मेंदीचा दरवळ

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
24 Aug 2010 - 9:37 pm

मागच्या आठवड्यात कोणाला तरी मेंदीची आठवण आली. आणि मग राखी पौर्णिमेला मेंदी काढूया असे ठरले. इथे पाकिस्तानी दुकानात मेंदीचे तयार कोन मिळतात. पण त्यात कोणतीकोणती रसायने मिसळली असतात म्हणे. मग काय कोन पण आपणच करूया असे ठरवले. कोणीतरी भारतातली मेंदी शोधून आणली. मोठ्या उत्साहात एका पातळ कपड्याने मेंदी चाळली. मग ती पाणी आणि निलगिरी तेल घालून लोण्याएवढी पातळ भिजविली. कात्री, प्लास्टिकचे पेपर, चिकटपट्ट्या यांचा एवढामोठ्ठा पसारा करत कसेबसे ४ धड कोन तयार केले. त्यात मेंदी भरली. नि वर रबर लावून ते बंद केले. सगळ्या घरभर मेंदीचा वास, निलगिरी तेलाचा वास घमघमत होता. मन भरून तो वास घेतला. किती वर्षं झाली अशी साग्रसंगीत, स्वतःच सगळी तयारी करून मेंदी रेखाटल्याला ?

अगदी लहान असेन मी. सहा सात वर्षाची. आमच्या घरमालकांना एक मुलगी होती. आम्ही कांचनताई म्हणायचो तिला. तर या कांचनताईने एकदा तिच्या हातावर काढलेली मेंदी दाखवली. झालं. मला अगदी तश्शीच मेंदी काढायची म्हणून आईकडे हट्ट धरला. गोर्‍यापान हातांवर, कोनाने अगदी नाजूक नक्षीत रेखाटलेली आणि गडद्द रंगलेली ती मेंदी म्हणजे त्या दोन दिवसांसाठी माझं स्वप्न झाली होती. आईला काही कोन वगैरे घेऊन मेंदी काढता येत नव्हती. तिने कांचनताईला विचारले तर तिला वेळ नव्हता. कोनही संपला होता म्हणे. मग आईने मेंदी भिजवून काडेपीटीतल्या काडीने हातावर एक स्वस्तिक आणि ठिपके अशी मेंदी काढून दिली. मला मुळीच आवडली नाही ती. अर्ध्या तासात हात नळाखाली धुवून मोकळी. 'तश्शी' मेंदी पायजे ! मग आईने काडीने अगदी बारीक बारीक ठिपके हातभर काढली. मग कुठे थोडेसे समाधान झाले. थोड्या काळाने कळू लागले की मेंदी नुसती छान काढून भागत नाही. रंगली की नाही बघण्याच्या नादात हातावरची सगली मेंदी २ तासात धुतली जायची. मग ती केशरी रंगायची. छान लाल चॉकलेटी रंग काही यायचा नाही. मग मी पुन्हा रडायची.

पुढे मेंदी हा विषय स्वतःच्या हातात घेतला. १०-१२ वर्षांच्या मैत्रिणींच्या आमच्या गटात तासंतास मेंदी कशाने रंगते अशा चर्चा व्हायच्या. तेव्हा बाजारात सहजपणे आजच्यासारखे तयार कोन मिळत नसत. मग प्रत्येकजण आपली ताई, मावशी, काकू मेंदी रंगण्यासाठी काय काय करतात ते सांगायच्या. आणि आम्ही घरी जाऊन ते प्रयोग करायचो. कुठे मेंदी चहाच्या पाण्यात भिजव, कुठे काताचं पाणी टाक, कधी लिंबाच्या रसात तर कधी चिंचेच्या पाण्यात मेंदी भिजवायचो. आमच्या घरात मी एकटी मुलगी नि बाकी सगळे मुलगे असल्याने मला एकटीला स्वतंत्र प्रयोग करता येत. आईपण फारसे लक्ष देत नसे. आमच्या वर्गात एक मुसलमान मैत्रीण होती. एकदा तिच्या आईने सांगितले की त्या काकू त्यांच्या लहाणपणी मेंदीत चिमणीची शी घालयच्या ! पण आजकाल निलगिरी तेलानेही काम होते. यातलं लॉजिक काही कळलं नाही. पण त्या मैत्रिणीच्या आमच्यापेक्षा जास्त रंगलेल्या मेंदीकडे आम्ही कसनुसे तोंड करून बघायचो एवढंच आठवतंय.

सातवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आई म्हणाली चल आपण मेंदीचा क्लास लावूया ! आयुष्यात क्लास लावण्यासाठी आनंदाने जाण्याची ती पहिली वेळ ! पण तो क्लास विचित्रच होता. मी आणि अजून एक मैत्रीण अशा दोघीच असायचो. शिकविणारी ताई एक मेंदीच्या डिजाईन काढलेली वही समोर ठेवायची नि बघून काढा म्हणायची. स्वतः टीव्ही बघत बसायची. तिथे फक्त साधारण मेंदी साठी कोणत्या प्रकारच्या नक्षी असतात एवढेच बघायला मिळाले. आणि हो, कोन कसा करायचा ते मात्र शिकायला मिळाले. चित्रकलेत माझा आनंदच होता. त्यामुळे बाकी काही शिकले नाही तरी कोन करता येतो या एका गोष्टीच्या जोरावर चुलत मावस मामे बहिणींमध्ये माझा भाव वाढला.

सणासुदीला सगळे एकत्र आलो की मेंदीची टूम निघायची. मग मी मेंदी काढणार म्हटल्यावर बाकी सगळ्या बहिणी मी सांगितलेली सर्व कामं करायला तयार असायच्या. एकतर मी सर्वात मोठी होते आणि मेंदीचा क्लास मी एकटीने केला होता ना ! मग मी सगळ्याना कामाला लावयची. मेंदी पुडा आणणे, मेंदी वस्त्रगाळ करणे, लिंबाचा रस गाळून वाटीत तयार ठेवणे, काताचे पाणी तयार करणे आणि मोठ्या माणसांची मर्जी झालीच तर निलगिरी तेलाची २ रु. ची छोटी बाटली विकत घेणे. मग मोठ्या कौशल्याचा आव आणून मी मेंदी भिजवत असे. मग ती ५-६ तास भिजवून ठेवायची. रात्री भराभरा जेवणं उरकायची. बाथरूमला जाऊन यायचं. ( पुन्हा खोळंबा नको ! ) हात साबणाने स्वच्छ धुवून यायचे नि मग मेंदी ची मैफिल बसायची. रात्री उशिरापर्यंत मान पाठीला रग लागेपर्यंत मेंदी लावणे चालायचे. नक्षी कोणतीही असो. ती बारीक हवी नि हात मनगटापासून नखांपर्यंत भरलेला दिसला पाहिजे एवढेच उद्दिष्ट असायचे. हात भरून मेंदी लावली की पोरगी खुष ! मग ती मेंदी सुकून निघून जाऊ नये म्हणून त्यावर साखरेचे पाणी कापसाच्या बोळ्याने हलकेच लावायचे.

सकाळी उठल्यावर सुकलेल्या मेंदीला तेल लावून कोमट पाण्याने ती धुवायची. मस्त केशरी, लाल रंगात रंगलेली ती मेंदी बघितली की रात्री जागल्याचा सगळा शीण जायचा. नागपंचमी, राखी पौर्णिमा, दसरा, दिवाळी अशा सगळ्या सणांना मेंदी हवीच. अगदी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलासुद्धा !

पुढे कॉलेजात गेल्यावर मेंदीचे अर्थ बदलले. मारवाड्यांच्या मुली कोपरापासून मेंदी काढत। ती बघायला खूप आवडायचे. कोन हातात धरून अगदी भराभरा नाजूक ,सुंदर नक्षी काढत बघता बघता पूर्ण हात रंगत असे. ती मेंदी काढतानाची तन्मयता पण तितकीच सुंदर भासे. गोर्‍या पावलांवरची नाजूक मेंदी पण बघणार्‍याला प्रसन्न करायची. स्नेहसंमेलनात मेंदीच्या स्पर्धा असायच्या. मी बहुतेक वेळा माझे हात या स्पर्धेसाठी वापरायला द्यायची !

मेंदी रंगण्यावरून चिडवाचिडवी व्हायची. कोणी आपल्यावर खूप प्रेम करत असेल तर मेंदी खूप रंगते असे सगळ्या मुली म्हणत. ज्या खरोखरीच प्रेमात पडलेल्या आहेत त्या मेंदीच्या नक्षीच्या गर्दीत कुठेतरी आपल्या हीरोचे नाव लिहीत. मुलंही कोणाच्या तरी लग्नाबिग्नाचे निमित्त करून टिपिकल बदाम वगैरे मेंदीने काढून त्यात आपल्या हिरॉईनच्या नावाचे आद्याक्षर लिहीत.

लग्न समारंभात अजून जोडे पळविणे, मेहंदी रसम वगैरे प्रकार आपल्याकडे सुरू झाले नव्हते. त्यामुळे नवरीची मेंदी हा अगदी खाजगी कार्यक्रम असे. नवरीच्या हातावर मेंदी काढण्यासाठी ओळखीतलीच कोणी मुलगी येई. मग करवल्या, नवरी नि मेंदी काढणारी ४ तास एका खोलीत गुडुप होत. या मेंदीत मात्र नेहमीची नक्षी न काढता मोर, डोली, बारात अशा थीमची नक्षी काढत. ती मेंदी रंगेल की नाही ही स्वतः नवरीसाठी पण काळजी असे. मेंदी हमखास रंगण्यासाठी चार लवंगा तव्यावर टाकून त्याच्या धुरात हात धरावे असे मेंदी काढणारी सांगून जाई. आईच्या तव्याशी नवरीचा तसा तो शेवटचाच संपर्क. लग्नात नवरदेवाने नवरीच्या हातावरच्या मेंदीत आपले नाव शोधायचे असा एक खेळ आम्ही खेळायचो.

लग्नात मेंदी काढल्यानंतर पहिल्या वर्षभरात कौतुकाने इतरांकडून मेंदी काढून घेण्यात मजा आली. मग कामाच्या रगाड्यात वेळ मिळेनासा झाला. आलीच कधी लहर तर आयता कोन आणून कामाच्या ठिकाणी अगदीच ऑड दिसणार नाही इतपत मेंदी काढली जाते. कोन विकतचा असल्याने त्याची तेवढी किंमत नसते. हमखास रंगण्याची खात्री असते. मेंदी रंगेल की नाही ही हुरहूर नसते . हल्ली वेगवेगळ्या रंगात दिसणारे मेंदीचे टॅटू पण सर्रास वापरले जातात.

खूप दिवसांनी मेंदीचा कोन करताना हे सगळं आठवत होतं. काल संध्याकाळी इथे असणार्‍या आम्ही ५ - ६ भारतीय मुली एकत्र भेटलो. आधी सगळ्यांच्या मुलांच्या हातावर एकेक चित्र मेंदीने काढलं. मग एकमेकींच्या हातवर. प्रत्येकीच्या हातावर मेंदी काढताना चेहर्‍यावर आपापल्या भावविश्वात रमल्याच्या खुणा बघत होते. कोणालाच अगदी सुंदर नक्षीकाम येत नव्हते. समोर एक मेंदीचे पुस्तक होते पण एक रेष सरळ येत नव्हती ! पण मिळून काहीतरी करण्याचा आनंद मात्र खूप मोठा होता. डोळ्यात लहाणपणीचे निरागस कुतुहल, एकमेकींच्या नक्षींचे कौतूक ( चक्क ! ) , आणि मेंदी पूर्ण झाल्यानंतर प्रेमाने आपल्याच हातकडे बघतानाचे समाधान ! गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि महाराष्ट्रातले हात एकाच मेंदीने रंगत होते. प्रत्येकीच्या मनातली मेंदी दरवळत होती.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

सुनील's picture

24 Aug 2010 - 9:46 pm | सुनील

लेख आवडला. बाकी मेंदी लावलेले हात दिसतात छान!

मेघवेडा's picture

24 Aug 2010 - 10:45 pm | मेघवेडा

असेच म्हणतो.

छोटा डॉन's picture

24 Aug 2010 - 11:29 pm | छोटा डॉन

मी पण हेच म्हणतो.

लेख एकदम क्लासिक आहे, आवडला :)

निखिल देशपांडे's picture

24 Aug 2010 - 11:31 pm | निखिल देशपांडे

अगदी असेच म्हणतो
लेख छानच आहे.

सुबोध खरे's picture

19 Dec 2013 - 10:41 am | सुबोध खरे

मेंदी लावलेले हात "हातात घ्यायला" जास्त आवडतात. मेंदी नीट बघण्याचा बहाणा चांगला असतो.( अननुभवी लोकाना एक अनाहूत सल्ला- तसे हस्तसामुद्रिक शिकलात तरीही फायदा होऊ शकतो.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2010 - 10:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच ... मी ही थोडी वर्ष मागे गेले. आमच्या शेजारच्या आवारात मेंदीची झुडपं होती. सुट्ट्यांमधे आम्ही थोड्याशाच ज्या मुली होतो त्या मेंदीची पानं अक्षरशः ओरबाडून आणायचो, बिल्डींगच्या मागे टाकी होती तिथे ती वाटायची आणि थोड्या वेळात उत्साह संपला की ती धुवून टाकायची!
पुढे मी थोडी मोठी झाल्यावर माझ्या चुलत बहिणीला मेंदी काढायची हौस असायची. तिची चित्रकलाही उत्तम आणि माझा हात तिच्यापेक्षा मोठा, मेंदी खूप रंगायची, मेंदी काढून घेण्यापुरतातरी खूप पेशन्स वगैरे असल्यामुळे गणपती, दिवाळीत ती दोन्ही हातभर मेंदी काढून द्यायची. शाळेत मी खूप भाव खाऊन घ्यायचे.

अगदी गेल्याच आठवड्यात मकीने हातावर मेंदी काढून दिली ... आणि पुन्हा तेच दिवस जगता आले. टिवल्याबावल्या, गप्पा आणि एकीकडे हातावर मेंदी! पुढे दोन-तीन दिवस थोडाजरी कंटाळा आला तरी हातावरच्या मेंदीचा वास घ्यायचा ... एकदम मस्त वाटत होतं.

मेंदी काढलेले हात मलाही आवडतात ... आणि माझ्यासारख्या लोकांनी काढलेलं डिझाईन कसंही वेडंबागडं जरी आलं ना तरी मेंदी रंगली की छानच दिसते.

चित्रा's picture

24 Aug 2010 - 11:45 pm | चित्रा

असेच म्हणते. असेच आमच्याही इथे मेंदीची झुडुपे असत. त्यांना वाटणे हा एक दिव्य प्रकार असायचा. आधी प्लास्टिक हातावर घालून मग ती मेंदी वाटायची, नाहीतर मेंदी वाटण्याऐवजी हाताला आधीच रंग लागायचा.

नंतर कोन मिळायला लागले तेव्हा डिझाइने वाढली. तोवर (स्वच्छ) खराट्याच्या बारीक काडीने किवा आगपेटीच्या काडीने मेंदीची डिझाईने काढत असू. ते बारीक कोरीवकाम कोनांशिवाय शक्य नव्हते.

लेख खूपच आवडला.

मेंदीच्या पानावर .. गाणेही आठवले.

मस्त कलंदर's picture

24 Aug 2010 - 11:53 pm | मस्त कलंदर

मेंदी काढून घ्यायला मलाही पुष्कळ आवडते. आता मितान आणि अदिती यांनी इतके लिहिलेय, की जणू ते माझेच म्हणणे असावे. मी देखील माझ्या बहिणीला या मेंदीसाठी मस्का मारायचे आणि ती जाम भाव खायची. तळव्यावरच्या ओल्या मेंदीचा सुगंध, नंतर ती सुकल्यावर गालावर हात फिरवताना होणारा खरबरीत स्पर्शासोबत मंद वास.. आणि नंतर कित्येक दिवस टिकणारी काळीशार लाल मेंदी ( माझ्या हातावर मेंदी अंमळ जास्तच रंगते ;) )सगळे अगदी मनापासून आवडते.

एकदा कॉलेजमध्ये काही कार्यक्रम होता. दोन मुली मेंदी काढून देत होत्या. त्या दिसल्याक्षणी काही विचार न करता त्यांच्यासमोर हात पसरला, आणि मग पोटात कावळे कोकलू लागल्यावर मैत्रिणींना, "ए मला भरव" "मला पाणी पाज" करून छळले. हात जरा वाळले न वाळले तोच समोर स्कॅनर दिसला. मग काय, फोटो काढण्यापेक्षा हातावरची नक्षी सरळ स्कॅन केली.

परवा बिकांच्या घरी मस्त मेंदी सोहळा रंगला. शनिवारी रात्री चालू झालेले प्रकरण रविवारी दुपारी 'फिश' ची मेंदी काढून संपले. हाताला पाणी लागू द्यायचे नाही म्हणून पोरींना पढवून ठेवलेले त्यांच्या आईबाबाला किती दिवस भोवले हे अर्थातच विचारले नाही. नंतरही परत आल्यावर एका मॉलमध्ये मेंदी काढणारा दिसला. माझा डावा हात मीच रंगवला होता. मग उजव्या हातावर त्या माणसाकडून मस्त मेंदी काढून घेतली. तो रंग अजूनही उतरला नाहीए. (त्याचाही फोटो लावायचाय पण कॅमेर्‍याने ऐन वेळेस राम म्हटले. :( )

स्पंदना's picture

24 Aug 2010 - 10:12 pm | स्पंदना

मला पण मेंदी अतिशय आवडते. बाकि कधी नाही तरी श्रावण म्हणुन अन मुलीच्या नावाखाली मी ही थोडी फार रंगुन घेते. पन ही कोनाची मेंदी पटकन जाते आपली पानांची कशी हळु हळु फिकट होत जाते तस नाही .

लिखाण मस्तच. आवडल.

मुक्तसुनीत's picture

24 Aug 2010 - 10:21 pm | मुक्तसुनीत

मेंदीभरल्या नखानखांचे
आले चालत पिवळे पाउल
ओल्या सुरमी बांधावरल्या
बालतणाला लागे चाहुल.
- इंदिरा.

शिल्पा ब's picture

24 Aug 2010 - 10:24 pm | शिल्पा ब

छान लिहिलंय...
मलापण मेंदी काढून घ्यायला आवडते...लहानपणी मी पण मोठ्या मुली मेंदीच्या पानापासून मेंदी तयार करताना लुडबुड करायचे...मस्त धुंद करणारा सुगंध येतो.
पण आजकाल कसली मेंदी असते कोण जाणे !! रंगून जरा दोन दिवस झाले कि रंग जायला लागतो आणि विचित्र दिसते..

नुसता लेख वाचूनच मनातल्या मनात मेंदीचा दरवळ आला.
आपल्या मेंदूतच तो कोरला गेला असावा!:)
श्रावण सुरु झाल्यावर एकदा मेंदीची आठवण आली होती.
मलाही मेंदी काढून घेण्याची भारी हौस होती. अजूनही आहे पण फारशी वेळ येत नाही.:(
माझ्या आतेबहिणीला आम्ही फार मान द्यायचो (तिने न मागता); कारण तिने मेंदीचा क्लास अपूर्ण केला होता.;)
चार दिवसाच्या क्लासचा पहिल्या दिवशी ती विसरली, दुसर्‍या दिवशी मात्र गेली, तिसर्‍या दिवशी अर्धाच वेळ जाता आले नंतर आजारी पडली म्हणून क्लास बुडला. तरीही ती मेंदी चांगली रेखाटायची.
पूर्वी रात्री मेंदी काढून झाल्यावर सगळ्याजणी मेल्यागत झोपत असत.;)
सकाळी पसरलेल्या गाद्यांवर सगळीकडे मेंदीच मेंदी. आई वेगळी बेडशीटस देत असे ती यामुळेच.
माझ्या सासूबाई सांगतात कि त्या लहान असताना पानं वाटून हातावर थापायची आणि मुठी वळून त्यावर फडकी बांधून ठेवायचे. सकाळी हात धूवून टाकायचे. एवढीच काय ती मेंदी!

बहुगुणी's picture

19 Dec 2013 - 1:38 am | बहुगुणी

नुसता लेख वाचूनच मनातल्या मनात मेंदीचा दरवळ आला.
खास मितान-टच!

दाद's picture

24 Aug 2010 - 11:06 pm | दाद

मा़झ्या २ मुलिना मेंदी काढून घ्यायला आवडते ! त्याच्या डोळ्यात लहाणपणीचे निरागस कुतुहल, एकमेकींच्या नक्षींचे कौतूक करतानाचे भाव बघताना समाधान होते!

पारुबाई's picture

24 Aug 2010 - 11:27 pm | पारुबाई

सुरेख आठवण जागवलीत.

तुमची लेखन शैली छान आहे.
सलग आणि सुसंगत ,मोजक्या शब्दातला ,परिपूर्ण लेख वाटला.

भाग्यश्री's picture

25 Aug 2010 - 9:24 am | भाग्यश्री

मस्तच लेख आहे !!
मला मेंदी काढून घ्यायला खूप आवडायचे.
अलिकडे फार कष्टाने मेंदी काढू शकतीय. डिझाईन्स जमतात, परंतू वेळ फार लागतो! पण तो आनंद अफलातून आहे..

ही गेल्या नागपंचमीला काढलेली मेंदी.. 'फक्त' ३ तास लागले! :(

शिल्पा ब's picture

25 Aug 2010 - 9:57 am | शिल्पा ब

मस्त आहे..मलापण द्या काढुन माझ्या हातावर.. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2010 - 10:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर दिसतोय हात! तू डावखुरी आहेस का गं?

भाग्यश्री's picture

25 Aug 2010 - 9:33 pm | भाग्यश्री

हो, मी लेफ्टी! :)

अस्मी's picture

25 Aug 2010 - 11:17 am | अस्मी

व्वाह! मस्त लेख...मलापण अगदी कोपरापासून मेंदी काढायला आवडते

आणि मेंदी पूर्ण झाल्यानंतर प्रेमाने आपल्याच हातकडे बघतानाचे समाधान !!

अगदी अगदी.....नुकत्याच काढलेल्या मेंदीकडे तसंच रंगून लाल झालेल्या मेंदीकडे बघतानाचा आनंद आणि समाधान खासच... :-)

- अस्मिता

मितान's picture

25 Aug 2010 - 1:02 pm | मितान

मके, भाग्यश्री, धन्यवाद :)
तुमच्या मेंदीच्या फोटोंमुळे लेख पूर्ण झाला :)

मृगनयनी's picture

25 Aug 2010 - 1:29 pm | मृगनयनी

गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि महाराष्ट्रातले हात एकाच मेंदीने रंगत होते. प्रत्येकीच्या मनातली मेंदी दरवळत होती.

हे वाक्य जास्त आवडलं! :)

बाकी "मेन्दी" मस्तच्च!

मनिष's picture

25 Aug 2010 - 5:15 pm | मनिष

माया, मस्त दरवळ मनात जागी करणारा झालाय लेख! :)

प्राजक्ता पवार's picture

6 Apr 2011 - 11:37 pm | प्राजक्ता पवार

छान लिहिलंय :)

योगप्रभू's picture

7 Apr 2011 - 12:33 am | योगप्रभू

मेंदीच्या आठवणीने मन बालपणात धावले.
बहिणींना मेंदी काढायची असली की चोरी करण्याच्या कामावर आमची नेमणूक व्हायची (आवळे, कैर्‍या, चिंचा-बोरे आणि मेंदी यांच्या चोरीसाठी धाकटी भावंडे फार उपयुक्त ठरतात) हे काम वाटते एवढे सोपे नसायचे. देशपांड्यांची म्हातारी फार खवट. डोळ्यात तेल घालून कुंपणावरच्या मेंदीवर लक्ष ठेऊन बसायची. शिव्या तर इतक्या घाणेरड्या द्यायची, की पुरुषही लाजावेत. आम्ही शिताफीने मेंदीचा पाला पळवायचो. घरी तो पाट्यावर वाटण्याचे उद्योग बहिणी करायच्या. त्यांच्या त्या मेंदीत आम्हाला फार रस नसे. कामाचा मोबदला म्हणून बहिणीच्या शाळेच्या लायब्ररीतील फास्टर फेणेचे पुस्तक वाचायला मिळे. त्यात आम्ही खूश.
कुणाची मेंदी कशी आणि का रंगते, यावर बहिणींची आणि मैत्रीण मंडळाची चर्चा रंगत असे. काहीजणींची मेंदी इतकी लालबुंद होई, की लवकरच ती काळपट पण होत जाई. मोठ्या बायका सांगत, की ज्यांच्या अंगात उष्णता जास्त असते त्यांची मेंदी लवकर रंगते. मेंदी लवकर आणि लालभडक रंगावी, म्हणून अनेक उपाय केले जात. त्यापैकी एकच उपाय लागू पडला. मेंदी वाळायला लागल्यावर त्यावर साखरेचे पाणी शिंपडून ती पुन्हा ओलसर करायची. म्हणजे नक्षी हातावरुन पडू द्यायची नाही.
पुरुषवर्गाचा आणि मेंदीचा फार संबंध नसे. मुस्लिम पुरुषांना मात्र मेंदी लावून केस आणि दाढी रंगवण्याची फार आवड. ही प्रथा अरबांकडून चालत आलेली. हातांवर लावण्याखेरीज पांढरे केस तांबूस करण्यासाठीही महिलावर्ग मेंदी वापरत असे. अजुनही डाय आणि गार्निएरपेक्षा अनेकजणी काली मेंदी लावणे पसंत करतात.

'मेंदीच्या पानावर मन अजुन झुलतंय गं' हे स्त्रीमन तर
'तळव्यावर मेंदीचा अजुन रंग ओला, प्रीत तुझी माझ्या मनी घेते हिंदोळा' हे पुरुषाचे मन.

मितान यांचे लेखन दाद देण्यासारखे...

एक कडू गोड आठवण-- आमच्या सोसायटीत मेंदीची भरपूर झाडे होती. पण त्याचा पाला तोडून आणला की पुढचे काही तास हात कडू होत. चुकून हात तोंडात गेला की तोंड कडू होत असे.

दिव्यश्री's picture

18 Dec 2013 - 9:34 pm | दिव्यश्री

लेख आवडला ... :)

विजुभाऊ's picture

19 Dec 2013 - 12:53 am | विजुभाऊ

अरे वा. मस्त लेख.
मेंदी चा दरवळ आला.
लांबसडक शिडशीडीत नाजूक बोटे, त्यावर टोपी लावावी तशी पहिल्या पेरापर्यन्त दाट मेंदी . अन त्या नंतर तळहातावर कोपरापर्यन्त बारीक वेलबुट्टीची नक्षी......

हा लेख वर उकरून काढून असं काहीतरी मला लिहिता येत होतं याची आठवण करून देणारांचा णिषेढ !!!!

कडकडीत थंडीमुळे शिडशिडीत बोटांच्या काड्या वळलेल्या असताना मेंदीचे कौतुक करणार्‍या विजुभाऊंचाही णिषेढ !!!! (पळा..)