अँकर - नमस्कार सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आज तुमच्यासमोर नविन कार्यक्रम घेउन आलो आहोत ज्याचे नाव आहे सासुबाई एक्सचेंज. त्यासाठी आम्ही आज आलो आहे आदर्श सोसायटी मध्ये. येथिल दोन कुटुंबांची आम्ही पाहणी करुन निवड करणार आहोत व त्या दोन कुटुंबातील सासु-सुनांची आदला बदल करुन त्या कशा तर्हेने एकमेकिंना मॅनेज करतात हे एक महिना पाहुन त्यातील विजेत्या जोडीला आम्ही एक लाखाच बक्षिस देणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहणी करुया पाटणकर कुटुंबातील सासुसुनांची.
सासु (देवपुजा करत) - सर्वमंगल मांगल्ये ........
सुन - ह्यांचे ३३ कोटी देव खाली उतरले पण माझी एकुलती एक देवी कधी अवतरणार ?
सखुबाई - माय नेम इस शिला....
सुन - ये तुझ्याच प्रसन्न होण्याची वाट पाहत होते, म्हटल आज देवी कोपते की काय माझ्यावर, दांडी मारुन ? बस तुज्यासाठी नैवेद्य आणते.
सासु - काय ग सखू (ओरडून) कुठे होतीस एवढा वेळ आ ? नेहमीची आगलावायची काम करत असशील शेजार्यांकडे. रोज अस उशिरा येण खपणार नाही मला सांगुन ठेवते. कामावरुन काढून टाकेन तुला.
सुन - (सासुला बाजुला घेउन) आहो सासुबाई तिला कामावरुन काढलत तर घरातली धुणीभांडी तुम्ही करणार आहात का ?
सासु - तुझ्यासारखी तरणी ताठी होते तेंव्हा केल हो मी सगळ. माझा संसार कसा फुलासारखा सांभाळायचे मी. आता माझ्याच्यानी होत नाही ग बाई वयोमानानुसार. पण तु तर चांगली धडधाकट आहेस ना ?
सुन - तुमच्या बडबडण्याच नाही का हो वय झाल सासुबाई ? आणि मी नोकरी करते म्हटलं. पैसे कमवुन आणते ना घरात ? शिवाय कोणाच्या खाण्यापिण्याचे पण हाल नाही ना करत ? तुमच्या मुलाच्या दुप्पट कमवते मग मिच का एकटी करु काम ? तुमच्या मुलालाही लावायला सांगा ना हातभार थोडा घरच्या कामात.
सखुबाई - आहो ताईसाहेब तुम्ही कशाला घरच्या कामाच्या काळज्या करता ? तुम्ही कितीबी मला बंद करायच ठरविलत तरी मी बा न्हाय जायची. (हळू आवाजात - इथुन गेले तर मला आगी लावायला कशा मिळतिल)
सुन्-सासु - काय ???????
सुन - बर बर चल तु काम आवरायला घे. मी निघते.
सासु - अग निघतेस काय ? सोनुच दप्तर भरलस का ? त्याचा नाश्ता लावलास का ?
सुन - आहो सासुबाई ते पण मिच करु का ? आहो जरा वाढा ना तिला. दिवसभर ती देवपुजा करण्यापेक्षा थोडी नातवंडांची देखभाल केलीत तर जास्त पुण्य मिळेल.
सासु - ए तू जास्त तोंड चालवु नकोस. त्या देवाची मी भक्ती करते म्हणुन हे सगळ व्यवस्थित चाललय. तोच ह्या घराच्या पाठीशी खंबिरपणे उभा आहे. त्याच्याबद्दल बोललेल मी काही सहन करुन घेणार नाही.
सुन - हो का ? बर ! मग मी सोडते नोकरी. बघा तुमचा देव देतोय का पैसा घर चालवायला ?
सासु - शिव शिव शिव शिव तु जा बाई माझ्याच्याने आता हे ऐकवत पण नाही.
सुन - हु$$$$$$$
सखुबाई - आईसाहेब गेल्या ताइ ? बघा ना तुमच्याशी कशा वचावचा भांडत होत्या ? नाहितर त्या शेजारच्या पाटकर ताई कित्ती गुणी ? तुमच्यासारखिच देवभक्तीण ती आणि तिची सासु नुसती उनाडाटप्पी. तिला तुमच्यासारखी सासु पायजे होती म्हणजे घर कस गुण्यागोविंदाने नांदल असत. (काम करायला निघुन जाते). आईसाब खाली चॅनेलवाल आलंत सासुबाई एक्सचेंज म्हनुन कार्यक्रम हाय नव त्यात मी तुमच नाव देते आणि तुमच्यासाठी शेजारच्या वैद्य सुनबाईंच नाव टाकते. बगा तुम्हाला ताज मिळतो की नाय ते.
सासु - खरच ग बाई दे नाव टाकुन म्हणजे माझी कटकट जाईल आणि माझ्या सुनेलाही चांगली अद्दल घडेल.
सखुबाई - व्हय आईसाब आता देऊनच येते नाव शेजारच्या वैद्यसुनबाईंना इचारुन.
----------------------------------------
अँकर - अरे वा ह्या घरातील सकाळ खुपच दमदार झालेली दिसते. आता आपण वैद्य कुटुंबातील सासु-सुनांची पाहणी करुया.
सुन - (देवपुजा) साष्टांग नमन माझे गौरी पुत्रा विनायका....
सखुबाई - माय नेम इस शिला (नाचत येते) आई साहेब निघालात वाटत.
सासु - अरे वा राणिसरकार आल्या, या या. आज जरा उशिरच झाला माझ्या सोनुला, काम जास्त होत का शेजार्यांकडे ?
सखुबाई - नाही ओ आई साहेब ते काय झाल त्या शेजारच्या पाटणकर सासवा सुनांच सकाळच झेंगाट लागलेल त्यांचा समझोता करुन देताना जरा वेळ झाला.
सुन - सखुबाई आहो किती उशीर हा ? सगळी काम खोळंबलियत. अस करा उद्यापासुन तुम्ही येउच नका.
सखुबई - आता ग बया, बघितलत का आईसाहेब ?
सुन - अहो घरात भरपुर वेळ असतो माझ्याकडे. मी करत जाईन ना सगळ.
सासु - हे बघ अॅना मला हे आजिबात चालणार नाही. माझ्या स्टेटसला ते शोभत नाही. आजुबाजुचे लोक काय म्हणतील ? महिला मंडळाच्या प्रेसिडेंटची सुन घरात राबते ? कदापी नाही. अग आम्ही महिला मंडळाच्या बायका अशा अत्याचार करणार्या सासवांविरुद्ध मोर्चे काढतो. तोच मोर्चा उद्या माझ्या घरी येऊन तोंडात शेण घालुन जाईल माझ्या.
सखुबाई - हो ना वो आई साहेब.
सुन - आहो आई त्यात कसला आलाय अत्याचार ? घर सांभाळण हे प्रत्येक गृहीणीच कर्तव्यच आहे. आणि मला कि नाही घर सांभाळण, घरातल्या माणसांची सेवा करण्यात खुप धन्यता वाटते. (सासुच्या पाया पडते)
सासु - हो ना ? ८ दिवस करुन बघ सगळ काम. आल्यापासुन तशी वेळ आली नाही ना तुझ्यावर, म्हणून ही असली गिता मला पढवतेस. अग ती पोथी पुराण वाचण जरा कमी कर. सगळ्या बायका मला नाव ठेवतात, तुमची सुन म्हण्जे नुसती देवभोळी, किती जुन्या वळणाची आहे ? अग हसतात मला सगळ्या. हे सगळ सोड आणि आजपासुन माझ्या बरोबर क्लबमध्ये चल.
सखुबाई - अगदी बराबर आईसाब. ताई साब खरच तुम्ही पण जा आईसायबांबरोबर कलपात.
सुन - आई नका हो मला त्या नरकात नेउ.
सासु - काय म्हणालीस ?
सुन - हो आई माझ्यासाठी ते नरकच आहे. हे घरच माझ स्वर्ग आहे. माझ्या पतीची, मुलांची, तुमची सेवा करुन मी जे पुण्य मिळवते त्या पुण्यावरच मी जिवंत आहे (सासुच्या पाया पडते).
सासु - ए गप ग, पुण्य म्हणशील तर ते मी जास्त मिळवते तुझ्यापेक्षा. अग मी अबलांना सबला बनवते, त्यांचे अन्याय, अत्याचार दुर करते.
सखुबाई - अगदी बराबर. माज्याबी सासुला चांगली अद्दल घडवली होती आईसाहेबांनी.
सुन - नाही आई तुम्ही सगळ्यांचे शाप ओढावुन घत आहात. तुम्ही नवरा-बायको, सासु-सुनांमध्ये भांडण लावुन देता अस कळल आहे मला (कामवालीकडे नजर रोखुन). आई त्यापेक्षा भगवंताची सेवा करा, तुमच्या शेवटच्या दिवसात तोच तुम्हाला धावुन येईल.
सासु - अरे देवा आता ही मला मारायच्या आत मला इथुन निघायला हव. ए सखु तु आजिबात सोडायच नाही ग काम. माझ्या स्टेटसचा प्रश्न आहे. आमच्या घरची अब्रु आता तुझ्याच हातात आहे ग बाई
सुन - राम राम $$$$$$$$$$$$ करत आत जाते.
सखुबाई - पाहीलत आईसाहेब कशा तुमच्याशी वाद घालतात ताईसाहेब ? आहो त्यापेक्षा त्या पाटणकर ताई किती चांगल्या हायेत. अगदी तुमच्यासारख्याच मॉडरन. हापिसात पण जातात. अव त्या तुमच्या सुनबाई शोभल्या असत्या. तुम्ही एक काम करा त्या सासुबाई एक्सचेंज मध्ये मी तुमच नाव नोंदवते आणि तुम्हाला जोडीला पाटणकर सुनबाईंच नाव टाकते. बगा लाखभराच बक्षिस तुमालाच गावल.
सासु - खरच ग बाई दे नाव टाकुन म्हणजे माझी कटकट जाईल एक महिन्याची आणि माझ्या सुनेलाही चांगली अद्दल घडेल.
सखुबाई - व्हय आईसाब आता देऊनच येते.
अँकर - तर मंडळी दोन्ही कडच्या सासुबाई एक्सचेंज व्हायला तयार झाल्या आहेत. तर आपण पाहूया ह्या दोन सासु सुना कस एकमेकिंशी पटवुन घेतात ते. तर आधी पाहूया मॉडर्न सासुबाई आणि मॉडर्न सुनबाई
------------------------------------------------------------------------------------
सुन - अग बाई माझी निघायची वेळ झाली. अजुन कशी येत नाही ही सखु ? घरात सगळा कामांचा पसारा पडलाय. (सासु निघुन येते) आई बर झाल आलात. जरा सोनु उठली की तिची अंघोळ घालुन नाश्ता देउन तिला शाळेत पाठवा. मी निघते.
सासु - अग मी पण निघालेय. आज माझं महीला मंडळाच शिबीर आहे. तिथे जाण मला गरजेच आहे. मी प्रेसिडेंट आहे महिला मंडळाची. एक काम कर आज सोनुला शाळेतच नको पाठवु. सखु येईल इतक्यात तिला सांगते सोनूच सगळ करायला.
सुन - ईईईईईई सखु, नको नको. मला नाही आवडत सोनुच तिने काही केलेल, धुणी भांडी करण्यापर्यंतच ठिक आहे ती आणि तुमच्या शिबिरासाठी मी सोनुची शाळा बुडवु ? मलाही जाण गरजेच आहे हो आज. मी आमच्या ऑफिसच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन करणार आहे.
सासु - अग पण मी रोजच बाहेर जाते. कधी किटी पार्टी, कधी भिशी पार्टी, कुणाकडे समारंभ, कुणाच्या घरचे प्रॉब्लेम सोडावायला मला जावच लागत.
सुन - आणि घरच्या प्रॉब्लेमच काय ? घराच, मुलाबाळांच काय ?
सासु - ते पाहण घरच्या सुनेच काम असत. माझी सुनच पहायची ते सगळ. घरच्या कामाची, मुला नातवंडांची मला काही काळजी करावी लागत नव्हती. सखु कडून घर अगदी चकचकीत करुन घ्यायची.
सुन - हो ना? माझ्यापण सासुबाईच कुरकुरत का होईना पण पहायच्या सोनुच सगळ. मी अगदी बिनधास्तपणे जायचे त्यांच्यावर सोनुच सोपवुन. शिवाय त्या सखुबाईकडुन कामही करुन घ्यायच्या.
सासु - हो ना मग जा ना तुझ्या त्या देवभोळ्या सासुकडे. नुसती दिवसभर देव देव करत असते.
सुन - हे बघा माझ्या सासुबाईंबद्दल काही बोलायच नाही. देव देव करत असल्या तरी सगळ घर सांभाळतात त्या. तुमच्यासारख्या उनाडक्या करायला म.मंडळात नाही हो जात. आणि तुमची ती सुन तरी काय हो ? ती पण घरात पोथ्याच वाचत बसते ना ? गवंढळ कुठली.
सासु - ए तोंड सांभाळून बोल. कशीही असली तरि माझी सुन आहे. ती आज घरात पोथ्या वाचत बसते म्हणूनच मी बिनधास्त तिच्या भरवश्यावर समाजकार्य करु शकते. आणि ती तुझ्यापेक्षा नक्कीच चांगली आहे. उद्धट नाही तुझ्यासारखी सतत बिचारी माझे आशिर्वाद घेत असते.
सुन - हो ना ? मग जा ना तुमच्याच सुने कडे. मला माझ्याच देवभोळ्या सासुबाई पाहीजेत. हू.....
सासु - तु पण घेउन बस तुझ्याच सासुला. मला पण माझीच भोळी सुन पाहीजे हू..... (दोघिही एकमेकिंना पाय आपटून बोट मोडून जातात)
------------------------------------------------------------------------------------
अँकर - अरे बापरे हे काय आम्हाला वाटल ह्या घरात एकमेकिंना न पटवुन घेणार्या सासवा सुना एक्सचेंज करुन गोडी गुलाबीने नांदतील. पण ह्या दोन्ही मॉडर्न शेवटी त्यांचे विचार मॉडर्न म्हणून कदाचित जमल नसेल. पण काही काळजी करु नका आता आपण दुसर्या देवभोळ्या जोडीकडे वळूया आणि पाहुयाच ह्यांचे सुर किती जुळताहेत ते. लाईट, अॅक्शन कॅमेरा स्टार्ट
-----------------------------------------------------------------------------------
देवभोळी सासु आणि देवभोळी सुन :
सुन - पुजा करत बसलेली असते. (भिमरुपी, महारुद्रा, वज्रहनुमान मारुती)
सासु - अग तु कशी बसलीस पुजेला ? ही तर माझी वेळ आहे पुजेची !
सुन - (सासुला पाया पडते, सासु आशिर्वाद देते) माझीपण हिच वेळ आहे पुजेची (भोळ्या नजरेने)
सासु - बरं आपण अस करु दोघी पण पुजा करु.
सासु सुना दोघी पुजेला बसतात. सुनेच भिमरुपी महारुद्रा तर सासुच गणपती स्तोत्र असा एकच गजर दोघी करतात. (दोघिंचा नुसता स्तोत्रांचा गोंगाट चालू होतो).
सासु - बास बास. चल आता झाल ना तुझ जा आणि घर आवरुन जरा जेवणाच बघ.
सुन - आहो सासुबाई एवढ्या लवकर कशी होईल माझी पुजा ? अजुन मला अथर्वशिर्ष, रामरक्षा, हनुमान चालीसा, गुरु चरित्र, साईबाबांचा अध्याय, नवनाथांचा अध्याय, शिवलिलामृत अध्याय वाचायचा आहे. शिवाय आज शनिवार. मला शनिमहात्म्यपण वाचायच आहे. हे सगळ वाचता वाचता मला दुपार होईलच .
सासु - अरे देवा मग घरातल्या कामांच जेवणाच काय?
सुन - का ? सखु आहे ना त्यासाठी. आणि तुमच्याकडे जेवणाला बाई नाही ? आमच्या सासुबाईंनी घरात प्रत्येक कामासाठी बाई ठेवली आहे. त्यांना घरातल्या बायकांनी राबलेल मुळीच आवडत नाही.
सासु - अग पण सखु म्हणत होती की तुला कामाची खुप आवड आहे म्हणून. तुला घरातल सगळ करायला आवडत म्हणुन मी सखुला येऊ नको सांगितल.
सुन - अरे भगवंता! हे काय संकट आणलस तु माझ्यावर ? आता कोणत स्तोत्र म्हणू मी ? मला माहीत होत, माझ्या सासुबाई स्वतःच्या स्टेटससाठी का होईना पण मला आजिबात काम करु द्यायच्या नाहीत.
मला नाही हो सवय आता कामाची.
सासु - अरे देवा, मग आता पोटापाण्याच काय करायच ?
सुन : (टिचकी मारुन) आयडीया आज आपण पार्सल आणुया. माझ्या सासुबाई सखु आली नाही की पार्सलच आणायच्या.
सासु - काय??? पार्सल ! आता ह्या वयात तु मला पार्सलवर पोसणार ? अग सहन होत नाही मला ते बाहेरच सोडा मारलेल जेवण. देवा वाचव रे बाबा.
सुन - सासु बाई तुम्ही काही काळजी करु नका तुमच्या पोटाची. तुमच पोट चांगल रहाव ह्यासाठी मी सिद्धिविनायकाला साकड घालीन, महालक्ष्मीची खणानारळानं ओटी भरीन.
सासु - अरे देवा त्यापेक्षा माझी ती मॉडर्न सुनच बरी होती. कामावर जात असली तरी जायच्या आधी सगळी घर आवरुन जेवण उरकुन जायची. मला काही काळजी नसायची मुलांच्या आणि माझ्या खाण्यापिण्याची. जरा तोंडाने असली तरी माझी काळजी पण घ्यायची हो.
सुन - मलाही माझ्या सासुबाईंची आठवण येतेय. मॉडर्न होत्या पण मला फुलासारख जपायच्या. अगदी काही करु देत नव्हत्या मला. मी त्यांना त्यांच्या महिला मंडळावरुन उगाच बोलायचे. मला आता कळल, तुमच्या सारख्या जर जाच करण्यार्या सासवा असतील तर त्यांच्यावर कारवाई करुन त्या खरच पुण्य कमवतात.
सासु - काय म्हणालीस ? जा ना मग तुझ्या त्या नखरेल सासुकडे.
सुन - हे बघा माझ्या सासुबाईंना नावं नाही ठेवायची, सांगुन ठेवते. त्यापेक्षा तुमची ती खट्याळ सुन बघा.
सासु - हो ना, मला नको ते बक्षिस बिक्षिस मला माझी सुनच पाहीजे. हू...
सुन - मला पण माझ्या आईच पाहीजेत हू...
-------------------------------------------------------------
अँकर - बापरे हे काय करायला गेलो आणि काय झाल ? इथे तर वैद्य - पाटणकर काढाच झाला आहे.
सखु - जोर का झटका हाय जोरोसे लगा... अव टिवीवाल तुमी या सासु-सुनांच्या भानगडीत पडू नका. अव समद्या घरच पानी चोखलय मी. घरात कितिबी एकमेकांशी भांडल्या तरी लई पिरिम असते त्यांच एकमेकावर. एकमेकांबिगर करमत नाय त्यांना. अव भांडाया बी त्यांना आपआपल्याच सुना लागत्यात.
अँकर - तर मंडळी आता आपण जाणून घेउया दोन्ही सासुबाइंचे मत.
मॉडर्न सासु, देवभोळी सुन दोघीही माईक ओढतात आणि एकमेकिंच्या सुनांच्या कंप्लेंट करतात. देवभोळी सुन येते आणि अँकरच्या पाया पडते, प्रेक्षकांना पाया पडते, कामवाली बाजुला असते हे तिला कळत नाही तिच्याही पाया पडते आणि बघुन इइइइइ करते. मग स्वतःची सासु तिला ओढायला जाते तेंव्हा तिच्या पाया पडून देवभोळ्या सासुची कंप्लेंट करते. ह्या सगळ्या गोंधळात अँकर बावरते आणि एकदाच ओरडते.
शटाप.
तर मंडळी हा कार्यक्रम आता मी इथेच थांबवते. आणि हाच कार्यक्रम आम्ही पुढच्या महिलादिनी, ह्याच वेळी, हयाच ठिकाणी घेउन येणार आहोत, ज्याच नाव आहे सासुबाई ....... (दोन्ही सुना अँकरच्या तोंडावर हात ठेवतात आणि सगळ्या एकदाच ओरडतात) नो एक्सचेंज
प्रतिक्रिया
16 Mar 2011 - 2:11 pm | स्पंदना
>>इथे तर वैद्य - पाटणकर काढाच झाला आहे.
अव भांडाया बी त्यांना आपआपल्याच सुना लागत्यात.>>>>
धुम च्याक जागु !! लगे रहो!!
16 Mar 2011 - 2:21 pm | प्राजक्ता पवार
छान लिहलं आहेस .
16 Mar 2011 - 2:30 pm | sneharani
मस्त! मजा आली वाचायला!
:)
16 Mar 2011 - 3:02 pm | नगरीनिरंजन
हा हा! भारीए! मजा आली.
16 Mar 2011 - 3:10 pm | पिंगू
हाहाहा.. वाचून चित्र उभे राहिले..
- (हलकट अँकर) पिंगू
16 Mar 2011 - 3:29 pm | सुहास..
हा हा हा
महिला दिनाच्या शुभेच्चा !!
16 Mar 2011 - 3:52 pm | वपाडाव
मजा आली वाचताना....
16 Mar 2011 - 4:36 pm | निवेदिता-ताई
मस्त लिहिले आहेस....
अगदी दोन्ही घरातील योग्य निरीक्षण करुन लिहिले आहेस.....
16 Mar 2011 - 4:38 pm | सुहास..
हा हा हा !!
महिलादिनाच्या शुभेच्चा !!
16 Mar 2011 - 4:44 pm | परिकथेतील राजकुमार
ज ह ब र्या !!
=)) =))
16 Mar 2011 - 7:33 pm | रेवती
अरे वा!
मजेदार लिहिलयस कि!
पाकृ लेखनाबरोबर असेही वेगळे चवदार लेखन;) आवडले.
16 Mar 2011 - 7:40 pm | पैसा
मस्त लिहिलंयस जागूताई!
"घरोघरी त्याच परी" आणि "तुझं नि माझं जमेना, आणि तुझ्यावाचून करमेना" या दोन्ही म्हणी सासू सुनांसाठी पेश्शल बनवल्यात!
16 Mar 2011 - 8:49 pm | अन्या दातार
जागुताईंची ही पाकृ मस्तच आहे. सासू-सुनेची भांडणं म्हणजे अगदी मासळी बाजारातला दंगाच!
16 Mar 2011 - 9:09 pm | प्रीत-मोहर
मस्त ग जागुतै!!!!
16 Mar 2011 - 9:26 pm | धनंजय
गमतीदार!
17 Mar 2011 - 12:11 am | प्राजु
हाहाहा!! मस्त लिहिलं आहेस.. जागु! :)
17 Mar 2011 - 11:32 am | सविता००१
मस्तच लिहिले आहे
17 Mar 2011 - 11:55 am | सहज
जागूतै सिद्धहस्त लेखीका???????
मस्तच :-)
17 Mar 2011 - 1:38 pm | फ्रॅक्चर बंड्या
छान
17 Mar 2011 - 1:54 pm | गणेशा
अप्रतिम लिहिले आहे ..
काही प्रसंग्/वाक्ये तर खुपच मज्जा आणतात ..
17 Mar 2011 - 2:07 pm | विनायक बेलापुरे
जावे त्याच्या वंशा
दुरुन डोंगर साजरे
असेल त्याला विटवा नसेल त्याला भेटवा
इकडे आड तिकडे विहीर
सासूबाई स्वैपिंग ............
पण घरात इतरही माणसे असतात ...... त्यांचेही भावनाकल्लोळ येउद्या अगली किश्त में ! ;)
17 Mar 2011 - 4:39 pm | माझीही शॅम्पेन
चुकुन सासुबाइ एक्सपोज्झ अस वाचल
मस्त लिहिले आहे
17 Mar 2011 - 11:42 pm | कोमल
लै भारि.....
18 Mar 2011 - 2:45 am | शुचि
मस्त :)
>> घरात कितिबी एकमेकांशी भांडल्या तरी लई पिरिम असते त्यांच एकमेकावर. एकमेकांबिगर करमत नाय त्यांना. >>
हे लै खरं हाय
18 Mar 2011 - 12:57 pm | जागु
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.