खालील प्रतिसादाकडे नम्रपणे वेधू इच्छितो.
आशा आहे की, यायोगे आपणांस अशी शक्यता किमान रास्त वाटावी, की आमच्या (कु)शंकेखोर मनासही भावू शकतील, अशा काही गोष्टी या भूतलावर जन्मास आल्या आहेत. परेश मोकाशी यांस आमचे धन्यवाद!
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
31 Jan 2010 - 8:19 pm | प्रशु
मुळ कादंबरी वाचा....
मराठी माणुस एकमेकांचे पाय ओढणे कधी थांबवणार देव जाणे....
31 Jan 2010 - 9:03 pm | शुचि
>>सर्वांच्या स्तुतिसुमनांमुळे आम्हांस मोह झाला >>
ही स्तुतिसुमनं लै ब्येकार. आपल्या अपेक्षा शिख्ररावर न्येत्यात अन आपला कडेलोट होतोया.
हेच जर कोर्या मनानी पाहील असतं तर काही वेगळच चित्र असतं
(मनोविश्लेषणाची पुस्तके चाळ्णारी) शुचि
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
31 Jan 2010 - 9:13 pm | मुक्तसुनीत
लेख आवडला.
चित्रपटामधे (की कुठल्याही अशा प्रकारच्या कलाकृतीमधे ?) काहीतरी कार्यकारणभाव लागतो , काळाचे भान ठेवावे लागते आणि एकंदर सगळे काँग्रुअंट (मराठी शब्द ?) लागते हे खरे आहे. आणि या दृष्टीने , या लेखात मांडलेले मुद्दे चपखल आहेत.
मला सुचलेली काही उत्तरे :
1. बोलपट नक्की कोणत्या काळात घडतो? एस. टी. सारखी दिसत राहाते, म्हणजे फार जुना नसावा. तसेच लोकांची भाषा, कपडे, तमाशातील अजय-अतुल यांचे संगीत वगैरे पाहताही असा समज होतो. पण पत्र, टेलिफोन, एस. टी. डी. बूथ वगैरे प्रकारांचा शोध लागला नसावा, असे दिसते. कारण बाप मेल्यावर महिनाभर गुणाचा कुटुंबाशी काही संपर्क नाही. सर्वसामान्यतः मनुष्यगणातील सजीव आपल्या जिवलगांपासून दूर गेल्यास त्यांची ख्याली-खुशाली पुसण्यास आणि आपली सांगण्यास उपरनिर्देशित साधनांचा उपयोग करतात, असा आमचा अनुभव आहे.
माझ्यामते चित्रपटाचा काळ नक्कीच एस्टीडी बूथच्या क्रांतीच्या आधीचा असला पाहिजे. मात्र या काळाच्या खुणा उभ्या करण्यात कलादिग्दर्शकाचे अपेश जाणवते. पत्रांच्या बाबतीत बोलायचे तर , तमाशापार्टी गावोगाव फिरते असे दाखवले आहे. कदाचित पत्रे लिहिणार्यांचा अभाव , पत्त्यांची अनिश्चितता वगैरे मुद्दे लागू होत असावेत.
2. अतुल कुलकर्णी नाच्या होण्यास तयार होतो आणि प्रत्यक्ष नाच्या बनतो, या दरम्यान नक्की किती काळ जातो? पैलवान गडी नंतर इतका हडकतो, की काही महिने दुष्काळ, उपोषण किंवा कुपोषण झाल्याचा भास होतो.
हा काळ काही आठवड्यांचा असू शकतो. असे मानण्यात काय समस्या आहे ?
3. घरंदाज स्त्रियांना तमाशात काम करण्याविषयी विचारल्यास मार पडेल, हे कळण्यास किती अक्कल लागते? तेवढीही अक्कल नसलेले पुरुष जो तमाशा उभा करतील, तो बक्कळ चालेल, यावर आमचा विश्वास बसणे अंमळ कठीण गेले.
हम्म. हा मुद्दा पटला.
4. कोंकणस्थ स्त्रिया या आमच्या घरच्याच! तरीही गोरीघारी स्त्री फडावर नाचताना पाहून आम्हांस काही तसदी वगैरे होत नाही; तितके आम्ही प्रागतिक (किंवा निर्लज्ज, काय म्हणाल ते!) आहोत. परंतु अशा स्त्रीने ग्रामीण असल्याचे दाखवताना हेल, भाषा, हावभाव यांवर थोडे कष्ट घ्यावेत, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. ते इतके का जड आहे?
कोकणस्थांप्रमाणेच , मराठा स्त्रियांमधील गोरे-घारेपण मी पाहिले आहे. (तसे ते कायस्थांमधेही असते; परंतु इथे नायिका कायस्थ जमातीची असेल असे वाटत नाही. ) बाकी भाषा, हेल , हावभाव यातल्या अस्सलपणाचा मुद्दा पूर्ण मान्य आहे.
5. अतुल कुलकर्णी नाच्या होईस्तोवर घंटाभर उलटून गेला असावा. मुख्य कथानक तोवर सुरुच होत नाही. असे का? त्यानंतरच्या घंटाभरात मात्र शून्यापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंतचा प्रवास, मग उत्कर्षबिंदू, मग पुन्हा शून्य आणि मग पुन्हा शिखर असा बोलपटाचा प्रवास होतो. त्यामुळे ते सर्व 'लवकर आटपा एकदाचे' अशा स्वरूपात होऊन जाते. असेही का? पहिला घंटाभर आम्ही मिशी कधी उतरेल आणि लावणी कधी सुरु होईल, याची वाट पाहिली. आम्हांस फार कंटाळा आला. इतरांस तो का येत नाही, याचा काही अदमास येत नाही. शून्यापासून शिखरापर्यंतचा दुसरा प्रवास तर दाखविलाच नाही. बहुधा तोवर बोलपटातले कलाकार आणि दस्तुरखुद्द दिग्दर्शक देखील कंटाळून गेले असावेत, असा कयास आम्ही काढला.
हा मुद्दा मला पटतो. कथानकाची एकंदर गती नीट राखली गेली नाही. पहिला भाग लांबला आणि दुसर्यातले सगळे नाट्य कोंबले गेल्यासारखे झाले आहे.
चित्रपटाबद्दल माझे स्वतःच्या काही शंका आहेत :
१. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा : तमासगीर मुलगी मूळच्या मर्दमराठ्या पैलवानाला नाच्या व्ह्यायला लावते आणि त्यामागचे कारण असे आहे की "नाच्या/मावशी" शिवाय तमाशा होऊ शकत नाही/ चालत नाही. हे नक्की खरे आहे काय ? की ही एका विशिष्ट व्यक्तिरेखेची भूमिका आहे ? कारण तसे असल्यास , नाट्य ज्या प्रमुख मुद्द्याभवती बांधले गेले आहे त्याचीच वीण सैलसर वाटते.
२. मूळच्या , पौरुषाने ओतप्रोत भरलेल्या पैलवानाला आग्रहाने नाच्या बनवल्यावर नायिका त्याच्या प्रेमात पडते आणि वैवाहिक नाते प्रस्थापित न होतानाच त्यांच्यामधे नियमित शैय्यासोबत घडताना दाखवले आहे. यात कुठेतरी विसंगती आहे असे मला वाटले. तमासगिरीणीला जर "गुणा" आवडला असेल तर त्याच्या अंगच्या गुणांमुळे, कलेमुळे , कलेच्या आंचेमुळे. त्याची शरीरसंपदा निघून गेल्यावर, त्याच्यातल्या पौरुषाच्या खुणा लोपत चालल्यावर त्याच्याबद्दल शारिरीक आकर्षण आणि मग त्याच्याबरोबर घडलेला संग हे सगळे न पटणारे.
३. अतुल कुलकर्णी या नटाने खूप मेहनत घेतली, झालेला बदल , होणारे दु:ख हे सगळे चांगले दाखवले आहे. अगदी उत्तम दर्जाचे. मात्र............ नाच्या/मावशी यातले "इट्ट" अगदी जराही दिसले नाही. गणपत पाटील आणि इतर काही कलाकारांनी सादर केलेल्या नाच्यांच्या वावरातली मजा (निदान मला तरी ) एका अंशानेही आलेली नाही. हे म्हणजे .... "नाच्यामुळे तमाशा हिट्ट झाला" असे लुटुपुटूच्या लढाईसारखे धरून चालावे लागते !
असो. चित्रपटाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा. परंतु एकंदर हे वाण उणे पडले आहे.
1 Feb 2010 - 3:57 pm | चिंतातुर जंतू
आम्हांसही हे अजिबात पटले नाही. विशेषतः 'सबकुछ गुणा' असणार्या तमाशात त्याने स्वतः नाच्या होणे, हे विश्वासार्ह नाही.
येथे मात्र आम्हांस एवढी विसंगती भासली नाही. अंगच्या गुणांमुळे जर एखादा पुरुष भावला, तर त्याचे हडकणे स्त्रीस चालून जाऊ शकेल. शिवाय, प्रेमाला बाधा व्हावी, असे वर्तन गुणाकडून घडत नाही, आणि शय्यासुख देण्यातही तो कमी पडत नसावा, असे वाटते. ज्याच्याविषयी निव्वळ शारिरीक आकर्षण वाटते, अशा पुरुषाच्या बाबतीत शरीराच्या र्हासासह आकर्षण कमी होणे साहजिक, पण इथे तसे सुचवावयाचे नसावे.
शंभर टक्के खरे. ज्या कलेच्या जोरावर गुण्या यश संपादन करतो, तो वग अगदीच कमअस्सल आहे. विशेषतः 'विच्छा माझी पुरी करा', 'कथा अकलेच्या कांद्याची' वगैरेंच्या आसपासही हा वग जाणार नाही. आम्हांस भीती आहे की अशा भूमिकांमुळे एका गुणी नटाचा कमल हासन होणार. म्हणजे एकाच चित्रपटात दात पाडून पण दिसतो, आणि बुटका पण दिसतो, आणि म्हातारा पण दिसतो, आणि बाई म्हणून पण दिसतो, म्हणून तो श्रेष्ठ नट, वगैरे.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
1 Feb 2010 - 4:16 pm | बिपिन कार्यकर्ते
बहुतेक मुद्दे बहुतांशी पटण्यासारखे आहेत.
कमलहासन या बोलटोत्तमाबद्दल (नट नाही तो बोलट या न्यायाने) काय बोलणार? गिमिक्स करून किती वर जाऊ शकेल माणूस?
बिपिन कार्यकर्ते
1 Feb 2010 - 9:46 pm | हरकाम्या
आपण सिनेमा बघायला जाताना " मेंदु " नावाचा शरीरातील महत्वाचा अवयव बरोबर नेलात. पण नेहमीसारखी एक गफलत केलीत.
त्याचा वापर केला नाहीत म्हणुन हे सर्व प्रश्न आपल्याला पडलेत. मी हासिनेमा पाहिला. मला तो आवडला. पण आपल्यासारखे प्रश्न मला पडले नाहीत. एक शेतमजुर आपले ध्येय गाठण्यासाठी धडपड करतो तो ते ध्येय गाठतो पण त्याच्या संसाराची राखरांगोळी होते. त्याची अब्रु जाते, तो समाजातुन उठतो. हे आपणास दिसले नाही.
१) ती त्याला नाच्या होण्यास सांगत नाही. तर नाच्या होण्यास कुणी तयार नाही. म्हणुन तो नाइलाजाने नाच्या होतो.
बाकी इतर बाबींविषयी मी लिहित नाही. पण एवढासुंदर सिनेमा पहाताना आपण ' मेंदुचा " नको तो वापर केला. याचे वाइट वाटते.
1 Feb 2010 - 12:27 am | अभिषेक पटवर्धन
तुमच्या काही प्रश्नांची उत्तंर पुढील प्रमाणे:
१. चित्रपटात मला तरी एस. टी. कुठे दीसली नाही. मला फक्त एक जुन्या धाटणीची एक गाडी गावोगाव फीरताना दीसली. मला तरी ती बस दाखवलेल्या काळाशी अगदी सुसंगत वाटली.
३. कोणत्या प्रकारच्या स्त्रीया तमाशात काम करायला तयार होतील यावर भाष्य करणारा एक संवाद मी चित्रपटात ऐकला. त्यात नवर्याने टाकलेल्या, घरी कोणी नसलेल्या आणि एकुण पोटाच्या मागे लागलेल्या स्त्रीयांचा उल्लेख होता. (पण त्यानंतरचे काही सीन विसंगत होते हे खरं)
४. सदाशिव मधुन थोडे बाहेर पडला असता तर हा प्रश्न पडला नसता. कोलाटी नावाची जमात माहीती आहे का तुम्हाला? (यावर 'कोलाट्याचं पोर' या नावाचा एक चित्रपटही आल्याचं मला आठवतयं)
याशिवाय बाकी मुद्दे पटले.
1 Feb 2010 - 11:18 am | अविनाशकुलकर्णी
मी पण हा सिनेमा बघितला..पण अतुल व किशोर कदम ह्याच जमेच्या बाजु आहेत..नाच्या तमाशाचा एक भाग असतो.पण इथे नाच्यालाच फार महत्व दिले आहे..लोक तमाशात नाच्याला बघायला जात नाहि..नाच्यामुळे सुपारी मिळते हेही थोडे अतीच वाटते...तसेच तमाशात दंगल होति अन तमाशातल्या बायकांना कुणी हात लावत नाहि हे पटत नाहि....आता वाजले कि बारा या गाण्यात अमृता नायिका पेक्षा जादा भाव खावुन जाते...एकुण सिनेमा यथा तथाच आहे..ग.दी वा खेबुडकरांच्या लावण्या सारखि एका हि लावणी गुरुला जमली नाहि..अतुल अजल बेस्ट...
1 Feb 2010 - 12:13 pm | प्रमोद्_पुणे
गाणी आणि संगीत सोडले तर यथातथाच आहे.. अतुल कुलकर्णीचे नाच्याचे काम सुद्धा लै भारी असे नाही वाटले (मुक्तसुनीतशी सहमत).. त्याचा वास्तुपुरुष आणि देवराई मधला अभिनय खूप उजवा आहे यापेक्षा..एकंदर ठीक.
बाकी हरिश्चंद्राची फैक्टरी कसा आहे??
1 Feb 2010 - 4:03 pm | चिंतातुर जंतू
आमच्या मते एकदम फक्कड! ऑस्कर द्या सोडून, आमचे (आणि आमच्या मेंदूचेही) पारितोषिक फॅक्टरीलाच.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
1 Feb 2010 - 12:15 pm | ऋषिकेश
बरंय ह्या चिंतातूर जंतुचा प्रादुर्भाव चित्रपटाआधी झाला नाहि ;) त्यामुळे आमच्या सर्वसामान्य मेंदुला झक्क नाचणारी बाई, लय भारी फड, सुरेख आभिनय अन झेपणारी तरी डोक्याला मुंग्या आनणारी कथा यामुळे चितपट लै लै आवडून गेला.
--ऋषिकेश
1 Feb 2010 - 6:05 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही सदाशिव पेठी. त्यामुळे वैचारिक मतभेदांची आम्हांस नको तेवढी आदत आहे
"मी सदाशिव पेठी आहे" असे मुद्दामुन सांगण्याची / टंकण्याची अस्सल सदाशिव पेठीला कधिही गरज पडत नाही.
स्वतःचे प्रामाणीक मत / परिक्षण व्यक्त करताना स्वतःचा उल्लेख सदाशिव पेठी असे करण्यामागचा हेतु काय असावा? तुम्ही इतर कुठे राहात असता तर ह्या चित्रपटाला डोक्यावर घेउन नाचला असतात का ?? स्वतःवर असल्या वैचारीक दारिद्र्याने भरलेल्या लिखाणामुळे काही आपत्ती ओढवु नये म्हणुन "सदाशिव पेठी" चिलखत चढवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न.
मोठे व्हा !!
©º°¨¨°º© रावण कडक ©º°¨¨°º©
आमचे राज्य
2 Feb 2010 - 7:22 am | अमृतांजन
१००% सहमत.
रोजच्या आयुष्यात जितके विरोधाभास दिसतात ते वर वर्णन केलेल्या प्रसंगापेक्षा प्रखर असतात.
1 Feb 2010 - 7:21 pm | ऍडीजोशी (not verified)
कोंकणस्थ स्त्रिया या आमच्या घरच्याच! तरीही गोरीघारी स्त्री फडावर नाचताना पाहून आम्हांस काही तसदी वगैरे होत नाही;
सोनाली कुलकर्णी कोकणस्थ नाही. बाकी सिनेमातलं तिचं नाव माहिती नाही. अमॄता खानविलकरही कोकणस्थ नाही . तिचंही सिनेमातलं नाव माहिती नाही.
2 Feb 2010 - 10:15 am | चिंतातुर जंतू
आम्हांसही या बायांची जात माहीत नाही. सोनालीबाईंच्या वागण्यात, बोलण्यात त्या नाचणार्या बाईच्या व्यक्तिरेखेस आवश्यक असलेला अस्सल ग्रामीणपणा जाणवत नाही. बाकी त्यांच्या गोर्या-घार्या रुपड्यास आमचा काही आक्षेप नाही (किंबहुना ते आवडतेच), एवढेच सांगावयाचे होते.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
2 Feb 2010 - 12:22 pm | ऍडीजोशी (not verified)
एवढेच सांगावयाचे होते.
मग तेव्हढेच सांगायचे. मुद्दलातल्या चुका कशाला?
2 Feb 2010 - 12:17 pm | समीरसूर
मी नटरंग नुकताच पाहिला. मला खूप आवडला. अतुल कुळकर्णी या अभिनेत्याने खूप मेहनत घेऊन ही व्यक्तिरेखा अगदी प्रभावीपणे साकारली आहे असे मला वाटते. पण संवाद उच्चारणात थोड्या सुधारणेला नक्कीच वाव होता. बर्याच ठिकाणी जिथे ग्रामीण जनता 'ण' चा 'न' असा उच्चार करते तिथे मुख्य अभिनेत्यांचा शुद्ध उच्चार खटकतो. सोनाली आणि अतुल यांनी संवाद उच्चारणात थोडी मेहनत अजून घ्यावयास हवी होती असे वाटते. अतुलच्या मित्रांनी, विशेषतः जो "बामणाच्या मळ्यात काम केल्यापासून बामणासारखं बोलाय लागलाय..." असा संवाद म्हणतो, त्या अभिनेत्याने खूप छान बाज पकडलाय. त्याला "घडलयं बिघडलयं" मध्ये खूप छान काम करतांना बघीतलं आहे.
काही किरकोळ त्रुटी वगळता सिनेमा खूपच छान जमून आलाय. आणि गाणी आणि संगीत खूप जबरदस्त होते. मला नाही वाटत की गाणी कुठल्याच अंगाने पिंजरा किंवा इतर कुठल्या जुन्या मराठी चित्रपटांच्या तुलनेत डावी होती म्हणून. माझ्या मते अजय-अतुल यांचे या चित्रपटातले संगीत हे अगदी जुन्या (सुधीर फडके, दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे, वसंत पवार, सी. रामचंद्र, राम कदम इत्यादी) संगीतकारांच्या तोडीचे किंबहुना त्यांच्यापेक्षाही थोडे सरस होते. तरुणाईला वेड लावणारे संगीत मराठीमध्ये कितीतरी मोठ्या वर्षांच्या खंडानंतर येत आहे असे मला वाटते. पुण्याच्या लक्ष्मीनारायण टॉकीजमध्ये कित्येक तरूण गाणी सुरु असतांना गाणी कडव्यांसकट म्हणत होती. संदीप-सलील, अजय-अतुल या प्रतिभासंपन्न कलाकारांनी मराठीमधला गीत-संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा सुरु केला असे म्हणायला हरकत नाही.
चित्रपटाची पटकथा अगदी बांधीव आणि कुठेही ढिसाळ न वाटणारी होती. किशोर कदम यांचा अभिनय ही लाजवाब होता.
मधली कित्येक वर्षे मराठी चित्रपटांची दुर्दशा ही टॅलेंटच्या अभावामुळे झाली होती. गीत, संगीत, नृत्य, कथा, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच आघाड्यांवर मराठी चित्रपट अगदीच सुमार दर्जाचे होते. १९८९ ते २००३ पर्यंतचा काळ म्हणजे लक्ष्याची आचरट कॉमेडी, सुबल सरकारांचे निर्बुद्ध नृत्यदिग्दर्शन, अमराठी निर्मात्यांची वाईट निर्मितीमुल्ये, कथा-पटकथेच्या नावाने बोंब आणि रद्दड गाणी! या सगळ्या उण्या बाजूंमुळे मराठी चित्रपट बघवत नव्हते. परवाच सह्याद्री वाहिनीवर 'आई मला माफ कर' नावाचा अलका कुबल आणि अशोक शिंदे या अभिनेत्यांचा एक चित्रपट १० मिनिटे पाहण्याचा सुवर्णमणिकांचन योग आला. प्रसून बॅनर्जी नावाच्या एका अतिशय प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकाराने हा चित्रपट बनवला होता. थोराड अलका कुबल बटबटीत मेकप करून आणि इंचभर लिपस्टिक लावून अगदी साध्या घरातल्या लोखंडी पलंगावर बसून अगदी तान्ह्या बाळाला दूध पाजते. मग दोन मुले मोठी होतात; वात येईल असा अभिनय करतात; अशोक शिंदे प्रसून बॅनर्जीने चाल लावलेले एक सुरेल गाणे म्हणतो. त्याची चाल ही कळत नाही. आणि शब्द म्हणजे "माझा बाळ किती छान, खूप सुख देईल मला, मोठा हो खूप शिकून आणि सुखी रहा" असे गद्यकाव्यापेक्षाही भयंकर होते. इतके वाईट डबिंग मी कधीच पाहिले नव्हते. कॅमेरा बहुधा प्रसूनदांनी त्यांच्या ड्रायव्हरकडे दिला होता. गायक पण प्रसूनदांचा मेव्हणा असावा. तो एकाच रटाळ सूरात अगम्य स्वरांमध्ये गाणे बरळत होता. असो. असे कितीतरी मराठी चित्रपट सांगता येतील. पाच मिनिटांच्यावर बघू शकलो तर स्वतःच स्वतःला बक्षीस जाहीर करण्याच्या लायकीचे.
श्वास ने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन श्वास दिला आणि आता तर काय, धडाधड चांगले मराठी चित्रपट निघत आहेत. त्यामुळे काही अगदी क्षुल्लक त्रुटींकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचार करणे श्रेयस्कर!
--समीर
2 Feb 2010 - 8:22 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री जंतू, चित्रपट पाहिलेला नाही. पण शंकेखोर मनाचे प्रकटन आवडले.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
3 Feb 2010 - 6:45 pm | गणा मास्तर
माझी निरिक्षणे....
१. किशोर कदमचे काम मला तर आवडले नाही. त्या जागी सदाशिव अमरापुरकर, अशोक सराफ किंवा निळु फुले असते तर.....
२.बाप मेल्यावर नाच्याला ती बातमी कळत नाही ही कथेची गरज असली तर कालसुसंगत नाही.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
3 Feb 2010 - 9:39 pm | टारझन
मस्त रे चिंतातुरजंता =)) ते विनाकारण आपण सदाशिवपेठी असल्याचा दावा करणे सोडल्यास बाकी मुद्दे फक्कड मांडलेत.
१. णाच्याशिवाय तमाशात काम करणार नाही , ह्या माजोरडेपणाचे कारणंच कळले नाही. बळेच ट्रॅजेडी घडवण्यासाठी विनाकारण उचलुन धरलेला मुद्दा वाटला.
२. अतुल कुलकर्णीने काही इमोशनल प्रसंग , (थोडीफार) बॉडी बनवने इत्यादी गोष्टींवर केलेली मेहेनत अगदी स्तुत्य आहे. पण त्याला नाच्याचं काम एवढं परफेक्ट जमलंय असं वाटत नाही. त्यापेक्षा आपला पछाडलेला मधला "सौंदर्या जवळकर" बरोबर असणारा नाच्या भारी वाटला होता. :)
३. वगात नाच्या बनला म्हणून राजा बनताच येणार नाही ? असा काही नियम होता का ? त्याला त्यातंच वग बनवुन राजा होता येत नव्हतं ?
असो ... चित्रपटात दु:ख , स्ट्रगल दाखवला की चित्रपट लै भारी ,, असं ज्यांना वाटतं त्यांना चित्रपट आवडू शकतो.
बाकी गाणी क्लास आहेत .. सोनाली कुलकर्णी काय एवढीही आउटस्टँडिंग नाहीये.. त्यापेक्षा अमृता एक नंबर आहे .. ये ढिंग च्याक ...मला जाऊ द्याना घरी .. आता वाजले की बारा :)
- टारझन
4 Feb 2010 - 6:12 am | सौरभ.बोंगाळे
ब्येस... चित्रपटांमधे त्रुटी आहेत. अप्सरा आली हे गाणं जेवढं जोरदार आहे तेवढं त्यावर त्यावरच नृत्य अजिबात नाही. त्याऐवजी आता वाजले की बारा ही लावणी लई फक्कड रंगते. शिवाय गाण्यानुसार चाल्लेल्या कलाकारांच्या हरकती प्रचंड गंडलेल्या आहेत. ओठांच्या हालचाली असो वा इतर हावभाव. गाण्यांमधे फार मुळमुळीत वाटतं. चित्रपटाची गतीदेखिल एकसारखी नाही.
पण एवढं असूनही चित्रपट आवडला. खुप वेगळा विषय मांडायचा धाडसी प्रामाणिक प्रयत्न आहे.
जंतूच्या चिंता समजू शकतो, पण चित्रपटाशी संबंधित बव्हतांशी जनता नविन आहे. त्यादृष्टीने नटरंग खुप कौतुकास्पद आहे. आणिक सांगायच झालं तर हा नुसता बनवायचा म्हणून बनवलेला चित्रपट नाही. जन्माला घातलेला चित्रपट आहे. एकंदर प्रवासात अनेक अडचणी आल्या असतिल, तडजोडी कराव्या लागल्या असतिल. लक्षात घेता नटरंगमधिल चुका माफ आहेत.
4 Feb 2010 - 10:02 am | भडकमकर मास्तर
आमच्याही काही शंका...
१. नाच्याने बायकी हावभाव करत , त्या सरपंचावर लाईन मारली की मग तो माणूस लगेच जत्रेत सुपारी द्यायला तयार होतो, हा प्रसंग मला अत्यंत हास्यास्पद वाटला... ( डेव्हिड धवन -गोविंदा यांचा सिनेमा चालू आहे असे वाटले)
त्यामुळे त्यापुढचं गणाचं दु:ख (आणि किशोर कदमला असं म्हणणं की तू मला नेहमी असंच करायल लावतोस)त्याहून हास्यास्पद वाटलं...
मूळ कादंबरीत हा प्रसंग अधिक चांगला असावा असे वाटते..
( कदाचित चित्रकर्त्यांच्या मनात दृश्य मध्यमाच्या मर्यादा? प्रेक्षकांची तीव्र प्रतिक्रिया ये ईल अशी भीती असे काहीसे कारण असावे..)
२. गणाने लिहिलेला अर्जुन बृहन्नडा वग प्रेक्षकांना आवडला आणि त्यानंतर तो लोकप्रिय तमाशा कलावंत झाला, हे जरा डीटेलमध्ये यायला हवे होते...... शेवट गुंडाळला आहे.
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
4 Feb 2010 - 10:59 pm | प्रमोद देव
ह्या चित्रपटाबद्दल जितकं बोललं गेलं त्या मानाने तो खूपच सामान्य वाटला.
नाच्यामुळे तमाशा चालतो....हेही नव्यानं कळलं. ;)
अतुल कुलकर्णीचा नाचा एकदम फडतूस वाटला.
गाणी मात्र चांगली आहेत.
हा चित्रपट फक्त संगीताच्या बाबतीत लक्षात राहील.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
5 Feb 2010 - 6:42 pm | मानस्
ह्म्म्म्....लेख आणि सगळया प्रतिक्रिया वाचल्या..नेमक्या मला न पटलेल्या आणि आवडल्या सर्व मुद्दयांवर चर्चा वाचून आनंद झाला.
मानस
26 Mar 2010 - 2:49 am | रोचनाकोन्हेरी
नटरंग पहिला आणि गाणी, नाच, अगदी अस्सल संवाद वगैरे सगळंच आवडलं, पण शेवटी तमाशात नाच्या म्हणजे कोण ? आणि त्याचे स्वरूप आणि महत्त्व काय, हे सिनेमा सांगूच शकला नाही, आणि एका दृष्टीने, लोककलेतील लैंगिक अस्मितेवर आधारित या गोष्टीने अनेक प्रश्न उद्भवले:
नाच्या हा समलिंगी नसतो, आणि हिजडाही नसतो, तो बायकी रूप धारण केलेला एक पुरुष कलाकार आहे, हे चित्रपट आवर्जून सांगतो. पण हा विषय असं सांगून टाकण्याइतका सोपा आहे काय? बायकी हावभाव करणारे सगळेच नाचे काय एकाच लैंगिक ओढीचे (प्रेरणेचे?) असतात काय? का काही समलिंगी आणि काही तृतीय लिंगी असूही शकतात? प्रेक्षकांना हवा असलेला नाच्या हा नक्की कोण असतो? नाच्याने अर्जुन झालेलं प्रेक्षकांना खपत नाही, आणि कोरेगावच्या पाटलाला पटवायला नाच्याचा वापर मंचाच्या बाहेरही केला जातो. तर मग त्याने खरोखर समलिंगी किंवा "हिजडा"च असावं अशी त्यांची अपेक्षा असते, का त्याने फक्त पडद्यावर त्या 'विचित्र' रूपानं यावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते काय? म्हणजे प्रेक्षकांना नाच्याने विचित्रच असावं अशी अपेक्षा असते का?
नयनाला "सिनेमातल्या तमाशासारखा" ग्रूप हवा असतो म्हणून ती नाच्याचा हट्ट धरते, पण अस्सल तमाशात - लोककलेत - नाच्याचं पात्र असतं की नाही? आधीच्या काळात बायका नसायच्या तेव्हा या पात्राची सुरवात झाली असं पांडोबा समजावतो, पण हे अर्धवट उत्तर झालं. सगळेच नाचे "त्या लोकांच्यातले नसतात" असे सांगून "तसले लोक" (म्हणजे समलिंगी आणि तृतीयलिंगी - "हिजडे") काहीतरी घाण आणि विचित्रच असतात, असेच शेवटी सांगितल्यासारखे वाटले. हे नाच्याच्या मूर्तीला, त्याच्या लैंगिक अस्मितेला, आणि तमाशातल्या लोककलेच्या इतिहासाला ते धरून आहे असे वाटले नाही. लोककलेच्या दैनंदिन जीवनावर आधारित असलेल्या सिनेमात असल्या कलेच्या जगात निरनिराळ्या लैंगिक ओढीच्या लोकांना ही जागा आहे, आणि त्यांच्यावर अत्याचार होत असतानाही ती जागा कायम राहिली आहे, असे दाखवले असते तर ते सामाजिक सत्याला, तमाशाच्या इतिहासाला धरून राहिले असते का? मला गोष्टीतला 'बृहन्नडा' धागा फार आवडला, आणि त्यातूनच हे सगळे प्रश्न उभे झाले...
चू.भू... इ.इ.!
संपादन : सदस्याच्या पहिल्या धाग्याला मदत करावी म्हणून मूलभूत शुद्धलेखन सुधारणा केलेल्या आहेत. शुद्धलेखनाचा आग्रह आहे किंवा अधिकाराचा वापर करावा म्हणून केलेले नाही. कळावे - संपादक.
26 Mar 2010 - 3:39 am | मुक्तसुनीत
सदस्याचे मिसळपाववर स्वागत करतो.
पहिल्याच आलेल्या प्रतिसादामधे चित्रपटाबद्दल अनेक चांगली निरीक्षणे आलेली आहेत. अभिनंदन.
26 Mar 2010 - 9:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नटरंगच्या निमित्ताने मांडलेले काही प्रश्न आणि त्याची संभाव्य उत्तरे वाचतांना आनंद वाटला.
मिपावर आपले स्वागत आहे.
-दिलीप बिरुटे
26 Mar 2010 - 11:47 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री कोन्हेरी, जालावर काही माहिती सापडली.
मनोहर लक्ष्मण देशपांडे यांच्या 'हिस्टरी ऑफ इंडियन थिएटर' या पुस्तकात काही माहिती (पृ. १६८ शेवटचा परिच्छेद) आढळते. त्यातील कारणमिमांसा (औरंगजेब महाराष्ट्राच्या मोहीमेवर असतांना उत्तरेकडून आलेल्या सैनिकांना काहीतरी शृंगारसदृश मनोरंजन हवे असल्याने स्थानिक स्त्रीयांसारख्या दिसणार्या मुलांना नाच्या म्हणून वापरण्यात आले. ) रोचक आहे. अर्थात याविषयी संशोधकांत एकमत नसावे. पण अशी कारणमिमांसा खरी असल्यास त्यांचा वापर लैंगिक भूक भागवण्यासाठी (तुरुंग वगैरे ठिकाणी होतो तसा) केला जाणेही शक्य आहे. याच पुस्तकात मात्र नाच्याची परंपरा संपुष्टात आल्याचाही उल्लेख आहे.
26 Mar 2010 - 10:40 pm | रोचनाकोन्हेरी
स्वागत, अाणि शुद्धलेखन केल्याबद्दल! :-)
6 Apr 2010 - 6:59 am | रोचनाकोन्हेरी
उत्तर ध्यायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व.. मी वरदपांडेंचं पुस्तक वाचलेले नाही, पण माहिती रोचक अाहे. तमाशातल्या स्त्री कलाकारांची बरीच मिमांसा अाढळते (नीरा अाडरकर, शर्मिला रेगे यांनी economic & political weekly मध्ये लिहीलेले लेख खूप वर्षापूर्वी वाचले होते), पण या तुटक-तुटक माहिती पलिकडे नाच्याबद्दल तसे काहीच अाठवत नाही. नौटनकी, भवई, तमाशा, या सगळ्याच लोककलांमध्ये काही साम्य अाणि देवाण-घेवाण अाहेच. याच देवाण-घेवाणीत नाच्याचे पात्र अाणि त्याचे evolution (शब्द?) बसवायला हवे!
नटरंग सिनेमाने अगदी इतिहासात खोल जावे असा माझा अग्रह नाही, पण एकूण त्या पात्राकडे अाणि त्याच्या अस्तित्वाकडे सिनेमाचे धोरण मला थोडे खटकले, एवढेच!