खूप वर्षांपुर्वी घडलेली एक सत्यघटना-
चित्राच्या लहान बहिणीचे लग्न ठरल्याचे कळले, आणि आमची नागपूरला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली. मुले त्या वेळी साधारणत: सोळा आणि बारा वर्षे वयाची होती. त्यामुळे त्यांचे आपापले लग्नात धमाल दंगामस्ती करण्याचे प्लान्स होते. हा सगळा उत्साह पाहून मी लगेच चांगली दोन आठवड्यांची सुट्टी घ्यावी लागणार असे सुतोवाच ऑफ़ीसमधे करून ठेवले. बॉसने आंबट चेहऱ्याने, तोंडातल्या तोंडात पुटपुटत संमति दाखवल्यासारखे केले होते. तीच पडत्या फ़ळाची आज्ञा मानून मी लगेच मुंबईची चार तिकिटे बुक करून टाकली. ताबडतोब त्याला तसे सांगून देखील टाकले. म्हणजे नंतर ह्याने नरो वा कुंजरो वा करून, मी संमति दिलीच नव्हती असे नाटक करायला नको. तिकीटे काढलेलीच आहेत हे समजल्यानंतर त्याने अगदी सुट्टीच्या दिवसापर्यंत रोज रात्री दहा-बारा वाजेपर्यंत थांबून संपणार नाही येवढे काम निर्माण करून सूड उगवला होता. अर्थात सुट्टीच्या स्वप्नरंजनापुढे ह्या त्रासाचे काहीच वाटले नव्हते.
आपल्याला जेव्हा प्रवास करायचा असतो, तोच नेहमी पीक सीझन असतो. अशा वेळेस तिकीटे काढणाऱ्या लोकांचे पीक आलेले असते. सगळ्या तिकीटांच्या किमती पीकवर गेलेल्या असतात. त्यातल्या त्यात स्वस्त असलेला पर्याय म्हणजे सिंगापूर-कौलालंपूर-मुंबई असा निवडला. सिंगापूर-कौलालंपूर ही शटल फ़्लाईट होती. म्हणजे, दर अर्ध्या तासाने सुटणारी बसच म्हणा ना! पुढची कौलालंपूर-मुंबई ही मलेशियन एयर लाईन्सची होती. डायरेक्ट जाण्या ऐवजी असे तिकडम करून जावे लागणार म्हणून घरून कटकट ऐकावी लागलीच. पण तिकडे लक्ष द्यायचे नसते! एनी वे, अशी तिकडम यात्रा केली त्यामुळेच नंतरचा सगळा गोंधळ व्यवस्थित सुटला होता. पण हे तेव्हा थोडेच माहित होते!
लग्नासाठी स्वत: आणि बायको, मुले अशा सगळ्यांसाठी खरेदी झाली. तिकडे नेण्याच्या गीफ़्ट आयटम्स, खाण्या पिण्याचे सामान आठवून आठवून भरल्या गेले. तिकडून आलेल्या याद्यांप्रमाणे वस्तू आणण्यात आल्या. ते महिने थंडीचे, म्हणून मुद्दाम गरम कपड्यांची खरेदी झाली. एरवी सिंगापूरला कशाला होतेय ही खरेदी! असे करता करता चौघांच्या चार म्हणता म्हणता छोट्या-मोठ्या आठ बॅगा झाल्या. शिवाय बारक्या पर्स, पिशवी वगैरे वेगळ्या. हे नको, ते कशाला असे करून काही बाहेर काढले की त्या रिकाम्या जागेत दुसरे काही येऊन बसायचे. शिवाय आधी काढलेले देखील कुठेतरी ठासून भरल्या जायचे. प्रत्येक वेळी वजन केल्यावर मोठ्या बॅगातले भारी सामान केबीन बॅग मधे भरण्यात येई. मग मोठ्या बॅगेत जागा झाली की ती जागा पटकन दुसरे हलके सामान बळकावून बसायचे. लग्नाचे वऱ्हाड म्हटल्यावर काही वाद घालणे शक्यच नव्हते.
मोठ्या मुष्कीलीने वजनाच्या सिमेमधे सामान बसवले. आतल्या-बाहेरच्या सगळ्या बॅगा घेऊन वऱ्हाड तयार झाले. खाली टॅक्सी आल्याचा फ़ोन वाजला. सगळे सामान लिफ़्ट भरणे, बाहेर काढणे, टॅक्सीत चढवणे ह्यात दोन्ही मुलांची चांगली मदत झाली. कौलालंपूर शटल पकडण्यासाठी विमानतळावर आलो. टॅक्सीमधून सामान बाहेर निघत होते. दोन्ही मुले सामानाची गाडी आणायला गेली. आणि इथेच ह्रदयाचा ठोका चुकला.
“हे काय! एक बॅग मिसींग आहे!” चित्रा ओरडली.
“काहीतरीच काय! घरी सगळ्या भरल्या होत्या. इथे उतरवून घेतल्या. टॅक्सी मधे एक देखील राहिलेली नाही. मिसींग कशी असेल?”
“अरे मी मोजल्या. एक कमी वाटते आहे.”
“वाटते म्हणजे काय? थांब मी मोजतो.” मी छोट्या-मोठ्या सगळ्या बॅगा मोजल्या. अगदी चित्राच्या हातातल्या पर्सला धरून. बरोबर दहा डाग होते. “ठीकच तर आहे.” मी म्हणालो.
“काहीतरीच काय! ही निळी प्लॅस्टीक पिशवी धरून अकरा होते.” चित्रा ठामपणे म्हणाली.
आतापर्यंत आखडून उभा असलेला टॅक्सी ड्रायवर वैतागला. होणारे संभाषण जरी मराठीत असले, तरी ह्यांचे सामान वगैरे मिसींग आहे हे त्याच्या लक्षात आले होते.
“Please let me go now. Check again in the cab if anything left.” त्याने लकडा लावला. तेव्हा पुन्हा एकदा टॅक्सीत बघून खात्री केली अन पैसे चुकते करून त्याची सुटका केली.
मूळ प्रॉब्लेम कायमच होता.
“अग निळी प्लॅस्टीक बॅग तर एक्स्ट्रा असावि म्हणून घडी करून रिकामी ठेवली होती.”
“हो, पण ऐन वेळेस फ़्रीज मधे ठेवलेले चॉकोलेट आठवले, ते त्यात भरले होते. बर झाल आठवण आली. नाहीतर राहून गेले असते, तुला तर कशाचीच काळजी नसते. मलाच सगळे लक्षात ठेवावे लागते.” अशा प्रसंगी देखील चिमटे काढण्याची संधी सोडणार नाही!
“ओ ह्हो! काय कन्फ़्युज़न आहे! निघतांना एकूण दहा बॅगा होत्या. आता देखील दहा आहेत.” मी पुन्हा मोजून सांगीतले. “चला आता लवकर, उशीर नको.”
हे ऐकल्यावर मुले भराभरा ट्रॉलीमधे बॅगा चढवू लागली.
“अरे असं काय करतोस? निळी बॅग घ्यायची नव्हती, म्हणून घरून निघतांना ती हॅंड बॅग मधे कोंबली होती. तेव्हा तू दहा मोजल्यास. मग आता इथे ती निळी धरून दहा आहेत. म्हणजे एक कमी नाही का?” चित्राने बेतोड मुद्दा काढला.
अरेच्चा! ही निळी पण मी मोजली काय! मी लगेच ती बॅग चित्राच्या हातातून ओढून हॅंडबॅग मधे कोंबली. “अरे अरे जपून, चॉकोलेटचा चुराडा करशील” ह्या ओरड्याकडे लक्ष न देता भराभरा पुन्हा बॅगा मोजल्या. नऊच होत्या.
माझ्या ह्रदयाचे आणखी काही ठोके चुकले.
“हे सगळे तुझ्याच लास्ट मिनीट गोंधळामुळे झाले. कशाला काढली होतीस ती बॅग वर! पुन्हा इथे मोजतांना हातात घेऊन उभी आहेस. तुम्हा बायकांचा सगळाच गोंधळ असतो.” चुकलेले ठोके भरून काढण्यासाठी ह्र्दयाने गती पकडली. ती धडधड बाहेर देखील ऐकू येत होती असे वाटले. तितक्यात बाजुने सामान खच्चून भरलेली एक ट्रॉली धडाधडा ओढीत कुणी प्रवासी निघून गेला.
“अरे बापरे! एक बॅग राहिली वाटते घरी!” आता कुठे परिस्थितीचे खरे आकलन होऊ लागले होते.
“अरे तुझीच बॅग नाहीय या मधे!” चित्रा म्हणाली. “तूझा नविन सूट आणि लग्नासाठी घेतलेले गिफ़्ट्स त्यात आहेत.”
मी भराभरा घड्याळात पाहून अंदाज घेतला. घरी जाऊन बॅग आणण्या येवढा वेळ मुळीच नव्हता. पण मला आणखी विचार त्रासून गेला. ती बॅग घरामधे नक्कीच नव्हती. कारण निघतांना मी सगळ्या खोल्या व्यवस्थित चेक करून काही सामान राहिले नाही हे बघून घेतल्याचे आठवत होते. “अग, ती बॅग घरात नक्कीच नाही.”
म्हणजे दार बंद केल्यावर दारासमोर राहिली, लिफ़्ट मधे चढवलीच नसेल. किंवा लिफ़्ट मधून बाहेर काढल्यावर एक एक करून टॅक्सी पर्यंत नेल्या तेव्हा एक बॅग लिफ़्टच्या दारासमोर राहिली असेल! हा अंदाज आम्हा दोघांनाही आला.
“अरे देवा! आता काय करायचे?”
“अग तू आपल्या मजल्यावर रहाणाऱ्या ममताला फ़ोन करून पहा. तिला विचार की आमच्या दारासमोर, किंवा लिफ़्टच्या सहाव्या किंवा तळमजल्यावर एखादी बॅग दिसते आहे का?”
“ममता तिच्या नवऱ्याबरोबर नुकतीच ऑफ़ीसला जायला निघाली असेल.” म्हणत चित्राने भराभरा तिला फ़ोन लावला. जास्त विचार करायला वेळच नव्हता.
“हॅलो, ममता, मी चित्रा बोलते आहे.”
“.........”
“अग मी एयरपोर्ट वरून बोलते आहे. इमर्जन्सी आहे.”
“.........”
“आमची एक बॅग राहिली तिथे. तू बघ आमच्या दारासमोर किंवा लिफ़्टच्या खालच्या वरच्या दारासमोर आहे का ते.”
“.......”
मी कानात प्राण आणून ऐकत होतो, पुढे काय? पण चित्रा नुसतीच फ़ोन कानाला लावून गप्प.
“अग काय झाल? काय म्हणाली ती?”
“बर झाल लगेच फ़ोन केला!”
“म्हणजे बॅग मिळाली?”
“नाही, अरे ती आणि अशोक नुकतेच लीफ़्टने खाली उतरले आणि कार मधे बसतच होते, तेवढ्यात मी फ़ोन केला म्हणाली.”
“????”
“म्हणे सहाव्या किंवा तळमजल्यावर, किंवा लिफ़्टमधे सुद्धा बॅग नव्हतीच.”
“अग, मग तिला आपल्या अपार्टमेंट समोर पहायला सांग!”
“तेच पहायला ती वर गेली आहे.”
त्यानंतर कित्येक क्षण टांगलेल्या अवस्थेची टकटक अनुभवली.
“हा बोल...बोल..”
“.......”
“ओह नो!...अरे आपल्या दारासमोर पण बॅग नाहीय!”
“........”
“ती विचारतेय काय करू म्हणून!”
“आता ती तरी काय करणार? कोणीतरी ती बॅग आधीच घेऊन गेलेला असणार! जाऊदे. आपली फ़्लाईट थोडीच मिस करणार आपण त्या बॅग साठी?” मी घड्याळाकडे पहात म्हटले.
चित्राने थोडे आभाराचे बोलून फ़ोन ठेवून दिला. चित्त सैरभैर झाले होते. सुन्न होऊन सामान ट्रॉलीवर चढवले आणि चेक ईनच्या रांगेत लागलो. नुकसान जोपर्यंत फ़क्त संभाव्य असते, तोपर्यंत त्या नुकसानाची बोच तीव्र असते. एकदा का नुकसान झालेय हे सत्य उघडे झाले, की मलमपट्टी आपोआप बांधली जाऊ लागते.
“जाऊ दे. तिथे गेल्यावर रेडीमेड सूट घेईन. गीफ़्ट्स सुद्धा पुन्हा आणता येतील. निदान ज्याच्या त्याच्या पसंतीच्या तरी येतील!” खिसा कितीला कापल्या जाईल हा हिशेब मनात करत मी बळेबळे म्हटले.
“अरे पण त्यात कितीतरी वस्तु होत्या. माझ्या आईने मला काही दिवस वापरायला म्हणून ठेवलेली तिची आवडती साडी देखील त्यातच ठेवली होती!” आईची आवडती साडी हरवली तर तिथे काय गहजब होईल हे दृष्य चित्राच्या डोळ्यासमोर तरळू लागले. ही जखम कुठल्याही मलमपट्टीने बरी होणारी नव्हती. जखम तिला, आणि जन्मभर अश्वत्थामा मी भटकणार!
चेक ईनची लाईन सरकत सरकत आमच्या पुढे तीन लोक असतांना चित्राचा फ़ोन वाजला. वाजला नाही, मन प्रसन्न करणारे शुद्ध संगीत!
“हा ममता, काय झाले?”
“..........”
“मग?”
“..........”
“काय सांगतेस!
“..........”
ऐकलेल्या प्रत्येक वाक्यागणीक चित्राच्या चेहऱ्यावर फ़ेअर अॅंड लव्हली्ची जाहिरात उमटत होती.
“.........”
“वॉव! सो नाईस ऑफ़ यू!”
“अग काय झालं, मिळाली का बॅग?” मी न राहवून नीसीटीजचा भंग केला.
“हो हो.. मिळाली......ओके ओके. थॅन्क्स अ लॉट. वी वेट हिअर फ़ॉर यू...” आणखी काही नीसीटीज नंतर फ़ोन ठेवला.
चित्राने फ़क्त आनंदाने उड्या मारण्याचेच काय ते बाकी ठेवले होते. हळुहळू तिने काय झाले ते सगळे सांगितले. तिकडे फ़ोन ठेवल्यावर तिची मैत्रीण ममता काही गप्प बसली नव्हती. खरं तर, तिला विचारले होते, बॅग लिफ़्ट पाशी वा घरासमोर आहे का ते पाहून सांग. हे पहाण्यात त्या दोघांना आधीच ऑफ़ीसला जायला उशीर झाला होता. दुसरी एखादी असती तर, आपण आपले सांगण्याचे काम केले ह्यात संतोष मानून ऑफ़ीसला निघून गेली असती. पण ममताला हे काही पटले नाही. बॅग अशी गेलीच कुठे असेल? ती लगोलग अपार्टमेंट संकूलात असलेल्या कचरा घराकडे गेली. इथे सगळ्या रहिवासी संकूलात सफ़ाई कर्मचाऱ्यांसाठी एक कंपाउंड बांधले असते. त्यात मोठे कचराघर, त्यात कचरा कॉंपॅक्टींगची सोय, मागे सफ़ाई कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खोली वगैरे सोयी असतात. ह्या कंपाउंडमधे कुठेच नेहमीचा सफ़ाई कामगार दिसला नाही, तेव्हा ममता सरळ दार ठोठाऊन त्यांच्या खोलीत शिरली. आणि काय आश्चर्य! तो कामगार एका बॅगशी झटापट करतांना तिला दिसला. ही आमचीच बॅग असणार हे उघड होते. बॅगच्या बाजुला स्कृ ड्रायव्हरने चीर करून त्यातून एक कपडा बाहेर ओढून काढतांना त्या कामगाराला ममताने ऐन वेळेस पकडले होते. तिने दरडावून विचारले, ही कोणाची बॅग आहे? तेव्हा तो ततपप करीत म्हणाला की कोणीतरी लीफ़्ट पाशी टाकून दिली होती. ममताने त्याची चांगली हजेरी घेतली. ही कुलूप लावलेली बॅग काय फ़ेकून दिल्यासारखी दिसतेय तुला? आणि कोणाला फ़ेकायची असेल तर तो कुलूप लावून लीफ़्ट पाशी ठेवेल, का एका बाजुला उघडी टाकेल? तिने त्याला दाट फ़टकार करून बॅग ताब्यात घेतली. आणि आता ममता आणि तिचा नवरा बॅग घेऊन एयरपोर्ट वर यायला निघाले होते.
हे ऐकल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला. असे शेजारी मिळणे म्हणजे किती भाग्य! पण आता दुसराच प्रॉब्लेम उभा राहिला होता. आमचे चेक ईन आम्ही अगदी शेवतच्या क्षणापर्यंत टाळून देखील, ते काऊंटर बंद होईपर्यंत ममता एयर पोर्टवर पोहोचली नाही. बरे, आमचे सामन इतके होते, की ती आल्यावर पुन्हा री-अॅडजस्ट करून हातातल्या सामानात त्यातले काही घ्यायचे, काही ममताबरोबर घरी परत पाठवायचे हे सगळे करायला मुळीच वेळ शिल्लक नव्हता. चेकईन काउंटरवाला घाई करीत होता. शेवटी नाईलाजाने त्या बॅगशिवायच अगदी काउंटर बंद होताहोता चेक ईन केले. अजून देखील ते लोक पोहचले नव्हते. ह्या वेळेचा ट्रॅफ़ीक जाम कुप्रसिद्ध आहे हे माहित होतेच. आता इमिग्रेशनला जाण्याआधी जर बॅग हातात आलीच, तर त्यातील एकदोन महत्वाच्या गोष्टी काढून हातात घ्यायच्या आणि बॅग ममताबरोबर परत पाठवून द्यायची येवढेच करता आले असते. फ़ोन करून ममताला विचारले, आणखी किती वेळ लागेल? ती म्हणाली जॅम आता थोडा कमी वाटतो आहे. तरिही बहुदा पंधरा मिनटे लागतील. आम्हाला आत जाण्यासाठी पंधरा मिनटे कटाकटीने काढता आली असती. आपण प्रत्येक मिनटाला घड्याळ बघितले तर घड्याळाचा काटा नेहमिच्या १/४ गतीने पुढे सरकतो हा नविनच शोध मला त्या दिवशी लागला. आईनस्टाईनच्या रिलेटीव्हिटी थीयरीमधे हे आहे की नाही हे ठावूक नाही!
पण घड्याळ्याच्या काट्याने कितीही नखरे केले तरी तेवढे फ़ेरे करून पुढे जात रहाणे त्याला भागच होते. त्यामुळे जीत आमचीच झाली आणि एका शुभ क्षणी ममता-अशोक बॅग ढकलत हॉलच्या प्रवेशदारातून येत असलेले आम्हाला दिसले. तोंडाची वाफ़ दवडायला मुळीच वेळ नव्हता, तरी देखील दोन बायकांनी आधीच बोलून झालेल्या घटना पुन्हा एकदा फ़ास्ट फ़ॉरवर्ड करून वाजवल्या. तेवढ्या अवधीत मी अशोकला धन्यावाद वगैरे देऊन सांगीतले, आमचे चेक इन होऊन गेले, काऊंटर बंद झाले. मी फ़टफ़ट एक दोन वस्तू काढून बॅग तुझ्या बरोबर परत पाठवतो. त्यांचे प्रसंगावधान पहा- त्यांनी प्रसंग ओळखून एक छोटी हॅंडबॅग देखील बरोबर आणली होती! मी बॅग एका बाजुला खुर्चीवर वगैरे ठेवून उघडावी म्हणून जागा शोधू लागलो. तेवढ्यात काऊंटरवरच्या लाईनीत एका सरदारजीला पाहून अशोक उदगारला- “अरे हा कुठे चाललाय!” मी म्हटले “कोण?”
“माझा कस्टमर आहे. थांब त्याच्याशी थोडे बोलून येतो.” म्हणून अशोक तिकडे गेला. ईकडे मी हॅंडबॅगेत थोडे सामान भरले. उरलेले आमच्या बॅग मधून अशोक बरोबर परत पाठवता आले असते. हातातले सामान जास्त झाले म्हणून आत थोडी कटकट ऐकावी लागली आसती. पण ते बघून घेऊ.
इतक्यात अशोक त्या सरदारजीला घेऊनच आला. “अरे हा तुझ्या नंतरच्या शटलने के.एल. ला जात आहे. तिथून त्याची मुंबईची फ़्लाईट आहे. तुमची जी आहे तीच!”
माझ्या डोक्यात एकदम बल्ब पेटला! तोच विचार अशोकने देखील केला होता. सरदारजीकडे जास्त सामान नव्हते. तो ऑफ़ीसच्या कामासाठी मुंबईला जात होता. ऐन वेळीस दुसरे कुठलेच तिकीट मिळाले नाही म्हणून त्याला के.एल. तर्फ़े जावे लागत होते. मुख्य म्हणजे तो आमची बॅग चेक ईन करून घेऊन जायला तयार होता! अचानक देव भेटल्यासारखे झाले. अर्थात बॅग आम्हाला मुंबईलाच सरदारजीकडून घ्यावी लागणार होती. एकदम मस्त अरेंजमेंट होती! दोघांचेही पुन्हा पुन्हा आभार मानता मानता मी माझ्या बॅगेत सगळे सामान भरले, कुलुप लावून किल्ली आणि बॅग सरदारजीच्या हातात दिली. घाईघाईत त्याचे नाव विचारून घेतले. आणि आम्ही सगळे ममता-अशोकचा निरोप घेऊन इमिग्रेशन काऊंटरकडे पळालो. एका अनावश्यक घालमेलीवर पडदा पडला होता.
एका अनावश्यक घालमेलीवर पडदा पडला होता असे वाटले, पण तसे नव्हते. सुटलेली सुटकेस अजूनही सोबत नव्हती. के.एल. ला मिळालेल्या अल्प अवधीत आम्हाला कोणालाच तो सरदार कुठे दिसलाच नाही. खरे तर मुंबई फ़्लाईटसाठी त्या हॉलमधे असायला पाहिजे होता. त्यांची शटल आलेली देखील मी स्क्रीनवर पाहिले. आम्ही आमच्या सीट्स पकडल्या. मुंबईच्या विमानात देखील पुढे पासून मागे पर्यंत दोनदा फ़िरून पाहिले. बरेच सरदार दिसले. पण आमचा सरदार दिसेना. चित्रा मला विचारतेय, अरे तू नीट पाहिले होते का त्याला? कारण मला काही त्याचा चेहरा इतका नीट आठवत नाहीय. तिने असे म्हटल्यावर मलाही थोडी शंका आली. पण ती मी बाजुला सारली. कदाचित डोक्यावरून शाल ओढून झोपलेल्या चार पाच जणांपैकी एक असेल. कदाचित मी विमानात फ़ेरी मारत असतांना तो नेमका टॉयलेट मधे असेल. कदाचित तो बिझिनेस क्लासमधे असेल. कदाचित.... कदाचित.... असे करता करता मला कदाचित त्याचे नाव जसबीर होते की जसवंत होते की जगपाल... असे अनेक कदाचित होऊ लागले. जाऊदे. आता मुंबईला उतरल्यावर तोच आपल्या कडे येईल. आतापर्यंत सगळे नीट झाले आहे. पुढेही होईल. मी सगळे विसरून समोरच्या असलेल्या पेयाची नीट विचारपूस सुरू केली.
मुंबई एयर पोर्ट. तोच परिचित वास. तीच सर्वत्र माखलेली मरगळ. इमिग्रेशनच्या लायनीत पेंगुळलेले डोळे चारी बाजुला सरदार शोधत होते. आणि अचानक एका पागोट्याखालचे डोळे ओळखीचे हसले. हातांनी एकमेकांना दाद दिली. आमचा सरदार सुखरूप पोहचला होता!
यथावकाश सुटलेली सुटकेस आमच्या ताब्यात आली. मी म्हणालो, आता ह्यानंतरची सगळी ट्रीप मस्तच होणार. कारण आपला प्रॉब्लेम्सचा कोटा आपण निघतांनाच पूर्ण केला आहे. तेव्हा आता सिंगापूरला परत येई पर्यंत जस्ट चील!
************************************************************
प्रतिक्रिया
8 Apr 2011 - 3:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आयला... मस्तच.... ह. ह. पु.वा. झाली. पण त्या वेळेस होणारी धकधक नक्कीच जिवघेणी असते. असो.
लिखाण मस्तच झाले आहे. मजा आली.
हे तर..... विचारुच नका....
8 Apr 2011 - 3:52 pm | पैसा
गावाला जाताना नेहमीचा गोंधळ. असं काहीतरी झालंच पाहिजे. पण वाचताना मस्त मजा आली!
यानंतर घरातून "ममता आणि तिचा नवरा किती चांगले, प्रसंगावधानी आहेत, नाहीतर तुम्ही!" हे ऐकावं लागलं की नाही बरेचदा?
8 Apr 2011 - 3:56 pm | प्रास
अरुणजी,
मस्त लिखाण!
>>>>तोंडाची वाफ़ दवडायला मुळीच वेळ नव्हता, तरी देखील दोन बायकांनी आधीच बोलून झालेल्या घटना पुन्हा एकदा फ़ास्ट फ़ॉरवर्ड करून वाजवल्या<<<<
हे आवडलं आणि पटलं :-)
8 Apr 2011 - 4:03 pm | नगरीनिरंजन
खुसखुशीत लेख!
8 Apr 2011 - 4:15 pm | यशोधरा
मजा आली वाचताना!
8 Apr 2011 - 4:32 pm | टारझन
खरपुस !! :)
8 Apr 2011 - 4:49 pm | मी ऋचा
या प्रसंगात आम्चे बाबा असते तर सगळ्यांना त्यांनी विनाकारण भो*** वगैरे शिव्यांची लाखोळी वाहीली असती नक्की आणि ते चित्र डोळ्यापूढे येऊन वाचताना आणिकच मज्जा आली ;)
8 Apr 2011 - 8:46 pm | योगी९००
मस्त अनुभवकथन..
माझ्याही बाबतीत असाच एक प्रसंग झाला होता. मी नॉर्वेत एका घरातून दुसर्या घरी शिफ्ट केले होते तेव्हा एक बॅग (केबीन बॅग) अशीच घराच्या खालती राहीली.
बायकोशी भांडल्यावर दुसर्या दिवशी परत पुर्वीच्या घरी गेलो तर बॅग जशीच्या तशी घरासमोर मिळाली. तेवढ्या एका रात्री आणि सकाळी १० वाजेपर्यंत कोणीही त्या बॅगेला हात लावलेला (बहुतेक) नव्हता.
8 Apr 2011 - 10:11 pm | मराठे
मस्त खुसखुशीत लेख!
8 Apr 2011 - 10:48 pm | रेवती
वाचताना आमचीही तुमच्याबरोबर पळापळ झाल्यासारखे वाटले.;)
लेखन आवडले. अश्वत्थाम्याचे उदाहरण वाचून फिसकन हसू आले.
8 Apr 2011 - 11:01 pm | शिल्पा ब
असेच म्हणेन.
लै भारी लिहिलंय. :)
8 Apr 2011 - 10:55 pm | स्मिता.
अनुभव मस्तच! आता त्याचं हसायला येत असलं तरी त्यावेळी फार टेंशन असेल.
जखम तिला, आणि जन्मभर अश्वत्थामा मी भटकणार!
हे बेश्ट!
8 Apr 2011 - 11:02 pm | प्राजु
नेहमीप्रमाणेच फटाके बाज!!
मस्त! लिहिता लिहिता मध्ये मध्ये टाकलेल्या लवंग्या चांगल्याच फुटल्यात. :)
8 Apr 2011 - 11:12 pm | कुसुमिता१२३
छान किस्सा आहे!
9 Apr 2011 - 4:16 am | टुकुल
मस्त...
मजा आली वाचायला.
--टुकुल
9 Apr 2011 - 4:56 am | सुनील
मस्त!!
9 Apr 2011 - 10:46 am | गणपा
स्वतः असला अनुभव घेतला नाही. पण प्रवासाच्या आधल्या रात्री बरेच वेळा अशी स्वप्न पडतात ज्यात मी पासपोर्ट विसरुन विमान तळावर पोहोचलोय आणि विमान उड्डाणाची वेळ झाली आहे. मग दचकुन जाग येते.
आता तुमचा हा किस्सा ऐकुन त्यात बॅगेची पण भर पडणार बहुतेक. :)
9 Apr 2011 - 10:56 am | sneharani
मस्त!! मजा आली वाचायला!!
9 Apr 2011 - 11:01 am | निनाद मुक्काम प...
कौतुक आहे .
तुमच्या लिखाणाचे व त्या प्रसंगात जे प्रसंगावधान तुमच्या परिवाराने व शेजार्यांनी दाखवले .त्याबद्दल
12 Apr 2011 - 10:28 pm | पुष्करिणी
सह्हीच, मजा आली वाचताना :)