कोण होतास तू... कोण होतीस तू

नीलांबरी's picture
नीलांबरी in जनातलं, मनातलं
16 Apr 2011 - 8:32 am

सकाळी साडेपाच वाजता कोणाचातरी गजर मोठ्ठ्यानं किंचाळत असतो. अपार्टमेंटमधे रहायचं म्हणजे हा एक त्रासच. भिंती फार मजबूत नसल्या की आजूबाजूचे सगळे आवाज कसे अंगावर धावून येतात. गजराचा मालक आता बंद करेल, मग बंद करेल म्हणून मी पांघरूण कानापर्यंत ओढून घेते. पण गजर अविरत ओरडतच राहतो. थोड्याच वेळात माझ्या लक्षात येतं की हा गजराचा आवाज माझ्याच उशाजवळून येतोय...
चरफडतच मी उबदार पांघरुणातून बाहेर येते. बाहेरच्या खोलीतून रोजच्यासारखे चित्रविचित्र आवाज येतच असतात. कुणीतरी भारतातून रामदेवबाबांची सी. डी. (हो, तेच ते योगा गुरू वगैरे वगैरे...) पाठवल्यापासून नवरा रोज नेमानं कपालभाती वगैरे क्रिया जोमानं करतो. मला तर त्या क्रियांची नावं उच्चारणं सुद्धा जड जातं. त्यामुळे करण्यापासून मी चार हात दूरच असते. पायात सपाता सरकावून मी बाहेरच्या खोलीत येते. एक क्षण थबकते. दोन्ही हात, दोन पाय नि एक धड या सगळ्या अवयवांना ज्या विचित्र पद्धतीनं गुंतवून जे कोणतं आसन नवरा करत असतो त्यावरून बहुतेक आता याला मोकळं करायला माझी मदत लागेल नि ते झाल्यावरही हा ऑफिसला जाऊ शकेल की थेट हाडवैद्याकडे जावं लागेल हा विचार माझ्या डोक्यात येतो. पण नाही, सगळे अवयव पुन्हा जागच्याजागी आणून तो पुढच्या योगासनाची तयारी करायला लागतो.
स्वैपाकघरात जाऊन मी नाश्त्याची तयारी टेबलावर मांडून ठेवते. माझी आन्हिकं उरकते. आता सकाळच्या कामांमधलं सर्वात कठीण काम. मुलांना साखरझोपेतून जागं करणं. हे काम पूर्वी आम्ही दोघं आळीपाळीनं एकमेकांवर ढकलत असू. पण नवर्‍यावर रामदेवबाबांची कृपा झाल्यापासून तो या अवघड कामातून सुटला.
'ऊठ रे सोन्या, ऊठ ग राणी... सकाळ झाली.. शाळेत जायचंय ना.. चला चला.. आज छान छान खाऊ देणाराय डब्यात...'

माझ्या उसन्या गोड आवाजाचा नि अवसानाचा काही उपयोग होत नाही. दोघंही आपल्या मर्जीनं, आपला वेळ घेत आरामात उठतात. त्यामुळे आता पुन्हा रोजच्यासारखी धावपळ नि घाई होणारच असते. कसं बसं मी दोघांना तयार करायला लागते. मधेच जाऊन शवासन करता करता घोरायला लागलेल्या नवर्‍याला उठवून येते. दोन्ही हात नि एक मेंदू चौफेर लढवत मी 'आई, हा ड्रेस नको, आई, ज्यूस वेगळा ठेव... आई टीचरच्या बर्थडेचं गिफ्ट राहिलं... इ. मौलिक सूचनांचं पालन करते. धावत पळत आम्ही तिघं बस स्टॉप वर पोचतो. तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझ्या हातात एक निळा नि एक गुलाबी हातमोजा आहे. एक हात खिशात घालूनच मी बस ड्रायव्हरला 'गुड मॉर्निंग' करते.

स्कूल बस गेल्यावर घरी परतून नवर्‍याचा डबा उरकायचा असतो. घाईघाईनं मी भाजी चिरायला घेते. फोडणीला टाकल्यावर लक्षात येतं की भाजी नागपूरच्या भाषेत 'चोरटी' म्हणजे शिजून कमी होण्याची लक्षणं आहेत. तेव्हा तीच भाजी सगळीच्या सगळी नवर्‍याच्या डब्यात भरल्या जाते. याने की आज(भी) माझ्या जेवणासाठी सँडविच जिंदाबाद.. हो.. परत भाजी चिरायचा खटाटोप कोण करणार... तेही एकटीसाठी?

नवर्‍याला 'टाटा' करून मी घरात येते. एक मोठा हॉट चॉकलेटचा कप भरून.... त्याच्यावर मोकळ्या हातानं क्रीम टाकून ( वजन कमी वगैरे करायला 'नेहमीप्रमाणे' उद्या सुरुवात करणार आहे हं मी. कोण रे ते कुत्सित हसतंय?) सोफ्यावर मस्तपैकी बसते. गरम कप हातात घेऊन जितकं लोळता येऊ शकेल तितकी लोळायची पोझ घेऊन... तसं बसताना मला सोफ्यावरची दोन तीन खेळणी बाजूला सरकावूनच बसावं लागतं. पण आता ही दिवसातली पंधरा मिनिटं माझी स्वतःची असतात. विचारमंथन, चिंतन इत्यादी मोठे शब्द वापरून जे जे करायचं असतं ते ते करण्यासाठी...

माझ्या दिवाणखान्याकडे मलाच बघवत नाही. हीच का ती जागा... जी मी काल दुपारी घासून पुसून... म्हणजे व्हॅक्यूम करून स्वच्छ केली होती? आता इथे सगळीकडे बाहुल्यांचे हातपाय...( हो.. बाहुल्या एकसंध राहिलेल्या माझ्या लेकाला आवडत नाहीत. नवी बाहुली लेकीसाठी आणली की उपट तिचे हातपाय' हा त्याचा बाणा. हा कसला दुष्टपणा असं मी मैत्रिणीजवळ बोलून दाखवल्यावर 'तो मोठेपणी बहुतेक अस्थिरोगतज्ञ होईल' हा तिचा होरा तिनं मला बोलून दाखवलाय.), टिशू पेपरचे तुकडे, ज्यांना फक्त 'विचित्र' हाच शब्द योग्य होईल अशी चित्रं असं बरंच काही बाही पसरलंय्..हे सगळं आवरायला पुन्हा नव्या जोमानं(हा रोज रोज आणायचा तरी कुठून?) सुरुवात करायची असली तर कपभर हॉट चॉकलेटचं इंधन पोटात हवंच...)

आधी अंघोळीला जावं का हा डोक्यात आलेला विचार मी तडफेनं झटकून टाकते. आधी घराची स्वच्छता करावी हे बरं . नाही का? तेव्हा अंगावर घामाचा शर्ट नि पँट ( गचाळ म्हणू नका हं मला...अमेरिकन विंग्रजीप्रमाणे स्वेट पँट नि शर्ट हो....) वर बांधलेला बुचडा नि सपाता अशा नितांतसुंदर रूपात मी साफसफाईला सुरुवात करते. आता पुढचे दोन तीन तास मला झाडणे, झटकणे, पुसणे, फेकणे नि शेवटी दमणे या क्रिया जमेल त्या अनुक्रमाने उरकायच्या असतात. कधीकधी तर दमण्याच्या क्रियेपासूनच सुरुवात होते.

मला माझे लग्नाआधीचे दिवस आठवायला लागतात. किती वेळ देता यायचा तेव्हा स्वतःसाठी? चोवीस तासातले तेवीस तर आरशासमोरच जात असावेत. ड्रेसवर मॅचिंग बांगड्या हव्यातच, नखांवर रंग लावण्याचा तर नियमच... चपला कोणत्या ड्रेसवर कोणत्या घालायच्या याचे आराखडे ठरलेले..
हे सारं केलं तरी हरकत नाही पण दरवर्षी फर्स्टक्लास चुकायला नको हा आईबाबांचा नियमही काटेकोरपणे पाळल्या जात असल्याने नीटनेटकं, फॅशनेबल रहायला त्यांचीही हरकत नसायची. लग्न झाल्यावर सासरची मंडळीही हौशी...त्यामुळे चांगलं राहणं हा सवयीचा भाग झालेला.

अमेरिकेत आल्यावरचं छोटसंच अपार्टंमेंट..ते सजवायची हौस पुरी झाली. घरात दोघंच त्यात मी इथल्या भाषेत 'होममेकर' त्यामुळे रोज घर चकाचक ठेवण्यापलिकडे दुसरा उद्योग नाही. 'तुझं घर कित्ती छान ठेवतेस तू' असं मैत्रिणींनी चित्कारत म्हटलं की मूठभर मांस चढायचं अंगावर...(याच मैत्रिणी आता न कळवता आल्या तर बेशुद्धच पडतील हा भाग वेगळा..)

पण दोघांचे चौघं झालो नि सगळी परिस्थितीच बदलली. पसारा हा घराचा अविभाज्य भाग बनला. हे असं विस्कटलेलं, रणभूमी झालेलं घर आईबापांच्या नजरेला 'पोरांचा पसारा...चालायचंच...'असं म्हणून कितीही गोड वाटलं तरी आल्या गेल्याच्या नजरेलाही ते तसं वाटायला हवं ना? अन या घराचीही एक मोठी गंमतच असते. अगदी लखलखीत, स्वच्छ घर जेव्हा असतं ना, तेव्हा काळं कुत्रंही फिरकत नाही. अन एखाद्यावेळी मुलांनी दाणादाण केलेल्या घराकडे थोडं दुर्लक्ष करून आपणही टी. व्ही समोर लोळत पडावं त्या पसार्‍यात....की लगेच कोणीतरी आपली एक मैत्रीण सहकुटुंब फोन न करताच सुहास्य वदनानं प्रकट होते.

नवर्‍याचं काम तर माझ्यापेक्षाही व्यवस्थित (म्हणजे मुलं व्हायच्या आधी होतं.) आता त्याच्या बहुतेक सगळ्या गोष्टींवर लेकाचं आक्रमण असतं. बाबाची दाढीची आयुधं, शेव्हिंग क्रीम, रुमाल इत्यादी वस्तू या आपल्याच आहेत नि अधून मधून आपल्याला त्याची दया आली की थोड्या वेळासाठी बाबाला त्या द्यायला हरकत नसते असा उदारमतवादी दृष्टीकोण त्याचा असतो. शिवाय बुटाचे बंद, मोजे, पेन या आणि तत्सम चिजा या फक्त शोधण्यासाठीच असतात हाही आमच्या कुटुंबाचा एक गोड गैरसमज असतो. त्यामुळे या वस्तूंचं नाव निघालं की पळापळच सुरू होते.

थोडक्यात काय तर कडक इस्त्रीचे कपडे, त्यावर शोभणारे बूट, टायपिन वगैरे वगैरे घालून ऑफिसला जाणं हे आता नवरोजींसाठी स्वप्नच उरलंय. पूर्वी असा तयार होऊन तो ऑफिसला निघाला की माझ्या मोठ्या जाऊबाई मुद्दाम 'साला मै तो साब बन गया ....' हे गाणं म्हणून त्याची फिरकी घेत असत. पुतणे सुद्धा 'ये काका...एकदम कडक...' वगैरे ओरडत असत. तसंच मी तयार व्हायला गेले की 'आज काकू किस शेप की टिकली लगायेगी...' यावर पैजा मारत असत. गेले ते दिन गेले. आता हाताला येईल तो शर्ट किंवा टॉप यही फॅशन है...

सगळी साफसफाई झाल्यावर मी जरा थकून पुन्हा सोफ्यावर बसते. बाजूच्या टेबलावर माझ्या नि नवर्‍याचा लग्नानंतरचा फोटो आहे. त्यात आम्ही दोघं कसे वेल ड्रेस्ड आहोत...' याचं कौतुक करत मी थोडावेळ उसंत घेते. पण थोडावेळच हं.... जास्त वेळ नसतोच माझ्याजवळ... अन शेजारीच मला मुलांचा फोटो दिसतो...

.....मग काय... जे रोज होतं तेच होतं. स्वतःसाठी वेळ मिळत नाही , आधीसारखं चांगलं राहता येत नाही याची वाटणारी क्षणिक खंत पार हवेवर उडून जाते. मन कसं एकदम हलकं होतं... अगदी पिसासारखं....
नि आंघोळीला जायच्या आधी मी मुलांनी फर्माईश केलेल्या पुडिंगच्या तयारीला लागते.

शेवटी काय... घरी आल्यावर पुडिंग बघून गळामिठी घालून 'यू आर द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड...' ही पावती मिळाली की मग आणखी काही नको असतं मला... अगदी माझ्यासाठी थोडा वेळ सुद्धा...

-समाप्त.

विनोदलेख

प्रतिक्रिया

लवंगी's picture

16 Apr 2011 - 8:55 am | लवंगी

अगदि माझीच गोष्ट लिहिलीस कि ग तू... छान लिहिलय..

५० फक्त's picture

16 Apr 2011 - 9:39 am | ५० फक्त

लई भारी लिखाण; मजा आली वाचताना.

स्पा's picture

16 Apr 2011 - 9:44 am | स्पा

मस्त

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Apr 2011 - 10:58 am | निनाद मुक्काम प...

मस्त च
तुमचा तर २४ तास ऑन ड्युटी जॉब आहे .

किती छान लिहिलेस गं! यातले काहीही माझ्यासोबत होत नाही तरीही अगदि आपलंसं वाटलं चित्रण!

प्यारे१'s picture

16 Apr 2011 - 11:45 am | प्यारे१

छानच लिहिलंय.

इरसाल's picture

16 Apr 2011 - 1:43 pm | इरसाल

बाबाची दाढीची आयुधं, शेव्हिंग क्रीम, रुमाल इत्यादी वस्तू या आपल्याच आहेत नि अधून मधून आपल्याला त्याची दया आली की थोड्या वेळासाठी बाबाला त्या द्यायला हरकत नसते असा उदारमतवादी दृष्टीकोण त्याचा असतो.

हे म्हणजे अगदीच बरोबर...................

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2011 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार

नीलांबरी म्हणजेच मधुरिमा काय ?

३ वर्षांपूर्वी हि कथा मधुरिमा ह्यांची म्हणुन वाचली होती.

प्रीत-मोहर's picture

16 Apr 2011 - 3:13 pm | प्रीत-मोहर

मस्त लिहिलय ग ....:)

नीलांबरी's picture

16 Apr 2011 - 6:27 pm | नीलांबरी

होय. नीलांबरी हे नाव मिसळपाववर तर मधुरिमा हे मायबोलीवर वापरते.

चांगले लेखन!
सगळ्या आयांची कथा म्हणावी लागेल.
३ वर्षांपूर्वी हि कथा मधुरिमा ह्यांची म्हणुन वाचली होती.
अरे वा! मग मुलं आता मोठी झाली असतील आणि पसाराही कमी करत असतील.;) हलके घेणे.
आमच्याकडे सध्या पसारा कमी असतो, कारण मुलाला वाचनाचे वेड लागले आहे. सतत वाचन करण्यामुळे बाकी अ‍ॅक्टीव्हिटीज बंद म्हणजे एकदम बंद! त्यामुळे सध्यातरी घरातल्या सगळ्या वस्तू जागेवर सापडतात.;)

पैसा's picture

16 Apr 2011 - 9:18 pm | पैसा

पण मुलांच्या पाठोपाठ मी पण नोकरीसाठी घराबाहेर पडत असल्याने घर लावणे ही माझ्या दृष्टीने चैन आहे. पूर्वी, म्हणजे मुलं नव्हती तेव्हा मला प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे हवी असायची, इतकी की नवर्‍याला त्याचा सासुरवास वाटायचा. आता आमच्याकडे "जिथल्या तिथे" चा दुसरा प्रकार आहे. म्हणजे घेतलेली वस्तू असेल तिथेच टाकायची आणि विसरून जायचं.

कोणी पाहुणे आले तर मी अजिबात गडबडत नाही. दिवाणावर असलेल्या वस्तू , मांजरं हाताने बाजूला करयचा प्रयत्न करायचा आणि "या, या बसा बसा!" म्हणायचं. जी गोष्ट आपण बदलू शकत नाही, तिचा डोक्याला ताप कशाला करून घ्यायचा हो?

मांजरं हाताने
नवीन शब्द समजला आणि फारच छान.

श्रावण मोडक's picture

17 Apr 2011 - 12:41 am | श्रावण मोडक

'मांजरं हाताने' असं नसावं ते. ती खऱ्याखुऱ्या मांजरांबाबत बोलत असावी. :)

रेवती's picture

17 Apr 2011 - 7:05 am | रेवती

हत्तिच्या! मला वाटलं की मांजरं जश्याप्रकारे पायाचा उपयोग करून वस्तू बाजूला सारतील तश्या प्रकारे की काय!
म्हणजे अगदी हलकेच. हा हा हा !

श्रावण मोडक's picture

17 Apr 2011 - 4:44 pm | श्रावण मोडक

तसं नव्हे. तुला जे वाटलं त्याच्याशी सहमत. कारण तसा शब्दप्रयोग आपण करू शकतोच. फक्त इथं पैसाला जे म्हणायचं आहे ते वेगळं असावं, असं मला वाटतंय. ती काय म्हणते ते पाहू. आणि खऱ्या मांजरांचाच विषय असेल, तर तिला विनंती - तिच्या त्या मांजरांची ती सुंदर प्रकाशचित्रे काढा एकदा बाहेर. :)

होय, तिची खरड आली होती की ती मांजरंच आहेत चार.

पैसा's picture

17 Apr 2011 - 4:52 pm | पैसा

रेवतीच्या म्हणण्याप्रमाणे लिहिलं असतं तर मी इथे "मांजराच्या पावलांनी" शब्द वापरला असता. इथे मला "वस्तू आणि मांजरं" असंच लिहायचं होतं. आमच्याकडे दिवाणावर खरंच ३/४ मांजरं पसरलेली असतात हो! त्यांची प्रकाशचित्रं कधीतरी देईन इथे नक्की! :) (पण या धाग्यावर नको.)

श्रावण मोडक's picture

17 Apr 2011 - 5:07 pm | श्रावण मोडक

आपण भर टाकू. पायाशी संबंधित कृती असेल तेव्हा मांजरपावलांनी. आणि हातांशी संबंधित कृती असेल तेव्हा मांजरहातांनी असं म्हणायचं. अशक्य नाही.
खऱ्या मांजरांविषयीचा माझा अंदाज बरोबर निघाला. त्याला कारण ती सम्राज्ञी. खुर्चीच्या पाठीवर पाय टाकून उभी राहत तिनं दिलेली ती दिमाखदार पोझ डोळ्यांसमोर आहे अजूनही.

गणपा's picture

16 Apr 2011 - 9:22 pm | गणपा

फार सुरेख लिहिलय.

काय गं माझ्या घरी येऊन गेलीस की काय?? ;)
अगदी अगदी असंच होतं माझंही.
नवरा आणि मुलगा, दोघांना सकाळी आपापल्या उद्योगांना पाठवण्या आधी मी चहा सुद्धा घेत नाही. कारण मला नुस्ता चहा नाही आवडत सोबत काहीतरी भरगच्च नाष्टाही लागतो. आणि ते खाण्यासाठी समोर मिपा किंवा तत्सम साईट लागते वाचायला. म्हणजेच काय नाष्ता निवांत करायचा असतो मला. त्यामुळे दोघांन पिटाळून नंतरचा १ तास हा माझा हक्काचा चहा-नाष्ता करण्याचा असतो. मग सुरू होते पळापळ.. हे आवर ते आवर!!
लेख आवडला.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Apr 2011 - 10:57 am | बिपिन कार्यकर्ते

लेखन आवडले. :)

क्रान्ति's picture

18 Apr 2011 - 8:33 pm | क्रान्ति

आवडलं लिखाण. :)

अप्रतिम लिखान ..
मस्त वाटले वाचुन

असेच लिहित रहा .. वाचत आहे..

सखी's picture

18 Apr 2011 - 9:00 pm | सखी

लेखन आवडले, नर्मविनोदी शैलीपण आवडली.

दणदणीत स्पीड आहे लिखाणाला! फुल्ल सुसाट वाचून झालं ष्टार्ट टू येंड!!!! :-)

--असुर

शिल्पा ब's picture

18 Apr 2011 - 11:34 pm | शिल्पा ब

चटपटीत लिखाण...
आजकाल मी आवरायचं फारसं मनावर घेत नाही...अन शोधाशोध करायला पण मदत करत नाही...कीती दमायचं एकटीनेच!!

मराठमोळा's picture

19 Apr 2011 - 11:14 am | मराठमोळा

मस्तच.. एकदम आवडले..
विवाहित गृहिणींच्या व्यथेला वाचा फोडलीत. :)

बाकी वपुर्झा मधले एक वाक्य आठवले - "More and More you write personal, more and more it becomes universal"

थांब जरा . एव्हढ आवरल की पुरा प्रतिसाद टंकते.