क्रांती ~ आणि क्रांतीमधील एका 'आयकॉन' च्या फोटोची जादू...!!

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in जनातलं, मनातलं
15 Feb 2011 - 11:32 pm

CheA" alt="CheA" />
इजिप्तमध्ये अखेर "क्रांती" झाली आणि एक सत्ता उलथवून टाकण्याची एकजुटीची शक्ती जनतेत कशी आणि केव्हा एकवटते याचे पुनश्च एकदा जगभरातील क्रांतीप्रेमींना प्रत्यंतर आले. अर्थात हा लेख त्या क्रांतीवर नसून एका क्रांतिवीरावर आहे. त्याची आठवण या निमित्ताने होण्याचे कारण म्हणजे त्या अठरा दिवसाच्या कायरोमधील घडामोडीविषयी सीएनएन तसेच आपल्याकडील विविध न्यूज चॅनेल्सवर जी लोकक्षोभाची, मोर्च्यांची, मुबारकविरोधी घोषणांची दृष्ये वारंवार दाखविली जात होती ती पाहताना 'युवा' वर्गाच्या घोळक्याकडे लक्ष जात असे. त्यातील काही टीव्ही कॅमेर्‍यासमोर येऊन अरबी भाषेत घोषणा देतादेता आपल्या टी शर्टावर असलेल्या वा हातात असलेल्या एका पोस्टरकडे बोटे दाखवित. ते काय म्हणत असतील याचा तर्क करण्याचे खरे तर काहीच कारण नव्हते हे अशासाठी म्हणत आहे की त्या टी शर्टवरील एक युवा नेता काय किंवा घोषणा देणार्‍याच्या हातातील पोस्टरवरील 'ती' जगप्रसिद्ध पोझकाय...."क्रांती" संदर्भात माहिती ठेवणार्‍या जगातील जवळपास सर्वच देशातील युवाच नव्हे तर आता अगदी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांनाही माहीत आहे... त्या 'क्रांतीवीरा'चे नाव 'अर्नेस्टो चे ग्वेव्हरा' किंवा 'चे ग्वेरा....' पण या सर्वापेक्षाही साध्या 'चे' या नावाने प्रसिद्ध असलेला 'युथ आयकॉन' ~

Che11" alt="CheO" />

वयाच्या अवघ्या पंचविशीतच लॅटिन अमेरिकेतील सर्वच लहानमोठ्या राष्ट्रातील युवावर्गाचा 'हीरो' आणि तिशी ओलांडायच्या आतच अमेरिकेला त्याच्याविषयी वाटणारी धाक, तर रशिया आणि चीन सारख्या साम्यवाद्यांना त्याच्या नावाने उफाळून आलेले प्रेम, हे सर्वदूर पोचले. 'क्युबा' च्या फिडेल कॅस्ट्रोचा "उजवा हात" अशी त्याची ओळख करून देणे म्हणजे 'चे' वर अन्याय होईल. कारण मुळात तो क्यूबन नसूनही क्युबा त्याच्या अलोट प्रेमात पडली होती [इतकी की खुद्द फिडेललाही त्याचा वचक वाटावा अशी परिस्थिती]. त्याच्या चेहर्‍यातच क्रांतीवीराच्या अशा काही खुणा होत्या की, त्याचे नाव आणि त्याचे फोटो या सर्वांची लॅटीन अमेरिका आणि युरोपिअन देशातील युवकांना भुरळ पडली होती. निव्वळ राज्यक्रांतीच नव्हे तर विद्यार्थी वर्ग आपल्या मागण्यासाठी कॉलेज, विद्यापीठ वर मोर्चा नेताना 'चे' चा मागेपुढे फोटो असलेले शर्ट अंगात घालत. मुली त्याचे फोटो असलेल्या चेन्स घालून तर ज्येष्ठ हात उंचावून त्याचीच अदा करीत आजुबाजूला असणार्‍यांनी 'चे' चा संदेश देत.
Photobucket" alt="CheC" />

(कायम मित्र आणि सहकारी राहिलेले दोन क्रांतीवीर ~ चे आणि कॅस्ट्रो)
कलकत्यात अर्नेस्टोचे नाव असणे नाविन्याचे वाटणार नाही, पण जेएनयु आणि दिसू च्या संघटना 'चे' च्या तस्विरी आपल्या कार्यालयात ठळकपणे लावीत....इतके 'चे' विषयी सर्वांना प्रेम. वयाची पस्तिशी ओलांडायच्या आतच या तरूण नेत्याची मोहिनी जगभरातील क्रांतिकारकांत निर्माण झाली...आणि हा युवा जणू काही जगातील सर्वच युवकांचे प्रश्न सोडविणार अशीच हवा झाली. आज 'चे' च्या मृत्युला ४० वर्षे होऊन गेली, तरीही 'इजिप्त'च्या निमित्ताने ठळकपणे दिसून आले की त्याच्या मृत्युनंतर जन्माला आलेली पिढीही त्याला विसरायला तयार नाही. क्वचितच असे हेवा वाटण्यासारखे भाग्य एखाद्या नेत्याच्या नशिबी येत असेल.

कोण होता हा "अर्नेस्टो चे ग्वेव्हरा"?

१४ जून १९२८ रोजी रोझॅरिओ, अर्जेन्टिना येथे डाव्या विचारसरणीच्या कुटुंबात जन्मलेल्या अर्नेस्टोने (त्याचे 'चे' असे सुटसुटीत नामकरण नंतर झाले आणि ते जगभर इतके लोकप्रिय झाले की पुढे तो सहीही 'Che' इतकीच करत असे) लहाणपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचे धडे वडिलाकडून गिरविले होते. त्याचे वडीलही स्पॅनिश यादवी युद्धात रीपब्लिकनांचे खंदे समर्थक होते. शाळेत आणि महाविद्यालयात चे एक खेळाडू (अ‍ॅथलेटिक्स, बुद्धिबळ, फुटबॉल, जलतरण आदीमध्ये तो पारंगत होता) म्हणून जसा प्रसिद्ध होता तशीच त्याला सायकलींग आणि मोटारसायकलचीही आवड होती.

शिक्षणाची आवड आईवडील आणि सर्वच भावंडात असल्याने घरीही मोठे ग्रंथालय असल्याने वाचनाची भूक जशी वाढली तसे त्याने कवितामध्ये रस घेण्यास सुरूवात केली. पाब्लो निरुदा, कीट्स, वॉल्ट व्हिटमन आणि किपलिंग हे जसे त्याला प्रिय होते; त्याचप्रमाणे गद्य लेखनात कार्ल मार्क्स, विल्यम फॉकनर, आन्द्रे गिद, ज्युल्स व्हर्न यांचीही मोहिनी त्याच्यावर पडली होती. साहित्याची आवड असलेल्या कोणत्याही युवकाला जसे त्या त्या वयात काफ्का, काम्यू, लेनिन, सार्त्र भावतात तसे चे यालाही ते भावत असत [पुढे तर पॅरिसमध्ये त्याची सार्त्रसमवेत भेटही झाली...तो उत्कृष्ट फ्रेंच भाषा बोलत असे). इतकेच काय जवाहरलाल नेहरुंचेही साहित्य त्याने वाचले होते. तत्वज्ञान, गणित, अभियांत्रिकी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, पुरातत्वशास्त्र हे त्याच्या आवडीचे विषय होते. [पुढे १९५८ मध्ये सीआयएने "अमेरिकेने ज्याच्यापासून सावध राहिले पाहिजे" अशा व्यक्तींच्या यादीत चे ग्वेव्हराचे नाव नोंदविताना त्याच्या नावासमोर "व्यापक वाचन केलेला युवक" तसेच "इतर लॅटिनोंच्या तुलनेत फारच बुद्धीमान" असा उल्लेख केला होता.

Photobucket" alt="CheD" />

(पॅरिसमध्ये थोर लेखक ज्याँ पॉल सार्त्र आणि लेखिका सिमॉन बुव्हॉ यांच्यासमवेत 'चे')
पुढे ब्युनोस आर्यस येथे वैद्यकिय शिक्षण घेतानाच त्याला लॅटिन अमेरिकेतील छोट्या छोट्या देशात असलेल्या विषमतेची जाणीव व्हायला लागली. पण केवळ ऐकिव बातम्यावर विसंबून न राहता चक्क एकट्याने त्या काळात मोटारसायकलवरून त्याने फक्त अर्जेन्टिनाच नव्हे तर चिली, पेरु, इक्वेडर, व्हेनेन्झुएला, कोलंबिया, पनामा आदी देशात जवळपास १५ हजार किलोमीटर्सचा प्रवास करून त्या त्या देशात अगदी हुकूमशाही पध्द्तीने चाललेला राज्यकारभार नोंदविला. भयाण दारिद्र्य, रोगराई, शिक्षणाचा अभाव, दोन नव्हे तर एका वेळेच्याही जेवणाचे भ्रांत असलेली जनता....असमानता. सत्तेत असलेल्या राज्यकर्त्याना असलेला 'अंकल सॅम'चा छुपा नव्हे तर उघड पाठिंबा. छोट्या स्वरूपातील या देशांनी आता एकत्र येवून 'हिस्पानिक अमेरिका' नावाचे एकच राष्ट्र स्थापन केले तर जगातील बड्यांना ते तोंड देऊ शकतील आणि तेच शेवटी त्याच्या सर्व रोगावरील रामबाण औषध होईल ही कल्पना मनी ठेवून तो ब्युनोस आर्यस येथे शिक्षण पूर्ण करण्यास परतला आणि १९५४ मध्ये "डॉक्टर" ही झाला. पदवीनंतर समाजसेवेच्या निमित्ताने त्याची अथक भटकंती सुरूच होती आणि या खेपेस लॅटिन अमेरिकेतील बोलिव्हिया, कोस्टा रिका, निकारागुआ, होंडुरास, अल साल्व्हदोर या राष्ट्रातील समाजजीवनाची पाहणी मोटारसायकलने प्रवास करून पूर्ण केली. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशाने पैसा आणि लष्कराच्या ताकदीवर येथील सत्तेवर कसा अंकुश ठेवला होता याची नोंद करूनच तो ग्वाटेमाला येथील राज्यकारभारात गुंतला.

ग्वाटेमालातील आर्बेन्झचे सरकार हुसकावून लावून आपल्या पठडीतील कार्लोस अर्मासला राष्ट्राध्यक्ष बनविण्यासाठी अमेरिकेने केलेल्या यशस्वी प्रयत्नाने चे अमेरिकाचा कट्टर विरोधक बनला त्यामुळे सीआयएने देखील चे ग्वेव्हरा हे नाव कायमचे पुसून टाकण्यासाठी "संभाव्य टार्गेट" मध्ये नोंदवून ठेवले. एक फर्डा वक्ता म्हणून त्याचे नाव सर्वत्र गाजत होतेच. पुढे तो 'क्युबा' मध्ये पोहोचला आणि १९५४-५५ मध्येच तो फिडेल कॅस्ट्रोच्या सहवासात आला. इथे खर्‍या अर्थाने त्याला 'क्रांती' ची दिशा आणि ती अंमलात आणण्यासाठी कशाप्रकारची तयारी आणि निर्धार नेत्याकडे हवा असतो याचे प्रमाण मिळाले. कॅस्ट्रोलाही चे याचे नाव आणि लॅटिन अमेरिकेत त्याच्या नावाने होत असलेला उदोउदो माहीत असल्याने असला तगडा युवक आपल्याकडे असणे स्वागतार्हच वाटले आणि त्यामुळे कॅस्ट्रो आणि चे ह्या जोडगळीचे मिलिटरी पोषाखातील फोटो इंग्लंड आणि अमेरिकाच काय पण युरोपातील अन्य कम्युनिस्ट राष्ट्रातही झळकू लागले.
Photobucket" alt="CheE" />

(जगप्रसिद्ध 'टाईम' मॅगेझिनकडून मुखपृष्ठावर झळकण्याचा मान)
ग्वाटेमालाच्या कटू अनुभवामुळे तो आपल्या पत्नीसह (हिल्डा, मूळची 'पेरू' नागरीक असलेली पण ग्वाटेमालामध्ये काम करणारी आणि समाजसेविका...जिच्याशी त्याने १९५५ मध्ये विवाह केला होता) मेक्सिकोत आला व तिथूनच त्याने फिडेल कॅस्ट्रोशी हातमिळवणी केली. दोघांनी संयुक्त प्रयत्नाने क्युबातील अमेरिकन पाठिंब्याने टिकून राहिलेली 'जनरल बतिस्टा' ची सत्ता उलथून टाकून शेतकरी-कष्टकर्‍यांचेच राज्य आणायचे म्हणून गुरिल्ला पध्द्तीने क्रांती घडविणे या निर्धाराने ८० स्वयंसेवकांसह १९५६ मध्ये क्युबाच्या पर्वतराशीत एकत्र आले. बटिस्टाच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात ही दोघे आणि केवळ १६ युवक आणि १२ रायफली उरल्या. पण एवढ्याच तुटपुंज्या शक्तीवर गनिमी काव्यानी या दोघांनी ठिकठिकाणी सशस्त्र हल्ले करून सैन्यास बेजार करून सोडले. अर्थात क्युबातील शेतकरी वर्गाचाही या क्रांतिकारकांना सक्रीय पाठिंबा होताच कारण बटिस्टा सरकारच्या जुलूमी कारभाराची कडू फळे त्याना चाखावी लागत होतीच. कॅस्ट्रो आणि चे याना मिळत असलेला वाढता पाठिंबा आणि त्यांच्या गटात मोठ्या संख्येने सामील होत असलेले क्यूबन युवक पाहून बटिस्टा सरकारने गावागावातून दमननिती क्रूरपणे अंमलात आणली. पण याचा खरेतर उलटाच परिणाम झाला. आता केवळ युवकच कॅस्ट्रो आणि चे यांचे दिवाने झाले नव्हते तर मोठमोठ्या संस्थानीही (ज्यात क्युबातील शिक्षणतज्ज्ञ, वकील, इंजिनिअर, आर्किटेक्ट, डॉक्टर्स, बॅन्कर्स आदींचा समावेश होता) या क्रांतीकारकांना लेखी पाठिंबा दिला. केवळ गरीब आणि पिचलेलेच नव्हे तर मध्यमवर्गींयानीही या जोडगळीला आपले मानले. शेवटी अमेरिकेने क्रांती विफल करण्यासाठी कितीही लष्करी साहाय्य दिले तरी कॅस्ट्रो आणि चे यानी धीराने त्या ताकदीला स्थानिकांच्या मदतीने तोंड दिले. १९५८ मध्ये अंतर्गत युद्धात हजारो सरकारी सैनिक युद्धात मारले गेले पण जे पकडले गेले त्यांच्याविरूद्ध कॅस्ट्रो आणि चे यानी मवाळ धोरण ठेवून त्याना कोणतीही पुढील पिडा होणार नाही हे दक्षतेने पाहिले. त्यामुळे झाले असे की खुद्द बटिस्टाच्या सेवेत असलेल्या सैनिकांची सहानुभूतीही क्रांतीकारकांकडे वळली....आणि शेवटी जनतेचा कल पाहून अमेरिकेच्या हातचे बाहुले बनलेल्या जनरल बटिस्टाने प्रेसि.आयझनहॉवर यांच्या सल्ल्याने क्युबात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली, पण आता क्रांतीकारकांना आपल्या गळ्यातील ताईत मानलेल्या क्युबन जनतेने या निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार टाकला आणि ते पाहून पर्वतराशीत राहून गनिमी काव्याने सैन्याला भंडावून सोडलेल्या कॅस्ट्रो आणि चे च्या साथिदारांनी उघडपणे राजधानी 'हवाना' मध्ये प्रवेश केला....जनरल बटिस्टाने त्या अगोदरच देशातून पलायन केले आणि मग जानेवारी १९५९ मध्ये क्रांतीचे नेते 'फिडेल कॅस्ट्रो' क्युबाचे प्रमुख बनले....ते अगदी २००८ पर्यंत बिनविरोध (यांच्याविषयी स्वतंत्र लिहिणे गरजेचे आहे). कॅस्ट्रोचा उजवा हात असलेल्या मूळच्या अर्जेन्टिनाच्या चे ग्वेव्हराने आता 'क्युबन नागरिकत्व' पत्करले आणि त्या देशातील तळागाळातील लोकांमध्ये प्रत्यक्ष त्यांच्यासमवेत तो आता काम करू लागला. डॉक्टर तर होताच पण आता तो एक 'ऊस शेतकरी' बनला आणि साखरचे उत्पादन करणार्‍या कारखान्यात चक्क फॅक्टरी वर्करसारखी कामेही करू लागला. युरोपिअन देशातील कुणी पत्रकार त्याला भेटण्यासाठी वा मुलाखतीसाठी आला तर तो त्याना सरळ ऊसाच्या कापणीसाठी आमंत्रित करत असे आणि दोनतीन तास त्याना 'कामाला' लावल्यानंतरच हसतहसत त्याना मुलाखत देत असे. पुढे कॅस्ट्रो सरकारच्या मंत्रीमंडळात त्याने १९६१-६५ या कालावधीत उद्योग मंत्री म्हणूनही काम पाहिले.

१९५९ ते १९६१ या तीन वर्षात चे ने चीन आणि रशियाचे दौरे केले आणि तेथील साम्यवादी नेत्यांसमवेतच्या चर्चेतून त्याने काही नोंदीही केल्या. १९५९ मध्ये तर 'चे' भारतातही आला [त्या अगोदर तर इजिप्तला भेट देऊन त्यावेळेचे अध्यक्ष नासेर यांच्याशीही त्याने बातचित केली होती]

Photobucket" alt="CheF" />

(१९५९ मध्ये भारत भेटीत पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट)

आणि पंडित जवाहरलाल नेहरू याना भेटून कॅस्ट्रोकडून आणलेली एक भेट त्याने पंडितजीना दिली. भारताच्या भेटीत केवळ दिल्ली आणि कलकत्ताच नव्हे तर उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागांना त्याने भेटी दिल्या. इथल्या प्रचंड लोकसंख्येने (त्यावेळी ४५ कोटी) भरलेला हा देश किती वैविध्यतेने नटलेला आहे याच्या नोंदीही त्याच्या पुस्तकात सापडतात. 'गाय ही भारतीयांना पूजनीय का वाटते?' या प्रश्नाचेही त्याने उत्तर शोधून काढून भारत आणि गाय यांचे पवित्र नाते त्याने नोंदविले आहे. त्याचा देखणेपणा, सतत हसतमुख वर्तन, प्रभावी वक्ता, साधी राहणी (जवळपास सर्वच फोटो एका ठराविक ऑलिव्ह ग्रीन मिलिटरी ड्रेसचे तरी आहेत किंवा शेतात वा फॅक्टरीत केवळ डंगरी, किंवा पॅण्ट घालून काम करतानेच आहेत. पं.नेहरू असोत, माओ असो, नासेर असो वा यू.पी.मधील एखादा किसान असो, ड्रेस मिलिटरी सैनिकाचाच...) यामुळे जगभरातील युवकांचा तो लाडका आणि क्रांतीचा 'आयकॉन' बनला.

फिडेल कॅस्ट्रोची क्युबातील वाढती आणि चे ग्वेव्हराबद्दल एकूणच जगातील युवकात वाढत चाललेले प्रेम तसेच याना मिळत असलेला रशियाचा वाढता पाठिंबा नोंदवून घेत असता अमेरिकेन सीआयएच्या कारवाया थांबणे शक्यच नव्हते. क्युबाच्या बटिस्टा राजवटीशी एकनिष्ठ पण आता परांगदा असलेल्या काही असंतुष्ट क्युबनना हाती धरून सीआयएने आयझेनहॉवरच्या अध्यक्षीय कारकिर्दीतच क्युबावर हल्ला करण्याची योजना आखली ज्याला पुढे प्रेसिडेंटपदी आलेल्या जॉन केनेडी यानी हिरवा कंदील दाखविला होता...हे प्रकरण "ऑपरेशन बे ऑफ पिग्ज" या नावाने इतिहासात नोंदविले गेले आहे. कॅस्ट्रो, चे आणि त्यांच्या अन्य नीडर नेत्यांनी, तसेच त्यांच्या सैन्यानी योग्य त्या प्रतिकाराने विफल करून अगदी युनोच नव्हे तर जगभर अमेरिकेचे हसे करून टाकले. केनेडीसारख्या नेत्याने आपली चूक तात्काळ ओळखून क्युबातून अमेरिकेचे सैनिक काढून घेऊन एकप्रकारे कॅस्ट्रो आणि चे यांची प्रतिमा आणखीनच उजळ केली.

पुढे ऑगस्ट १९६१ मध्ये उरुग्वे येथे भरलेल्या अर्थविषयक बैठकीला चे ग्वेव्हरा हजर असता त्याने तिथेच आलेल्या व्हॉइट हाऊसचे सचिव रिचर्ड गूडविन यांच्यातर्फे प्रे.जॉन केनेडीला एक मजेशीर पत्र पाठविले. त्यात चे म्हणतो, "बे ऑफ पिग्जची योजना आखल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या आक्रमणापूर्वी आमची क्यूबन क्रांती काहीशी मलूल झाली होती, पण आता तुमच्यामुळेच तिला नवीन ऊर्जा प्राप्त झाली जी कायमपणे टिकेल...."

पण जगात आता 'क्युबा' चे स्थान भक्कम झाले असल्याने 'माझी आता इथे गरज आहे का?" असा प्रश्न त्याला पडू लागला.कदाचित यामुळेच आपण आपले आयुष्य 'मंत्री' म्हणून सुखात न काढता इतरत्र विखुरल्या गेलेल्या आणि पिचलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे आवश्यक आहे याची टोचणी त्याला लागली. तसेच क्रांती यशस्वी झाल्याने क्युबामधील राहाण्याचा आपला हेतू आता सफल झाला असून लॅटिन अमेरिकेतील अन्य अशाच एखाद्या राष्ट्रासाठी आपली सेवा देणे गरजेचे आहे असे त्याला तीव्रतेने वाटू लागले. मग १९६५ च्या एप्रिल महिन्यातील अशाच एका सायंकाळी त्याने फिडेल कॅस्ट्रोला एक प्रदीर्घ पत्र लिहून 'माझे क्युबातील काम संपले असून मी आता इथून जाणे गरजेचे आहे...' असे सांगितले ["मी क्युबा का सोडीत आहे...." याची कारणमीमांसा दाखविणारे एक पत्र त्याने फिडेल कॅस्ट्रोला लिहिले. पुढे कॅस्ट्रोने 'चे' कुटुंबियाच्या उपस्थितीत त्या दीर्घ पत्राचे टेलिव्हिजनवर जाहीर वाचन केले होते.] आणि त्याच पत्रात मंत्रीपदाचा राजिनामा देवून त्याने क्युबाला आभारपूर्वक रामराम केला....कायमचा...आणि त्याचवेळी क्रांतीच्या ज्वालेले घेरलेल्या आफ्रिकेतील कांगोत आणि नंतर बोलिव्हियात त्याने तेथील क्रांतीकारकांचा नेता म्हणून जनसेवेचा पुन:श्च ओनामा केला. १९६६ मध्ये अगदी खोलवर जाऊन त्याने बोलिव्हियनांची संघटना बांधली पण १९६७ संपतासंपता सीआयएने शेवटी बोलिव्हियन आर्मीला दिलेल्या ट्रेनिंग आणि शस्त्रांच्या घाऊक मदतीमुळे 'अर्नेस्टो चे ग्वेव्हरा' त्यांच्या हाती जखमी अवस्थेत सापडला आणि त्याच्यावर लागलीच बोलिव्हियाच्या आर्मीकडूनच गोळ्या घातल्या गेल्या ज्यात तो ९ ऑक्टोबर १९६७ रोजी गतप्राण झाला...वयाच्य ३९ व्या वर्षी. १० आक्टोबरला बोलिव्हियन सरकारने अधिकृतरित्या 'चे' च्या मृत्यूची घोषणा केली. पण त्याचे प्रेत क्युबाच्या हवाली करण्यात आले नाही, इतकेच नव्हे तर त्याचे दफन करण्यात आले की दहन याचाही पुढे कित्येक वर्षे सुगावाही लागला नाही. मात्र पुढे १९९५ मध्ये 'अर्नेस्टो चे ग्वेव्हरा'चे चरित्र लिहिणार्‍या जोन ली अ‍ॅन्डरसन या लेखकास बोलिव्हियन आर्मी जनरलने सांगितले की, "मध्य बोलिव्हियाच्या व्हॅलेग्रॅन्ड या गावाच्या परिसरातील एका डोंगराळ भागात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या स्मशानभूमीत त्याचे शरीर दफन करण्यात आले होते...". मात्र असे असले तरी १९९७ मध्ये त्यावेळेच्या बोलिव्हिया सरकारने त्यांच्याकडे असलेला 'चे' च्या अस्थी आणि अन्य सर्व वस्तू फिडेल कॅस्ट्रोकडे परत पाठविल्या. क्युबानेही अत्यंत शोककुल वातावरणात आपल्या या लाडक्या युवा नेत्याच्या त्या अस्थींचे विधिवत सान्ता क्लारा येथे सरकारी इतमामाने दफन केले. या प्रसंगी खुद्द फिडेल कॅस्ट्रो आणि लाखो 'चे' प्रेमी उपस्थित होते.

Che12" alt="CheF" />
(बोलिव्हियन आर्मीकडून युद्धात वीरमरण)
अर्नेस्टो चे ग्वेव्हरा....४५ वर्षे पूर्ण होत आली त्याच्या मृत्युला पण त्याचा फोटो.... (जगात सर्वाधिक प्रती निघाल्याचा इतिहास आहे असा हा बेफाट लोकप्रियता लाभलेला फोटो....) आजही जिथेजिथे क्रांतीची गरज आहे असे वाटते तिथेतिथे क्रांतीकारकांसाठी एक प्रतिक बनला आहे !!

Photobucket" alt="CheB" />

इन्द्रा

[लेखनासाठी : पावलो इव्हान्स आणि किम हिली यांच्या Argentine Marxist revolutionary and Guerrilla Leader तसेच The death of Che Guevara : A chronology या लेखांचा, तसेच "Red Envelope Entertainment" यानी सन २००८ मध्ये निर्मित आणि वितरीत केलेला "Chevolution" हा जवळजवळ दीड तासाच्या माहितीपटातील धावते वर्णन यांचा उपयोग झाला आहे. 'चे' संदर्भातील सर्व फोटो विकीपिडीयावरून साभार...ते "कॉपीराईट अ‍ॅक्ट" खाली आलेले नाहीत याची खात्री केली आहे !)

इतिहासमाध्यमवेध

प्रतिक्रिया

शेखर's picture

16 Feb 2011 - 1:01 am | शेखर

अप्रतिम लेख...

चे बद्दल आत्ता पर्यंत खरेच माहित नव्हते. लढवय्या क्रांतीकारकाची माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

सुनील's picture

16 Feb 2011 - 1:13 am | सुनील

सुंदर लेख.

लहानपणी "फिडेल, चे आणि क्रांती" हे पुस्तक वाचले होते. लेखकाचे नाव आता आठवत नाही. पण ते पुस्तक भारावून टाकणारे होते. तुमच्या लेखामुळे पुन्हा एकवार चेच्या आठवणींना उजाळा मिळाला.

इन्द्र्राज पवार's picture

16 Feb 2011 - 10:09 am | इन्द्र्राज पवार

"....फिडेल, चे आणि क्रांती"...."

~ "मुंबई दिनांक..." आणि "सिंहासन" चे लेखक श्री.अरू़ण साधू यानी हे पुस्तक लिहिले आहे.
खरे तर लेख लिहिताना या पुस्तकाचे वाचन करावे असे मनात आले होतेच....जरी यापूर्वी वाचले होते तरी... पण याच दरम्यान लेखात उल्लेख केलेला "Chevolution" ही त्याच्या जीवनावर बेतलेली एक नीतांतसुंदर डॉक्युमेन्टरी पाहाण्यात आली, आणि मग अन्य कुठे शोध घेण्याची आवश्यकताच भासली नाही.

तुम्ही जरूर पाहा....दीड तासाच्या या पटात निव्वळ चे बद्दलच नव्हे तर एकूणच क्रांतीचा लेखाजोखा मांडला गेला आहे.

इन्द्रा

मदनबाण's picture

16 Feb 2011 - 7:03 am | मदनबाण

अत्यंत माहितीपूर्ण लेख... :)
पुन्हा एकदा शातंपणे बसुन वाचीन...

बेसनलाडू's picture

16 Feb 2011 - 8:06 am | बेसनलाडू

उत्तम, माहितीपूर्ण लेख. विकीवर गव्हेराबद्दल वाचले होतेच; ते सगळे नव्याने आठवले. विशेषतः जेव्हा गव्हेराला बंदी बनवून त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या, त्याआधीचे गोळ्या झाडणारा दारुडा सैनिक आणि गव्हेरा यांचे विकीवरील संभाषण तर मृत्यू डोळ्यांसमोर असतानाची गव्हेराची मानसिक कणखरता दाखवणारे आहे. खरे तर गव्हेराला बंदी बनवले गेले होते आणि अमेरिकेची अशी इच्छा होती की पुढील कारवाई (खटला चालवणे, शिक्षा देणे इ.) साठी त्याला पनामाला न्यावे. मात्र गव्हेराचा कैदेतच खून करायचा आणि लष्करी कारवाईत तो मारला गेला, असे दाखवायचे, अशी खेळी तत्कालीन बोलिव्हियन राजवटीने खेळली. विकीवरचे हे वर्णन वाचून मी अक्षरशः शहारलो होतो आणि नकळत डोळे पाणावले होते -

Moments before Guevara was executed he was asked by a Bolivian soldier if he was thinking about his own immortality. "No", he replied, "I'm thinking about the immortality of the revolution." When Sergeant Terán entered the hut, Che Guevara then told his executioner, "I know you've come to kill me. Shoot, coward! You are only going to kill a man!" Terán hesitated, then opened fire with his semiautomatic rifle, hitting Guevara in the arms and legs. Guevara writhed on the ground, apparently biting one of his wrists to avoid crying out. Terán then fired several times again, wounding him fatally in the chest at 1:10 pm, according to Rodríguez. In all, Guevara was shot nine times. This included five times in the legs, once in the right shoulder and arm, once in the chest, and finally in the throat.

गव्हेराचे छायाचित्र अनेक ठिकाणी क्रांतीचे प्रतीक बनून राहिले आहे, हे इजिप्तमधील घडामोडींचे चित्रण पाहताना दिसून आलेच आहे.
(स्मरणशील)बेसनलाडू

फिडेल कॅस्ट्रो, गमाल अब्दल नासर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सक्रीय पुढाकाराने अलिप्तवादी चळवळीची स्थापना झाल्याचे नि त्याद्वारे जगाच्या राजकीय ध्रुवीकरणाला आळा बसल्याचे इतिहासात शिकल्याचे स्मरते. चाचा नेहरूंबद्दल अनेक माध्यमांतून अनेकदा वाचले आहे. पण कॅस्ट्रो, नासर यांच्याबद्दलही नक्की लिहा. वाचायला आवडेल.
(वाचनोत्सुक)बेसनलाडू

सुनील's picture

16 Feb 2011 - 8:08 am | सुनील

फिडेल कॅस्ट्रो, गमाल अब्दल नासर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सक्रीय पुढाकाराने अलिप्तवादी चळवळीची स्थापना झाल्याचे नि त्याद्वारे जगाच्या राजकीय ध्रुवीकरणाला आळा बसल्याचे इतिहासात शिकल्याचे स्मरते
टिटोंना विसरू नका!

(स्मरणशील) सुनील

बेसनलाडू's picture

16 Feb 2011 - 8:10 am | बेसनलाडू

पवार साहेब, तुमच्या पुढील किमान ४ उत्तम लेखांची वाट पाहत आहोत.
(सहमत)बेसनलाडू

इन्द्र्राज पवार's picture

17 Feb 2011 - 12:49 am | इन्द्र्राज पवार

"...किमान ४ उत्तम लेखांची ...."

~ थॅन्क्स बेला.....यापैकी फिडेल कॅस्ट्रोचा लेख म्हटले तर या क्षणीही तयार आहे. पण राहू दे थोडे दिवस त्याला वाट पाहात. श्री.सहजराव आणि तुमच्यासारख्या जाणकार वाचकांनी या संदर्भात केलेल्या काही सूचनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

हां....नासेर आणि टिटोवरही लिहावे असे मात्र वाटू लागले आहे.

(चे च्या अखेरच्या क्षणांचे तुम्ही वर दिलेले वर्णन वाचून त्याच्याविषयीचे प्रेम अजूनही वाढते.)

इन्द्रा

सहज's picture

16 Feb 2011 - 8:22 am | सहज

इंद्राजचे लेख म्हणजे गौतम राजाध्यक्षांचे फोटो, सगळे काही सुंदर, चकचकीत.

शेवटचा परिच्छेद तरी इंद्राज तुला समजलेला, तुझे मत असलेला पाहीजे रे. चे बद्दल फक्त आदरच आहे का तुला?

डॉक्टर तर होताच पण आता तो एक 'ऊस शेतकरी' बनला आणि साखरचे उत्पादन करणार्‍या कारखान्यात चक्क फॅक्टरी वर्करसारखी कामेही करू लागला. युरोपिअन देशातील कुणी पत्रकार त्याला भेटण्यासाठी वा मुलाखतीसाठी आला तर तो त्याना सरळ ऊसाच्या कापणीसाठी आमंत्रित करत असे

ज्यांना लोकांच्या मदतीने चळवळ उभारायची आहे त्यांना हे असे करावेच लागते. आता नावे घेतली तर चर्चा भरकटेल म्हणुन पण हेच अन्य नेत्यांच्या बाबतही झाले आहे. बिग डिल!

हा 'चे' जर दिसायला कुरुप असता तर इतक टि-शर्टप्रिय झाला असता का? युथ - रेबल - गुड लुक्स - पोरींना असे काही आवडणे व एक फॅशन. एक सोशलिस्ट नेता 'चे' चे 'भांडवलशाही' लोकांकडून टिशर्टच्या माध्यमातून विकला गेला. हा टि शर्ट घालणार्‍या कित्येक लोकांना त्याचे पूर्ण नाव व काम माहीत नसते. हा टिशर्ट विकला गेला नसता, फॅशन म्हणून याची विक्री झाली नसती तर किती लोकांना आजही लक्षात असता?

एका देशाच्या माणसाने दुसर्‍या देशात जाउन सशस्त्र कारवाया करणे याला काय म्हणले जाईल?

तो काळ वेगळा होता, सत्ता चालवणारे तसे जुलमी होते. सशस्त्र क्रांतीला साथ मिळत होती. सोशलिस्ट क्रांती बदल घडवेल असा विश्वास होता. जग ह्या दोन विचारसरणीत विभागले जात होते. ज्या कॅस्ट्रोने सत्ता हस्तगत केली पुन्हा जनतेचे गोरगरीबांचे राज्य आणले का? सोशलिस्ट म्हणवत भांडवलशाहीला नावे ठेवत एकदा सत्ता हस्तगत केल्यावर काय कार्य?

असो. सांगायचा मुद्दा की तुझे मत लेखात शेवटी येउ दे. होते का आजकाल लोकप्रिय लेख हे अन्य माध्यमात, पेपरात छापायची मागणी असते. लोकांपर्यंत दोन्ही बाजु पोहोचण्यासाठी जरा वेगळा प्रकाशही टाकायला पाहीजे तुझ्यासारख्या लेखकाने. नक्षलवादाचे उदात्तीकरण होणे पटते का?

असो फोरम मधे विरझण लावले गेले पाहीजे (आग नाही पण दुसरी बाजु) हे तत्वता मान्य होतेच पण विरझणवाल्या लोकांना अतिशहाणे किंवा संस्थळद्वेष्टे म्हणून ब्रँड केले जाते. प्रगल्भ, अप्रगल्भ हिणवले जाते, चर्चा उडवून लावण्याच्या मारामार्‍या, तुमच्याकडे असेच चालते त्याचा वाईट परिणाम कंपू, संस्थळ भांडणे यात दिसुन येतो. मुख्यत्वे चे / एका सशस्त्र लढ्याच्या समर्थकाच्या धाग्यात प्रामाणिक चर्चा होणे हे 'चे' ला आवडले असते (??) म्हणुन हा प्रतिसादाचा खटाटोप.

खुद्दा इंद्राजने या चे बद्दल आपले मत मांडावे ही विनंती.

विरंगुळा - प्रतिसादात भाग न घेणार्‍या मिपाकरांना गृहपाठ - मिपावरचे 'चे', 'कॅस्ट्रो' ओळखा. :-) पण इथे धाग्यावर लिहू नका.

आळश्यांचा राजा's picture

16 Feb 2011 - 8:59 am | आळश्यांचा राजा

हा 'चे' जर दिसायला कुरुप असता तर इतक टि-शर्टप्रिय झाला असता का?

एक सोशलिस्ट नेता 'चे' चे 'भांडवलशाही' लोकांकडून टिशर्टच्या माध्यमातून विकला गेला.

हा टिशर्ट विकला गेला नसता, फॅशन म्हणून याची विक्री झाली नसती तर किती लोकांना आजही लक्षात असता?

एका देशाच्या माणसाने दुसर्‍या देशात जाउन सशस्त्र कारवाया करणे याला काय म्हणले जाईल?

ज्या कॅस्ट्रोने सत्ता हस्तगत केली पुन्हा जनतेचे गोरगरीबांचे राज्य आणले का? सोशलिस्ट म्हणवत भांडवलशाहीला नावे ठेवत एकदा सत्ता हस्तगत केल्यावर काय कार्य?

नक्षलवादाचे उदात्तीकरण होणे पटते का?

बाकी लेख छानच!

ग्वेव्हरा बद्दल आजवर फार तुटपुंजी माहिती होती. त्यात भर घातल्या बद्दल इंद्रदाचे आभार.
तसच सहज रावांचा ही मुद्दा पटला.
इंद्रदाकडुन अजुन माहिती वाचायला आवडेल.

आवांतर: ( सहजराव व्यनी करतोय हो ;) )

sneharani's picture

16 Feb 2011 - 10:16 am | sneharani

मस्त माहितीपुर्ण लेख!
:)

पाषाणभेद's picture

16 Feb 2011 - 10:39 am | पाषाणभेद

छान माहितीपुर्ण लेख.
आपल्याकडच्या 'जगाचा इतिहास' असल्या शालेय पुस्तकांत असल्या हिरोंचा उल्लेखदेखील नसावा याचे वैशम्य वाटते.

गवि's picture

16 Feb 2011 - 10:46 am | गवि

चे गव्हेराविषयी नावाखेरीज काहीच माहिती नव्हती. त्यामुळे भारून टाकणारा लेख असंच वर्णन करतो.

बाकी पवारसाहेबांची खास डीटेलिंगची शैली आहेच.

अत्यंत आवडले.

पण पुढे प्रतिसादांत उमटलेल्या मुद्द्यांवर चर्चा पहायलाही आवडेल. कारण सर्वच नवीन आहे.

श्रावण मोडक's picture

16 Feb 2011 - 12:03 pm | श्रावण मोडक

पूजा आणि 'उत्तरपूजा' असे या धाग्याचे वर्णन होऊ शकते. दोन्हीं घातकच.
चेच्या संदर्भात पूजा ही पूर्वापारच आहे. त्यामुळे तसे कोणतेही लेखन वगैरे थोडे विरजण लावूनच घ्यावे हे उत्तम. पण विरजण लावतानाही गडबड नको. एरवी दही न मिळता दूध फक्त फाटायचे (हुश्श, दवणीय लिहायला हरकत नाही आता).
सहजरावांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. काही अगदी खोलवर विचार करण्यासाठीचेच आहेत. काहीमध्ये इथल्या लेखनातून वरकरणीपणा वाटावा (तो त्यांचा हेतू नसेल, पण त्या परिस्थितीत लिहिताना, एरवीही कोणाचीही होऊ शकते अशी, गडबड) असे झाले आहे.

ज्यांना लोकांच्या मदतीने चळवळ उभारायची आहे त्यांना हे असे करावेच लागते.

फक्त चळवळीला हे लागू नाही. हे सार्वत्रिक आहे. चळवळीच्या बाहेर पक्षकार्य करतानाही असे करावेच लागते. तेच प्रशासनातही. त्यामुळे त्याचे मूल्य कमी होते का? लेखनाचा सूर तसा वाटतोय. तसा नसेल तर माझा मुद्दा खारीज.

हा 'चे' जर दिसायला कुरुप असता तर इतक टि-शर्टप्रिय झाला असता का? युथ - रेबल - गुड लुक्स - पोरींना असे काही आवडणे व एक फॅशन. एक सोशलिस्ट नेता 'चे' चे 'भांडवलशाही' लोकांकडून टिशर्टच्या माध्यमातून विकला गेला. हा टि शर्ट घालणार्‍या कित्येक लोकांना त्याचे पूर्ण नाव व काम माहीत नसते. हा टिशर्ट विकला गेला नसता, फॅशन म्हणून याची विक्री झाली नसती तर किती लोकांना आजही लक्षात असता?

माझी माहिती चुकत नसेल तर - चेच्या लोकप्रियतेची सुरवात त्याच्या सुरूप असण्याने झाली नव्हती. तशी ती नाही. यूथ - रिबेल हे दोन मुद्दे त्यात निश्चितपणे होते. पोरींना आवडणे व फॅशन हे आरंभीच्या काळात तरी पूर्ण आणि एकमेव वास्तव नव्हे. चेच्या संदर्भात रिबेलच्या जोडीने साहसीपणा, अभिनवता हेही मुद्दे होते. त्याला जोड होती ती विचारांच्या आविष्काराची. टीशर्ट भांडवलशाहीने काढले वगैरेतही पुरते तथ्य नाही. प्रथेनुसार हा प्रकार आधी चळवळीतूनच सुरू झाला. चळवळींना (इतर कोणत्याही घटकाप्रमाणे) एक प्रकारची ओळख लागतेच. त्यातून हे झाले. चेचे टीशर्ट चळवळींनी स्वबळावर तयार करून प्रसारित केले. पुढे त्याला संपूर्णपणे नव्हे, पण अंशतः फॅशनचे वलय लाभले. भांडवली व्यवस्थेने ते उचलले नसते तर नवल. (त्यातही मला काही वावगे वाटत नाही. कारण भांडवलशाहीही मार्क्सने सांगितली त्यापलीकडे बदलत गेली आहे हे वास्तव आहे.) टीशर्टच्या माध्यमातून त्याचा प्रसार झाला नसता तर किती लोकांच्या तो लक्षात राहिला असता हा मुद्दा वरकरणी पटतो. पण त्याचा फैसला इतिहास करेल. आपण अद्यापही चेनंतरच्या फारतर तिसऱ्या पिढीत आहोत.

एका देशाच्या माणसाने दुसर्‍या देशात जाउन सशस्त्र कारवाया करणे याला काय म्हणले जाईल?

काही नाही. देश वगैरेच्या सीमा या अशा काही मुद्यांसंदर्भात अशा माणसांबाबत असतच नाहीत. फक्त सशस्त्र की निःशस्त्र यावर याचे तपशील आणि त्यानुसार पक्ष ठरतात.
(मी मुळातच सशस्त्र वगैरेच्या विरुद्ध आहे; पण एखाद्याने तो मार्ग स्वीकारला तर त्याचे फळ त्याला मिळेल. त्यात कोलॅटरल डॅमेज (अर्रर्र... हा शब्द अनाहूतपणे आला ;) ) असतेच. निःशस्त्र असण्याचेही तसेच असते.)

...कॅस्ट्रोने सत्ता हस्तगत केली पुन्हा जनतेचे गोरगरीबांचे राज्य आणले का? सोशलिस्ट म्हणवत भांडवलशाहीला नावे ठेवत एकदा सत्ता हस्तगत केल्यावर काय कार्य?

क्यूबाविषयी काही बोलणे शक्य नाही. कारण तिथली किती वास्तविक माहिती बाहेर आली हा प्रश्न आहे. त्यामुळे हितकारकच सारे असेल असे मी तरी मानणार नाही. राजवट बंदिस्त असणेही चूकच.
(अगदी वैयक्तिक (कदाचित चुकीची) धारणा - सोशालिस्ट म्हणजे भांडवलाचा नकार नाही. त्यांनाही भांडवल हवेच असते. प्रश्न फक्त नियंत्रणाचा. नियंत्रण खासगी की सरकारी. बाकी दोघंही सारखेच थोर किंवा सारखेच चोर.)

...लोकांपर्यंत दोन्ही बाजु पोहोचण्यासाठी जरा वेगळा प्रकाशही टाकायला पाहीजे तुझ्यासारख्या लेखकाने.

सहमत.
नक्षलवादाचे उदात्तीकरण होणे पटते का?
नाहीच.

मृत्युन्जय's picture

16 Feb 2011 - 12:47 pm | मृत्युन्जय

छान लिहिले आहेस रे. या धाग्यावरच्या प्रतिक्रिया देखील सुंदर. चे बद्दल अजुन वाचेन आता आणि मगच मत बनवेल की त्याचा जयजयकार करावा की नाही ते.

अतिशय सुंदर माहिती .. नावा पलीकडे आणि टी शर्ट पलीकडे जास्त माहिती नव्हती..
धन्यवाद ....

अवांतर : फोटो येथे दिसले नाहित पण विकीपेडीआ वर जावुन बरेच से पाहिले

रणजित चितळे's picture

16 Feb 2011 - 3:11 pm | रणजित चितळे

अप्रतिम शब्दरुपांकन. फारच सुंदर

प्रास's picture

16 Feb 2011 - 4:28 pm | प्रास

'चे'ची बरीच माहिती कळली....

चांगल्या लेखाबद्दल आभारी......

चिंतामणी's picture

16 Feb 2011 - 5:01 pm | चिंतामणी

उत्तम लेख.

परन्तु " जगातील जवळपास सर्वच देशातील युवाच नव्हे तर आता अगदी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांनाही माहीत आहे.." हे वाक्य माझ्यामते असे असायला हवे होते.

अगदी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांना नव्हे जगातील जवळपास सर्वच देशातील युवांनासुध्दा माहीत आहे..

आळश्यांचा राजा's picture

16 Feb 2011 - 5:06 pm | आळश्यांचा राजा

सहजरावांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि श्रामोंच्या प्रतिसादाला अनुसरुन चे विषयी मला असं वाटतं -

चे सारख्या माणसांना देशाचं बंधन नसतं, आणि ते रास्त आहे. त्याच्या सशस्त्र मार्गाला एका संदर्भात पाहणे अतिशय आवश्यक आहे. ज्या ज्या देशांत त्याने हा मार्ग अवलंबला, ते ते देश लष्करी दमनशाहीवर राज्य करत होते. तिथली व्यवस्था बदलणे हाच एक मार्ग चे कडे होता. इंद्राने लेखात लिहिले आहेच - अमेरिकेच्या पाठिंब्यावर हे लष्करी हुकुमशहा उभे होते, म्हणून चे अमेरिकेचा शत्रु बनला. या परिस्थितीत चे कडे सशस्त्र गुरिला युद्धाशिवाय काय पर्याय होता?

एका माणसाने दुसर्‍या देशात जाऊन सशस्त्र लढा देणे याला काहीही म्हणता येऊ शकते - चांगले, वाईट. त्याला संदर्भ हवा, चे च्या संदर्भात या गोष्टीचे माझ्या मते समर्थन होते.

याचा अर्थ असा नाही की नक्षलवादाचे समर्थन करावे. चे चे कोणतेही संदर्भ नक्षल्यांना लागू होत नाहीत.

बाकी चे च्या हॅण्डसम लुक्सचा काही एक भाग तोच आयकॉन होण्यामागे असावा असे मला वाटते. तो एवढा रुबाबदार वगैरे नसता तरीही आयकॉन झाला असताच; फक्त मला वाटतं त्याचे एवढे टी शर्ट निघाले नसते!

कॅस्ट्रोने नंतर काय केले हा संशोधनाचा विषय खराच. लढा देणे आणि राज्य करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

ज्ञानेश...'s picture

17 Feb 2011 - 1:35 pm | ज्ञानेश...

उत्तम विषय/परिचय आणि प्रतिसाद.
हा धागा आता चांगल्या वाचनाची मेजवानी ठरतो आहे. इन्द्रा द टायगर यांनी आता नासेर/टिटो/कॅस्ट्रो आणि ((फाटे फुटण्याच्या भीतीने) नेहरूंना वगळून) अलिप्ततावादी चळवळ आणि तिचे यशापयश यावरही लिहावे, ही विनंती आहे.

इन्द्र्राज पवार's picture

17 Feb 2011 - 11:03 pm | इन्द्र्राज पवार

श्री.सहज, श्री.बे.ला., श्री.श्रा.मो आणि श्री.आ.रा....या चौघांच्याही प्रतिसादाना एकत्रित प्रतिसाद देत आहे.

~ मला हे विनातक्रार मान्य आहे की, मी चे ग्वेव्हरा संदर्भात 'निबंध' सद्दर्श्य लेखन केले कारण माझा तोच प्रमुख उद्देश होता. लेखात लिहिल्याप्रमाणे विविध चॅनेल्सवर इजिप्तचा लढा पाहात असताना 'तो' टी शर्ट आणि पोस्टर घेतलेले दोन्ही गटातील लोक दिसताना माझ्या मित्रांपैकी एकाचा धाकटा भाऊ सहजगत्या उदगारला 'शर्टावरील नेता कोण?" म्हणजे तो फोटो इजिप्तच्या चळवळीशी संबंधित आहे अशी त्याची समजूत झाली. त्याला 'चे' आणि त्याचे कार्य थोडक्यात सांगितले पण नंतर वाटू लागले की तो तर कॉलेजच्या पहिल्या दुसर्‍या वर्षातील विद्यार्थी पण असे कित्येक असतील त्याना 'चे' आणि त्याला प्राप्त झालेले अदभुत वलय माहीतही नसेल. त्यामुळे प्रथम त्याची सविस्तर ओळख करून द्यावी आणि त्याअनुषंगाने येणार्‍या प्रतिसादाच्या आधारे हा विषय चहुअंगाने विचाराला घ्यावा असे ठरले.

अपेक्षेप्रमाणे वरील चौघांनी विस्ताराविषयाबाबत आणि इतरानीही थोडीबहुत हेच मत मांडले असल्याने आता त्यावर चर्चा करता येईल.

लॅटिन अमेरिका हा एक लहानमोठ्या क्षेत्रफळाचा २० राष्ट्रांचा समुदाय आहे आणि प्रामुख्याने 'स्पॅनिश' आणि 'पोर्तुगिज' भाषा बोलणार्‍यांचा देश आहे. ब्राझिल हा असा एकमेव देश आहे या गटात जो उरलेल्या लॅटिनो पासून काहीसा फटकून आहे...विशेष म्हणजे अन्य राष्ट्रांच्या तुलनेत तो लोकसंख्या आणि क्षेत्रफळानेही मोठा आहे. बाकीची सर्व छोटी राष्ट्रे [बोलिव्हीया, चिली, क्युबा, कोलंबिया, कोस्टा रिका, इक्वेडोर, एल साल्व्हाडोर, होंडुरास, मेक्सिको, निकारगुवा, पनामा, पराग्वे, उरुग्वे, पेरू, प्युर्तो रिका, व्हेनेन्झुएला] असून त्यातल्या त्यात 'अर्जेन्टिना' याना दादा वाटावे असा मोठा आहे. ही इतकी छोटी राष्ट्रे आहेत की, सदैव चर्चेत असणारे आणि अमेरिकालाही धाक वाटावा असे 'क्युबा' सारखे राष्ट्र घेतले तर त्यांची एकूण लोकसंख्या (सन २०१० ची) अवघी १ कोटी १२ लाख आहे तर क्षेत्रफळ आहे १ लाख १० हजार स्क्वे.कि.मी. ब्राझिल आणि अर्जेन्टिना सोडता सर्वच राष्ट्रांची लोकसंख्या याच प्रमाणात कमीजास्त आणि क्षेत्रफळही तितकेच आहे.

आता आपल्या भारताची आणि या राष्ट्रांची तुलना करून विरोधाभास पाहिल्यास एकट्या 'गोव्या'ची लोकसंख्या क्युबापेक्षा जास्त आहे तर देशातील दूरवरची मणिपूर आणि मेघालयासारखी राज्येही लोकसंख्या आणि क्षेत्रीय मोजमापाच्या दृष्टीने लॅटिन अमेरिकेतील कित्येक देशापेक्षा मोठी आहेत. एकट्या आपल्या "महाराष्ट्रा" ची लोकसंख्या ११ कोटीच्या घरातील असल्याने लॅटिन अमेरिकेच्या १० राष्ट्रासमवेत एकटा महाराष्ट्र आकडेवारीत पुढे जातो. ही तुलना अशासाठी की, तेथील नेत्यांनी हा छोटेपणा नाहिसा होऊन त्याला एक विशाल रूप यावे यासाठी [चे आणि कॅस्ट्रोच्या अगोदरपासून] सातत्याने 'हिस्पानिक अमेरिके'ची (ब्राझील वगळून....एकट्या ब्राझिलची राष्ट्रीय भाषा 'पोर्तुगिज' आहे, तर बाकीच्या सर्व लॅटिनोंची 'स्पॅनिश') कल्पना मांडली आहे...अगदी सन १४९२ पासून ती थेट चे च्या या प्रयत्नापर्यंत चालूच आहे. अशासाठी की अमेरिका त्या खंडात या छोट्या राष्ट्रात कायम अशांतता राहिल असेच प्रयत्न करीत असल्याचे आढळत असल्याने एकटादुकट्याने अंकल सॅमला लढा देण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊन आपल्या खंडाची प्रगती करू या, यासाठी ते अपील. अमेरिका आणि कॅनडा हे दोन बलाढ्य देश एकत्र आले तर त्यांची लोकसंख्या होईल ३३ कोटी तर ब्राझीलला वगळूनही सर्व 'हिस्पानिक' राष्ट्रे एकत्र आली तर त्यांची लोकसंख्या होईल ३४ कोटी...शिवाय सीमारेषांचीही डोकेदुखी कायमपणे मिटेल (१९२०-२५ च्या सुमारास तर 'हिस्पानिक अमेरिका' चे एक "झेंडा'ही तयार झाला होता...'चे' च्या जन्माअगोदर). 'चे' क्युबा क्रांतीनंतर याच विचाराने पुढील कार्य ठरवित होता. पण सीआयए ला लॅटिनोंची अशी एकी व्हायला नकोच असल्याने आहे त्या साम्राज्यशाही मानणार्‍या सत्ताधार्‍यांना पैसा आणि शस्त्रे पुरवित त्यानी ते रण कायम धगधगीत ठेवले.

थोडक्यात 'चे' ने "अन्य राष्ट्रात जावून शस्त्राच्या साहाय्याने सत्ता उलथविणे" ही व्याख्या तिथल्या इतिहासाला मान्य नाही, हे अशासाठी की त्याअगोदरही 'स्पॅनिश ओरिजिन' च्या लोकानी एकत्र यावे अशी धडपड सातत्याने होतीच. फक्त तांत्रिकदृष्ट्या आपण वेगळे आहोत अशीच सर्वांची भावना होती....आजही आहे. अर्नेस्टोने 'क्युबा' तील आपला 'रोल' संपला आहे ही जी भूमिका घेऊन तिथले मंत्रीपद सोडले तेही याच हेतूने की आपण सर्वांनी एका छत्रीखाली यावे यासाठी. आणि जे सरकार त्या त्या छोट्या राष्ट्रात होते ते अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे असल्याने 'भांडवलशहा' ला हुसकावणे हाच त्याचा मूळ हेतू असे.

श्री.सहज यानी 'कॅस्ट्रो' च्या राजवटीविषयी उल्लेख केला आहे. पण त्याचे 'डिसेक्शन' स्वतंत्ररित्या करणे गरजेचे आहे कारण आपल्या धाग्याचा हीरो आहे 'चे', ज्याने अगदी सहजपणे 'हवाना' चे सुख सोडून बोलिव्हियाचे जंगल जवळ केले. [कॅस्ट्रो जर ४० वर्षापेक्षाही जास्त काळ सत्तेत राहू शकतात आणि जनता त्याना स्वीकारते, याचा अर्थ त्यांच्यात काहीतरी Qualities आहेत हे मान्य करू या. अमेरिकन आणि ब्रिटिश मिडिया त्यांच्याविरोधी बातम्या देत असते म्हणजे त्या सर्व शिरोधार्थ मानाव्यात असेही नसते.]

चे देखणा होता म्हणून तो लोकप्रिय झाला असे त्याच्या यशाचे मूल्यमापन करू नये असे वाटते. निव्वळ देखणेपण असते तर तो एल्व्हिस प्रिस्ले होऊन बेव्हर्ली हिल्स येथे मुक्कामास गेला असता. पण उच्चविद्याविभूषित, चौफेर वाचन, तळागाळातील लोकांच्यासमवेत अगदी विशीत असल्यापासून काम करण्याची त्याची खुबी....१५ ते २० हजार किलोमीटर्सचा प्रवास सायकल आणि फटफटीने करून तेथील समाजजीवन अनुभवने.....इतकेच काय पण वेळप्रसंगी महारोग्यांचासमवेतही राहुन त्यांची कामे करणे, डॉक्टरकीच काय पण उसाच्या शेतात तोडणी कामगार म्हणूनही कामे करणे.....आदी अनेक बाबी त्याला 'हीरो' ठरविण्यास कारणीभूत झाल्या होत्या. क्युबाचे नागरिकत्व घेतले म्हणजे लॅटिन अमेरिकेतील तत्सम पिचत पडलेल्या अन्य राष्ट्रांना तो विसरला असे नाही....किंबहुना बोलिव्हियाला जायचे नक्की झाल्यावर जे एक पत्र त्याने फिडेल कॅस्ट्रोला लिहिले त्यात स्पष्टच म्हटले आहे, ....

"........मला आता अशी जाणीव होऊ लागली आहे की माझे क्युबातील काम आता संपले आहे. अशा चक्रात असणारी अन्य राष्ट्रे माझे मार्गदर्शन इच्छित आहेत आणि मी जर त्यांची विनंती स्वीकारली तर क्यूबन सरकारमधील मंत्री या नात्याने मी ते करणे इथल्या घटनेच्या विरूध्द आणि म्हणून चुकीचे होईल. पण मी तर त्यांची विनंती नाकारूही शकत नसल्याने आता आपणा दोघाना एकमेकाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे.
".....मी इथे हे स्पष्ट करतो की, तुम्हाला सोडून जाताना हर्ष आणि दु:ख या दोन्ही भावांच्या मिश्रणाने जात आहे. हर्ष एवढ्यासाठी की आता क्युबातील काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि दु:ख यासाठी की तुमच्यासारख्याना आणि माझ्या प्रिय क्युबाच्या नागरिकाना, ज्यानी मला आपला पुत्र मानले, सोडून कायमचे जावे लागत आहे. तरीही येथील शिदोरी मला पुढे जिथे जिथे काम करणार आहे तिथे नक्कीच उपयोगी ठरणार आहे. विश्वात कुठेही साम्राज्यवादा विरूद्ध लढा देण्याची वेळ आली तर मला इथल्या लढ्याच्या आठवणीचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे...."

अशा बेडर आणि कुर्बानीस सदैव तयार असलेला नेत्याचा फोटो ताईत करून गळ्यात घातला म्हणजे तो देखणा होता म्हणून अशी समजूत त्याच्या एकूणच कारकिर्दीवर आणि विचारावर अन्याय करते. बोलिव्हियन आर्मीला अमेरिकेने पुरविलेल्या बंदुकांना सामोरे जावून छातीवर गोळ्या झेलतच त्याने प्राण सोडले हे त्याच्या कार्याला साजेसे असेच झाले होते.

इन्द्रा

सहज's picture

18 Feb 2011 - 8:33 am | सहज

चे एक प्रसिद्ध बंडखोर नेता व तसेच देखणा होता म्हणूनच अन्य देशात त्याचा टि शर्ट त्याच्या मृत्युनंतरही लोकप्रिय झाला. काही धार्मीक लोक, गळ्यात धार्मीक चिन्ह असलेली चेन, हातात गंडा किंवा असेच विशिष्ट कारणाने बांधलेला धागा, जानवे इ मनापासुन काही पटणारी मुल्ये असतात म्हणून घालतात त्याप्रमाणे अत्यंत आदर, चे च्या कार्याचे महत्व पटून त्याची आठवण म्हणुन टि शर्ट बहुसंख्य जनता घालत नाही, विशेषता आजही. इतकाच माझा मुद्दा होता. अरे इंद्रा 'चे' सगळे चांगले गुण तु लिहले मग मी परत कशाला लिहू म्हणून फक्त दुसरी बाजू दाखवली. चे च्या देखणेपणामुळे चे हा मोठा बनला असे मी म्हणत आहे असे तुला वाटले असेल तर तसे अजिबात नाही. मी फक्त मृत्युनंतरच्याही चे च्या वलया व विशेषता त्याची टोपी, टि शर्ट इ गोष्टींबद्दल म्हणत होतो. आणी हो, जसे तुला वाटले की देखणेपणावरुन चे चे अगदीच मामूलीकरण करत आहे तसे तू ही केलेसच की. एल्वीसला देखणेपणाने मोठे केले म्हणतोस म्हणजे त्याच्या गायकीला भाव दिलाच नाहीस की, एल्वीसही त्याच्या कलेमुळे, मेहनतीमुळेच मोठा झाला. :-) असो माझा मेन मुद्दा मृत्युनंतर इतक्या वर्षानी अजुनही त्याच्या नावाचे टि शर्ट घालतात म्हणजे बघा किती महान असेल ह्या अश्या निबंधातून अर्थ निघणार्‍या वाक्याचा खीस पाडणे हा हेतू होता. असो हा मुद्दा पुरे.

अर्थात इंद्रा तुझ्या एकंदर लेखातून 'चे' बद्दल एक व्हिजनरी व त्याचा मार्ग अयोग्य नव्हता असा सूर मला दिसत आहे व तो मला पटत नाही. का ते पुढे.

तू लॅटीन अमेरिकाचे काही मुद्दे मांडलेस पण लक्षात घे १५ ते १८ शतक द. अमेरिका ही पोर्तुगीज व स्पेन यांची वसाहत होती. यात आता मी एकच देश घेतो, बोलीव्हीया. नेपोलीयन (फ्रेंच) व फर्डीनंड (स्पेन)च्या युरोप मधील युद्धात साधारण १८०० च्या सुरवातीलाच स्पेनची द. अमेरिकेतली पकड ढिली होत चालली होती. बोलीव्हीआ मधे स्वतंत्रतेचे वारे सुरु झाले होते. १८०९ ला सुरवात होउन १६ वर्षानी १८२५-२६ला बोलिव्हीया स्वतंत्र झाला. त्यांनी घटना इ निर्माण करायचा प्रयत्न केला पण परत अंतर्गत बंडाळी इ मुळे १८२८ मधे बहुतेक पेरु ने बोलीव्हीयावर आक्रमण केले, पुन्हा काही वर्षे असेच चीली, पेरु, बोलीव्हीया युद्धे भूभाग वाद होतेच. समेटचाही प्रयत्न झाले अधुन मधुन. एक फेडरेशन इ इ . कृपया लक्षात घ्या त्या वेळी ना 'चे' होता ना ती 'सीआयए' वाली अमेरीका. लक्षात घ्या चे ने लहान राष्ट्रांचे एकत्रीकरण इ तत्वता रम्य वाटतील अश्याच कल्पना मांडल्या असतील तरी त्या शस्त्रांच्या बळावर अतिशय चूक वाटते. इस्ट युरोपीय राष्ट्रे त्याच सुमारास रशीयाने घशात घातली एक मोठा भूभाग केला आज तो पुन्हा विस्कटला आहे, रशीयाने केलेल्या अत्याचार जगापुढे आला. चे च्या काळात साम्यवाद व लोकशाही+भांडवलशाही यांची स्पर्धा होती. आज लोकशाहीचे मॉडेल तुम्हा आम्हाला हुकूमशाहीपेक्षा योग्य वाटतेच. त्याकाळात "पाश्चात्य जगाला" ते वाटले व त्याकरता त्यांनी संघर्ष केला.

बर चे चा कालाखंड आहे १९४८ ते १९६७ या काळात अमेरिकाला आपल्या दरवाज्यावर आजुबाजुला लोकशाही+भांडवलशाहीचे सशस्त्र विरोधक बळकट होउ नये असे वाटले तर मी तरी अमेरिकेला दोष देत नाही. कशावरुन सर्व त्या छोट्या छोट्या देशांना एक राज्य व्हायचे होते? इथे भारतात अजुनही राष्ट्रीय एकात्मतेबद्दल ओरडून सांगावे लागते. भूतान, नेपाळ, ब्रम्हदेश, श्रीलंका भारतात सामील व्हायला प्रचंड उत्सुक असा मोठा मतप्रवाह होता / आहे का?

छोट्या राष्ट्रांनी एकत्र येउन सहकार्य करावे, संघटना बनवाव्या, शांतता ठेवावी, युद्धाने प्रश्न सुटणार नाही हे विचार १९४८- १९६७ मधे कविकल्पना नव्हत्या. जे काय 'चे' ला करावेसे वाटत होते ते फक्त शस्त्राने साध्य झालेही असते जसे रशीयाने केले पण नंतर त्या राजवटी कशावरुन सामान्य लोकांचे हक्क दडपणार्‍या झाल्या नसत्या? आणी तसेही का म्हणून अमेरिकेने सुखासुखी होउन द्यावे? विचार करा नेपाळ, भूतान, ब्रम्हदेश, बांगलादेश ह्या देशांच्या भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागात भारतीय प्रशासनाला सशस्त्र आव्हान देणार्‍या व भारताच्या ईशान्य भागात सक्रिय असलेल्या विविध अतिरेकी संघटनांच्या बिमोड होण्याकरता, आपल्याशी सहकार्य करणारी राजवट भूतान, ब्रम्हदेश, बांगलादेश मधे असावी असे भारत सरकार, तुम्हाला आम्हाला नाही वाटणार? मग अमेरिका किती वाईट किती वाईट सूर कशाला?

असो दुसरे महायुद्ध संपले तरी शीतयुद्ध चालू होतेच. त्याचा हा ही एक भाग. अमेरिका - सीआयए व त्यांचा पाठींबा असलेले सरकार म्हणजे सर्व जनतेला फटके मारुन बंधुआ मजदूर बनवून स्वता महालात केक खात असायचे असे (झोरो सिनेमा हॉलीवूड ) सरसकट चित्र मला मान्य नाही.

हजारो किमी सायकलप्रवास, बंधुभावाचा प्रसार, महारोग्यांसाठी कार्य ... वेट.. मला बाबा आमटे जास्त महान वाटतात. हेच कार्य करायला बंदूक, आपली सत्ता असावी असे त्यांना वाटले नाही. आज चित्र असेच दिसते लोकशाही असु दे हुकूमशाही त्या देशात नागरीक असणारच ज्यांना सरकार कायम चूकीचे व अन्याय करणारेच वाटणार.

निडर, छातीवर हसत गोळ्या झेलणे, सुखाचा त्याग इ इ वर्णन करुन नेत्यांना वलयांकीत करणे व ती निबंधीय भाषा मला पटत नाही. मी तर असेच म्हणेन चे ला हे सगळे लोकहितवादी कार्य करण्याचे इतरही मार्ग होते मग शस्त्रच का? शिवाय महान नेता तो जो फक्त तेवढ्यापुरता विचार न करता पुढेचे संभाव्य धोके पाहून योजना आखतो. नेहरूंनी फक्त स्वातंत्रलढाच दिला नाही तर देशाच्या सर्वांगीण विकासाकरता विचारपूर्वक मनापासुन प्रामाणीक प्रयत्न केले. मिळाले स्वातंत्र चला आता निवांत ऐश करुया केले नाही. स्वातंत्र लढा व उन्नत देश, समाज निर्माण दोन्ही कामे महत्वाची आहेत, अन्यथा स्वातंत्र कशाला मिळवायचे?

मला आजतरी नियंत्रीत लोकशाही+भांडवलशाही हेच मॉडेल पटते. हेच मॉडेल त्यातल्या त्यात कमी अन्यायकारक आहे, शांतता व सामान्य माणसाच्या विकासाठी प्रतिबद्ध आहे.

त्यामुळे इंद्रा तू जितका 'चे' मुळे भारावून गेला आहेस तितका मी नाही. सुख त्यांच्या दारात लोळत असताना बाहेर पडुन मोठे काम करणार्‍यात 'चे' आहे, 'ओसामा' आहे, 'बाबा आमटे' आहेत. हे तिघेही भिन्न प्रकृतीचे पण नेते / लिडर्स आहेत, त्यांना जे मनापासुन पटते ते झटून आपापल्या परीने यशस्वी करण्याचा जीवतोड प्रयत्न त्यांनी केला आहे. ह्या लोकांची महत्वाकांक्षा त्यांच्याकडून कार्य करवून घेते. पण इंद्रा तुझ्यासारख्याने अशा नेत्यांच्या कार्याचे योग्य मुल्यमापन केले पाहीजे इतकेच म्हणणे.

बास कंटाळा आला. विरोधातला मुद्दा मांडला आहे असे वाटते. पटलाच पाहीजे आग्रह नाही कारण शेवटी व्यक्तीस्वातंत्र आहे ;-)

(लोकशाहीचा कट्टर समर्थक) सहज

मारवा's picture

30 Sep 2015 - 10:17 pm | मारवा

इन्द्राज पवार
तुम्ही कुठे आहात ?

मार्मिक गोडसे's picture

1 Oct 2015 - 10:40 am | मार्मिक गोडसे

अत्यंत माहितीपूर्ण लेख.
टि शर्टवर 'चे' चा फोटो बघितला होता, परंतू फोटोतील व्यक्तीचा इतिहास ह्या लेखामुळे कळाला.
धन्यवाद इन्द्रराज साहेब व हा धाग वर आणल्याबद्दल धन्यवाद मारवा साहेब.

राजाभाउ's picture

1 Oct 2015 - 1:38 pm | राजाभाउ

अत्यंत माहितीपूर्ण लेख व त्यावरील प्रतीसाद म्हणजे मेजवानी